Monthly Archives: July 2019

सुखाचा सदरा

शीव

“ही सगळी चित्रे मी घेऊन जातो. तुम्हाला चार पाच दिवसांत परत पाठवतो.” येव्हढे बोलून त्या माणसाने माझी सगळी चित्रे घेतली.एका चांगल्या कागदात घेऊन आपल्या गाडीत काळजीपूर्वक ठेवली. माझ्याकडे पाहात हात हलवून गेला.

मी काही फुटपाथवर माझी चित्रे मांडून बसलो नव्हतो. आमच्या काॅलेजातील एका झाडाखाली मी व माझे मित्र बोलत होतो. मधून मधून माझी चित्रे दाखवत होतो. आणि हा बूट टाय घातलेला तीस-बत्तीस वर्षाचा तरूण मागे येऊन कधी उभा राहिला ते आमच्या लक्षातही आले नाही. मग चित्रे पाहात, बोलताना त्याने माझे नाव गाव पत्ता सहज विचारूनही घेतला होता! मला हो नाही म्हणू न देता थोडेसे हसत माझी चित्रे घेऊनही गेला. मित्रांनी तर मला धारेवर धरले. “ अरे तू गप्प काय बसला होतास? कोण कुठला आणि एक नाही सगळी चित्रं घेऊन गेला की तुझी ! नुसता बघत काय होतास?” “ तुम्हीही काही बोलला नाहीत! अरे तुम्ही माझे दोस्त ना? तुम्ही का बोलला नाहीत त्याला? आणि मलाच विचारता? जाऊ देऽ! मी काही आचरेकर, सातवळेकरांसारखा मोठा किंवा भोसले आणि यल्ला-चदासी इतका प्रसिद्ध सिने होरडि्ंग्जचा चित्रकारही नाही म्हणा!”

घरी आलो. आई बाबांना काही सांगण्याचा प्रश्नच नव्हता. बहिणीला मात्र रात्री सांगितले. ती बराच वेळ काही बोलली नाही. नंतर म्हणाली, उद्या काॅलेजच्या आॅफिसात विचार तो कोण होता ते. दुसऱ्या मुलांनाही विचार. नाहीतर शेवटी प्रिन्सिपाॅलचे पी. ए. आहेत ना डीआरडी, त्यांना विचार तो कोण,होता ते” मी व माझ्या मित्रांनी दुसरे दिवशी काॅलेजातील बहुतेक सगळ्यांना विचारले पण कुणालाच त्याची माहिती नव्हती.मात्र बऱ्याच मुलांनी त्याला पाहिला होता.पीएनां तो भेटला,”पण त्याने कार्ड वगैरे दिले नाही. सर्व एचओडी,मी आणि प्रिन्सिपाॅल मिटींगमध्ये होतो म्हणून तो निघून गेला,” इतकेच ते म्हणाले.

मी त्या आठ दिवसांत एकही चित्र काढले नाही की रेघही ओढली नाही. माझ्या गेलेल्या चित्राच्या चिंतेतच होतो. काल कुरियरचा माणूस एक सुंदर लांब पाकीट “मी इथेच राहतो का,हेच कोटम नगर का” विचारत घरी आला. पाकिटावरचा तो मीच हे समजल्यावर तो चिडचिड करत इथे सही करा.म्हणाला. मी पाकिट घेतले. जातानाही तो आठ्या घालून रस्त्यातले अडथळे उड्या मारत, लांब ढांगा टाकत, पार करत होता. काय करणार मी तरी. आम्ही कोणीच इथे हौसेने राहात नव्हतो!

पाकीट फोडून पत्र वाचले. माझ्या तोंडाचा जो आऽऽ झाला तो मिटेचना. डोळ्यांवर विश्वास बसेना. ते पत्र हातात घेऊन मी तिथल्या तिथेच किती पळालो असेन, दोन्ही हात वर करून किती उड्या मारल्या असतील ते सांगताच येणार नाही. ते पत्र किती तरी वेळा वाचले असेल. बहिणीची वाट पाहात बसलो. पण धीर धरवत नव्हता. मोठ्याने ओरडावेही वाटत होते. घरातल्या घरात फेऱ्या मारत होतो. आईने अरे काय करतो आहेस? काही झालेय का? विचारल्यावर काही नाही म्हणत मान हलवत होतो.

बहिण आल्यावर तिला “इकडे ये” असे हात करून बोलवत होतो. पण ती लगेच आली नाही. तरी बरे एक वर्षाने का होईना लहान आहे माझ्यापेक्षा. ती आली. मी तिला पत्र दाखवले. तिनेही डोळे विस्फारले! पत्रात माझी चार चित्रे कंपनी विकत घेणार आहे. त्या चार चित्रांच्या पुढे त्यांनी किंमत लिहिली होती. हजारोंच्या आकड्यांची ती रक्कम पाहून मला हर्षवायु व्हायचेच बाकी राहिले होते.पत्रात शेवटी लिहिले होते की किंमती मान्य असतील तर कळवावे व परवा आॅफिसमध्ये यावे असेही
लिहिले होते.

बहिणीने मला विचारले काय करायचे? मी म्हणालो,” हो म्हणून कळवणार! “ बहिण म्हणाली,” नाही अजिबात नाही. दोन चित्रांच्या किंमती वाढवून कळव.” ज्या दोन चित्रांच्या किंमती त्यांनी जास्त देऊ केल्या होत्या त्यापैकी एका चित्राची व ज्या चित्रांचे त्यांनी पैसे कमी देऊ केले होते त्यापैकी एका चित्राची अशा दोन चित्रांसाठी मी जास्त रक्कम मागितली. बहिणीने नंतर सांगितले की परवा तुला जमणार नाही असेही कळव. मी तेही लिहून टाकले. आणि तिला विचारले ,” असं का? मग जायचं केव्हा? “ “पुढच्या आठवड्यात मंगळवारी येईन म्हणावे.” मी तेही लिहिले. दुसरे दिवशी पत्र पोष्टात टाकले.

चार दिवसांत त्यांचे त्यांना आम्ही कळवलेल्या किंमती मान्य आहेत व पुढच्या आठवड्यात बुधवारी येण्यास सांगितले. आम्ही पत्र वाचले. मी बहिणीला पुन्हा विचारले,” किंमती का वाढवल्या! वेळ नाही असे का कळवले आपण? अगं,इतके पैसे बघितले तरी होते का? मोजता तरी येतील का? त्यांनी दिलेलेच खूप होते!” ती मला वेड्यात काढत म्हणाली,” म्हणूनच! अरे दादा, तू साधा आहेस. तुझे महत्व वाढवून घेण्यासाठी तसे लिहायला सांगितले.”

माझे महत्व वाढले की नाही ते मला अजूनही माहित नाही. पण माझी बहिण व्यवहारचतुर आहे हे नक्की. मी तिला घेऊनच कंपनीच्या आॅफिसमध्ये पोचलो. बाहेरून ती इमारत पाहताना छाती दडपून गेली. चकचकीत काचांची आणि किती उंच! इमारतीच्या काचेत आकाश, समोरची झाडे, पक्षी, थोडी रहदारी ह्यांची खऱ्या पेक्षा चांगली दिसणारी प्रतिबिंबे पाहात मी थोडा वेळ उभा होतो. दरवाजा लोटण्याची गरजच नव्हती. जवळ जाताच आपोआप उघडला. आत गेल्यावर आतील उंचावरचे छत, आणि गुळगुळीत फरशी. फरशी कशी म्हणायची त्या डोळ्यांना शांत करणाऱ्या मखमली जमीनीला! पाय न ठेवता अलगद जावे वाटणारी अशी ती शोभा होती. आणि झालेही तसेच. लिफ्टमध्ये कसे जायचे हे कोडे सुटण्या आधीच अलगदपणे आम्ही वरच्या मजल्यावरील एका गुबगुबीत कोचात बसलो होतो! समोरा समोरच्या भिंतीवर चित्रे होती. माझीच! जवळ जाऊन पाहिली. काय सुंदर दिसत होती! कोंदणामुळे रत्नालाही अधिकच तेज येते म्हणतात.कधी नव्हे ती माझी बहिणही माझी चित्रे पाहात होती. मी त्याच खुषीत होतो.

समोरून टक्कल पडायला लागेल असे एक चष्मा घातलेले गृहस्थ हसत आले. मला व बहिणीला चला म्हणत ते एका प्रशस्त खोलीत घेऊन गेले.स्वत: खुर्च्या मागे घेत आम्हाला त्यांनी खुर्च्यांत बसवले. आपल्या खुर्चीवर बसल्यावर त्यांनी आमची नावे पुन्हा विचारून ते बोलू लागले. चित्रे केव्हा पासून काढतोस, कोणी शिकवले, वेगळ्या क्लासमध्ये जात होतास का, आवडते चित्रकार कोण असे विचारल्यावर मी दोन चार नामांकित चित्रकारांची नावे सांगितली. पण पुढे जाऊन सिनेमाची मोठमोठी होर्डिंग्ज करणारे, नट-नट्यांना त्यातून मूर्तिमंत उभे करणारे, कमळाच्या पानावरील पाण्याच्या थेंबांना मोत्याचे पाणी देणारे मनोहर,जी.भोसले, यल्ला-दासी ह्यांची नावे मुद्दाम सांगितली! ते ऐकून भुवया उंच करून हसत ते माझ्याकडे पाहू लागले.

आपले काही चुकले असावे वाटून मी बहिणीकडे पाहिले.तिने डोळ्यांनीच व माझ्या हातावर थापटत काही चुकले नाही सांगितले. धीर आला. मग ते उठत आम्ही कुठे राहतो विचारल्यावर मी कोटम नगर म्हणालो.ते गंभीर झाले असावेत. पण लांब पाहावे तसे पाहात उभे होते.आम्हाला वाटले की कोटम नगर खूप दूर आहे की काय! हो का येव्हढेच म्हणत ते आम्हाला घेऊन बाहेर आले.

माझ्या चित्राच्या भिंतीजवळ एका बाजूने आम्ही गेलो. तिथे दरवाजा होता. आम्ही येतोय हे पाहून दरवाजा स्वत:च आपोआप उघडला. आत गेलो तर समोर आरशाची भिंत होती. पण त्यात आम्ही कोणी दिसलो नाही. आमच्या डाव्या उजव्या बाजूला सुंदर झाडे होती! साहेब एका फांदीला धरून होते. लगेच त्या आरशाची चांदण्याची वाट झाली, त्या वाटेवरून मी व बहिण तोंडात बोटे घालूनच चालत होतो! मध्ये एक वरून येणारा धबधबा दिसला. साहेबांनी आम्हाला तिकडे नेले.आम्ही कंपनी,आॅफिस सगळे विसरून पाण्याखाली हात धरले. आजूबाजूला थेंब उडाले.पाणी पिऊन तोंडावरून गार पाण्याचा हात फिरवावा म्हणून ओंजळ तोंडाजवळ नेली पण ओंजळ रिकामी होती! साहेब तो पर्यंत पुढे जाऊन थांबले होते. त्यांनी आम्हाला काय झाले वगैरे काही विचारले नाही. आम्ही पहिल्या साहेबांच्या दालना पेक्षा दुसऱ्या मोठ्या खोलीत आलो.बहुतेक हे आणखी मोठ्या साहेबांचे आॅफिस असावे. साहेब मोठे असतील. पण आमच्या बरोबर आलेल्या साहेबांपेक्षा तरूण होते. ते तोंडभर हसून हाय हॅलो करत पुढे आले.

ते म्हणाले, “ तू पेन्सिल,चारकोल, ब्रशने चित्रे काढतोस. तू काढलेली पोरट्रेट्स पाहिली. अजून सराव चालू ठेव.आणि आमचे आर्ट डिपार्टमेंटचा स्टाफ म्हणत होता की तू आॅईल पेंट तर करच पण आवड असल्यास शिल्पकामही कर.” माझे लहान काम ही मोठी माणसे इतके बारकाईने पाहतात तेच पुष्कळ होते!

मी गप्प बसलेला पाहून पहिल्या साहेबांनी चहा आणायला सांगितला. कुणाला ते समजले नाही. पण रुबाबदार पोषाखातल्या एकाने चहा बिस्किटे आणली. मी व बहिणीने कपात बोट बुडवुन कपात चहा आहे ह्याची खात्री करून घेतली. दोघे साहेबही हसले. मोठ्या साहेबांनी ,” बिस्किटेही खरी आहेत” म्हणत बिस्किट खायला सुरवात केली!

चहा झाल्यावर मोठे साहेब उठलेले पाहून आम्हीही उठलो.”चला” म्हणत बाजूच्या भिंतीकडे गेले. आम्ही तिघेही तिकडे गेलो.भिंतीची लिफ्ट कशी झाली समजले नाही.खाली जातोय की वर हे न समजल्यामुळे मी व बहिण आतून घाबरून गेलो. पण काही क्षणात आम्ही अर्ध चंद्राकार स्टुडिओत होतो.हे आमचे आर्ट,ॲनिमेशन डिपार्टमेंट. पार पलिकडे दिसते ते रोबोटिक्स लॅब आहे साहेब सांगत होते. पण मला ती आपली नेहमीच्या माणसांसारखी वाटली.काही स्त्रिया, पुरूष निरनिराळ्या वयांची मुले; असे पाहात होतो. निरनिराळ्या जागेत बरेच जण काम करत होते. त्यातही तिघे वरिष्ठ असावेत. दोन मोठ्या साहेबांना पाहिल्यावर ते तिघे सामोरे आले. त्यांचे काही बोलणे झाले. ते चालू असता एका वरिष्ठाने मला चित्रकारांच्या घोडीकडे,(फळ्याकडे)नेले. त्यावर कॅनव्हास होते. ते म्हणाले,” तुला वाटेल ते रंगव.” मी म्हणालो,” मला कॅनव्हसवर काढण्याची सवय नाही.” ते हसले. त्यांनी ते कॅनव्हस काढले.खाली दर्जेदार ड्राॅईंग पेपर होता. मी समोरच्या भव्य चंद्राकार काचेत दिसणारे प्रतिबिंबच काढू लागलो. ते पाहून वरिष्ठांना आश्चर्य व माझ्या उत्स्फूर्ततेचे कौतुक वाटले. ते हसले. इतरांनाही त्यांनी खुणेने मी काय रंगवतोय ते पहायला सांगितले.

त्या प्रचंड अर्ध गोलाकार सभागृहात -हो सभागृहा येव्हढा- विशाल हाॅल होता. तिथे काय नव्हते. सर्व कला व कलाकार होते. वादन, गायन, नृत्य, अभिनय सगळे कला प्रकार दिसत होते.शिल्पकला ही चालू होती.कुणी भाषणही करत असावेत. हे सर्व दिसत होते. पण अधल्या मधल्या अदृश्य काचांमुळे काहीही ऐकू येत नव्हते.

मोठे साहेब निघाले म्हटल्यावर आम्ही तिघेही निघालो. पुढे गेल्यावर केसाच्या सुंदर बटे प्रमाणे वळणदार जिन्याची पायरीच पायाखाली आली. समोरचा व मागचा जिना गुंडाळला गेला का नाहीसा झाला ते समजण्या आत दुसऱ्या आॅफिसमध्ये कांचेच्या खुर्च्यावर विराजमान झालो होतो! विराजमानच म्हणायला हवे. सिंहासनासारख्या त्या खुर्च्या होत्या. एका माणसाने मोठ्या साहेबांच्या समोर एक देखणा ट्रे ठेवला. त्यावरचे पाकिट साहेबांनी माझ्या हातात दिले. ते म्हणाले,” हा तुमचा चेक.”. चेक न पाहताच मी तो परत देत म्हणालो,” सर, आमचे बॅंकेत कुठले खाते असणार? मला रोख दिले तर बरे होईल .” साहेबांनी सर्व रक्कम रोख देता येणार नाही म्हटल्यावर बहिण म्हणाली,” सर पाच हजार तरी द्या. आणि बाकीच्या पैशाचा चेक द्या.” तो माणूस पुन्हा आत जाऊन एक पाकिट घेऊन आला. दोन्ही पाकिटे मला दिली. एका पाकिटात चेक व दुसऱ्या पाकिटात पैसे. पाकिटातले पैसे मी मोजायला काढणार इतक्यात बहिणीने कपाळाला आठ्या घालत माझ्या हातून दोन्ही पाकिटे घेतली. पर्समध्ये ठेवली. पहिले साहेब हसले वाटते!

पहिले साहेब म्हणाले,” निघायचे ना?” मोठे साहेबही हो हो म्हणत उठले. आम्ही सगळे पुन्हा माझी चित्रे होती त्या उंच छताच्या शांत आणि प्रसन्न दालनात आलो. येताना मोठ्या साहेबांनी कसे काय वाटले तुम्हाला असे विचारल्यावर मी उत्साहाने सांगितले,” सर, हॅरी पाॅटरच्या जगात,अल्लाउद्दीनच्या गालिचावरून आलो असे वाटले.” साहेब हिरमुसले. विचारात पडून ते ,” खरं?” इतकेच म्हणाले. पहिल्या साहेबांकडे वळून ते काही तरी इंग्रजीत बोलत होते. मला हाॅगवर्ट, मॅजिक, अदभुत व नो नो! We aren’t yet there; असे काही तरी पुटपुटल्यासारखे वाटले. माझ्याकडे पाहात पहिले साहेब मला म्हणाले,” तुला AI, VR, रोबाॅट माहित असेल ना?” मी म्हणालो,” हो,फक्त ऐकून माहित आहे. ‘भास-आभास का हे खरेच आहे’ असे वाटावे असे काही आहे ते. व “Yes; मोठे साहेब म्हणाले. पण आम्ही त्याच्या पुढे जाऊन आभासही प्रत्यक्षात खराच करणार आहोत.” त्यावर माझी बहिण म्हणाली, मग ते तर आता आहेच की.!” “ वास्तव, दिसणारे आणि जाणवणारे त्याच जगात तर आपण आताही आहोतच की सर! तुम्ही आणखीन काय वेगळे करणार?” मीही भर घालत म्हणालो,” आता पलीकडे माणसांसारखे रोबाॅट्स पाहिले. तुम्ही रोबाॅट्सचे जग करणार का? “ त्यावर दोघेही साहेब घाईघाईने ,” नाही! नाही!, तसले काही करणार नाही. ती प्रयोग शाळा आहे. त्यासाठी आम्ही माणसांऐवजी रोबॅट्सचा वापर करतो.” “रोबाॅट्स वाटत होते हालचालींवरून पण सर ती माणसेच दिसत होती” माझी बहिण म्हणाली. त्यावर दोघेही साहेब सांगू लागले नाही ती दिसत असली तरी माणसेही नाहीत. आहे त्या पेक्षा चांगले जग करणार आहोत आम्ही.” “आहे त्यापेक्षा जग चांगले करायचे तर आधी माणूसच चांगला करायला हवा; हो ना? बाकीचे जग तर चांगलेच आहे! आपण काऽय म्हणतोऽ बघा तेऽऽ,” मोठे साहेब पहिल्या साहेबाकडे पाहात विचारत होते. “ Utopia , रामराज्य.”
“Yes, Utopia रामराज्य!”
ते ऐकल्यावर मी अडखळत म्हणालो,” सर मी फार लहान आहे. माझे आजोबा त्यांच्या वेळच्या गोष्टी सांगतांना ते फार उत्साहात आनंदात असतात. त्यांचा काळ ते म्हणतात रामराज्यच होते! माझे वडीलही त्यांच्या शाळा काॅलेजच्या दिवसांच्या आठवणी सांगतात तेव्हाही त्यांना किती बरे वाटते,आनंद होतो ते आम्हाला समजते. ते त्यांचे युटोपिया होते. लागलीच बहिण म्हणाली,” गतकाळ रामराज्यच असते; काल रामराज्य!”
जणू आम्ही दोघेच बोलतो आहोत समजून मी भर घातली,” आजही उद्या कालच होणार! कालचा दिवस युटोपिया असतो.”jj
हे ऐकून दोघे साहेब म्हणाले,” आम्ही आज आणि उद्यालाही युटोपिया, रामराज्यच करणार आहोत!”
मी थोडा वेळ गप्प होतो. नंतर हळूच म्हणालो,” सर! रामराज्य आणि सुखी माणसाचा सदरा दोन्हीही virtual पेक्षाही पुढे पळणाऱ्या, पुसल्या जाणाऱ्या कjल्पना आहेत ना ? सर,तुमची ही कंपनी, आॅफिस पाहताना कल्पनेच्या पलिकडले काही पाहतो आहे असे वाटत होते. पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नव्हता. सर, सुखी माणूस दिसला असे वाटले पण इथेही त्याचा सदरा नाही सापडला!” मी थोडे निराशेने म्हणालो असेन. लगेच बहिणीने विचारले ,”तुला मृगजळ म्हणायचेय का?”
मी म्हणालो,”नाही; मृगजळ हा ‘खरा’भास आहे. मला कल्पना किंवा कल्पनेसारखे काही म्हणायचे आहे. कारण कल्पना केव्हा का होईना त्या प्रत्यक्षात येतात! आणि दोघेही साहेब म्हणतात तसे त्यांचेही प्रयत्न वास्तवात येतील.” इतके सगळे बोलत असताना, मी येव्हढा तत्वज्ञानी कधी झालो ह्याचे मलाच आश्चर्य वाटत होते.

दोघेही साहेब उत्साहाने एकसुरात म्हणाले,” YES! YES! लवकरच आम्ही तो सदरा देणार आहोत तुम्हा सर्वांना!” त्यांचा आत्मविश्वास आणि उत्साह पाहून कुणालाही उमेद आली असती. मग आम्हालाही का नाही येणार?

मी आणि बहिण निघताना ते म्हणाले,” तुझे शिक्षण पूर्ण झाल्यावर तू आमच्याकडे केव्हाही येऊ शकतोस. तुझी चित्रे घेऊन केव्हाही येत जा. तुझ्या चित्रकलेसाठी आणि कल्पनेसाठीही आमचे दरवाजे नेहमी खुले आहेत!”च

त्यांचा निरोप घेऊन मी आणि बहिण आनंदात हातातल्या पाकिटातील आमचा ‘सुखाचा सदरा’पाहात घरी आलो!

हाके राव

शीव

“दोन इसम पाच रुपये! ते मागचे मामा त्यांचे अडीच घ्या! साहेबांचे साडे चार! “ हाक्के हाॅटेल मधल्या वेटरचे आवाज चालू होते.वडा,वडापाव, मिसळीच्या प्लेटी भराभर ठेवल्या जात होत्या हाक्केभाऊ टेबला मधून फेरी मारत बारकाईने पाहात होते. “अरे, सुभ्या, तीन नंबरला पाणी दे ना”असे थोड्या जरबेनेच सांगत होते. नेहमीच्या गिऱ्हाईकांशी दोन शब्द बोलून परत गल्ल्याकडेल येत होते.
आमच्या गावचा हाक्के वडा प्रख्यात होता.
नगरपालिकेचे गाव होते. महापालिका होण्याला अजून काही वर्षे लागणार होती.
शहर म्हटले की हाॅटेले, ऱेस्टाॅरंट आलीच. रेस्टाॅरंट बरोबरीने आमच्या शहरातही चहाच्या गाड्या, टपऱ्या होत्या. प्लास्टिकच्या ताडपत्रीने झाकलेली पत्र्याची हाॅटेले होती. हाकेचे रेस्टाॅरंटही बेताचेच आणि बेताच्या मध्यम भागात होते.
हाक्केला शहरातले अनेकजण ओळखत होते. पण निरनिराळ्या नावाने ओळखत होते. काहीजण हाकेराव म्हणत. काही हाके भाऊ,हाक्के दादा म्हणून आवाज देत. काही हाक्केभाय् म्हणत हसून मान झुकवत. हाके हाक्के एकच होता. पण सगळे त्याला त्यांच्या त्यांच्या नावानेओळखत होते.
हाकेच्या बेतशीर हाॅटेलात नेहमीचे पदार्थही मिळत असत. चहा फुल-हाप, स्पेशलही होता. पण तिन्ही चहासाठी काचेचा ग्लास एकच होता. काना एव्हढा लहान नव्हता, पंजा एव्हढा उंच नव्हता, मुठी इतका मध्यम होता. ताटल्या चमचे स्टेनलेसचे होते. हाक्केचा राव-दादा, भाऊ -भाय् होण्यापूर्वी, ‘ए हाक्के’म्हणणाऱ्या गिऱ्हाईकांना मात्र त्याच्या हाॅटेलातल्या ताटल्या चमचे जर्मलचे होते तेही आजआठवत असते.

हाकेचा प्रसिद्ध वडा इतर हाॅटेलांसारखाच होता तरी तो त्याचाच वडा म्हणून का ओळखला जातो ते शहरातल्या अनेक लोकांना समजत नसे. तसे पाहिले तर स्वत: हाक्के भाई,भाऊ-दादा-रावांला सुद्धा लगेच लक्षात येत नाही.

मी,एकदा हाक्केच्या वाॅर्डाचे आजी माजी नगरसेवक आणि नगराध्यक्ष नगरपालिकेच्या प्रकरणांसाठी कोर्टात वकीलांना भेटायला गेलो होतो. वाटेत हाक्केचे हाॅटेल दिसले. नगरसेवक म्हणाले, चला आलोच आहोत तर तुमची हाक्केभाऊंशी ओळख करून देतो.

आम्ही हाॅटेलात आलो नसू तेव्हढ्यात स्वत: हाक्केराव पुढे येऊन नगरसेवकाला व आम्हाला नमस्कार करत आला. त्याच्या गल्ल्याच्या कांऊंटर जवळचे टेबल- खुर्च्या मुलगा साफ करेपर्यंत रेंगाळलो आणि हाक्केने आम्हाला टेबलाकडे नेले. टेबला भोवती गल्ल्यावर विझून गेलेल्या उदबत्तीचा सुवास रेंगाळत होता. आमच्यासाठी वडा पाव आला. आम्ही सगळेच नको म्हणालो. पण नगरसेवकाने घेतला आणि हळूच नगराध्यक्षांना म्हणाला,” घ्या साहेब. हाक्केभाऊला वाईट वाटेल.” हाक्केने हे काहीच ऐकले नव्हते. मग मलाही तो खावा लागला. त्याच्या सुरवातीच्या वड्यासारखाच होता. गरम होता, तेलावर वाफवलेल्या मिरच्यांबरोबर तो चांगला लागला. चहा झाल्यावर आम्ही सर्व निघालो. “तुमच्या वड्याचे एव्हढे स्पेशल काय आहे हो ?” असे नगराध्यक्षांनी विचारल्यावर हाके म्हणाले, “ मी काय सांगणार ? बरीच वर्षे करतोय तसाच अजूनही होतोय.इतकंच साहेब.” असे हाक्केभाऊ म्हणाला.

आम्हाला गाडीपर्यंत पोचवायला हाकेभाऊ आला होता. माझ्याकडे पाहात म्हणाला,” काय रे..काय ..हो, बरेच दिवसात आला नाहीस— आला नाहीत?” “काम वाढलंय. राहायलाही जरा लांब गेलो आहे. पण येत जाईन मधून मधून.” हे मी जरा अडखळतच म्हणत होतो.

गाडीत बसल्यावर नगरसेवकांनी हाक्केभाऊ तुम्हाला कसे ओळखतो असे विचारलेच. लोक म्हणजे मतदार व ते नगरसेवकाला जास्त ओळखतात हे गणित जाणणाऱ्या नगरसेवकांनी विचारल्यावर मी त्यांना जे सांगितले तेच तुम्हालाही सांगतो-
काॅलेजपासून मी त्याला ओळखतो. अगोदर लहान गाडी, मग टपरी आणि आता हे बेताचे का असेना हाॅटेल. काॅलेजला जाता येता मी हक्केच्या टपरीवर येत असे. थोडक्यात वारंवार येत असे.मी येत असे तेव्हा कोणी ना कोणी एक दोघे गरीब माणसे वडापाव खाऊन पाणी पिऊन जाताना,”हाकेदादा येतो. लै बरं वाटलं बघं, पोट कसं गार झालं”म्हणत जात असत. पैशे हाक्के मागत नसे,ती माणसे देत नसत. एकदा विचारु का नको असे ठरवत मी त्याला विचारले,”ही अशी माणसं रोज येतात का?” “ हां येतात.” हे केव्हा पासून चाललं आहे?” “अरे माझी हातगाडी होती तेव्हापासून.” तो सहज नेहमीच्या आवाजातच बोलत होता. काही वेळा मी चहा वडा काही घेत नसे. थोडावेळ गप्पा मारून जात असे. त्यातच जून जुलै महिन्यात त्याच्या टपरीत थोड्या पाटी पेन्सिली वह्या दिसल्या. मी काही विचारले नाही. पण सात आठ दिवसांत ते सामान सगळे संपले होते. मी समजलो.

हे ऐकल्यावर नगरसेवक आणि नगराध्यक्ष गप्प बसले होते. विचारात पडलेले दिसले. आठ दिवसांनी त्यांनी मला त्यांच्या दालनात बोलावून घेतले. नगरसेवकही होते. अध्यक्ष म्हणाले , “ तुम्ही सांगितल्यावर लक्षात आलं की हाक्के हे काम बरीच वर्षे करतोय. आपण त्याच्या करता काही करावे असे वाटतंय.” मी म्हणालो,” नगरपालिकेने काही करायचे म्हटले तर सभा, ठराव,पैसा, मंजुरी आणि शिवाय एकट्या हाक्केलाच का दुसऱ्यांनाही का नको असे फाटे फुटणार.हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे.” त्यावर ते गप्प बसले. थोड्या वेळाने म्हणाले,”मीही विचार करतोय त्यावर. पण तुम्ही त्याच्याशी बोला ह्यावर; एकदम काही सांगू नका. त्याला काय वाटते ते महत्वाचे आहे.” “ मी म्हणालो, “ बरोबर आहे तुमचे. पण थोडा वेळ लागेल.” ते म्हणाले, “हरकत नाही.”
काही दिवसांनी मी हाक्केच्या हाॅटेलात गेलो. मी एकटा हे पाहून त्याला बरे वाटलेले दिसले. नेहमी प्रमाणे पूर्वीच्या दिवसांची भराभर उजळणी झाली.,मी सहज इतकेच विचारले,”हाक्केराव, अजून चालू आहे का?” “ ते कसं बंद पडेल? गरीबी चालूच असते!” आता महागाई वाढत चाललीय. जास्त लोक गरीब होत आहेत असं वाटतेय.”मी म्हणालो,”तू एकटा पुरा पडशील?” छ्या:काय बोलतोस! “ अरे तुला माहित आहे तेव्हाही माझ्या डोक्यात कधी हे आलं नाही. अरे मी केव्हढा आणि गरीबी केव्हढीऽ!”
पुन्हा आठ दिवसांनी गेलो. त्याला म्हणालो की,”आम्ही तुला त्या वडापावाचे पैसे दिले तर चालतील का?”
हाके विचारात पडला. “माझ्या हाॅटेलात बिल तिकिटावर लिहून देत नाही आम्ही. पोरं ओरडून सांगतेत.तुम्हाला पावती बिलं लागणार. कुठून देणार? तुम्ही स्वत: देणार का म्युनसिपालटी देणार आहे? रोजचे रोज देणार का महिन्याला ?” हाकेला मी तिथेच सर्व सांगू शकलो असतो. पण म्हटले थोडा वेळ घ्यावा.
आमच्या तिघा चौघांत बरीच भवति न भवति होऊन तूर्तास रोजचे रोज द्यावेत म्हणजे किरकोळ खर्चात रक्कम टाकता येईल. हाकेच्या माणसाने मला किंवा नगरसेवकाला भेटावे. व हाकेचा कागद दाखवून पैसे घेऊन जावेत ठरले. मी हाक्केभाऊला तसे सांगितले. तो म्हणाला, “मुलगा दुसरे दिवशी सकाळी येईल. कारण रात्री अकरा पर्यंत हाॅटेल बंद होते.”

सुरळीत सुरु झाले.माझ्या आणि हिशेबनीसाच्या एक गोष्ट लक्षात आली. सर्वसाधारणपणे रोज पाच सहा वडापावचे बिल येई. कधी बिलच नसे.तर आठदहा दिवसांतून एकदम दहा बारा वडापावचे पैसे द्यावे लागत. महिन्यानी हाक्केदादाला बोलावले. तो आला. नगराध्यक्षाचे दालन, गुबगुबीत खुर्च्या काचेखाली हिरव्या फ्लॅनलचा टेबल क्लाॅथ असलेले मोठे टेबल वगैरे पाहून सुरवातीला तो बिचकला असणार. पण थोडे हवापाण्याचे बोलणे झाल्यावर त्याला नगरसेवकांनी, आम्हाला पडलेला प्रश्न विचारला.त्यावर हाकेभाऊ म्हणाला, “साहेब, गरीब झाला तरी त्याला रोज फुकट खायला गोड वाटत नाही. दोन वेळचे पोट अर्धवट भरले आणि दुसरे दिवशीचा सकाळच्या चहा बटेर पुरते मिळाले तरी ते येत नाहीत. तुमची गरीबीची रेघ का काय म्हणता ती मला समजत नाही. पण मी पाच सात रुपयापासूनचे दिवस पाहातोय; आता वीस पंचवीस मिळाले की माणसे येत नाहीत. म्हणून कधी दोन चार तर कधी सहासात तर मध्येच एखादा दिवस आठ- दहा जण येतात.”
ह्या अधिकृत अनधिकृत योजनेला सहा महिने झाले. पुन्हा आम्ही हिशेबनीस आणि हिशेब तपासनीसासह सगळे हाक्केदादाकडे गेलो. मुद्दामच रात्री गेलो. काही तरी उपाय करावा लागणारच होता. सर्वांच्या सरळपणा आणि प्रामाणिकपणावर चाललेली ही हाकेभाऊच्या धर्मार्थ कामाला आमची निम्मी मदत चालली होती. मदत निम्मीच करा हेसुद्धा हाकेभाऊनेच सांगितले होते. पण काही चांगले ठोस व्हायला पाहिजे असे आम्हाला वाटत होते. त्यातूनच बोलता बोलता ‘वडा पाव, पाव-मिसळ’ योजना का काढू नये? हा विचार पुढे आला. आमच्यापैकी बहुतेकांचे म्हणणे असे की हे नगरपालिकेचे काम नाही. हाक्केभायने सुचवले,” अहो सब्शिडी म्हणा की ग्रॅन्ट द्या कुणाला. चालव म्हणावे.” लगेच आम्ही सर्वजण एकसुरात म्हणालो, दादा, तुम्हीच चालू करा. आम्ही देऊ ! बघा! केव्हा करता सुरू?” “साहेबांनो, जागा पाहण्यापासून सुरुवात आहे. रोजचे पोट हातावर असणाऱ्यांच्या सोयीचे ठिकाण पाहिजे.” पण नक्की झाले.
एकदिड महिन्यात हाकेदादाचा निरोप आला. जागा ठरली. तुम्ही पाहायला इथे इथे या. आम्ही गेलो. आम्ही कोण हो नाही म्हणणार? पाण्याचा नळ द्या साहेब तेव्हढा.” इतकेच तो म्हणाला. तेही काम झाले. चांगल्या पत्र्याच्या मंडपात वडा वडापाव आणि मिसळ पाव केंद्र सुरु झाले. सर्व साधारण गिऱ्हाईकालाही प्रवेश होता. पण त्यांना नेहमीच्या दराने पदार्थ मिळत.पहिल्या दिवशी सर्वांनाच कोणताही पदार्थ मोफत होता. नगराध्यक्ष म्हणाले, “हे ठिकाण गरीबाच्या उपयोगी पडावे ह्यासाठी आहे. त्यांनी यावे. पण केंद्राची भरभराट होवो असे मात्र मी म्हणणार नाही. अडीअडचणी वेळी काही तरी आधार असावा ह्या साठी हे केंद्र हाक्केदादांनी काढले आहे.”
दोन महिन्यात आणखी केंद्र दुसऱ्या भागात काढले. हाकेची दोन्ही मुले ती सांभाळू लागली. हाकेदादा दर दिवशी एकदा एका केंद्रावर जाऊन यायचा.

दिवस जात होते. केंद्रावर आता सर्वसाधारण गिऱ्हाईकांचीही ये जा वाढू लागली. गल्ल्यात भर पडू लागली.केंद्रावर तसेच पहिल्या हाॅटेलमध्ये अजूनही गरीब मजूर कामगार येत असत. हाकेदादाला तोंडभरून आशिर्वाद देऊन, कोणी शुक्रिया जी करून जात असत.

नगरपालिकेची महापालिका झाली. आजूबाजूची गावे सामील झाली. शहर वाढू लागले. हाकेदादांनी आपल्याच हाॅटेलातील चार पोरांना दोन हातगाड्या आणि थोडे पैसे देऊन वाढलेल्या वस्तीत गाड्या चालवायला दिल्या. त्यांना स्वतंत्र व्यवसाय दिला. तेच मालक! एक म्हणाला, दादा, मी चायनीजची गाडी काढणार तर दुसरा म्हणाला,आम्ही सॅन्डविचची! हाकेराव म्हणाला,” बरोब्बर! काही तरी नवीन करा.”
हाकेरावच्या मदतीला त्याची बीकाॅम शिकलेली काॅन्प्युटरचा कोर्स केलेली मुलगी अर्धा दिवस हाॅटेल चालवू लागली. हाकेरावला दोन्ही केंद्राकडे जायला मिळू लागले. मुलगी अर्धा दिवस टॅलीचे शिक्षण घेत होती. यथावकाश तेही पूर्ण झाले. केंद्रावर दोन्ही मुलांनी माणसे चांगली तयार केली होती. महापालिका झाल्यामुळे आजूबाजूच्या सरहद्दीवरचे गरीबही येऊ लागले. आधीच्या गरीबांच्या गर्दीत नविन गरीब आले.

महापालिकेने गरीबांच्या उपयोगाची आणखी दोन केंद्रे काढली. शिकलेली पण बेकार दोन चार तरुण मुले ती चालवू लागली. महापालिकेने हाकेरावला चारी केंद्रावर मानधनावर देखरेख करून चांगली घडी बसवण्याचे काम दिले. ते काम पाहू लागला.पहिल्या हाॅटेलवर तोंडभर आशिर्वाद देणाऱ्यांचीही वाढ होऊ लागली. हाकेभाऊंनी पूर्वी प्रमाणेच आपली प्रथा चालू ठेवली होती.मुलीला पूर्णवेळ नोकरी लागली. हाकेदादाची तारांबळ होऊ लागली. पण विश्वासू नोकर व दोन्ही मुलांची मदत ह्यामुळे सर्व निर्धास्त चालले होते.

दिवस वर्षे सरत होती. हाके थकला होता. महापालिकेत मला किंचित बढती मिळाली होती. मी कधी मुद्दाम वेळ काढून हाकेभाऊंना भेटत असे. आठवणींना उजाळा देऊन झाले की म्हणायचा,” बघ तुझ्या समोर किती घडून गेले. आपल्याला चांगले दिवस लवकर आले.”

हाकेराव थकले होते. मुला मुलींचे संसारही चांगले चालले होते. आलेला माणूस जाणार ह्या न्यायाने कुणाचा हाके भाऊ-हाकेदादा-हाकेराव- हाक्केभाई गेले. अंत्यात्रेला अनेक लोक होते. हार जाड जूड नव्हते. माळा म्हणाव्या तसे होते. वर वर जात चाललेल्या गरीब रेषे खालची हाकेभाऊ-दादाची मंडळी खूप होती. ते लोक आपले डोळे पुशीत चालत होते. अंत्ययात्रा वेगळी होती.

काही विद्यार्थी विद्यार्थिनी वही पुस्तके कंपास पेट्या छातीशी धरून चालले होते.कुणी क्रिकेटची बॅट, हाॅकीची स्टिक बंदुकी सारखी खांद्यावर घेऊन चालत होती; काही पोरं पेन्सिली, बाॅलपेन फूटपट्ट्या घेऊन आली होती. बऱ्याच आयाबापड्याच्या कडेवरच्या आणि बोट धरलेल्या मुलांच्या हातात खेळणी होती.थोड्या मुली नविन ड्रेस घालून आल्या होत्या. शाळेतली काही पोरं दोन पुड्यांचे मधल्या सुट्टीचे डबे मधूनच कपाळाला लावून हुमसत होती. पदवीचे झगे घातलेले दोन तीन तरूण आपले ओघळणारे डोळे,चेहरे लपवत होते. ही गर्दी वेगळी होती.

चिरायु होवो, अमर रहे असे कापडी फलक नव्हते. बॅन्ड नव्हता, टाळ मृदुंगही नव्हते. तीन हलगीवाले वाजवण्याचा प्रयत्न करीत होते. पण आवाज निघत नव्हता. अंत्ययात्रेत कृतज्ञतेचे हुंदके होते.ही गर्दी तशी वेगळीच होती!
हाकेभाऊची अंत्ययात्रा पाहिली आणि आम्हा सर्वांचे, ‘हाक्केरावसाठी आपण कितीऽ केल्याचे’ अहंकाराचे तरंगते फुगे हवेतच फुटले.

स्मशानभूमीत कोणी भाषणे करू शकले नाहीत. जमलेल्यांच्या मनात संभाषणे चालू होती
स्मशानातून परतताना हिशेबनीस व हिशेब तपासनीसांनी हाकेरावची एक गोष्ट सांगितल्यावर तर आमच्या सर्वांचा उरला सुरला गर्वही गायब झाला. ते म्हणाले,
“ हाक्केदादांनी मानधनही कधी घेतले नाही!”

अखेरीच्या दिवसात मी जेव्हा हाकेभाऊला अजूनही त्याच्याकडे गरीब बऱ्याच संख्येने येतात; तुम्ही त्यांच्यासाठी कायमचे करत आलात, असे म्हटल्यावर हाकेराव थोडा वेळ गप्पच होते. मग म्हणाले, “ करता येईल तेव्हढं करायचे. काही करायचे असे ठरवून कधी केले नाही. ती माणसे दोन तीन तास तरी त्यांची भूक विसरत होते.दुसरं काय !”

पद्मश्री,नगरभूषण सारख्या पदव्या हाकेसारख्या माणसाच्या वाटेला जात नाहीत. त्या पदव्यांपेक्षा फार मोठ्या ‘हाकेराव, भाऊ, दादा, हाकेभाय’ ह्या पदकांच्या माळा त्याला जास्त शोभत होत्या.

हाकेभाऊ गेल्यानंतर काही दिवसांनी मी,माजी नगराध्यक्ष,आणि ते नगरसेवक बोलत होतो. मी नगराध्यक्षांना म्हणालो, “ पहिल्या भेटीत तुम्ही हाकेरावना त्यांच्या बटाटे वड्याचे वैशिष्ठ्य काय विचारले होते, आठवतेय ना?” ते लगेच उत्तरले,” हो हो आणि त्यांचे उत्तरही आठवते! “ हाकेराव म्हणाले होते की ते पूर्वी जसा करत तसाच आजही तो बनतो, इतकेच.”
आम्ही सगळे थोडा वेळ गप्पच होतो. हळू हळू आमच्या लक्षात आले की हाक्के वड्याची प्रसिद्धी त्याच्या चवीमुळे नव्हती; ते बनवणाऱ्या माणसामुळे होती! ‘सामान्यांसाठी सामान्यांचा’ हाकेराव सामान्य होता!
‘सामान्यांच्या सामान्य’ हाक्केभाऊनी गावाने देऊ केलेले मानधनही घेतले नव्हते!