मुक्काम पोस्ट शर्यतीचे बॉस्टन

  • हाता तोंडाशी आलेला घास कोणीतरी काढून घ्यावा
  • पंगुं लंघयते गिरीम….
  • गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेलव्ज
  • अ स्टॉर्म बिटवीन कप ऍन्ड लिप्स
  • प्रत्येकाचे दु:ख निराळे…

म्हणी, वाकप्रचार, सुभाषितांची ही जंत्री पाहून एखादा संग्रहच आता वाचायला लागणार की काय अशी भिती वाटण्याची शक्यता आहे. पण ह्या अशा आणि आणखी काही वचनांची प्रचिती, ज्युली विन्डसरचा पराक्रम, तिची गोष्ट ऐकल्यावर यॆईल.

ज्युलीने ८-९ वीत असताना क्रॉस-कंट्री शर्यतीत भाग घेतल्यापासून तिला पळण्याची आवड निर्माण झाली. तेव्हापासून तिने धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला सुरवात केली. कॉलेजच्या पहिल्या वर्षापर्यंत ती भाग घेऊन धावत असे. हायस्कूलमध्ये असतानाच तिने निश्चय केला होता.”मी बॉस्टनच्या मॅरथॉनमध्ये भाग घेणार.”
पण हे सोपे नव्हते. बॉस्टनच्या शर्यतीत कुणालाही असा थेट भाग घेता येत नाही. विशिष्ठ वेळेत तेव्हढे अंतर पार करण्याची पात्रता गाठावी लागते.

ज्युलीने त्यासाठी अशा तऱ्हेच्या लांब पल्ल्याच्या शर्यतीत धावायला सुरुवात केली. २०१० मध्ये तिने एक मॅरथॉन चार तासात पूर्ण केली. त्या नंतर २०१२ मध्येही न्युमोनिया सारख्या आजारातून नुकतीच उठली असतानाही तिने एक मॅरथॉन पूर्ण केली. आणि आपल्या गटात ती बॉस्टनच्या शर्यतीसाठी ती पात्र ठरली!

यंदा तिला खात्री होती कि आपल्या गटात ती पहिली येणारच. तसे तिने आधीच ठरवले होते. त्यासाठी तिने जानेवारीपासूनच १६ आठवड्यांच्या खडतर सरावाची सुरवात केली. आठवड्यातले दोन दिवस ती मोठ्या वेगाने पळत असे. नंतरचे दोन दिवस ती १०, १३ मैल पळायची. शनिवारी ती मग कधी सतरा तर कधी अठरा मैल धावायची. हे सर्व करत असताना ती रोज एका मोठ्या रुग्णालयात आणि महाविद्यालयात जाऊन वैद्यकीय सहाय्यक या शिक्षणक्रमाचा अभ्यासही करत असे.

बॉस्टनच्या मॅरथॉनच्या दिवशी ज्युली विन्डसर मोठ्या उसाहात होती. ती म्हणाली,” प्रत्यक्ष शर्यतीच्या दिवशी मनावर कसलेच दडपण नसते. ताण तणाव नसतो. शर्यतीच्या पूर्वीचे ते सरावाचे दिवसच फार कष्टाचे असतात. आज काय नुसते धावायचे-पळत रहायचे.”

तिला उत्तेजन देण्यासाठी, तिचा उत्साह कायम ठेवण्यासाठी ज्युलीबरोबर तिचा नवरा, सासूबाई आणि तिची आई आली होती. त्यांच्यापेक्षाही शर्यतीच्या मार्गावर दुतर्फा जमलेले लोकच ज्युलीचे प्रत्येक टप्प्यावर टाळ्या वाजवून, हात उंचावून “गो ज्युली गो”, रन ज्युली,हाय ज्युली” असे ओरडत होते. वर्तमानपत्रांनी आदल्या दिवसापासून ज्युलीला मोठी प्रसिध्दी दिली होती. त्यामुळे अनेकांना ती माहित झाली होती.

शर्यतीला सुरुवात झाली. आठव्या मैलावर ज्युलीची पाठ अतिशय दुखायला लागली. असह्य कळा वेदना सुरु झाल्या. असे तिला बरेच वेळा बाराव्या मैलावर व्हायचे. पण नेमके आज तिला इतक्या लवकर त्रास व्हायला लागला. जवळच्या लोकांनी तिला मलम लावले. तिने आपल्या गोळ्या घेतल्या. आणि ज्युली पुन्हा धावायला लागली. ज्युली पळतच राहिली. ९-१० मिनिटात एक मैल या वेगाने ती धावत होती. इतर स्पर्धकांच्या बरोबरीने धावत मैला मागे मैल मागे टाकत होती. २५ व्या मैलापाशी आले की वेग वाढवायचा. पायात गोळे आले होते. ठणकत होते. वेदना फार होत होत्या. मागे फिरावे, इथेच थांबावे असे वाटत होते. तरीही ज्युली निश्चयाने पळत राहिली. २५.७ मैलाच्या टप्प्यापाशी आली. आणि आता तर फक्त अर्धा मैलच राहिलाय की! आता जोरात मुसंडी मारून पुढे जायचे. बरे झाले! आपण नवऱ्याला आईला सांगून ठेवले, ” तुम्हाला माहित आहे ना? शर्यतीत मी नेहमी मार्गाच्या उजव्या बाजूनेच धावते. तुम्ही उजव्या बाजूलाच, शेवटच्या रेषेजवळपास थांबा.” आता ज्युली आणि इतर स्पर्धकही जोरात पुढे जाणार तोच, ” थांबा! थांबा! मागे व्हा! पळा ! मागे फिरा! शर्यत थांबवलीय! पुढे बॉम्बस्फोट
झालाय!” असे म्हणत पोलिसांनी संपूर्ण रस्ता आडवून धरला होता.

एका क्षणापूर्वी “आपण आता शर्यत जिंकलीच!” “आपल्या गटात मी पहिली!” “बॉस्टन मॅरथॉनमध्ये मी पहिली!” असे छाती धडधडत असतानाही आनंदाने म्हणणारी ज्युली आता घाबरून, धसक्याने छाती धडधडत इतरांबरोबर मागे पळत, धडपडत फिरली!

पुढे बॉम्बस्फोट झालाय म्हणजे .. म्हणजे नवरा, सासूबाई आपली आई सर्व कुठे असतील? कसे असतील? कुठे भेटतील? भेटतील का? अशा विचारांच्या गर्दीत ज्युली मागे मागे जात होती.
बरे झाले! ज्युलीचा नवरा, आई, आणि सासू अगोदर बरेच पुढे थांबले होते. पण ज्युली नीट दिसावी, लवकर दिसावी म्हणून थोड्या वेळापूर्वीच ते तिघेजण बरेच जवळ येऊन थांबले होते.. पहिल्या ठिकाणीच थांबले असते तर? त्याच ठिकाणी समोरच बॉम्बस्फोट झाला होता! बघा, देव तारी त्यांना कोण मारी!
ज्युलीला आपले पदक हुकले याचे वाईट वाटले असणारच.

कालपासून ज्युलीला प्रसिध्दी मिळाली होती. वाटेवरचे लोक टाळ्या वाजवून तिचे स्वागत, कौतुक करीत होते. तिचा उत्साह वाढवत होते. ह्या सर्वाच्या पाठीमागे कारण होते. कारण २६ वर्षाची ज्युली विन्डसर फक्त, फक्त तीन फूट नऊ इंच उंच होती! (बॉस्टनच्या मोबिलिटी-इंपेअर्ड डिविजन या गटात तिची गणना आहे. तसेच ती मेडिकली डायग्नोज्ड फॉर्म ऑफ ड्वार्फिझमनुसार ती ड्वार्फ आहे.)

शाळेपासून ही बुटकी ठेंगणी गिड्डी ज्युली इतर धडधाकट सर्वसाधारण (नॉर्मल) स्पर्धकांबरोबर धावते. आजही १५ एप्रिल २०१३ च्या प्रख्यात बॉस्टन मॅरथॉन शर्यतीत लहान, सुंदर ठेंगणी ठुसकी ज्युली इतर सर्वसाधारण धडधाकट स्पर्धकांबरोबर धावत होती. यथावकाश ज्युलीची आणि तिच्या कुटुंबाची भेट झाली.

बॉस्टनच्या शर्यतीमुळे ठेंगणी ज्युली विन्डसर एका दिवसात फार, फार, खूप उंच झाली! आता आपल्याला तिच्याकडे खाली वाकून नाही तर तिच्यापुढे आपली मान झुकवून पहावे लागते!

बॉस्टन-मॅरथॉनच्या आयोजकांचेही कौतुक करायला हवे. ज्यांनी २५.७ मैलाचा टप्पा गाठला त्या सर्वांना त्यांनी पदक दिले. अर्थातच ज्युली विन्डसरलाही पदक मिळालेच!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *