Monthly Archives: March 2016

शेवटचा दिस

मृत्यु, मरण , मृतदेह, प्रेत, मढे, हे शब्द आपल्या रोजच्या बोलण्यात कधीही नसतात. इतकेच काय त्याचे विचारही आपल्या मनात नसतात. ‘मेला, मेले’ हे शब्दही आपण वापरायचे कटाक्षाने टाळतो. ‘गेले’ असे त्याचे सौम्य रूप करून म्हणतो.
ज्यांचा ह्या गोष्टीशी आणि त्या संबधातील वस्तु, विधी, संस्कार करण्याशी रोज संबंध येत असेल त्यांच्या घरी कसे वातावरण असेल हा विचारही आपल्या मनात येत नाही. ज्यांची ती उपजीविकाच आहे त्यांचे रोजचे आयुष्य कसे असेल?

तर, परवाच मी ‘द अंडरटेकर्स डॉटर्’ हे केट मेफिल्डने लिहिलेले तिच्या आठवणींचे पुस्तक वाचले. विषय वरती दोन परिच्छेद लिहिले त्या संबंधीच आहे. अंत्यसंस्कार करणाऱ्या वडिलांची ही मुलगी. वडलांचे ‘मेफिल्ड & सन फ्युनरल होम’ हे व्यवसायाचे नाव.

त्यांचे घर दोन मजली. जिथे असला व्यवसाय असतो त्याच ठिकाणी घरचे लोक राहात नसतात. पण हे सगळे कुटुंब मात्र त्याच इमारतीत राहत असे. ज्युबिली नावाच्या लहानशा गावातील अंत्यसंस्कार करणाऱ्या(च्या) घरात जन्मलेली ही लेखिका. एक भाऊ आणि ह्या तीन बहिणी. आई कडक शिस्तीची. आईसमोर शांत गप्प गप्प असणारे वडील्, सुस्वभावी आणि खेळकर स्वभावाचे उमदे गृहस्थ. सर्वाना केव्हाही मदत करायला तत्पर असणारे. गावात एक प्रतिस्पर्धी असूनही आपल्या स्वभावाने त्यांनी सावकाशपणे चांगला जम बसवला होता. गाव फार मोठे नाही आणि फार लहानही नाही. त्यामुळे गावातील सगळेजण एकमेकांना ओळखत. गावातील प्रत्येक घराला हिच्या वडलांची केव्हा ना केव्हा मदत घ्यावी लागणारच असे; त्यामुळे तिथले सर्वजण अणि काही बडी धेंडे, सगळ्यांशी वडलांची ओळख होती ह्यात आश्चर्य नव्हते.

उपजीविकाच ती म्हटल्यावर , घरात मृत्यु, मृतदेह, त्याचे शोकग्रस्त नातेवाईक हे वातावरण सतत असायचे.
‘ वुइ’व गॉट अ बॉडी’, ‘प्रेत येणार आहे’ असे आई म्हणाली की आई वडिलांचे बोलणेही हळू आवाजात होई. सर्व मुलांची रवानगी वरच्या मजल्यावरील खोल्यात होई. लहान लेखिकेला तर त्या देहावरचे सोपस्कार पूर्ण होईपर्यंत किंवा कधी तो दफन होईपर्यंत खाली येण्यास बंदी असे.

घरात शाळेच्या, मित्रमैत्रिणींच्या गप्पा सोडल्या तर एरव्ही ‘ह्याचीच’ बोलणी. कोण केव्हा जाईल हे कधी सांगता येते का? लेखिकेच्या आई वडलांना गावात कोण किती गंभीर आजारी आहे, कोण किती अत्यवस्थ आहे, कोण किती दिवसांचा, तासांचा सोबती आहे ह्याची नेमकी माहिती असे. आणि त्यांच्या बोलण्यातही हेच असायचे. जेवतानाही मधून मधून हाच विषय असायचा. सर्वच माणसांचा शेवट मृत्युतच होणार. पण ती म्हणते,” आमच्या रोजच्या आयुष्यात जेवतानाही ‘मृत्यु’ मध्ये यायचाच. आई विचारायची,” मि. शूमेकर आपल्यालाच मिळणार होता. त्या अल्फ्रेड डेबो(ह्यांचा प्रतिस्पर्धी) कडे कसा काय नेल्ं त्याला ?” “हो ना! शूमेकरकडे इतकी माणसं येणार म्हणून आपण त्यांच्या घरी खुर्च्याही नेऊन दिल्या होत्या!” “जाऊ दे. दुसरा कुणीतरी येइलच की आपल्याकडे.”

ह्यांच्या घरात प्रत्येक खोलीत फोन होता. आई बाबा, खाली काम करणारे दोघे चौघे कोणीही कुठेही असले तरी फोन पटकन घेता यायचा. फोन उचलला नाही, उचलायला वेळ लागला म्हणून ‘बॉडी’ आपल्या कडून जायला नको !
फोन खणखणला की, सगळे घर एकदम गप्प व्हायचे. वडील अशा वेळी त्यांच्या ‘अंडरटेकरच्या’ आवाजात बोलायचे. आई बाबांच्या आवाजावरून आमचे तर्क बांधले जायचे. आई हळूच हलक्या स्वरात “इझ इट जेम्स्?” विचारायची. वडिलांच्या एका हो किंवा नाही या शब्दावरून, मान हलवण्यावरून घरातील पुढ्च्या गप्पाटप्पा, हसणे, आमची वादावादी हे सर्व अवलंबून असायचे.!

बाबा कधी कधी खोटेच गंभीर होत. ते लवकर काहीच सांगत नसत. काही वेळाने “तसे काही नाही” समजल्यावर आई चिडल्यासारखे दाखवायची. आम्ही भावंडे पुन्हा आमच्या गमती जमतीत रमायचो. अशा वातावरणात, घरात काही समारंभ, पार्टी करायची असली, इतकेच काय नेहमीचे सणवार करायचे असले तरी गावातल्या घराघरातील, दवाखान्यात असलेल्या “आजाऱ्यांचा” आणि ‘कोण? केव्हा?’ त्याचा अंदाज घेऊन कार्यक्रम ठरवावे लागत. दिवस किंवा वेळ केव्हा आणि कसा आनंदात घालवायचा ह्याचीही तारीख आणि मुहुर्त ठरवूनच घराला अणि भावंडांना आनंदित व्हावे लागायचे !

आईचा ब्रिजचा ग्रूप होता. त्या बायकांचे पोषाखापासून ते खाण्याचे पदार्थ त्यावेळी किती पटापट संपत, बशा पुन्हा पुन्हा भरून ठेवाव्या लागत, तसेच प्रत्येकीच्या स्वभावाचे बोलण्याचे बारकाईने खुसखुशीत वर्णन केले आहे. सगळीकडे होतात तशा ह्या बायकाही इतरांची म्हणजे हजर नसलेल्यांची उणी दुणी किती चतुराईने काढतात; इतक्याजणी येणार म्हटले की खाण्यापिण्याच्या तयारीची, स्वयंपाक घरातली गडबड लगबग, घरातला पसारा आवरण्याची तारांबळ, ‘तसला फोन’ येतो की काय ह्या धसक्याची टांगती तलवार, अशा कार्यक्रमावर (अगोदर कितीही खात्री करून घेतली असली तरी) सतत लटकलेली असायचीच.

पत्ते खेळणाऱ्यांपैकी एक बाई शाळा मास्तरीण होती. ती बाई कुणाच्याही एखाद्या साध्या वाक्यातून, शब्दावरून लगेच इतिहासातील घटना, भूगोलातल्या घडामोडी, शब्दाची व्युत्पत्ती असे काही मध्येच सांगत बसायची. असले काही तरी रूक्ष रटाळ सांगून, हलक्या फुलक्या मजेशीर गप्पांना ती बाई ‘सामान्य ज्ञानाची परीक्षा’ करून टाकायची. गप्पांचा खळखळता ओघ अडवला जायचाच पण तो खेळकरपणा परत यायलाही वेळ लागायचा.

लेखिकेच्या ‘त्या घरात’ अंत्यसंस्कारच्या वेळी पियानो वाजवायला टॉटी नावाची तरूण मुलगी यायची. ठरलेल्या वेळेपेक्षाही ही उशीरा यायची. तिची वाट बघत, मृतदेह, त्याची नातेवाईक मित्र मंडळी आणि आमचा स्टाफ ताटकळत बसलेला असे. पण टॉटी मात्र यायची ती हसत हसत आणि प्रत्येकाकडे हसून पाहात हाय हॅलो म्हणत पियानोवर बसायची!

एके दिवशी’ तसला विधीचा’ कार्यक्रम संपल्यावर पियानोवर मला एक माळ पडलेली दिसली. टॉटीला मी ती पाहू का म्हटले, नेहमीप्रमाणे हसून ,”हो, पाहा ना घे” म्हणत तिने ती मला दिली. माळेवर मी बोटे फिरवत मी तिला परत दिली. मला ती माळ आवडली होती. बस इतकेच. टॉटी गेल्यावर आई रागवून म्हणाली, “पुन्हा तिच्या माळेला हात तर लाव म्हणजे तुला मी दुसरा दिवस उजाडेपर्यंत बडवून काढीन.” मी घाबरले. तरी मी आईला विचारलेच, “माळ हातात घेऊन पाहिली तर त्यात एव्हढे काय झाले?” पण ते आईला कसे पटणार? नंतर माझ्या लक्षात आले. हां, त्या माळीला एक क्रॉस होता. पण असे लहान मोठे असंख्य क्रॉस ज्युबिलीत होते. अनेकांच्या गळ्यातही दिसत. पण नंतर समजले की आईचा राग ती माळ जपाची होती आणि त्याहूनही गंभीर अपराध म्हणजे टॉटी कॅथॉलिक होती. आमच्या सदर्नर गावात कुणी कॅथॉलिक असे नव्हतेच. अरे देवा! हे असे आहे होय! मला तिचा क्रॉस फक्त क्रॉस वाटला होता. माझे त्याकडे लक्षही नव्हते. मला कसे माहित असणार की क्रॉसही कॅथलिक, प्रॉटेस्टंट असतो ते!

प्रार्थनेसाठी आणि देहाच्या दर्शनासाठी घराच्या आवारात एक चॅपेल होते. ब्रदर व्हिन्सेन्ट प्रार्थनेसाठी यायचा. टॉटीने पियानोवर एक दोन भक्तिगीते म्हटली की हा बोलायला सुरुवात करायचा. समोरच्या शवपेटीत मृतदेह, आजुबाजूला दु:खित नातेवाईक्, आणि इतर लोक. हा ब्रदर व्हिन्सेन्ट पाद्री प्रार्थना म्हणायला सुरू करायचा. त्यात देवाचे आभार मानून झाले की देवाच्या आशिर्वादाला सुरुवात व्हायची. आशीर्वाद त्या मृताच्या गोठ्यातील गाईगुरांपासून किंवा तो दुकानदार असला तर दुकानातील वस्तूंना मग त्या माणसाच्या पाळीव प्राण्यांना आशीर्वाद देऊन व्हायचे. त्यानंतर घरातील सर्वांना असे करत करत ही आशीर्वादांची शेपटी सारखी लांबत त्याच्या ट्रॅक्टरलाही किंवा मोटारीलाही ही आशीर्वादाची खैरात मिळायची; देव दयाळू असतो, अखेर ब्रदर व्हिन्सेन्ट सर्वात शेवटी देवाची कृपा मृतव्यक्तीवर करायचा ! हे झाले की त्याचे प्रवचन सुरू व्हायचे. प्रवचनाचे पहिले वाक्य संपण्याच्या आतच टॉटी पियानोची पायपट्टी दाबून भैरवीचे हाइम्न म्हणायला सुरवात करायची ! जमलेली मंडळी टॉटीकडे हळूच हसून पाहात नजरेनेच तिचे आभार मानायचे. शक्य असते तर मृतदेहानेही तेच केले असते.

पुस्तकाचा निम्मा भाग मृतांच्या संदर्भातून सजीव झाला आहे. पण गाव, त्यातील काही व्यक्तींचे, आपले वडील, भाऊ, बहिणी शाळा अशा जीवनाशी संबंधित अनेक गोष्टीमुळे पुस्तक केवळ अंत्येष्टीचे राहात नाही. लेखिका हायस्कूलमध्ये गेल्यापासून फ्युनरल होम मधील फ्युनरल अस्तंगतच झाल्यासारखे आहे.
लेखिकेने आपल्या वडिलांविषयी आणि भावाविषयी उत्कटतेने लिहिले आहे. तिने आपल्या लहानपणीच्या डोळ्यांमधून पाहिलेल्या आठवणी खरोखर वाचनीय आहेत. शेवटपर्यंत तिच्या आठवणीत असलेल्या काहीजणांचे तिने लिहिलेले स्मरण लेख वाचनीय आहेत.

वाचक, पुस्तकाचे ‘अंडरटेकर्स डॉटर’ हे नाव वाचल्यावर किंवा ‘मेफिल्ड & सन फ्युनरल होम ‘ हे पहिल्याच पानावरील शब्द पहिल्यावर दबकत, पावलांचा आवाजही न करता ह्या घरात प्रवेश करतो. पण लेखिका आपल्याला इतके गंभीर होण्याचे काही कारण नाही हे तिच्या सरळ आणि खेळकर शैलीने पहिल्याच पानात सांगते .
पुस्तक, मन हेलावणाऱ्या, हृदयाला भिडणाऱ्या प्रसंगातून, शब्दांतून , एका निराळ्या आणि रोजच्या व्यवहारात ज्याचा उल्लेखही होत नाही असा व्यवसाय करणाऱ्या घराचे, त्यातल्या तुमच्या आमच्या सारख्या माणसांचे , त्यांच्या रोजच्या आयुष्याचे हृदयंगम वर्णन करणारे आहे. तरीही अर्ध्या पाऊण भागानंतर पुस्तक लांबले आहे असे वाटते. जोपर्यंत तिच्या बाळपणीच्या आठवणी आहेत तोपर्यंत ह्या ‘फ्युनरल होम मधून वाचक लवकर बाहेर येत नाही. आणि ज्युबिली गावातला मुक्कामही थोडा वाढवावा म्हणतो.

मृतदेहाबरोबर त्याच्यासाठी घरची माणसे घड्याळ अंगठी, गळ्यातल्या माळा अशा वस्तू ठेवत असतात. मृताबरोबर त्याही अखेर जमिनीत पुरल्याच जातात. पण ” मोस्टली, व्हॉट द डेड टेक विथ देम आर देअर सिक्रेट्स.” हे अंडरटेकरच्या मुलीशिवाय दुसरे कोण म्हणू शकेल?