Monthly Archives: April 2005

गरीब बिचारा मारुती – एक उपेक्षित दैवत

आज हनुमान जयंती. मारुतीचा जन्म झाला तो साजरा करण्याचा दिवस. त्यामुळेच वर उजव्या कोपऱ्यात शब्दांचे भु:भुत्कार उमटले असावेत.

खरं तर मारुतीचा म्हणून वर्णिलेला एकही गुण अंगात नाही. त्याच्यासारखे दणकट शरीर नाही की ताकद नाही. त्याची चपळाई नाही की त्याच्या उंच उड्डाणाची, शारीरिक सोडा मानसिक ’झेप’ही नाही. फार तर ’झोपावे उत्तरेकडे’ इतकेच बिनघोर जमते मला! मारुतीशी कसलेही साम्य नाही, तुळणा नाही. पण इतके सणवार, जयंत्या उत्सव येतात. अगदी वाजत गाजत येतात, गर्जत जातात. मग आजच मारुती जन्माची–हनुमान जयंतीचे मला इतके अप्रूप का वाटावे? आठवण का व्हावी?

तशी काही कारणे सांगता येणार नाहीत.सांगता येतीलही. (ही अशी कायमची द्विधा अवस्था; जन्मभराची!) हो आणि नाही दोन्ही एकदमच. असो.

लहानपणी दोन तीन वर्षं मी, मी आणि श्याम; तर कधी श्याम आणि देगावकर चाळीतली कुणीतरे मुलं असे मिळून- आणि हो शशीही असेच- फरशा, विटांचे लहान लहान तुकडे लावून ’देऊळ’ करायचो. आमच्या किंवा कधी आबासाहेबांच्या बोळात, मागच्या अंगणात हे देऊळ असायचे. देवळाचा इतर जामानिमा देवळाच्या फरशा विटाच्या तुकड्यांना साजेसाच!मारुतीचे कुठून तरी आणलेले लहानसे चित्र तरी किंवा त्यतल्या त्यात चांगला गुळगुळीत उभा दगड हाच आमचा मारुती असायचा. कोरांटीची, गुलबक्षीची किंवा पारिजातकांची एक दोन फुले त्यावर कशाचीही हिरवी पाने! मारुती खूष!पण हा’उत्सव’आमच्या उत्साहा इतकाच दोन तीन वर्षेच झाला असावा.

पण ह्या ’उत्सवा’ पेक्षाही आमच्या मारुती भक्तीला, प्रेमाला खरे उधाण भागवत टॉकीज मध्ये ’रामभक्त हनुमान’ हा अद्भुत चित्तथरारक सिनेमा पहाताना यायचे. मारुतीचा सिनेमा पहाण्याचा आनंद मोठा असायचा. माझ्यासारख्या लहान मुलांचाच नाही तर साध्या अशिक्षित कामगारांचा पोरांचाही तसाच असायचा. हा सिनेमा काही हनुमान जयंतीलाच लागत नसे. तो केव्हाही यायचा.संक्रांतीच्या जत्रेच्या वेळी कुठल्यातरी एखाद्या थेटरात हमखास असायचाच. ह्या मारुतीवर बरेच सिनेमा निघाले. आणि रामावरच्या सिनेमातही मारुती असायचाच!

मारुतीच्या सिनेमातील ट्रिक सीन्स, मारुतीने आपली छाती फाडून,(गंजिफ्राक फाडतय बे त्ये!असं पुढं मोठेपणी म्हणायचे) त्याच्या हृदयात राम लक्ष्मण सीता बसलेली दाखवणे, त्याची आकाशातील उड्डाणे वगैरे भाग म्हणजे खरा सिनेमा. तुफान गर्दीत चालायचा. त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या.’पवनपुत्र हनुमान’, ’जय हनुमान’ ’रामभक्त हनुमान’. शिवाय रामायणावरचे सिनेमे मारुतीशिवाय कसे पूर्ण होतील?रामापेक्षाही सर्वजण मारुती कधी येतो… मोठ मोठी झाडे उपटून उचलून; प्रचंड दगड फेकून राक्षसांच्या टाळक्यात कधी हाणतो त्यांना हैराण करतो; गदेने त्यांची टाळकी कधी शेकणार; राक्षसांच्या छातीत गदा हाणून त्यांना कधी लोळवणार; ह्याचेच मोठे कौतूक आणि उत्सुकता सगळ्या थेटरला असे!

अलिकडे सिनेमाचे तंत्र, छायाचित्रण कितीही सुधारले असो पण त्या आमच्या सिनेमातील मारुती हात पाय पसरून ते हलवत आकाशातून पोहत, झेप घेत निघाला की सगळे थेटर त्याच्याबरोबर पराक्रमाला निघत असे.मग तो टेबलावरच त्या पोझमध्ये आडवा पसरला आहे; टेबलाची अंधुकशी रेघ दिसतेय; वरच्या दोऱ्या अस्पष्ट दिसताहेत; आकाशातले ढग फक्त मागे जाताहेत; मारुती आहे तिथेच आहे; अशा कर्मदरिद्री शंका कुशंका घेण्याचे करंटेपण थेटरातला एकही प्रेक्षक करत नसे. मारुती आपल्या जळत्या शेपटीने लंकेला आग लावतोय , रावणाची दाढी जाळतोय (रावणाला दाढी कशी? विचारू नको बे!), ह्या गच्चीवरून त्या वाड्यावर उड्या मारतोय ह्याची अपूर्वाई; तो अद्बुत पराक्रम सगळेजण आपापल्या बाकावरची, खुर्ची वरची जागा सोडून अर्धवट उभे, ओणवे हॊऊन, पुढच्या माणसाच्या खांद्यावर हात टेकून तोंडाचा आ करून पहात. मारुतीला शाबासकी देत. “तिकडे राहिले”, “अरे तो वाडा”, “तो महाल” “आता त्या गच्चीवर हां” “अरे तिकडून राक्षस येतोय”, हय़्य रे पठ्ठे!” अशा शंभर सुचना देत, प्रोत्साहन देत मारुतीला सावध करत ते सीन जिवंत करत. दिग्दर्शकाचे पुष्कळसे काम प्रत्येक थेटरात आम्ही प्रेक्षकच करत असू! पडद्यावर एक मारुती, थेटरात ३००-४००!

आणि अशा वेळी जर का फिल्म तुटली मध्येच तर काही विचारू नका.पहिल्यांदा”अबे लाईट” चा आरडा ओरडा. लाईट आल्यावर जस जसा उशीर हॊऊ लागला की त्या ऑपरेटरच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार सुरू. प्रथम त्याच्या आई-बापा पासून कौटुंबिक सुरवात करत एक एक ठेवणीतल्या गावरान शिव्यांचा वर्षाव सुरू होई. जितके प्रेक्षक तितक्या शिव्या. बरं एक शिवी पुन्हा वापरायची नाही.उष्टं कोण खातंय? तिळा दार उघड म्हणल्यावर अलिबाबाला तो प्रचंड खजिना दिसला तसा फिल्म तुटल्यावर हा शिव्यांचा खजिना उघडला जायचा! क्षणभर मारुती मागे पडायचा आणि अशा इतक्या प्रकारच्या शिव्या ऐकून आमच्यासारखी मुलं नुसती थक्क होत!पण फिल्म जोडून सिनेमा चालू झाला की पुन्हा सगळे मारुतीमय हॊऊन जात.

आश्चर्य म्हणजे आज एकही लाऊडस्पीकर चौकात, कोपऱ्या कोपऱ्यावर ओरडत नाही! गाणी नाहीत. झेंडे नाचवणे नाही. शोभायात्रा नाहीत. मिरवणुका नाहीत. झांजांचे आवाज आदळत नाहीत की ढोल, ताशे बडवले जात नाहीत. गुलाल उधळला जात नाही की शेंदूर फासला जात नाही.
मारुती दैवत राहिले नाही की काय? मारुतीला देवांच्या यादीतून वगळले तर नाही ना?
मारुती देवापेक्षा आज मारुती मोटारच लोकांना प्रिय आहे. शिवाय मारुती हा”बुद्धिमतां वरिष्ठं” असा असल्यामुळेही तो ह्या लोकांच्या समजुतीपलीकडे असावा.तो “वानर युथ मुख्यम” मधील ’युथ’ हा शब्द इंग्रजी आहे अशा समजुतीमुळेही मारुती परधर्मीय देव आहे असाही शोध त्यांनी लावला असावा.

मारुतीचे देऊळ जास्त करून खेडेगावात असते.म्हणून त्याला ग्रामीण वर्गात टाकून पांढरपेशा शहरांनी त्याला उपेक्षित ठेवले असावे.

उत्सव, शोभायात्रा, यासाठी असले आडदांड शक्तिवान दैवत धार्मिक “मार्केटिंग”साठी व्हायेबल/फिझिबल प्रॉडक्ट/इमेज नाही असा सल्ला सर्व पक्षातील कॅंपेन मॅनेजमेंट गुरूंनी दिला
असावा. मारुती भले ’मारुततुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं’ वगैरे असेल पण तो श्रीरामदूतंही असल्यामुळे अशा दूताचा-दासाचा-नोकराचा कसला उत्सव? हा विचारही झाला असावा. त्यामुळेही सर्वत्र शांतता आहे.

प्रत्येक गावातील मारुतीच्या देवळातील मारुती आजही मिणमिणत्या दिव्याच्या अंधारात विनारुपाच्या चेहऱ्याने आकृती म्हणूनच उभा आहे. हातात गदा असून ती हाणता येत नाही. दुसऱ्या हातावर द्रोणागिरी झेललेला आहे पण तो कुठे ठेवताही येत नाही. झेप घेण्याचा पवित्रा आहे पण पाय उचलत नाही. धडकी भरवणारा बुभ:त्कार करून सर्व भूमंडळ सिंधुजळ डळमळून टाकावे आणि ब्रम्हांडही गडगडावे अशी शक्ती आहे पण गुरव पुजाऱ्यांनी शेंदूर नुसता फासलाच नाही तर तोंडावर फासून आत तोंडातही घातल्यामुळे घसा निकामी झालाय. सर्वांगी शेंदूर थापून थापून मारुती दिसेनासा झालाय.मिणमिणत्या अंधारात सगळ्या गावातले मारुती उदास उभे आहेत. बिनवासाची उदबत्ती देवळातली कोंदट हवा कुबट करत धुराचे झुरके सोडत कलली आहे.

गरीब बिचारा मारुती. सगळ्यांनी उपेक्षिलेला. एके काळी आमच्या लहानपणचा महाबळी प्राणदाता असलेला मारुती आज उदास मारुती झालाय!