Monthly Archives: March 2023

एकातून एक … ह्यातून ते … त्यातून हे …

बेलमॉंट

८ मार्च २०२३ – महिला दिन

गोपू लहान होता. त्याच्या आजोबांनी त्याच्यासाठी एक उबदार पांघरूण शिवून दिले. रंगीत कापडांचे दोन तीन थर लावून ते पांघरूण शिवले होते. ते गुडीगुप्प पांघरुण गोपुला इतके आवडायचे की झोपताना, जागा झाल्यावर , दूध पिताना ते सतत घेऊन असायचा.

गोपू थोडा मोठा झाला तरी ‘आजोबाच्या पांघरुणा’ शिवाय तो झोपत नसे. बरे , उठता बसताही ते त्याच्या बरोबर असायचेच.

इतके दिवस होऊन गेल्यावर ते पांघरुण फाटायला लागले. वरच्या कापडाचा रंग विटू लागला. आई म्हणाली, “ गोपाळा, अरे ते पांघरूण टाकून दे आता.” “ टाकायचे का? मी नाही टाकणार.हे आजोबाला दे. ते करतील पुन्हा चांगले.”

गोपुच्या आईने आजोबांना ते पांघरुण दिले. “ बघा काय करायचे ते “, असे सांगून घरी आली. आजोबांनी पांघरुण चारी बाजूंनी पाहिले. “ हंऽऽ, हॅां, अस्सं तर “ असे पुटपुटत ते पुढे म्हणाले की , “ अरे पुष्कळ आहे की हे करायला …. .” असे म्हणत त्यांनी कात्री घेतली .

आजोबांची कात्री कच कच करीत कापड कापू लागली. त्यांच्या मशिनची सुई खाली- वर-खाली जोरात चालू लागली. दुसरे दिवशी आजोबा गोपुच्या घरी आले. त्यांनी गोपुला ,” हा घालून बघ “ म्हटल्या बरोबर गोपु टणकन उडी मारत पळत आला. तो लांब कोट अंगात घालून आई पुढे उभा राहिला. “ बघ आजोबांनी पांघरुणातून कोट केला की नाही? “ इतके म्हणून कोट घालून तो बाहेर पळाला. सर्वांना दाखवत फिरत राहिला. जो तो विचारी,” काय गोप्या नविन कोट शिवला का?” “ हो माझ्या आजोबांनी शिवलाय. मस्त आहे ना?” उत्तराची वाट न पाहता गोपू पुढे सटकला देखील.

आता गोपूला त्या कोटाशिवाय काहीच सुचत नव्हते. दिवस रात्र, घरात आणि बाहेर, गोपु कोटाशिवाय दिसत नसे. शेजारची, जवळची गोपुची दोस्त कंपनी त्याला म्हणे , अरे गोपु मला घालून पाहू दे ना कोट. दे ना! एकदाच.” मग गोपु बबन्याला, मग बाज्याला, नंतर गज्याला, असं करीत सर्वांना आपला कोट घालायला देत असे.

कोटाचेही दिवस भरले असावेत. गोपुची आई म्हणाली, “ अरे गोपाळा, त्या कोटाची रया गेली की रे! टाकून दे तो आता.” लगेच गोपु म्हणाला, “ टाकायचा कशाला? आजोबा आहेत की. त्यातून ते- हे काहीतरी करून देतील मला.”

आई गोपुचा कोट घेऊन आजोबांकडे आली. त्यांच्या समोर कोट टाकीत म्हणाली, “ गोपुचा कोट. तुम्ही, गोपु आणि कोट! काय करायचे ते करा.” आजोबांनी कोट खाली वर, मागे पुढे फिरवून पाहिला. “ हंऽऽ , हॅां ऽ हॅूं ऽऽ अस्संऽऽऽ तर “ असे पुटपुटत, “ पुष्कळ आहे की ….हे करायला….” म्हणत

म्हणत त्यांनी कात्री घेतली. कात्री कच कच करीत गोल, तिरपी, आडवी,उभी होत कोट कापायला लागली. आजोबांच्या मशिनची सुई खाली-वर-खाली वेगाने जाऊ लागली. आणि आजोबांनी आपण शिवलेल्या कपड्याकडे पाहात त्याची घडी घालून गोपुकडे आले.

“ आजोबा, आजोबा काय आणले माझ्यासाठी” म्हणत गोपु धावत त्यांच्याजवळ गेला. आजोबांनी अर्ध्या बाह्या असलेले सुंदर जाकीट गोपुच्या अंगात घातले. गोपुराजे एकदम खूष होऊन आईला म्हणाले, “ बघ आई, कोट टाकून दे म्हणत होतीस ना? बघ कोटातून आजोबांनी काय काढले ते ! “

गोपु आता जाकीटमय झाला. बरेच दिवस सगळे त्याला जाकीटगोपुच म्हणत. बाज्या- गज्या, बबन्या- गहिनी , अरुण- मधुला , सगळ्या दोस्तांनाही थोडा वेळ का होईना जाकीट घातल्याचा आनंद लुटता आला.

दिवस गेले. जाकीट मळकट कळकट दिसू लागलेच पण फाटायलाही लागले. आईचे पुन्हा ते “टाकून दे रे बाबा आता ते जाकीट!” आणि गोपुचे, “ आजोबा करतील काही तरी ह्यातून” हे रोजचे पाढे म्हणून झाले.

पांघरूण कापडांच्या थरांनी बनविले होते तरी त्यातली बरीचशी कापडे विरून गेली होती. आजोबांनी जाकीटाला सगळ्या दिशांनी फिरवले. शिंप्याच्या पाटावर पसरून ठेवले. “ हंऽऽ , हॅांऽऽऽ , हॅूंऽऽ अस्संऽऽ तर “ असे पुटपुटत पुष्कळ झाले की इतके” म्हणत आजोबांची कात्री कच कच करीत कापड कापत गेली. त्यांच्या मशिनची सुई खाली-वर -खाली जोरात जाऊ लागली. थोड्या वेळाने तयार झालेली….

आजोबा गोपुला हाका मारीतच घरात शिरले. गोपुही ‘आजोबा आले’ म्हणत एकेक पायरी सोडून उड्या मारीत खाली आला. आजोबांनी, सुंदर कारागिरी केलेली झोकदार टोपी, गोपुच्या डोक्यावर चढवली. हातानी चाचपून ठाकठीक केली. गोपु हर्षभरीत होऊन आईकडे ओरडतच गेला, “आई बघ आजोबांनी जाकीटातून, जादूने टोपी केली माझ्यासाठी. बघ बघ ,” असे म्हणताना तो आपली मान, डोके रुबाबात इकडे तिकडे फिरवत होता. घरातून धूम ठोकत गोपू बाहेर पडला. रस्यावरचे, बाजूचे, घरातले सर्व गोपुकडे कौतुकाने पाहात राहिले. टोपी होतीच तशी देखणी.

पक्या-मक्या, बबन्या-गहिन्या, अरुण-मधु , बाज्या-गज्या सर्वांच्या डोक्यांवर गोपुची टोपी दिमाखात मिरवत राहीली.

टोपीच ती. तीही बरेच दिवसांनी भुरकट धुरकट झाली. तिची एक घडी फाटली, दुसरी उसवली गेली. आईचा ,” अरे आता तरी फेकून दे ना ती टोपी. तिचे चिरगुट झालंय की रे!” हा मंत्र सुरु झाला. त्यावर गोपुचा, “ आजोबा ह्या टोपीतून दुसरे काही एक करतील” हा खात्रीचा पाढा न चुकता गोपुने म्हटला.

आजोबांनी टोपी पाहिली. सुस्कारा टाकला. पण हंऽऽ, हॅांऽऽ हॅूऽऽ , अस्सं तऽऽर “, पुटपुटणे सुरु झाले. कात्री फिरू लागली. सुई खाली-वर-खाली झाली. आजोबांनी झालेली वस्तु समोर घरून पाहिली.

आजोबा गोपुच्या घरी आले. “गोऽपु ! अशी हाक दिली. हाकेसरशी गोपु आला. आजोबांनी मोठा हातरुमाल समोर धरला. गोपुने तो पटकन ,” हात रुमाऽऽल!” म्हणत घेतला. दोस्तांना दाखवायला पळत गेला. झेंड्यासारखा फडकावत चालला. प्रत्येक खेळगड्यांनीही तो वाऱ्यावर फडकवत नाचवला. गोपूने काळजीपूर्वक घडी घालून सदऱ्याच्या वरच्या खिशात ‘फॅशन ’ करीत ठेवला. आता रुमाल गोपुला सोडेना की गोपु रुमालाला. गोपूने हातरुमालाचे पॅरशूट केले. हवेत फुगून ते डोलत डोलत खाली येऊ लागले की सर्व पोरे टाळ्या वाजवायचे. गावातल्या नदीवर खेळायला गेले की वाळूतले रंगीत दगड तर कधी चिंचा, चिंचेचा चिगुर तर कधी बोरं रुमालात येऊ लागली. पण हातरुमाल तो हात रुमालच की!

बरेच दिवस होऊन गेले. आईचे ,” अरे माझ्या ल्येका गोपाळा! अरे तो रुमाल आहे का चिंघी? होय रे? टाकून दे तो बाबा!” हे नेहमीचे म्हणून झाले. त्यावर गोपूचे ठरलेले उत्तरही देऊन झाले. रुमाल घेऊन स्वतः गोपुच आजोबांकडे गेला.

आजोबांनी रुमालाकडे पाहिले. “ हंऽऽ, हॅांऽऽ हॅूऽऽ, अस्स्ंऽऽ तर ” पुटपुटणे झाले. आजोबा उठले. कपडा बेतताना, कापताना उरलेले रंगी बेरंगी कपड्यांच्या तुकड्यांनी भरलेली पिशवी काढली. गोपू हे सर्व टक लावून पाहात होता. आजोबांनी तुकडे एकत्र गोळा करून रुमालासहित एका रंगीत तुकड्याने झाकला. सुईने त्या गोळ्यावर भराभर टाके घातले . थोड्या वेळाने चेंडू तयार झाला. गोपुला तो देत ते म्हणाले, “ हा घे चेंडू! खेळ आता भरपूर!”

छाती पुढे काढून ऐटीत, आजोबांनी दिलेला चेंडू आईला दाखवित गोपु म्हणाला, “बघ बघ आई! हातरुमालातून आजोबांनी हा गोल गुबगुबीत चेंडू करून दिला! बघ! “

गज्या- बाज्या, अरुण -मधु, बबन्या-गहिनी, पक्या-मक्या रोज चेंडू खेळू लागले. दिवस जात होते. एके दिवशी खेळता खेळता चेंडू जवळच्या नदीत पडला. वाहात गेला. कुणाला तो काढता आला नाही.

हिरमुसली होऊन गोपू आणि त्याची दोस्त कंपनी घरी गेली. आजोबाही म्हणाले , “गोपाळा, आता काही करता येणे शक्य नाही रे ! ” गोपुला काही सुचेना. पण शाळा, अभ्यास, घर खेळ ह्यात तो कसे तरी मन रमवू लागला.

दिवस पुढे सरकत होते.चेंडू हरवला होताच. काही दिवसांनी गोपुचे आजोबाही गेले.

गोपू आता हायस्कुलात होता. एके दिवशी त्या विषयाचे सर आले नव्हते. दुसरे सर आले. त्यांनी मुलांना “तुम्हाला आठवती आणि आवडती ती गोष्ट “ लिहायला सांगितली.

वही उघडली, गोपू लिहित गेला, “ हंऽऽ , हॅूऽऽ, अस्सं तर … पुषकळ आहे की हे करायला…. “. एकामागून एक , एकातून एक .. लिहित गेला, लिहित गेला ….

… आणि हीच सुंदर गोष्ट त्याने आपल्यासाठी लिहिली की हो!

{ एका ज्यू लोककथेचा संदर्भ. मी मराठीत रुपांतरीत केली. )