Monthly Archives: September 2008

ऍन आयरिश कंट्री डॉक्टर

रेडवूड सिटी

काल रात्री “ऍन आयरिश कंट्री डॉक्टर” हे पॅट्रिक टेलरचे उत्तम पुस्तक वाचून संपवले. दुसरे महायुद्ध संपल्यानंतरच्या ५-१० वर्षांच्या काळात नुकताच डॉक्टर झालेल्या एका तरुण ,हुशार डॉक्टराच्या अनुभवाची ही कादंबरी आहे.स्वत: लेखक हा डॉक्टर आहे. खेड्यात वाढलेला आहे. शाळा कॉलेजात अभ्यासू, हुशार तसेच काव्य-शास्त्र-विनोद यात उत्तम रस असलेला असा हा तरुण डॉक्टर. डॉक्टरीची परीक्षा पास झाल्यावर पुढचे उच्च शिक्षण घेण्याची इच्छा होती पण पैशाची अत्यंत गरज होती म्हणून एका लहानशा खेड्यातील अनुभवी डॉक्टराच्या हाताखाली काम करण्यासाठी आला.

खेड्याचे नाव ’बेलीबकलबो’ जिथून डॉक्टर झाला ते बेलफास्ट हेच जवळचे मोठे शहर. ह्या तरुण डॉक्टरचे नाव बॅरी लॅव्हर्टी. ह्याला खेड्यातील निसर्ग सौदर्याची, तिथल्या शांत वातावरणाची मनापासून आवड होती.

बेलीबकलबो कुणालाही फारसे माहित नसलेले गाव. पण तिथला एकमेव डॉक्टर एफ. एफ.ओरॅली तसा प्रसिद्ध होता. ओरॅली म्हणजे एक आडदांड, मस्त व्यक्तिमत्व. त्याच्याकडे काम करताना डॉ.बॅरी लॅव्हर्टीला व्यवसायातील व्यवहारी शहाणपण,रोग्यांविषयी आस्था, गावातल्या लोकांविषयी जिव्हाळा; आपल्या ज्ञानाचा, पेशाचा दबदबा कसा ठेवावा पण त्याच बरोबर रोग्याच्ची जबाबदारी आपण कशी घेतली पाहिजे, त्याच्या कुटुंबाविषयी आस्था, काळजी; आपला थोडा धाक आणि ह्या सर्व गोष्टींबरोबरच इतर गप्पा, धमाल ह्या सर्व गोष्टींचे लॅव्हर्टीला नकळत पण प्रत्यक्ष मिळालेले शिक्षण आणि अनुभव; आणि पुस्तकी ज्ञानपेक्षा लोकांच्या भावना, समजुती, त्यांची रहाणी स्वभाव हे सगळे ध्यानात घेऊन उपचार कसे करावेत ह्याचे फार सुंदर आणि अगदी धमाल विनोदी नसले तरी मनापासून हसवणारे प्रसंग ह्या पुस्तकात आहेत. डॉ.बॅरी लॅव्हर्टीबरोबर आपण वाचकही बॅलीबकलबो ह्या खेडेगावाशी आणि तिथल्या माणसांशी किती एकरूप झालो आहोत हे वाचून झाल्यावरच समजते! डॉ.ओरेली दणकट आडव्या बांध्याची आसामी. त्याचा आवाजही त्याच्या देहाला शोभेल असाच मोठा आणि जीभही धारदार. डॉ. ओरेलीचीही वाचन चौफेर.बायबल, पुराण, कविता, इतिहास, साहित्य, नाटके, शेक्स्पिअर,ऑस्कर वाइल्ड, शॉ ,यांच्या साहित्यातील उतारेच्या उतारे संदर्भासहित पाठ! डॉ. बॅरी लॅव्हर्टीला तोडीस तोड.बोलण्यातही वाकबगार, व्यवहारात बेरकी पण तितकाच मोठ्या मनाचा.उदार हृदयाचा आणि विनोदीही..तो नौदलात डॉक्टर होता.तिथे युद्धात काम केल्यामुळे अनुभव दांडगा.समुद्र आकाश ,वारे ,तारे यांच्या सतत सान्निध्यामुळे त्यातही तज्ञ. अशा डॉ.फिंगल ओरेली ह्या वरून नारळासारख्या टणक,फणसासारख्या काटेरी पण आतून गोड पाण्यासारखा, गोड गऱ्यांसारखा, दणकट तितकाच सहृदयी मोकळ्या मनाच्या , शुद्ध अंत:करणाच्या डॉक्टरवर बॅलीबकलबोच्या लोकांइतकेच आपणही प्रेम करू लागतो. आदराने बोलू लागतो.

गदिमा आणि व्यंकटेश माडगूळकरांमुळे माडगूळ आणि तिथली माणदेशी माणसे, गो.नी. दांडेकरांचे हर्णे,श्री.ना पेंडशांची गारंबी आणि तिथला बापू, पु.लंचे’रावसाहेब’, प्रकाश संतांचा ’लंपन’ आणि त्याचे बेळगाव, आर.के. नारायणचे मालगुडी, जेम्स हेरीयटचे ’ऑल क्रिचर्स ग्रेट ऍंड स्मॉल’ मधील —डेल गाव असो की ए.जे. क्रोनिन चे सिटाडेल मधील गाव किंवा होमेर हिकमचे कोलवूड आणि त्या गावातील खाण कामगार असोत, ही आपल्या मनात कायमची घर करून राहिले आहेत. पॅट्रिक टेलरचे बॅलीबकलबो हे गाव आणि डॉ.ओरॅली,तिथली माणसेही अशीच आपल्या मनात कायमची रहातील यात शंका नाही.
आपणही तिथलेच, त्या त्या गावचे रहिवासी आहोत असे वाटायला लागते. ह्यातच ह्या सर्व लेखकांचे मोठेपण आहे.वर नमुन्यादाखल उल्लेख केलेल्या पुस्तकांमुळे आपल्यालाही आपले गाव आणि तिथल्या माणसांविषयी जास्त जिव्हाळा वाटू लागतो!

*****************************

डॉ.बॅरी लॅव्हर्टी डॉ.ओरॅलीचे बोलणे ऐकत होता. पण त्यापण ह्या खेडेगावात कशाला आलो.,इथे रहायचे की नाही हे ठरत नव्हते.ओरॅलीने त्याला आपल्या समोरच्या खुर्चीत बस म्हणून सांगितले. तो बसला. पण बसल्यावर तो घसरायला लागला. खुर्चीचे दोन्ही हात घट्ट धरून बसला. ओरॅली त्याला खेड्यातील प्रॅक्टिसविषयी सांगत होता.पण लॅव्हर्टी खुर्चीतून घसरता घसरता सावरत बसण्यातच गुंतला होता. ही काय खुर्ची आहे की घसरगुंडी? असे मनात म्हणत होता. आता इथे कसले रहायचे?, नको; विचार करू असे त्याचे चालले होते. आणि एकिकडे जमिनीला पाय घट्ट दाबून खुर्चीत पुन्हा वर सरकत होता.त्याचे हात आणि पाय दुखायला लागले ही घसरगुंडीची कसरत करता करता. डॉ.ओरॅलीला हे सर्व दिसत होते. तो बॅरीला म्हणाला,” हात पाय भरून आले ना?” “होय हो. ही खुर्ची अशी कशी? मी सारखा घसरतोय.पुन्हा मागे वर सरकतोय. पाय घट्ट रोवून रोवून दुखायला लागलेत.”बॅरी म्हणाला. “काय झालय काय खुर्चीला?’” त्याने पुन्हा विचारले. “काही नाही. मी स्वत: ती चांगली नीट दुरुस्त केलीय.” डॉ. ओरॅली म्हणाला. पुन्हा त्यांची बोलणी सुरू झाली. पण डॉ. बॅरी लॅव्हर्टीची त्या घसरगुंडीच्या खुर्चीवरची कसरत काही थांबत नव्हती.”अहो. काय दुरुस्ती केलीय तुन्ही डॉक्टर? तो आता जरा चिडूनच म्हणाला.”खुर्चीचे पुढचे दोन्ही पाय मी एकेक इंच कापून टाकले!” डॉ. ओरॅली हसत हसत म्हणाले. काय़?!!” डॉ.बॅरी जवळ जवळ किंचाळतच म्हणाला.
“हो. नीट बसता येत नाही ना?” डॉ.ओरॅली मख्ख्पणे म्हणाला.”नाही हो, हे काय ….” तो घसरता घसरता म्हणाला.”तुला जसे इथे खेड्यात रहावेसे वाटत नाही तसेच ह्या खुर्चीत बसल्यावर पेशंटला इथे दवाखान्यात फार वेळ थांबावे वाटत नाही” डॉ. ओरॅली शांतपणे म्हणाला. अशा घसरगुंडीच्या खुर्चीवर पशंटला बसवून त्याच्या आजाराची माहिती डॉ.ओरॅली कशी काय घेत असतील असा प्रश्न डॉ. बॅरीला पडला.त्यापेक्षा कारखान्यातल्या सरकत्या पट्ट्यावर पेशंटना का बसवत नाही? धन्य धन्य आहेत हे डॉक्टर ओरॅली! असे तो मनात म्हणत होता. त्याच्या मनातील विचार ओळखून की काय डॉ. ओरॅली म्हणाले,”इथे खेडेगावत काही काही पेशंट असे असतात की त्यांना नुसते “हं, काय होतेय?” असे विचारण्याचा अवकाश की ते जे काही रटाळ चऱ्हाट लावतात ते संध्याकाळ झाली तरी थांबत नाही. जसे काही चावडीवर गप्पा मारत बसले आहेत!”डॉक्टर ओरॅली थोड्याशा वैतागाने, किंचित गमतीने सांगत होते. “इकडे इतके पेशंट खोळंबलेले असतात. काम इतके आणि इतक्या तऱ्हेचे असते की मला एकट्याला आटोपणे शक्य होत नाही. म्हणून ही खुर्चीची मी घसरगुंडी केली. दोन तीन वेळा घसरला की पेशंट आपोआप आपले चऱ्हाट वळणे थांबवतो. मी लगेच, चला, पुढचा कोण? असे ओरडतो.” हे सांगताना डॉ. ओरॅलींचे डोळे मजेशीर चमकत होते!

*****************************

डॉ.ओरैलीने इंजेक्शनच्या सहा पिचकाऱ्या काढल्या. त्या गुलाबी औषधाने भरल्या. “हे काय डॉक्टर?” डॉ.बॅरी लॅव्हर्टीने विचारले.ओरैली हसत हसत,”व्हिटमिन बी१२!” म्हणाला.”बी१२? पण ते काही….”डॉ. बॅरी पुढे काही म्हणायच्या आत,”हो,हो बाबा, मला माहित आहे ते काही टॉनिक नाही. मला माहित आहे आणि तुलाही माहित आहे ते टॉनिक नाही, पण, तो आणखीनच हसत म्ह्हणाला,” पण त्यांना त्या पेशंटना माहित नाही ते टॉनिक नाही म्हणून… जा त्या सगळ्यांना बोलाव!”ओरैलीने डॉ. बॅरी लॅव्हर्टीला सांगितले.
ते सहा पेशंट आले. टेबलाच्या कडेला पण भिंतीकडे तोंड करून वाकून उभे राहिले. एका रांगेत.डॉ. ओरेलीने सढळ हाताने प्रत्येक पेशंटच्या कंबरेखाली थबथबा स्पिरिट फासले. नंतर एकामागून एक असे प्रत्येकाच्या त्या जागेवर खस्सकन सुया खुपसल्या. त्या सहात दोन बायकाही होत्या! पण त्याने सुया सरळ सगळ्यांच्या कपड्यातूनच खुपसल्या होत्या! आणि म्हणूनच स्पिरिटचे बोळे थबथबा फासले होते.डॉ. बॅरी इंजेक्शन देण्याची ही अजब पद्धत पाहून चकित झाला.

“हां, झाले. आता तुम्ही लाह्या फुटल्यासारखे टणा टणा उड्या मारायला लागाल.एकदम झक्क झाले. चला.” डॉ. ओरेली पेशंटना म्हणाला. पेशंट ओरेलीकडे कृतज्ञतेने पहात गेले.”त्यांना कसलाही त्रास होणार नाही आणि बहुतेकांना बरे वाटेल. मला महित आहे ह्याचा औषधी उपयोग काही नाही. पण पेशंटला बरे वाटावे म्हणून अशी समजूत काढावी लागते.” डॉ.ओरेली बॅरीला सांगू लागला.”आपण पेशटला बरे वाटावे म्हणूनच आहोत आणि त्यासाठी असे करावे लागते अधून मधून.”डॉ ओरेली सांगत होता आणि डॉ. बॅरी अजूनही जरा साशंकतेनेच ह्या प्रकाराकडे पहात होता! पण हळू हळू त्याला हे पटणार होते.

*****************************

” डॉ.फिंगल आहेत का?” डॉ.बॅरी लॅव्हर्टीने दार उघडल्यावर एका साठीच्या घरात असलेल्या, तोंडाचे बोळके झालेल्या म्हाताऱ्या बाईने डॉ. बॅरीला विचारले. तो काही म्हणाणार तोच ” या ,या, मॅगीआजी असे मोठ्याने म्हणत डॉ. ओरेली स्वत:च पुढे आला.” हे माझे तरूण मदतनीस, डॉ. बॅरी लॅव्हर्टी.आज तेच तुला तपासतील.”
मॅगी आजी बसल्या. बॅरीने तपासणी करायला सुरवात केली. “काय होतय तुम्हाला?”
डॉ. ओरेलीकडे बघत ती म्हणाली”डोकं दुखतय.””अस्सं. केव्हापासून दुखतय?” डॉ.बॅरी. “अरे देवा! काय सांगू! अहो ते किती दिवसांपासून म्हणून काय सांगू? कधी कधी फार ठणकते. पण काल कमालच झाली. रात्रभर डोकं ठणकत होतं! अजूनही तसं दुखतयच.”हे सांगत असतानाही मॅगीबाई मध्येच डॉ. ओरेलीकडे पहात होत्याच.
” असं.आणि आता मला सांगा हे डोकं ठणकतं ते नेमके कुठे?” डॉ.लॅव्हर्टीने कॉलेजात शिकवले होते त्याप्रमाणे शास्त्रशुद्धपणे पेशंटची तपासणी चालू ठेवली. मॅगी आजी थोडे पुढे वाकल्या आणि गुपित सांगावे तसे हळू आवाजात,आपला हात डोक्यावरच्या फुलाफुलांच्या उंच हॅटच्या वर नेत,”इथे”म्हणाल्या! डो. बॅरी लॅव्हर्टी खुर्चीतून उडायचाच बाकी राहिला होता!”तुमच्या डोक्याच्या वर डोके दुखते?” बॅरी थक्क हॊऊन म्हणाला. “हो, डोक्याच्या वर दोन अडीच इंच वरती.”मॅगी मॅकॉर्कल आजी ठामपणे म्हणाल्या. आता डॉ.बॅरी लॅव्हर्टीची डॉ.ओरेलीकडे पहाण्याची पाळी होती!
“बरं. आणि अलिकडे डोकं दुखु लागले की आवाजही ऐकू येतात?”बॅरीने विचारले. “काय? आवाज?”असे जरा घुश्यातच बाईने उलट प्रश्न केला. डॉ.ओरेलीच समजुतीच्या स्वरात तिला म्हणाले,” डॉक्टर विचारताहेत की तुमच्या कानात काही आवाज होतात असे वाटते का?” “कसे?डिंग डॉन्ग की ट्ट्र्र्र्र्र्र्र्र?” घसरगुंडीच्या खुर्चीत स्वत:ला सावरत मॅगीआजीनी विचारले?” “तुम्हीच सांगा.”ओरेली म्हणाला. “डिंग डॉन्ग! डॉक्टर.” मॅगीबाई. ओरेलीचा चष्मा खाली घसरला होता.तो सावरत हसत असतानाच आजीबाईंचे आपले”डिंग डॉंग..डिंगी डिंगी डॉन्ग… डिंगी..”चाललेच होते. “आजी, बरं”ओरेली अगदी गंभीरपणाचा आव आणून म्हणाला,”डिंग डॉन्ग आणि दोन इंचांच्या वर. दुखतं कुठे डोक्याच्या मध्यभागी का एका बाजूला?” “मध्यभागी नाही.एका बाजूला,ह्या बाजूला. फार वाईट असते का असे ?”मॅगी बाईंनी विचारले. “नाही.तसे काही नाही.” तिच्या खांद्यावर थोपटत ओरेली म्हणाला. आपण एका झटक्यात बरं करू.” आजीबाईंना बरं वाटलं हे ऐकून.ती डॉ.ओरेलीकडे बघून हसली.आणि लगेच तरूण डॉ.बॅरी लॅव्हर्टीकडे अपल्या थंड नजरेने रोखून पाहू लगली. डॉ.ओरेलीने तेव्हढ्यात औषधाच्या कपाटातून एक बाटली काढली.”ह्या गोळ्या खरं काम करतील”डॉ. ओरेली बाईना म्हणाला. “ह्या गोळ्या अगदी निराळ्या, खास स्पेशल आहेत,बरं का,मॅगी. डॉ.ओरेली त्या बाईना दरवाज्याकडे नेत म्हणाला.” बाईनी मान हलवली.” मी सांगतो त्या प्रमाणेच ह्या गोळ्या घ्यायच्या. नीट लक्ष देऊन ऐका.” ओरेली. “हो, अगदी तुम्ही सांगाल त्याप्रमाणेच मी घॆईन. पण कशा घ्यायच्या? मॅगी आजी आता खुषीत होत्या. ओरेलीने त्या आजींसाठी दरवाजा उघडला. “अर्धा तास” इतके म्हणून डॉ.ओरेली थांबला आणि गंभीरपणे तिच्याकडे पहात पुढे सांगू लागला, “बरोब्बर अर्धा तास ,डोकं दुखायच्या आधी बरोबर अर्धा तास आधी.” ” हो का, डॉक्टर? बरं नक्की घॆईन” असे मॅगी आजी डॉ.ओरेलीकडे आनंदाने पहात म्हणाल्या.पण लगेच डॉ.बॅरी लॅव्हर्टीकडे पहात पण डॉ.ओरेलीला म्हणाल्या,”ह्या नवशिक्या तरूण लॅव्हर्टीला अजून बरच काही शिकायचं आहे…”

बिचारा लॅव्हर्टी!

*****************************

डॉ.ओरेली आज तसे घाईतच होते.आज टीव्हीवर त्यांच्या आवडत्या टीमची रग्बीचे मॅच होती. मग ते कशी चुकवणार ती मॅच? त्यामुळे सकाळपासूनच ते प्रत्येक गोष्ट भराभर आटपत होते. कुणाकडेही व्हिजिटला गेल्यावर वेळ घालवत नव्हते.नेहमीच ते मोटार भन्नाट चालवत. त्यात आज ती मॅच चुकवायची नाही ह्याचा ध्यास. घरी परत जाताना गाडी जोरात निघाली. पण रहदारीचे दिवे आले की चौकात नाइलाजाने थांबावे लागायचेच.ओरेलीची अस्व्स्थता आणि चुळबुळ,वाढत जायची.पुढच्या वाहनाच्या ड्रायव्हरवर रागावून स्वत:शीच बोलणे आणि चरफडण्यापलिकडे तो काही करू शकत नव्हता.

एका चौकात रह्दारीचा तांबडा दिवा लागला. डॉ. ओरेलीने गाडी थांबवली. त्याच्या पुढे दोन तीन गाड्या होत्या. अगदी समोर एक ट्रॅक्टर होता. ओरेली अस्वस्थ झाला होता आता. तेव्हढ्यात हिरवा दिवा लागला. पुढच्या दोन मोटारी निघून गेल्या.ट्रॅक्टरचे इंजीनही फटर फटर आवाज करू लागले. पण काय! नुसते फटर, फटर फटर्र्र झाले आणि फट्ट करत ट्रक्टर बंद झाला.त्या ट्रॅक्टरवाल्याने मागे वळून पाहिले तेव्ह्ढ्यात पुन्हा दिवा तांबडा झाला. ओरेली स्वत:शीच चरफडत ओरडत बसला. डॉ. बॅरी हे सगळे पहात होता. त्याने समोरच्या ट्रॅक्टरवाल्यालाही ओळखले. डॉ. ओरेलीचा पेशंटच होता तो. त्या ट्रॅक्टरवाल्याने आरशातून मागे पाहिले आणि डॉ. ओरेलीच मागे आहेत हे पाहिल्यावर तो जरा भेदरला!. दिवा हिरवा झाला. ट्रॅक्टची फटर फटर फटर्र्र्र्र्र्र… सुरू झाली पण तेव्हढेच. पुन्हा फट्ट्ट …. आणि ट्रॅक्टर थंड पडला.पुन्हा त्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरने मागे वळून ओरेलीकडे पाहिले. ओरेलीच्या गाडीमागे आता पाच सहा मोटारींची रांग लागली. पुन्हा हिरवा दिवा तांबडा झाला. सगळे चिडून हताश हॊऊन बसले. खेडेगावातील तो मुख्य रस्ता. मुख्य असला तरी किती रूंद असणार? त्या ट्रॅक्टरला वळसा घाळून जाता ही येणे शक्य नव्हते!. इतक्यात दिवा हिरवा झाला. सगळ्या मोटारींनी आपापली इंजिने चालू केली. ट्रॅक्टरही चालू झाला…फटर…फटर..फट्ट्टर.. ओरेलीने गाडी किंचित पुढे नेण्याचा प्रयत्न केला तेव्ह्ढ्यात फट्ट्ट करत तो ट्रॅक्टर बंद पडला. आणि हिरवा दिवा तांबडा झाला. आणि डॉ. ओरेलीचा चेहरा त्या दिव्यापेक्षाही लालबुंद झाला.डॉ. ओरेली गाडीतून उतरला आणि इतर मोटार गाड्या चालू असूनही त्यांच्या इंजिनांच्या आवाजावर चढला होता.इतक्यात दिवा हिरवा झाला. आणि डॉ. ओरेली त्या दिव्याकडे बोट दाखवून ट्रॅक्टरवाल्या म्हणाला, “अरे स्वत:ला माणूस म्हणवून घेणाऱ्या क्षुद्र प्राण्या, डोनाल्ड डोनेली! अरे,बोल, बोल! हिरव्या रंगाच्या अशा, कोणत्या खास छटेची तू वाट पहात थांबला आहेस रे मघापासून इतका वेळ? आं,होय रे?……”