Monthly Archives: January 2019

तालेवार भाषांतरकार

Translation is an art of critical interpretation. No two languages ever dovetail perfectly but they can be linked by translation.

भाषांतर करणे सोपे नाही. विशेषत:एका भाषेतील साहित्य कृतीचे दुसऱ्या भाषेत भाषांतर कठिण असते. लेखाच्या सुरवातीलाच भाषांतरा संबंधातील कोणा मोठ्याचे विचार आणि सुरवातीची प्रस्तावना पाहून अाज मी असा भाषांतराकडे का वळलो असा प्रश्न पडला असणार.

शाळेच्या परीक्षा, प्रश्नपत्रिकेची आठवण झाली का हीशंका सुद्धा आली तर नवल नाही. कारण प्रारंभीच्या वर्गात हिंदीचे मराठीत आणि मराठीचे हिंदीत तर नंतर आठवीपासून संस्कृतचे मराठीत व त्याविरुद्ध मराठीचे संस्कृतात हे प्रश्न हमखास असत. संस्कृताचे हे दोन्ही प्रश्न नापास करण्यासाठीच असत असे आम्हा सर्वांचेच मत होते. गाईडमुळे संस्कृतचे मराठीत भाषांतराचा प्रश्न पाठांतर केले असल्यानुळे, सोडवण्याचा प्रयत्न तरी करत असू. पण मराठीचे संस्कृत? अरे बापरे. तो प्रश्न कधी सोडवल्याचे आठवत नाही! कारण सांगायचे तर शरदचंद्र चटर्जींच्या गाजलेल्या कादंबऱ्यांची प्रसिद्ध नाटककार भा.वि. उर्फ मामा वरेरकरांनी भाषांतरे केली नसती तर आपण वाचनाच्या किती मोठ्या आनंदाला मुकलो असतो ह्याची जाणीव आता होते.

अमृता प्रितम, प्रेमचंद मुन्शी,किंवा सआदत हसन मंटो, पंजाबी उर्दू हिंदीतून लिहिणारे प्रख्यात लेखक राजेंद्रसिंह बेदी ह्यांच्या कथांचे कादंबरीचे भाषांतर जर कुणी केले नसते तर आपल्याला त्या परिणामकारक, विचार करायला लावणाऱ्या कथानकांचा अनुभव आनंद घेता आला असता का? “पण वर म्हटल्याप्रमाणे कोणत्याही भाषेतून आपल्या भाषेत भाषांतर करणे सोपे नाही. त्यासाठी साहित्यिक जाण व भाषांतरकार स्वत:ही जर लेखक असले तर ते जास्त चांगले होते. म्हणूनच मी वर वरेरकरांनी केलेल्या शरदचंद्र चटर्जींची ‘श्रीकांत’ चे तिन्ही भाग किंवा सानेगुरुजींनी केलेले कृष्णा हाथिसिंग यांच्या With No Regrets चे केलेले ‘ना खंत ना खेद’, प्रसिद्ध कादंबरीकार व मराठीतील शैलीदार लेखक ना.सा. फडके ह्यांनी आर्मेनियन लेखक विल्यम सारोयान ह्यांच्या कादंबरीचे ‘ जीवन-संगीत’ ह्या नावाने उत्कृष्ट भाषांतर केले होते त्याचा उल्लेख केला .तसेच रामानंद सागर ह्यांच्या ‘ और इन्सान मर गया’ ह्या कादंबरीचे मनोहर तल्हार ह्यांनी केलेले ‘आणि माणसाचा मुडदा पडला’ हे सुरेख भाषांतर अथवा अलिकडे पुपुल जयकर ह्यांनी इंदिरा गांधींविषयी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचे अशोक जैन यांनी केलेले भाषांतर ही सर्व अप्रतिम पुस्तके वाचतांना ती भाषांतरे न वाटता स्वतंत्र कृति वाटतात. असीकडे चांगली भाषांतरे बरीच होत आहेत. लोकवाड.मय प्रकाशन आपल्या येथील निरनिराळ्या भाषांतील पुस्तकांची, काव्यसंग्रहांची भाषांतरे प्रसिद्ध करीत असते. तीही वाचनीय असतात.

हे सुद्धा आठवण्याचे कारण, दोन वर्षापूर्वी वारलेल्या प्रख्यात अनुवादक Gregory-Rabassa ह्यांच्या संबंधी, वाड.मयाचे नोबेल पारितोषिक विजेते मारियो गार्सिया ह्यांनी काढलेले उद्गार वाचनात आले. ते म्हणाले, “ उत्तम भाषांतर म्हणजे ती स्वतंत्र निर्मितीच असते. आणि तसे उत्कृष्ट व अनुरूप भाषांतर करणारे ग्रेगरी रेबासा होते!” ग्रेगरी रेबासांमुळे मारियो गार्शिया, ज्युलिओ काॅर्टाझार, मारिओ व्हर्गाझ लोसा अशा बऱ्याच नामवंत स्पॅनिश व पोर्च्युगीझ भाषेतील लेखकांच्या श्रेष्ठ कादंबऱ्या, कथांची ओळख जगातील इंग्रजी वाचकांना झाली! लॅटिन अमेरिकेतील बऱ्याच प्रतिभावंत व दर्जेदार लेखकांना जगाच्या वाड.मयात स्थान मिळवून देण्यात ग्रेगरी रेबासाचा फार मोठा हातभार आहे. त्यामुळेच ते लेखक रेबासाला खूप मानतात.

ग्रेगरी रेबासा दोन वर्षापूर्वी वयाच्या ९४व्या वर्षी वारला.

त्याचा जन्म अमेरिकेतील न्यू याॅर्कच्या याॅन्कर्स येथे १९२२ साली झाला. त्याचे शिक्षण न्यू हॅम्पशायर जवळच्या डार्टमाऊथ काॅलेजमध्ये झाले.त्याचे वडील क्युबन होते. आई न्यू याॅर्कच्या बारमध्ये काम करायची. त्याने पदवीसाठी Romance( ह्यातील प्रमुख भाषा आहेत इटालियन, फ्रेंच,स्पॅनिश, पोर्च्युगीझ आणि रुमानियन. ह्यांचा उगम,त्या काळी रोजच्या व्यवहारात सामान्य माणसे बोलत त्या गावठी- अनागरी लॅटिन भाषेत आहे.)भाषांचा अभ्यासक्रम घेतला होता. त्यामध्ये त्याने पहिली पदवी मिळवली होती. त्यामुळे त्याला फ्रेंच, स्पॅनिश,पोर्च्युगीझ व इटालियन भाषेत बरीच गति व ज्ञान होते. दुसऱ्या महायुद्धात त्याची शत्रूंचे सांकेतिक भाषेतील गूढ संदेश उलगडण्याच्या महत्वाच्या कामावर नेमणूक झाली. मुळातच त्याला भाषेची आवड होती. हे कामही त्याच्या आवडीचे झाले. युद्ध संपल्यावर त्यामुळेच त्याने कोलंबिया विद्यापीठात स्पॅनिशमध्ये एम. ए. केले व पोर्च्युगीझ भाषा व वाड.मयात डाॅक्टरेट मिळवली! त्याच विद्यापीठात व नंतर काही वर्षे क्विन्स काॅलेजमध्ये अशी २२ वर्षे त्याने प्राध्यापक म्हणून काम केले. भाषा हे ग्रेगरी रबासाचे खास ‘प्रेम प्रकरणच’ होते! विद्यापीठात असतानाच त्याने स्पॅनिश आणि पोर्च्युगीझ लेखांचे व कथांचे भाषांतर केले. ते ओडिसी रिव्ह्यू ह्या साहित्याला वाहिलेल्या त्रैमासिकात प्रसिद्ध होऊ लागले. वाचकांना तर ते आवडलेच पण Pantheon ह्या प्रसिद्ध प्रकाशकांचेही लक्ष वेधून घेतले. रबासाचे ह्या दोन्ही भाषांवरील त्याच बरोबर इंग्रजीवरील प्रभुत्व त्यांच्या पारखी नजरेत भरले. त्यांनी रबासावर एक मोठे काम सोपवले. ज्युलिओ काॅर्टेझाच्या स्पॅनिश Rayvuela कादंबरीचे भाषांतर रबासाने हाती घेतले. रबासाने भाषांतर केलेली ही कादंबरी Hopscotch नावाने प्रसिद्ध झाली. ह्या कादंबरीला त्या वर्षीचे नॅशनल बुक अॅवार्ड मिळाले. ह्याच सुमारास ज्याने साहित्यात अदभुत वास्तवता आणली;अद्भुततेच्या कोंदणात बसवलेल्या वास्तववादी लिखाणाचे युग सुरू केले त्या मारिओ गार्शियाने आपली One Hundred Years of Solitude ही कादंबरी लिहून संपवली होती.

भाषांतर करण्या अगोदर तो ते पुस्तक आधी वाचत नाही. वाचून बघेन मग भाषांतर करायचे ठरवेन असे म्हणत नाही. वाचायला घेतो.पण काही शब्दांवाक्यांवर मात्र रेबासा बराच चिकित्सापूर्वक विचार करतो. मूळ भाषेतील शब्दांच्या हव्या त्याच अर्थछटा इंग्रजीतही आल्या पाहिजेत अशा शब्दांची तो निवड करतो. वर सांगितलेल्या मारिओ गार्शियाच्या कादंबरीतील पहिल्याच वाक्यात स्पॅनिश मधील firing squad ह्या अर्थाच्या शब्दाचे भाषांतर इंग्रजीत firing partyअसेही करता आले असते. पण अमेरिकन वाचकांना जास्त सवयीची व जवळची वाटेल अशी firing squad शब्दयोजना त्याने केली. कादंबरीचे स्पॅनिश नाव Cien Anos de Soledad चे इंग्रजीत नामांतर करताना त्याने One Hundred Years Of Solitude असे केले. स्पॅनिश Cien चा अर्थ “ One hundred “ आणि “a hundred” असाही होतो. पण त्याने one hundred च पसंत केले. त्याचे कारण सांगताना तो म्हणतो कादंबरी वाचल्यावर लक्षात येते की गार्शियाच्या मनात एक विशिष्ट असाच काळ होता. त्यामुळे तितकी ती शंभरच वर्षे दर्शविण्यासाठी One hundred हे शब्द वापरले. कादंबरीच्या नावातील दुसरा महत्वाचा शब्द म्हणजे Soledad. त्याचेही भाषांतर Loneliness आणि Solitude ह्या दोन्ही शब्दांनी करता आले असते. पण त्याने वर्णिलेल्या काळातील महत्वाचा भाव येण्यासाठी त्याने तो शब्द का निवडला ह्याचा खुलासा केला,तो आपल्या मराठीतील ‘एकटेपणा’/ ‘एकटेपण’आणि ‘एकान्तवास’ ह्या शब्दांत जो फरक आहे त्यावरून कळेल.

गार्शिया,काॅर्टेझा, लोसा किंवा आॅगस्टो माॅन्टेरसो ह्या लेखकांच्या कादंबऱ्या कथांचे अनेक भाषांत भाषांतर झाले आहे. पण रबासा संबंधी बोलतांना गार्शिया म्हणतो , “ फक्त रबासाने मला कधीही एखाद्याही शब्दाचा किंवा वाक्यांच्या बाबतीत खुलासा,संदर्भ विचारला नाही!” गार्शियाच्या काही पुस्तकांचे एडिथ ग्राॅसमन ह्या दुसऱ्या नामवंत भाषांतरकारानेही, इंग्रजीत भाषांतर केले आहे. तीही प्रसिद्ध आहेत. “स्पॅनिश पोर्च्युगीझ भाषांच्या बाबतीत रबासा हा आम्हा सर्वांचा पितामह आहे!” असे ग्राॅसमनने त्याच्याविषयी म्हटले आहे.एडिथ ग्राॅसमन ह्याने प्रख्यात स्पॅनिश लेखक सर्व्हॅन्टिसची तितकीच प्रख्यात सार्वकालीन अभिजात कादंबरी Don Quixote चे भाषांतर केले ते सगळ्यात जास्त वाचकप्रिय आहे. अशा लेखकांनी रबासाविषयी हे गौरवोद्गार काढले आहेत. पण रबासाचा खरा गौरव नोबेल विजेता मारियो गार्शियानेच केला.

गार्शियाने वर उल्लेखलेली आपली कादंबरी लिहून पूर्ण केली. रबासानेच आपल्या कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर करावे असे त्याला वाटत होते. पण रबासाच्या हातात काम होते. ते संपायला तीन वर्षे लागणार होती. गार्शिया तीन वर्षे थांबला. तो इतकी वर्षे रबासासाठी का थांबला ते सांगताना तो म्हणतो,” उत्तम भाषांतर म्हणजे दुसऱ्या भाषेतील ती स्वतंत्र निर्मितीच असते! माझ्या कादंबरीचीही इंग्रजीत अशीच साहित्यकृति व्हावी, म्हणूनच ग्रेगरी रबासाविषयी माझ्या मनात असलेल्या नितांत आदरापोटीच, मी तीन वर्षे थांबणे पसंत केले !” भाषांतरकारांना साहित्यात मूळ लेखकाइतकेच मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या या तालेवार भाषांतरकार रबासाचे १३ जून २०१६ साली वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले.






एक लहानसे चढणे

मी बरेच दिवसांपासून जायचे जायचे म्हणत होतो त्याला आज शनिवारी मुहुर्त लागला. Twin Pines Park मध्ये फिरायला गेलो. घरा जवळ मोठ्या रहदारीच्या रस्त्याला लागून. सतीश म्हणालाच होता की trail फार लहान आहे. त्याचे म्हणणे खरे ठरले. ट्रेल अशी नाहीच. पण ज्येष्ठ वृक्षांची मांदियाळी मन शांत करते. निलगिरी,आणि पाईनची गगनाला भिडताहेत की काय असे वाटायला लावणारी रुंद धडाची झाडे पाहिली की आपण आपोआप गप्प होतो.

हे पार्क नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या व सभागृहाच्या इमारतींमधून शिल्लक राहिलेली जागा वाटते.
पण तिथे म्हाताऱ्या वयस्क नागरिकांसाठी सुसज्ज इमारत आहे. लोकांना लहान प्रमाणावर काही कार्यक्रम करायचे असतील तर त्यासाठीही छोटीश्या दोन इमारती आहेत. एक कला दालन आहे. पार्क मध्ये पिकनिक साठी हिरवळ आहे. तर दोन वेगळ्या जागी मोठ्या शेडस व टेबलांना जोडलेली बाके आहेत. ह्या सर्व गोष्टीभोवती झाडांनी फेर धरलेला असतो! सतीशच्या घरामागील ओढा तिकडेच वाहात येत पुढे जातो. गेला आठवडा पावसाचा होता. त्यामुळे ओढाही थोडा ऐटीत खळाळीची शिटी वाजवत चालला होता.


पार्कमध्ये मोठ्या खडकांवर सुंदर पितळी पाट्यांवर गावातील ज्या लोकांनी नगरसेवक मेयर म्हणून बरीच वर्षे गावासाठी मोठी लोकोपयोगी कामे केली त्यांचा गौरवपर उल्लेखाच्या सन्मानदर्शक प्लेटस आहेत. अशाच एका मोठ्या खडकावर सैनिकांच्या स्मरणार्थ कोरलेले वचन माझ्या पक्के लक्षात राहिले. “All Gave Some. Some Gave All.”

सर्व पार्क मध्ये असतात तशी इथेही काही नागरिकांनी लोकांच्या सोयीसाठी सुंदर बाक वाटेवर ठेवले आहेत. राल्स्टन अॅव्हेन्यूच्या दोन्ही बाजूला उंच टेकड्या आहेत. त्यावर घरेही आहेत आणि भरपूर झाडीही आहे. तर पार्कही एका टेकडीच्या आधारानेच वसले आहे.


एका मोठ्या पिकनिक शेडच्या मागे उंच टेकडीची चढती पाठ आहे. तिच्यावर जायला शाळा काॅलेजच्या मुलांनीच एक दोन पायवाटा केल्या आहेत. आज गर्दी नव्हती. आई वडिलांबरोबर आलेली लहान मुले झोके घसरगुंड्या खेळत होती, तीन चार जोडपी व काही म्हातारे फिरत होती तिथल्या पार्कमध्ये.

मी विचार केला जावे टेकडीवर जेव्हढे जाता येईल तितके.पाऊस पडून गेलेला. खाली पडलेली साचलेली पाने; त्यात भर वरून वाहात आलेली काटक्या पानांची भर पडलेली.पण ही सर्व पावसाने दबलेली. पायवाट ओलसर. पण निघालो. हळू हळू चढत, थांबत वर जात होतो. एक वेळ वर जाईन पण उतरतांना घसरू नये म्हणजे झालं असं स्वत:ला सावध करत जात होतो. मध्ये मध्ये थांबत होतो.पुढे वर, मागे, आजूबाजूला व जिथून आलो तिकडे खाली पाहू लागलो. वर अजूनही झाडातून टेकडी दिसते आहे आणि खाली पाहिले तर ती शेड बाके स्पष्ट दिसत होती! हात्तिच्या! मला वाटत होते की मी पुष्कळ वर आलोय. पुन्हा चढू लागलो. समोर आता वरचे उन्ह दिसत होते. आणखी थोडा वर वर गेलो. टेकडी डोंगराचा माथा जवळच वाटत होता. तरी मीच नको म्हणालो.

आपल्यालाच खालीही उतरायचे आहे. घसरायचे नाही. त्यामुळे असल्या क्षुल्लक पराक्रमाचा मोह टाळून उतरायला सुरवात केली. म्हटले सतीश वगैरे सर्वांच्याबरोबर पुढच्या शनिवार रविवारी पुन्हा येऊ. सगळ्यांबरोबर वर चढून जाऊ. ‘जपून टाक पाऊल जरा’ असे पावलागणिक बजावत हळू हळू पण न घसरता ‘धोपट मार्गा’ न सोडता’ व्यवस्थित खाली आलो!

परत जायला निघालो तर हायस्कूलची वाटणारी चार मुले टेकडीवरच चालली होती. त्यांना विचारले तुम्ही ‘हिल’चढून जाता? टेकडी उतरून पलीकडेही जाता? दोन्ही प्रश्नांना ते होच म्हणाले. रोज जात असावेत.
गावातच, हमरस्त्याच्या बाजूलाच, सुंदर झाडीची हिरवळ असलेले व त्यात लहानशी का होईना trail असलेले निसर्गरम्य ठिकाण पाहिल्यावर मला सुधीरच्या गावातल्या YMC शेजारीच असलेल्या दाट झाडीतील मैल दीड मैलाची रम्य वाट आठवली.हे पार्क हम रस्त्याजवळ असूनही आत आलो की जगाचा संपर्क तुटतो!
मी पार्कमधे आल्यावर काही फोटो काढले.घरून पार्कमध्ये येताना Notredame uni. चे व घरी परत जाताना Ralston Ave चे फोटो घेतले.


मी इतके ड्रामेबाज वर्णन केले पण टेकडी फार तर ४००-५०० फुटापेक्षा थोडी कमी असेल! घराच्या पायऱ्या चढतानाही असावा बरोबर म्हणून झेंडा घेऊनच चढतो. चार पायऱ्यांचा जिना चढून गेलो की मी लगेच झेंडा घेऊन फोटो साठी शेरपा तेनझिंग सारखा उभा राहतो. त्यामुळे दीडदोनशे फूट का होईना टेकडी चढून गेलो;त्याचे एव्हढे नाटक खपून जाईल असे वाटले.त्याचे लिहिणेही केले! चला!एक लहानसे चढणे झाले.

अफाट लेखक – बल्झॅक

बेलमाॅन्ट

नेपोलियनचा फ्रान्स विजेत्याच्या विजेत्याच्या मस्तीत आणि जेत्याच्या रूबाबात राहात होता. नेपोलियनचा पाडाव झाल्यावरही युरोपवर त्याचा प्रभाव होता. त्याच्या नंतरच्या काळातील फ्रान्स कसा होता हे आपल्याला प्रख्यात फ्रेंच लेखक Honore de Balzac (१७९९-१८५०) च्या कथा कादंबऱ्या, कादंबरीका ह्यामधून समजते.

बल्झॅक हा हाडाचा लेखक होता.”कोणी चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता” असे बऱ्याच कीर्तिवंतांच्या बाबतीत वाचतो. बल्झॅक तोंडात लेखणी धरूनच जन्माला आला होता म्हणावे इतके लेखन त्याने केले आहे! एखाद्या फलंदाजाची षटकार आणि चौकार ठोकतच खेळणे हीच त्याची सहज फलंदाजी असते. त्याप्रमाणे बल्झॅकचा लिहिणे हाच त्याचा धर्म झाला होता.
इतके भरमसाठ लिहूनही त्याने आपला उच्च दर्जा कायम राखला. पॅरिस आणि पॅरिसमधील लोक ह्यांच्याविषयी त्याने लिहिले. लिहिताना त्याने कोणतीही गाळणी वापरली नाही.जसे दिसले जाणवले तसे लिहिले.त्यामुळे कादंबऱ्या कथा असल्या तरी त्याच्या साहित्यात वास्तवता आहे. त्यामुळे त्याला ह्या पद्धतीचा प्रणेता मानले जाते.

बल्झॅकचा जन्म १७९९ साली झाला. विसाव्या वर्षा पर्यंत वडिलांच्या ऐकण्यात असल्यामुळे त्यांनी सांगितल्यामुळे तो कायद्याचे शिक्षण घेऊ लागला.पण त्याला काही ते जमले नाही. त्यांने तो अभ्यास सोडला. वडिलांनी सांगितले काय शिकायचे असेल ते शिक पण पॅरिसमध्ये दिवस कसाबसा काढता येईल इतकेच पैसे पाठवता येतील असे कळवले. त्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. त्यामुळे तो गरीबांना परवडेल अशा वस्तीत राहू लागला. बल्झॅक रोज “ दिसामाजी काही तरी लिहित” असे.त्याचा लिहिण्याचा झपाटाही जबरदस्त होता. दहा वर्षांत वीस कादंबऱ्या तरी नक्कीच लिहिल्या असतील.

काही वर्षांनी त्या कादंबऱ्या वाचल्यावर त्याला ह्या आपण लिहिल्या असे वाटले नाही. वयाच्या तिसाव्या वर्षी लिहिलेली Choumans ही कादंबरी त्याला आपली वाटते. त्यानंतर तर तो वर्षाला तीन चार पुस्तके लिहित होता.आणि आयुष्याच्य अखेरपर्यंत तो ह्याच वेगाने लिहित होता. वर्षात तीन चार पुस्तके ! लिहिण्याच्या श्रमानेच तो मरण पावला असेल का हा प्रशन् पडतो.

बल्झॅक बायकांच्या बाबतीत फार रंगेल होता. स्त्रीसुखाचा भरपूर उपभोग घेत असे. बल्झॅक चर्चेचा विषय झाला नसता तरच नवल होते. त्याची दिनचर्याही अजब होती. फिरून आल्यावरसंध्याकाळी पाच सहा वाजता जेवायचा. मग एखाद्या मैत्रिणीला, बाईला घेऊन रात्र रंगवायचा. रात्री अकरा वाजेपर्यंत झोप काढायचा. बाईला जायला सांगायचा. आणि मग हा सारस्वत पुत्र लिहायला बसायचा. संपूर्ण रात्र लिहित असे. पण दिवस उजाडल्या नंतरही दुपारी तीन चारपर्यंत लिहित बसलेला असे! बल्झॅक रोज पंधरा सोळा तास लिहित असे. ह्या सोळा तासात त्यास काॅफीची सोबत असे. काॅफीच्या कपावर त्याची रोज सोळा तास लिहिण्याची तपश्चर्या चालत असे.

दुपारी चार वाजता बाहेर जायचा.सहा वाजता घरी आला की जेवण आणि मग…..पंधरा सोळा तास एक टाकी लिहित बसण्याचा हटयोग सुरू!

बल्झॅकला आता कादंबऱ्या नाटके लिहिण्यात रस नव्हता. त्याला माणसाविषयीच काही भरीव विशेष महाकाव्यासारखे काही लिहायचे होते चित्रकाराला अतिभव्य, विशाल चित्र रंगवायचे स्वप्न असते.तशी बल्झॅकला मानवी जीवनात घडणाऱ्या घटनांचे; त्यातील नाट्याचे, संघर्षाचे,दिव्य दाहक आणि भव्य भयानक असे काही लिहायचे होते.नवरसांनाही मागे टाकेल असा आपल्या प्रतिभेचा ‘बल्झॅक’हा दहावा रस त्यात असेल अशी साहित्यिक कृति लिहायची होती ! प्रत्येक लेखकाचे आपण असे काही तरी लिहावे ही इच्छा असते. जगातील सर्व उत्कृष्ठ वाड.मय पाहिले तर आताच वर लिहिलेल्या “आपल्या प्रतिभेचा दहावा रस बल्झॅकचा” या वाक्यातील बल्झॅग च्या जागी त्या त्या ‘लेखका’चे नाव लिहावे लागेल!

बल्झॅगच्या मनात होते तितके भव्य दिव्य लिहिले गेले की नाही हे कोणी सांगू शकणार नाही. पण त्याने लिहिलेले La Comédie Humaine /Human Comedy हे त्याचे उत्कृष्ट पुस्तक मानले जाते.

मूळ फ्रेंच भाषेतील ला काॅमेडिए मध्ये नव्वद खंड आहेत. पण इंग्रजी प्रतिमध्ये संपादन करताना त्याचे चाळीस खंड केले आहेत. जाॅर्ज सेन्ट्सबरी ने इंग्रजीमध्ये भाषांतर व संपादित केलेली प्रत प्रमाण मानली जाते. बल्झॅकच्या ह्या ग्रंथात माणसाच्या आयुष्यात केवळ वयानुसार येणाऱ्या टप्प्यानुसारच नाही तर वास्तव्याचा परिसर, परिस्थिती अशा विविध टप्प्यानुसार भाग पाडले आहेत. त्यामध्ये लहान कादंबऱ्या येतात. काही भागांची नावे सांगायची तर Scenes of Private Life, Scenes of Provincial Life, Scenes of Paris Life ही सांगता येतील. पॅरिस लाईफ मधील Old Goriot ही कादंबरिका उत्कृष्ठ मानली जाते. ही वाचल्यावर बल्झॅकची लेखक म्हणून काय ताकद आहे ती समजते असे म्हटले जाते.

Old Goriot पॅरिसच्या गरीब वस्तीत घडते.मुख्य पाच पात्रे आहेत. खाणावळीची मालकीणबाई- मादाम व्हाॅकर, युजेन ड रॅस्टिनॅक – हा धडाडीचा तरुण, त्याच्या नात्यातील सुंदर व श्रीमंत बहिण मादाम डी बोझान्ट आणि स्वत: वृद्ध Goriot. रॅस्टिनॅक आणि वृद्ध Goriotगाॅरिओ ही दोन सगळ्यात महत्वाची पात्रे. गाॅरिओ श्रीमंत असतो. त्याच्या वैभवाला उतरती कळा लागली असते. त्यात त्याच्या दोन मुलींचा उच्च फॅशनेबल वर्तुळातील वावर हेही एक कारण असणार. गाॅरिओचे आपल्या मुलींवर खूप प्रेम असते. त्यामुळे त्यांच्यासाठी होणाऱ्या खर्चामुळेहीवत्याच्या व्यवसाय श्रीमंती बसत चाललेला असणार. तर युजनची प्रगतीची घोडदौड चालू असते. बल्झॅकने गोरिओच्या खालावत चाललेल्या परिस्थितीचे केलेले वर्णन वाचताना वाचकांच्या डोळ्यात पाणी उभे राहील तर रॅस्टिनॅकच् उत्कर्ष वाचक तितक्याच धडधडत्या छातीने उत्सुकतेने वाचत जातो.
कथानकात वाचक गुंगुन जातोच पण बल्झॅकने लेखकाच्या नजरेतून बारकाईने केलेले पॅरिसचे वर्णनही वाचक विसरु शकत नाही. ते वाचताना डिकन्सप्रेमी वाचकाना चार्ल्स डिकन्सची नक्कीच आठवण येईल. त्यानेही जगभरच्या वाचकांना आपल्या पुस्तकातून लंडनमध्ये इतके फिरवले आहे की तेही डिक्सनच्या व्यक्तीरेखांबरोबर लंडनचे रहिवासी होतात! डिकन्सची पुस्तके वाचलेला रसिक लंडनला गेला तर त्याच्या पुस्तकातल्या लंडनचे रस्ते,गल्ली,बोळ चुकणार नाही.स्वत: इतकेच डिकन्स वाचकाला त्याच्या लंडनशी एकजीव करतो.

पण चार्ल्स डिकन्सच्या कादंबऱ्यातून संपूर्ण इंग्लंडचे दरशन होत नाही. लंडनमधील वरच्या वर्गाचे वर्णन डिकन्सला नीट जमले नाही. त्याने त्यांचे खरे चित्रण केले नाही. डिकन्स हा लंडनचा चरित्रकार तर बल्झॅक हा पॅरिसचा चरित्रकार म्हणता येईल. बल्झॅकला सर्व थरातील पॅरिस माहित होते. गरीब कनिष्ठांचे पॅरिस. मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू वर्गाचे पॅरिस ह्या सर्वांची त्याला चांगलीच ओळख होती. ह्या सर्व थरांतील लोकांच्या जगण्यावर परस्परांचा होणारा परिणाम व प्रभाव कसा पडतो हे बल्झॅकने अनुभवले होते. सर्व थरांत होणारे चढ उतार, एका थरातून दुसऱ्या अशी वर खाली होणारी स्थित्यंतरे तो पाहात होता. हे उत्कर्ष आणि अपकर्ष त्याने आपल्या कादंबऱ्यातून हुबेहुब वर्णन केले आहेत. जसे डिकन्सला लंडनच्या वरिष्ठ वर्गाचे चित्रण यथार्थपणे करता आले नाही त्याच्या नेमके उलट बल्झॅकला बकाल गरीब पॅरिसचे चित्रण तेव्हढे नीट रंगवता आले नाही. पण वर म्हटल्याप्रमाणे सामाजिक पायऱ्यांवर त्यांची स्थित्यंतरे डिकन्सपेक्षा बल्झॅकने उत्कृष्ठ केली आहेत.

शेवटी विचार करता ह्या भेदांना फारसा अर्थ राहात नाही. ह्या दोन्ही नामवंत लेखकांना लोकांविषयी जी जवळीक होती तीच महत्वाची ठरली. हे लोकांचे लेखक होते. त्या काळची लंडन व पॅरिस ही दोन मोठी शहरे होती. त्यांचा वेग उर्जा, चैतन्य व धडपड हे सर्व ह्या दोन महान लेखकांच्या साहित्यातही दिसते. त्यांच्या कथानकांच्या वेगात आपणही वाहात जातो. पण वाचक बल्झॅकच्या कथा कादंबऱ्यातून जास्त वेगाने पुढे जातो!

फ्रान्सिस बेकन – तत्वज्ञानी, मुत्सद्दी, वैज्ञानिक,विद्वान

पैसा सर्वस्व नाही पण पैशाशिवाय सर्व अडते. साठलेले पाणी आणि साठलेला पैसा दोन्हीही फार काळ उपयोगी पडत नाहीत. संपत्ती विषयी असे बरेच काही आपण वाचलेले असते. पण सोळाव्या शतकातील एका राजकारणी,मुत्सद्दी,आणि विद्वानाचे पैशाच्या बाबतीतले व्यवहार्य मत आजही लक्षात ठेवण्यासारखे आहे.तो आपल्या Of Seditions and Trouble निबंधात लिहितो,”Money is like muck(manure), not good except it be spread.” हे वाचकांना सांगणारा विद्वान म्हणजे लाॅर्ड फ्रान्सिस बेकन !

फ्रान्सिस बेकनचा जन्म १५६१ साली लंडनमध्ये झाला. राजदरबाराशी निगडीत असलेल्या उच्च घराण्यात झाला. फ्रान्सिस बेकनचे वडिल सर निकोलस बेकन हे होत. पहिल्या एलिझाबेथ राणीचे ते Lord Keeper होते. हे पद मोठ्या अधिकाराचे व जबाबदारीचे होते. राणीची सरकारी आज्ञा,हुकूम,संमती,कायदे अशा महत्वाच्या कागदपत्रांवर उमटवण्याची ‘राजमुद्रा’ ह्याच्या ताब्यात व अखत्यारित असे. ती कागदपत्रे कायदेशीर व अधिकृत करण्याचा त्याला अधिकार होता. ह्याच पदाचे विलीनीकरण लाॅर्ड चॅन्सेलरमध्ये झाले. हा काही काळ पार्लमेंटचा सभापतीही असे. न्यायखात्याचे सेक्रेटरीही ह्याच्याच अंतर्गत होते. कॅबिनेट मंत्रिपदही असे. थोडक्यात फ्रान्सिस बेकनला बाळपणापासून अनुकुल परिस्थिती होती.

फ्रान्सिस बेकनने कायद्याचे शिक्षण पुरे केल्यावर तो इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये आला. तिथे त्याचा आणि अर्ल आॅफ इसेक्स Essexचा संबंध आला. बेकनला त्याच्या कामात वरच्या आणि त्याही वरच्या पदांवर जाण्यासाठी ह्या अर्लने खूप प्रयत्न आणि मदत केली. कारण अर्ल राणीच्या निकटवर्तियांमधील महत्वाचा माणूस होता.

त्यानंतर आलेल्या पहिल्या जेम्सच्या कारकीर्दीत फ्रान्सिस बेकनच्या कर्तृत्वाचा तारा तेजाने तळपू लागला.
हल्लीच्या पदाचे नाव वापरून सांगायचे तर साॅलिसिटर जनरल पदापासून तो लाॅर्ड चॅन्सलर ह्या मोठ्या अधिकारपदा पर्यंत पोहचला. पण दुर्दैवाने त्याच्या सोनेरी कारकीर्दीला ग्रहण लागले. इ.स.१६२१ मध्ये असे काही घडले की त्यामुळे फ्रान्सिस बेकनने पार्लमेंट,राजकारण उच्च पदांचा त्याग करून त्याने आपले पुढील सर्व आयुष्य लिहिण्यात घालवले.

बेकनवर लाच घेतल्याचा आरोप आला. चौकशी झाली. त्याने आपण लाच घेतल्याचे कबूल केले.लाॅर्ड आॅफ बकिंगहॅमला बदनामीपासून वाचवण्यासाठी बेकनला ह्यामध्ये पद्धतशीरपणे गोवले गेले. त्याला बळीचा बकरा केला गेला असे काही इतिहासकारांचे मत आहे. काही असो पण बेकनची चाळीस वर्षांची गौरवास्पद राजकीय कारकीर्द संपली हे खरे. फ्रान्सिस बेकन, बॅराॅन व्हेरुलेम व्हायकाउन्ट सेंट अल्बन्स…लाॅर्ड बेकन; पण अधिकृतरीत्या लाॅर्ड सेन्ट अल्बन्स, लाॅर्ड चॅन्सलर फ्रान्सिस बेकन इतकी मानाची बिरुदे किताब पदव्या असणारा उच्च अधिकारपदे भूषविणारा बेकन राजकारणाच्या धकाधकीतून आणि राज्यकारभारातून बाहेर पडला. त्याच्या लाॅर्ड, सर,अर्ल ह्या भूषणावह पदव्यांचे लोकांच्या लेखी महत्व नव्हते. ह्याचे कारण त्याच्या विद्वत्तेमुळे व त्याने लिहिलेल्या ग्रंथांतील ज्ञान आणि विचार ह्यामुळे तो आजही आदरपुर्वक फ्रान्सिस बेकन अशा साध्या नावानेच ओळखला जातो. त्याने मागे ठेवलेला वैचारिक वारसा पाहिला की बेकनने लाच घेतली हे एका अर्थी बरेच झाले असे वाटते.

राजाच्या मर्जीतला असल्यामुळे त्याला तुरुंगवास वगैरे काही घडला नाही. बेकनचा एक गुण उठून दिसतो. ज्यांनी त्याला मदत केली आपला म्हटले त्यांच्याशी तो प्रामाणिक राहिला.भावनात्मकतेने नव्हे तर त्याच्या विचारपूर्वक बनलेल्या मतांमुळेही असेल. कारण आपल्याला बेकनच्या कारकिर्दीची, त्याने लिहिलेल्या पुस्तकांची खूप माहिती मिळते पण त्याच्या हृदयातील मनांतील भावभावनांविषयी फारशी माहिती मिळत नाही.

बेकनने लिहिलेल्या ग्रंथांतून मांडलेल्या विचारांमुळे आपल्या ज्ञानात मोलाची भर घातली हे निर्विवाद सत्य आहे. अधिकारपदावरून खाली आल्यावर बेकनने त्याचा मित्र पंतप्रधान बर्ली ह्याला एक पत्र लिहिले. त्यात त्याने लिहिलेले एक वाक्य आपले लक्ष निश्चित वेधून घेते. ह्यानंतर बेकन आपण काय करणार आहोत हे स्पष्ट करताना म्हणतो, “I have taken all knowledge to be my province.” पूर्वीपासून चालू असलेल्या त्याच्या अभ्यासाची, विचारांची झेप व बुद्धीचा प्रचंड आवाका ह्यामधून व्यक्त होतो. अर्थातच इथे All Knowledge ह्या शब्दांतील Knowledge ह्या शब्दावर जास्त भर आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

वाड.मय त्यातील सर्व प्रकार, धर्म, व्यवहारातील अनुभवांवर आधारीत ज्ञान, ह्यांचा समावेश बेकनने ज्ञानात केला नाही.त्याचा भर विज्ञानावर आहे. ह्यामध्येही अर्थातच ज्ञानाचे अनेक विषय येतात.त्यात Logic ही येते.समस्त निसर्गसृष्टी येते. म्हणजे विज्ञान येते.

बेकनने आपल्या ज्ञान साम्राज्याचे,त्यावर वेळोवेळी झालेले, होणाऱ्या हल्ल्यांपासून(विरोधी मते,टीका) त्याचे रक्षण करणारी स्वत:ची बाजूही त्यामध्ये मांडली आहे. त्याने वरील पत्रात व्यक्त केलेल्या All Knowledge संबंधात त्याने पुस्तक लिहिले आहे. दुर्दैवाने तो ते पुरे करू शकला नाही. त्या पुस्तकाची प्रस्तावना वाचल्यावर, त्या विषयाचा अफाट आवाका पाहिल्यावर हे एका माणसाचे काम नाही ह्याची खात्री पटते.बेकनच्या ह्या पुस्तकाचे नाव आहे Great Instauration , म्हणजे महान पुनर्बांधणी, पुनर्रचना. ह्या पुस्तकात बरेच विभाग आहेत.

पहिला भाग विषयाची ओळख करून देणारा आहे. ह्याची पाने थोडीच आहेत. “ती वाचताना आपण आपला श्वास रोखून वाचू इतक्या अप्रतिम व ओघवत्या शैलीत बेकनने लिहिले आहे. ती वाचताना शब्दांचे सौदर्य व सामर्थ्य काय असते ते बेकन आपल्या शब्दांतून प्रकट करतो!” असे चार्ल्स व्हान डाॅरेन सारख्या बऱ्याच विद्वान समीक्षकांचे आणि श्रेष्ठ वाचकांचे मत आहे.

पुस्तकाचा दुसरा भाग Novum Organon अथवा Modern Logic असा आहे.आणि त्यानंतर येतो Advancement Of Learning हा भाग. त्यामध्ये निरनिराळ्या शास्त्रांचे, मनुष्याच्या बुद्धीच्या, आकलनशक्तीच्या आधारे वर्णन केले आहे. त्यानंतर बरीच प्रकरणे आहेत. त्यामध्ये तत्वज्ञानाला व विज्ञानाला जे प्रश्न पडतात किंवा सोडवायचे आहेत त्यांची चर्चा आहे. ही प्रकरणे, आणि बेकनचे इतर लेखन पाहिले तरी बेकनने काय करायचे योजले होते किंवा मानवजातीनेच काय केले पाहिजे त्याचा अंदाज येतो.

ह्यामध्ये New Logic आणि The Advancement of Learning हे दोन भाग विशेष वाचनीय आहेत.
नोव्हम आॅर्गॅनान मध्ये त्याने मनातील भ्रामक कल्पनांना, चुकीच्या समजुतींना,तर्कबुद्धीचा आधार नसलेल्या कल्पनां-विचारांना Idol म्हटले आहे.ह्यावर त्याने जे विश्लेषण केले आहे ते आजही मानले जाते. Idolविषयी लिहिताना तो म्हणतो की एखादी वस्तु काय आहे , कशी आहे, तिचे वेगवेगळे पैलू हे वस्तुनिष्ठपणे जाणून घेण्यात आपल्या मनातील असलेल्या पूर्व कल्पना किंवा त्यांच्यावर बुद्धीपेक्षा इतर बाबींचा प्रभाव(पूर्वसमजुती,ऐकीव माहिती इत्यादि) अडथळा आणतात.समाजमनावरही ह्यांचा मोठा प्रभाव असतो.माणसाचा कल त्याचा ज्या गोष्टीवर विश्वास आहे त्याच गोष्टींवर विश्वास ठेवण्याकडे असतो. त्याला जे दिसावेसे वाटते तेच तो पाहात असतो.निसर्गातही त्याला तीच ती नियमितता नित्य असावी असे वाटत असते. त्याला फारसा कशातही बदल नको असतो. आपल्या अनुभवांचे विश्लेषण विवेकबुद्धी, तटस्थ विचारांच्या आधारे करण्यापेक्षा दिसते,वाटते तेच खरे मानण्याचे तो पत्करत असतो.

सभोवतालच्या सृष्टीचे ज्ञान करून घेणे अवघड आहे पण अशक्य नाही हे बेकनला माहित होते. पण ह्यातूनही निसर्गावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे असे तो म्हणतो. त्यासाठी निसर्गाचे नियम पाळून त्याच्या कलाने घेत आपल्याला ते करता येईल. ज्ञान मिळविण्यासाठी त्याने प्रयोग, वस्तूंत अंतर्बाह्य होणाऱ्या क्रिया,प्रक्रिया, प्रतिक्रिया ह्यांच्या अभ्यासावर त्याचा भर होता. ‘जुने जाऊ द्या मरणा लागुनी।हे नवमत लोका कळवु द्या’ इतक्या स्पष्टपणे म्हटले नाही तरी त्याने जे लिहिले त्याचा आशय हाच होता.वर सांगितलेल्या पायऱ्यांनी, तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून, का व कसे ह्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत असे त्याचे म्हणणे होते. आलेली उत्तरे व निष्कर्षही कसोटीला लावून,म्हणजे त्यांचा वापर करून पाहावा ह्या मताचा त्याने पुरस्कार केला.
हे सांगत असतानाच, बेकन म्हणतो हे सगळे करणे,होणे शक्य आहे पण माणूस समजून घेणे हे त्याहूनही अवघड आहे हे सत्यही तो सांगतो.

पण बेकन माणसाला समजून घेण्याचे ज्ञान मिळवण्याच्या प्रयत्नातही बराच यशस्वी ठरला आहे. बेकनला माणसाविषयी झालेले ज्ञान त्याने आपल्या प्रख्यात Essays मध्ये मांडले आहे. बेकनच्या इतर पुस्तकांपेक्षा Essays जास्त वाचले जातात. Essays च्या प्रारंभी तो स्वत:च म्हणतो त्याप्रमाणे त्याचे निबंध “Would come home to men’s business and bosoms.” सर्वांना उपयोगी आणि आपलेवाटतात ! बेकनच्या ह्या पुस्तकाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्यात थोडक्याच शब्दांत खूप अर्थपूर्ण आशय सांगणाऱ्या वाक्यांची मेजवानी आहे. त्याला काय म्हणायचे आहे त्याचे सार अशा वाक्यांतून येते. ह्या वचन सदृश वाक्यांतून बेकनचा मानवी स्वभावाचा आणि पदार्थांचा अभ्यास किती होता हे दिसून येते. बेकनच्या Essays मधील अशी अनेक वचने उदघृतांच्या पुष्कळ पुस्तकांत आढळतील.

The Truth ह्या निबंधातील सत्यासंबंधात बेकन म्हणतो,” A mixture of a lie doth ever add a pleasure!”ह्यातील गंमतीचा स्वाद घेतल्यानंतर,माणसाला अति शुद्ध प्राणवायु पेक्षा तो निवळलेला प्राणवायु श्वास घ्यायला सोपा जातो ते का हेही पटते! तसेच ” Revenge is a kind of wild justice!” हे वाचल्यावर बेकनच्या ह्या निबंधातून सत्य किती व कसे व्यक्त होते ह्याची कल्पना येईल.

Of Marriage and Single Life ह्या निबंधाची -“He that has wife and children hath given hostages to fortune; for they are impediments to great enterprises, either of virtue or mischief.”- ही सुरुवात वाचल्यावरच निबंध पुढे वाचावासा का वाटणार नाही? प्रेमाच्या सागरात डुंबत असलेले दोघे अतिशयोक्तीच्या लाटांवरच खेळत असतात हा बहुतेकांचा अनुभव आहे. कविता, हिंदी सिनेमातील गाण्यांतून, ‘तुझ्यासाठी चांद तारे तोडून आणेन’ अशा ओळीतून तर अतिशयोक्तीचा सुखद अनुभव नेहमी येतोअाणि अतिशयोक्ति किंवा अवाच्या सवा बोलणे हे तेव्हढ्यापुरते ठीक आहे हे आपण जाणून असतो. बेकन म्हणतो “The Speaking in a perpetual hyperbole is comely in nothing but love.” हे वाचून आपणही संमती देत हसतो.

एक वेळ नाविन्याचा ध्यास नाही घेतला तरी चालेल पण निदान नविन ते माणसाने स्वीकारावे हे बेकनचे मत होते. तो स्वत: नविन होणाऱ्या बदलांना सामोरा जात असे. कोणत्याही काळात बदल, नविन विचार-वस्तु-शोध ह्यांना विरोध होत असतो. हे प्रत्येक काळात होणे चालूच असते. पण ‘नाविन्या’ला जे सामोरे जात नाहीत त्यांना सावध करण्यासाठी बेकन भाकित केल्याप्रमाणे इशारा देताना म्हणतो,”He that will not apply new remedies must expect new evils; for time is the greatest innovator.”

तो पुढे आपल्या “OF Beauty” मध्ये सौदर्यातील सत्य कशात आहे ते साध्या शब्दांत किती सुंदर करतो! वाचा, “ Virtue is like a rich stone, best plain set.”

बेकनच्याच एका सुगंधी फुला इतक्या सुंदर आणि पिकलेल्या फळासारख्या मधुर वचनाने लेखाचा शेवट करतो.”God Almighty first planted a garden, it is the purest of known pleasures.”

भक्त जोगा परमानंद

बेलमाॅन्ट

भक्त जसा परिपक्व होत जातो तशी त्याच्यामध्ये शांती क्षमा येऊनि पाही। अखंड वसती त्याचे हृदयी।हे गुण वास करू लागतात. हे सत्वगुणच आहेत पण बरेच वेळा भक्त त्याचबरोबर आपल्या भगवंतावरच्या प्रेमाला, शरीराला पराकोटीचे क्लेश देऊन त्याची भक्ती निष्ठा सिद्ध करण्याचेहीप्रयत्न करतो. पण तसे करण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे भक्त आपल्यातील विवेक ह्या गुणाला विसरला का असा विठ्ठलालाही प्रश्न पडतो. पांडुरंग, स्वत:लाच विचारल्यासारखे,भक्ताला म्हणतो,” एव्हढे का मांडिले निर्वाण। काहीच नसता अन्याय जाण। केले देहासी दंडण।।” पण तरीही भक्त स्वत:ला बजावत असतो की माझी दैवतावरील निष्ठा ही केव्हाही शंभर टक्के असली पाहिजे. नव्हे ही त्याची नेहमीच तीव्र इच्छा असते. ह्यासाठी प्रसंगी स्वत:च्या जीवाचीही तो पर्वा करत नाही. कारण माझा विठोबा मला ‘कसा मोकलील’हा त्याचा ठाम विश्वास असतो.

भक्तांच्या कथा ऐकण्यातही पुष्कळ पुण्य आहे.तीही भक्तीच आहे.श्रवण,भजन, कीर्तनआणि पठण हे भक्तीमध्ये अंतर्भूत आहेत. सामान्याप्रमाणेच साधकालाही हरीकथा ऐकणे जितके लाभदायक आहे तितकेच पुण्यवान भक्तांच्या कथा ऐकण्यातही आहे असे शंकर पार्वतीला सांगतात. ते काय म्हणतात ते आपण संतकवि महिपती बुवांच्या शब्दांतून ऐकू या.

शुद्ध सत्वगुण तोही।येत लवलाही निजप्रति।।……।सकळ दु:खांचे होय दहन।…….. वर्णिता गुण हरि कीर्तनी।। ऐसा अंतरी देखोनि नेम। मग प्रसन्न होईल पुरुषोत्तम। आपुले भजनी देऊनि प्रेम।। ऐसी भक्तकथेची गोडी थोरी। पार्वतीस सांगे त्रिपुरारी।।

भक्तकथा ऐकण्याने किंवा हरिकथा ऐकण्याने थोड्याच दिवसांत किंवा थोडक्या काळातच काही रोकडा (प्रत्यक्ष)फायदा होतो असे नाही. पण हळू हळू सद्भावनेचा उदय होऊन वाढ होते.असा हा अल्प सत्वगुण थोडा फार मुरला तरी त्याची जोपासना होऊ लागते. हया अप्रत्यक्ष फायद्यातून रोजच्या जीवनात कळत न कळत जे सुखाचे आनंदाचे क्षण येतात ते जास्त काळ टिकू लागतात.
भगवंताची एकनिष्ठेने उपासना करणारा असाच एक भक्त सोलापुर जिल्ह्यातील बार्शी गावात राहात होता. त्याचे नाव जोगा परमानंद.

जोगा गावात घरोघरी भिक्षाटनास जात असे. मिळेल त्या भिक्षेत कुटुंबाचे पोषण करीत असे. आंधोळ करून घरातल्या देवाची यथासांग पूजा करून तो गावातल्या प्रसिद्ध भगवंताच्या दर्शनाला जात असे. पण चालत जात नसे. गीतेचा एक श्लोक म्हणून जमिनीवर दंडवत घालायचा. दुसरा श्लोक म्हणायचा दुसरे दंडवत घालून पुढे सरकायचा. उठून तिसरा श्लोक म्हणून झाला की पुन्हा दंडवत……अशा रीतीने गीतेचे सातशे श्लोक म्हणत सात शते दंडवत घालून भगवंताचे दर्शन घ्यायचा. हे झाले की घरी चालत आल्यावर मगच जेवण करायचा. हा नित्यनेम पाहून गावातले लोक तर जोगा परमानंदाला मोठा मानीतच पण परगावातून बाजारहाटासाठी आलेले लोक आणि लहान मोठे व्यापारीही थक्क होत.

त्या रात्री खूप पाऊस पडला. रस्ता चिखल पाण्याचा झाला होता. गेले दोन तीन दिवस जोगाची ही दंडवत भक्ती पाहून एका व्यापाऱ्याच्या मनात आले की ह्या भक्ताला आपल्या मालातील एक पितांबर द्यावा. चिखलातूनही साष्टांग दंडवत घालत येणाऱ्या जोगाला पाहिल्यावर तर तो व्यापारी अचंबित झाला. निष्ठानेम म्हणावा तर हीच व निष्ठावान भक्त पाहावा तर जोगा परमानंदासारखा असे मनात म्हणत तो व्यापारी जोग्याजवळ जाऊन नम्रतेने म्हणाला,” जोगा महाराज! तुम्ही हा पितांबर घ्यावा व तो नेसावा. मला फार फार संतोष होईल.” जोगा म्हणाला,” शेठजी, हा पितांबर माझ्या काय कामाचा? मला स्वत:ला व घरालाही तो अति विशोभित दिसेल. जुन्यापान्या धोतरावर माझे भिक्षा मागून पोट भरते. आणि शेठजी ह्या पावसापाण्यात पितांबर काय कामाचा? राहू द्या तुमच्यापाशी. त्यापेक्षा हा तुम्ही पांडुरंगाला नेसवावा.” जोगाच्या बोलण्यावर शेठजी आदरपूर्वक म्हणाला,” जोगा परमानंद, तुमचे ह्यामुळे पोट भरावे किंवा घरासाठी ह्याचा काही उपयोग व्हावा ह्या विचाराने मी पितांबर दिला नाही. तुमची भक्ती पाहून माझे मन भरून आले म्हणून ही फुल ना फुलाची पाकळी देतोय. पांडुरंगालाही मी दुसरा देईन. चिखल- पाण्याने पितांबर खराब होईल तर त्याचीही चिंता नको. मी आणखी एक पितांबर आपल्याला देईन! आपण हा पितांबर नेसूनच पुढे जावे. माझ्या मनाला बरे वाटेल.”

तरीही जोगी परमानंदाने आढेवेढे घेतले. पण व्यापाऱ्याने मनापासून केलेल्या आग्रहापुढे व देणाऱ्याचे मन मोडू नये ह्या विचाराने जोगा नमला. त्याने तो पितांबर परिधान केला.

गीतेचा श्लोक म्हणत जोगा दंडवत घालणार पण पितांबर पायघोळ होतोय हे त्याच्या लक्षात आले. पितांबर वर खोचला. दंडवत घालायला वाकला पण हा भारी पितांबर चिखलाने घाण होईल ह्या विचाराने तो कुठे कोरडी जागा दिसतेय का पाहू लागला. चिखल तर सगळीकडेच झाला होता. ते पाहिल्यावर जोगाने दंडवत घातले. पुढचा श्लोक तो म्हणाला पण घसरलेले पितांबर पुन्हा वर खोचले. आणि दंडवत घातले. असे होता करता किती प्रहर उलटले ते जोगा परमानंदाच्या आज लक्षात आले नाही. कोणता श्लोक म्हणून झाला हेही त्याच्या बरेच वेळा लक्षात येईना. शरीर थकले होते पण त्यापेक्षाही मन फार ठेचकाळले होते. देवळा बाहेरच बसून राहिला.

हे काय झाले आज! कालपर्यंत रोजच्या धोतराकडे ते जुने का पुराणे, स्वच्छ का मळलेले, ते धुळीने भरते का वाऱ्याने उडते हे विचारही मनात येत नव्हते. भगवंताशिवाय दुसरीकडे अर्धा क्षणही लक्ष गेले नाही. आणि आज दंडवतापेक्षा, पांडुरंगापेक्षा पितांबरातच मन गुंतले होते.मनातच पांडुरंग नव्हता तर तो ध्यानांतही कसा असेल?  जोगा खिन्न झाला. त्याहीपेक्षा त्याला स्वत:चा संताप आला. तो आपलीच निर्भत्सना करू लागला. “अरे कुठे गेला तुझा नेम? मन थाऱ्यावर नव्हते. ते पितांबराच्या भरजरीत होते.ते चिखलाने माखेल ह्याची तुला चिंता होती. पितांबराच्या मोहाने मन बरबटले ह्याची तुला फिकीर नव्हती. अरे जोगड्या, काल पर्यंत काय पितांबर नेसलेल्या पांडुरंगाशिवाय तुला कशाचेही भान नव्हते. दंडवताने कष्ट होतात म्हणजे काय हे तुझ्या खिजगणतीतही नव्हते! एकाग्रता काय असते,ती वेगळी काही असते हे माहित असण्याचीही तुला आवश्यकता पडली नाही. कारण तुझे चित्त पांडुरंगाच्या पायीच रंगले होते.तल्लीनता एकाग्रता अनन्यता हे शब्द तुझ्यासाठी वेगवेगळे नव्हते.कारण तो तुझा सहज भाव होता.पण आज पितांबर नेसलास काय आणि त्याच्याच विवंचनेत गुंगलास काय! अरे जोगी होतास तो चार हात पितांबरामुळे भोगी झालास! लाज वाटली पाहिजे तुझी तुलाच. उठ प्रायश्चित्त घे.शिक्षा भोग. त्यामुळे तरी तुझी भगवंतापाशी थोडीफार पत राहिल. उठ!”

जोगा परमानंद असा विचार करत असतानाच समोरून धष्टपुष्ट बैलांची जोडी घेऊन एक शेतकरी चाललेला दिसला. शेतकऱ्याला आपला हा भरजरी पितांबर घेऊन त्या बदली त्याचे बैल काही वेळासाठी परमानंदाने घेतले. शेतकरीही थोड्या वेळासाठी इतका भारी पितांबर मिळाला ह्या आनंदात होता. परमानंदाने शेतकऱ्याकडून चऱ्हाटाने आपले पाय बैलाच्या जोखडाला घट्ट बांधून घेतले. आणि तो शेतकऱ्याला म्हणाला बैलाना जोरात चाबूक हाणून पळव. भाड्यापोटी भारी पितांबर मिळाल्याच्या आनंदात शेतकऱ्याने जोगा सांगेल तसे केले.

चाबकाचा फटकारा बसल्यावर बैल चौखुर उधळत निघाले. आणि जोगा परमानंद फरफटत चालला. काटेकुटे-सराटे, दगड-गोटेआणि खड्यां-मातीतून जोगा अंग खरचटत फरपटत होता.नंतर कातडे सोलून निघू लागले. रक्त वाहू लागले. बैल वारा प्याल्यासारखे, शेपट्या वर करून पळतच होते. बैलांना आवरणारा कुणी शास्ता नव्हता. त्याही सिथितीत पश्चात्तापाने पोळलेला जोगा तोंडाने,” जय रूक्मिणीमानसरंजना। पयोब्धिवासा शेषनयना । भक्त कैवारिया गुणनिधाना। जगज्जीवना पांडुरंगा।। असा धावा करीत, मध्ये रामकृष्ण हरि हा नाममंत्र जपत, अंगाची कातडी सोलून निघालेल्या,मांसपेशी लळत लोंबत खाली पडत चाललेल्या अवस्थेत फरफटतच होता. बैल थांबण्याचे चिन्ह नव्हते. जोगाचे हाल संपणार नव्हते. आता तर रक्ताने माखलेला हाडाचा सांगाडा तोंडाने जय जय जय रामकृष्ण हरि हे भजन करीत फरफटत होता. तो सांगाडा कोणी पाहिला असता तर तो कुणाचा असा प्रश्न त्याला पडला असता.

अखेर भक्ताची दया देवालाच येणार ह्या न्यायाने चक्रधारी पांडुरंग जोगा परमानंदासाठी धावून आला. बैलांसमोर उभा राहून त्यांची शिंगे धरून त्यांना थांबवले. जोगाच्या पायाचे चऱ्हाट सोडून त्याचे पाय मोकळे केले.मुखाने हरिनाम घेणाऱ्या सांगाड्याकडे अत्यंत प्रेमळ दृष्टीने पाहात पांडुरंगाने आपला कृपेचा वरदहस्त हळुवारपणे जोगाच्या सांगाड्यावरून फिरवला.भक्त जोगा पुन्हा पहिल्यासारखा झाला.

आपल्यासाठी निर्गुण भाव सोडून सगुण साकार रुपात प्रत्यक्ष प्रकट झालेल्या दयाघन विठ्ठलाकडे जोगा डोळे भरून नुसता पाहातच राहिला. मग थोड्या वेळाने भानावर आलेल्या परमानंदाने आपले रोजचे दंडवत भगवंतापुढे घातले! परमेश्वरापुढे शरण होऊन तसाच पडून राहिला. पांडुरंगाने त्याला उठवले. जवळ घेतले. विठ्ठलाने त्यानंतर जोगा परमानंदाला सांगितले ते सर्वांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे.

“रोज रस्त्यावरून दंडवत घालत शरीराला इतके कष्ट देऊन माझ्या दर्शनाला येण्याचे कारण नाही. नित्यनेमात मन काही काळ विचलित झाले तरी त्याचे इतक्या निर्वाणीला येऊन असे पराकोटीचे प्रायश्चित्त घेण्याचे मनातही आणू नये. मी भाव भक्तीचा भुकेला आहे. मला भक्तांचे इतके कौतुक असते की त्याने जेवताना घेतलेला घासही माझ्याच मुखात जातो. भक्त सहज चालत येतो जातो ती माझी प्रदक्षिणाच मानतो.आणि माझा भक्त समाधानाने झोपला तरी तेच त्याने मला घातलेले दंडवत मानतो.”
दमहिपतीबुवांनी देवाचेच शब्द आपल्या रसाळ ओव्यांतून सांगितले ते म्हणत भक्त जोगा परमानंदाची कथा संपवू या,
“ जोग्यासी म्हणे रुक्मिणीरमण। एव्हढे का मांडिले निर्वाण । काहीच नसता अन्याय जाण। केले दंडण देहासी । तुम्ही करता अन्नपान । ते माझे मुखी पडता जाण। सहज करीता गमना गमन। तेचि प्रदक्षिणा आमुची। नातरी कोणासी बोलाल वचन। तेचि होतसे माझे स्तवन। की सुख संतोषे करीता शयन। ते साष्टांग नमन मज पावे। ऐसे असता निजभक्त राया। एव्हढे निर्वाण केले कासया।

भगवंताचे हे अमृताचे शब्द ऐकून परमानंदाने देवाच्या पायांवर मस्तक ठेवले व त्याची कृपाछाया आपल्यावर सदैव असो द्यावी ही प्रार्थना केली. जोगा परमानंदाप्रमाणेच भगवंताची आपणा सर्वांवरही अशीच कृपा असू द्यावी ही प्रार्थना करून ही भक्तकथा संपवतो.

प्रसिद्ध पण अनोळखी लेखक

आपल्या सर्वांना ब्रिटिश अमेरिकन किंवा फ्रेंच आणि इटालियन लेखक माहित असतात. पुर्वीचे काही व अलिकडचेही काही.


गेल्या वीस पंचवीस वर्षात आणि त्यातीलही दहा वर्षात मला काही लॅटिन अमेरिकन, एखाद दुसरा पोर्च्युगीझ किंवा मेक्सिकन लेखक माहित झाले. त्यापैकी मी काहींचीच पुस्तके वाचली व इतरांविषयी दुसऱ्या लेखकांनी त्यांच्या संबंधात गौरवाने लिहिलेले लेख किंवा पुस्तकातील उल्लेख वाचले. बहुतेकांना Alchemist कादंबरीमुळे Paulo Coelho ह्या ब्राझेलियन लेखकाचे व ती मूळ पोर्च्युगीझ मध्ये आहे हे माहित झाले. व इंग्रजी फ्रेंच आणि इटॅलियन भाषांप्रमाणेच इतर भाषांतही उत्तम लेखक व साहित्य असू शकते हे कळून आले.

माझा वर्गमित्र कै.प्रा.मधु काळे, मी अमेरिकेला जायला निघालो की एक पुस्तक जरूर वाच म्हणायचा. मी पुस्तकाचे व लेखकाचे नाव एका कागदाच्या कपट्यावर लिहून घ्यायचो. बॅगेत जपून ठेवायचो. इतर पुस्तके पा्हण्याच्या चाळण्या वाचण्याच्या नादात काळेने सांगितलेले पुस्तक वाचायचे विसरत असे. तो कागद तसाच परत यायचा. दरखेपेला, “काळे, ह्या खेपेस नक्की वाचेन” म्हणायचो. काळे दोन वर्षांपूर्वी गेला. मी त्याने सांगितलेले पुस्तक अजूनही वाचले नाही. आता मन घेत नाही. पण अलिकडच्या पद्धतीप्रमाणे म्हणायचे तर, मी ते त्याच्या आठवणीसाठी वाचणार आहे. Octavia Paz हा मेक्सिकन कवि, लेखक आणि मुत्सद्दी. पण साहित्यिक म्हणूनच जास्त सर्वत्र ओळखला जातो. त्याने काही काव्य संग्रहासह अठरा पुस्तके लिहिली आहेत. बहुतेक सर्व प्रख्यात आहेत. त्याला १९९०मध्ये वाड.मयाचे नोबेल पारितोषक मिळाले. त्याचा त्याला आनंद झाला.

पण कोणालाही आपल्या भाषेचा सन्मान करणारे श्रेष्ठ पारितोषिक मिळाल्याचा निराळाच आनंद होतो तसा त्यालाही जेव्हा स्पॅनिश भाषेला जगाच्या नकाशावर ठळकपणे ज्याने आणले त्या अतिशय प्रख्यात कादंबरीकार Miguel de Cervantes च्या नावाने दिले जाणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पारितोषिक मिळाले तेव्हा झाला. हा सर्व्हॅन्टिस म्हणजे सर्वकालीन श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या, आपणापैकी अनेकांना माहित असणारा , Don Quixote ह्या कादंबरीचा लेखक!

आपल्याला पाझ जवळचा वाटावा कारण १९५१ मध्ये तो हिंदुस्थानात मेक्सिकोच्या वकिलातीत अधिकारी म्हणून आला. नंतर पुन्हा १९६२ साली तो वकील (राजदूत) या मोठ्या हुद्द्यावर रुजु झाला. इथल्या अनुभवावर त्याने Light In India हे पुस्तक लिहिले. आणि माझा मित्र काळेने त्याचे गाजलेले पुस्तक सांगितले ते Labyrinth of Solitude. मी काळेचा कागद आपल्याजवळ आहे हे विसरलो होतो. त्यामुळे मी नाव तेच आहे समजून दुसऱे तितकेच गाजलेले पण दुसऱ्या लेखकाचे पुस्तक One Hundred Years of Solitude हे नोबेल पारितोषिक विजेता Gabriel García Marques ह्याचे पुस्तक वाचले!

आता आपल्याला नवे तिसरे नाव समजले.

हा गार्शिआ कोलंबियाचा लेखक. जन्म १९२३ साली झाला. ह्याने आपल्या कादंबऱ्यांतून,जॅार्ज बोर्जेसने आपल्या साहित्यातून आणलेल्या सत्य आणि काल्पनिकता यांच्या बेमालूम मिश्रणातून लिहिण्याच्या प्रकारातून जी एक निराळीच वास्तवता आणली होती तिचाच विकास त्याने सहजपणे केला. तिला magical realismअसे म्हटले जाते. अदभुत वास्तव! ह्याचीही अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. Love in the Time Of Cholera, Chronicle of a Death Foretold, The General in His Labyrinth तशीच कथा संग्रह आणि लघुकादंबऱ्यांचा संग्रह ही पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. त्याने आपली One Hundred Years of Solitude ही कादंबरी १९६७साली लिहिलीआणि तो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा लेखक झाला! इतकेच नव्हे तर लॅटिन अमेरिकेचे हे पहिले “आंतरराष्ट्रीय तडाखेबंद विक्रीचे पुस्तक”असा मान मिळवला! जगभरात वीस कोटी प्रति खपल्या आहेत ! ह्या शतकातील श्रेष्ठ कादंबऱ्यांत तिची गणना होते.

गार्शिआ मार्किझ म्हणतो की कादंबरी लिहिण्याची प्रक्रिया १९५० सालीच सुरवात झाली. त्यावेळी तो आई बरोबर आपल्या आजोळी गेला होता.आठ वर्षापर्यंतचे त्याचे लहानपण आजी आजोबांच्या घरीच गेले होते. त्यामुळे तो आईबरोबर पुन्हा गेला तेव्हा त्याला “आजोळचे ते गाव तिथले रस्ते झाडे-पक्षी,घरे-माणसे, आजोबा आजीने सांगितलेल्या गोष्टी,त्यातल्याही माणसांसह व प्रसंगासह सर्व काही एका प्रचंड प्रकाशात डोळ्यांसमोर उभे राहिले.” पुढे नंतर कधीतरी लिहिताना म्हणतो की त्यावेळी मी कादंबरीचे पहिले संपूर्ण प्रकरणअगदी शब्द न् शब्द घडाघडा टायपिस्टला सांगितले असते. आजोबा आजी जशा आणि ज्या शब्दात गोष्टी सांगत तशाच तऱ्हेने मी लिहित गेलो असेही त्याने म्हटले आहे. १९६१साली लिहायला सुरुवात झाली. लिहायला अठरा महिने लागले.घरात जवळ जवळ बंदिस्त होऊन तो लिहित होता. कागदाचे दस्तेच्या दस्ते आणि सिगरेटची पाकिटे च्या पाकिटे एकामागून एक फस्त होत होती.त्याच बरोबर घरातील एक एक वस्तुही विकायला लागत होती.गहाण ठेवायची पाळी आली होती.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते तशी गार्शिआची बायको मर्सिडिझ, खंबीरपणे घर चालवत होती. दोन मुलांचे सर्व काही करणे,घर चालवणे हे तिने एकटीने केले. मोटार विकावी लागली. घरातली ठेवता येण्यासारखी प्रत्येक गोष्ट गहाण ठेवून, परतफेडीच्या मुदती वाढवून घेणे,हेही तिने केले. संसाराचा गाडा रेटत नेला. गार्शिआ मार्किझला १९८२ सालचे नोबेल पारितोषिक मिळाले! हा अर्जेंटिनाचा कवि,कथाकार,निबंधकार, भाषांतरकार तत्वज्ञानी, संपादक, आणि अर्जेंन्टिनाच्या सार्वजनिक ग्रंथालयांचा प्रमुख होता.

गार्शिआ सारखाच र्ब्युनासएअर्स युनिव्हर्सिटीमध्ये इंग्रजीच्या प्राध्यापक पदावर काम केलेला जॅार्ज फ्रान्सिस लुई बोर्जेस हा एक प्रतिभावंत साहित्यिक होता. जॅार्ज लुई बोर्जेसने तत्वदर्शी वाड.मयात मोलाची भर घातली. वाड.मयात एका वेगळ्याप्रकारची शैली आणली. काल्पनिकता,अदभुतता व प्रत्यक्षातले वास्तव सत्य ह्यांचे एकजीव मिश्रण अशा शैलीतून लिहिण्याचा मान ह्याच्याकडे जातो. ह्यात लेखकाच्या मनातील विचारांना कल्पनेत जाण्याचे स्वातंत्र्य जास्त आहे.

ह्याच्या कथासंग्रहात निरनिराळ्या कथा असल्या तरी कथा विषय समान एक असतो. त्यामुळे त्या कथा एकमेकांत जोडल्या जातात. सलग होतात. पण कादंबरी होत नाही हे विशेष. त्यांच्या कथांमध्ये Mirror, Labyrinth , Library इतकेच काय काल्पनिक लेखकही येतात. त्याचे नावाजले गेलेले पुस्तक म्हणजे Collected Fiction. ह्याला नोबेल पारितोषिक मिळाले नाही. पण प्रतिष्ठेची समजली जाणारी आंतरराष्ट्रीय, स्वित्झर्लॅंडच्या Belzan Foundation चे तसेच फ्रान्सचे Knights of the Legion of Honor अशी पारितोषिके मिळाली आहेत.

पोर्च्युगीझ लेखक Jose Saramago हे सुद्धा वरील सर्व लेखकांइतकेच विख्यात आहेत. आपल्यात ते आतापर्यंत म्हणजे २०१० पर्यंत होते. त्यांचा जन्म १९२२ सालचा. त्यांची अत्यंत गाजलेली व जिच्यामुळे त्यांना 1998 सालचे नोबेल पारितोषिक मिळाले ती Blindness ही कादंबरी वाचण्यासारखी आहे. ह्या कादंबरीचे माझे मित्र डॅा.भा.ल.भोळे ह्यांनी मराठीत भाषांतर केले आहे. त्यामुळ मला ती अनायासे वाचायला मिळाली. याच लेखकाची दुसरीही कादंबरी The Cave ही सुद्धा चांगली आहे व तीही वाचण्याची शिफारस श्रेष्ठ वाचक,इंग्रजी वाड.मयाचे प्राध्यापक, समीक्षक चार्ल्स व्हान डोरेन हे करतात.

ब्लाइंडनेस मध्ये, लोक अचानकपणे आंधळे होऊ लागतात. साथ पसरत जाऊ लागते. सरकारने ह्याला प्रतिबंध व्हावा म्हणून अशा आंधळ्यांना एका इमारतीत लोकवस्तीपासून वेगळे ठेवण्यास सुरुवात केली. तिथले आयुष्य, तिथेही काही समाजकंटक आंधळ्यांना मिळणाऱ्या अन्नपदार्थांचा ताबा घेतात. व काही मोबदल्याच्या बदली अन्नवाटप करु लागतात. मोबदल्याच्या वस्तूंमध्ये नंतर बायकांचीही मागणी होऊ लागते.

व्यवहारातील आंधळ्यांना समोर अंधार असतो तर कादंबरीत जे आंधळे होतात त्यांच्या समोर पांढरा पडदा येतो. संपूर्ण कादंबरीत,आंधळा झालेल्या डोळ्यांच्या डॅाक्टरच्या बायकोला मात्र आंधळेपण येत नाही. ती एकटी डोळस असते. ती तशी डोळस नसती तर कादंबरीत जे घडते ते आपल्याला समजले नसते. तिच्या डोळ्यातून आपण, आपलेच आंधळे झालेले जग पाहू शकतो.वाचू शकतो. मनुष्याच्या सर्व वृत्तींचे,वागण्याचे असहाय्यतेचे, त्या आंधळ्यांच्या जगातील- हे जन्माने आंधळे नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे- त्यांना परिस्थितीशी जुळवून घेण्यात रोजच्या हालचाली करण्यात, तिथल्या नरकापेक्षाही जास्त असलेल्या घाणीतून वावरताना होणाऱ्या हालांचे, पोटासाठी शरीरही देण्याचे भोग कपाळी आलेले, बळी कसे कान पिळतात इत्यादींचे दर्शन कादंबरीत होते.

डोळ्यांचा डॅाक्टर आंधळा होणे, डोळ्याच्या दुखण्यावर उपचारासाठी आलेले त्याचे पेशंट आणि तो एकाच ठिकाणी येणे;माणसांचे अशा परिस्थितीत वागणे किती एकदम वेगळे होते इत्यादी गोष्टींचे वर्णन वाचायला मिळते. शेवटपर्यंत ती डोळस बाई तिला दिसतेय हे न सांगता इतरांना मदत.करीत असते. पुस्तक वाचण्या सारखे तर आहेच.पण आपल्याला विचार करायला लावणारे पुस्तक आहे. पुष्कळ लिहिण्यासारखे आहे. ‘पांढरे आंधळेपण’ इथूनच विचार करायला लावते.

वानगीदाखल सांगितलेल्या वरील लेखकांपेक्षाही अनोळखी असलेल्या एका लेखकाची ओळख करून देण्यासाठी मी लिहिण्यासाठी बसलो होतो. पण वरील लेखकांत गुंतत गेलो. आणखी एक गंमतीचा योगायोग असा की त्या रात्री मी मुलाला ओझ् झविषयी सांगत होतो. दुसरे दिवशी संध्याकाळी तो म्हणाला,” बाबा ओझची शेवटची मुलाखत घेणारी बाई आज रेडिओवरून त्याच्या विषयीच बोलत होती!”

हा मूळ हिब्रू भाषेत लिहिणारा यहुदी(ज्यू) लेखक आहे. त्याचे नाव Amos Oz. त्याने इझ्रायल संबंधित लिहिलेल्या कादंबऱ्या, लेख, निबंध ह्यामुळे त्याचे नाव प्रथम जगातील ज्यू लोकांमध्ये व त्याचे साहित्य इतर भाषांमध्ये भाषांतरीत झाल्यामुळे जगाला माहित झाले. विशेष म्हणजे हा इझ्रायल व पॅलेस्टिनी लोकांमध्ये शांतता निर्माण होऊन ती कायम राहावी ह्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करीत होता.

Amos Oz हा इझ्रायलच्या विख्यात लेखकांपैकी होता.पण त्याहीपेक्षा त्याची ओळख शांततेसाठी उभारलेल्या चळवळीतील अग्रणी, -सर्वांत श्रेष्ठ असा पुढारी अशी होती. चळवळ दोन्ही देशांच्या लोकांमध्ये सामंजस्य वाढीस लागावे व कायमची शांतता नांदावी ह्यासाठी होती. पण अशा चळवळींना यशासाठी फार झगडावे लागते.

त्याच्या निधनाची बातमी परवा त्याच्या मुलीने Twitter वर टाकली. ती म्हणते,” माझे वडील फार चांगले, कुटंबवत्सल गृहस्थ होते. ते म्हणजे मूर्तिमंत शांती आणि उदारता आणि समन्वयच होते! कॅन्सरशी अल्पकाळ लढताना, अखेरच्या क्षणी आपल्यावर प्रेम करणारे सभोवती आहेत ह्याची त्यांना पूर्ण जाणीव होती. (शेवटच्या श्वासापर्यंत ते शुद्धीवर होते.) त्यांनी मागे ठेवलेला वारसा पुढे चालवून आपण परिस्थिती बदलू या.”

इझ्रायलच्या मातीत घडणाऱ्या कादंबऱ्या आणि इझ्रायलचा संदर्भ असलेले त्याचे लेख आणि निबंध Amos Oz ने पुष्कळ लिहिले आहेत. जगातील जवळपास चाळीस भाषांत त्याच्या कादंबऱ्या, लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तके, लघुकथा संग्रह ह्यांची भाषांतरे झाली आहेत. त्यामुळे त्याचा साहित्यिक व त्या दोन्ही देशांतील शांतिदूत म्हणूनही जगात बोलबाला झालाआहे. तो संपूर्ण इझ्रायलमध्ये व West Bank मध्येही फिरला. कितीतरी लोकांना भेटला. त्यांच्याशी आपल्या देशाचा इतिहास आणि भविष्य ह्याविषयी बोलला. अनेकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून त्याचे In the Land of Israel हे पुस्तक लिहिले गेले.

ओझ चे आई वडील पूर्व युरोपातून इझ्रायलमध्ये आले. देश अजून निर्माण झाला होता-नव्हता अशा बाल्यावस्थेत होता. ओझचा जन्म १९३९ साली इझ्रायलमध्येच झाला. त्यामुळे आई वडील आणि त्यांच्या पिढीतल्या लोकांना जे युरोप व पाश्चात्य देशांविषयी जवळीक,आकर्षण व अभिमान होता तसा त्याला नव्हता. तो बाळइझ्राईलमध्येच वाढला. नंतर त्याला आपला इझ्रईली तरुण,तरूण- इझ्राइल घडवत आहेत त्याचे आकर्षण होते. तो आपल्या आठवणींत लिहितो,” नव्या देशाबरोबरच मीही माझ्या आयुष्याचे नवीन गीत गाणार आहे.भर माध्यान्ही पाण्याने भरलेला ग्लास जसा हवासा वाटतो तसे या देशातील माझेच नाही सर्वांचे आयुष्य साधे आणि सरळ रेषेसारखे व्हावे असे वाटते !” ॲमॅास ओझने १९६१ साली लष्करी शिक्षण पूर्ण केले. १९६७ साली इझ्रायलने ईजिप्त आणि सिरिया या देशांना युद्धात पाठिंबा दिला. त्या युद्धात आणि १९७३च्या Yom kippur च्या युद्धातही तो आपल्या देशाकडून लढला होता.

त्याच्या आठवणीतून व्यक्त होणारे आत्मचरित्र A Tale of Love and Darkness प्रख्यात आहे. त्या पुस्तकाला Goethe Prize आणि इतर सन्मानही लाभले. त्यावर आधारित सिनेमाही निघाला आहे. इझ्रायलचा नामांकित मुत्सद्दी व पंतप्रधान शिमन पेरेझ हा ओझचा मित्र होता. ह्या पंतप्रधानाला पॅलेस्टिनींशी सलोख्याचे संबंध ठेवण्यात ओझने पुढाकार घेतला होता.ह्यासाठी त्याला शांततेचे नोबेलही मिळाले. ओझने, पॅलेस्टाईनशी शांतता करार व्हावा आणि त्याला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळावा हे कलमही त्या शांतता करारात असावे ह्यासाठी वर्तमानपत्रांतून व ठिकठिकाणी अनेक लेख लिहिले.

तो व्यथित होऊन म्हणतो की दोन इझ्रायलींमध्ये आपला देश कसा व्हावा धोरण काय असावे ह्यावर एकमत होत नाही! साहित्यिक म्हणून ॲमॅास ओझचे महत्व फार मोठे आहे. त्याने आपल्या हिब्रू भाषेतून लिखाण केले. हिब्रूचे पुनरज्जीवन केले. तिला संजीवन दिले. साहित्यिक जगात स्थान मिळवून दिले. ही त्याची मोठी कामगिरी आहे.

ओझ गेल्यावर त्याला कट्टर विरोध करणाऱ्या पंतप्रधान नेत्यानेहूनेही,ओझने हिब्रू भाषेला जागतिक स्तरावर नेल्याचे मान्य करून त्याचा ह्याबाबतीत गौरव केला आहे. ओझच्या आत्मचरित्रात्मक आठवणींच्या गाजलेल्या पुस्तकाचे शीर्षक वापरून इझ्रायलचे राष्ट्राध्यक्ष रूव्हेन रिव्हलिन ह्यांनी यथार्थ व समर्पक शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणतात,” A Story of Love and light and now darkness!” त्याच वेळी इझ्रायलच्या भेटीसाठी आलेल्या युरोपियन युनियनच्या प्रतिनिधी मंडळाने तर ओझचा इझ्रयल व पॅलेस्टाईन ह्या दोन लोकांत शांततेसाठी झगडणारा बुलंद आवाज ह्या शब्दांत गौरव केला. अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके ओझला मिळाली असतील पण शांततेचे नोबेल मिळावे ह्या यादीत मात्र तो कायम ‘नामांकन यादीत’ अजून तिष्ठत उभा आहे!

शतकानुशतके समाज , सामाजिक विचार, राजकीय विचारसरणी आणि अप्रत्यक्षपणे माणसाचे जीवन जी वळणे घेत घेत आज जिथे माणूस आला आहे त्यामागे ह्यांच्या सारखे, आणि फार पूर्वीपासून होत गेलेले अनेक लेखक आहेत हे विसरता येणार नाही. साहित्य, वाड•मय काय करते त्याचे उत्तर आपणच, आणि आपले जीवन हे आहे. आजपावेतो माणसाच्या विचारात आणि आचरणात बदल होत झाले त्याला बव्हंशी लेखक त्यांचे साहित्य/वाड•मय, पुस्तके, कारणीभूत आहेत. ऋण मानायचे की नाही हा प्रश्न नाही; त्या ऋणात आपण राहणे ही कृतज्ञता आहे.

ता. क.
वर्गमित्र प्रा. मधुकर काळे ह्याच्या स्मरणार्थ त्याने सतत शिफारस केलेले Octavio Paz चे The Labyrinth of Solitude हे पुस्तक नुकतेच घेतले. वाचायला सुरुवातही केली. १८ फेब्रुवारी २०२२