Monthly Archives: February 2022

यशस्वी लोकांची मनोगते


मागच्या लेखांत विविध क्षेत्रातील काही नामवंत काय वाचतात , त्यांच्या आवडीची पुस्तके ह्या संबंधी वाचले. टिमोथी फेरिसने शंभराच्यावर नामवंताना बरेच प्रश्न विचारले होते. त्यामध्ये त्यांची आवडीची पुस्तके व ती का आवडली, तसेच त्यांना जर त्यांच्यासाठी स्वतंत्र मोठा जाहिरात फलक दिला तर त्यावर काय लिहाल ? त्यांची उत्तम गुंतवणूक कोणती? नव्या पदवीधारकांना, तरुणांना काय सांगाल? असेही काही प्रश्न विचारले होते. त्यावर ह्या मोठ्या यशस्वी लोकांनी काय सांगितले तेही आपण आज वाचणार आहोत.


नवल रविकांत हे मूळचे हिंदुस्थानचे पण ते बऱ्याच काळापासून अमेरिकेतच आहेत. तेही यशस्वी गुंतवणुकदार आहेत. त्यांनी सुमारे दोनशेच्यावर कंपन्यांत, त्या अगदी बाल्यावस्थेत असल्यापासून,गुंतवणुक केली आहे. त्यापैकी काही कंपन्यांची नावे सांगायची तर Opendoor, Postmates , Uber, FourSquare , Twitter, Snapchat अशी सांगावी लागतील.


नवल रविकांत ह्यांची उत्तम गुंतवणूक म्हणजे पुस्तके !पुस्तकांचे, वाचनाचे महत्व सांगताना ते म्हणतात की, , “ वाचनाची आवड असणे आणि ती जोपासणे म्हणजेच वाचन हे मोठी शक्ती आहे. वाचन तुम्हाला सामर्थ्यवान बनवते. मी शाळेत असल्यापासून “ आवश्यक वाचन” (Required Reading) पुस्तकेच नाही तर इतरही अनेक पुस्तके वाचत असे.कधी काही एक उद्देशाने तर बरीच सहजगत्याही वाचली. आज आपल्या हाताशी पुस्तकांचा महासागर आहे. पण ती वाचण्याची इच्छा, उर्मी हवी. वाचनामुळे आपण निश्चित शिकत असतो. त्या साठी इच्छा तळमळ हवी. ती तुमच्यामध्ये येऊ द्या. वाचनामुळे तुम्हाला काय हवे, काय करावे, कोण व्हावे ह्याची जाणीव होते. तशी ती होऊ द्या. वाचा.”


कॅालेजमधून नुकतेच बाहेर पडलेल्या तरुणांना काय सांगाल ह्यावर ते म्हणाले,” तुम्हाला जे करावेसे वाटते , मनापासून तीव्रतेने वाटते ते करा. पण ते करताना एक गोष्ट सतत ध्यानात ठेवा. कोणत्याही गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते. वाट पाहाण्याची शक्ती असू द्या.जे करायचे ते करताना चिडचिड , चिंतेने अस्वस्थ होऊन करू नका.” “ बातम्या , कुरकुर करणारे, संतापी प्रक्षुब्ध लोकांकडे दुर्लक्ष करा, दूर राहा” असेही ते सांगतात. हे सांगत असतानाच कोणतीही अनैतिक, अनीतीची गोष्ट कधीच करू नका, तसे वागूही नका.” असेही ते बजावतात.


ह्याच प्रश्नाला उत्तर देताना प्रख्यात पाकशास्त्रातील तज्ञ आणि तिच्या पाककृतींच्या पुस्तकांमुळे नावारुपास आलेली सेमीन नुसरत सल्ला देते की,” प्रसंगी गोंधळून जाल , शंका,संशयांत पडाल तेव्हा तुमच्यामधील दयाळूपणा, करूणा आणि चांगुलपणाचा आधार घ्या. त्यांनाच प्राधान्य द्या.”


Floodgates चा संस्थापक माईक मेपल्सला सांगितले की तुम्हाला तुमचा स्वतंत्र मोठा जाहिरात फलक दिला तर तियावर काय लिहाल? त्यावर त्याने दिलेले उत्तर लक्षात ठेवण्यासारखे आहे “ सचोटीच्या मार्गाने जा. तुम्ही कधीच रस्ता चुकणार नाहीत!”


तर ह्याच प्रश्नाला उत्तर देताना SalesForce ह्या प्रख्यात कंपनीचा अध्यक्ष आणि मुख्य कार्याधिकारी मार्क बेन्यॅाफ Marc Benioff म्हणतो , “बालवाडी ते १२ वी एक शाळा दत्तक घ्या” अर्थात हे ज्यांना सहज शक्य आहे अशा धनवंतांना तो सांगत असावा. पण उदात्त, आणि समाजाला उपयोगी असा सल्ला आहे ह्यात शंका नाही. विशेष म्हणजे ‘ आधी केले मग सांगितले’ असा तो माणूस आहे.


जिचा MarieTV कार्यक्रम हा खूप लोकप्रिय आहे, तसेच प्रख्यात B-School ची संस्थापिका मेरी फर्लियोने सांगितले की तिची आई नेहमी सांगत असे तेच वाक्य मी वचन म्हणून माझ्या जाहिरात फलकावर लिहिन. “कोणत्याही अडी अडचणीच्या वेळी , बिकट न सुटणारा प्रश्न, संकट आले की आई म्हणायची ,” Everything is ‘figure-out-able’ ! “ ती पुढे म्हणते घरांतील आम्हा सर्वांसाठी तिचे हे सांगणे मार्गदर्शक झाले आहे. कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतोच! साधे, रोजचे वाटणारे हे बोल किती आश्वासक धीर देणारे आहेत. तिच्या आईचा ‘फिगरआऊटेबल’ शब्द वाचला तेव्हा मला आपण गमतीने किंवा सहजही ‘ परवडेबल’ म्हणतो त्याची आठवण झाली.


मागील लेखात काईल मेनर्डविषयी(Kyle Maynard) विषयी वाचले. खास त्याच्यासाठीच जर मोठा जाहिरात फलक मिळाला तर तो म्हणतो की त्यावर त्याचा नौदलातील श्रेष्ठ वीरपदक मिळवणारा मित्र Richard Machowicz म्हणत असे तेच, कुणातही वीरश्री निर्माण करणारे, वचन मी लिहिन. ” Not Dead, Can’t Quit !” “मारता मारता मरेतों लढेन “ किंवा मराठी वीर सरदार दत्ताजी शिंदें ह्यांनी पानिपतच्या रणभूमीवर अखेरच्या क्षणी सुद्धा जे उत्तर दिले त्या “ बचेंगे तो और भी लढेंगे” ह्या वीरवचनाची आठवण करून देणारे हे स्फूर्तिदायक वचन आहे !


काही नामवंतांनी ते मोठ्या फलकावर काय ते लिहितील हे सांगितले. पण आपल्याला बरेच वेळा मोठमोठ्या फलकांचा त्रास वाटतो; उबगही येतो. हे दोन्ही बाजूंचा देखावा , दृश्य, पाह्यला अडथळा आणणारे, बटबटीत, वाहन चालवणाऱ्यांचे लक्ष विचलित करणारे फलक नको वाटतात. काढून टाकावेत असे वाटते. अगदी असेच, लेखक,व चित्रपट कथा पटकथा लेखक, जाहिराती उत्तम लिहिणाऱ्या Steve Pressfield ह्यालाही वाटते. तो म्हणतो,” अगोदर मला असा फलक कुणी देणार नाही. दिला तरी तो मी घेणार नाही.उलट तो मी ओढून खाली पाडून टाकेन. दुसरे ही असे फलक मी पाडून टाकेन.”


पण ह्यापेक्षाही आणखी काही प्रेरक विचार वाचायला मिळतील. “ मैदान सोडून पळून न जाणे हाच यश आणि अपयश ह्यातील फरक आहे” किंवा प्रसिद्ध टेनिसपटू विजेती मारिया शारापोहव्हा जेव्हा ,” पराभवानंतर जितका विचार करते तेव्हा तितका विजयानंतर होत नाही.” हे सुभाषितासारखे बोलून जाते तेव्हा आपणही त्यावर विचार करू लागतो. निदान,” खरे आहे.” इतके तरी म्हणतोच..


टिमोथी फेरिसच्या The Tribe of Mentors मध्ये Affirm ह्या कंपनीचा सह संस्थापक मॅक्स लेव्हशिन Max Levchin , ; न्यूयॅार्क टाईम्सचा सतत आठ वेळा सर्वाधिक खप Best Seller असलेला लेखक Neil Strauss; हॅालिवुडमधील नट व एकपात्री विनोद वीर, Joel Mettale ; नट दिग्दर्शक Ben Stiller ; आणि आणखीही बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींनी आपले विचार मांडले आहेत. सर्वांचा परामर्श घेणे शक्य नाही.


“ तुमची सर्वांत उत्तम गुंतवणुक कोणती?” ह्या प्रश्नाला Mike Maples ह्याने दिलेल्या, सर्वांना पुन्हा अंतर्मुख करणाऱ्या, उत्तराने ह्या लेखाचा समारोप करतो. तो सांगतो,” मी माझ्या मुलांवर ठेवलेला विश्वास !” “Believing in my Kids”

वेगळ्या जमातीची आवडीची पुस्तके

आयुष्याची वाटचाल कशी करावी, “जगावे कसे ? तर उत्तम” , हे शिकवणारे मार्गदर्शक, धडपडणाऱ्यांना हात देऊन उभे करणारे शिक्षक किंवा अनुभवी उद्योजक; ‘तान्ह्या’ कंपन्यांत भांडवल गुंतवून त्यांना वाढवणारे गुंतवणुकदार; किंवा समाजातील गुणी मुलांमुलींसाठी मदत करणारे जगप्रसिद्ध खेळाडू, गायक, नट, संस्था; किंवा कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगायचे तर ‘पाठीवर थाप मारून फक्त ‘लढ’ म्हणत निश्चय बळकट करणारे, अशा विविध रुपाने अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक मददगारांची ही विशेष जमात आहे. हे इतक्या तऱ्हेने सांगण्याचे कारण म्हणजे मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात टिमोथी फेरिसचे The Tribe of Mentors हे पुस्तक वाचनात आले.


पुस्तकाविषयी तर जमेल तेव्हढे सांगावेसे वाटते. पण त्या अगोदर हा लेखक कोण आहे तेही समजून घेणे प्राप्त आहे.
टिमोथी फेरिस हा कंपन्या बाल्यावस्थेत असताना त्यांच्यात पैसा गुंतवणारा कुशल गुंतवणुकदार आहे. कितीही चांगले, वेगळे,व भविष्यकाळ असलेले उत्पादन असो; त्याची संकल्पना ज्यांना सुचली ते बुद्धिमान प्रतिभाशाली असोत, पुरेसे भांडवल नसेल तर गाडे अडते. अशावेळी, कंपनी आणि उत्पादनाविषयी थोडीफार खात्री असणारे गुंतवणुकदार पुढे येतात. आपला पैसा त्यात गुंतवतात. अशा angel investor (पोषणकर्त्यां) पैकी टिमोथी फेरिस आहे. त्याशिवाय तो लेखकही आहे. तो पुढे आला 4-Hour Week ह्या पुस्तकामुळे. त्यानंतर त्याची अशीच 4-Hour Body आणि 4-Hour Chef ही पुस्तके प्रकाशित झाली.


फेरिसने StumbleUpon, Evernote आणि कितीतरी अनेक तंत्रज्ञान कंपन्यांत त्यांच्या प्राथमिक अवस्थेपासून गुंतवणुक केलेली आहे. उबेर कंपनीचा तो सल्लागारही आहे. लोकांना तो माहित आहे ते त्याच्या पॅाडकास्टमुळे. त्यातअनेक वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींच्या मुलाखती असतात. या बरोबरच त्याने ‘ऐकण्याची’ Audio (श्रवण)पुस्तकेही प्रकाशित केली आहेत.


ह्या टिमोथी फेरीसने सुमारे शंभराच्यावर नामवंतांना अकरा प्रश्न पाठवले व त्यांची उत्तरे देण्याची विनंती केली. बहुतेक नामवंत हे तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. तसेच काही गायक, वादक,लेखक, प्रख्यात बल्लवाचार्य, खेळाडू, अपंगही आहेत.
ह्या ख्यातनामांनी दिलेली उत्तरे बारावी आणि कॅालेज आटपून नुकतेच बाहेरच्या वास्तव जगात प्रवेश करणाऱ्या तरुणांना, उद्योजक व्यावसायिक होऊ इच्छिणाऱ्या धाडसी व्यक्तींना आणि इतरांनाही उपयुक्त ठरतील. म्हणूनही हे पुस्तक वाचनीय आहे.


माझ्यासारख्या सामान्य वाचकाला ही मोठी माणसे कोणती पुस्तके वाचतात, आपण वाचलेली किंवा वाचू अशी काही पुस्तके आहेत का ही माहिती मिळते. निदान नविन किंवा वेगळ्या पुस्तकांची माहिती होते. हा लाभ मोठा आहे. कारण फेरिसने त्या सगळ्यांना “ तुम्ही आतापर्यंत सर्वात जास्त कोणते पुस्तक /पुस्तके भेट दिली आहेत? आणि का? किंवा कोणत्या एका किंवा तीन पुस्तकांचा तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव पडला आहे? “ हा पहिला प्रश्न विचारलाय. “तुमची सर्वात महत्वाची गुंतवणुक कोणती?” सर्वांत आवडते किंवा संस्मरणीय अपयश कोणते?”किंवा आपण कधी कुठे कमी पडलो असे वाटले का?” “ ताण तणाव घालवण्यासाठी तुम्ही काय करता?” “ तुम्हाला एक मोठा प्रसिद्धी-फलक दिला व त्यावर लिहिण्याचे स्वातंत्र्य दिले तर काय लिहाल?” ह्या आशयाचे व इतरही दुसरे काही प्रश्न त्याने विचारले आहेत.


सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत असे नाही. ज्या प्रश्नांची उत्तरे द्यावी वाटतील ती द्यावी हा खुलासाही त्याने केला होता.
सर्वांनी दिलेल्या सर्व उत्तरांचा परामर्श घेता येणे शक्य नाही. काही प्रश्न, त्यांची काही व्यक्तींनी दिलेली उत्तरे ह्यांचा उल्लेख करावा असे ठरवले आहे. बघू या , कितपत जमते ते.


स्टीव्हन प्रेसफिल्ड Steven Pressfield ह्याने लेखनाच्या- ‘जाहिराती, पटकथा, कथा-कादंबऱ्या ,ललितेतर , आणि प्रेरक पुस्तके – पंचक्रोशीत’ आपला चांगला ठसा उमटवला आहे.


त्याची The Legend of Bagger Vance ( ह्यावर ह्याच नावाचा पाहण्याजोगा उत्तम सिनेमाही निघाला आहे.ह् सिनेमात विल्स स्मिथ, मॅट डॅमन सारखे नामवंत नट आहेत.), Gates of Fire , The Virtues of War ही त्याची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. त्याच्या कथा पटकथा असलेले चित्रपट सांगायचे तर Above theLaw, King Kong Lives, Joshua Tree ( Army of One) ही काही नावे सांगता येतील. Pressfield त्याच्या आवडत्या पुस्तकाविषयी म्हणतो की,” त्याच्यावर खरा आणि अत्यंत प्रभाव पाडणारे पुस्तक फार जाडजूड आणि प्रचंड आहे. रक्तरंजित घडामोडींनी ते भरलेले आहे. पुस्तकाचे नाव “ Thucydides’s History of Peloponnesian War “ प्रेसफिल्ड पुढे सांगतो की स्वतः लेखकच पुस्तकाच्या सुरुवातीलाच वाचकांना सावध करतो “ गंमतीसाठी, करमणुक करणारे हे पुस्तक नाही.आणि वाचायलाही सोपे जाणारे नाही.” पण प्रेसफिल्ड सांगतो की पुस्तक कालातीत, त्रिकालाबाधित सत्यांनी भरलेले आहे. लोकशाहीतील सर्वांनी हे पुस्तक वाचायला हवे असेही तो आवर्जुन सांगतो. तोही म्हणतो की मनोरंजनासाठी हे पुस्तक नाही. पण उत्तुंग तितकेच सखोल वैचारिक असे काही वाचायचे असेल तर हे पुस्तक वाचायला हवे.


War of Art, A Man at Arms, Gates of Fire, Tides of War( अथेन्स आणि स्पार्टनस् मध्ये २७ वर्षे चाललेल्या युद्धाविषयी) ही त्याने लिहिलेली काही पुस्तके. त्याच्या बहुतेक पुस्तकांच्या नावात ‘युद्ध’ आहेच. युद्धाविषयी व त्या संकल्पनेविषयी त्याला आकर्षण दिसते!


Marie Forleo मरी फर्लियो ही सुरुवातीला “ रेस्टॅार्ंट, पब मध्ये ड्रिंक्स देणे, वेटर , जॅनिटर अशी कामे करत करत , नंतर व्यवसाय विद्येची पदवीधर झाली. तिने आपले on line बी- स्कूल सुरू केले. लघु उद्योग करू इच्छिणाऱ्या व लघु उद्योजक असलेल्यांनाही तिच्या बी- स्कूल मध्ये त्यासंबंधी मार्गदर्शन व शिक्षण दिले जाते. लघुउद्योग वाढवावा कसा ह्याचेही प्रशिक्षण तिच्या संस्थेत दिले जाते. १४८ देशातील ७०,००० लघु उद्योजक तिच्या बी- स्कूल मधून प्रशिक्षित होऊन उद्योग व्यवसायिक झाले आहेत.


मरी फर्लियो लेखिका आहेच त्या शिवाय ती हिप हॅाप नृत्यातही पारंगत आहे. MTV वर तिने बसविलेली बरीच नृत्ये सादर झाली आहेत. तिची स्वतःची मरी फर्लिओ इंटरनॅशनल कंपनीही आहे. १०० झपाट्याने उत्कर्ष होणाऱ्या कंपन्यांच्या यादीत तसेच आघाडीच्या पन्नास महिला उद्योजकांच्या कंपन्यातही तिच्या कंपन्यांचा समावेश आहे. हार्पर्स बझार मासिकाने तिचा “स्वतःच्या बळावर झालेली कोट्याधीश” असा उल्लेख केला आहे. फोर्ब्ज मासिकाने “ उद्योग-व्यावसायिकांसाठी असलेल्या सर्वोत्कृष्ठ १०० websites “मध्ये मरी फर्लियोच्या वेबसाईटची गणना केली आहे. आपण आताच ज्याच्या विषयी वाचले त्या स्टिव्ह प्रेसफिल्डचे “War of Art हे तिचे आवडते पुस्तक आहे . “ ती म्हणते, “हे पुस्तक वाचकाला आपल्या न्यूनगंडातून किंवा भयगंडातून बाहेर काढते. त्याच्यात आत्मविश्वास देणारे आणि वाढवणारे पुस्तक आहे.त्याच्या मनातली मरगळ दूर करणारे ते पुस्तक आहे.शिवाय पुस्तक कुठल्याही पानापासून वाचले तरी चालते.वाचकाला प्रत्येक पानातून उत्साहाची उभारी येते.”


कायल मेनर्ड जन्मापासून दोन्ही हातांनी आणि पायांनी अपंग आहे. हात कोपरापर्यंतही नव्हते. पायही अर्धेच होते. गुडघेही दिसू नयेत इतकेच. चौरंगी अपंग म्हणतात तसा तो आहे. तो कृत्रिम हात आणि पाय वापरत नाही. आहेत त्या हाता पायांनी तो सर्व व्यवहार, हालचाली करतो. इतकेच काय कुणाचीही मदत न घेता त्याने टॅन्झानियातील किलिमॅंन्जॅरो पर्वत आणि अर्जेन्टिनातील Aconcagua अकॅांनकाग्वा पर्वत तो चढून गेला आहे. ह्या ठिकाणी किलिमॅंन्जॅरो १९३४१ फूट तर अकॅांनकाग्वा हा २२८४१ फूट उंच आहे हे अवश्य लक्षात घ्यावे. खऱ्या अर्थाने कायल मेनर्ड स्वावलंबी आहे. तो म्हणतो ,” कुणाचीही मदत घ्यायची नाही हे मी आणि घरातल्या सगळ्यांनी पहिल्यापासून ठरवले होते .” त्याच्या आवडत्या पुस्तकाविषयी तो सांगतो ,” फ्रॅन्क ह्युबर्टचे Dune ; अल्बेर केम्यु Albert Camus चे The Stranger ( अल्बेर केम्यु किंवा जॅान पॅाल सार्ट्रा ह्यांची पुस्तके वाचणे आणि ती आवडणे हे विशेष वाचकांची ओळख मानली जाते- हे मेनर्ड म्हणत नाही😀.) ) आणि The Hero With a Thousand Faces हे जोसेफ कॅम्पबेलचे ही तीन पुस्तके माझ्या खास आवडीची आहेत.” Dunes च्या पुस्तकांची -बहुधा सहा- मालिकाच आहे. Dune,Dune Messiah, Children of Dune ,Heretics of Dune वगैरे. Dune चा सिनेमाही निघाला. पुस्तकांसारखा तोही गाजला. त्याने एक व्यायामशाळा काढली आहे. तिचे नाव वाचल्यावर खूष होऊन तुम्ही “ व्वा! व्वा!” म्हणाल. नाव आहे “ No Excuse” तुम्ही ‘वा वा’ का म्हणाला ते मलाही माहित आहे .


दोन्ही हातापायांनी अपंग असलेल्या कायल मेनर्ड कधीही कोणतीही सबब न सांगता तो स्वावलंबी राहिला!
गायक, गीतकार, गिटार वादक , नट आणि रेकॅार्डसचा निर्माता. अनेक प्रतिष्ठेची सन्मानाची पारितोषिके, पदके मिळवलेल्या आणि विविध रुपाने ख्यातनाम असलेल्या टिम मॅकग्राथ चे आवडते पुस्तक आहे -Jayber Crowe . वेन्डल बेरी लेखक आहे. “पुस्तक वाचल्यावर मनाला शांति लाभते. आपण शांत स्थिर होतो. पण त्याच बरोबर पुस्तक विचारही करायला लावते . जी श्रेष्ठ कलाकृती असते ती तुम्हाला अंतर्मुख करते. स्वतःचाही पुनर्विचार करायला लावते. आपण आपल्या विचारांचे,मग ते स्वतःविषयीचे, आपण प्राधान्य देत असलेल्या गोष्टींचे, आपल्या अवती भोवतीचे, आपलेच पुनर्मुल्यांकन करू लागलो तर ती श्रेष्ठ कलाकृती समजावी. असे करत नसू तर आपण एककल्ली, एकांगी बनत जाण्याची शक्यता असते; “ असे टिम मॅकग्रा ह्या पुस्तकाविषयी म्हणतो.


अमेरिकेतील आरंभीच्या काळातील अग्रेसर आंतरजाल कंपनी AOL चे संस्थापक स्टीव्ह केस ह्यांना आवडलेल्या पुस्तकाने तत्यांना ते कॅालेजमध्ये असल्यापासूनच भुरळ घातली होती. त्यावेळेपासूनच त्यांनी ह्याच क्षेत्रात उतरायचे ठरवले होते. ते म्हणतात,” ह्या पुस्तकाचा माझ्यावर एव्हढा प्रभाव होता की ह्या पुस्तकाचे नाव, मी काही वर्षानंतर लिहिलेल्या माझ्या पुस्तकासाठी वापरले !” त्यांच्यावर प्रभाव पाडणाऱ्या पुस्तकाते नाव आहे “ The Third Wave” . ह्या पुस्तकाचे लेखक आहेत अल्व्हिन टॅाफलर. “ ह्या पुस्तकातील ( जग जवळ आणणाऱ्या) Global Electronic Village विषयी वाचल्यामुळे मला AOL सुरू करण्याचा विचार आला. निश्चय झाला.लोक एकमेकांशी Digital माध्यमातून संबंध ठेवतील, संपर्कात राहतील ह्याची मला जाणीव झाली.” “अल्व्हिन टॅाफलरने शेतकी , औद्योगिक , आणि तंत्रज्ञान ह्या तीन क्षेत्रात होणाऱ्या क्रांती विषयी लिहिले. तेच नाव वापरून मी नंतरच्या काळात येणाऱ्या तंत्रज्ञानात होणाऱ्या तीन मोठ्या बदलांविषयी, तिसऱ्या लाटेसंबंधी पुस्तक लिहिले आणि मी त्याचे Third Wave : An Entrepreneur’s Vision of Future असे बारसे केले.”


जेसी विल्यमस हा टीव्ही वरील अतिशय लोकप्रिय मालिका Grey’S Anatomy मध्ये डॅा. जॅकसन एव्हरीची भूमिका करणारा नट; आणि The Butler, The Cabin in The woods आणि आणखीही काही सिनेमातील नट म्हणूनही ख्यात आहे. तो सामाजिक कार्यकर्ताही आहे. विशेषतः त्याच्या २०१६ सालच्या कृष्णवर्णीय लोकांवर आणि विशेषतः तरुणांवर राजकीय,सामाजिक दृष्ट्या होणाऱ्या अन्याय तसेच पोलिसी अत्याचारांसंबंधीच्या भाषणामुळे तो जगापुढे आला. त्याची आवडत्या पुस्तकांची नावे सांगायची तर — Confederacy of Dunces हे जॅान केनेडी टूलचे , टोनि मॅारिसनचे Song of Solomon , Black Folk हे W.E.B. DuBois चे आणि वाचकांपैकी अनेकांना माहित असलेले क्लासिक गणले जाईल असे Ayan Rand चे Fountainhead , हे पुस्तक.


माईक मेपल्स हा भांडवल गुंतवणुक करणारी कंपनी Floodgate चा सहसंस्थापक आहे . फोर्बसच्या परिसस्पर्श कंपन्यांच्या यादीत सतत १२ वर्षे ही कंपनी मानाने टिकून आहे.


मेपल्सवर प्रभाव टाकणारी बहुतेक पुस्तके नेतृत्वगुणांची वाढ कशी करावी, त्यासाठी रोजचे आयुष्य एखाद्या उद्दीष्टपूर्ती साठी तर असावेच, स्वतःला जे योग्य वाटेल ते – मग ते स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी किंवा जी कंपनी चालवतो किंवा नोकरी करतो- ते ते काम उत्कृष्ठच झाले पाहिजे ह्या भावनेने करावे. चित्रकला, गायन शिल्पकला, जाहिरात तयार करणे कोणतेही असो ते अशा उंचीवर न्यावे की ते करतांना आपल्यालाही आकाशात झेप घेऊन विहरणाऱ्या पक्षासारखा आनंद व स्वातंत्र्य लाभावे. अशी झेप प्रत्येकालाच घ्यावी वाटते. का वाटू नये? अशा किंवा ह्यासम विचारांची पुस्तके त्याला आवडतात असे वाटते. Top Five Regrets of Dying – हे Brownie Ware चे तसेच प्रेरणादायी पुस्तकांचे भीष्म समजले जाणारे Jonathan Livingstone Seagull हे रिचर्ड ब्राख चे आजही मागणी असलेले पुस्तक. हार्वर्ड बिझिनेस स्कूल च्या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना, लेखकाने स्वतः आयुष्य कसे व्यतित करावे ह्यावर विचार केला व ठरवले,त्या अनुभवावर आधारित भाषण दिले. त्याचे नंतर त्यानते पुस्तक झाले. तेच हे हार्वर्डचा प्राध्यापक Clayton Christensen चे पुस्तक How will You Measure Your Life .


पुस्तकांचा प्रभाव, परिणाम किती होतो ह्याचे मोजमाप करणे अवघड आहे. ह्या पुस्तकांत सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शंभर सव्वाशे नामवंतांच्या लेखी मुलाखती आहेत. किती पुस्तके, किती नावे,किती लेखक आपल्या समोर येतील ! . त्यांना आवडलेली सर्व पुस्तके आपणा सगळ्यांना आवडतील असे मुळीच नाही. आपले ते आवडीचे विषयही नसतील. त्यातील विषयांशी बऱ्याच वाचकांचा संबंधही येत नसेल. तरीही निदान ही मोठी माणसे काय वाचतात; काही नाही तरी पुस्तकांची व लेखकांची थोडी माहिती होईल. काही पुस्तकांची नावे समोर आल्यावर ,” अरे! ही पुस्तके मी सुद्धा वाचली आहे!” त्या क्षणापुरते तरी आपण नामवंतांच्या पंक्तीत जातो. ह्याचेही एक वेगळेच समाधान असते.


नंतर, माझ्या हातून लिहिले गेलेच, तर टिमोथी फेरिसने प्रसिद्ध व्यक्तींना विचारलेल्या इतर काही प्रश्नांना त्यांचा प्रतिसाद पाहू या.