Monthly Archives: April 2012

रद्दी वाचन

रेडवूड सिटी

गेल्या काही वर्षांपासून आपल्या महाराष्ट्राच्या लोकराज्य मासिकाचे स्वरूप खूपच बदलले आहे. मध्यंतरी त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्यावर चांगले आणि वाचनीय अंक काढले होते. आताही जून-जुलै२०११ मध्ये फारच सुंदर आणि संग्रही ठेवावा असा वाचनावर, ’वाचन: एक अमृतानुभव’ या नावाचा अंक प्रसिध्द केला.

नामांकित लेखक, समीक्षक, संपादक, कादंबरीकार, कवी यांचे लेख तर आहेतच आणि प्रख्यात प्रकाशक यांचे त्यांच्या काही गाजलेल्या पुस्त्कांविषयीचे लेखही आहेत.त्याशिवाय अनेक नामवंतांनी त्यांच्या आवडीच्या पुस्तकांची यादीही दिली आहे. १९८६ साली महाराष्ट्र टाईम्सने  मराठी साहित्यातील लेणी म्हणून सुमारे १५० उत्कृष्ट पुस्तकांची यादी केली होती तीही यात आहे. मराठीच्या अभ्यासकांना, संशोधकांन उपयोगी पडतील अशा शंभर एक  अशा महत्वाच्या ग्रंथांची नावेही आहेत. एकूणच अंक मोलाचा आहे. हा अंकच पुढे संदर्भासाठी वापरला जाईल!

हे सर्व लेख,अनेक मोठ्या लोकांच्या आवडीच्या आणि महाराष्ट्र टाईम्सची ती १५० पुस्तकांची यादी वगैरे वाचताना, आनंद तर वाटत होताच पण यातील बरीच पुस्तके आपण पूर्वीच वाचली आहेत, माहितीची आहेत याचा माझा मलाच आनंद झाला.

बरेच वेळा अनेक मोठी माणसे “मला ह्यांच्यामुळे, “त्यांनी एक पुस्तक वाचायला दिले, “एक पुस्तकाचे दुकान होते”  वगैरे वगैरे आपल्या वाचन संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाची प्रेरणा, स्फूर्तिस्थाने सांगतात. अनेक शिक्षणतज्ञ, बाल मानसशास्त्रज्ञ म्हणतात घरात मुलांना दिसतील अशा जागी पुस्तके मासिके वगैरे ठेवावीत म्हणजे लहानपणापासून अक्षर ओळख होते. वाचनाची गोडी लागते.हे सगळे अनुभवसिध्द बोल. यांचे मोल मोठेच आहे.

मला(म्हणजे आम्हा भावंडांना) वाचनाची केव्हा आणि कशी गोडी लागली हे सांगता येणार नाही. वाचनातून काय मिळाले, मिळते हे सुध्दा नेमक्या आणि योग्य शब्दांत सांगता येणार नाही. निदान मला तरी. महिन्याचा किराणा, बाजार आणला की पुडे, पुड्या सोडताना, सोडून झाल्यावर, इकडे आई वस्तू डब्यात भरते आहे आणि अण्णा ते वर्तमानपत्राचे एकेक कागद घेऊन वाचत बसलेले.. त्यात टाईम्स सारख्या इंग्रजी वर्तमानपत्राचे कागद असायचे. मराठी वर्तमानपत्रांचेही असत. बातम्या तर शिळ्या झालेल्या मग वाचत काय असत? नंतर पुढे समजले की त्यात लेख काही अग्रलेख, वगैरे फार शिळा न होणारा मजकुरही असतो. आबासाहेबांकडेही हिच तऱ्हा! तेही असेच ती पाने वाचण्यात तल्लीन! घरी रोज एखादे वर्तमानपत्र येत असेच. पण महिन्यातून एकदा होणाऱ्या या वाचन सोह्ळ्याची न्यारीच मजा. पुढे मीही, जोपर्यंत दुकानदार कागदाच्या  पुड्यातून वस्तू देत असत तो पर्यंत, असेच ती रद्दीची पाने, तुकडे घेऊन वाचत असे! शाळा कॉलेजात असताना सिनेमाच्या जाहिराती, परीक्षणे, चुकुन माकून रविवारचे एखादे पान मिळाले तर मग पुस्तक परिक्षण, एखादा लेख असे वाचायला मिळे. पण हे सर्व अर्धवटच असायचे. पुडे बांधणारा टरकन पाहिजे तेवढा कागद फाडणार! तो जर वाचणारा असता तर त्याची नोकरी कधीच गेली असती.

दहावी-अकरावी पर्यंत शाळेची मराठीची पुस्तके वाचणे हासुध्दा एक मोठा आनंद असे. त्या आनंदात आणखी भर म्हणजे माईच्या शाळेत निराळे पुस्तक असायचे.(आचार्य) अत्रे-कानेटकर(कवि गिरीश) यांचे अरूण-वाचन असे त्यांना.आणि आमच्या शाळेत काही वर्षे उदय वाचन आणि मंगल वाचन असायचे. आमचीही पुस्तके चांगली असायची पण अरूण-वाचनला तोड नाही. तीच गोष्ट इंग्रजीच्या पुस्तकांची. सेवासदनला ग्लिनींग्ज फ़्रॉम इंग्लिश लिटरेचरचे भाग बरेच आधीपासून होते. आम्हाला ते नववी का दहावीपासून आले.

घरात कोणत्याही कपाटात पुस्तके असायचीच. त्यांत गुळगुळीत कागदावर छापलेली अगदी जुनी पाठ्यपुस्तके असायची.(बहुतेक नवयुग-वाचनमालेची असावीत) पण सुंदर धडे, कविता त्यात असायच्या. गोष्टीच वाटायच्या इतके मनोरंजक धडे. जुन्या प्रख्यात मासिकांचे सुटे अंक, एकेका वर्षाचे  बांधलेले काही गठ्ठेही पडलेले असत. यशवंत, मासिक मनोरंजन सारखी मासिके म्हणजे उत्तम दर्जाची मासिके कशी असवीत यांचा आदर्श. त्यात वि.स. खांडेकरांच्या गोष्टी, य.गो जोशींच्या कथा, यशवंत, माधव ज्युलियन, यांच्या कविता, आपल्या अणांच्या कथा, कविताही होत्या.मासिक मनोरंजन madhye पहिल्या पानावर कविता चापून येणे हा मोठा सन्मान समाजाला जात असे. आपल्या अण्णांच्या कविता बरेच  वेळा  पहिल्या पानावर छापून आल्या होत्या.  आबासाहेबांकडे रत्नाकर, अभिरुचि यासारख्या दर्जेदार मासिकांचे काही वर्षांचे अंक, त्यातच वाचलेले वसंत शांताराम देसाई यांचे बालगंधर्वांवरचे अप्रतिम लेख वाचल्याचे आठवते.याचेच पुढे पुस्तक झाले. आबासाहेब, किर्लोस्कर, स्त्री हे अंकही नियमित घेत असत काही काळ. तेही वाचत असू आम्ही.

अण्णांच्या कपाटात तर आम्हा सर्वांना आवडणारा रुपेरी खजिनाच होता. पण तो बराच काळ आम्हाला सापडत नव्हता. पण योग्य वेळीच मिळाला असे वाटते आता. त्याकाळी मराठी सिनेमे उत्कृष्ट असत. कथाकारांची कवींची नावं ऐकलीत तरी छाती दडपून जाईल! आचार्य अत्रे, वि.स. खांडेकर, विश्राम बेडेकर,चिं.वि.जोशी, ना.ह. आपटे, राजा बढे, स.अ. शुक्ल,वि.वि. बोकील असे लोक चित्रपट कथा-गाणी लिहित.यापैकी शिवराम वाशिकर हे साहित्यिक लेखक म्हणून फारसे माहित नव्हते पण चित्रपटांमुळे ते लोकांना माहित असावेत. त्यांचे संवाद फार प्रभावी असत.. या बऱ्याच सिनेमांची पुस्तके आमच्याकडे होती. ती वाचणे ही एक मोठी मेजवानीच असे. ब्रम्हचारी, ब्रँडीची बाटली, सिनेमे वाचताना हसून हसून पोट दुखे. पोट दुखायचे नाही तरी चिं.वि. जोशींचा “सरकारी पाहुणे”मधील दामुअण्णा मालवणकरांचे  आणि विष्णुपंत जोग या जोडगोळीचे संवाद वाचताना भरपूर हसायचो.इतरही अनेक उत्तम सिनेमांची पुस्तके होती. यादी फार लांबेल म्हणून थांबतो. दु:खाची गोष्ट म्हणजे नंतर पुढे कधीही ह्यातील एकही पुस्तक सापडले नाही! फार वाईट वाटते. आजही त्या सिनेमांची ती पुस्तके वाचताना तितकाच आनंद आजच्या पिढीलाही झाला असता. दुर्मिळ,अगदी दुर्मिळ पुस्तके आम्ही गमावली.

हॉलमधल्या कपाटात एक अद्भुत पुस्तक होते. हिरव्या कापडी बांधणीचे चांगले जाडजूड होते. त्यात प्रकरणे नव्हती, अध्याय नव्हते, धडे नव्हते,खंड नव्हते तर स्तबक होते! प्रकरणासाठी म्हणा किंवा भागासठी असे नाव पूर्वी कधी वाचले नव्हते. हे नव्हते ते नव्हते असे मी म्हटले खरे, पण ह्या पुस्तकात काय नव्हते असा प्रश्न पडावा असे ते अपूर्व पुस्तक होते. यात सिंदबादच्या सातच काय सातशे सफरी होत्या, अरेबियन नाईट्स हजारो असतील, हॅरी पॉटर ची जादू म्हणजे नुसते पुळक पाणी वाटावे, तर ट्रॅन्स्फॉर्मर्स, अवतार(इंग्रजी), आणि असले इतर सिनेमे म्हणजे या पुस्तकातील गोष्टींची नक्कल वाटावी इतके गुंग करणरे ते पुस्तक होते. त्याचे नाव “कथा-कल्पतरु!” पुराणातील कथाच होत्या. देव-दानवातील भांडणे, वगैरे नेहमीच्या अशा गोष्टी होत्याच पण देवा देवातील भांडणे, ऋषी-मुनीतील स्पर्धा, इतके अवतार, मल्टि-स्टार सिनेमात नसतील इतकी हजारो पात्रे, लढाया, अस्त्र-मंत्र-तंत्र,शाप-उ:शाप, व्रते-उपासना त्यांची फळे-परिणाम,त्याग-भोग सर्व सर्व होते. मी आणि शामने तर देव वाटून घेतले होते. या पुस्तकाने आमच्या सारख्या साध्या मध्यम वर्गाच्या मुलांचे बाळपण दैवी केले! समुद्रमंथनातून चौदाच रत्ने निघाली पण कथा कल्पतरु मध्ये अशी असंख्य रत्ने होती! आता ते पुस्तक कुठे मिळत नाही. पुस्तकाचे बाईंडिंग खिळखिळे झाले होतेच तरीही पुस्तक बरीच वर्षे होते. पण नंतर ते कधी सापडले नाही!

घरीच असणाऱ्या आणखी पुस्तकापैकी दत्तो अप्पाजी तुळजापुरकरांचे माझे रामायण, लक्ष्मीबाई टिळकांचे स्मृती-चित्रे,  कोल्हट्करांचे सुदाम्याचे पोहे, राम गणेश गडकरी यांचे  बाळकराम आणि त्यांची इतर सर्व नाटके. सुदाम्याचे पोहे, बाळकराम  आणि चि. वि. जोशी आणि आचार्य अत्रे यांनी आम्हाला नेहमी हसत ठेवले! गडकऱ्यांच्या नाटकांतील धारदार, पल्लेदर वाक्ये थक्क करून सोडत, मोठ्याने म्हणून पाठ करण्याचा प्रयत्न करत असू.(नंदूने शाळेच्या गदारिंग मध्ये राजसंन्यास मधील संभाजीचे  स्वगत “मुंग्यांनी मेरुपर्वत तर गिळला नाही ना ” म्हणून दाखवले होते) तर त्यांचे विनोदी संवाद हसवून हसवून मुरकंडी वळवत. देवलांच्या शारदेचे संवाद हृदयाला पीळ पाडीत तर त्यांचा फाल्गुनराव आणि भादव्या हसवून सोडीत. तीच गोष्ट आचार्य अत्रे यांच्या नाटकांची. आजही आपल्याला पु.लंची, सखाराम गटणे, अंतू बर्वा, रावसाहेब जसे आठवतात तसेच गडकऱ्यांची सिन्धू, तळीराम, गोकूळ, आचार्य अत्रे यांचा औदुंबर, बगाराम,चि.वि. जोशींचे चिमणराव, गुंड्याभाऊ वगैरे आठवतात. अशी अजरामर नाटके आम्हाला घरी वाचायला केव्हाही मिळत!श्रेष्ठ नट चिंतामणराव कोल्हटकरांचे बहुरूपी हे आत्मचरित्र आणि गोविंदराव टेंबे-प्रख्यात हार्मोनियम   वादक आणि संगीत दिग्दर्शक यांचीही  आत्मचरित्रे  सुंदर, वाचनीय होती.

आबासाहेब शाळेतून आमच्यासाठी ना.धों. तामण्ह्करांचे गोट्या, मुलींसाठी चिंगी अशी पुस्तके आणत. आमच्याकडे वि. वि. बोकीलांच्या दोन उत्तम कादंबऱ्या होत्या. द्वंद्व आणि बेबी. या लेखकाचे नावही आजच्या पिढीला माहित असणे शक्य नाही. गोट्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी बोकीलांचा वसंत होता. हा सुध्दा अनेकांचा दोस्त होता. त्यातच खानोलकरांच्या चंदूची भर पडली. हे सगळे मस्त खेळगडी होते.  शालापत्रक, खेळगडी, देवगिरिकरांचे चित्रमय-जगत ही मासिकेही चांगली असत. आबासाहेबांकडे लोकमान्या टिळकांच्या आठवणी हे अतिशय वाचनीय, आणि मोठे पुस्तक होते. लेखक-संकलक बापट(आद्याक्षरे आठवत नाहीत) असावेत. टिळकांचे निराळे चरित्र वाचण्याची त्यामुळे गरज भासली नाही.

या सगळ्या यादीत ना.सी. फडके, वि.स. खांडेकर कसे नाहीत? हे ही होते. पण आम्हाला हे दोघे लेखक फारसे आवडत नसत. वि.स. खांडेकर तर अण्णांचे मित्र. त्यांची बरीच पुस्तके भेट म्हणून अण्णांना येत.खांडेकरांचे खलिल जिब्रानच्या शैलीने लिहिलेल्या लघुनिबंधासारखे लेखांचे पुस्तक मात्र छान होते. त्यांच्या आणि फडक्यांच्या दोन तीन कादंबऱ्या चांगल्या होत्या. पण खांडेकरांनी लिहिलेल्या काही सिनेमांच्या कथा आणि संवाद गाणी वगैरे  फार सुंदर होती.

कवितांचे काय? त्याही होत्या पुष्कळ. केशवसुत, माधव ज्युलियन-“मराठी असे आमुची मायबोली” यांचीच कविता-, यशवंत, गिरीश, तर होतेच पण त्या वेळचे बरेच आधुनिक कविही होते.कुसुमाग्रज, वि.म. कुलकर्णी, संत, कवि अनिल, बा.भ. बोरकर, आणखीहि काही होते. शाळेच्या पुस्तकातील कविता आणि इतर दुसऱ्या कविताही, अगदी इंग्रजी सुध्दा,-माई तर त्या मराठी कवितेच्या चालीवर म्हणत असे -, आम्ही म्हणतही असू.

इंग्रजी पुस्तकांचीही गर्दी  होतीच. आमच्या घरी आणि आबासाहेबांकडेही. आणि त्या पुस्तकंमुळे आम्हाला ऑक्स्फर्ड प्रेस, हार्पर-कोलिन्स, पेन्ग्विन,मॅक्मिलन अशा प्रकाशकांची नावेही माहित झाली. विल ड्युरांट,स्पेन्सर वगैरे तत्वज्ञांशी ओळख नव्हती, पण सॉमरसेट मोघॅम-चुकलो, मॉम, थोडा शेक्स्पिअर-म्हणजे त्याच्या नाट्कांच्या गॊष्टींची पुस्तके-,sheridan ची i नाटके, शॉ, पी.जी. वूडहाऊस. बॉस्वेल(डॉ. जॉन्सनचे चरित्र), ग्राहम ग्रीन, रॅटिगनचे विन्स्लो बॉय नाटक-अण्णांनी हे वाचा म्हणून सांगितलेल्या काही पुस्तकांपैकी एक-, मॉडर्न इंग्लिश प्रोज, एसेज, अशी आणखी बरीच पुस्तके आमच्या वाचनात असत. येशू खिस्तासंबंधी  असलेले एक पुस्तक अण्णा नेहमी उल्लेख करीत, ते म्हणजे इमिटेशन ऑफ ख्राइस्ट! पण ते वाचले नाही. पण आता ते वाचायचे ठरवले आहे. पण एका पुस्तकाविषयी मात्र सांगितलेच पाहिजे. ते म्हणजे “हिडन इयर्स ऑफ ख्राइस्ट”! इंग्रजी नाही, त्याचे मराठीतले भाषांतर, “प्रभूचे अपरिचित चरित्र!” फार छान पुस्तक आहे. जुन्या ख्रिस्ती मराठी पुस्तकासारखी कृत्रिम, बोजड मराठी भाषा यात अजिबात दिसणार नाही. सगळ्यांनी वाचावे असे हे पुस्तक आहे.  स्थानिक अमेरिकन मराठी मिशनने हे काम केले.त्यांच्या पध्दतीप्रमाणे त्यांनी लेखकाचे नाव छापले नाही. हे पुस्तकही आमच्याकडे आज नाही!

कॉलेजमधे गेल्यावर तर पु.ल., गो.नी. दांडेकर, ग.दि. आणि व्यंकटेश माडगुळकर, चि.त्र्यं.खानोलकर, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पु.भा.भावे,वगैरे मान्यवर वाचनात आले होते. आचार्य अत्रे अजुनही जोरात होतेच….हे कधी संपणार असे तुम्हाला वाटण्या अगोदर थांबले पाहिजे. किती पुस्तके, त्यांच्या किती गोष्टी! त्या संपणार नाहीत.आम्ही सर्वजण केव्हा वाचू लागलो, काय काय वाचले,त्यावर किती गप्पा झाल्या, काय काय आणि किती सांगणार! तरी हे सर्व माझ्या कॉलेजच्या सुरवातीच्या दिवसापर्यंतचेच आहे! आणि काही याद्या, गोष्टी थोडक्यात आटोपल्या आहेत. ( अरे बाप रे! हे थोडक्यात? सविस्तर काय असेल!)

अण्णांनी पुस्तके वाचा असे कधीही सांगितले नाही. पुढे नंतर नंतर,”हे वाचा” असे सांगत पण त्याही पेक्षा त्यांनी किंवा आमच्यापैकी कोणी काही नवीन वाचले त्यावर कधी गप्पा व्हायच्या, त्यातूनच पुन्हा नवी नवी पुस्तके वाचली जायची. पुस्तके पुस्तकेच होती. त्यांचे ग्रंथ झाले नव्हते. वाचन म्हणजे वाचणेच होते. त्याची संस्कृती झाली नव्हती. वाचण्याचा आनंद होता.अमृतानुभव झाला नव्हता, असे ते दिवस होते. आम्हा सगळ्यांचे ते पुस्तकांचे दिवस होते. आमचे घरच पुस्तकांचे होते!

आज ते दिवसही नाहीत, ती पुस्तकेही नाहीत आणि आमचे ते घरही नाही!