Monthly Archives: July 2017

पाणी

आम्ही बसमधून उतरलो. स्टॅंडमध्ये बाजूला जाऊन बसलो. त्या दोघी आणि थोडे अंतर ठेवून तेही बसले. तिघेही गप्पच होते तसे. त्या एकमेकींशी मधून बोलत असाव्यात. हळू आवाजात. मीच म्हणाले, ” मी आपली परतीची तिकीटे काढून येते.” कोणी काही म्हणाले नाही. 

तिकीट घेऊन आले; आणि त्यांना म्हणाले, “दुपारी ४ची काढली बरं का? आज दुपारी निघायचंयआपल्याला.” “काय? आज दुपारीच? लगेच? मग आलो तरी कशाला इथं आपण ? “  ” पण निघतानाच हे ठरलं होतं आपलं.” मी म्हणाले. ” मला कुणी विचारलं नाही, की सांगितलंही नाही!” ते रागानेच म्हणाले. “ह्या दोघींनी मला सांगितलं तसं मी केलं. मला वाटले तुम्हाला माहित आहे सगळे.” ” अगं, त्या बोलतात का माझ्याशी कधी? तुला माहितेय हे सगळं.”ते चिडूनच बोलत होते. आणि रागारागाने दूर जाऊन बसले. हे असे बऱ्याच वेळा होते. घरातही रागवारागवी झाली की ते कुठेतरी दुसरीकडे जाऊन बसतात. मी म्हणाले,” मी आले तिकीटं परत करून. उद्या सकाळी काय ते ठरवू.” म्हणत मी निघाले. त्या दोघी काहीही बोलल्या नाहीत. मी परत आले. त्या दोघींजवळ बसत म्हणाले,” तुम्ही त्यांना काहीही सांगितले नाहीत, बोलला नाहीत? आताही काही म्हणाला नाहीत दोघीजणी तुम्ही!” ” अगं, काय बोलायचं त्याच्याशी? आणि का बोलायचं? तुला माहित नाही तो आमच्याशी कसा वागत होता ते.”  ” मी कधी तुम्हाला विचारले नाही म्हणा. पण तुम्हीही मला  आपणहून कधी काही सांगितलं नाही.  बरं जाऊ दे ते. चला निघूया.” असे म्हणत, मी त्यांच्याकडे गेले.  बसता बसताम्हणाले, आता घरी जायचे, चला, म्हणत मी उठले. “जायचं ठरले वाटते” असे पुटपुटत तेही उठले. आम्ही

घरी आलो. संध्याकळी मी मैत्रीणींकडे गेले. रात्री आले. दोघींशी आणि मग त्यांच्याशीही बोलत बसले.

दोन तीन दिवस मैत्रिणींबरोबर मजेत गेले.सिनेमा,पार्कमध्ये, भेळ भत्ता, हाॅटेलात जाणे, सगळ्यात मजा येत होती. पण गप्पांइतकी चव कशात नव्हती. आमच्या घरीही मैत्रिणी यायच्या. दोघींशीआणि त्यांच्याशीही त्या बोलत बसत. ते तिघेही हसत, मैत्रिणींची माझी गंमत करत बोलायचे. दोन तीन दिवस छान गेले. मग तेच म्हणाले आता आपण निघूया. त्या दोघींचीही तीच इच्छा दिसली. मी म्हणाले, “माझे उद्या थोडं काम आहे. ते झालं की दुपारी निघूयात.” 

परत आम्ही इकडे आलो. इकडे आल्यावर इथले झालो. दुपारी बोलत बसलो होतो. त्या दोघी त्यांच्या जागी. ते त्यांच्या सोफ्याच्या खुर्चीत. मी माझ्या ठरलेल्या खिडकीपाशी.काही वेळ त्या दोघींच्या जवळ तर थोडा वेळ त्यांच्या बाजूला. मध्येच माझे चहा पाणी आणणे चालू होते . बोलता बोलता त्या दोघी म्हणाल्या,”दोन दिवस किती छान गेले तिकडे.” तेही पुस्तकातून वर पाहात म्हणत होते, “मलाही फार बरे वाटत होते तिथे. असे नेहमीच होते.” मी म्हणाले, “अहो तुम्ही तिघेही तर निघायचे म्हणलात की.” त्या म्हणाल्या, “अगं,तिकडे गेल्यावर इकडची आठवण येते,” त्या आणखी काही म्हणायच्या आत ते हळू आवाजात म्हणाले, “इथे आलो की तिथल्या घराची आठवण येते.” मीही थोडे थांबत थांबत म्हणत होते, “मलाही त्या घराची फाSर आठवण येते.” दोघी म्हणत होत्या,”अगं,आमचं सगळं आयुष्य त्या गावात, घरात गेले.” तेही तेच सांगत होते. तिघांचे आवाज बदलले होते. मी सांगू लागले,” अहो, मीही तिकडे येत असे. आम्ही सगळे येत असू सुट्टया लागल्या की दरवर्षी! “  ‘सगळे’ शब्द एकदम बाहेर पडत नव्हता. माझ्या एकेका हुंदक्यातून एकेक अक्षर कसे तरी येत होते. पुन्हा ‘आम्ही सगळे’म्हणू लागल्यावर मात्र माझा बांध फुटला!  डोळ्यांतले पाणी वाढू लागले. पाण्याच्या डोळ्यांनीच पाहू लागले, तिघांचेही डोळे पाण्यांनी वाहात होते. 

इतके दिवस त्या पाण्यानेच आम्हाला जवळ आणले होते! 

पंडितराज जगन्नाथ

मॅरिएटा

संस्कृत वाड.मयात, कालिदास आपल्या ‘शाकुंतल’  व ‘मेघदूत’ या काव्याने, भवभुति ‘उत्तररामचरित’या नाटकामुळे लोकप्रिय आहेत. राजा शूद्रक त्याच्या ‘मृच्छकटिक’नाटकाने सर्वमान्य झाला. जगन्नाथ पंडिताच्या वाट्याला त्यांच्या इतकी लोकप्रियता आली नसेल; पण अनेक विद्वानांच्या मते तो संस्कृत कवींचा मुकुटमणि आहे.

एका नावासारखी अनेक नावे असतात. हेच पाहा ना , जगन्नाथ पंडिताच्या काळाच्या सुमारासच दहा-बारा जगन्नाथ पंडित होऊन गेले. त्यातील एखाद दोन कविही होते.एका जगन्नाथाने महाभारतातील राजकारणावर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. एक जगन्नाथ पंडित तर राजा होता. पण आपण आज ज्याची गोष्ट ऐकणार आहोत ती ‘गंगालहरी’ या अप्रतिम काव्याचा कर्ता पंडितराज जगन्नाथ याची.

इ.स १५५० साली आंध्र प्रदेशातील वेंगिनाड गावात जगन्नाथ पंडिताचा जन्म झाला. त्याच्या वडिलांचे नाव पेरमभट्ट आणि आईचे नाव लक्ष्मी होते. जगन्नाथ पंडिताचेवडील पेरमभट्ट मोठे विद्वान होते. आपल्या वडिलांपाशीच जगन्नाथ पंडिताचे शिक्षण झाले. अत्यंत बुद्धिमान असलेला जगन्नाथ पंडित सर्व शास्त्रात पारंगत झाला. खऱ्याअर्थाने पंडित झाला. त्याला आपल्या वडिलांचा खूप अभिमान होता तितकाच त्यांच्याविषयी आदरही होता.’ रसगंगाधर ‘ या वाड.मयशास्त्रावरील प्रख्यात ग्रंथाच्याप्रस्तावनेतील एका श्लोकात त्याने आपल्या वडिलांना महागुरू म्हटले आहे.

जगन्नाथ पंडिताचे लग्न झाले. त्याच्या बायकोचे नाव भामिनी. ही भामिनी रसिक होती. मोठी विदुषीही होती. लग्नानंतरचा थोडा काळ काव्यशास्त्रविनोदात मोठ्याआनंदात गेला. थोडा काळ म्हणण्याचे कारण असे की भामिनी लवकर वारली. जगन्नाथ पंडिताने भामिनीविलास हे काव्य तिच्या स्मरणार्थ लिहिले आहे.

जगन्नाथ पंडिताची आई अगोदरच वारली होती. आणि आता भामिनीही गेली. वडीलही थोड्याच काळात वारले. संसार, कुटुंब या अर्थाने जगन्नाथ पंडित एकटा, एकाकीपडला. आपले नशीब उघडण्यासाठी, किंवा या एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी किंवा आपल्या ज्ञानाची,विद्वत्ततेची इथे अथवा जवळच्या कर्नाटक, महाराष्ट्रात कदर होतनाही, दखल घेतली जात नाही या भावनेतूनही असेल, पण जगन्नाथ पंडित उत्तरेकडे निघाला.

जयपुरचा राजा भगवानदास याने त्याला आश्रय दिला. जगन्नाथ पंडिताने पाठशाळा काढली. त्याच्या हाताखाली शिकून तयार झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्यागुरुची कीर्ति सर्वदूर पसरवली. त्या काळी विद्वान शास्त्री पंडितांच्या वादसभा, चर्चा होत असत. त्यात पंडित जगन्नाथ अनेक वेळा विजयी झाला.

जगन्नाथ पंडित नुसताच व्युत्पन्न शास्त्री पंडित नव्हता. तो मोठा रंगेल वृत्तीचा रसिक कविही होता. त्याला आपल्या विद्वत्तेचा, काव्यप्रतिभेचा अभिमानआणि आत्मविश्वासहोता. जिथे विद्वत्ता प्रतिभा अभिमान आत्मविश्वास असतो त्याबरोबर अहंकारही येतो. तसा त्याच्या आत्मविश्वाला अहंकाराचा सुगंधही होता. अहंकाराला सुगंधम्हणायचे? जगन्नाथ पंडिताच्या बाबतीत तसे म्हणायला हरकत नाही. कारण तो कवि हृदयाचा होता.हा अहंकार त्याच्या काव्यप्रतिभेपुरता मर्यादित होता.

पंडित जगन्नाथाच्या आत्मविश्वासाचे उदगार त्याच्या ‘रसगंगाधर’ ग्रंथात पाहायला मिळतात. तो एके ठिकाणी म्हणतो,” प्रसाद या गुणाचे उत्तम उदाहरण म्हणजे माझीबहुतेक सर्व काव्ये”. रसगंगाधरमध्ये विविध रसांची उदाहरणे देतानाही हा बहुतेक स्वत:ची काव्येच देतो! त्याबद्दल तो म्हणतो की,” मी इतरांच्या कविता कशाला घेऊ?आपल्यातच कस्तुरी असणारा मृग दुसऱ्या फुलांचा वास कशाला घेईल?” गंगालहरीतही एके ठिकाणी जगन्नाथ या नामाचा उपयोग त्याने स्वत:चे नाव आणि ‘मी जगाचानाथ’ असे दोन्ही अर्थ होतील अशा तऱ्हेने करून आपला रुबाब दाखवला आहे!

ह्या बरोबरच त्त्याची गुलाबी रंगेल वृत्तीही एक मोठा विशेष आहे. गंगालहरीसारख्या आर्तमधुर भक्तीपर काव्यातही ‘नृपतिरमणींनां कुचतटी’, ‘ सुरस्त्री वक्षोज’ अशा गोष्टीआढळतात. पण तरीही त्यातील भक्तिरसाची गोडी, भक्ताची आर्तता यत्किंचितही कमी होत नाही.

जगन्नाथ पंडिताच्या काळात अकबर बादशहा हिंदुस्थानचा सम्राट होता. तो सुसंस्कृत होता. रत्नपारखी होता. म्हणूनच त्याच्या दरबारातील मंत्री,सल्लागारांना नवरत्नेम्हणत. त्याचा दरबार नवरत्न दरबार म्हणूनच ओळखला जात होता.

अकबराने सर्व धर्मातील पंथातील चांगल्या आणि सर्वमान्य अशा तत्वांच्या आधारे एक नविन धर्म, ‘ दिने-इलाही’ स्थापन करण्याचा प्रयत्न केला. एकदा एक विद्वानमौलवी अकबराला म्हणाला की तो एखाद्या विद्वान हिंदु पंडिताशी कुराणाच्या आधारे धर्म चर्चा करायला तयार आहे. अकबराने अशा हिंदु पंडिताचा शोध घ्यायलासांगितले. सगळ्यांकडून अकबराला जगन्नाथ पंडिताचेच नाव ऐकायला येऊ लागले.

अकबराने जयपुरच्या नरेशाला जगन्नाथ पंडिताला दिल्लीला पाठवण्याचा सांगावा धाडला. दिल्लीच्या बादशहाचा निरोप म्हणजे हुकुमच की! शिवाय जयपुरच्याराजाची बहिण अकबराची एक राणी होती. अकबराला तिच्यापासून एक मुलगी झाली होती. ती बुद्धीमान आणि सुंदर होती. अकबराने लाडाने तिचे नाव लवंगी ठेवलेहोते. कुनिष्का असे तिचे दुसरेही एक नाव होते असे म्हणतात.

दिल्लीला जाण्याअगोदर जगन्नाथ पंडिताने कुराणाचा अभ्यास केला. दिल्ली दरबारी पोचल्यावर जगन्नाथ पंडिताची आणि त्या मौलवीची बरीच चर्चा होत असे. चर्चेतूनकाय निष्पन्न झाले त्याची कुठेही नोंद नाही.

दमलो होतो थकलो होतो …

मला पंढरपुरची पायी वारी करण्याची बरेच वर्षापासून इच्छा होती. पण तसा योग येत नव्हता. मी तसा ज्ञानेश्वरांच्या पालखीबरोबर सासवडपर्यंत बरेच वेळा जात असे. त्यातहीमोठा आनंद होता.मला स्वत:ला मात्र दुधाची तहान ताकावर भागवली असे वाटायचे. अखेर ती संधी चालून आली. माझी पंढरपुरची पायी वारी सफळ झाली!

ही हकीकत २००७ सालची. त्यानंतरहा मी जेव्हा संधी मिळेल तेव्हा माऊलीबरोबर सासवडपर्यंत जाउन येत असे. असाच २०१४ साली निघलो. पण हडपसरच्या पुलापाशीआल्यावर फार दमलो होतो. एक पाऊल टाकवत नव्हते. दम खाण्यासाठी पुलाखाली बसलो होतो.समोर वारी दिसत होती…..

 

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो

समोरुन वारी वाहात होती
वारकऱ्यांची पावले पळत होती
विठोबाला पाहाण्यासाठी.

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो.।।

किती पावले चालत होती
गणती करता येत नव्हती!
चपला होत्या सॅंडल्स होत्या
फ्लोटर्स होते वहाणाही होत्या.
हवाई होत्या स्लीपर्स होते
बूट होते शूज होते
वाॅकर्स होते रनर्स होते
पण हे सगळे थोडे होते.
चपलाच सगळ्यात जास्त होत्या.
कोल्हापुरी होत्या कानपुरी होत्या
बऱ्याच काही अनवाणी होत्या!

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो. ।।

सलवार होती कुडते होते
टाॅप होते खमिजही होते
पॅंट होत्या जिन्स होत्या
पण सगळ्या अगदी मोजक्या होत्या
शर्ट होते टिशर्ट होते
पण सदरे पायजमे सर्वत्र होते
ओढणी होती सलवार होती
पण साड्या लुगडी भरपूर होती.

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो. ।।

पटका होता मुंडासे होती
कॅप कुठे दिसत नव्हती
फेटा कुठे क्वचितच होता
गांधी टोपीचा सागर होता.
डोक्यावर तुळस होती
एखादीच्या कळशी होती.
ओझी होती बोचकी होती
पावले झपझप पडत होती।।
पोरे होती लेकरं होती
आजे होते आजी होती
काठी टेकत चालली होती
मी मात्र …

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो.।।

आवाज होता घोष होते
गजर होता गोंधळ नव्हता.
नाद होता ताल होता
टाळ मृदुंग वाजत होता
वारी अभंग म्हणत होती
दिंड्या पताका नाचत होत्या.
ज्ञानोब्बा माऊली तुकाराम तुकाराम
हा एकच मंत्र चालला होता.
रामकृष्ण हरि रामकृष्ण हरी
ज्ञानेश्वर माऊली तुकराम
हेच परवलीचे शब्द होते
सगळे वेद ह्यातच होते.

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसलो होतो.।।

घेणारे हात हजार होते
देणारेही तितकेच होते
विठ्ठल- प्रसाद वारीचा
आनंदाने खात होते.
सर्वच काही हसत नव्हते
पण सगळे आनंदाSत होते.
समोर वारी वाहात होती
सद्भाव वाटत चालली होती.

दमलो होतो थकलो होतो
पुलाखाली बसून होतो.।।

वारी कधी नाचायची
मधीच थोडी थांबायची
टाळ मृदुंग दणदणायची!
लगबग होती धावपळ होती
विठोबाला भेटण्यासाठी
सागर नदीला मिळण्यासाठी
वेगात वारी चालली होती.
काठावर मी बसलो होतो
तरीही मी भिजलो होतो
आता मी उठलो होतो
चार पावले टाकीत मी
वारी बरोबर जात होतो …।।