Monthly Archives: April 2020

आई : तुमची आमची आई

रेडवूड सिटी

आई हा शब्द नाही, हाक आहे.
स्वरव्यंजनांनी शब्द होतात
आई मात्र होत नाही
शब्दांत ती मावत नाही.
कोणीतीही भाषा,असो लिपी
आई कधी लिहिता येत नाही.

आई कधी काही सांगत नाही
सदैव मात्र पाहात असते.
डोळ्यांनी तुम्ही आम्ही पाहात असतो
आई हृदयाने पाहात असते.
डोक्यांत जळमटे आमच्या विचारांची
आईच्या डोक्यात एकच असतो
मुलाबाळांचाच तो सतत असतो.

मागितलेले द्यावेसे असेल तर हो म्हणते
नसेल तसले तर नाही म्हणते
फार तर बघू म्हणते.
लाड जमेल तेव्हढेच करते
शाळेत मात्र ओढत नेते.
झालो पास,डोक्यावर हात फिरवते
प्रगति पुस्तक मागत नसते
पुढे केले सही साठी की
लिहिताी वाचती असूनही
‘त्यांच्याकडे’ बोट करते.

ती रागावली तरी ते आठवत नाही
रागावली ते समजतही नाही.
आई शब्दही नाही, हाक ती एक असते
दिली नाही तरी तिला ती ऐकू येते.

माया-ममता लाड-कौतुक वत्सल-प्रेम
आणखीही अनेक चिकटवले तिला
पण सहन सोशिकता हे सोबती कायमचे.
घरातील असो चाळीतली, फ्लॅटमधली वा टपरीतली
असो झोपडीतली शिवारातली, पुलाखालची
कि नाक्यावरची,परीक्षा रोज तिला द्यावी लागते.
तोंडी परीक्षा देतच नाही, माहिती उत्तरही देत नाही
तसेही रोजचे बोलणे मोजकेच असते.
लेखी परीक्षा रोजच असते, वेळेपूर्वी पेपर देते,
पोळपाटावरती लिहित असते
तव्यावरती टाकत असते
ताटांमध्ये वाढत असते
गेल्यावर सगळे, एकटी ती जेवत असते.

दुपारची डुलकी झाली; येतील आता सगळे म्हणत
चिवडा चुरमुऱ्यांचा करावयाला घेते.
नाही राग, लोभ नाही, इतकी ती संतही नसते
सोसणे अति होता नशीबालाच ती दोष देते.
पदराने तोंड पुसत किंचित ताठ होत
कामात पुन्हा गुंतुन घेते.

शिका चांगले, व्हा मोठे, आनंदात राहा
इतकेच ती म्हणत असते,मागणे तिचे लई नसते.
विचार मुलांचेच असतात तिच्या मनात
श्वासनिश्वासही त्यांच्यासाठीच तिचे असतात.
आई शब्दही नाही, ती एक हाक असते
दिली नाही तरी ती ऐकत असते !

सदाशिव पं. कामतकर
२६एप्रिल २०२०

संत सेना न्हावी

विठ्ठलाने आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी निरनिराळ्या रूपाने मदत केली. ते पाहिले म्हणजे तो खरा ‘बहुरूपी’ होता हे पटते.दामाजीसाठी महाराचे रूप घेऊन विठ्ठलाने सरकारी रकमेचा भरणा केला.त्याने संत जनाबाईसाठी लुगडी धुतली.संत सखूसाठी दळण कांडण केले. संत तुकारामाच्या कीर्तीला बट्टा लागू नये म्हणून हजारो शिवाजींच्या रूपाने यवनी सैन्यात मोठा गोंधळ उडवून दिला. चोखोबाच्या घरी झोपडी बाहेर जेवत असता पुजाऱ्यांनी थोबाडीत मारली चोखोबाला, पण गाल सुजून काळा निळा पडला विठोबाचा!
नामदेव लहान असल्यापासून विठोबा त्याने दिलेला नैवेद्य हा आपल्या ‘भक्ताचाच कृपाप्रसाद’ या भावनेने रोज खात असे. पण देव इथेच थांबला नाही. त्याने नामदेवाचा सगुण भक्तीमार्ग हा ज्ञान आणि योगमार्गा इतकाच श्रेष्ठ आहे हे
तीर्थयात्रेत खुद्द ज्ञानेश्वरांना सिद्ध करून दाखवले !

अनेक रूपे घेऊन आपल्या भक्तांना संकटातून सोडवणाऱ्या विठ्ठलाच्या आणखी एका रूपाची गोष्ट ऐकण्यासारखी आहे.

सेना न्हावी यवनी बादशहाच्या नगरात राहात होता.तो बादशहाचा न्हावी होता. बादशहाचे बोलावणे आले की समोरचे काम सोडून त्याला पळत जावे लागे. विशेषत: सेना पूजेला बसला की नेमके बादशहाचा निरोप यायचा.

आता हे फारच झाले हे जाणून, बादशहाचा निरोप आला की ,” सेना घरी नाही; बाहेर गेला” म्हणून सांगत जा असे बायकोला बजावून ठेवले. असे तीन चार वेळा घडले. आपण बोलावले की सेना बाहेर कसा गेलेला असतो? असा प्रश्न बादशहाला पडला असता एकदा शेजारीपाजाऱ्यांनी,” “खाविंद ! सेना खोटे बोलता है. वो घरीच देवपूजा करते बैठा असतो!” हे समजल्यावर बादशहाने सेनाला पकडून आणण्यासाठी शिपाई पाठवले.

पांडुरंगाला ही खबर न लागली तरच नवल ! तो लगोलग उठला. क्षणार्धात त्याने आपले किरीट,कुंडले, कौस्तुभमणि उतरून ठेवले. सेनासारखाच वेष केला.सेनासारखेच बिनगुंड्याचे बिन बाह्यांचे काळे तोकडे जाकीट घातले. गुडघ्या पर्यंत येणारे धुतलेले स्वच्छ धोतर नेसला. पांढरा रूमाल डोक्याला बांधला. सेनाच्या घरी आला. खुंटीवरची सेनाची धोपटी खांद्याला अडकवली. आणि ‘ झाला नाभिक पंढरीनाथ’ बादशहाचे शिपाई निघण्या आधीच राजाकडे आलाही !

सेना आलेला पाहून बादशहाचा राग निवळला. सेनाने आपले कसबी काम सुरू केले.बादशहाने मध्येच एखादे वेळी “स्स्स” केले की तिथे गुलाबपाणी लावायचा.वस्तरा पिंडरीवर चटपट चटपट करून धार लावायचा. बादशहाची हजामत करून झाली.

अभ्यंगस्नानासाठी राजेशाही हमामखान्या जवळच बादशहासाठी चांदीचे चांदतारे बसवलेला चंदनाचा मोठा चौरंग मांडला. रत्नजडीत भांड्यात सुगंधी मोगरेल ओतले. राजाच्या पाठीमागे उभा राहून सेनारूपी जगजेठी बादशहाच्या डोक्याला मोगरेलाने मालिश करू लागला. सेनाचा हात फिरू लागला तसा बादशहा सुखावला.त्याचे डोळे अर्धवट मिटू लागले. सेनाजगदीशने मस्तकावरून हात नेत त्याची वरच्यावर टाळी वाजली की राजा डोळे उघडे. त्याने मोगरेल तेलाच्या भांड्यात पाहिले आणि त्याला देदीप्यमान अशा विठ्ठलाचे मनोहर रूप दिसले. विस्मयचकित होऊन बादशहा मागे पाहायचा तर त्याला आपला नेहमीचाच सेना दिसे. असे दोन तीनदा झाले. ते दिव्य रूप पाहून बादशहा चकित झाला.सेना डोक्याला पाठीला मालिश करे त्याने तो सुखावला. सेना न्हाव्यावर खूष होऊन बादशहाने त्याला ओंजळभर सोन्याच्या मोहरा दिल्या.
सेनाजगन्नायक बादशहाला कुर्निसात करून निरोप घेऊन जाऊ लागला. पण बादशहा त्याला सोडेचना. इथेच राहा असा आग्रह करू लागला. पण “ मी घरी जातो; आणि लगेच येतो”
असे सांगून तो भक्तवत्सल, सर्वव्यापी पांडुरंग, सोन्याची नाणी धोपटीत टाकून निघाला.

सेनाच्या घरी जागच्या जागी धोपटी खुंटीला अडकवून पांडुरंग वैकुंठी गेलाही! दोन दिवस झाले आता येतो असे सांगून गेलेला सेना हजाम अभीतक आया नही ? असं स्वत:लाच विचारत बादशहाने सेनाला आणण्यासाठी शिपाई पाठवले. एकदम पाच सहा शिपाई आल्याचे बायकोकडून समजल्यावर सेना मुंडासे बांधत बाहेर आला.धोपटी अडकवण्या अगोदर वस्तरा आरसा वगैरे आहे ना हे पाहण्यासाठी धोपटीत हात घातला तर हातात सोन्याच्या मोहरा आल्या. सेना मनात दचकला. चमकला! आपल्याला अडकवण्यासाठी हा कसला डाव तर नाही ना ? अशी शंका त्याला आली. इकडे शिपाई दरडावून घाई करू लागले.

सेना बादशहाकडे पोचला. परवापासून बादशहा सेनावर खूष होताच. आजही त्याने सेनाचे हसून स्वागत केले. सेनाने कामाला सुरुवात केली. तेल मालिशची वेळ आली. चौरंगावर बसल्यावर राजा म्हणाला, “सेना, दो दिन पहले जैसा मालिश किया वैसाही करना.” “ आज भी हम तुझे सोनेकी अशर्फी देंगे.” सेना पुन्हा बुचकळ्यात पडला. पण त्याने आपले काम सुरू केले. थोडा वेळ गेल्यावर बादशहाने विचारले, “ सेना आज तुझे क्या हुआ है? परसों जैसा तुम्हारा हात नही चल रहा. क्या बात है?” हे विचारत असताना राजा रत्नजडीत पात्रात पाहात होता.

हळू हळू सेनाच्या डोक्यात प्रकाश पडू लागला. त्याचा गळा दाटून आला. “ अरे त्या परम दयाळू विठोबाने माझ्यासाठी रूप घेऊन हजामाचे काम केले. बादशहाच्या रोषातून मला वाचवले .” ह्या विचाराने त्याला रडू आले. हात जोडून तो म्हणाला,” जहाॅंपन्हाॅं! त्या दिवशी मी आलो नव्हतो. मुझे बचाने माझा विठोबा आया. तुमची सेवा करून गेला ! माझ्या पांडुरंगाने माझी लाज राखली, बादशाहा !” असे म्हणत खाली बसून गुडघ्यात मान घालून रडू लागला. गदगदून रडू लागला.

बादशहाने पुन्हा त्या मोगरेल तेलात पाहिले; आणि त्याला पुन्हा परवाचे “ सुंदर साजिरे रूप सावळे “ असा जगजेठी पांडुरंग दिसला! काय झाले असावे ते बादशहाच्या लक्षात आले. शिपायांना खुणेनेच सेनाच्या पाठीवर हात फिरवून त्याला उठवायला सांगितले.

सेना उठला पण विठ्ठलाची कृपा आठवून आठवून पुन्हा पुन्हा सदगदित होऊन स्फुंदत होताच. बादशहाला मुजरा करून परत जाण्यासाठी त्याची इजाजत मागू लागला. बादशहाने परवानगी दिली. सेना निघाला तेव्हा तो म्हणाला, “ सेना मेने भी तुम्हारे विठोबाको परसों देखा. मनमें कुछ अजीबसा होता था. बहोतही प्यारा और खुबसुरत है वो !” “ और देखो, कभी भी अपने भगवान को इतनी तकलीफ मत देना.उससे दुॲा मांगो. हमारे लिये भी !” हमारे लिये भी!”

एक रूपयाचा देव

चिन्नू मुठीत एक रुपयाचे नाणे धट्ट धरून जात होता. एक दुकान दिसल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील चिंतेची छटा कमी झाली. मोठ्या अधीरतेने त्याने दुकानदाराला विचारले, “ काका, तुमच्याकडे देव मिळतो का हो? मी विकत घेईन. मला एक देव पाहिजे.असला तर लवकर द्या हो.” दुकानदाराने चिन्नूकडे कोण चक्रम आहे हा अशा मुद्रेने पाहात हातानेच नाहीय्ये जा म्हणून धुडकावले. चिन्नू निराश होऊन दुसऱ्या दुकानात जाऊन,” दादा, मला एक देव पाहिजे. आहे का तुमच्या दुकानात? मी पैसे देईन त्याचे.” असे तळमळून विचारले. “ ए पोरा काय येडबीड लागलंय का तुला? जा देव बिव काही नाही मिळत इथं, पळ!” चिन्नू हिरमुसला झाला. एव्हढेसे तोंड करून पुढच्या चौकातल्या दुकानात गेला. तिथेही हाच प्रकार! तीच चौकशी, तेच उत्तर, व हडत हुडत करून घालवून देणे हेच घडले. होता होता एकूण चाळीस दुकाने फिरून झाली पण चिन्नूला देव तर मिळाला नाहीच पण टिंगल, हेटाळणी व उडवा उडवीची उत्तरेच ऐकायला मिळाली. चिन्नू रडकुंडीला येऊन एका खांबाखाली तोंड झाकून हुंदके देत बसला.

थोड्या वेळाने उठून तो पुन्हा कुठे देव मिळतो का पाहात एका दुकानात शिरला. इतका वेळ रुपया मुठीत धरल्यामुळे तळहात घामाने ओला झाला होता. तळवाही तांबडा झाला होता.ओला रुपया खिशात ठेवला. हातही खिशाच्या आतच पुसला.

दुकानात गेला. तिथे कोणी दिसले नाही. “ कुणी आहे का?” चिन्नूने दबकतच विचारले. एका शोकेस मागून एक हसतमुख म्हातारा आला.”काय पाहिजे बाळ तुला?” असे नेहमीच्याच आवाजात त्याने चिन्नूकडे पाहात विचारले. “बाबा! मला देव विकत घ्यायचाय हो.” चिन्नू मोठ्या आशेने दुकानदाराकडे पाहात म्हणाला. “ अरे वा! देव मिळेल पण पैसे आणले आहेस का ?” चिन्नूला आश्चर्य वाटले. इतकी पायपीट करीत किती दुकाने हिंडलो असेन. ह्या बाबाने निदान थोडी चौकशी तरी केली. “ आणले आहेत ! आणले आहेत! एक रूपया आहे माझ्या जवळ!” हे सांगताना चिन्नूने छाती फुगवायची तेव्हढी राहिली होती. “छान! नेमकी इतकीच किंमत आहे देवाची. पण तुला देव कशासाठी हवा?” चिन्नूचा चेहरा उतरला. तो खिन्न होऊन म्हणाला,” माझे काका हाॅस्पिटलमध्ये आहेत. मला ते एकटेच जवळचे आहेत.” “ आई बाबा कुठे आहेत?” “ माझे आई बाबा मी अगदी लहान असतानाच वारले. ह्या काकांनीच माझा सांभाळ केला. काका बांधकामावर जातात. काल ते उंच फरांच्यावरून खाली पडले. दवाखान्यातले डाॅक्टर म्हणाले. आता फक्त देवच काय करील ते खरं!” म्हणून मी एक रुपया घेऊन देव आणायला आलो.” चिन्नूने सांगितले ते ऐकल्यावर दुकानदार बाबा म्हणाले,” अरे देवाची किंमतही नेमकी एकच रुपया आहे.” असे म्हणत त्यांनी एक टाॅनिकची बाटली काढून चिन्नूला दिली.

देव मिळाल्याच्या आनंदात चिन्नू धावत पळत दवाखान्याकडे निघाला. काकाला,डाॅक्टरांना देव केव्हा दाखवेन असे त्याला झाले होते. रात्र झाली होती. चिन्नू धापा टाकत काकाजवळ आला. बाटली काकाजवळ ठेवत म्हणाला, “काका काका,मी देव आणलाय. आता तुला भीती नाही. देव मिळाला मला.!” सांगता सांगता दमल्या भागल्या चिन्नूला केव्हा झोप लागली ते समजले नाही.

दुसरे दिवशी सकाळी चिन्नू उठला. पण पलंगावर काका दिसला नाही. तेव्हा तो घाबरून काका कुठे आहे असे नर्सला विचारू लागला. “मोठ्या शहरातले पाच सहा डाक्टर्स आले आहेत. ते तुझ्या काकाला तपासताहेत.” नर्सने सांगितल्यावर चिन्नू मुकाटपणे काकाच्या पलंगापाशी येऊन बसला.

मोठ मोठ्या तज्ञ डाॅक्टरांनी सर्व तपासण्या केल्या. एक आॅपरेशन केले. यथावकाश चिन्नूचा काका बरा झाला.बिल आले. ते पाहून काकाला आपण हार्टफेलने मरणार असे वाटू लागले. तो बिलाकडे पाहात मनात म्हणत होता,” चिन्नू एक रुपयात देव मिळत नसतो रे!” काकाचे डोळे पांढरे होण्याच्या आत नर्स आली. ती म्हणाली,”ते बिल आहे ; बिलाचे सर्व पैसे मिळाले आहेत.त्याची ही पावती!”

काकाने सुटकेचा निश्वास टाकला.काका आणि चिन्नू बाहेर पडतांना बिलाच्या खिडकीपाशी आले. “साहेब, माझ्या बिलाचे एव्हढे पैसे कुणी भरले ते सांगता का? त्याच्या पाया तरी पडतो.” बिलाचे काम पाहणाऱ्याने कागदपत्रे वर खाली करीत तपासून पाहिली. तो म्हणाला,” एका श्रीमंत माणसाने तुमचे पैसे भरले आहेत. औषधाचे मोठे दुकान आहे त्यांचे. येव्हढे मला माहित आहे.” इतके सांगून त्याने दुसरा कागद पाहून, चिन्नूच्या काकाला त्या मालकाचे नावही सांगितले.

चिन्नूने “औषधाचे मोठे दुकान आहे” हे ऐकले होते. चिन्नू आपल्या हातातला देव दाखवत काकाला म्हणाला,” काका ज्यांनी मला हा देव दिला त्या बाबांचेच दुकान असेल.मला माहित आहे,चला.”
काका आणि चिन्नू त्या देवमाणसाला भेटायला निघाले. चिन्नूच्या हातातला एक रुपयाचा देव काकाने घेतला. त्या देवाकडे पाहात ते दुकानदार बाबाला शोधत त्या दुकानात आले.तिथे दुकानदार बाबा नव्हते. नोकर म्हणाला, “मालक सुट्टी घेऊन प्रवासाला गेले आहेत. पंधरा वीस दिवसांनी येतील. पण त्यांनी हे पत्र तुमच्यासाठी दिले आहे.”

काका पत्र वाचू लागला. जसे वाचू लागला तसे त्याचे डोळे भरून येऊ लागले. “ मला माहित आहे तुम्ही माझे आभार मानायला आला आहात. पायही धरू लागाल माझे. पण तसे काही करण्याची गरज नाही. तुमच्या, एक रुपयाच्या देवाचे,चिन्नूचे आभार माना.”

( युट्युबवर सहज समोर आलेल्या लहानशा गोष्टीच्या आधारे.)