Author Archives: Sadashiv Kamatkar

आमचा ‘ पासिंग शो ‘

बेलमाँट

बहुसंख्य लहान मुलांना मुलींना काही तरी गोळा करण्याचा , जमवण्याचा , जमवून ते जपून ठेवण्याची हौस छंद आवड -काही नाव द्या- असते . मला आणि माझ्या बरोबरीच्या काही सवंगड्यांना सुरुवातीला काचेच्या,सिमेन्ट सारख्या टणक, लहान मोठ्या गोट्या जमवण्याची आवड होती. गोट्या खेळत असल्यामुळे ती जोपासणेही सहज होत असे. मोठ्या गोटीला, गोटी कसे म्हणायचे, गोटूलाच म्हणावे लागेल, अशा गोट्या ढंपर म्हणून ओळखल्या जायच्या. काचेच्या गोट्यांतही विविध रंगासोबतच त्यांच्या पोटात नक्षीही असे. पोटात, अंतरात नक्षी खेळत असलेल्या पारदर्शी गोट्यांना तितक्याच सुंदर नावाने म्हणजे ‘बुलबुल’ म्हणून त्याओळखले जायचे .

गोट्यांनंतर काड्याच्या पेटीचे छाप जमवणे सुरू केले. काड्याच्या पेट्या घरोघरी असायच्या. किराणा दुकानदार. पानपट्टीवाले संख्येने किती तरी असत. त्या प्रत्येक दुकानात वेगवेगळ्या छापांच्या काड्यापेट्यांची बंडले असत.

छाप जमवण्यास सुरुवात झाल्यावर दोस्तांशी गप्पा मारत जात असलो तरी प्रत्येकाचे लक्ष चारी बाजूना बारकाईने असे. काही जण गप्पांत रमले की, मला नाही तर त्याला रिकामी काड्यापेटी किंवा चिरडली गेलेली काड्यापेटी दिसली की कशाचेही भान न राहता त्या काड्यापेटींवर झडप घालायला झेपावत असू. एकदम दोन्ही मिळणे फार कठिण. एक जरी मिळाली तरी लढाई जिंकल्याचा आनंद असायचा. मग तुला कोणता छाप मिळाला ह्याची चर्चा. “हाऽत्तीच्या! घोडा छापच की” म्हणत तो किंवा मी ती काड्याची पेटी पुन्हा फेकून देत असू. कारण हा घोडा छाप सर्रास सापडत असे. पत्त्याच्या पानाचा छाप, किंवा नुसता एकच किलवर आणि इस्पिक छाप मिळाले की काही तरी मिळाले असे वाटे. अदला बदलीत किंचित वरचढ ठरणारे हे छाप असत. तांबड्या रंगाचा आडवा चौकटच्या एक्क्याचा छाप असलेली काडीपेटी सापडली की तो दिवस सोन्याच व्हायचा आम्हा दोस्त मंडळीचा.

एकेकटे फिरताना, भाजी आणायला संध्याकाळी फाटकावर जाताना, रविवारी गावातल्या मुख्य भाजीबाजारात जातांना किंवा, आई किंवा काकूंबरोबर देवळात जाताना, ह्या छापांची आणि तशीच अगदी वेगळ्या नेहमीच न मिळणाऱ्या छापांची कमाई होत असे!

कधी कधी आमची ही हौस- छंद-आवड अगदी व्यसनाची पातळी गाठायची. कुणी दोघे- तिघे अगर एकटा माणूस सिग्रेट विडी ओढताना दिसले किंवा आता ‘तो/ ते विडी सिग्रेट शिलगावणार ‘ असा अंदाज आला की आशाळभूतपणे तो किंवा त्यांच्यातले एक दोघे तरी रिकामी काडीपेटी केव्हा फेकतील ह्याची वाट पाहात उभे असू. सहज दोस्त उभे आहेत किंवा कोणी एकटा असला तर, कुणाची वाट पाहातोय अशी ॲक्शन करत उभे राहायचो. नशिब जोरावर असेल तर दोन काड्याच्या पेट्या खाली पडलेल्या दिसायच्या. दिसल्या की त्याच सहजतेने ती काड्याची पेटी उचलून पुढे सटकायचे. घोडा छाप निघाली की चिडून ती पायाखाली चिरडून पुढे जायचो; कुणी विडी सिग्रेट ओढतेय का ते पाहात ! हा तपश्चर्येचाच काळ होता आमच्यासारख्या ‘ एका ध्येयाने पछाडलेल्या ‘ ‘ एकच श्वास एकच ध्यास ‘ घेतलेल्या पोरांचा. काड्यापेटींचे वेग वेगळे भारी वाटणारे छाप जमा करणाऱी छंदोमय झालेली मुले आम्हीच ! आमच्यासारखी आणखीही पुष्कळ असतील.

प्रत्येकाकडे दुर्मिळ, सहज न मिळणारे काड्या पेटींचे एक दोन छाप तरी नक्कीच असत. त्यांची अदला बदल देवाण घेवाण सहसा होत नसे. प्रत्येकासाठी ते छाप Trophy च असत. माझ्याकडे आणि धाकट्या भावाकडेही अशी मौल्यवान रत्ने होती. एका काड्यापेटीच्या वर संत तुकारामांचा छाप होता . त्याची छपाई व चित्रही सुंदर! दुसरा एक छाप टारझनचा होता. त्यालाही तोड नव्हती. सुरवातीला दुर्मिळ असणारा पण नंतर काही महिन्यांत तो तितकासा वैशिष्ठ्यपूर्ण न राहिलेला म्हणजे जंगलातून झेप घेतलेला वाघ व झाडावर बंदूक रोखून बसलेला शिकारी. पिवळसर व हिरव्या रंगाचे मिश्रण त्या छापात होते. काडीपेटी ती अशी कितीशी मोठी ? त्यावर हे चित्र छापणे सुद्धा फार अवघड आहे असे त्या वयातही वाटायचे. दुसरा एक छाप होता, समई छाप. किंचित गडद तपकिरी रंगाच्या पार्श्वभूमीवर पितळेची चकचकीत समई, चारपाच तेवणाऱ्या ज्योती आणि त्यांच्या भोवती पिवळ्या प्रकाशाते वलय. आमच्या भाषेत- येकदम मस्त! असेच उदगार संत तुकाराम महाराजांचा छाप पाहिल्य्वर सगळ्या पोरांच्या तोंडून बाहेर पडत. फक्त” येकदम मस्त हाय ब्ये!” ही भर पडायची.

गोट्यांच्या मागोमाग काड्यांच्या पेटीचे छाप जमवण्याचा नाद लागला व तोही संपला. काड्यापेटीची सखीसोबती सिग्रेटच्या पाकिटांच्या मागे लागलो. त्यावेळी बिडी सिग्रेट पिणे म्हणत जरी त्यात ओढण्याची क्रिया असली तरी पिणे हेच क्रियापद प्रचलित होते.

ह्या दोन्ही नादासाठी रस्ते धुंडाळणे हे समान कर्तव्य होते. ते इमान इतबारे पार पाडत असू. त्यासाठी शाळेच्या सुट्टीची वाट पाहण्याची गरज नव्हती. काड्यापेटीचे छाप असोत की सिग्रेटची पाकिटे, शाळा सुद्धा आमच्या संशोधनाचे केंन्द्र होते. मोरे मास्तर, पवार मास्तर, हे ह्या दोन्हींसाठी भरवशाचे .

काड्याच्या पेटीत जशी घोडाछाप सार्वत्रिक होती तशी सिग्रेटीत दोन ब्रॅन्ड लोकप्रिय होते. चहात जसा कडक चाय पिणारे तसे सिग्रेटमध्ये लई कडक चार मिनार होती ! त्यानंतर सर्वाना सहज सहन होणारी म्हणजे पीला हत्ती किंवा पिवळा हत्ती. ही पाकिटे जमवायला कौशल्याची हुन्नरीची आवश्यकता नव्हती. कुठेही गेलो आणि पाहिले तरी सहज ह्या दोन्ही छापांची पाकिटे मुबलक मिळायची. त्यानंतर बर्कले व त्याही नंतर कॅपस्टन हे दोन प्रतिष्ठित छाप होते. सर्वात वरिष्ठ म्हणजे गोल्ड फ्लेक्स सिगरेट. तिला सिग्रेट- शिग्रेट म्हणण्याचे धाडस कुणी करत नसे. ती लोकसंबोधने जनतेच्या जिव्हाळ्याचे जे दोन ब्रॅन्ड चार मिनार आणि पिवळ्या हत्तींसाठी राखीव होती ! कारण ते सर्वसामान्य कामगारांना, कारकुनांना आणि हेडक्लार्कना परवडणारे होते.

छाप कोणताही असो सर्व सिग्रेटींची पाकीटे दहाची असत. नंतर काही काळांनी काही ब्रॅन्डनीं वीसचीही पाकिटे आणली ती दोन्हीही गुण्या गोविंदाने पानपट्टीच्या टपऱ्यांत एकमेकाशेजारी बसत. तसेच बर्कले, कॅपस्टन, आणि गोल्ड फ्लेक्स ह्यांचे पन्नास सिगरेटींचे टिन असत. इस्त्रीच्या कपड्यातील, गॅागल लावलेले तरूण कधीतरी रुबाबात हातात हा टिन तिरपा धरून जाताना जिसत. पण अशी शान मोजके मोटरवाले होते त्यांना जास्त शोभून दिसे. गोल्ड फ्लेकस शिवाय ते दुसऱ्या सिगरेटीचा झुरकाही घेत नसावेत. पण चार मिनारवाले ह्या सर्वांना तुच्छ समजत. बायकी शिग्रेटी पिणारे म्हणत त्यांना.

ही पाकिटे जमा करायचोच पण कधी सटीसहीमाहीला कॅमल किंवा अबदुल्ला नावाचे एखादे पाकीट मिळे ! ही वार्ता सिग्रेटची पाकिटे जमवणाऱ्या आमच्या सारख्या नादिष्ट मुलांच्या गोटांत वाऱ्यासारखी पसरे! दुध पिणाऱ्या गणतीचे दर्शन घ्यायला पुढे येणाऱ्या नंतरच्या काळात धावपळ झली नसेल तितकी पळापळी केली असेल पोरांनी! हे कधी न ऐकलेले ना पाहिलेली छापाची पाकिटे कशी दिसतात इतके पाहायला मिळाले तरी धन्य वाटायचे.

पण दुर्मिळ असल्यामुळे व कसलीही माहिती नसल्यामुळे लहानशा ओढ्याला अचानक आलेल्या पुराचा लोंढा जसा लगेच ओसरतो तशी आमची उत्सुकताही ओसरायची ! ओळखीची माणसेच बरी हाच सनातन नियम पटायचा.

हे चार मिनार, पिवळा हत्ती, कॅपस्टन वगैरे जमा करण्याच्या मोसमातच एक वेगळा ब्रॅन्ड त्याच्या अत्यंत अनोळखी नावा मुळे, पाकिटाच्या रंगसंगतीमुळे व त्यावर असणाऱ्या स्टायलिश माणसाचा फोटो आणि त्याच्या तितक्याच स्टायलिश हॅट मुळे त्या पाकिटाची किंमत ( मूल्य वगैरे शब्द कुणाला माहित?! आणि म्हणता येणार होते!) आमच्या अदलाबदलीच्या मार्केटमध्ये वधारली! ज्यांच्याकडे ही पाकिटे होती ते मोटारीतून गोल्डफ्लेकसचा टिन घेऊन उतरणाऱ्या रुबाबदार श्रीमंताप्रमाणे आव आणीत आमच्यात वावरत !

पण ह्या सिग्रेटचे नावही सुंदर आहे . ‘ पासिंग शो ‘ वा! सिगरेटचे झुरके घेण्याला इतके काव्यमयच नव्हेतर वास्तवही म्हणता येईल नाव आहे. ‘ घटकाभरचा खेळ, घटकाभर करमणुक, क्षणभराचा विरंगुळा!’ ‘फार नाही, दोन घटका मजेत घालवा’ ‘दोन घटका लगेच सरतील,’ त्यावेळी हे अर्थ माहित नव्हते. नाव सोपे आणि निराळे होते. हे समजत होते. ते नाव लक्षात राहण्याचे त्यातील सहजता हेही कारण असेल.

काड्यापेट्यांचे छाप, सिगरेटची पाकिटे जमवणे हा खेळही होता आणि नाद होता. छंद आवड हौस हे शब्दही आम्हाला कधी आमच्या वाटेवर भेटले नाहीत. त्यामुळे नाद होता म्हणणेच योग्य. बरं ह्या वस्तु अखेर शब्दशः टाकाऊच. बरीच माणसे, मुलं छाप पाकिटे गोळा जमवतात हे पाहून ते कौतुकाने आपणहून रिकामी काडेपेटी किंवा रिकामे सिगरेटचे पाकीट देत. काहीजण तर एकच शिल्लक असली तर ती खिशात ठेवून सिगरेटचे पाकिट देत.

गोट्या जमवणे थांबले, मग काड्यापेटींचे छाप जमवण्यामागे लागलो. तेही बंद कधी झाले त्याचा पत्ता नाही आणि सिगरेटची पाकिटे जमवता जमवता तोही नाद कसा आणि कुठे संपला तेही समजले नाही.

हा खेळ अखेर ‘पासिंग शो’ च होता!

‘बॅट बाॅल’ आणि…

आम्ही मुले स्वतंत्रपणे आणि काही वेळा आमच्या काकांच्या आणि वडिलांबरोबरही बॅडमिन्टन, रिंगटेनिस खेळत असू. बॅडमिन्टनसाठी लागणाऱ्या रॅकेटस मोजक्या होत्या. त्यामुळे आळीपाळीने खेळणे ओघानेच आले. बॅडमिंन्टनचा उत्साह संपला की त्याच मोठ्या अंगणात बॅट- बाॅल खेळत असू.

सुरवातीला सिद्धेश्वरच्या जत्रेत मिळणाऱ्या बॅटी होत्या. खऱ्या बॅटीशी किंचित सारखेपणा असायचा. तोही फक्त आकारात. ती बॅट म्हणजे बॅटीच्या आकाराची केवळ फळी होती. पण त्याकडे आमचे लक्ष नसे. रबरी चेंडू आणि ती बॅट म्हणजे आमचा बॅट बाॅल; म्हणजेच क्रिकेट खेळणे असे. रबरी बॅाल (टेनिसचा नव्हे) हरवायचा किंवा बॅटीचा मार खाऊन फुटायचा. जशी बॅट तसाच बाॅल. समान दर्जाचे. रबरी बाॅल फुटला की श्रावणी सोमवारी सिद्धेश्वरच्या जत्रेतून लाकडी बाॅल आणायचो. टिकाऊ आणि टाळक्यात, कपाळाला लागला की किती कडक आणि दणकट तेही समजायचे. त्यामुळे तो बाॅल अडवण्याचा, कॅच पकडण्याचा आमच्यापैकी कुणीही प्रयत्न करीत नसे. असल्या हिरोगिरीच्या वाटेला जात नसू.

खऱ्या बॅटी बॅाल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे कुकरेजाचे दुकान ! हे दुकान म्हणजे क्रिकेटच्या बॅटी बॅाल आणि फुटबॅाल हॅाकी आणि इतरही सर्व खेळांच्या साहित्याचे दुकान, -भांडारच! त्यावेळी संपूर्ण शहरात असे एकच दुकान होते. गावातल्या सगळ्या शाळा कॅालेजांची, खेळाच्या सामानाची खरेदी इथूनच होत असे. कुकरेजा कं.चे आणखी एक खास वैशिष्ठ्य म्हणजे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेची मानाची ढाल कुकरेजांनी ठेवली होती. कुकरेजा शिल्ड जिंकण्यासाठी सर्व हायस्कुलांत दरवर्षी अटीतटीची लढाई असायची. विशेषतः आमची शाळा, न्यु हायस्कूल आणि ॲन्ग्लो उर्दु ह्यांच्यात.

आम्हाला कुकरेजा आणि कं.चे दुकान आणखी एका कारणाने माहितीचे होते. बॅडमिन्टनच्या रॅकेटस दुरुस्त करायला तिथे जात असू. दुकानात एक अत्यंत कुशल आणि कसबी कारागीर होता. हा कारागिर अगदीशिडशिडा. आणि मालक कुकरेजा ( हे गृहस्थ, मालक कुकरेजाच होते का कोणी व्यवथापक होते हे माहित नाही. पण आम्हाला ते मालकच वाटत.) जाडे होते. ह्या दोघांना पाहिले की लॅारेल हार्डीची आठवण यायची. त्यांचा वेष ठरलेला असे. जाड कापडाचा ढगळ पायजमा आणि त्यावर कधी अर्ध्या बाह्यांचा रंगीत, कधी पांढरा शर्ट. केस पांढरट. भांग साधा पाडलेला . पण व्यवसथित विसकटलेले. त्यांचा कारागीर उंच आणि शिडशिडीत. पंजाबी लुंगी, वर पैरणीसारखा अर्ध्या बाह्यांचा चोकटीचा सदरा किंवा बनियन. डोक्यावर फेटा नसे पण मध्यभागी केसांचा बुचडा बांधलेला असे. सदा कामात गढलेला. बॅडमिन्टनच्या रॅकेटस ची जाळी घट्ट विणत बसलेला दिसे तर कधी क्रिकेटच्या बॅटला तळाशी चांभारी दोऱ्यासारखी ट्वाईन काटेकोरपणे गुंडाळत असे. त्यासाठी तो बॅट, मागे- पुढे- -बाजुला सरकवता येईल असा, जमीनीवर ठेवलेल्या साचात ठेवायचा. ट्वाईन बॅटला ज्या ठिकाणी गुंडाळायची तिथे ब्रशने सरस लावायचा. मग ट्वाईनचे एक टोक तिथे घट्ट चिकटवून ठेवायचा. त्यानंतर साचा हळू हळू फिरवायला लागे. आणि ट्वाईन इकडे तिकडे न भरकटू देता बरोबर एकाखाली एक अगदी सरळ रेषेत जवळ आणत आपोआाप तो गुंडाळत असे. ही पट्टी झाली की तीन चार बोटांचे अंतर ठेवून त्यावर सरसाचा ब्रश फिरवून झाला की दुसऱ्या पट्टीसाठी ट्वाईन गुंडाळणे सुरू. अशा तऱ्हेने तो ट्वाईनच्या दोन पण बहुतेक बॅटीना तीन पट्ट्या लावायचा.

आम्ही आमचे काका आबासाहेबांच्याबरोबर बॅडमिन्टनच्या रॅकेटस दुरुस्तीसाठी कुकरेजाकडे घेऊन जायचो. रॅकेटची जाळी सैल झाली असेल तर दोन तीन दिवसांनी या म्हणायचा. कधी मधली एखाद दुसरी तार तुटली असेल तर तो अर्ध्या तासात सुंदर विणून द्यायचा. जाळी पुन्हा पहिल्या सारखी दिसायची. एखाद्या तारेची वेलांटी फ्रेम मधून सैल झालेली दिसल्यावर तो काय करायचा माहित नाही. पण खालच्या बाजूने, वरच्या बाजूने दोन तारा तो अशा काही खाली वर ताणत असे. आणि तळहातावर ती रॅकेट मारत असे त्यावेळी “तंन्नन” असा झंकारणारा आवाज ऐकायला मजा येई. जाळी आता पक्की झाली ह्याची खात्री होई.

असेच एकदा आम्हाला आमचे वडील अचानक कुकरेजा मध्ये क्रिकेटची बॅट घ्यायला घेऊन गेले. तेव्हाचा आनंद काय वर्णावा. आपली पहिलीच टेस्ट मॅच खेळायला जाणाऱ्या बॅटसमनला किंवा बॅालरला काय वाटत असेल ह्याची काही कल्पना नव्हती. पण शाळेच्या टीम मधून न्यू हायस्कूल किंवा ॲंग्लो उर्दु विरुद्ध पार्कच्या मैदानावर खेळायला जाताना बॅट्समन किंवा गोलंदाजाला काय वाटत असेल तोच आनंद, तीच धाकधुक, तसाच उत्साह आम्हालाही आला होता.

खरी क्रिकेटची बॅट! आणि तो चमकणारा, पॅालिशने चकाकणाऱ्या लाल रंगाचा लेदर बॅाल! तो बॅाल हातात घ्यायला मिळाला, नव्हे ह्या बॅटने व बॅालने आता बॅटबॅाल न खेळता ‘ क्रिकेट ‘ खेळणार हाच विचार वारंवार आम्हा तिघाही भावांच्या मनात येत होता. आमच्यासाखे भाग्यवान आम्हीच!

दुकानात आम्ही तीन चार बॅटी स्टाईलमध्ये धरून बॅटिंग करण्याच्या पवित्र्यात उभे राहून पाहिल्या. तिघांनाही बॅट व्यवस्थित धरता येईल अशी एकमेव बॅट मिळणे शक्य नव्हते. त्यातून कुकरेजानीच मार्ग काढला. आमच्याकडे पाहात त्यांनी एक दोन प्रसिद्ध ‘नॅान्जर’च्या बॅटी ( बॅटीना खेळाडूच्या शरीरयष्टी म्हणण्यपेक्षा उंची ध्यानात घेऊन नंबर दिलेला असे. ५,६ ७ वगैरे.) पाहून त्यातली त्यांनी योग्य त्या नंबरची बॅट दिली. oiling करून झाल्यावर बॅट घेऊन जा असे त्यांनी सांगितले. स्टम्पस? कमीत कमी तीन तरी लागायचे पण बजेटमध्ये स्टम्प बसत नव्हते त्यामुळे बॅालिंग न करता उडवले आम्ही ते !

भरपूर खेळलो आम्ही त्या बॅटने. गल्लीतल्या मॅचेस मध्ये नवीन होती तोपर्यंत आमची बॅट हिरॅाईन होती. एकदा बॅटीचे हॅन्डलच सैल झाले. कुकरेजा कडे गेलो. बिनफेट्याचा तो कसबी शीख कारागीर यायचा होता. कुकरेजाशेठनी बॅट पाहिली. थोडा वेळ थांबा म्हणाले. थोड्या वेळाने तो शीख कारागीर येताना पाहिला. बिचारा एका पायाने लंगडा होता ते आम्हाला समजले. एका पायाच्या चौड्यांने चालायचा. त्या पायाची टाच टेकतच नव्हती. उंच होता मुळात त्यात एक पाय नेहमीसारखा टाकायचा पण तो दुसरा पाय चौड्यावर चालण्यामुळे दर पावला गणिक तो एका बाजूने जास्त उंच व्हायचा.

त्याने बॅटीकडे नुसती नजर टाकली. काही न बोलता, सैल झालेल्या हॅन्डलच्या पाचरात जिथे अंतर होते तिथे सरस भरला आणि त्या साच्यात बॅट ठेवली. व हॅन्डलचे पाचर जिथे खुपसले होते त्या बॅटीच्या दोन्ही भागांना त्याने रबरी हातोड्याने योग्य तेव्हढ्याच शक्तीने हळू हळू ठोकू लागला. “ठीक हो गयी है. पण ट्वाईन लावली तर बरेच दिवस टिकेल.” पैशाचा अंदाज घेतला. परवडेल वाटल्यावरून हो म्हणालो. त्याची ती आखीव रेखीव पण तितकीच दोरा बळकट गुंडाळण्याची कामगिरी ओणवे होऊन पाहात राहीलो. बॅट हातात दिली त्यांनी. पुन्हा बॅटिंग करण्याच्या पवित्र्यात उभे राहून मुद्दाम हॅन्डलवर जोर देत जमिनीवर बॅटीने टक टक करत बॅटिंग करून पाहिली. बॅट नविन झाली ह्या खुषीत आलो घरी !

बॅटीचा दोस्त लाल चेंडूची मात्र रया जाऊ लागली. पण दुसरा लेदर बॅाल घेणे शक्य नव्हते. त्या ऐवजी खेळण्याच्या इतर मोठ्या दुकानात सीझन बॅाल नावाचा एक बॅाल मिळायचा. तो स्वस्त व बरेच दिवस टिकत असे. पण नडगीवर किंवा हॅन्डल धरलेल्या दोन्ही हातांना लागला की ठो ठो करण्याची वेळ यायची. पण असल्या किरकोळ कारणांनी कुणी क्रिकेट खेळणे थांबवते का?

बॅटीच्या हॅन्डलला रबरी कव्हर बसवताना पाहणे हा सुद्धा एक नेत्रसुभग सोहळा असायचा. कुकरेजाचा हा वाकबगार कलावंत-कारागीर तुम्हाला पाहिजे ते कव्हर ( ‘परवडणे’ हा आमचा परवलीचा शब्द असायचा.) निवडा म्हणायचा. बॅट नवीन घेताना जे कव्हर असे ते फुकट असे. कारण बॅटीसह ते गृहप्रवेश करायचे. त्याची गुणवत्ता तितकीच. नवीन घेणे बरेच दिवस लांबणीवर टाकायचो आम्ही. पण बदलायची वेळ टळून गेली. उघड्या हॅन्डलने खेळून हात खरचटू लागले. टोलाच नाही चेंडू नुसता तटवला तरी हाताला झिणझिण्या यायच्या. आता मात्र तसे नवीन कव्हर बसवणे आणि हॅन्डल पक्के करून घेण्यासाठी गेलो.

चांगले रबरी काटेरी ठिपकेदार कव्हर ज्यामुळे पकड छान यायची खेळताना तसे घ्यावे असे पहिल्यांदा वाटायचे पण किंमत ऐकल्यावर मग “हे केव्हढ्याला, ते केव्हढ्याला” करत एक परवडणारे( पुन्हा तो परवलीचा शब्द आलाच) कव्हर नक्की करत असू.

आता इथून त्या शीखाची कामगिरी सुरू. पहिल्यांदा तो ते कव्हर दोन्ही बाजूंनी ओढून ताणून पाहात असे. बॅटीच्या हॅन्डलला पांढरी पावडर लागायची. तीच पावडर रबरी कव्हरमध्येही जायची. कव्हर चांगले चोळले जाई. त्यानंतर तो ते कव्हर आत खुपसताखुपसता मध्ये पावडर हाताला लावायचा, रबरी कव्हर मध्यम लांबीचे करी. उघडे तोंड हॅन्डलच्या डोक्यावर घट्ट दाबून ठेवल्या सारखे करतो ना करतो तोच कव्हरची वर राहिलेली बाजू सरसर करीत खाली आणत जाई! बॅटीचे दोन्ही खांदे बेताने झाकले जातील इतके ते कव्हर खाली न्यायचा. थोडा भाग अजून वर दिसत असे तो भाग खाली सरकवत सरकवत हॅन्डलच्या कपाळपट्टीला खाली वळवत गुंडाळून टाके. वारे पठ्ठे ! एका झटक्यात, हवेत हात फिरवून बंद मुठीतला रुपया प्रेक्षकांना दाखवणाऱा कुकरेजाच्या दुकानातील हा आमचा लंगडा कलाकार जादूगारच होता आमच्यासाठी !

ढगळ मापाचा वाढत्या अंगाचा अभ्रा असला तरी तो उशीला घालण्यासाठी अर्धा तास झटापट करणारे आम्ही. आम्हाला तो कसबी शीख जादूगार वाटला तर आश्चर्य नाही.

पुस्तकांच्या गराड्यांत

बेलमाँट

गेले काही दिवस पुन्हा मी लायब्ररीत जाऊ लागलो आहे. आजपर्यंत पाचसहा लायब्रऱ्यात जाऊन बराच काळ तिथे काढला. सर्व ठिकाणी अनेक चांगल्या पुस्तकांच्या नंदनवनात वाचक म्हणून वावरत होतो.

सध्या बेलमॅान्टच्या लायब्ररीत मात्र मी व्हॅालन्टियर म्हणून जातो. म्हणूनच सुरुवातीला लिहिले की पुन्हा मी लायब्ररीत जाऊ लागलोआहे.

पुस्तके मासिके वाचण्यासाठी माझ्या लायब्ररींच्या भेटी जनरल लायब्ररीपासून सुरुवात झाली. त्यानंतर वल्लभदास वालजी वाचनालय, बळवंत वाचनालय,नवजीवन ग्रंथालय, ते मुंबई मराठी ग्रंथालय – विशेषतः तिथल्या संदर्भ ग्रंथालयापर्यंत पर्यटन झाले. . त्यानंतर माउन्टन व्हयू लायब्ररी, मर्चंटस् वॅाक, रेडवुड शोअर्स, सॅन कार्लोस रेडवुडसिटी ह्या लायब्रऱ्यात सुद्धा जाऊन आलो. सॅन कार्लोस लायब्ररीपासून माझे व्हॅालंन्टियरचे दिवस सुरू झाले.

पण आज जास्त करून लिहिणार आहे ते, विशेषतः बेलमॅान्टच्या वाचनालयाशी संबंधित आहे. कारण सध्या मी बेलमॅान्टच्या लायब्ररीत व्हॅालन्टियर म्हणून जात आहे. तिथे देणगी म्हणून येणाऱ्या पुस्तकांशी माझा सतत संबंध येतो.

निरनिराळी, अनेक विषयांवरची, कादंबऱ्या, आठवणींची, चरित्रे, आत्मचरित्रे, अभिजात (classic), काव्यसंग्रह , इतिहासाची, उत्कृष्ठ छायाचित्रांची, आर्थिक राजकीय विषयांवरची किती किती, अनेक असंख्य पुस्तके समोर येत असतात.

काही पुस्तके अगोदर वाचली असल्यामुळे ओळखीची असतात. त्यातलीही काही पुस्तके तर केव्हा कुठे वाचली कोणी दिली ह्यांच्याही आठवणी जाग्या करतात. ह्यातच काही योगायोगांचीही भर पडते. थोरल्या मुलाने अगोदर केव्हा तरी – केव्हा तरी नाही- दोन तीन दिवसांपूर्वी विचारले असते ,” बाबा सध्या अचानक ज्योतिषावरची पुस्तके दिसायला लागलीत.तुमच्या पाहण्यात आलीत का?” त्यावर मी नाही म्हणालो. इतक्यात तरी काही दिसली नाहीत.” असे म्हणालो. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी, चिनी ज्योतिष, अंकशास्त्रावर आधारित भविष्याची, तुमची जन्मतारीख आणि भविष्य अशी पुस्तके आली की! योगायोग म्हणायचा की चमत्कार हा प्रश्न पडला.

फेब्रुवारीत धाकटा मुलगा म्हणाला की ते सगळे एप्रिलमध्ये युरोपातील ॲमस्टरडॅम लंडन पॅरीस ला जाणार आहेत. दोन चार दिवस माझ्या ते लक्षात राहिले. नंतर विसरलो. ऐका बरं का आता. मी लायब्ररीतल्या कॅाम्प्युटरवर पाहिले. स्टीव्ह रीकची पुस्तके दिसली नाहीत. एक आढळले. पण ते दुसऱ्या गावातल्या लायब्ररीत होते. माझ्यासाठी राखून ठेवा असे नोंदवून ठेवले. दोन दिवस गेले. तिसरे दिवशी लंडन का पॅरिसवरचे स्टीव्ह रीकचे पुस्तक समोर आले. अगदी समोर. वा! हे जाऊ द्या. मी लायब्ररीतल्या बाईंनाही सांगून ठेवले होते. दोन तीन दिवसांनी त्यांनी मला बोलावलेआणि नेदर्लॅंडचे पुस्तक हातात ठेवले. “ पण तुला पाहिजे त्या ॲाथरचे नाही .” मी काय बोलणार? योगायोग की चमत्कार ? हा नेहमीचा प्र्शन पुन्हा पडला!

पुस्तके देणारे बरेच लोक पुस्तके देतात ती इतक्या चांगल्या स्थितीत असतात की आताच दुकानातून आणली आहेत! अनेक पुस्तके खाऊन पिऊन सुखी अशी असतात. तर काही जिथे जागा सापडली तिथे बसून, जेव्हा मिळाला वेळ तेव्हा वाचलीअशी असतात. कव्हरचा कोपरा फाटलेला , नाहीतर कान पिरगळून ठेवावा तशी आतली बऱ्याच पानांचे कोपरे खुणेसाठी दुमडून ठेवलेली, अशा वेषांतही येतात. काही मात्र बघवत नाहीत अशा रुपाने येतात. पण अशा अवस्थेतील, फारच म्हणजे अगदी फारच थोडी असतात.

पुस्तके ज्या पद्धतीने दिली जातात ती पाहिल्यावर देणगी दार आणि त्यांची घरे कशी असतील ह्याचा ढोबळ अंदाज येतो. काही पुस्तके बऱ्याच वर्षांपूर्वी प्रकाशित झाली असतात तरी ती नुकतीच दुकानातून आणली आहेत असे वाटते.काहीजण कागदी पिशव्या भरून पुस्तके देतात. पण इतकी व्यवस्थित लावून रचलेली की ती पिशवी रिकामी करू नये; पिशवीकडे पाहातच राहावे असे वाटते. साहजिकच पुस्तके बाहेर काढताना मीही ती काळजीपूर्वक काढून टेबलावर ठेवण्याचा प्रयत्न करतो.

काही वेळा पुस्तके खोक्यांत भरून येतात. पहिले दोन थर आखीव रेखीव. मग वरच्या थरात जशी बसतील, ठेवली जातील तशी भरलेली ! खोकी आपले दोन्ही हात वर करून उभे ! काही पुस्तके तर धान्याची पोती रिकामी करावी तशी ओतलेली. सुगीच्या धान्याची रासच! हां त्यामुळे मोऽठ्ठ्या, खोल पिपातली पुस्तके उचलून घ्यायला सोपे जाते हे मात्र खरे.

एक दोनदा तर दोन लहान मुले,पुस्तकांनी भरलेले आपले दोन्ही हात छातीशी धरून “कुठे ठेवायची ?” विचारत कामाच्या खोलीत आली ! लहान मुलांची पुस्तके होती. त्या मुलांइतकीच पुस्तके गोड की पुस्तकांपेक्षाही मुले ? ह्याचे उत्तर शोधण्याची गरजच नव्हती. दोन्ही गोड! किती पुस्तके आणि ती देणारेही किती!

आठवणी जाग्या करणारी पुस्तकेही समोर येतात. पूर्वी मुलाने ,” हे वाचा” म्हणून दिलेले Little Prince दिसल्यावर माउन्टन व्ह्यु नावाच्या लायब्ररीची आठवण येते. जिथे बसून वाचत असे ती कोचाची खुर्ची, तिच्या बाजूला खाली ठेवलेली, बरोबर घेतलेली वहीची पिशवी…. असेच आजही बेलमॅान्टच्या लायब्ररीत टाईम, न्युयॅार्क संडे मॅगझिन, रिडर्स डायजेस्ट,न्यूयॅार्कर वाचताना वही बॅालपेन असलेली पिशवी जवळच्या टेबलावर ठेवलेली असते!

मध्यंतरी धाकट्या मुलाने दिलेले बेंजॅमिन फ्रॅन्कलिनचे, आयझॅकसनने लिहिले चरित्र आले तर एकदा त्यानेच दिलेले लॅारा हिल्डनबर्डचे Unbroken भेटीला आले. माझ्या दोन्ही नातवांच्या शेल्फातील चाळलेले The Catcher in the Rye आणि Of the Mice and Man ही पुस्तके हातात आल्यावर त्यांची ती विशेष खोली, तिथली,त्यांच्या पुस्तकांनी भरलेली शेल्फंही दिसली. इकडे अगदी पहिल्यांदा आलो तेव्हा मुलाने आणून दिलेले Ian Randची सर्वकालीन श्रेष्ठ कादंबरी Fountain Head काही दिवसांपूर्वी दिसले ! आणि त्याच लेखिकेचे Anthem ही ! धाकट्याने दिलेले Confidence Men सुद्धा मध्यंतरी अचानक भेटून गेले.

मुलीचे आवडते Little Women हे अभिजात वाड•मयाचे पुस्तक आणि तिला आवडलेले व नातीने मला दिलेले Anne of Green Gables ही दोन्ही पुस्तके इतक्या विविध, सुंदर आवृत्यांतून येत असतात की लग्नसमारंभाला नटून थटून जाणाऱ्या सुंदर स्त्रियांचा घोळकाच जमलाय! हाच सन्मान शेक्सपिअर , चार्ल्स डिकन्स,शेरलॅाक होम्स आणि लिटल प्रिन्स , हॅरी पॅाटरला, आणि ॲगाथा ख्रिस्तीलाही मिळत असतो. उदाहरणादाखल म्हणून सन्मानीयांची ही मोजकीच नावे सांगितली.

लहान मुलांच्या पुस्तकांनाही देखण्या, जरतारी आवृत्यांतून असेच गौरवले जाते. त्यापैकी काही ठळक नावे सांगायची तर C.S. Lewis ह्यांचे प्रख्यात Chronicles of Narnia , Signature Classics of C.S. Lewis. तसेच E.B. White ची Charlottes Web , Stuart Little ही पुस्तके, Alice in Wonderland, Sleeping Beauty , The Beauty and The Beast, ह्या पुस्तकांनाही असाच मान मिळतो.

अगदी अलिकडच्या योगायोगाची कहाणी; मी पूर्वी वाचलेले Dr. Andrew Weil चे पुस्तक अचानक प्रकट झाले. अरे वा म्हणालो. पुन्हा परवा त्याच डॅाक्टरांचे Natural Health Natural Medicine हे पुस्तक दिसले. म्हटलं आता मात्र हे मुलांना कळवायलाच पाहिजे.

मघाशी मी वेगवेगळ्या रुपातील आवृत्यांतून येणाऱ्या पुस्तकांच्या यादीतील आणखी एका मानकऱ्याचे नाव सांगायचे राहिले. ते म्हणजे Hermann Hess चे Siddhartha ! हे सुद्धा सार्वकालीन लोकप्रिय पुस्तक आहे. मागच्याच वर्षी मला हे मुलाने दिले होते. मी वाचले. छान लिहिलेय. आपल्या तत्वज्ञानासंबंधी व तत्वज्ञाविषयी लिहिलेले, तेही परदेशी लेखकाने ह्याचे एक विशेष अप्रूप असते. ह्याने बरेच समजून उमजून लिहिले आहे. सहा महिन्यांपूर्वी, मुलांनी वाचलेले व मला,” बाबा हे वाचा तुम्हालाही समजेल,आवडेल असे पुस्तक आहे “ म्हणत दिलेले Homosepiens हे गाजलेले पुस्तक परवाच दोन तीन वेळा शेकहॅन्ड करून गेले. माझ्याकडे असलेली लायब्ररीविषयी, लायब्ररी हेच मुख्य पात्र असलेली The Library Book किंवा Troublewater Creeks Book-woman अशी पुस्तके पाहिली की लायब्ररीत लायब्रऱ्या आल्या असे वाटू लागते !

काही वेळा मी ह्या ना त्या पुस्तकांचा “ परवा हे आले होते आणि ते सुद्धा, बरं का!” असे मुलांना सांगतो. पण माझ्या आवडीच्या जेम्स हेरियटचे एकही पुस्तक आतापर्यंत तरी ह्या गराड्यात आलेले, थांबलेले पाहिले नाही! येईल, योग असेल तेव्हा ती चारीही पुस्तके येतील. !

पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या, लोकांच्या गराड्यांत , किंवा प्रसिद्धीच्या सतत झोतांत असलेल्या लोकप्रिय नामवंतांना आपल्या चहात्यांची गर्दी,गराडा हवा हवासा वाटतो. पुस्तकप्रिय वाचकांनाही पुस्तकांच्या गर्दीगडबडीचा गराडाही हवा हवासा वाटत असतो ! नाहीतर आजही लायब्ररीत इतके वाचक-लोक आले असते का?

एकातून एक … ह्यातून ते … त्यातून हे …

बेलमॉंट

८ मार्च २०२३ – महिला दिन

गोपू लहान होता. त्याच्या आजोबांनी त्याच्यासाठी एक उबदार पांघरूण शिवून दिले. रंगीत कापडांचे दोन तीन थर लावून ते पांघरूण शिवले होते. ते गुडीगुप्प पांघरुण गोपुला इतके आवडायचे की झोपताना, जागा झाल्यावर , दूध पिताना ते सतत घेऊन असायचा.

गोपू थोडा मोठा झाला तरी ‘आजोबाच्या पांघरुणा’ शिवाय तो झोपत नसे. बरे , उठता बसताही ते त्याच्या बरोबर असायचेच.

इतके दिवस होऊन गेल्यावर ते पांघरुण फाटायला लागले. वरच्या कापडाचा रंग विटू लागला. आई म्हणाली, “ गोपाळा, अरे ते पांघरूण टाकून दे आता.” “ टाकायचे का? मी नाही टाकणार.हे आजोबाला दे. ते करतील पुन्हा चांगले.”

गोपुच्या आईने आजोबांना ते पांघरुण दिले. “ बघा काय करायचे ते “, असे सांगून घरी आली. आजोबांनी पांघरुण चारी बाजूंनी पाहिले. “ हंऽऽ, हॅां, अस्सं तर “ असे पुटपुटत ते पुढे म्हणाले की , “ अरे पुष्कळ आहे की हे करायला …. .” असे म्हणत त्यांनी कात्री घेतली .

आजोबांची कात्री कच कच करीत कापड कापू लागली. त्यांच्या मशिनची सुई खाली- वर-खाली जोरात चालू लागली. दुसरे दिवशी आजोबा गोपुच्या घरी आले. त्यांनी गोपुला ,” हा घालून बघ “ म्हटल्या बरोबर गोपु टणकन उडी मारत पळत आला. तो लांब कोट अंगात घालून आई पुढे उभा राहिला. “ बघ आजोबांनी पांघरुणातून कोट केला की नाही? “ इतके म्हणून कोट घालून तो बाहेर पळाला. सर्वांना दाखवत फिरत राहिला. जो तो विचारी,” काय गोप्या नविन कोट शिवला का?” “ हो माझ्या आजोबांनी शिवलाय. मस्त आहे ना?” उत्तराची वाट न पाहता गोपू पुढे सटकला देखील.

आता गोपूला त्या कोटाशिवाय काहीच सुचत नव्हते. दिवस रात्र, घरात आणि बाहेर, गोपु कोटाशिवाय दिसत नसे. शेजारची, जवळची गोपुची दोस्त कंपनी त्याला म्हणे , अरे गोपु मला घालून पाहू दे ना कोट. दे ना! एकदाच.” मग गोपु बबन्याला, मग बाज्याला, नंतर गज्याला, असं करीत सर्वांना आपला कोट घालायला देत असे.

कोटाचेही दिवस भरले असावेत. गोपुची आई म्हणाली, “ अरे गोपाळा, त्या कोटाची रया गेली की रे! टाकून दे तो आता.” लगेच गोपु म्हणाला, “ टाकायचा कशाला? आजोबा आहेत की. त्यातून ते- हे काहीतरी करून देतील मला.”

आई गोपुचा कोट घेऊन आजोबांकडे आली. त्यांच्या समोर कोट टाकीत म्हणाली, “ गोपुचा कोट. तुम्ही, गोपु आणि कोट! काय करायचे ते करा.” आजोबांनी कोट खाली वर, मागे पुढे फिरवून पाहिला. “ हंऽऽ , हॅां ऽ हॅूं ऽऽ अस्संऽऽऽ तर “ असे पुटपुटत, “ पुष्कळ आहे की ….हे करायला….” म्हणत

म्हणत त्यांनी कात्री घेतली. कात्री कच कच करीत गोल, तिरपी, आडवी,उभी होत कोट कापायला लागली. आजोबांच्या मशिनची सुई खाली-वर-खाली वेगाने जाऊ लागली. आणि आजोबांनी आपण शिवलेल्या कपड्याकडे पाहात त्याची घडी घालून गोपुकडे आले.

“ आजोबा, आजोबा काय आणले माझ्यासाठी” म्हणत गोपु धावत त्यांच्याजवळ गेला. आजोबांनी अर्ध्या बाह्या असलेले सुंदर जाकीट गोपुच्या अंगात घातले. गोपुराजे एकदम खूष होऊन आईला म्हणाले, “ बघ आई, कोट टाकून दे म्हणत होतीस ना? बघ कोटातून आजोबांनी काय काढले ते ! “

गोपु आता जाकीटमय झाला. बरेच दिवस सगळे त्याला जाकीटगोपुच म्हणत. बाज्या- गज्या, बबन्या- गहिनी , अरुण- मधुला , सगळ्या दोस्तांनाही थोडा वेळ का होईना जाकीट घातल्याचा आनंद लुटता आला.

दिवस गेले. जाकीट मळकट कळकट दिसू लागलेच पण फाटायलाही लागले. आईचे पुन्हा ते “टाकून दे रे बाबा आता ते जाकीट!” आणि गोपुचे, “ आजोबा करतील काही तरी ह्यातून” हे रोजचे पाढे म्हणून झाले.

पांघरूण कापडांच्या थरांनी बनविले होते तरी त्यातली बरीचशी कापडे विरून गेली होती. आजोबांनी जाकीटाला सगळ्या दिशांनी फिरवले. शिंप्याच्या पाटावर पसरून ठेवले. “ हंऽऽ , हॅांऽऽऽ , हॅूंऽऽ अस्संऽऽ तर “ असे पुटपुटत पुष्कळ झाले की इतके” म्हणत आजोबांची कात्री कच कच करीत कापड कापत गेली. त्यांच्या मशिनची सुई खाली-वर -खाली जोरात जाऊ लागली. थोड्या वेळाने तयार झालेली….

आजोबा गोपुला हाका मारीतच घरात शिरले. गोपुही ‘आजोबा आले’ म्हणत एकेक पायरी सोडून उड्या मारीत खाली आला. आजोबांनी, सुंदर कारागिरी केलेली झोकदार टोपी, गोपुच्या डोक्यावर चढवली. हातानी चाचपून ठाकठीक केली. गोपु हर्षभरीत होऊन आईकडे ओरडतच गेला, “आई बघ आजोबांनी जाकीटातून, जादूने टोपी केली माझ्यासाठी. बघ बघ ,” असे म्हणताना तो आपली मान, डोके रुबाबात इकडे तिकडे फिरवत होता. घरातून धूम ठोकत गोपू बाहेर पडला. रस्यावरचे, बाजूचे, घरातले सर्व गोपुकडे कौतुकाने पाहात राहिले. टोपी होतीच तशी देखणी.

पक्या-मक्या, बबन्या-गहिन्या, अरुण-मधु , बाज्या-गज्या सर्वांच्या डोक्यांवर गोपुची टोपी दिमाखात मिरवत राहीली.

टोपीच ती. तीही बरेच दिवसांनी भुरकट धुरकट झाली. तिची एक घडी फाटली, दुसरी उसवली गेली. आईचा ,” अरे आता तरी फेकून दे ना ती टोपी. तिचे चिरगुट झालंय की रे!” हा मंत्र सुरु झाला. त्यावर गोपुचा, “ आजोबा ह्या टोपीतून दुसरे काही एक करतील” हा खात्रीचा पाढा न चुकता गोपुने म्हटला.

आजोबांनी टोपी पाहिली. सुस्कारा टाकला. पण हंऽऽ, हॅांऽऽ हॅूऽऽ , अस्सं तऽऽर “, पुटपुटणे सुरु झाले. कात्री फिरू लागली. सुई खाली-वर-खाली झाली. आजोबांनी झालेली वस्तु समोर घरून पाहिली.

आजोबा गोपुच्या घरी आले. “गोऽपु ! अशी हाक दिली. हाकेसरशी गोपु आला. आजोबांनी मोठा हातरुमाल समोर धरला. गोपुने तो पटकन ,” हात रुमाऽऽल!” म्हणत घेतला. दोस्तांना दाखवायला पळत गेला. झेंड्यासारखा फडकावत चालला. प्रत्येक खेळगड्यांनीही तो वाऱ्यावर फडकवत नाचवला. गोपूने काळजीपूर्वक घडी घालून सदऱ्याच्या वरच्या खिशात ‘फॅशन ’ करीत ठेवला. आता रुमाल गोपुला सोडेना की गोपु रुमालाला. गोपूने हातरुमालाचे पॅरशूट केले. हवेत फुगून ते डोलत डोलत खाली येऊ लागले की सर्व पोरे टाळ्या वाजवायचे. गावातल्या नदीवर खेळायला गेले की वाळूतले रंगीत दगड तर कधी चिंचा, चिंचेचा चिगुर तर कधी बोरं रुमालात येऊ लागली. पण हातरुमाल तो हात रुमालच की!

बरेच दिवस होऊन गेले. आईचे ,” अरे माझ्या ल्येका गोपाळा! अरे तो रुमाल आहे का चिंघी? होय रे? टाकून दे तो बाबा!” हे नेहमीचे म्हणून झाले. त्यावर गोपूचे ठरलेले उत्तरही देऊन झाले. रुमाल घेऊन स्वतः गोपुच आजोबांकडे गेला.

आजोबांनी रुमालाकडे पाहिले. “ हंऽऽ, हॅांऽऽ हॅूऽऽ, अस्स्ंऽऽ तर ” पुटपुटणे झाले. आजोबा उठले. कपडा बेतताना, कापताना उरलेले रंगी बेरंगी कपड्यांच्या तुकड्यांनी भरलेली पिशवी काढली. गोपू हे सर्व टक लावून पाहात होता. आजोबांनी तुकडे एकत्र गोळा करून रुमालासहित एका रंगीत तुकड्याने झाकला. सुईने त्या गोळ्यावर भराभर टाके घातले . थोड्या वेळाने चेंडू तयार झाला. गोपुला तो देत ते म्हणाले, “ हा घे चेंडू! खेळ आता भरपूर!”

छाती पुढे काढून ऐटीत, आजोबांनी दिलेला चेंडू आईला दाखवित गोपु म्हणाला, “बघ बघ आई! हातरुमालातून आजोबांनी हा गोल गुबगुबीत चेंडू करून दिला! बघ! “

गज्या- बाज्या, अरुण -मधु, बबन्या-गहिनी, पक्या-मक्या रोज चेंडू खेळू लागले. दिवस जात होते. एके दिवशी खेळता खेळता चेंडू जवळच्या नदीत पडला. वाहात गेला. कुणाला तो काढता आला नाही.

हिरमुसली होऊन गोपू आणि त्याची दोस्त कंपनी घरी गेली. आजोबाही म्हणाले , “गोपाळा, आता काही करता येणे शक्य नाही रे ! ” गोपुला काही सुचेना. पण शाळा, अभ्यास, घर खेळ ह्यात तो कसे तरी मन रमवू लागला.

दिवस पुढे सरकत होते.चेंडू हरवला होताच. काही दिवसांनी गोपुचे आजोबाही गेले.

गोपू आता हायस्कुलात होता. एके दिवशी त्या विषयाचे सर आले नव्हते. दुसरे सर आले. त्यांनी मुलांना “तुम्हाला आठवती आणि आवडती ती गोष्ट “ लिहायला सांगितली.

वही उघडली, गोपू लिहित गेला, “ हंऽऽ , हॅूऽऽ, अस्सं तर … पुषकळ आहे की हे करायला…. “. एकामागून एक , एकातून एक .. लिहित गेला, लिहित गेला ….

… आणि हीच सुंदर गोष्ट त्याने आपल्यासाठी लिहिली की हो!

{ एका ज्यू लोककथेचा संदर्भ. मी मराठीत रुपांतरीत केली. )

हद्दपार ते नोबेल विजेता – २

मॅरिएटा

“ माझी मानवप्राण्यात तरी गणना कुणी केली? मी माणूस आहे ही मान्यता कुणी दिली?” ब्रॅाडस्कीने हे प्रश्नातून दिलेले उत्तर ऐकून सरकारी वकील व न्यायाधीश गप्प झाले.

“ हे तू कुठे शिकलास? “ न्यायाधिशानी विचारले.

“ हे म्हणजे ?” ब्रॅ्डस्कीने प्रतिप्रश्न केला. त्यावर न्यायाधीश बोलू लागले,” हे म्हणजे ह्या कविता- बिविता करणे… तू तर शाळाही धड पूर्ण नाही केलीस ! तिथे…”

“ शाळाकॅालेजात शिकवित नाहीत. आणि मला वाटते तुम्ही जे ‘हे’ म्हणालात ते कोणी कुणाला शिकवणेही शक्य नाही.मला .. मला तुमचे ‘हे’ देवानी दिले असावे.” इतके सांगून ब्रॅीडस्की थांबला.

त्

त्याला, जणू ठरवलेच होते त्याप्रमाणे सायबेरियाच्या एका भागात सक्तमजुरीची पाच वर्षाची शिक्षा दिली.

त्या आधीही त्याला वेळोवेळी पोलिस चौकीत चौकशीला जावे लागत होते. बरेच वेळा कोठडीची हवाही खावी लागे. पण ही सक्तमजुरी म्हणजे अत्यंत कठोर शिक्षा होती. .

नामवंत रशियन आणि इतर युरोपियन देशांतील कवि, विचारवंतांनी ब्रॅाडस्कीला दिलेल्या शिक्षेविरुद्ध जेव्हा आवाज उठवला तेव्हा त्याची शिक्षा कमी करून सुटका केली. पण त्याला १९७२ साली हद्दपार केले.

हद्दपार होऊन कोणत्याही देशाचा नागरिक नसलेला,अधांतरी

हद्दपार झालेल्या ब्रॅाडस्कीला प्रख्यात कवि W. H. Auden ने खूप मदत केली. ब्रॅाडस्की अमेरिकेत आला. त्यावेळी त्याने ‘साल १९७२’ नावाची कविता लिहिली. कुणालाही आपले गाव, राज्य, देश सोडताना,तेही शिक्षा म्हणून, जे दुःख होते; आठवणींची गर्दी होते तसे ब्रॅाडस्कीलाही झालेच असणार.

आपली प्रेयसी, सहचरी मरिना बास्मानोव्हा हिला आणि तिच्यापासून झालेल्या आपल्या अवघ्या पाच वर्षाच्या लहान मुलाला लेनिनग्राद मध्येच सोडून यायचे त्या ताटातुटीचे दुःख वेगळेच. लहान मुलाचे भवितव्य तरी सुरक्षिततेचे असावे म्हणून त्याचे आडनावही बदलावे लागले. आईचेच आडनाव त्याला लावले. ब्रॅाडस्कीच्या अनेक प्रेम कविता जणू तिच्यासाठीच , तिलाच उद्देशून लिहिल्या आहेत. त्याची बायको मरिना उत्तम चित्रकार होती. पोर्ट्रेट करण्यात प्रविण होती.

ब्रॅडस्की अमेरिकेत आला. पण त्याची उदास किंवा ‘आता काय राहिले जगण्यासाठी’ अशी भावना प्रबळ होऊ लागली असावी. म्हणून तो नंतर येणारे म्हातारपण डोळ्यासमोर आणून म्हणतो,” मरण जवळ येतेय्, त्याची पूर्व तयारीही सुरु होईल. लवकरच केस गळतील, दात पडतील, डोळ्यांच्या खाचा होतील!” – पण हाडाचा कवि असल्यामुळे ह्याच मालिकेत तो—“ क्रियापदे,उपपदे, प्रत्ययही गळून पडू लागतील ! “असे सुस्कारा टाकून म्हणतो. त्याचे खरे दुःख हे असावे.

पण ह्या नैराश्यातून तो लगेच बाहेरही आला. पुन्हा लिहू लागला. कविता रशियन भाषेतून करू लागला. इतर लिखाण इंग्रजीत लिहू लागला. भाषेची उपजत आवड असल्यामुळे त्याने इंग्रजीही चांगले आत्मसात केले.

१९७३ मध्ये ब्रॅाडस्कीच्या कवितांचा Selected Poems प्रसिद्ध झाला. कवितांचे भाषांतर जॅार्ज एल. क्लाईन ह्यांनी केले होते. आणि प्रख्यात कवि डब्ल्यु एच ॲाडेन यांनी मार्मिक प्रस्तावना लिहिली होती. त्यानंतर १९८० साली त्याचा आणखी एक काव्यसंग्रह Part of Speech प्रकाशित झाला. हा संग्रह त्याची विशेष ओळख म्हणून गणला जातो. ब्रॅाडस्की ह्या कविता-संग्रहामुळे खूप नावाजला जाऊ लागला. त्यामुळे त्याला इंग्रजी बोलल्या जाणाऱ्या इंग्लंड अमेरिका आणि युरोपसह अनेक देशात प्रसिद्धी मिळाली. तो प्रख्यात झाला. ब्रॅाडस्कीने त्याच्या कवितांतून, कवितेची भाषाच बदलली असे समीक्षक, जाणते रसिक म्हणू लागले.

त्याचे History of Twentieth Century हे १९८६ साली प्रसिद्ध झाले. त्यात फारशा न झोंबणाऱ्या पण डिवचणाऱ्या, बारिक चिमटे काढणाऱ्या कविता आहेत. त्याच बरोबरीने उपहासात्मक, विडंबन कवितांचाही समावेश आहे.,

ब्रॅाडस्की हा साहित्याचा भोक्ता होता. उत्तम वाचक होता. मोलमजुरी, मदतनीस, हरकाम्या अशी विविध तऱ्हेची कामे करत असतांनाही तो कविता करीत असे. त्याच बरोबरीने त्याचे वाचनही चालूच असे.

ब्रॅाडस्कीवर १३-१४ व्या शतकातील इटालियन कवि आणि तत्वज्ञ डान्टे , इंग्लिश कवि जॅान डन आणि त्यांच्या काळापासून डब्ल्यु एच ॲाडेन पर्यंतच्या आधुनिक कवींचा प्रभाव होता. अमेरिकन कवि रॅाबर्ट फ्रॅास्टचा तो मोठा चाहता होता. वेस्ट इंडिज बेटातील कवि डेरेक वॅालकॅाट त्याचा मित्र होता. त्याच्या मित्रांमध्ये कवि, वक्ता, लेखक, नाटककार Seamus Heaney सुद्धा होता. ब्रॅाडस्कीच्या स्वभावाच्या सर्व कंगोऱ्यांना सांभाळून घेणारा त्याचा चाहता, शेमिस हिनी स्वतः उत्तम कवि व लेखक होता. श्रेष्ठ रशियन साहित्यिक, कवि,नाटककार, आणि कादंबरीकार पुश्किन आणि दुसरा नामवंत रशियन साहित्यिक व नोबेल विजेता (1958) बोरेस पॅस्टरनॅक ह्यांच्या परंपरेतील ब्रॅाडस्की मानला जातो.

काळ माणसाला कसा घडवत असतो हेच वाड•मय सांगत असते. ब्रॅाडस्कीचे वाड•मयही ह्याला अपवाद नाही. पण प्रतिभावंत,बुद्धिमान आणि विचारी कवि,लेखक ज्या शैलीने आणि ज्या शब्दांतून सांगतो त्या मुळेच तो थोर म्हटला जातो. ब्रॅाडस्की त्यापैकी एक आहे.

ब्रॅाडस्की हा प्रथम कवि आहे. तो कवितेचा अभिमानी आहे. आणि त्याने उत्कट प्रेमही केले होते. कविता आणि प्रेम ह्या विषयी तो जास्त बोलणार सांगणार हे ओघाने आलेच. मागच्या लेखात, त्याने एके ठिकाणी “प्रेमाला पर्याय कविता होय.” म्हटल्याचा उल्लेख केला. तर त्याचे ‘दैवत’ असलेला कवि,मॅन्डलस्टॅम , (सत्ताधाऱ्यांच्या विरोधी मताच्या किंवा ज्यांच्या पासून सत्ताधीशांना धोका आहे ह्या नुसत्या संशयानेही त्यांना छळवणुकीच्या ,सक्त मजुरीच्या छावण्यांत (‘गुलाग’) शिक्षा म्हणून पाठवले जात असे) त्या ‘गुलाग’ मध्ये शिक्षा भोगत असताना थंडी आणि उपासमारीने मेला. त्या बंडखोर, शहीद कवि मॅन्डलस्टॅम ची विधवा Nadezhda Mandelstam हिने तिचा नवरा मॅन्डलस्टॅम मेल्यानंतर बऱ्याच वर्षांनी लिहिलेल्या, अप्रतिम आत्मचरित्राविषयी ब्रॅाडस्कीने एक लेख लिहिला. त्या लेखात तो म्हणतो , “जर प्रेमाला पर्याय असेलच तर स्मृति, आठवणी हाच असेल.” कवितेला तो भाषेचे अंतिम परिपक्व फळ.” म्हणतो. “भाषेची अभिव्यक्ति कविताच होय !” असे म्हणताना पुढे तो लिहितो की “कविता ही जीवनाचीच अभिव्यक्ति आहे !”

“जे न देखे रवि ते देखे कवि” ह्या वचनाने आपणही कवितेचे श्रेष्ठत्व आणि वेगळेपण मान्य करतो. केशवसुत ,” आम्ही कोण म्हणुनि काय पुससी?” असे विचारत कवीचा आणि पर्यायाने कवितेचे मोठेपण सांगतात. त्यांची थोरवी ही त्यांच्या कवितेमुळेच आहे. कविता नसेल तर आकाशातील तारांगणेही निष्प्रभ वाटू लागतील असे ते म्हणतात.क्रौचवध झालेला पाहताच कवि वाल्मिकींच्या मुखातून “ मा निषाद प्रतिष्ठां त्वमगम: शाश्वतौ समा: ….” हा काव्याचा श्लोकच बाहेर पडला. सांगायचे इतकेच ब्रॅाडस्की कवितेला इतके मानतो ते योग्यच वाटते. कवितेचे सर्वांना माहित असलेले वैशिष्ठ्य म्हणजे ती थोडक्या शब्दांत मोठा आशय सांगून जाते.

ब्रॅाडस्की हा श्रेष्ठ समीक्षकही होता. तसेच प्रतिभावान लेखकही होता. त्याने व त्याच्या दोन कविमित्रांनी (वर उल्लेख केलेले डेरेक वॅालकॅाट , Seamus Heaney) मिळून अमेरिकन कवि रॅाबर्ट फ्रॅास्टला आदरांजली वाहिली त्या पुस्तकात( Homage to Robert Frost) रॅाबर्ट फ्रॅास्टची व्यक्ति आणि कवि व त्याची कविता ह्या विषयी तिघांनीही लिहिले आहे. तिघांचेही लेख वाचनीय आहेतच. त्यांमधून ब्रॅाडस्कीचे वाचन, अभ्यास, चिंतन ह्याचे दर्शन होते. ज्या ब्रॅाडस्कीवर प्रभाव पडला त्या रॅाबर्ट फ्रॅास्टविषयी त्याने सखोल चिंतनात्मक व वाचनीय लेख लिहिला आहे.

हे तिघेही नामवंत लेखक आणि तिघेही वाड•मयाचे नोबेल पारितोषिक विजेते ! साहित्यातील तीन दिग्गजांनी वाचकांना रॅाबर्ट फ्रॅास्टची पुन्हा नव्याने ओळख करून दिली ! फ्रॅास्टला हा मान मिळाला तसा फार थोड्यांना असा ‘त्रिवेणी’ सन्मान मिळतो!

ब्रॅाडस्कीचा अमेरिकेतील रशियन समाजाशी निकटचा संबंध होता. रशियातून येणाऱ्या लोकांना तो बरीच मदत करीत असे. त्याला अमेरिका आणि युरोपियन साहित्य क्षेत्रांत सर्व सन्मान मिळाले. त्याचे सभा वश करणारे वक्तृत्व, परिणामकारक कविता वाचन, आणि त्याचा वाड•मयाचा , त्यातही अभिजात वाड•मयाचा सखोल अभ्यास ह्यामुळे तो प्रख्यात झाला.

अनेक समीक्षकांनी ब्रॅाडस्कीने कवितेला नवीन भाषा दिली असे म्हटले आहे. कवितेचे रुप रंग बदलले. आपल्याकडेही असे कवि झाले आहेत. केशवसुतांनी जसे मराठी कवितेचे स्वरूप आमुलाग्र बदलले तसेच त्यांच्या नंतरच्या काळात, ज्यांचा ‘ दुसरे केशवसुत.’ असा यथार्थ गौरव होतो ते बा. सी. मर्ढेकर, त्याही नंतरच्या काळातील कवि ग्रेस, कवि आरती प्रभु (चिं.त्र्यं . खानोलकर), ‘ माझे विद्यापीठ’ लिहिणारे कविवर्य नारायण सुर्वे , आपल्या मातीत रुजलेल्या कविता लिहिणारे लोककवि अण्णाभाऊ साठे, आपल्या कवितेतून मग ती प्रेमगीत असो की ‘उषःकाल होता होता काळरात्र झाली…’ हे सांगत आपल्या गझल आणि कवितेच्या मशाली पेटवून मराठी कवितेला वेगळाच रंग देणारे कविवर्य सुरेश भट; अशी काही नावे सांगता येतील.

ब्रॅाडस्कीच्या जातिवंत दर्जेदार कवितांचीच नव्हे तर साहित्य समीक्षेची, लेख, निबंधासहित -( उदाः- Less Than One ; —हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. ) — त्याच्या संपूर्ण वाड•मयाची नोबेल पारितोषिक समितीने दखल घेतली; आणि १९८७ सालचे वाड•मयाचे नोबेल पारितोषिक देऊन ब्रॅाडस्कीचा सन्मान केला. त्यामुळे ब्रॅाडस्की जगविख्यात झाला. कवितेला निराळी भाषा, निराळा रंग आणि रूप देणारा कवि ब्रॅाडस्की, केवळ शब्दांचा कसबी, कुशल कारागीर नव्हता तर भाषाप्रभु होता. त्यावेळी,साहित्याचे नोबेल पारितोषक मिळालेल्यांमध्ये ब्रॅाडस्की हा वयाने सर्वात लहान होता. वयाच्या ४७ वर्षी त्याला नोबेल पारितोषिक मिळाले.

ब्रॅाडस्की हा संभाषणपटू होता. चर्चा असो वाद असो,नेहमीच्या काव्यशास्त्रविनोदांची गप्पाष्टके असोत, तो आला की बैठकीत रंग भरत असे. चैतन्य सळसळत असे. असे त्याचा कविमित्र लेखक व नोबेल विजेता मित्र शिमस हेनी याने म्हटले आहे.

त्याच्या ठिकाणी पूर्व आणि पश्चिम ( पुर्व युरोप व पश्चिम युरोप व अमेरिका ) संस्कृतीचा, विचारांचा, परिस्थितीचा सुरेख संगम झाला होता . श्रेष्ठ रशियन कवि Osip Mandelstam आणिAnna Akhmatova हे दोघे त्याची प्रेरणास्थाने होती. डान्टे, जॅान डन, ॲाडेन, रॅाबर्ट फ्रॅास्ट ह्या इंग्लंड अमेरिकेतील कवींचा त्याच्यावर प्रभाव होता.

कवि ॲाडेन हा ब्रॅाडस्कीपेक्षा निःसंशय श्रेष्ठ होता. तो खरा नोबेल पारितोषकाचा मानकरी होता. त्याला नोबेल पारितोषिक मिळायला हवे होते. पण मिळाले नाही. ब्रॅाड्स्कीला ह्या गोष्टीची खंत वाटत असे. आणि नोबेल पारितोषिक स्वीकारताना केलेल्या भाषणात त्याने ती बोलून दाखवली. आपल्यापेक्षा नोबेल पारितोषकावर माझ्यापेक्षा इतर अनेक साहित्यिकांचा कवींचा हक्क आहे हे सांगतांना त्याने प्रामुख्याने डब्ल्यु एच. ॲाडेनचा गौरवाने उल्लेख केला.

पण कोणीही शंभर टक्के पूर्ण नसतो. सर्वांमध्ये चांगल्या वाईटाचे थोडेफार मिश्रण असते. ब्रॅाडस्कीही अपवाद नव्हता . तो अहंवृत्तीचा होता असे म्हटले जाते. ‘मीच बरोबर’, ‘ माझेच खरे’ अशा अहं पद्धतीने बोलायचा . मग त्या मित्रमंडळीच्या बरोबर चाललेल्या गप्पा, चर्चा असोत. त्याच्या मित्रमंडळात कवि, लेखक प्राध्यापक अशी विद्वान मंडळी असत. तो म्हणे इंग्लिश कवींपेक्षा मला त्यांच्या कवितेतील यमक वृत्त छंदोरचना यांचे जास्त ज्ञान आहे. पण इतरांना हे माहित होते की हे फक्त त्याला वाटते ! तो त्याचा स्वकेंद्रित स्वभावाचा दोष होता.

इतके असूनही शिमस हेनी ब्रॅाडस्कीच्या गुण दोषांसह त्याचा चाहता आणि मित्र राहिला. वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी ब्रॅाडस्कीचे निधन झाले. हेनीने त्याच्यावर न्युयॅार्क टाईम्समध्ये लेख लिहिला. दोन ठिकाणी भाषणेही दिली. त्या लेखात ब्रॅाडस्कीचे गुण गाताना तो लिहितो, “कालपरवा आपल्यात असणाऱ्या ब्रॅाडस्कीविषयी बोलता-लिहिताना भूतकाळाळाची क्रियापदे वापरावी लागतात ह्यापरते दुःख नाही. पण तो (हेनी) “होता, ‘म्हणत असे,’ ‘तो हसायचा,’ ‘कवितेची ओळ अशा तऱ्हेने म्हणायचा की लोक काही वेळ स्तब्ध होत) -तो पुढे म्हणतो, असे भूतकाळ वापरून लिहिणे म्हणजे आपण व्याकरणाचा उपमर्द करतो असे वाटते.”

कविता,काव्यावर प्रेम करणारा, कविता वाचताना श्रोत्यांना आपल्यासमोर प्रत्यक्ष कविताच उभी आहे, असे वाटावयास लावणारा , स्टालिनच्या काळात, कवि आणि त्याच्या कविता हा समाजाला मोठा धोका आहे. तो लोकांचा शत्रु आहे ह्या विचारसरणीमुळे वारंवार पोलिसी चौकशीला सामोरे जावे लागून , तुरुंगवास भोगावा लागलेला, बर्फाळ प्रदेशात छळ-छावणीत सक्त मजुरीची शिक्षा भोगणारा, आणि आपली प्रेयसी, मुलगा, आणि थकत आलेल्या आई वडिलांपासून तोडला गेलेला, तिशीतील तरूण प्रतिभावान कवि जोसेफ ब्रॅाडस्कीला अखेर हद्दपार होऊन अमेरिकेत जावे लागले ! तिथे त्याच्या प्रतिभेचे, बुद्धिमत्तेचे,आणि विचारांचे स्वागत झाले. मोठे मान सन्मानही प्राप्त झाले. आणि ह्या सर्वांवर मानाचा शिरपेच असलेले साहित्याचे नोबेल पारितोषिकही त्याला मिळाले.

जगाच्या उघड्या विद्यापीठात आयुष्याचा अर्थ समजून घेतलेल्या ब्रॅाडस्कीचे १९९६ साली निधन झाले.

ब्रॅाडस्कीचे दैवत,हिरो असलेला,जुलमी राजवटीविरुद्ध आपल्या कवितेतून आवाज उठवणारा कवि मॅन्डलस्टॅम खोचकपणे पण विषादाने म्हणतो,” रशियामध्ये कवितेचा जेव्हढा सन्मान होतो तितका इतरत्र कुठेही होत नाही….. म्हणूनच त्यासाठी अनेकांचे प्राणही घेतले जातात !” रशियातून हद्दपार झालेला, जगाच्या उघड्या विद्यापीठात आयुष्याचा अर्थ समजून घेतलेल्या जोसेफ ब्रॅाडस्कीचे १९९६ साली अमेरिकेत निधन झाले.

सतराव्या शतकाचील फ्रेंच तत्वज्ञानी डेकार्टचे “ I think therefore I am “ हे वचन प्रख्यात आहे . त्याच्या पावलावर पाउल ठेवत विसाव्या शतकात साहित्यप्रेमी ब्रॅाडस्कीने माणसाचे मुल्यांकन करताना डेकार्टच्या वचनाला जणू आणखी विचारसमृद्ध केले आहे. ते वाचण्यासारखे आहे. तो म्हणतो “Man is what he reads !”

फॅहरनहाईट ४५१ कादंबरीतील, जिथे कुठे पुस्तके असतील ती शोधून जाळून टाकण्याच्या ‘अग्निवर्धक’ दलातील एक ‘आगलावा’ त्याला आपण हे काय करतोय ह्याची जाणीव झाल्यावर पश्चात्तापाने म्हणतो , “एकेक पुस्तक जाळताना मी एकेका माणसालाच जाळत होतो ! “ त्याही पुढे जाऊन ब्रॅाडस्की म्हणतो, “ पुस्तके जाळणे हा गुन्हा आहेच पण त्यापेक्षाही पुस्तके न वाचणे हा मोठा गुन्हा आहे.”

जॅार्ज ब्रॅाडस्की असो किंवा त्याच्या आधी होऊन गेलेले तसेच त्याच्या काळातील अनेक थोर साहित्यिकांचे ग्रंथ हेच त्यांचे अमरत्व आहे !

हद्दपार ते नोबेल विजेता -१

मॅरिएटा

“ महाराज, आरोपीने काही वर्षे मजुरीची कामे केली म्हणजे काही विशेष केले असे अजिबात नाही.ते सामाजिक कर्तव्य आहे. पण तो कविताही करतो. कविता करणे हे समाजासाठी अजिबात महत्वाचे नाही. त्याच्या कविता अश्लील,बीभत्स असतात असाही आरोप लेनिनग्राडच्या मुख्य वर्तमानपत्राने केला आहे. ह्याचा अर्थ त्या समाजाला घातकच होत. आरोपी हा समाजावर आलेले एक बांडगुळ आहे. समाजालाच त्याला पोसावे लागते. हा परोपजीवी आरोपी समाजाला भार झाला आहे. तरी त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा द्यावी असे जनतेच्या सरकारला वाटते.”

सरकारी वकीलाचे हे आरोप ऐकल्यावर ‘जनतेच्या न्यायाधीशांनी’ आरोपीला विचारले, “ तुला कवि म्हणून कुणी मान्यता दिली ? तुझी कवींमध्ये गणना कुणी केली ?”“
त्यावर तिशीतल्या तरूण आरोपीने निर्भयपणे न्यायाधीशांना, सांगितले,” कोणीही नाही.” नंतर त्याने न्यायाधीशांकडे पाहात सरकारलाच विचारले,” माझी मानव वंशात कुणी गणना केली? मी माणूस आहे अशी तरी नोंद कुणी केली आहे?मला माणूस म्हणून तरी मान्यता कुणी दिली ?”

कवि जोसेफ ब्रॅाडस्कीचे ही उत्तरे ऐकल्यावर सरकारी वकील आणि न्यायाधीश स्तब्ध झाले. पण ठोठवायची म्हणजे ठोठवायचीच ह्या न्यायाने न्यायमूर्तींनी ब्रॅाडस्कीला पाच वर्षे आर्क्टिक प्रदेशातील एका मजुरांच्या छावणीत काम करण्याची शिक्षा सुनावली.

ही घटना १९६४ सालची. कवि,साहित्यिक, जोसेफ ब्रॅडस्कीला इतकी कठोर शिक्षा झाल्याचे समजल्यावर त्या काळातली रशियातली श्रेष्ठ कवियत्री ॲना ॲव्खमातोव्हाने व इतर कवी आणि साहित्यिकांनी सरकारला एक पत्र लिहिले आणि जोसेफच्या बाजूने त्यांची भूमिका स्पष्ट केली. जोसेफची शिक्षा माफ करावी अशी विनंती केली. युरोपमधील बऱ्याच प्रख्यात कवि आणि साहित्यिकांनीही जोसेफ ब्रॅाडस्कीवर झालेल्या अन्याया विरुद्ध आवाज उठवला. त्यामध्ये प्रख्यात कवि डब्ल्यु. एच. ॲाडेनचा मोठा पुढाकार होता.

ह्या घडामोडी पाहिल्यावर प्रश्न चिघळू नये म्हणून रशियन सरकारने जोसेंफ ब्रॅाडस्कीची अठरा महिन्या नंतर सुटका केली.
ह्या अठरा महिन्याच्या काळात सक्तीच्या मजुरीची कष्टाची कामे करावी लागली. पण ज्या पत्र्याच्या खोलीत भाडे देऊन राहात होता तिथे सांडपाण्याची सोय नव्हती. पाणी जायला गटारे होती . पण ती कायमची तुंबलेली होती. एकच मोठी चैन होती. ती म्हणज संडासासाठी एक आडोसा होता !

ब्रॅाडस्कीचा जन्म १९४० साली लेनिनग्राद (सेंट पिटसबर्ग) येथे झाला. तो दोन वर्षाचा असताना हिटलरने लेनिनग्राडला ९०० दिवस वेढा घातला होता. असंख्य लोक मारले गेले. उपासमारी, रोगराईने किती मेले त्याचा पत्ता नाही. ह्या संकटातूनही ब्रॅाडस्कीचे आईवडील व तो स्वतः बचावले. पण त्याचा काका मात्र मृत्युमुखी पडला.

ब्रॅाडस्कीचे आयुष्य गरीबीत गेले. त्याच्या कुटुंबासारखी अनेक कुटुंबे सरकारी मदतीने उभ्या राहिलेल्या इमारतीत राहात होती. ती मोठी संपूर्ण गल्ली अशा सामुहिकरीत्या राहणाऱ्या कुटंबांची गर्दी असलेल्या इमारतींनींच भरलेली होती. एका मोठ्या खोलीत तीन चार कुटुंबे राहात असत. पडदे, उंच कपाटे ह्याच मधल्या भिंती ! सहा सात कुटुंबाना एकच स्वैपाक घर, एकच न्हाणीघर व संडास ! आपल्याला निश्चितच मोठ्या अडचणीची व अवघडलेल्या मनःस्थितीत राहण्याची गैरसोय वाटेल अशी गोष्ट म्हणजे इतक्या कुटुंबाना मिळून एकच स्वैपाक घर! त्यातल्या त्यात सामायिक संडास म्हणजे फार मोठी अडचण गैरसोय वाटणार नाही. पण पाश्चात्य देशातील मध्यम, कनिष्ठ मध्यमवर्गीयांना अशा गोष्टी हालाखीच्या आणि मोठ्या गैरसोयी वाटत असतात.

प्रत्येक कुटुंबाला महिन्यातील एक आठवडा सामायिक स्वैपाकघर, न्हाणीघर आणि संडास स्वच्छ करावा लागत असे. तिकडे जाण्याची सामायिक मार्गिकाही घासून पुसून स्वच्छ करणे भाग असे. तो म्हणतो,” आमची पाळी असली की एक दिवस आधी आई, आमच्याकडे बघून पण स्वतःशी बोलल्यासारखे म्हणायची , “सर्व स्वच्छ करण्याची पाळी आपली आहे. कोण करणार आहे?” इतके म्हणत ती दुसऱ्या कामाला लागत असे. तिला माहित असे की हे काम तिलाच करावे लागणार !

१९७२ पर्यंत अशा मोहल्यात ब्रॅाडस्कीचे बाळपण व तरुणपणाची वर्षे गेली. ह्या घरात ब्रॅाडस्की राहिला, वाढला. कविताही लिहित होता.

ब्रॅाडस्की अशा तरुण वयात होता की घरात सोयी गैरसोयी होत्या नव्हत्या ह्याचे त्याला विशेष महत्व नसेल पण स्वतःसाठी लहानशी का होईना वेगळी खोली नाही ही त्याची मोठी अडचण होती. उंच कपाटे, पुस्तके,वस्तूंनी भरलेली शेल्फ ह्यांचा आडोसा असलेला एक कोपरा त्याचा होता!
तो सांगतो,” मला आणि माझ्या वयाच्या अनेकांच्या मनातील ही दुखरी जागा होती. मैत्रीणीला घरी आणणेही जमत नसे. मग प्रेम कसले साजरे करतो मी! त्यामुळे मी आणि माझी मैत्रीण Marina Basmanova बाहेर फिरायला जात असू. आम्हा प्रेमिकांचे चालणे, विहरणे, किती मैल झाले असेल ते मोजता येणार नाही. काही शतक, किंवा हजारो मैल आम्ही आमच्या प्रितीच्या धुंदीत चाललो असू ! ही सारी त्या सामायिक खोलीतल्या एका कोपऱ्याची मेहरबानी!”

हद्दपार झाला तेव्हा ब्रॅडस्कीला आपली प्रेयसी मरिनाला व तिच्यापासून झालेल्या पाच वर्षाच्या लहानग्या मुलाला लेनिनग्रादलाच सोडून यावे लागले. त्या दोघांच्या सुरक्षिततेसाठी मरिनाचे आडनावच मुलालाही लावावे लागले.

वयाच्या पंधराव्या वर्षी जोसेफ ब्रॅाडस्कीने शाळा सोडून दिली. मोल मजुरीची, मिळेल ती कामे करू लागला. कधी प्रेतागारात काम केले. प्रेते फाडायची. नंतर ती शिवायची. काही काळ त्याने कारखान्यांत कामगार तर काही काळ रसायनांचे पृथ:करण करणाऱ्या लॅबोरेटरीत. पण जास्त काळ तो धरणे-बंधारे, कालव्यांची कामे व त्यांचे बांधकाम आणि देखभाल करणाऱ्या भूशास्त्र इंजिनियराच्या — बांधकाम करणारे तज्ञ इंजिनिअर्स —हाताखाली, मदतनीस,हरकाम्या म्हणूनही काम करीत होता. लहान मोठी धरणे, त्यांची मजबुतीची तपासणी, कालव्यांच्या भिंतीच्या दुरुस्ती ह्या कामात तो रंगला असावा. ह्या कामामुळे त्याला रशियातील निरनिराळे प्रदेश पाहायला मिळाले. आता पर्यंत करीत असलेल्या कामामुळे त्याला, त्याच्याच शब्दांत “ खरे आयुष्य,खरे जगणे काय असते त्याची जाणीव झाली. कित्येक लोकांना जवळून पाहता आले. त्यांच्या सारखेच राहण्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्यांचे प्रपंच कसे चालतात त्ह्या आश्चर्याचे याचे वास्तवच समोर दिसले.” इथे आपल्याला मॅक्झिम गॅार्कीची आठवण येते. तोही असाच बिन भिंतींच्या उघड्या विश्वविद्यालयात मिळेल ते काम, शारिरीक कष्टाची कामे करून शिकला.

पण अशी कामे करीत असतांना तो कविता करू लागला होता. ब्रॅाडस्कीने १८ व्या वर्षी कविता लिहायला सुरुवात केली. ‘समाजाला लागलेले परजीवी बांडगुळ’ अशा आरोपावरून मजुरांच्या छावणीत सक्त मजुरी करण्यास धाडले तेव्हाही तो कविता करत होता.

ब्रॅाडस्कीला कवि म्हणून मान्यता व प्रसिद्धि मिळाली त्यामागे त्या काळची प्रख्यात कवयित्री ॲना ॲख्मातोहा Anna Akhmatova आहे. तिला त्याच्या काव्यातला ’जिवंतपणा’, ‘धग’, आणि वेगळेपण जाणवले. तुमच्या मते सध्या कवि म्हणून ज्याचे नाव घेता येईल असा कोण आहे ? असे विचारल्यावर, तिने सर्व प्रथम जोसेफ ब्रॅाड्स्कीचे नाव घेतले.

ब्रॅाडस्कीला साहित्य,वाड•मयाचे अतिशय प्रेम होते. त्यातही कवितेवर सर्वात जास्त. शेवटपर्यंत कविता त्याचे ‘पहिले प्रेम’ होते. तो सांगतो, “ प्रेमाला पर्याय असलाच तर तो एकच आहे – कविता !”

जन्मला,जगला,मेला’ ह्या शब्दांतून कोणाच्याही आयुष्याचे वर्णन होऊ शकत नाही. कवितेविषयीही ब्रॅाडस्की असेच काहीसे म्हणतो. “माणूस त्याच्या निधनाची बातमी व्हावी म्हणून जसा जगत नाही तशीच चार सुंदर शब्द सुचले म्हणून
कविता होत नाही.” जेव्हा आयुष्य, जगणे हे अगदी जवळून, आतून अनुभवाला येऊ लागते तेव्हा कविता होऊ लागते. ती
जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होते.“ जुलमी राजवटीत पोलिसांच्या भीतीखाली, सतत दडपणाखाली जगणारी माणसे
अखेर अशा अवस्थेला पोचतात की “ आम्हाला सुख नको, फक्त यातना कमी होऊ देत” इतकेच ते मागत असतात.
ब्रॅाडस्की ज्या परिस्थितीत राहिला वाढला त्यातलेच हे त्याचे स्वानुभवावर आधारित बोल आहेत.

ब्रॅाडस्की श्रेष्ठ कवि होताच, तसाच उत्तम भाषांतरकारही होता. कारण त्याने पोलिश आणि इंग्लिश भाषांत प्राविण्य मिळवले होते. त्याने पोलिश कवींच्या कविता लेख भाषांतरीत केल्या. त्याच्या स्वत:च्या कवितांचे फ्रेंच,जर्मन, इटालियन, स्पॅनिश इंग्रजी व इतर काही भाषांतून, एकूण दहा भाषांत भाषांतर झाले आहे. त्याच्या रशियन कवितांचे दर्जेदार इंग्रजी कवींनी भाषांतर करून संग्रह प्रसिद्ध केले. त्यामुळे तो आणखी ख्यात झाला. कविता तो त्याच्या रशियन भाषेतच करीत असे. निबंध, लेख मात्र इंग्रजीत लिहित असे.

ब्रॅाडस्कीला १९७२ मध्ये रशियातून हद्दपार केले. राजकीय कारणांमुळे त्याला हद्दपार केले नव्हते. तो राजकीय विरोधक नव्हता.पण त्याची स्वतंत्र वृत्ती, व्यक्ति स्वातंत्र्याविषयीची मते ही स्टालिनआणि स्टालिन नंतरच्या सत्ताधीशांनाही मानवणारी नव्हती. कविता लेख भाषणे ह्यातून आपल्या विरुद्ध जनमत तयार होईल ही सगळ्या हुकुमशहांना कायमची धास्ती असते. हुकुमशहा शब्दांना फार घाबरत असतात. मग ते लिखित असोत, छापील असोत. भाषणातील असोत की कवितेतील, गाण्यांतील असोत ! म्हणूनच “कवि,कविता करणे म्हणजे समाजासाठी काही उपयुक्त,मदत करणारा मार्ग, काम नाही. समाजालाच त्याला पोसावे लागते.तो समाजाचे शोषण करत असतो. म्हणजेच तो बांडगुळ आहे.” अशा ठरवून रचलेल्या विचारसरणीमुळे सत्ताधीशांनी त्याला हद्दपार केले.

तो प्रथम पोलंडमध्ये आला. मूळचा ब्रिटिश पण नंतर अमेरिकेत राहिलेला प्रख्यात कवि डब्ल्यू. एच ॲाडेनकडे तो राहिला. त्याच्या मदतीने तो अमेरिकेत आला. आणि पाच वर्षानंतर अमेरिकन नागरिक झाला.मधली पाच वर्षे तो हद्दपार ह्या अवस्थेतच होता.ना रशियाचा नागरिक ना कुठल्या एका देशाचा; हद्द्पार ! कोणत्याही देशाना आपला न मानलेला हद्दपार !

तो म्हणतो, “ वाड•मय, पुस्तकांनी माझे आयुष्य बदलले. साहित्याने माझ्यात मोठा बदल घडवून आणला. आयुष्य घडवणाऱ्या काळात, खास करून दोस्तोयव्हस्कीच्या Notes from Underground ह्या पुस्तकाचा त्याच्यावर प्रभाव होता.

“ कविता आपल्याला काळाच्या तडाख्याला तोंड देण्यास समर्थ करते.” असे सांगून तो पुढे जे म्हणतो ते विशेषतः जुलमी, हुकुमशाही राजवटीत राहाणाऱ्या लोकांना लागू पडते. तोही अशाच राजवटीत राहात होता.तो पुढे सांगतो,” भाषा, शब्द कविता फक्त रोजच्या आयुष्यातील ताणतणाव सोसण्याची जबर इच्छाशक्ती, बळ देते असे नव्हे तर अस्तित्वावर येणाऱ्या दबावातही जगण्याचा, मुक्त होण्याचा मार्ग दाखवते.”

ब्रॅाडस्कीला लहानपणापासून लेनिनविषयी राग होता. राग लेनिनच्या राजकीय विचारसरणीमुळे नव्हता . कारण ते समजण्याचे त्याचे वयही नव्हते. पण “ लेनिनच्या सर्वत्र दिसणाऱ्या, असणाऱ्या,पराकोटीच्या ‘अति अस्तित्वाचा’ राग होता. लेनिनग्राद मध्ये अशी एकही जागा,ठिकाण, कोपरा,रस्ता, रेस्टॅारंट, इमारत नव्हती की जिथे लेनिनचे प्रचंड चित्र, पुतळा, फोटो नाही. वर्तमानपत्राच्या पहिल्यापानापासून लेनिनचे फोटो, पोस्टात,पोस्टाच्या लहानशा तिकिटावरही लेनिन, बॅंका शाळा,कोणत्याही छापील कागदावर लेनिन, लेनिन लेनिन इथे तिथे लेनिनला पाहून पाहून, सतत डोळ्यांत घुसणाऱ्या वीट आला. डोळे बिघडून आंधळा होईन असे वाटू लागले.” असे तो म्हणतो.

साहित्यातील कवितेवर त्याचे जीवापाड प्रेम होते. कवितेचा गौरव करताना तो म्हणतो,” भाषेची सर्वोच्च प्रगल्भता, परिपूर्णता आणि परिपक्वता कविता आहे!”
जे एकाकी आहेत, कोणत्या तरी भीतीच्या दडपणाखाली आहेत, अस्वस्थ आहेत त्यांनी कविता वाचल्या पाहिजेत अशी आग्रहाची शिफारस करतो. त्यामुळे त्यांना समजेल की इतरही अनेक असे जगताहेत. पण तसले जीवनही ते एक उत्सव साजरा होतोय ह्या भावनेने जगत आहेत. कविता अशी जाणीव करून देते.

अमेरिकेत ब्रॅाडस्की हा मिशिगन युनिव्हर्सिटीत, Queens College, Smith College , Mount Holyoke College मध्ये वाड•मयविषयाचा प्राध्यापक होता. तो उत्तम शिक्षक होता. इंग्लंडमधील केंब्रिज युनिव्हर्सिटीत अतिथी प्राध्यापक होता.त्याला अनेक विद्यापीठांनी डॅाक्टरेट पदवी दिली आहे. त्यापैकी इंग्लंड मधील ॲाक्सफर्ड आणि अमेरिकेतील प्रतिष्ठित अशा Yale विद्यापीठांचा समावेश आहे.

तो फर्डा वक्ता, आपल्या बोलण्याने खिळवून ठेवणारा संभाषणपटू होता. चर्चा असो अथवा आपल्या मित्रांच्या गप्पागोष्टींनाही तो आपल्या संभाषणाने व विचारांनी निराळ्याच उंचीवर नेत असे.

विद्यापीठात, महाविद्यालयात शिकवताना सांगायचा की कविता मोठ्याने वाचा,म्हणा. त्यामुळे अर्थ समजण्यास जास्त सोपे जाईल. कविता पाठ होतील. ह्यामागे रशियातील शाळेत पाठांतराला महत्व होते. आपल्याकडेही परीक्षा पास होण्यासाठी पाठांतरावर भर द्यावा लागतो !

कवितेच्या आवडीपोटी त्याने एक योजना सुचवली. लोकांना कविता वाचायची सवय व्हावी; त्या आवडाव्यात ह्यासाठी निवडक कवितांच्या छोट्या पुस्तिका काढाव्यात. त्या फुकट द्याव्यात. शाळा महाविद्यलये, वाचनालयात , निवडक सार्वजनिक ठिकाणी ठेवाव्यात. सरकारने ही कल्पना काही काळ उचलून धरली. अंमलातही आणली. थोडक्या काळासाठी ही योजना असावी. पण काही तरी अनुकुल परिणाम झाला असणार.

ब्रॅाडस्की हा आपल्या कविता तशाच इतरही कवींच्या कवितांचे वाचन करीत असे. ते इतके प्रभावी होत असे की रशियन भाषा न समजणारे श्रोतेही मंत्रमुग्ध होऊन ऐकत. त्याची आदर्श व त्याला पुढे आणणाऱ्या ॲना माख्वाटोव्हा आणि रशियन Gulag मध्ये शिक्षा भोगत तिथे उपासमार आणि थंडीमुळे १९३८ साली मृत्यु पावलेल्ला त्याचा Hero मॅन्डलस्टॅम (Mandelstam) ह्यांच्या कविता फार मनापासून,अत्यंत परिणामकारक रीतीने वाचन करीत असे. अमेरिकेतील पहिल्या दोन वर्षांत त्याने ६० वेळा कविता वाचन केले !

रशियातून हद्दपार झालेल्या प्रतिभावान, बुद्धिमान, कवि, निबंधकार व लेखक आणि उत्कृष्ठ शिक्षक जोसेफ ब्रॅाडस्कीला अमेरिकेतील साहित्य जगतातील बहुतेक सर्व सन्मान मिळाले. तो १९९१ सालचा ‘अमेरिकेचा राजकवी’ ही होता.

ह्या सन्मानानंतर त्याला साहित्यातील सर्वोच्च सन्मानही मिळणार होता……

यशस्वी लोकांची मनोगते


मागच्या लेखांत विविध क्षेत्रातील काही नामवंत काय वाचतात , त्यांच्या आवडीची पुस्तके ह्या संबंधी वाचले. टिमोथी फेरिसने शंभराच्यावर नामवंताना बरेच प्रश्न विचारले होते. त्यामध्ये त्यांची आवडीची पुस्तके व ती का आवडली, तसेच त्यांना जर त्यांच्यासाठी स्वतंत्र मोठा जाहिरात फलक दिला तर त्यावर काय लिहाल ? त्यांची उत्तम गुंतवणूक कोणती? नव्या पदवीधारकांना, तरुणांना काय सांगाल? असेही काही प्रश्न विचारले होते. त्यावर ह्या मोठ्या यशस्वी लोकांनी काय सांगितले तेही आपण आज वाचणार आहोत.


नवल रविकांत हे मूळचे हिंदुस्थानचे पण ते बऱ्याच काळापासून अमेरिकेतच आहेत. तेही यशस्वी गुंतवणुकदार आहेत. त्यांनी सुमारे दोनशेच्यावर कंपन्यांत, त्या अगदी बाल्यावस्थेत असल्यापासून,गुंतवणुक केली आहे. त्यापैकी काही कंपन्यांची नावे सांगायची तर Opendoor, Postmates , Uber, FourSquare , Twitter, Snapchat अशी सांगावी लागतील.


नवल रविकांत ह्यांची उत्तम गुंतवणूक म्हणजे पुस्तके !पुस्तकांचे, वाचनाचे महत्व सांगताना ते म्हणतात की, , “ वाचनाची आवड असणे आणि ती जोपासणे म्हणजेच वाचन हे मोठी शक्ती आहे. वाचन तुम्हाला सामर्थ्यवान बनवते. मी शाळेत असल्यापासून “ आवश्यक वाचन” (Required Reading) पुस्तकेच नाही तर इतरही अनेक पुस्तके वाचत असे.कधी काही एक उद्देशाने तर बरीच सहजगत्याही वाचली. आज आपल्या हाताशी पुस्तकांचा महासागर आहे. पण ती वाचण्याची इच्छा, उर्मी हवी. वाचनामुळे आपण निश्चित शिकत असतो. त्या साठी इच्छा तळमळ हवी. ती तुमच्यामध्ये येऊ द्या. वाचनामुळे तुम्हाला काय हवे, काय करावे, कोण व्हावे ह्याची जाणीव होते. तशी ती होऊ द्या. वाचा.”


कॅालेजमधून नुकतेच बाहेर पडलेल्या तरुणांना काय सांगाल ह्यावर ते म्हणाले,” तुम्हाला जे करावेसे वाटते , मनापासून तीव्रतेने वाटते ते करा. पण ते करताना एक गोष्ट सतत ध्यानात ठेवा. कोणत्याही गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते. वाट पाहाण्याची शक्ती असू द्या.जे करायचे ते करताना चिडचिड , चिंतेने अस्वस्थ होऊन करू नका.” “ बातम्या , कुरकुर करणारे, संतापी प्रक्षुब्ध लोकांकडे दुर्लक्ष करा, दूर राहा” असेही ते सांगतात. हे सांगत असतानाच कोणतीही अनैतिक, अनीतीची गोष्ट कधीच करू नका, तसे वागूही नका.” असेही ते बजावतात.


ह्याच प्रश्नाला उत्तर देताना प्रख्यात पाकशास्त्रातील तज्ञ आणि तिच्या पाककृतींच्या पुस्तकांमुळे नावारुपास आलेली सेमीन नुसरत सल्ला देते की,” प्रसंगी गोंधळून जाल , शंका,संशयांत पडाल तेव्हा तुमच्यामधील दयाळूपणा, करूणा आणि चांगुलपणाचा आधार घ्या. त्यांनाच प्राधान्य द्या.”


Floodgates चा संस्थापक माईक मेपल्सला सांगितले की तुम्हाला तुमचा स्वतंत्र मोठा जाहिरात फलक दिला तर तियावर काय लिहाल? त्यावर त्याने दिलेले उत्तर लक्षात ठेवण्यासारखे आहे “ सचोटीच्या मार्गाने जा. तुम्ही कधीच रस्ता चुकणार नाहीत!”


तर ह्याच प्रश्नाला उत्तर देताना SalesForce ह्या प्रख्यात कंपनीचा अध्यक्ष आणि मुख्य कार्याधिकारी मार्क बेन्यॅाफ Marc Benioff म्हणतो , “बालवाडी ते १२ वी एक शाळा दत्तक घ्या” अर्थात हे ज्यांना सहज शक्य आहे अशा धनवंतांना तो सांगत असावा. पण उदात्त, आणि समाजाला उपयोगी असा सल्ला आहे ह्यात शंका नाही. विशेष म्हणजे ‘ आधी केले मग सांगितले’ असा तो माणूस आहे.


जिचा MarieTV कार्यक्रम हा खूप लोकप्रिय आहे, तसेच प्रख्यात B-School ची संस्थापिका मेरी फर्लियोने सांगितले की तिची आई नेहमी सांगत असे तेच वाक्य मी वचन म्हणून माझ्या जाहिरात फलकावर लिहिन. “कोणत्याही अडी अडचणीच्या वेळी , बिकट न सुटणारा प्रश्न, संकट आले की आई म्हणायची ,” Everything is ‘figure-out-able’ ! “ ती पुढे म्हणते घरांतील आम्हा सर्वांसाठी तिचे हे सांगणे मार्गदर्शक झाले आहे. कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतोच! साधे, रोजचे वाटणारे हे बोल किती आश्वासक धीर देणारे आहेत. तिच्या आईचा ‘फिगरआऊटेबल’ शब्द वाचला तेव्हा मला आपण गमतीने किंवा सहजही ‘ परवडेबल’ म्हणतो त्याची आठवण झाली.


मागील लेखात काईल मेनर्डविषयी(Kyle Maynard) विषयी वाचले. खास त्याच्यासाठीच जर मोठा जाहिरात फलक मिळाला तर तो म्हणतो की त्यावर त्याचा नौदलातील श्रेष्ठ वीरपदक मिळवणारा मित्र Richard Machowicz म्हणत असे तेच, कुणातही वीरश्री निर्माण करणारे, वचन मी लिहिन. ” Not Dead, Can’t Quit !” “मारता मारता मरेतों लढेन “ किंवा मराठी वीर सरदार दत्ताजी शिंदें ह्यांनी पानिपतच्या रणभूमीवर अखेरच्या क्षणी सुद्धा जे उत्तर दिले त्या “ बचेंगे तो और भी लढेंगे” ह्या वीरवचनाची आठवण करून देणारे हे स्फूर्तिदायक वचन आहे !


काही नामवंतांनी ते मोठ्या फलकावर काय ते लिहितील हे सांगितले. पण आपल्याला बरेच वेळा मोठमोठ्या फलकांचा त्रास वाटतो; उबगही येतो. हे दोन्ही बाजूंचा देखावा , दृश्य, पाह्यला अडथळा आणणारे, बटबटीत, वाहन चालवणाऱ्यांचे लक्ष विचलित करणारे फलक नको वाटतात. काढून टाकावेत असे वाटते. अगदी असेच, लेखक,व चित्रपट कथा पटकथा लेखक, जाहिराती उत्तम लिहिणाऱ्या Steve Pressfield ह्यालाही वाटते. तो म्हणतो,” अगोदर मला असा फलक कुणी देणार नाही. दिला तरी तो मी घेणार नाही.उलट तो मी ओढून खाली पाडून टाकेन. दुसरे ही असे फलक मी पाडून टाकेन.”


पण ह्यापेक्षाही आणखी काही प्रेरक विचार वाचायला मिळतील. “ मैदान सोडून पळून न जाणे हाच यश आणि अपयश ह्यातील फरक आहे” किंवा प्रसिद्ध टेनिसपटू विजेती मारिया शारापोहव्हा जेव्हा ,” पराभवानंतर जितका विचार करते तेव्हा तितका विजयानंतर होत नाही.” हे सुभाषितासारखे बोलून जाते तेव्हा आपणही त्यावर विचार करू लागतो. निदान,” खरे आहे.” इतके तरी म्हणतोच..


टिमोथी फेरिसच्या The Tribe of Mentors मध्ये Affirm ह्या कंपनीचा सह संस्थापक मॅक्स लेव्हशिन Max Levchin , ; न्यूयॅार्क टाईम्सचा सतत आठ वेळा सर्वाधिक खप Best Seller असलेला लेखक Neil Strauss; हॅालिवुडमधील नट व एकपात्री विनोद वीर, Joel Mettale ; नट दिग्दर्शक Ben Stiller ; आणि आणखीही बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींनी आपले विचार मांडले आहेत. सर्वांचा परामर्श घेणे शक्य नाही.


“ तुमची सर्वांत उत्तम गुंतवणुक कोणती?” ह्या प्रश्नाला Mike Maples ह्याने दिलेल्या, सर्वांना पुन्हा अंतर्मुख करणाऱ्या, उत्तराने ह्या लेखाचा समारोप करतो. तो सांगतो,” मी माझ्या मुलांवर ठेवलेला विश्वास !” “Believing in my Kids”

वेगळ्या जमातीची आवडीची पुस्तके

आयुष्याची वाटचाल कशी करावी, “जगावे कसे ? तर उत्तम” , हे शिकवणारे मार्गदर्शक, धडपडणाऱ्यांना हात देऊन उभे करणारे शिक्षक किंवा अनुभवी उद्योजक; ‘तान्ह्या’ कंपन्यांत भांडवल गुंतवून त्यांना वाढवणारे गुंतवणुकदार; किंवा समाजातील गुणी मुलांमुलींसाठी मदत करणारे जगप्रसिद्ध खेळाडू, गायक, नट, संस्था; किंवा कुसुमाग्रजांच्या शब्दांत सांगायचे तर ‘पाठीवर थाप मारून फक्त ‘लढ’ म्हणत निश्चय बळकट करणारे, अशा विविध रुपाने अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक मददगारांची ही विशेष जमात आहे. हे इतक्या तऱ्हेने सांगण्याचे कारण म्हणजे मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात टिमोथी फेरिसचे The Tribe of Mentors हे पुस्तक वाचनात आले.


पुस्तकाविषयी तर जमेल तेव्हढे सांगावेसे वाटते. पण त्या अगोदर हा लेखक कोण आहे तेही समजून घेणे प्राप्त आहे.
टिमोथी फेरिस हा कंपन्या बाल्यावस्थेत असताना त्यांच्यात पैसा गुंतवणारा कुशल गुंतवणुकदार आहे. कितीही चांगले, वेगळे,व भविष्यकाळ असलेले उत्पादन असो; त्याची संकल्पना ज्यांना सुचली ते बुद्धिमान प्रतिभाशाली असोत, पुरेसे भांडवल नसेल तर गाडे अडते. अशावेळी, कंपनी आणि उत्पादनाविषयी थोडीफार खात्री असणारे गुंतवणुकदार पुढे येतात. आपला पैसा त्यात गुंतवतात. अशा angel investor (पोषणकर्त्यां) पैकी टिमोथी फेरिस आहे. त्याशिवाय तो लेखकही आहे. तो पुढे आला 4-Hour Week ह्या पुस्तकामुळे. त्यानंतर त्याची अशीच 4-Hour Body आणि 4-Hour Chef ही पुस्तके प्रकाशित झाली.


फेरिसने StumbleUpon, Evernote आणि कितीतरी अनेक तंत्रज्ञान कंपन्यांत त्यांच्या प्राथमिक अवस्थेपासून गुंतवणुक केलेली आहे. उबेर कंपनीचा तो सल्लागारही आहे. लोकांना तो माहित आहे ते त्याच्या पॅाडकास्टमुळे. त्यातअनेक वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींच्या मुलाखती असतात. या बरोबरच त्याने ‘ऐकण्याची’ Audio (श्रवण)पुस्तकेही प्रकाशित केली आहेत.


ह्या टिमोथी फेरीसने सुमारे शंभराच्यावर नामवंतांना अकरा प्रश्न पाठवले व त्यांची उत्तरे देण्याची विनंती केली. बहुतेक नामवंत हे तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. तसेच काही गायक, वादक,लेखक, प्रख्यात बल्लवाचार्य, खेळाडू, अपंगही आहेत.
ह्या ख्यातनामांनी दिलेली उत्तरे बारावी आणि कॅालेज आटपून नुकतेच बाहेरच्या वास्तव जगात प्रवेश करणाऱ्या तरुणांना, उद्योजक व्यावसायिक होऊ इच्छिणाऱ्या धाडसी व्यक्तींना आणि इतरांनाही उपयुक्त ठरतील. म्हणूनही हे पुस्तक वाचनीय आहे.


माझ्यासारख्या सामान्य वाचकाला ही मोठी माणसे कोणती पुस्तके वाचतात, आपण वाचलेली किंवा वाचू अशी काही पुस्तके आहेत का ही माहिती मिळते. निदान नविन किंवा वेगळ्या पुस्तकांची माहिती होते. हा लाभ मोठा आहे. कारण फेरिसने त्या सगळ्यांना “ तुम्ही आतापर्यंत सर्वात जास्त कोणते पुस्तक /पुस्तके भेट दिली आहेत? आणि का? किंवा कोणत्या एका किंवा तीन पुस्तकांचा तुमच्यावर सर्वाधिक प्रभाव पडला आहे? “ हा पहिला प्रश्न विचारलाय. “तुमची सर्वात महत्वाची गुंतवणुक कोणती?” सर्वांत आवडते किंवा संस्मरणीय अपयश कोणते?”किंवा आपण कधी कुठे कमी पडलो असे वाटले का?” “ ताण तणाव घालवण्यासाठी तुम्ही काय करता?” “ तुम्हाला एक मोठा प्रसिद्धी-फलक दिला व त्यावर लिहिण्याचे स्वातंत्र्य दिले तर काय लिहाल?” ह्या आशयाचे व इतरही दुसरे काही प्रश्न त्याने विचारले आहेत.


सर्व प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत असे नाही. ज्या प्रश्नांची उत्तरे द्यावी वाटतील ती द्यावी हा खुलासाही त्याने केला होता.
सर्वांनी दिलेल्या सर्व उत्तरांचा परामर्श घेता येणे शक्य नाही. काही प्रश्न, त्यांची काही व्यक्तींनी दिलेली उत्तरे ह्यांचा उल्लेख करावा असे ठरवले आहे. बघू या , कितपत जमते ते.


स्टीव्हन प्रेसफिल्ड Steven Pressfield ह्याने लेखनाच्या- ‘जाहिराती, पटकथा, कथा-कादंबऱ्या ,ललितेतर , आणि प्रेरक पुस्तके – पंचक्रोशीत’ आपला चांगला ठसा उमटवला आहे.


त्याची The Legend of Bagger Vance ( ह्यावर ह्याच नावाचा पाहण्याजोगा उत्तम सिनेमाही निघाला आहे.ह् सिनेमात विल्स स्मिथ, मॅट डॅमन सारखे नामवंत नट आहेत.), Gates of Fire , The Virtues of War ही त्याची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. त्याच्या कथा पटकथा असलेले चित्रपट सांगायचे तर Above theLaw, King Kong Lives, Joshua Tree ( Army of One) ही काही नावे सांगता येतील. Pressfield त्याच्या आवडत्या पुस्तकाविषयी म्हणतो की,” त्याच्यावर खरा आणि अत्यंत प्रभाव पाडणारे पुस्तक फार जाडजूड आणि प्रचंड आहे. रक्तरंजित घडामोडींनी ते भरलेले आहे. पुस्तकाचे नाव “ Thucydides’s History of Peloponnesian War “ प्रेसफिल्ड पुढे सांगतो की स्वतः लेखकच पुस्तकाच्या सुरुवातीलाच वाचकांना सावध करतो “ गंमतीसाठी, करमणुक करणारे हे पुस्तक नाही.आणि वाचायलाही सोपे जाणारे नाही.” पण प्रेसफिल्ड सांगतो की पुस्तक कालातीत, त्रिकालाबाधित सत्यांनी भरलेले आहे. लोकशाहीतील सर्वांनी हे पुस्तक वाचायला हवे असेही तो आवर्जुन सांगतो. तोही म्हणतो की मनोरंजनासाठी हे पुस्तक नाही. पण उत्तुंग तितकेच सखोल वैचारिक असे काही वाचायचे असेल तर हे पुस्तक वाचायला हवे.


War of Art, A Man at Arms, Gates of Fire, Tides of War( अथेन्स आणि स्पार्टनस् मध्ये २७ वर्षे चाललेल्या युद्धाविषयी) ही त्याने लिहिलेली काही पुस्तके. त्याच्या बहुतेक पुस्तकांच्या नावात ‘युद्ध’ आहेच. युद्धाविषयी व त्या संकल्पनेविषयी त्याला आकर्षण दिसते!


Marie Forleo मरी फर्लियो ही सुरुवातीला “ रेस्टॅार्ंट, पब मध्ये ड्रिंक्स देणे, वेटर , जॅनिटर अशी कामे करत करत , नंतर व्यवसाय विद्येची पदवीधर झाली. तिने आपले on line बी- स्कूल सुरू केले. लघु उद्योग करू इच्छिणाऱ्या व लघु उद्योजक असलेल्यांनाही तिच्या बी- स्कूल मध्ये त्यासंबंधी मार्गदर्शन व शिक्षण दिले जाते. लघुउद्योग वाढवावा कसा ह्याचेही प्रशिक्षण तिच्या संस्थेत दिले जाते. १४८ देशातील ७०,००० लघु उद्योजक तिच्या बी- स्कूल मधून प्रशिक्षित होऊन उद्योग व्यवसायिक झाले आहेत.


मरी फर्लियो लेखिका आहेच त्या शिवाय ती हिप हॅाप नृत्यातही पारंगत आहे. MTV वर तिने बसविलेली बरीच नृत्ये सादर झाली आहेत. तिची स्वतःची मरी फर्लिओ इंटरनॅशनल कंपनीही आहे. १०० झपाट्याने उत्कर्ष होणाऱ्या कंपन्यांच्या यादीत तसेच आघाडीच्या पन्नास महिला उद्योजकांच्या कंपन्यातही तिच्या कंपन्यांचा समावेश आहे. हार्पर्स बझार मासिकाने तिचा “स्वतःच्या बळावर झालेली कोट्याधीश” असा उल्लेख केला आहे. फोर्ब्ज मासिकाने “ उद्योग-व्यावसायिकांसाठी असलेल्या सर्वोत्कृष्ठ १०० websites “मध्ये मरी फर्लियोच्या वेबसाईटची गणना केली आहे. आपण आताच ज्याच्या विषयी वाचले त्या स्टिव्ह प्रेसफिल्डचे “War of Art हे तिचे आवडते पुस्तक आहे . “ ती म्हणते, “हे पुस्तक वाचकाला आपल्या न्यूनगंडातून किंवा भयगंडातून बाहेर काढते. त्याच्यात आत्मविश्वास देणारे आणि वाढवणारे पुस्तक आहे.त्याच्या मनातली मरगळ दूर करणारे ते पुस्तक आहे.शिवाय पुस्तक कुठल्याही पानापासून वाचले तरी चालते.वाचकाला प्रत्येक पानातून उत्साहाची उभारी येते.”


कायल मेनर्ड जन्मापासून दोन्ही हातांनी आणि पायांनी अपंग आहे. हात कोपरापर्यंतही नव्हते. पायही अर्धेच होते. गुडघेही दिसू नयेत इतकेच. चौरंगी अपंग म्हणतात तसा तो आहे. तो कृत्रिम हात आणि पाय वापरत नाही. आहेत त्या हाता पायांनी तो सर्व व्यवहार, हालचाली करतो. इतकेच काय कुणाचीही मदत न घेता त्याने टॅन्झानियातील किलिमॅंन्जॅरो पर्वत आणि अर्जेन्टिनातील Aconcagua अकॅांनकाग्वा पर्वत तो चढून गेला आहे. ह्या ठिकाणी किलिमॅंन्जॅरो १९३४१ फूट तर अकॅांनकाग्वा हा २२८४१ फूट उंच आहे हे अवश्य लक्षात घ्यावे. खऱ्या अर्थाने कायल मेनर्ड स्वावलंबी आहे. तो म्हणतो ,” कुणाचीही मदत घ्यायची नाही हे मी आणि घरातल्या सगळ्यांनी पहिल्यापासून ठरवले होते .” त्याच्या आवडत्या पुस्तकाविषयी तो सांगतो ,” फ्रॅन्क ह्युबर्टचे Dune ; अल्बेर केम्यु Albert Camus चे The Stranger ( अल्बेर केम्यु किंवा जॅान पॅाल सार्ट्रा ह्यांची पुस्तके वाचणे आणि ती आवडणे हे विशेष वाचकांची ओळख मानली जाते- हे मेनर्ड म्हणत नाही😀.) ) आणि The Hero With a Thousand Faces हे जोसेफ कॅम्पबेलचे ही तीन पुस्तके माझ्या खास आवडीची आहेत.” Dunes च्या पुस्तकांची -बहुधा सहा- मालिकाच आहे. Dune,Dune Messiah, Children of Dune ,Heretics of Dune वगैरे. Dune चा सिनेमाही निघाला. पुस्तकांसारखा तोही गाजला. त्याने एक व्यायामशाळा काढली आहे. तिचे नाव वाचल्यावर खूष होऊन तुम्ही “ व्वा! व्वा!” म्हणाल. नाव आहे “ No Excuse” तुम्ही ‘वा वा’ का म्हणाला ते मलाही माहित आहे .


दोन्ही हातापायांनी अपंग असलेल्या कायल मेनर्ड कधीही कोणतीही सबब न सांगता तो स्वावलंबी राहिला!
गायक, गीतकार, गिटार वादक , नट आणि रेकॅार्डसचा निर्माता. अनेक प्रतिष्ठेची सन्मानाची पारितोषिके, पदके मिळवलेल्या आणि विविध रुपाने ख्यातनाम असलेल्या टिम मॅकग्राथ चे आवडते पुस्तक आहे -Jayber Crowe . वेन्डल बेरी लेखक आहे. “पुस्तक वाचल्यावर मनाला शांति लाभते. आपण शांत स्थिर होतो. पण त्याच बरोबर पुस्तक विचारही करायला लावते . जी श्रेष्ठ कलाकृती असते ती तुम्हाला अंतर्मुख करते. स्वतःचाही पुनर्विचार करायला लावते. आपण आपल्या विचारांचे,मग ते स्वतःविषयीचे, आपण प्राधान्य देत असलेल्या गोष्टींचे, आपल्या अवती भोवतीचे, आपलेच पुनर्मुल्यांकन करू लागलो तर ती श्रेष्ठ कलाकृती समजावी. असे करत नसू तर आपण एककल्ली, एकांगी बनत जाण्याची शक्यता असते; “ असे टिम मॅकग्रा ह्या पुस्तकाविषयी म्हणतो.


अमेरिकेतील आरंभीच्या काळातील अग्रेसर आंतरजाल कंपनी AOL चे संस्थापक स्टीव्ह केस ह्यांना आवडलेल्या पुस्तकाने तत्यांना ते कॅालेजमध्ये असल्यापासूनच भुरळ घातली होती. त्यावेळेपासूनच त्यांनी ह्याच क्षेत्रात उतरायचे ठरवले होते. ते म्हणतात,” ह्या पुस्तकाचा माझ्यावर एव्हढा प्रभाव होता की ह्या पुस्तकाचे नाव, मी काही वर्षानंतर लिहिलेल्या माझ्या पुस्तकासाठी वापरले !” त्यांच्यावर प्रभाव पाडणाऱ्या पुस्तकाते नाव आहे “ The Third Wave” . ह्या पुस्तकाचे लेखक आहेत अल्व्हिन टॅाफलर. “ ह्या पुस्तकातील ( जग जवळ आणणाऱ्या) Global Electronic Village विषयी वाचल्यामुळे मला AOL सुरू करण्याचा विचार आला. निश्चय झाला.लोक एकमेकांशी Digital माध्यमातून संबंध ठेवतील, संपर्कात राहतील ह्याची मला जाणीव झाली.” “अल्व्हिन टॅाफलरने शेतकी , औद्योगिक , आणि तंत्रज्ञान ह्या तीन क्षेत्रात होणाऱ्या क्रांती विषयी लिहिले. तेच नाव वापरून मी नंतरच्या काळात येणाऱ्या तंत्रज्ञानात होणाऱ्या तीन मोठ्या बदलांविषयी, तिसऱ्या लाटेसंबंधी पुस्तक लिहिले आणि मी त्याचे Third Wave : An Entrepreneur’s Vision of Future असे बारसे केले.”


जेसी विल्यमस हा टीव्ही वरील अतिशय लोकप्रिय मालिका Grey’S Anatomy मध्ये डॅा. जॅकसन एव्हरीची भूमिका करणारा नट; आणि The Butler, The Cabin in The woods आणि आणखीही काही सिनेमातील नट म्हणूनही ख्यात आहे. तो सामाजिक कार्यकर्ताही आहे. विशेषतः त्याच्या २०१६ सालच्या कृष्णवर्णीय लोकांवर आणि विशेषतः तरुणांवर राजकीय,सामाजिक दृष्ट्या होणाऱ्या अन्याय तसेच पोलिसी अत्याचारांसंबंधीच्या भाषणामुळे तो जगापुढे आला. त्याची आवडत्या पुस्तकांची नावे सांगायची तर — Confederacy of Dunces हे जॅान केनेडी टूलचे , टोनि मॅारिसनचे Song of Solomon , Black Folk हे W.E.B. DuBois चे आणि वाचकांपैकी अनेकांना माहित असलेले क्लासिक गणले जाईल असे Ayan Rand चे Fountainhead , हे पुस्तक.


माईक मेपल्स हा भांडवल गुंतवणुक करणारी कंपनी Floodgate चा सहसंस्थापक आहे . फोर्बसच्या परिसस्पर्श कंपन्यांच्या यादीत सतत १२ वर्षे ही कंपनी मानाने टिकून आहे.


मेपल्सवर प्रभाव टाकणारी बहुतेक पुस्तके नेतृत्वगुणांची वाढ कशी करावी, त्यासाठी रोजचे आयुष्य एखाद्या उद्दीष्टपूर्ती साठी तर असावेच, स्वतःला जे योग्य वाटेल ते – मग ते स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी किंवा जी कंपनी चालवतो किंवा नोकरी करतो- ते ते काम उत्कृष्ठच झाले पाहिजे ह्या भावनेने करावे. चित्रकला, गायन शिल्पकला, जाहिरात तयार करणे कोणतेही असो ते अशा उंचीवर न्यावे की ते करतांना आपल्यालाही आकाशात झेप घेऊन विहरणाऱ्या पक्षासारखा आनंद व स्वातंत्र्य लाभावे. अशी झेप प्रत्येकालाच घ्यावी वाटते. का वाटू नये? अशा किंवा ह्यासम विचारांची पुस्तके त्याला आवडतात असे वाटते. Top Five Regrets of Dying – हे Brownie Ware चे तसेच प्रेरणादायी पुस्तकांचे भीष्म समजले जाणारे Jonathan Livingstone Seagull हे रिचर्ड ब्राख चे आजही मागणी असलेले पुस्तक. हार्वर्ड बिझिनेस स्कूल च्या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना, लेखकाने स्वतः आयुष्य कसे व्यतित करावे ह्यावर विचार केला व ठरवले,त्या अनुभवावर आधारित भाषण दिले. त्याचे नंतर त्यानते पुस्तक झाले. तेच हे हार्वर्डचा प्राध्यापक Clayton Christensen चे पुस्तक How will You Measure Your Life .


पुस्तकांचा प्रभाव, परिणाम किती होतो ह्याचे मोजमाप करणे अवघड आहे. ह्या पुस्तकांत सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शंभर सव्वाशे नामवंतांच्या लेखी मुलाखती आहेत. किती पुस्तके, किती नावे,किती लेखक आपल्या समोर येतील ! . त्यांना आवडलेली सर्व पुस्तके आपणा सगळ्यांना आवडतील असे मुळीच नाही. आपले ते आवडीचे विषयही नसतील. त्यातील विषयांशी बऱ्याच वाचकांचा संबंधही येत नसेल. तरीही निदान ही मोठी माणसे काय वाचतात; काही नाही तरी पुस्तकांची व लेखकांची थोडी माहिती होईल. काही पुस्तकांची नावे समोर आल्यावर ,” अरे! ही पुस्तके मी सुद्धा वाचली आहे!” त्या क्षणापुरते तरी आपण नामवंतांच्या पंक्तीत जातो. ह्याचेही एक वेगळेच समाधान असते.


नंतर, माझ्या हातून लिहिले गेलेच, तर टिमोथी फेरिसने प्रसिद्ध व्यक्तींना विचारलेल्या इतर काही प्रश्नांना त्यांचा प्रतिसाद पाहू या.

इच्छाकांक्षाची बदलती क्षितिजे

मॅरिएटा

Laughter is timeless Imagination is ageless Dreams are forever. -Walt Disney


माझ्या इच्छांची सुरुवात केव्हा व कशापासून झाली ते सांगता येणार नाही. पण…..


आमच्या शाळेत इतर सर्व शाळेप्रमाणे काही चांगले व काही मारकुटे मास्तर होते. दोन्ही प्रकारचे मास्तर पाहून – खरं सांगायचं तर मारकुटे मास्तर पाहून– ‘मी मास्तर होणार असे ठरवले. सडपातळ असूनही मास्तर म्हटले की मुलांना बदडता येते. छडी नसली तर फुटपट्टीने मारताही येते हे लक्षात आल्यामुळे मास्तर होण्य्याच्या इच्छेला महत्वाकांक्षेचे रूप येऊ लागले. बहुधा इथपासूनच माझ्या इच्छाकांक्षेची थैली भरायला सुरुवात झाली असावी.


पण हे काही महिने टिकले असेल. कारण ….


आमच्या घराससमोरच पोलिस लाईन होती. त्यामुळे दिवसातून बरेच वेळा पोलिसांची ये जा चालूच असे. त्यांचा खळीचा खाकी ड्रेस, बिल्ल्याचे बकल पासून , पॅालिशने कमरेचा पट्टा, डोक्यावरची निळी व तिच्या बाजूने गेलेली पिवळ्या पट्टीची लकेर , साखळीला अडकवलेली पितळी शिट्टी आणि पायातल्या जाड जूड चपल किंवा बुटापर्यंत सर्व काही चकाचक इतमाम पाहून मलाच काय आमच्या वर्गातल्या सर्वच मुलांची पोलिस व्हावे ती इच्छाकांक्षा होती. ह्यातली मोठी गंमत अशी की चोर-शिपायाचा खेळ खेळताना मात्र मी आणि सर्व मुलं चोर होण्यासाठी धडपडत असू !


घरी कोणी बाहेरचे आले व मुलांशी काय बोलायचे असा नेहमीच प्रश्न पडलेल्या पाहुण्यांनी, “ बाळ ! – बहुतेक सर्व पाहुणे लहान मुलांना ह्या एकाच नावाने ओळखत – तू मोठा झाल्यावर कोण होणार “ असे विचारल्यावर, मी अटेंन्शन पवित्र्यात छाती पुढे काढून उभा राहात असे. पाहुण्यांकडे न पाहता सरळ भिंतीकडे पाहात “ मी पोलिस होणार” असे मोठ्या आवाजात उत्तर देत असे.


मागे एकदा आलेल्या ह्याच पाहुण्यांना “ मी मास्तर होणार” असे सांगितले असणार. पाहुण्यांची स्मरणशक्ती चांगली असावी . “ मी पोलिस होणार “ हे ऐकून त्यांनी हसत विचारले,” बाळ तू तर मागच्या खेपेला मास्तर होणार म्हणाला होतास. त्याचे काय झाले? ” मी म्हणालो, “आता उन्हाळ्याची भरपूर सुट्टी आहे. .” हे ऐकून पाहुणे मोठ्याने हसले. पण गोष्टींतील पाहुण्यांप्रमाणे त्यांनी बक्षिस दिले नाही.


पोलिस व्हायचे तर सराव म्हणून, येणाऱ्या जाणाऱ्या पोलिसांना मी पवित्र्यात उभा राहून ,” पोलिस सलाम” म्हणत सलाम ठोकत असे. गंमत बघा, ‘मोठेपणी पोलिस होणार’ म्हणणारा मी आणि माझ्याबरोबरीची मुले, चोर-शिपाई खेळताना मात्रअगदी खटपट करून चोर होत असू!


पोलिसही काही महिनेच इच्छाकांक्षेच्या “चौकीच्या खजिन्यात” होते. कारणही तसेच घडले. सुट्टीत आलेल्या मावशीला व भावाबहिणीला पोचवायला स्टेशनवर गेलो होतो. गाडी यायला अजून थोडा अवकाश होता. फलाटावरची निरनिराळ्या लोकांची गडबड पाहात मी व भाऊ फिरत होतो. किती प्रवासी! त्यांना सोडायला आलेले, चहाच्या स्टॅाल पाशी असलेले. प्रत्येक खांबा वरची जाहिरात वाचून पाहात फिरत होतो. हे पाहणे संपेपर्यंत गाडी येण्याची घंटा झाली. धडधड करत येणारी गाडी इंजिनाच्या दिव्यामुळे दिसत नसे. पण वेग कमी करत फलाटात शिरु लागली; इंजिनाच्या दरवाजात दांडीला धरून पिकॅप घातलेला ड्रायव्हर दिसला की त्याची ऐट अधिकार पाहून ठरवले की आपण इंजिन ड्रायव्हरच व्हायचे. त्याने इंजिनाची शिट्टी वाजवली की फलाटावर रेंगाळणारे सगळे प्रवासी डब्यात जाऊन बसतात हे पाहिल्यावर त्याच्या अधिकाराची व मोठेपणाची खात्रीच पटायची. आगगाडीचा इंजिन ड्रायव्हरच व्हायचे. नक्की झाले.


इच्छाआकांक्षेचे इंजिन चालूच होते. ते दिवस दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीच्या वर्षादोन वर्षांचे असतील. आमच्या पाच नंबर शाळे समोरच्या.रस्त्यावरून मिलिटरीचे रणगाडे मोटारी जात. ते पाहात बराच वेळ ऊभे राहात असू. मोटारीच्या मागच्या बाजूला उभे असलेले किंवा रणगाड्याच्या टपातून बाहेर पाहणारा लालबुंद टॅामी आणि आपले सैनिक दिसले की ओळीत उभे असलेले सगळी पोरं त्यांना कडक सलाम ठोकत असू. लालगोरा टॅामी आमच्याकडे हसत पाहून हात हलवत. ते पाहून आम्हा सर्वांची मान ताठ होत असे. मास्तर, पोलिस, इंजिन ड्रायव्हर मागे पडले. ठरले ! मी सैनिक होणार. युद्धात लढणार. रणगाड्याच्या टपातून शत्रूवर पाळत ठेवून, धडाऽऽडधूम्मऽ तोफा उडवणार. बंदुक घेऊन पुढे सरकतो आहे हीच स्वप्ने पडू लागली. चला ! चला, थैलीत नवी भर पडली. ……


गावात सर्कस आली. शाळकरी मुलांत उत्साह आला. सर्कसचा अवाढव्य तंबू बांधायला सुरुवात झाली. त्या दिवसापासून सर्कशीच्या मैदानावर आम्ही दोस्त मंडळी रोज मैदानात जात असू. (अवाढव्य तंबू, त्याचे तितकेच जाड दोर. ते ताणत चारी दिशेने कामगार मोठ्याने होईऽऽ य्या खैचो हुईंऽऽय्या खैंचो ओरडून जोश भरत मागे मागे जाऊ लागले. त्याच बरोबर मधले दोन मोठे खांब बरेच कामगार एकाच वेळी वरती नेत उभे करू लागले. जसे जसे दोर ओढले जात आणि ते दोन खांब सरळ ताठ होत गेले तेव्हा तंबूचे जाड जूड कापड फुगत फुगत आकाशभर पसरले) सर्कशीचा शिकारखाना पाहायला फार थोडे पैसे पडत. त्यामुळे सकाळी बरीच मुले वाघ सिंह, उत्तम घोडे, प्रचंड हत्ती पाहायला जात. सर्कशीतील खेळाडूंच्या वेगवेळ्या कसरती पाहताना , जोकरच्या गंमती पाहून हसताना,सर्कसचा खेळ संपू नये असे वाटायचे. सर्कसच्या बॅन्डमुळे तर ह्या आनंदाला आणखी बहर येई!


सर्कसचा बॅन्ड सुरु झाला. दोरीच्या शिडीवरून सरसर चढत कसरतपटू सर्कसच्या छता पासून लोंबते झोके पाच सहा वेळा हलवत. मग एका क्षणी ते पकडून त्यावरून झोके घेत घेत दोन्ही बाजूचे कसरतपटू मध्यभागी जवळ येत. त्याच क्षणी ‘हाय हुपला’म्हणत टाळी वाजवून आपला झोका सोडून दुसऱ्याचा पकडत. आणि नेमक्या त्याच क्षणी बॅन्डची मोठी झांज दणक्यात वादायची. ह्यावेळी प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके थांबत. आमची छाती धडधडत असे. तरीही बॅन्डच्या ठोक्या क्षणी तंबूत टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. कसरतपटू आपला खेळ झाल्यावर खालच्या जाळ्यांत उलट्या सुलट्या कोलांट्या घेत रडत. क्षणार्धात मांजराीसारखे पायावर उभे राहत. पन्हा टाळ्या!


जोकरही हसवून सोडत. त्यांना कसे विसरू? आम्ही किती वेळ श्वास रोखून सर्कस पाहात होतो. तुमच्या लक्षात आले असेलच की मोठा झाल्यावर मी कोण होणार ते!


सिनेमाच्या पडद्यावरची गंमत पाहात असतानाच पाठीमागून येणाऱ्या प्रकाश झोताकडेही लक्ष जायचेच. प्रकाशाचे झोत पडद्यावरील माणसांना हातवारे करायला लावतात.पळायला लावते , गाणे म्हणायला लावतात.नाचायला, हसायला लावतात. प्रकाश झोत खाली वर एका बाजूला, दोन्ही बाजूला हलत उडत असताना सिनेमा दिसत असे. कोण हे करत असेल? हा प्रश्न पडायचा. मध्यंतरात उभा राहून पाठीमागे असलेल्या त्या चार सहा अगदी लहान जादुई चौकोन खिडक्यांकडे पाहात असे. ह्यातील रहस्य शोधलेच पाहिजे.


एके दिवशी तो रहस्यभेद झाला. त्या दिवसांत सिनेमा चालू असताना थिएटरची फाटके बंद करत नसत. एकदा सहज पुढच्या सिनेमाची पोस्टर्स फोटो पहायला चित्रा टॅाकीजमध्ये गेलो होतो. आणि ती रहस्यमय खोली दिसली !
दोन मोठी मशिन्स होती. मशीनच्या पाठीच्या उंचवट्यांवर फिल्म गुंडाळलेले मोठे रीळ होते. एक माणूस कधी दुसऱ्या खिडकीतून पडद्याकडे पाही. मशिनच्या काही खटक्यांची, बटनांची हालचाल करे. दोन पायऱ्या खाली उतरून एका टेबलावर एक रिकामे मोठे रीळ व दुसरे भरलेले रीळ होते. तो एक बटण दाबून ती रिळे चालू करी. भरलेले रिळ दुसरे रिकामे रीळ भरून टाके. पटकन ते रिळ घेऊन एका मऱ्शिनच्या रिकाम्या उंचवट्यावर खटकन बसवे. मग दुसऱ्या मशिनच्या लहान खिडकीतून सिनेमा पाहात आरामात बसे.


अरे! पडद्यावरील माणसांना खेळवणारा हा जादुगार ! इतका मोठा महत्वाचा माणूस किती साधा! त्याला ॲापरेटर म्हणतात हे वरच्या वर्गातील मुलांनी सांगून माझ्या ज्ञानात भर घातली. केव्हढी मोठी जबाबदारी तो पेलत होता ! उगीच नाही त्याला रोज सिनेमा पाहायला मिळत! तेही फुकटात. मला त्याचा का हेवा वाटू नये? त्या क्षणी माझ्या आकांक्षेतील मागील पानावरच्या सर्व इच्छा पुसल्या गेल्या. दुसरे काही ठरवण्यासारखे, होण्यासारखे नव्हतेच. माझ्या आकांक्षे पुढे गगनही ठेंगणे झाले होते. मोठा झाल्यावर सिनेमाचा ॲापरेटर मी होणार ! मी नसलो तर लोकांना सिनेमा कसा दिसणार?


माझ्या माझ्या इच्छकांक्षेच्या थैलीत सिनेमाचा ॲापरेटर जाऊन बसला!


जादू कोणत्या लहान मुलाला आवडत नाही? शाळेत जादूचे प्रयोग झाले. प्रत्येक जादू आश्चर्याने तोंडात बोट घालूनच पाहात होतो. मग काय जादूशिवाय दुसरे काही सुचेना. नंतर कुणी वडीलधाऱ्या माणसाने सांगितले की जादू म्हणजे ‘हात की सफाई’ , हातचलाखी असते. कोणत्याही चलाखीशी माझा कधी संबंध आला नव्हता त्यामुळे आणि त्यासाठी रोज सराव करावा लागतो हे समजल्यावर, जादुगाराचे स्वप्न माझ्या थैलीतून कधी खाली पडले ते समजलेही नाही.

सर्वजण लहानपणापासून क्रिकेट खेळतात. मी व माझ्या बरोबरीची मुले जे काही हाताला बॅट सारखे मिळेल आणि चेंडूसारखे दिसेल त्यानिशी क्रिकेट खेळत असू. आमचे क्रिकेट गल्ली बोळात, किंवा कुणाच्या घराच्या अंणात चाले. जेव्हा पार्कवर मोठ्या संघांचे सामने पाहायला जात असे तेव्हा पांढरे शुभ्र सदरे आणि विजारी , कुणाच्या टीमची तांबडी,निळी,किंवा हिरव्या रंगाची काऊंटी कॅप पाहिल्यावर आणि फलंदाज जेव्हा पायाला पॅडस् बांधून,हातातले ग्लोव्हज् घालत, चहूबाजूला पाहात रुबाबात येई तेव्हा; आणि जर पहिल्याच बॅालला बॅाऊन्ड्री मारली किंवा त्याची दांडी उडाली तर दोन्ही वेळा टाळ्या वाजवतानाच मोठेपणी काय व्हायचे ते निश्चित झाले.


उत्तम क्रिकेटपटूच व्हायचे. मग आपण पार्क मैदानावरील मध्यवर्ती पिचच्या मॅटवर बॅटिंग करू, किंवा गोलंदाजीही करत हॅटट्रिकही करू अशी स्वप्ने पाहायला लागलो. तशी [शेखमहंमदी] स्वप्नेही पडू लागली.प्रत्येक मॅचमध्ये माझे शतक झळकू लागले. विकेटसही घेऊ लागलो. आकांक्षा रंगीत होण्यासाठी स्वप्नाइतकी दुसरी अदभूत दुनिया नाही !
इच्छाकांक्षेच्या थैलीत मी पहिल्या दर्जाचा क्रिकेटर होऊनही गेलो.


हायस्कूलच्या टीममध्ये मला घेतले नाही. निवड करणारे सर चांगले होते. त्यांनी तीन चार वेळा संधी दिली. एकाही संधीचे मी सोने करू शकलो नाही. सोन्याचे लोखंड करणारा परिस ठरलो मी.


कॅालेजमध्ये मात्र तिसऱ्या चौथ्या वर्षी क्रिकेट टीममध्ये मी होतो. आंतरमहाविद्यालयीन सामन्यातील पहिले तीन चार सामने संघातून रीतसर खेळाडू ह्या दर्जाने खेळलो. पण हे सोडल्यास नंतरच्या सामन्यात नेहमी राखीव खेळाडूची सन्माननीय लोकलमधली चौथी सीटच मिळायची !


काही असो, कॅालेजच्या टीममध्ये होतो, त्यामुळे पार्क मैदानातील मुख्य खेळपट्टीवर खेळायला मिळाले.लहानपणी पार्कवर होणारे सामने पाहूनच क्रिकेटर होण्याची तीव्र इच्छा कॅालेजमध्ये पुरी झाली.


हायस्कूलच्या अखेरच्या दोन वर्षांपासून आणि त्यानंतर पुढेही किती तरी वर्षे सिनेमातला हिरो होण्याचे मनांत होते. हिरो होण्याचे स्वप्न, किंचित का होईना,नंतर काही वर्षांनी पुरे झाले असे म्हणता येईल.


प्रथा-परंपरेतील ‘कॅालेज संपल्यावर नोकरी ‘ हे सरळ साधे वाक्य नियम – सायन्समध्ये ज्याला लॅा म्हणतात- आहे. तो नियम माझ्याकडून पाळला गेला.

नोकरीच्या गावातील जिमखान्याच्या दोन तीन नाटकात नायकाची भूमिका मिळाली. पण गंमत अशी की नाटके नायिका प्रधान होती. त्यामुळे खमंग,तिखट, चिमटे काढणारे उपहासात्मक, टाळ्या घेणारे संवाद तिच्या वाट्याला. आणि मी सतत बचावात्मक बोलणारा ! नायक!


संवाद किंवा रंगमंचावर नाट्यपूर्ण प्रवेश -(एन्ट्री)- नसली तरी आता हिरो म्हटल्यावर नायिकेच्या जवळ जाणे, तितक्याच जवळकीने तिच्याशी बोलणे ह्याला वाव नाटककाराने दिला होता. पण त्या वेळी सरकारी वटहुकुम नसतानाही दिग्दर्शकाने आम्हा दोघांना ‘सोशल डिस्टन्स’ पाळायला लावले होते! हिरोसाठी किंवा नायिकेसाठी असलेले कोणतेही सवलतीचे हक्क नव्हते ! त्यामुळे माझ्यासाठी ती नाटके म्हणजे पोथीचे पारायण झाले!
काही का असेना नंतर दोन एकांकिका केल्या. त्यातही नायक होतो. एकांकिका विनोदी होत्या. त्यात बऱ्यापैकी चमकलो. पण त्यामध्ये नायिका नव्हती!


रंगमंचावर आलो. वावरलो. पडदा पडल्यावर का होईना टाळ्या मिळाल्या. तोही प्रथेचा भाग होता हे उशीरा लक्षात येत असे. . इतके असूनही नाटकात काम करण्याचा, प्रेक्षक आपल्याकडे पाहताहेत, बाहेर ओळख देतात ह्याचा आनंद लुटला.
लहानपणी, शाळा कॅालेजात असताना, नंतर नोकरी, व्यवसायाच्या काळातही अशा इच्छा आकांक्षा सर्वांच्या असतात. त्यातील अनेकांच्या काही इच्छा आकांक्षा पूर्णही होत असतील.


वयानुसार बदलत जाणारी ही स्वप्ने गोष्टीतील शेखमहंमदच्या हवेतील मनोऱ्यांप्रमाणे असतात. वयाचा तो तो काळ सोनेरी करत असतात. अलिबाबा सारखे, त्या प्रचंड गुहेपाशी जाऊन ‘तिळा दार उघड’ म्हटल्यावर प्रचंड आवाज करीत उघडणारी ती शिळा, गुहा, त्यातला खजिना वगैरे रोमांचक, रंजक गोष्ट ऐकल्यावर किंवा कथेवरचे सिनेमे पाहिल्यावर कोणाला अलिबाबा व्हावेसे वाटणार नाही?


मला आणि दोस्तांना मारुती व्हावेसे वाटे. राम किंवा लव-कुशा सारखी बाणांतून अग्नी अस्त्र, त्याला उत्तर म्हणून पाण्याचा वर्षाव करणारे वरुणास्त्र तर त्यालाही प्रत्युत्तर वायु अस्त्र सोडावे अशी इच्छा आकांक्षाच नव्हे तर ती झाडाच्या फांदीचे किंवा बांबूच्या कांडीचे धनुष्य व खराट्याच्या काडीचे बाण करून खेळत प्रत्यक्षात आणत असू. फरक इतकाच की फक्त अस्त्रांची नावे मोठ्याने म्हणत आवेशाने बाण सोडत असू. आजही मुलांना सुपरमॅन स्पायडरमॅन व्हावे असे वाटत असणारच.


स्टंटपट पाहताना त्यातील धडाकेबाज ‘ काम करनार’ जॅान कॅावस व्हावे असे वाटायचे. त्यानंतर राजकपूर देव आनंद दिलीप कुमार आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या सौदर्यवतींना पाहून हिरो व्हावे असे वाटणे ओघानेच आले. ‘गन्स ॲाफ नव्हरोन’, ग्रेट इस्केप, ‘पॅटन’ असे इंग्रजी सिनेमा पाहून वैमानिक, शूर योद्धा व्हावे असे का वाटणार नाही. प्रत्येकात अशा प्रकट म्हणा, सुप्त म्हणा इच्छाकांक्षेची स्वप्ने असतातच….. …. एका उत्तम कवींची इच्छाकांक्षा म्हणते ‘वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे ‘ ! तर कविश्रेष्ठांच्या प्रतिभेतील, रामाला पाहण्यासाठी आतुर झालेली सीताही आपली इच्छाकांक्षा, “ मनोरथा चल त्या नगरीला। भूलोकीच्या अमरावतीला“ ह्या ओळीतून व्यक्त करते! मग लहानपणी सर्वांनाच मोठेपणी आपण कोणी ना कोणी व्हावे असे वाटते ह्यात काहीच आश्चर्य नाही ….. …… त्याशिवाय का जेम्स थर्बर ह्या प्रख्यात लेखकाचा ‘वॅाल्टर मिट्टी’ वाचला किंवा त्याच कथेचा झालेला सिनेमा (प्र.भूमिकेत डॅनी के) पाहिल्यावर; त्याचा ‘ सब कुछ पु. ल. देशपांडे’ अशी सार्थ जाहिरात केलेला, पुलंनी केलेल्या अस्सल मराठी रुपांतरातील ‘गुळाचा गणपती’ (त्यातील मुख्य भूमिका नारबा-पुल.) पाहिल्यावर, स्वप्नाळू डॅा.वॅाल्टर मिटी किंवा पुलंचा नारबा ही सर्व थोर माणसेही आपल्याच कुळातली आहेत हे समजले तेव्हा किती आनंद होतो! आपणही त्यांच्या इतके मोठे होतो !


पन्नाशी आणि त्यापुढील वाटचालीत, बदलत्या काळामुळे, करीत असलेल्या व्यवसायात, लहान मोठ्या व्यापारात टिकून राहणे, नोकरीत बढती मिळवणे, किंवा आतापर्यंत करीत असलेले काम सोडून निराळेच काही करण्याचा प्रसंग आला तर त्यासाठी करावा लागणारा खटाटोप महत्वाकांक्षेचे रूप घेतो. नवे ज्ञान, नवे तंत्र, नवे मंत्र, नवा कॅम्प्युटर आत्मसात करण्यासाठी ‘हा सर्टिफिकेटचा’, ‘त्या डिप्लोमाचा’ अभ्यास करणे; त्यासाठी क्लासेस लावणे; पास झालेच पाहिजे ही सुद्धा हळू हळू महत्वाकांक्षा होत जाते. आजचा कॅाम्प्युटर शिक्षित होण्याची महत्वाकांक्षा धरून आपली योग्यता आणि आवश्यकता वाढवू लागतो. दृढनिश्चयाला तीव्र इच्छेची जोड देऊन त्याला ध्येय गाठल्याचे समाधान मिळते. काळानुरुप बदलले पाहिजे हे समजल्यावर स्पर्धेत टिकून राहण्यापासून ते अव्वल नंबर गाठण्या पर्यंत महत्वकांक्षेची दालने विस्तारत जातात.


मोठे झाल्यावर आपल्याला “ मी हा होणार,तो होणार, ते करणार” ह्या लहानपणाच्या इच्छा फुलपाखरी स्वप्ने वाटू लागतात. जगाच्या व्यावहारिक स्पर्धेत टिकून राहणे किंवा असलेल्या स्थानावर पाय रोवून उभे राहणेहीच एक महत्वाकांक्षा बनते. येव्हढ्यासाठीच लुई कॅरोल म्हणतो : Remember we have to run fast to stay where we are. असे जरी असले तरीही बालपणीची, तारुण्यातली स्वप्ने ही महत्वाकांक्षेची बाळरुपेच असतात. इच्छाकांक्षा बदलत गेल्या तरी कित्येकांची स्वप्ने, त्यांनी त्यात रस घेऊन ‘आवडीचे काम’ ह्या भावनेने केलेल्या सतत प्रयत्नांमुळे ती प्रत्यक्षांत येतात !


केवळ बहिणीचे बूट आपल्या हातून हरवले ह्याची फक्त खंत न बाळगता निरनिराळे मार्ग शोधत, काही झाले तरी बहिणीला मी बूट देणारच ह्या तीव्र इच्छेपोटी, तो शाळकरी भाऊ किती धडपतो ह्याचे उत्तम चित्रण Children of Heaven ह्या अप्रतिम इराणी चित्रपटात रंगवले आहे. ते पाहण्यासारखेआहे.


आंतर शालेय स्पर्धेत भाऊ धावण्याच्या शर्यतीत भाग घेतो. कारण? तिसऱ्या नंबर येणाऱ्याला बुटाचा जोड बक्षिस मिळणार असतो. भाऊ तिसरा नंबरच मिळवायचा ह्या जिद्दीने शर्यतीत पळतो. विजयी क्रमांकाची नावे जाहीर होतात. तिसऱ्या क्रमांकावर दुसराच आलेला असतो. निकाल जाहीर झाल्यावर त्याची शाळा मैदान डोक्यावर घेते. भाऊ पहिल्या क्रमांकाने विजयी झाला असतो. पण भाऊ खिन्न, निराश होऊन घरी येतो. बहिण वाट पाहात असते. पण ऱ्भावाचा चेहरा पाहिल्यावर तीही काही बोलत नाही.


पहिला क्रमांक पटकावूनही बहिणीला बूट देऊ शकलो नाही हीच खंत. भावाने उच्च यश मिळवूनही त्याला इच्छा पूर्तीचा आनंद नाही! पण नंतर दोघानांही बूट मिळतात हे पाहून प्रेक्षकांना खूप आनंद होतो. इच्छाकांक्षेची झालेली महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ते भाऊ बहिण किती कष्ट सोसतात ते पाहिल्यावर आपणही मनात त्यांना यश मिळो हीच प्रार्थना करत राहतो.


इच्छाकांक्षा माणसाला काय असावे, काय व्हावे,हे सांगत असतात. आणि तो त्यात स्वत:ला पाहू लागतो. त्याला आपण जो व्हावे असे वाटत असते तसे आपण झालोच आहोत ह्या कल्पनेत तो वावरत असतो. महत्वाकांक्षा, ती पूर्ण होण्यासाठी माणसाला सर्व ते प्रयत्न करण्याची उर्मी उर्जा व प्रेरणा देत असते. एक प्रकारे ते त्याचे ध्येय होते. ते गाठण्यासाठी ध्यास घेऊन ते गाठतोच. सुरुवातीला स्वप्न असले तरी ते प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो.

आतापर्यंतच्या वाटचालीत, रोज बदलणाऱ्या आणि न गवसणाऱ्या इच्छा आकाक्षांची क्षितीजे लांबून का असेना पण मी सुद्धा पाहिली. ह्यापेक्षा दुसरे मोठे समाधान ते काय?


नाही क्षितिज गवसले पण वाटचाल कशी सोनेरी स्वप्नांची झाली.


मुक्कामाला पोचण्याच्या आनंदापेक्षा, झालेला प्रवास हा नेहमीच रोमांचक असतो !

जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे

स्वातंत्र्यवीर सावरकर हे कवि लेखक साहित्यिक होते. विज्ञानवादी होते. उत्कृष्ट वक्ते होते.मात्र लोकांच्या मनांत ते जाज्वल्य देशभक्त रुपानेच विराजमान आहेत. मराठी वाचकांना सावरकरांची ‘ ने मजसी ने परत मातृभुमीला। सागरा प्राण तळमळला” ही कविता माहित आहे. ह्याचे कारण ती शाळेच्या क्रमिक पुस्तकातही होती. त्यांची


जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वंदे


ही देशाला स्वातंत्र्य मिळावे ह्या तळमळीतून स्वतंत्रतेलाच दैवी रूप देऊन तिची स्तुति गाणारी कविता आहे. बहुधा १९५९-६० साली ही कविता आकाशवाणीचे संगीतकार मधुकर गोळवलकर ह्यांनी ‘महिन्याचे गीत’ ह्या कार्यक्रमातून सादर केली. तेव्हापासून वीर सावरकरांची ही कविता प्रकाशात आली. त्यामुळे ती हजारो लोकांपर्यंत पोचली.अलिकडच्या शालेय पुस्तकात ही कविता घेतली आहे.


कवितेची सुरुवात ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वंदे।। ह्या संस्कृत श्लोकाने होते. सावरकरांनी बाजी प्रभु देशपांडे ह्या पराक्रमी वीराच्या पोवाड्याची सुरुवातही ह्याच श्लोकाने केली आहे.


स्वातंत्र्य, स्वतंत्रता ह्या अमूर्त संकल्पनेला त्यांनी मूर्त स्वरूप दिले. आपला देश परकीयांच्या ताब्यात आहे. परके लोक आपल्यावर राज्य करतात. त्यांच्या गुलामगिरीतून सुटका व्हावी; स्वातंत्र्यासाठी चाललेल्या लढ्यात यश मिळावे ह्यासाठी स्वतंत्रतेलाच देवी मानून कवि तिची स्तुति करतो. स्वराज्यदेवतेचे हे स्तोत्र देशभक्त कवि गात आहे.


प्रारंभीच्या श्लोकात स्वातंत्र्यदेवीचे वर्णन करताना, कवि म्हणतो,” हे महान मंगलकारी,पवित्र, आणि सर्वांचे कल्याण करणाऱ्या आणि आम्हाला यश मिळवून देणाऱ्या स्वतंत्रते भगवतिदेवी तुझा जयजयकार असो. स्वातंत्र्याची देवी भगवति, तू राष्ट्राचे मुर्तिमंत चैतन्य आहेस.तेच स्वातंत्र्य्याचे चैतन्य आमच्यातही सळसळते राहो. सर्व सदगुण आणि नीतिमत्ता तुझ्यात एकवटली असल्यामुळे तू त्यांची सम्राज्ञी आहेस. पारतंत्र्याच्या काळोख्या अंधाऱ्या रा्त्री आकाशात तू तेजस्वी ताऱ्याप्रमाणे लखलखत आहेस.


अथवा (भगवति ! स्वातंत्र्याचा तेजस्वी तारा पारतंत्र्याचा काळोख दूर करो. किंवा तुझा लखलखता तारा चमकू लागला की देशावर पसरलेला गुलामीचा अंधार नाहीसा होईल.)


पुढे नाजुक शब्दांचा सुंदर खेळ करीत कवि स्वातंत्रयदेवीचा गौरव करताना म्हणतो, फुलांचे सौदर्य आणि कोमलता तूच आहेसआणि सूर्याचे तेज आणि समुद्राची गंभीरताही तूच आहेस. त्या पुढच्या ‘अन्यथा ग्रहण नष्ट तेचि’ ह्या शब्दांतून ते स्वातंत्र्याचे सामर्थ्य व महत्व स्पष्ट करताना म्हणतात तू नसताीस तर (पारतंत्र्याच्या) ग्रहणाने ते सौदर्य, तेज आणि सखोल गंभीरता सर्व फिके पडले असते.


विद्वान योगी मुनी ज्याला मुक्ति मोक्ष श्रेष्ठ परब्रम्ह म्हणतात तीही, हे स्वतंत्रते, तुझीच रूपे आहेत. जे काही सर्वश्रेष्ठ, उदार थोर आणि सर्वोच्च आहे ते सर्व तुझे साथी सोबती आहेत. (तेही नेहमी तुझ्या बरोबरच असतात.)


शत्रंचा संहार करताना, त्याच्या रक्ताने रंगलेल्या चेहऱ्याने अधिकच सुशोभित दिसणाऱ्या स्वातंत्र्यदेवते, सर्व चांगले सज्जन लोक तुझीच पूजा करतात; तुझ्यासाठी लढता लढता आलेले मरण हेच खरे जगणे; जन्माला आल्याचे ते सार्थक आहे. हे स्वतंत्रते तू नसलीस ( देश स्वतंत्र नसला तर) तर ते कसले जिणे? ते मरणाहून मरणे होय ! स्वातंत्र्य हेच जीवन, पारतंत्र्य हेच मरण! निर्माण झालेले सर्व काही, सकल प्राणीमात्र तुलाच शरण येते. ह्या भावनेतूनच कवि तळमळीने विचारतो,”तू आमच्या देशाला कधी जवळ करशील? आम्हा देशवासीयांना हे स्वतंत्रते, ममतेने कधी हृदयाशी धरशील? “
पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकलेल्या हिमालयाच्या मोहातून शंकरही सुटला नाही. हिमालयाला त्याने आपले घरच मानले. मग तू इथे का रमत नाहीस? अप्सराही इथल्याच गंगेच्या, चंद्रप्रकाशा सारख्या रुपेरी पाण्याच्या आरशात पाहून स्वत:ला नीट नेटके करतात.मग स्वातंत्र्यदेवी तुला आमच्या देशात का करमत नाही? आमच्या देशाचा तू का त्याग केलास? पाहिजे असेल तर तुझ्या वेणीत घालायला तुला इथे रोज ‘कोहिनूर’ चे ताजे फुलही आहे. ह्या सुवर्णभूमीत तुला कशाचीही कमतरता पडणार नाही.


आमची भारतमाता सर्व समृद्धीने भरली असता,तू तिला का दूर लोटलेस? कुठे गेली तुझी पुर्वीची माया ममता ? तू तिला परक्यांची दासी केलेस. माझा जीव तळमळतो आहे. यशाने युक्त असलेल्या स्वातंत्र्यदेवते! तुला वंदन करून मी हेच विचारतो की तू आमचा त्याग का केलास? आमच्या देशाला तुझ्यापासून का दूर लोटलेस? हे स्वतंत्रते! ह्याचे उत्तर दे.