Monthly Archives: October 2017

मी काय वाचतो?

Redwood City

 

मी काय वाचतो असे विचारल्यावर मला पटकन सांगता येणार नाही. तसे म्हणाल तर मला कोणत्याही प्रश्नाचे उत्तर एकदम देता येत नाही. रेल्वेच्या आरक्षणाचा अर्जही भरता येत नाही. परीक्षेत तर हे बरेच वेळा प्रत्येक वर्षी प्रत्येक प्रश्नाला झाले आहे. त्यामुळे माझे शिक्षण बरेच वर्षे चालू होते. “अरे तू केव्हा ज्या त्या वर्षी पास होणार?” असे कुणी विचारले तर त्या प्रश्नालाही मी लगेच उत्तर देऊ शकत नव्हतो.

सांगायचे असे की अवघड आहे तसे सांगणे.कालच बघा ना वर्तमानपत्र थोडे फार वाचून झाले की लगेच भगवदगीता वाचायला घेतली. दोन मिनिटांनी Whatsapp चे forwarded अक्षर वाड.मय पुढे पाठवत बसलो. कुणाच्या खांद्यावर कुणा कुणाssचे ओझे!

विमानात सुद्धा मी वाचतो. माझ्या खुर्ची समोरच्या पाकिटात सुरक्षिततेच्या सूचना देणारे शिकवणीचे पुस्तक. विमानात काय विकत मिळते त्याची रंगीत पुस्तिका, विमान कं.ने स्वत:चे कौतुक करून ओवाळून घेतलेल्या दिव्यांचे जाड रंगीत पुस्तक, आणखी काही वाचतो. सर्व exit कुठे आहेत ते एकदा चक्कर मारून हात लावून खात्री करून घेतो.खाली मान घालून संकटकाळात दिसणारी जमिनीवरची दिव्यांची रांग कुठे ते शोधत जातो. मग, पट्टा आवळूनच खुर्चीच्या खाली ठेवले आहे म्हणे ते ‘जीव वाचवा’ जाकीट पहाण्यासाठी हात माझ्या पृष्ठभागाखाली-म्हणजे खुर्चीच्या- फिरवून पहाण्याचा प्रयत्न करतो. पण पट्टा आवळून हे चालल्यामुळे पाच सेकंदात गुदमरून मान टाकून पडतो.! वरून आॅक्सिजनचा मुखवटा खाली आला नाही तर? या कल्पनेनेच पुन्हा गुदमरतो! आणि प्रवास संपेपर्यंत आपण संकटात कसे वाचणार ह्या काळजीने हैराण होतो. तोंडाला सारखी कोरड पडते. भीतीने ओरडता येत नाही आणि ओरडलो असतो तरी भीतीने आवाजही बाहेर पडला नसता! मी विमानात सारखे पाणी पितो, ज्युस पितो असे मुलांना सांगतो त्या मागील गुपित हे आहे. बरेच वेळा मी मागितले नसताही सेविका माझा भेदरलेला चेहरा बघूनच ज्युस पाणी देत असतात. उगीच तासा तासानी ढकल गाड्या फिरवित इतरांनाही दिल्याचे नाटक करतात.केवळ मला अवघडल्यासारखे  वाटू नये म्हणून त्यांची ही धडपड असते हे मला समजते! मग पुन्हा पुन्हा आपल्या-आपणच विमानात सुखरुप कसे राहावे ती पुस्तिका मी बारकाईने वाचत राहतो. हे येव्हढे एक दहशतीपोटी वाचतो म्हणून मला फार तर सांगता येईल.

माझ्याकडे टेलिफोन आला. तोही कंपनीने खास माझ्या पदाचा विचार करून दिलाय ह्याचे मला केव्हढे अप्रूप होतेसुरवातीला! त्याच्या शेजारीच मग टेलिफोनचा सदग्रंथ असायचा. त्याला डिरेक्टरी म्हणतात, हे सुद्धा मला माझ्या वाचनाच्या आवडीमुळेच लक्षात आले. त्या गलेलठ्ठ ग्रंथाचे मग मी रोज पाच पाने वाचण्याचा नेम ठेवला. बराच काळ निष्ठेने केला. परिणाम इतकाच झाला की कुणाचा कोणता नंबर आणि तक्रारीचा नंबर पाहायलाही ती डिरेक्टरी पाहिल्याशिवाय चालत नसे!

कालचेच वाचन पहा ना. वर्तमानपत्र झाले की लगेच भ.गीता झाली. नंतर Travelerमधील फोटो, जाहिराती वाचून झाल्या. लगेच मग इथल्या हाऊसिंग सोसायटीचे मुखपत्र वाचायला घेतले. आज आता TradersJoe या दुकानात काय मिळते आणि त्यांच्याकडे जे मिळते ते त्यांनी त्यांच्या गिऱ्हाईकांना पसंत पडेल असेच खास फ त्यांनी तयार करून घेतलेले असते त्यामुळे ते जगात एकमेव असते हे अत्यंत बहुमूल्य ज्ञान प्राप्त करून घेतले. लोकशाहीच्या, “लोकांची लोकांसाठी आणि लोकांनी’ या व्याख्येनंतर  TradersJoe ची ही नम्र फुशारकीच गाजलेली असावी! कोण  भारावून जाणार नाही हे दुर्मिळ ज्ञान वाचून? मी भारावून गेलो. ताबडतोब पिशवी घेऊन त्या सगळ्या वस्तु, दुसऱ्या कोणी घ्यायच्या आत घ्यायला निघालो. पण मोटार चालवता येत नाही हे लक्षात आले; आणि बसही तिकडे जाते न जाते हे ज्ञानही मिळवले नसल्यामुळे लगेच आरामात पडलो.

ताजे वर्तमानपत्र वाचू लागलो. इथल्या वर्तमानपत्रातील नुसत्या वरच्या ठळक ओळी वाचायच्या म्हटले तरी दोन अडीच तास सहज जातात. मग शब्द उलट पालट केलेले कोडे सोडवायचा प्रयत्न करतो. फक्त प्रयत्न. तरी त्या प्रयत्नातच तास सहज जातो. सोडवता येतच नाही. आले असते तर माझे शिक्षण इतकी वर्षे चालले असते का? मग रोजचे भविष्य वाचायचे. स्वत:च्या राशीचे नाही.तिन्ही मुलांचे वाचतो. आनंदी होतो, काळजी करतो,अरे वा म्हणतो. सावध राहतो, कधी तर उड्याही मारतो. पण हे सगळे स्वत:शीच ठेवतो. कारण नंतर माझ्या लक्षात तरी कुठे राहते ते?

आजच्याच भविष्यात एका राशीला सांगितले ते वाचण्यासारखे आहे. तो म्हणतो,” Forgiveness is the original miracle cure!वा! म्हणालो. कोण केव्हा सुभाषित लिहून जाईल सांगता येत नाही! कुणी सांगावे? मीही लिहून जाईन केव्हा ना केव्हा.. . माझीही ती महत्वाकांक्षा आहे . रोजचे भविष्यलिहिणाऱ्याचे नाव  Christopher Renstrom नाव आहे. हे सुभाषितासारखे वचन त्याचे स्वत:चे आहे का कुणा प्रख्यात्याचे आहे माहित नाही. पण यावरून Oscar Wildeची आठवण झाली. त्याने म्हटलेय की,” Forgive your enemies; it is most annoying to them.” बोला, का आवडणार नाही Oscar Wilde? दोन्ही वचनांतील भावार्थात जमीन अस्मानाचा फरक आहे. पण एकदम लक्षात आला तो Oscar Wildeच!

वर्तमानपत्र वाचणे हे ज्याचा दमश्वास चांगला आहे त्याचे काम आहे. मला तीन महिन्यात सुमारे ३२३७१९ पेक्षा जास्त पाने वाचावी लागली! चुकभूल द्यावी घ्यावी. गेली काही वर्षे दर वर्षातील सहा महिने मी वाचतोय. हिशोब करा. हा एक का दहा बारा विक्रमाच्या तोडीचा विक्रम असेल. पण माझा स्वभाव भिडस्त व नम्र आणि मी प्रसिद्धी पराड.मुख असल्यामुळे कुणालाही माझा हा पराक्रम विक्रम माहित नाही.सांगत नाही. पण लोक, मी तसा काहीही नसून भित्रट,भेदरट, घाबरट आहे अशी माझी टकारात्मक संभावना करतात. हल्ली स्पष्ट बोलणाऱ्या लोकांची संख्या अफाट झाली आहे; दुसरं काय! पूर्वी ह्याला उद्धटपणा म्हणायचे. आता परखड स्पष्टपणा म्हणतात. माझ्या लहानपणी फार थोडे लोक असे बोलत. मध्यंतरी बरेच लोक पोलिटिकली करेक्ट बोलू लागले. थोडेच असे काही तरी उद्धट बोलत. पण क्वचित. पण सध्या बहुतेक सर्वच politically Arrogant बोलू लागले आहेत. त्यामुळेही मी माझे वर्तमानपत्री विक्रमी वाचन आपणहून सांगत नाही!

आता The Totally Unscientific Study of the Search for Human Happiness हे पुस्तक वाचायला घेतोय. परवा Words Are My Matter हे अर्धवट वाचूनच परत केले. बऱ्यापैकी म्हणता येईल. मागे सोनियाने सांगितलेली दोन पुस्तके वाचली होती. .चांगली होती. सध्याच्या बाल-युवा पिढीचे वाचन चांगले आहे. माझ्या सर्वच नातवांनी शिफारस केलेली पुस्तके चांगली असत्तात.

मागे जाफर अबिद ह्यांनी प्रसिद्ध केलेले हिंदी चित्रपटांचा छायाचित्रांतून प्रवास दाखवणारे सुंदर पुस्तक पाहण्यात  आले. प्रस्तावनेत त्याने लिहिताना म्हटले होते की माझ्याविषयी काय सांगावे ते मला समतत नाही.माझी काही वैशिष्ठ्येही नाहीत. मी लेखक आहे की नाही तेही मला नक्की सांगता येणार नाही. मलाही मी काय वाचतो हे मला एकदम सांगता येत नाही…

एक वेळ त्तत्वज्ञानातील “मीकोण”ह्याचे उत्तर देणे शक्य होईल. मीही ते देऊ शकेन ! पण मी काय वाचतो ह्याचे उत्तर मात्र मला पटकन कधी सांगता येणार नाही.तसे म्हणाल तर कोणत्याही प्रश्नाचे उत्तर मला एकदम देता येत नाही….तसे देता आले असते तर माझे शिक्षण …..

……आताच पहा ना मार्ग क्रमांक २६०आणि ३९५ बसचे वेळापत्रक वाचायला घेतले आहे…..उद्या-परवा रेडवुड सिटीला जावे असे म्हणतोय, म्हणून हे “required reading …..!”

युटोपिया, राजा राम आणि रामराज्य

रेडवुड सिटी 

 युटोपिया, राजा राम आणि रामराज्य

त्यावेळी

ग्रीक भाषेतील युटोपिया शब्द आणि प्लेटोने सांगितलेले “राजा हा तत्वज्ञानी असावा” ह्यावर अनेक विद्वानांनी आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले आहेत. ते लेखनही राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा विषय झाला अाहे. 

युटोपियात, केवळ राजाच नव्हे तर प्रजाही सर्व बाबतीत सर्व आदर्शांचे पालन, आचरण करणारी असते.असे शंभर टक्के परिपूर्ण आदर्श राजाआणि राज्य असणे अशक्य आहे. म्हणून युटोपिया ही केवळ कल्पना आणि तसे आदर्श राज्यही फक्त कल्पनेतच असणार! आणि ते सध्या तरी खरे आहे. 

युटोपिया किंवा त्याचे  विशेषण युटोपियन या शब्दांमागे नकारात्मक भावना आली. ” हे कसे शक्य आहे? केवळ क्ल्पनाच ती!” “अशा गोष्टी कुठे असतात तरी का?” “मग स्वर्गच म्हटला पाहिजे!” अशा भावनेनेच तो वापरला जातो. मग पटते की युटोपियाचा अर्थच मुळी “no place” असा का आहे! अस्तित्वात नसलेले! 

पण इथे युटोपिया सारखी Philosopher King ही आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. प्लेटोचे म्हणे “राज्यकर्ता हा तत्वज्ञ असावा” असे होते.ही सुद्धा क्लपनेच जमा होणारे तत्व वाटते. पण आपल्या देशातील राजा जनक प्लेटोची ती अपेक्षा पूर्ण करतो. त्याला राजर्षी असेच म्हणत. अत्यंत स्थिर मनाचा, स्थिरवृत्ती समबुद्धी, स्थितप्रज्ञ असा जनक राजा होता.पण राजाच्या कर्तव्यातही त्याने कसुर केली नाही. म.गांधी म्हणत तसा तो trustee सारखा किंवा परिरक्षक custodianच्या  भूमिकेतून राज्य करीत असे. 

एक योगायोग पहा. जनकाच्या वेळी म्हणजेच योग्य शब्दात म्हणायचे तर रामायण काळातच अयोध्येचा राजा आणि त्याचे राज्य प्रत्यक्ष utopiaच होते! 

ज्ञानेश्वर, नामदेव तुकाराम यांचा जसा विठोबा हे सावळे परब्रम्ह होते तसा श्रीराम हा रामदासांचा ‘देवांचा देव, ‘देवराणा ‘ होता. मनाच्या श्लोकात त्यांनी सगुण भक्तीचे माहात्म्य सांगतांना (श्लोक १३७ पर्यंत) आणि नंतरच्या निर्गुण भक्तीचे महत्व पटवून देतानाही ते आपल्या रामरायाचे गुणवर्णन करतात. 

रामदासस्वामी, भक्ती मनापासून करावी व ती फलद्रुप कशी व्हावी ह्यासाठी “प्रभाते मनी राम चिंतित जावा”, ” मना राघवी वस्ती कीजे”, आणि मनात सतत ईश्वराचेच चिंतन असावे आणि त्याबरोबर ते साधण्यासाठी आपल्याला “मना सज्जना सज्जनीं वस्ती कीजे” असे विविध उपाय सांगतात. त्याचीच परिणिती ते आपल्याला एका रामाचे भजन करायला सांगतात. हा बोध करताना ते पुरुषोत्तम रामाचे गुणगान कसे करतात ते पाहण्यासारखे आहे. 

ते म्हणतात, 

” भजाया जनी पाहता राम एकू।

करी बाण एकू मुखी शब्द एकू। 

क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू। 

धरा जानकीनायकाचा विवेकू।। १३१।।

ह्यातील क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू । हा चरण महत्वाचा आहे. इथे क्रिया याचा अर्थ आचरण, चरित्र चारित्र्य असा आहे. 

रामाच्या एकेक गुणाचे आणि त्या गुणांप्रमाणेच तो प्रत्यक्ष आचरणही करीत होता हे आपल्याला रामचरित्राचे वाचन करताना समजून येते. वाचता येत नसलेल्यांना रामकथा केवळ ऐकल्यानेही ते लक्षात राहते. 

रामापाशी सर्वांविषयी दया होती. रामाला सर्वांची काळजी होती. आईबापाविषयी अत्यंत पूज्य बुद्धी होती. वडिलधाऱ्यांविषयी आदर होता. भावांविषयी अपार माया होती. भक्तांविषयी तर त्याला विशेष प्रेम, कौतुक, आणि अभिमान होता. रामापाशी न्यायबुद्धी होती.तो न्यायी होता. याशिवाय रामदासस्वामींनी वरील श्लोकात वर्णन केलेले गुणही होतेच. 

रामाच्या आचरणाचा आदर्श समोर ठेवून जे लोक तसे वागण्याचा प्रयत्न करतात ते हळू हळू वरच्या पायरीवर जाऊ लागतात. रामचरित्र माहिती होण्यापूर्वी आपण ज्या पायरीवर होतोतेव्हा त्या पातळीवरचेच आपले वागणे होते. पण जसे आपण रामकथा मनापासून गोडीने ऐकल्या वाचल्यावर रामाच्या आचरणासारखे अंशत: जरी अनुकरण करून वागू लागलो तर आहे त्यापेक्षा वरच्या श्रेणीत जाऊ शकतो. आपल्या आचारविचारात चांगला फरक होऊ लागतो. आपले आयुष्य उन्नत होऊ शकते. ह्यालाच रामदासस्वामी ” क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू।” असे म्हणतात. 

राजा रामाच्या चारित्र्यातील महत्वाचा भाग हा की अयोध्येतील सर्व प्रजा सुखी होती. समाधानात होती. त्याहीपेक्षा महत्वाची बाब अशी की रामाचा राजा म्हणून वागण्याचा, त्याच्या आचरणाचा अयोध्येतील प्रजेवर फार प्रभाव होता. 

वै. ह.भ.प.ल.रा.पांगारकरांनी उदघृत केलेल्या  समर्थ रामदसांच्या अफाट वांड.मयातील ‘मानपंचक’ मधील श्लोकांतून रामदासांनी वर्णन केलेले रामाच्या कार्याचे, अयोध्येतील लोकस्थितीचे, वातावरणाचे, ‘लोक वर्तती कैसे’ हे वाचण्यासारखे आहे. पण त्यातील जे काही निवडक श्लोक बहारदार आहेत, ते वाचू या:-

कीर्ती या रघुनाथाची। पाहता तुळणा नसे।

येकबाणी येकवचनी। येकपत्नीच धार्मिकु।।६।।

लोक कसे होते? तर

उद्वेग पाहतां नाही। चिंता मात्र नसे जनीं।

व्याधी नाही रोग नाही। लोक आरोग्य नांदती।।

लोकांची वृत्ती वागणे, आचरण किती नैतिक होते, स्वभाव कसे होते ते वाचल्यावर आपण स्तिमित होऊन जातो.

युद्ध नाहीच अयोध्या। रोग ना मत्सरू नसे।

बंदनिर्बंदही नाही। दंडदोष कदा नसे।।९।।

बोलणे सत्य न्यायाचे। अन्याय सहसा नसे। 

अनेक वर्तती काया। येकजीव परस्परें।।११।।

दरिद्री धुंडता नाहीं। मूर्ख हा तो असेचिना।

परोपकार तो मोठा। सर्वत्र लोकसंग्रहो।।१२।।

राजापेक्षाही  तिथले लोक श्रेष्ठ दर्जाचे वाटावेत अशी अयोध्येची प्रजा होती.मग सुबत्ताही का असणार नाही? 

अद्भुत पिकती भूमी। वृक्ष देती सदा फळे।

अखंड दुभती धेनु । आरोग्यें वाहती जळे।।१३।।

वा! वा! रामदासांच्या शब्दयोजनेची, प्रतिभेची चुणुक या दोन शब्दांत स्पष्ट होते! “आरोग्यें वाहती जळे!”

पाण्याचे, निर्मळ शुद्ध असे सगळेच वर्णन करतात. काही त्यापुढे जाऊन स्फटिकासारखे स्वच्छ म्हणतील; पण केवळ रामदासच “आरोग्ये” हा त्याचे ‘सर्व गुण, उपयोग, परिणाम, स्वरुप,आवाज, उत्साह,त्याचा प्रवाह,’ इतके आणि असेच काही सूचित करणारा परिपूर्ण यथार्थ शब्द वापरु शकतात!  पुढे वाचा, 

चढता वाढता प्रेमा। सुखानंद उचंबळे। 

संतोष समस्तै लोकां । रामराज्य भूमंडळी।। १८।।

आतापर्यंत रामराज्य म्हणजे सुबत्ता-समृद्धी, धार्मिकता,  त्यामुळे शांतता ह्याच गोष्टींवर भर देऊन वर्णन केले जात असे. केले जाते. पण राजा राम आणि रामराज्य ह्यांचे खरे मर्म कशात असेल तर” क्रिया पाहता उद्धरे सर्व  लोकू” ह्यामध्ये आहे. 

‘ यथा राजा तथा प्रजा’ ही म्हण आपण वापरतो.ती बरेच वेळा नकारात्मक रुपाने वापरतो. कारणे आणि करणीही  तशीच असते म्हणूनही असेल.विशेषत: राज्यकर्ते,नोकरशहा किंवा आॅफिसातील वरिष्ठ किंवा व्यसनी माणसांच्या बाबतीत  ती वापरली जात असते. ‘हेच असे तर तेही तसेच असणार!” “अहो जसा वरिष्ठ तसा कनिष्ठ” ” मग दुसरं काय होणार? असंच!” हीच भावना त्यामागे असते. 

पण राम आणि अयोध्येतील लोक यांच्या बाबतीत मात्र ती म्हण जशी आहे, त्यातील शब्दांचे जे अर्थ आहेत त्याच सरळ अर्थाने नि:शंकपणे वापरता येते! हा रामाच्या आचरणाचा खरा महिमा आहे. रामराज्याचा खरा अर्थ तिथले लोकही राजा रामासारखेच नितीमान चारित्र्यसंपन्न होते. अथवा मोठा शब्दच वापरायचा तर सत्वगुणी होते त्यामध्ये आहे. राजा आपल्या आचरणाने सगळ्या प्रजेचे आयुष्य उन्नत करु शकतो त्याचे हे उदाहरण आहे. म्हणून रामदासस्वामी रामाचा ‘ क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू।’ या शब्दांत गौरव करतात. 

सुबत्ता, शांतता, कायद्याचे पालन आर्थिक भरभराट इतकेच काय धार्मिक वातावरणही  इतर राजांच्या राज्यात असणे शक्य आहे. पण वर दिलेल्या श्लोकांतील लोकाचार आणि लोकस्थितीआणि त्याचा परिणाम, तसे वातावरण कुठे आढळेल का? हो, युटोपियात !  रामराज्य हे युटोपिया होते . त्यावर हा नियमाचा अपवाद आहे असे कोणी म्हणतील. पण हा अपवाद इतका महान आहे की त्यामुळे तो नियमाचा गौरवच करतो. 

माझे शिनिमाचे गाव – 2

‘माझ्या आवाजाच्या गावात’ अजून एक आवाज आहे.
तो माझ्या गावाचा खरा ‘आतला’ आवाज. या आवाजाची सुरुवात, हलगीच्या किंवा बॅंडच्या आवाजाच्या साथीने ‘शिनिमा’च्या जाहिरातीच्या ढकलगाडीपासून होऊ लागते. इतर कुठल्याही कागदांकडे ढुंकुनही न पाहणारे आमच्या गावातले लोक सिनेमाची जाहिरात मात्र, मन लावून वाचतच नसत तर वाचून झाल्यावर जणू नोटच आहे अशी घडी घालून खिशात जपून ठेवत!

आमच्या गावात ज्या कुणाकडे घड्याळे होती ती घड्याळे फक्त सिनेमाच्या वेळाच दाखवत. त्या त्या खेळाची वेळ झाली की लोकांची पावले शिनिमाच्या थेटराकडे वळू लागतात.नदीच्या गावातील सर्व रस्ते जसे उताराने नदीकडे नेतात तसे आमच्या गावाचे सर्व रस्ते सिनेमाच्या थिएटरकडे जातात. रस्त्यांच्या बाबतीत रोमनंतर, आमच्या गावातील सिनेमा टाॅकीजचाच असा उल्लेख होतो!
गाव उणेपुरे तीन लाखाचे असेल नसेल पण सिनेमाची टाॅकीज मात्र पंधरा सोळा. त्यातली सात आठ तर एका चौका भोवती वसलेली! त्यातलीही चार एकाच प्रांगणात! आणि त्या चारातील दोन तर एकावर एक अशी उभी! सिने व्यवसायाच्या जगातला चमत्कार वाटावा अशी ही टाॅकीज सिनेमा थेटरे आमच्या गावचे भूषणच नव्हे तर अभिमान आहे!

आमच्या गावचा सिनेमाचा प्रेक्षक गावाप्रमाणेच सामान्य माणूस होता. त्यात गिरणी व इतर कामगार, हमाली, कष्टाची कामे करणारे, कारकुन मंडळी, शाळेपासून काॅलेजपर्यंतचे विद्यार्थी आणि इतरेजनही असत. तिकीटाच्या खिडकीपाशी गर्दी ही रोजच असे. तिच्या रांगेत हमरीतुमरीही रोजच व्हायची. पण घामेघुम होऊन हातातले तिकीट नाचवत कुणी आला की रांगेतल्या इतरांनाही त्याला तिकीट मिळाल्याचा आनंद होत असे. थेटरात लोक आले की सगळे फक्त सिनेरसिक होत. सिनेमा थिएटरमध्ये कोणी अनोळखी नसे! एकदम सगळेजण दोस्त होत.

अगदी सुमार सिनेमाचेही पहिल्या दोन आठवड्यात तिकीट मिळवणे आमच्या गावात येरा गबाळ्याचे काम नसे.तिकीटाला रांग लागायची. त्यासाठी प्रभातच्या तिकीटाच्या खिडकीकडे चक्रव्युहात जावे तशा भिंतींमधून जावे लागे.गाजणारा सिनेमा असला तर पाच सहा आठवडे ह्या चक्रव्युहातून जावे लागे. त्यातही भिंतीवर चढून रांगेत उड्या मारून घुसणारी दणकट कंपनी असेच. आमच्या सारख्यांना दोन तीन वेळेला तरी खिडकी जवळ पोहचे पर्यंत खिडकी बंद झाल्याचेच पाहावे लागे. एक दोन वेळा मी आणि माझ्या दोस्तांनी भिंतीवरून उड्या मारून घुसण्याचा प्रयत्न केला. पण रांगेतल्या लोकांनी व्हाॅलीबाॅल सारखे उडवून बाहेर फेकले. बरं झाले बाहेर रांगेतल्या लोकांवर पडलो!

भागवतमध्ये चारी थिएटरच्या रांगा उघड्यावरच लागत. तिथे भिंतीचा अडथळा नसे. पण थिएटरची माणसे मध्येच घुसणाऱ्यांना दणका देऊन हुसकावून लावत.मागे रांगेत पाठवत. पण एक बरे होते. तिथेच चार थेटरे असल्यामुळे हा नाही तर तो सिनेमा पाह्यला मिळायचाच. भागवतच्या आवारात जाऊन तिकिट मिळाले नाही म्हणून सांगत आला तर तो रडतराऊ आमच्या गावात राहण्याच्या लायकीचा नाही असेच मानले जायचे!

तिकीट मिळाल्याचा आनंद हातातली तिकीटे नाचवत दोस्तांना आरोळ्या देत साजरा होई. पण लगेच थेटरात मागच्या रांगेत जागा मिळावी म्हणून दरवाज्यापाशी रांगेत उभे राहाण्यासाठीही पळावे लागे!

आषाढी वारीत पांडुरंगाचे दर्शन मिळणे जितके अवघड त्यापेक्षाही आमच्या थिएटरच्या आत जाणे हे दुरापास्त होत असे. दोन्ही बाजूनी सरकणाऱ्या लोखंडी दरवाजात इतकी थोडी फट ठेवली जाई की कितीही धक्काबुक्की केली तरी त्या फटीतून अर्धा माणूसच जाऊ शकत असे. झुंबड उडायची. सगळेजण त्या फाटकाला धडका मारून एकमेकाला बाजूला ढकलत आत जाण्याची शर्थ करीत. आणि जे विजेते आत जात ते अापल्या सोबत्यांसाठी खुर्च्या धरून ठेवत. ह्यालाच आमच्या शिनिमाच्या गावात रिझर्व्हेशन,ॲडव्हान्स बुकींग म्हणत. थोडा वेळ गुरगुर कुरबुर व्हायची. सगळे लोक आपापल्या जागेवर बसतांना थेटरात मोठा कोलाहल चालू असे. “अबे ही रांग बे” ‘तिकडे कुठे कडमडातो बे? तुझ्या समोर तर हाहे मी!” “ ती बिडी नंतर पेटवा की मिश्टर! पुढं जाऊ दे आम्हाला.” “ ओ शिग्रेटवाले सायेब पाय खाली घ्या ना! सिनेमा चालू नाही तर हे पाय ताणून बसले साहेबराव!” “ ये तुझ्या… कुणाला म्हंतो बे तू? आं? दाताड फोडीन ; जा पुढं जा गप.” “ ए कानिट्या तू आला का आत? मग इकडं इकडं ये, हां! आणिआपला बाग कुठाय? “ “तो अजून रेटरेटीतच आहे ! येईल, कुणाच्याही दोन पायातून घुसून येईल!”व्हय बे त्या दीड फुट बांबूला काय ! तो रांगतही येईल! “अरे पट्या नाही दिसत?” “तो दुसऱ्या सिनेमाला गेलाय! असे संवाद मोठ्या आवाजात चालू असत.

थिएटर भरते न भरते तोच अंधार होऊन ‘मुन्शी बिडी,लिप्टन टी, 501 साबण, चपटी बिडी पन्नालालची ह्या किरकोळ आणि डालडाची सिनेमा चालू झालाय वाटावी अशी आजच्यासारखी व्हिडीओ जाहिरात चालू व्हायची. फिकट अंधार झाला तरी येणाऱे आपल्या माणसाला खणखणीत हाक मारून कुठे बसला वगैरे विचारत येत. कधी डोअर कीपर आपल्या मोठ्या बॅटरीचे झोत फिरवत कुठे जागा असेल ती दाखवत. पण डोअरकीपर आणि त्यांच्या मोठ्या बॅटऱ्या प्रेक्षकांपेक्षा त्यांच्याच मदतीला येत. त्याचाही अनुभव सिनेमाच्या पहिल्या काही ‘हाऊसफुल्ल आठवड्यांत’ चार आणेवाल्या बाकावरच्या आणि मधले हात नसलेल्या आम्हा पाच आणे खुर्चीवाल्यांनाही येई. “सरक, हां बसा, सरका, सरका, हां बसा, सरक की बे! पार्कात भेळ खायला बसल्यासारखं बसलेत बहाद्दर! अजून चारजण बसतील की.” “सरका सरका, बसा इथं बसा” असे बॅटऱ्या घुसवुन घुसवुन इंच इंच जागा शोधून प्रेक्षकांना कोंबून बसवत ! त्यामुळे ‘गर्दी म्हणजे? “बॅटऱ्या घुसवून घुसवुन” बशिवले बे गाबड्यांनी आम्हाला!” प्रत्येकाच्या मांडीवर दोघं दोघं बशिवले!”हा संवाद हाच सिनेमा पहिल्या तीन चार आठवड्यात पाहून परत पुन्हा पाहणारे आमच्या गावातील हाडाचे सिनेरसिक ऐकवत.

पुन्हा पुन्हा पाहणाऱ्यांचा उल्लेख केल्यावरून आठवले. गावची परंपराच अशी की सहसा कुणी सिनेमा एकदा पाहात नसे. सरासरी काढली तर लोक एकच सिनेमा किमान तीन चार वेळा पाहात असत. त्याही पुढे तो किती वेळा पाहावा हे ज्याची त्याची सिनेमाची आवडती नायिका,(आणि हे सर्वात महत्वाचे कारण),मग नायक, संगीतकार, गाणी ह्यावर अवलंबून असे. गावातल्या सर्व लोकांचा तो सिनेमा चार पाच वेळा पाहून झाल्याशिवाय थिएटरच्या मालकाला तो सिनेमा बदलता येत नसे! ह्या दराऱ्यालाच गावात ‘लोकसत्ता,लोकराज्य, लोकशक्ति ‘ म्हटले जात असे.
शाळा-काॅलेजात सिनेमा हा फक्त वर्गमित्रांचाच विषय नसे. तो सगळ्या वर्गाचाच असे- संवाद ऐकला की सिनेमाहात्म्य कळून येईल.’नागिन’ कुणी किती वेळा पाहिला ह्याची गंभीर चर्चा चालली असता आमचा मेहरोमजी मात्र अस्वस्थ होता. त्याला विचारल्यावर तो म्हणाला,” नागिन गेला का रे?” “ हो २७आठवडे चालू होता. गेला की.” “का तू किती वेळा पाहिला?” (लक्षात घ्या आमच्या शिनिमाच्या गावात कुणीही कुणाला “हा सिनेमा पाहिला का” असे विचारत नसत. कुणी विचारलेच तर त्यांच्यात पिढीजात वैर उत्पन्न होई. कुणाचा चार चौघात अपमान, पाणउतारा करायचा असेल तरच ‘पाहिला का?’असला प्रश्न विचारला जाई.) मेहरोमजी सहज म्हणाला,” फक्त चौदा वेळाच पाहिला रे!” हे सांगतानाही त्याचा चेहरा पार उतरला होता!

तिकीटे काढून आत शिरल्यावर थेटरात कोणीही लगेच बाकांवर किंवा पाच आणेवाले खुर्च्यांवर बसत नसत. माचिस पेटवून ती बाकांच्या, खुर्यांच्या बुडाखालून फिरवत. ढेकणं पटापट मरून खाली पडत. बरेच वेळा खुर्च्याच्या फळ्या खालीवर आपटत. सगळ्या थेटरात गोळीबारापेक्षाही ‘फटफट फटाक्’जोरदार आवाज घुमत असे. सिनेमाचे रोज कमीतकमी तीन खेळ असायचे. आणि हे अशी खुर्च्यांची आदळ आपट रोज चालत असे.त्यावर उपाय म्हणून मालकाने रांगेतल्या खुर्च्यांच्या तळाशी एक लांबलचक लाकडी फळी बसवली. अाता आपटा तुमची खुर्ची! कुणाला आपली खुर्ची उघड झाप करत आपटता येईना ! बरे कोणी सिनेमा पाहताना पाठीमागे रेलू लागला तर इतरांच्या खुर्च्याही मिटू लागत! लगेच दुसरे “अो आप्पा नीट बसा की!” ची ओरड सुरू करीत. तीन चार तरूण तर सिनेमा चालू असतांना मधेच एकदम बसल्या बसल्या आपल्या खुर्च्या मुद्दाम पाय ताणून मिटवत. त्यामुळे रांगेतील सगळ्या खुर्च्या मिटायला लागत. ‘अरे अरे अबे अबे ’ म्हणत लोक सावरू लागले की हे सगळे हसत!

सिनेमा थेटरमध्ये बिडी सिगरेट पिणे,हिरोच्या किंवा व्हिलनच्या स्टाईलीत धूर सोडणे, पान-तंबाखू खाणे हे सर्वमान्य होते. त्यामुळे डबडा थेटरमध्येच नव्हे इतर थेटरातही धूर भरलेला असे. बहुतेक प्रेक्षक आपले सदरे मागे लोंबत ठेवत नसत. पायजम्याच्या, विजारीचे पायही वर गुंडाळलेले असत! एखादा सभ्य व सुसंस्कृत प्रेक्षक तुमच्या खांद्याला हळूच हात लावून, तोंडाच्या चंबूवर दोन बोटे ठेवून, खुणावून पाय वर घ्यायला सांगे. त्यानंतर वाकून तुमच्या खुर्चीखाली एक पावरफुल पिचकारी मारायचा!

पिक्चर सुरु होणार हे शेवटच्या ‘शांतता पाळा’ ही आॅपरेटरने तयार केलेली पिवळ्या अक्षरातली स्लाईड झळकली आणि मुद्दाम चालू ठेवलेले दोन दिवे मालवले गेले की समजायचे सिनेमा सुरु होणार. पण मुख्य पिक्चर सुरु होण्याआधी१५ मिनिटांची News Review असे. ती संपेपर्यंत काही प्रेक्षक येतच असत. मग ते आमच्या गुडघ्यांना घासत किंवा खुर्च्यांच्या पाठीवरून हात सरकवत जायचे. पण त्यांना नीट जाऊ दिले तर आमचे सिनेमाचे गाव कसले! “ अरे पाय वर घ्या सायेब आलेत!” “ ए मम्हद्या! घाल तंगडी आडवी त्याला. मग येंईल उद्या वेळेला.” पण हे लेट लतीफही त्याच गावचे. “ का बे, मला तू दिसत नाही वाटलाव का आं? इन्ट्रोल मधी बघतो तुला !” असे धमकावत सरकायचे पुढे.

नीट बसा! आता ‘पिच्चर’ चालू होणार!