Monthly Archives: June 2021

जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे

स्वातंत्र्यवीर सावरकर हे कवि लेखक साहित्यिक होते. विज्ञानवादी होते. उत्कृष्ट वक्ते होते.मात्र लोकांच्या मनांत ते जाज्वल्य देशभक्त रुपानेच विराजमान आहेत. मराठी वाचकांना सावरकरांची ‘ ने मजसी ने परत मातृभुमीला। सागरा प्राण तळमळला” ही कविता माहित आहे. ह्याचे कारण ती शाळेच्या क्रमिक पुस्तकातही होती. त्यांची


जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वंदे


ही देशाला स्वातंत्र्य मिळावे ह्या तळमळीतून स्वतंत्रतेलाच दैवी रूप देऊन तिची स्तुति गाणारी कविता आहे. बहुधा १९५९-६० साली ही कविता आकाशवाणीचे संगीतकार मधुकर गोळवलकर ह्यांनी ‘महिन्याचे गीत’ ह्या कार्यक्रमातून सादर केली. तेव्हापासून वीर सावरकरांची ही कविता प्रकाशात आली. त्यामुळे ती हजारो लोकांपर्यंत पोचली.अलिकडच्या शालेय पुस्तकात ही कविता घेतली आहे.


कवितेची सुरुवात ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वंदे।। ह्या संस्कृत श्लोकाने होते. सावरकरांनी बाजी प्रभु देशपांडे ह्या पराक्रमी वीराच्या पोवाड्याची सुरुवातही ह्याच श्लोकाने केली आहे.


स्वातंत्र्य, स्वतंत्रता ह्या अमूर्त संकल्पनेला त्यांनी मूर्त स्वरूप दिले. आपला देश परकीयांच्या ताब्यात आहे. परके लोक आपल्यावर राज्य करतात. त्यांच्या गुलामगिरीतून सुटका व्हावी; स्वातंत्र्यासाठी चाललेल्या लढ्यात यश मिळावे ह्यासाठी स्वतंत्रतेलाच देवी मानून कवि तिची स्तुति करतो. स्वराज्यदेवतेचे हे स्तोत्र देशभक्त कवि गात आहे.


प्रारंभीच्या श्लोकात स्वातंत्र्यदेवीचे वर्णन करताना, कवि म्हणतो,” हे महान मंगलकारी,पवित्र, आणि सर्वांचे कल्याण करणाऱ्या आणि आम्हाला यश मिळवून देणाऱ्या स्वतंत्रते भगवतिदेवी तुझा जयजयकार असो. स्वातंत्र्याची देवी भगवति, तू राष्ट्राचे मुर्तिमंत चैतन्य आहेस.तेच स्वातंत्र्य्याचे चैतन्य आमच्यातही सळसळते राहो. सर्व सदगुण आणि नीतिमत्ता तुझ्यात एकवटली असल्यामुळे तू त्यांची सम्राज्ञी आहेस. पारतंत्र्याच्या काळोख्या अंधाऱ्या रा्त्री आकाशात तू तेजस्वी ताऱ्याप्रमाणे लखलखत आहेस.


अथवा (भगवति ! स्वातंत्र्याचा तेजस्वी तारा पारतंत्र्याचा काळोख दूर करो. किंवा तुझा लखलखता तारा चमकू लागला की देशावर पसरलेला गुलामीचा अंधार नाहीसा होईल.)


पुढे नाजुक शब्दांचा सुंदर खेळ करीत कवि स्वातंत्रयदेवीचा गौरव करताना म्हणतो, फुलांचे सौदर्य आणि कोमलता तूच आहेसआणि सूर्याचे तेज आणि समुद्राची गंभीरताही तूच आहेस. त्या पुढच्या ‘अन्यथा ग्रहण नष्ट तेचि’ ह्या शब्दांतून ते स्वातंत्र्याचे सामर्थ्य व महत्व स्पष्ट करताना म्हणतात तू नसताीस तर (पारतंत्र्याच्या) ग्रहणाने ते सौदर्य, तेज आणि सखोल गंभीरता सर्व फिके पडले असते.


विद्वान योगी मुनी ज्याला मुक्ति मोक्ष श्रेष्ठ परब्रम्ह म्हणतात तीही, हे स्वतंत्रते, तुझीच रूपे आहेत. जे काही सर्वश्रेष्ठ, उदार थोर आणि सर्वोच्च आहे ते सर्व तुझे साथी सोबती आहेत. (तेही नेहमी तुझ्या बरोबरच असतात.)


शत्रंचा संहार करताना, त्याच्या रक्ताने रंगलेल्या चेहऱ्याने अधिकच सुशोभित दिसणाऱ्या स्वातंत्र्यदेवते, सर्व चांगले सज्जन लोक तुझीच पूजा करतात; तुझ्यासाठी लढता लढता आलेले मरण हेच खरे जगणे; जन्माला आल्याचे ते सार्थक आहे. हे स्वतंत्रते तू नसलीस ( देश स्वतंत्र नसला तर) तर ते कसले जिणे? ते मरणाहून मरणे होय ! स्वातंत्र्य हेच जीवन, पारतंत्र्य हेच मरण! निर्माण झालेले सर्व काही, सकल प्राणीमात्र तुलाच शरण येते. ह्या भावनेतूनच कवि तळमळीने विचारतो,”तू आमच्या देशाला कधी जवळ करशील? आम्हा देशवासीयांना हे स्वतंत्रते, ममतेने कधी हृदयाशी धरशील? “
पांढऱ्या शुभ्र बर्फाने झाकलेल्या हिमालयाच्या मोहातून शंकरही सुटला नाही. हिमालयाला त्याने आपले घरच मानले. मग तू इथे का रमत नाहीस? अप्सराही इथल्याच गंगेच्या, चंद्रप्रकाशा सारख्या रुपेरी पाण्याच्या आरशात पाहून स्वत:ला नीट नेटके करतात.मग स्वातंत्र्यदेवी तुला आमच्या देशात का करमत नाही? आमच्या देशाचा तू का त्याग केलास? पाहिजे असेल तर तुझ्या वेणीत घालायला तुला इथे रोज ‘कोहिनूर’ चे ताजे फुलही आहे. ह्या सुवर्णभूमीत तुला कशाचीही कमतरता पडणार नाही.


आमची भारतमाता सर्व समृद्धीने भरली असता,तू तिला का दूर लोटलेस? कुठे गेली तुझी पुर्वीची माया ममता ? तू तिला परक्यांची दासी केलेस. माझा जीव तळमळतो आहे. यशाने युक्त असलेल्या स्वातंत्र्यदेवते! तुला वंदन करून मी हेच विचारतो की तू आमचा त्याग का केलास? आमच्या देशाला तुझ्यापासून का दूर लोटलेस? हे स्वतंत्रते! ह्याचे उत्तर दे.