Monthly Archives: September 2018

‘पेढे’ गावच्या आठवणी

WhatsApp वर जलदीने दूध नासवून केलेल्या धारवाडी पेढ्यांचे फोटो टाकले होते. पेढ्यांसाठी इतके चांगले आणि भरपूर दूध नासवणे आणि त्याचे पनीर किंवा पेढे करणे हे मला खटकते.

नासवून ते इतके देशस्थी रंगाचे पेढे करण्यापेक्षा दूध आटवून आटवून आटवून घट्ट करून खरपूस बदामी रंगावर आणले तरी ते धारवाडी इतकेच किंवा फार तर दावणगिरे मुंगळहट्टी सारखेच खमंग व चविष्ट होतील! बडोद्याचे दुलीचंदचे पेढे चवीला हुबेहुब धारवाडी मिश्राच्या पेढ्यासारखेच असतात. पण थोड्या उजळ रंगामुळे उजळमाथ्याने परातीत विराजमान असतात. दूध नासले तर मी कलाकंद करत असतो.शतावधानी असल्याने आठवड्यातून चार दिवस मला उत्तम कलाकंद खायला मिळायचा. उरलेले तीन दिवस दूध उतू जायचे; त्यामुळे मला रोज दिवसातून तीन चार वेळा दूध आणायला तीस पायऱ्या चढ-उतार करून जावे लागे. कुणी माझ्याकडे केव्हाही आले तरी दूध असेच. फक्त नासलेले किंवा उतू गेलेले! हा अगदी परवा परवा २३ जुलै१९१८ पर्यंतच्या भूतकाळातीलच इतिहास आहे. अखेर आपल्याकडे कुठल्याही इतिहासाची परंपरा गौरवशालीच असते तशी माझ्या कलाकंदाचीही आहे !

कालच भंडाऱ्याच्या शंभर वर्षाची परंपरा असलेला “राणी” पेढ्याचा व्हिडिओ पाहिला.त्यात पाककृती अशी नाही. इतकेच काय शब्दही एखादाच आहे.पण ते राणी पेढे कसे करतात तेव्हढे दिसले.

पेढ्यांचेही किती प्रकार ! औरंगाबादचे अप्पा हलवाईचे पेढे. हे गोळ्यांसारखे आता करत असतील पण पूर्वी ते द्रोणात मोठ्या चमच्याने लावून देत असत. चवीला बरेचसे सोलापूरच्या स्वस्तिकच्या कुंद्यासारखे खमंग. छानच. त्याच पद्धतीचे पण पेढ्याच्या रुपातले कुंथलगिरीचे पेढे. तेही तितकेच स्वादिष्ट,मस्त. अगदी five starबसेसही तिथे थांबतील मग आमच्या सर्वांसाठी असलेल्या सर्वमान्य तांबड्या येष्टी का नाही थांबणार ? कुंथलगिरी खवा व पेढ्यांचेच गाव आहे असे वाटण्या इतकी तिथे खव्या पेढ्यांची दुकाने व विक्रेते आहेत!

पूर्वी सोलापूरला बदामी पेढा मिळत असे. तो चांगला साधारण तळहाता एव्हढा मोठा असे. आकार बदामाचा, त्यात असली तर बदामाची एखादी पातळशी पाकळी. वयाचीच चव त्यात भरपूर असली तरी तो पिवळ्या रंगाचा पेढा चवीला उत्तम असे. पण तो लवकरच लुप्त झाला. बालपणासारख्या सर्व चांगल्या गोष्टी अल्पकाळच असतात. सध्या राजकोटी पेढा पुण्याला मिळतो. त्यालाच काका हलवाई जम्बो पेढा म्हणतात. मलई पेढा आहेच. सर्वांना मथुरा कंस किंवा कृष्णामुळे माहित नसते पण तिच्या पेढ्यांमुळेच जास्त ती जास्त माहित आहे. कुठे मथुरा आणि कुठे सोलापूर! पण सोलापुरचे सगळे पेरूवाले आपले पेरू “लै गोड! आल्ल्ये मथुरेचे प्येढ्ये” ऐेSय मथुर्रेच्चे पेढ्ये ” म्हणतच पिवळे जर्द पेरू विकत. लोकही ते मथुरेचे पेढे म्हणूनच खात!

मलई पेढ्यांची देशी आवृत्ती म्हणजे सध्या ज्याला दुधाचे पेढे म्हणतात ते.पण दुधाचे पेढे आमच्या जळगावचे भावे करीत. ते उत्तम असत. भावे,मी जिथे राहात असे त्याच्या तळमजल्यावर होते. दुधाचा व्यवसाय होता त्यांचा. सोलापूरला घरी जाताना मी बरेच वेळा ते नेत असे. त्यांचे नाव बाळ असले तरी आडनाव भावे असल्यामुळे आधी आॅर्डर नोंदवल्याशिवाय (तोंडी सांगितले तरी चालेल ही मोठी सवलत होती) मिळत नसत. सर्व काही आटोपशीर असल्यामुळे जास्तीत जास्त अर्धा किलोचीच आॅर्डर ते घेत. तीही फक्त एकाच गिऱ्हाईकाची! पण पेढे मात्र भरपूर खावेसे वाटण्या इतके उत्तम असत.

काही चांगल्या पेढ्यांत सोलापूरच्या दूध पंढरीचे आणि कऱ्हाडच्या सहकारी डेअरीच्या पेढ्यांचाही समावेश करावा लागेल.
कऱ्हाडवरून साताऱ्याच्या कंदी पेढ्यांची आठवण झाली. कंदी ही पेढे बनविण्याची पद्धत आहे की ते बनवणाऱ्या साताऱ्याच्या मूळ हलवायांचे नाव आहे हे सांगता येत नाही इतके कंदी नाव साताऱ्ऱ्याच्या पेढ्याशी निगडित आहे. त्याचा पोत स्वााद वेगळाच व अप्रतिम असतो. किंचित कडक वा टणक पण आतून मऊ, कळत न कळत लागणारी जर्राशी आंबूस चव. इंग्रजीत जसे hint of… म्हणतात तशी.कंदी साताऱ्याचे पण आमची आणि त्यांची ओळख आबासाहेबांनीलहानपणी करून दिली; ते एम. दिगंबरच्या (नव्यापेठेतील) स्टोअर्स मधून हे कंदी पेढे आणत. नेहमी मिळत नसत. बहुधा एम दिगंबर साताऱ्याला त्यांच्या नातेवाईकांकडे जात असतील तेव्हा परतताना, त्यांच्यासाठी दिलेलेच हे विकत असतील!!

कुंथलगिरी गावासारख्याच दोन लहान गावांचाही नावे त्यांच्या प्रसिद्ध पेढ्यांसाठी घेतली जात त्यांचाही आवर्जून उल्लेख केला पाहिजे. ती दोन्ही गावे लहान रेल्वे स्टेशनची आहेत. दोन्ही विरुद्ध दिशेला. एक म्हणजे जवळचे मोहोळ आणि दुसरे तडवळ. मोहोळ माहितच आहे. तडवळ हे पूर्वीच्या एमएसएमवरील म्हणजे सध्याच्या दक्षिण रेल्वेवरील लहानसे स्टेशन.सोलापूर विजापूर मार्गावर आहे. पण आम्हाला ते आमच्या आईच्या रामूमामांच्या मंगरूळ गावामुळे तडवळ स्टेशन माहित आहे. दोन्ही स्टेशनवर गाड्या थांबल्या,अर्थात पॅसेंजर गाड्याच, की बहुतेक प्रवासी,डब्याला आग लागलीय की काय वाटावे अशा तातडीने पटापट उतरून (बहुतेक अग्रवालचेच हे स्टाॅल असावेत) चहाच्या स्टाॅलकडे पेढ्यांसाठी पळत सुटत! अशी घाई नंतर पुढे कर्जत स्टेशन आले की लोक दिवाडकरांच्या बटाटे वड्यासाठी पळत सुटत तेव्हा पाहिली. दोन्ही स्टेशनचे पेढे चांगलेच असत. काही स्टेशनावर गाड्या इंजिनमध्ये पाणी घेण्यासाठी थांबायच्या तशा मोहोळ आणि तडवळला पेढ्यांसाठी थांबत. गाडी किती वेळ थांबते इथे असे कुणी विचारले तर सर्वांचे पेढे घेऊन होईपर्यंत हेच उत्तर गार्डकडूनही मिळे!

कंदी पेढ्यांशिवाय पेढे प्रकरण पूर्ण होत नाही तसेच नाशिकचे प्रख्यात हलवाई पांडे यांचे पेढे खाल्याशिवाय लेख पूर्ण होणे शक्य नाही.

खरे सांगायचे तर प्रत्येक गावात चांगले पेढे मिळत असतातच. व तिथे ते प्रसिद्धही असतात. येव्हढेच कशाला जत्रेतल्या कापडाच्या छपराखालचे किंवा आठवडी बाजारातले अॅल्युमिनियमच्या परातीत रचून ठेवलेले आणि धुळीची किंचित पावडर लागलेले पेढेही ,”बाबा पेढा घ्ये की” म्हणणाऱ्या लेकराकडे दुर्लक्ष करून तेलकट दोरी गळ्यात बांधलेल्याबाटलीत ‘अदपाव त्येल’ , लाल मिर्च्या आणि मोठ्या फडक्यात किलो दोन किलो ज्वारी बांधून झाल्यावर परतताना त्या कापडी टपरीपाशी थांबून पोरासाठी दोन प्येढ्ये आणि पै-पैशाची गुडीशेव बांधून घरी नेणाऱ्या वाडी वस्तीतल्या रोजगार हमीच्या कामगारांसाठी,तो धुळीचा हलकासा मेक अप केलेला पेढाही तितकाच प्रसिद्ध आणि गोड असतो!

चार दिवस गॅदरिंगचे – २

रेडवुड सिटी

आमच्या शाळेच्य गॅदरिंगच्या जेवणाचे व अल्पोपहाराचे वर्णन करताना गॅदरिंगचे आणखी एक वैशिष्ट्य ध्यानीं आले. गॅदरिंगला शाळा आम्हाला सिनेमा दाखवत असे. कुठे मैदानात किंवा शाळेच्या सभागृहात, त्या १६मिमि पडद्यावर नाही. चांगल्या सिनेमा-थेटरात दाखवत असे! भागवतमध्ये असला तर चित्र मंदिर,कलाआणि छाया ह्या त्यांच्या तिन्ही टाॅकीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळी तो पहायला मिळे. (त्यांचे उमा चित्र मंदिर बांधून झाले नव्हते.) प्रभात मध्ये असला तर मात्र दोन खेळ करावे लागत. ही झाली रुक्ष आकडेवारीसारखी माहिती. खरी गंमत होती ती आमची गर्दी पाहण्याची आणि वाहत्या वाऱ्यासारख्या एकामागून एक ऐकू येणाऱ्या गप्पांच्या त्याबरोबरच्या हसण्याच्या अनेक तऱ्हांच्या,आरोळ्या,व एकमेकांना पाहिल्यावर मारलेल्या असली हाकांच्या लहरी कानांवर झेलण्याची ! पाखरांच्या शाळेतही एव्हढा उल्हास असणारी व आनंद देणारी कलकल निनादत नसेल.

भागवत थिएटरचे आवार त्यामानाने मोठे. ते तर फुलून जायचेच पण कला व चित्रमंदिराच्या मधल्या बागेजवळची बेताची मोकळी जागाही रिकामी राहात नसे. तीच गोष्ट प्रभातची. प्रभातची लाॅबी आणि समोरची आयताकार प्रशस्त मोकळी जागा मुलांनी तुडुंब भरून जाई. दाटीवाटी-खेटाखेटी,रेटारेटीचे कुणाला काही वाटत नसे. तरी गप्पात रंगलेल्याला धक्का लागला तर एखादाच कुणी,”अब्ये लई ताकद आली का बे?” ए सुकड्या,दिसत नाही का तुला?”त्यावर हा सुक्कड लगेच,” दिसायचं काय त्यात बे? तू कुणाला नाही दिसणार बे ढब्ब्या !” हा संवादऐकल्यावर भोवतालची सात आठ पोरं मोठ्यांदा हसली की इतरही काही कारण नसता मोठ्यांदा हसायची की लगेच सगळी गर्दी हसत सुटायची ! पण तोपर्यंत “सुक्कड हाॅकीस्टिक ”आणि “तो फुटबाॅल”हसत खेळायलाही लागलेले असत!

आत गेल्यावर मग जागा धरून ठेवलेली पोरे दोस्तांच्या नावाने हाकारा सुरू करत.सिनेमा सुरू झाला तरच शांतता होईल ह्या भरवशावर मास्तर सिनेमा सुरु कारायला सांगत. ही शांतता काही वेळ प्रस्थापित होत असे. पण गाजलेले गाणे सुरु झाले की कुठून तरी ,” अरे जाधव मस्त म्हणतो हे गाणं.” असा आवाज आला की जाधव आणखी आग्रहाची वाट न पाहता लगेच सुरु करायचा म्हणायला. लगेच दुसऱ्या वर्गांचा अभिमान उसळून यायचा की एकदम चार पाच जाधव ते गाणं म्हणू लागायचे . बाकीची आम्ही ‘वगैरे” पोरं ठेका धरायला होतोच की! तीन मिनटाचे गाणे सहा मिनिटांची LPव्हायची! गंभीर किंवा करूण ‘सीन’ आला की वरच्या मजल्यावरील एखादा प्रोजेक्टरच्या झोतात, हातांनी बोटांनी’पक्षी उडतोय, हरिण,किंवा मासासळसळसतोय’ ‘ हा खेळ सावल्यांचा’ करत असे.शिक्षकांनी पाठीत रट्टा घातला की हा खेळ बंद व्हायचा.

सिनेमा काही जणांनी अगोदर पाहिला असला तर पुढचे डायलाॅग अगोदरच ऐकायला लागायचे! गाणे आले की कुणी जाधव-देशपांडे-इनामदार असे बरेच सवाई रफी,फर्माईशीची वाट न पाहता गाणे म्हणायलाही लागत. तर “चूल आणि मूल” असला तर अगोदरच सर्वतोमुखी झालेले दामुअण्णा मालवणकरांचे “अगं माया आवर,आवर” आले की प्रोजेक्टरच्या प्रकाश-झोतात तेच वाक्य ‘माया’च्या जागी निरनिराळे पाठभेद घालून भिरभिरत विहरत असत!

एरव्ही चार मुलांसमोर, घाबरून धड नीट न बोलणारेही सिनेमाच्या अंधारात मात्र आपापले विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम साजरे करीत ! सिनेमा संपल्या नंतरही मजा पुढे चालूच असे.सिनेमातले संवाद म्हणताहेत, तर कुणी गाण्यांच्या ओळी गुणगुणताहेत;,बरेच जण हसत खिदळत गप्पाटप्पा करत घोळक्या टोळक्यांनी,कुणाच्या खांद्यावर हात टाकून, काही एकमेकांना ढकलत चालले आहेत; काही जवळच्या घरी ठेवलेल्या सायकली आणून टांग मारत “जातो बे” म्हणत निघालेही असतात! अशा तऱ्हेने रमत गमत सगळे घरी परतायचो आम्ही.

गॅदरिंगचा सिनेमा ही सर्वांनाच एका शुद्ध,निर्भेळआनंदाची आणि करमणुकीची मेजवानी असे.

गॅदरिंगच्या अल्पोपहारासारखा सिनेमाही अल्पकालीनच ठरला. फार तर दोन तीन वर्षेच टिकला. पण कधीच flop झाला नाही; तो hit च ठरला!

चार दिवस गॅदरिंगचे – १

रेडवुड सिटी

आमच्या ऱ्शाळेने काही अतिशय चांगल्या गोष्टी आमच्या आठवणींसाठी दिल्या; त्यात गॅदरिंगमध्ये होणारी विद्यार्थ्यांनी कामे केलेली व वा.शि.आपटे , आमचे पद्माकर देव व गो.रा. कामतकर यासारख्या उत्तम दिग्दर्शकांनी बसवलेली आजी आणि माजी विद्यार्थी विद्यर्थ्यांनीवेगवेगळी बसवलेली त्या काळची उत्तमोत्तम नाटके, संगीतिका ह्यांची मेजवानी दिली. संशयकल्लोळ. आचार्य अत्र्यांची साष्टांग नमस्कार, लग्नाची बेडी उद्याचा संसार, कवडी चुंबक तर मो.ग. रांगणेकरांचे कुलवधु व त्यांच्या तुझं नि माझं जमेना ह्या सारख्या तीन एकांकिका तर झुंझारराव सारखे शेक्सपिअरचे जबरदस्त पण देवलांनीही त्याच ताकदीने केलेले हे रुपांतर तितकेच प्रभावीपणे बसवून सादर करणारे आमचे शिक्षक-दिग्दर्शक व विद्यार्थी -नटांची नाटके पाहणे हा अवर्णनीय आनंद होता.

त्याच बरोबर पं.जगन्नाथबुवा पंढरपुरकर, मा. कृष्णराव, पं.नारायणराव व्यास, पं विनायकबुवा पटवर्धन यांच्यासारख्या नावाजलेल्या गवयांच्या मैफिली ऐकण्याचे भाग्य लाभत होते. तेही फक्त चार आण्यांच्या वर्गणीत! भाग्य भाग्य म्हणजे ह्यापेक्षा काय निराळे असते?!

मी हरिभाईमध्ये जाण्या अगोदर काही वर्षे शाळेच्या गॅदरिंगची सांगता अतिशय उत्कृष्ट जेवणाने होत असे. जेवणातील बेत, काही पदार्थांची वर्णने दोन चार दिवस ऐकायला मिळत असत. पण मी त्या प्रख्यात शाळेत गेलो त्यामागे गॅदरिंग व त्यातले हे जेवण मुख्य कारणे होती. पण काय ! आमची बॅच शाळेत आली ती दुसरे महायुद्ध संपत येण्याच्या काळात. कुठले जेवण असणार. खराच हिरमुसला झालो. तरीही पहिली एक दोन वर्षे तरी शाळेने अल्पोपहार नावाचा भरगच्च असा फराळ दिला. मस्त असायचे सगळे पदार्थ.

दीड-पाउणे दोन हजार विद्यार्थी पन्नास पंचावन्न शिक्षक गडी-शिपाईअशी भरपूर लोकसंख्या असे.
हा कार्यक्रम आमच्या शाळेच्या भव्य मैदानावर होत असे.विद्यार्थ्यांच्या दोन रांगा पीटी ला बसल्यासारख्या समोरासमोर तोंडे करून त्यांच्याच पाठीला पाठ लावून समोरासमोर बसलेल्या दोन रांगा. अशा पद्धतीने किती रांगा! काही वर्ग आणि शिक्षक वर्तुळाकारात बसलेले. काही विद्यार्थिनी व शिक्षक वाढायला असत. मुली वाढायला साव्यात असे सर्वच रांगांना वाटत असे. पण आमच्यासारख्या भिकार c-grade सिनेमाच्या टुकार हिरोंच्या वाट्याला गणिताचे, सायन्सचे आणि भूगोलाचे ‘सेकंड रन’ सिनेमाचे मास्तर येत. त्यामुळे पदार्थ कठिण आणि अवघड जाऊ लागले. पण त्यावर आमचा उपाय काढला. आम्ही पलीकडच्या मुली वाढणाऱ्या रांगांकडे पाहात प्रत्येक पदार्थ मग तो कसाही,अगदी गोड असला, तरी गोड मानून खात असू. पण दडपून खात असू!

अल्पोपहाराचे हे दृश्य खरोखर प्रेक्षणीय असे. कर्व मैदानात नाही पण एक दोन बाजू पतंगीच्या रंगीत त्रिकोणी कागदांच्या फडफडणाऱ्या पताकांच्या माळा, ठसठशीत अक्षरातील शब्दांच्या ओळी प्रमाणे बसलेले विद्यार्थी, त्यात मधूनच एक दोन गोलाकारात बसलेली विद्यार्थी, शिक्षक आणि त्या ओळीतून होत असणाऱ्या लगबगीच्या हालचाली हा पाहण्यासारखा देखावा असे. कॅमेरे फोटो ह्या देवदुर्लभ वाटणाऱ्या गोष्टी. मग हवाई चित्रिकरण कुठले! पण कुणी तसे ते टिपले असते तर आजही गुगलला किंवा गेट्टीला आपल्या मुकुटातले मानाचे शिरपेच वाटावे असे ते फोटो असते!

पण कितीही असले तरी सुखाचे दिवस थोडेच तसा हा अल्पोपहाराचा कार्यक्रमही दोन वर्षेच टिकला. गॅदरिंगचा अल्पोपहार बंद झाल्यावर ते भव्य मैदान आणखीच मोठे वाटू लागले!