Monthly Archives: August 2018

एकापेक्षा एक! एकातून अनेक!

रेडवुड सिटी

यु-ट्युबवर बरेच वेळा मी स्वयंपाकाचे व्हिडिओ पाहात असतो. किती पदार्थ ! नव-नविन पदार्थ, माहित असलेल्या मिठाईचेही वेगवेगळे प्रकार, नेहमीचे पदार्थही किती वेगवेगळ्या रुपात येतात! थक्क होतो.
आपल्या घरीही आपण एका कणकेचीच(गव्हाच्या पिठाची) किती रूपे पाहतो, आणि किती विविध चवींचाआनंद घेतो! कोणतेही पिठ न मिसळता केलेली मुलभूत पोळी, पुऱ्या, त्या पुऱ्यांचेही पाकातल्या पुऱ्या, पाकातले चिरोटे ह्या गोड प्रकारांच्या बरोबरच आणखीही काही प्रकार जसे पाणी पुरी, तिखट-मिठाच्या पुऱ्या.बरं त्या तिखट मिठाच्या चवीला जर आणखी बढती द्यायची असली तर तिंबताना त्यात थोडे आंबट ताक घालायचे! बढतीच्या मजेबरोबर स्वादाचा बोनसही मिळतो. मेथीच्या, थोडे जिरे घालून केलेल्या पुऱ्यांचा झणकारा औरच. तशा नको असतील तर ताज्या मेथीच्या किंवा पालकाच्या पुऱ्याही मजा आणतात. ह्या पुऱ्यांना तसेच साध्या पुऱ्यांनाही वाळकाची कोशिंबीर किंवा नेहमीची कांदा-टोमॅटोच्या कोशिंबिरीची साथ असेल तर जवाब नाही.’टाॅप टेन’ गाणीही त्यापुढे बेसूर वाटतात. इतकेच काय साध्या पुऱ्यांबरोबर बटाट्याची भाजी नसेल तर त्यांना पुऱ्या म्हणत नाहीत! आणि त्यातच बरोबरीने श्रीखंड किंवा तुपाने थबथलेला,वेलदोडे खिसमिस तर असणारच, पण भरीला तुपात तळलेल्या पिकल्या केळ्यांच्या चकत्याही असलेला शिरा असेल तर मग ती जेवणाच्या वर्ल्ड कपची फायनलच! प्रत्येक घास त्या जल्लोषातच खाल्ला जातो!


पुरी-भाजी वरून आठवण झाली. बहुतेक सगळ्याच हाॅटेलात पुरीभाजी मिळत असे.पण शारदा स्टोअरवरून बक्षी ब्रदर्स कडे जाताना वाटेत टांगा स्टॅंडसमोरच तुषार हाॅटेल होते. रस्यावरच प्रवेशदार होते; त्यातून जरा आत जावे लागे. तिथे मिळणारी पुरीभाजी सालंकृत असे. मोठी प्लेट.फिकट गुलाबी- बदामी रंगाच्या फुगलेल्या पुऱ्या. बटाट्याची भाजी. भाजी बटाट्याची का,हा अडाणी प्रश्न विचारू नका. पुऱ्यांबरोबरची भाजी ही बटाट्याचीच असते हे समस्त बटाट्यांनाही माहित आहे. डाव्या बाजूला लालपिवळ्या तेलाचा किंचित ओघळ असलेले कैरीचे लालभडक लोणचे आणि वाळकाची कोशिंबिर.आणखी काय पाहिजे!


कणकेचा एक अवलिया अवतार म्हणजे आमटीतली फळं! तुपाची धार घालून ओरपून, मिटक्या मारून खाल्यानंतर पातेल्यात आमटी शिल्लक आहे की फळं हे शेरलाॅक होम्सच्या बापालाही न उलगडणारे रहस्य कायम राहते! “हेल्दि ”राहण्यासाठी फळं खा न खा पण ही फळं खाताना आणि खाल्ल्यावर साक्षात अमृताचे फळ जरी कुणी पुढे ठेवले तरी त्याकडे कुणी ढुंकुनही पाहणार नाही!

कणकेच्या पोळीचा आणखी एक प्रकार म्हणजे दुधात तिंबून केलेल्या दशम्या; बहुधा ही दशमी रात्री केली जाते.घरातील वडील वयस्कर मंडळी ह्या दशम्यांचे खास गिऱ्हाईक.खरे फॅन! पण आपणही जेव्हा त्या खातो त्यावेळी दशम्यांच्या सात्विक चवीमुळे होणाऱ्या आनंदात आदरही मिसळलेला असतो!
थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी झाऱ्यावरच्या पोपया किंवा गाखर, दामट्या खाल्या नाहीत तर आपण लहान होतो की नव्हतो अशी रास्त शंका येते. थेट शेगडीवरच्या निखाऱ्यांवरच त्या गाखर/पोपई-दामट्या ठेवलेल्या झाऱ्याकडे पाहात,”झाली? झाली? “ विचारत, चांगली भाजल्याची तीन चार गालबोटं लागलेली ती पोपयी झाऱा आपटून ताटलीत पडली की जीव भांड्यात पडायचा.भराभ्भर व्हायच्या की पटापट ताटलीत पडायच्या. तुपाचा ठिपका टाकून फिरवला की ती पोपयी खुसखुशीत लागायची. तूप नसले तरी लोणच्याच्या खाराचे गंधही तिला तितकेच चविष्ट करायचे!


रविवारची दुपारची किंवा एखाद्या रात्रीची आमची जेवणं संपत आलेलीअसतात. आणि एक चमत्कार घडतो. परातीतले,पोळ्यांना लावण्याचे उरलेले पीठ किंवा भाकरीचे पिठ आणि तिथेच थोडीफार राहिलेल्या कणकेची नक्षीही त्यात कधी मिसळली गेली आणि हिंग मीठ कधी पडले हे समजायच्या आत पातळ केलेले ते लच्छीदार पीठ तव्यावर ओतले गेलेही! हे फक्त मोठ्याने चर्रर्र आवाज यायचा तेव्हा समजायचे! मग आता कोण हात धुवायला उठतो हो? आता तो तवा लोखंडी-तवा राहिलेला नसतो तर त्या ओतलेल्या पीठाचे ‘धिरडे’ नावाचे सोने करणारा परिस झाला असतो! हे फक्त त्या आयत्या वेळच्या धिरड्याचा रुपाया येवढा का होईना ज्याने गरम गरम घास खाल्लाय त्यालाच माहित असते.
बरं गव्हाच्या पीठाचे हे प्रकरण इथेच थांबत नाही गव्हाचाच, पिठा ऐवजी रवा मैदा झाला की त्यांचीही किती रूपे चाखायला मिळतात. शिरा,गुळाचा सांजा, रव्याचे लाडू, वड्या,उपमा, उप्पीट हे झाले आपले नेहमीचे. त्यांच्या गोडाच्या आवृत्याही असंख्य! गोड पोळ्यांचेही, पुरणपोळी, गुळाची पोळी, गुळाच्या सांज्याची किंवाशिऱ्याची पोळी,उसाच्या रसाची पोळी! अबब किती ते प्रकार! शंकरपाळ्यांचे प्रकार सांगायचे राहिलेच. गव्हाची खीर(हुग्गी)आणि त्याच कणकेचे लाडू कोण विसरेल?

स्वल्पविरामासारख्या गव्हले/ गव्हल्या,सहाणेवर झर्रकन वळवून केलेल्या प्रश्नचिन्हासारख्या मालत्या,तर दोन डब्यांवर ठेवलेल्या आडव्या काठीवर वाळत घातलेला दीर्घायुषी शेवयांचा संभार,तसेच टिकली येव्हढ्या पोह्यासारख्या नकुल्या,हे कसबी कलाकार सणासुदीच्या पंगतीना रंगत तर आणतातच पण लग्ना-मुंजीत हे रुखवत सजवून ते करणाऱ्यांच्या कौतुकांतही भर घालतात.

एका गव्हाच्या पीठाच्या पदार्थांची ही यादी अर्धवटच आहे. ती पुरी करण्याला किती दिवस जातील हे कुणी सांगू शकत नाही.

हे झाले एका गव्हाचे रामायण. तेही पूर्ण नाहीच. त्या पिठाची मिठाईतील रूपांतरे राहिलीच आहेत अजून. गव्हासारखीच ज्वारी,बाजरी,नाचणी,तांदूळ,भगर राजगिरा अशी किती तरी धान्यं रांगेत वाट पहात उभी आहेत.बरं,हरभऱ्याची डाळ, तुर-मुग,उडीद-मसूर ह्या डाळी व कडधान्ये, शेंगादाणे ही मंडळीही ताटकळत थांबली आहेतच. इतकेच काय पापड,सांडगे,वडे थापड्या,कुरडया आणि काय आणि किती! पण नाइलाज आहे.ही कधीही पूर्ण न होणाऱ्या,अव्याहत ज्ञानकोषासारखी, न संपणारी गोष्ट आहे.पण कुठेतरी ती थांबवली पाहिजे.

अन्नपदार्थ अनंत आहेत.त्याच्या विश्वाचा पसारा त्याहून अमर्याद आहे. एका दाण्यातून जिथे शेकडो दाण्यांनी भरलेली असंख्य कणसे डोलत असतात, तिथे एकातून अनेक हे फक्त ‘एकोSहं बहुस्याम’ अशी इच्छा झालेल्या परब्रम्हालाच लागू नाही; तर आमच्या रोजच्या आयुष्यातील,जेवणातल्या अन्नपदार्थांना ते जास्त लागू आहे. म्हणूनच न दिसणाऱ्या परब्रम्हापेक्षा आम्हाला आमचे रोजचे आयुष्य प्रसन्न आणि रंगीबेरंगी करणारे स्वादिष्ट-चविष्ट, खमंग-चटकदार,गोड,मधुर आणि तृप्त करणारे ‘अन्न हे पूर्णब्रम्ह’च पुरे आहे. ते आमचे आहे.

अमेरिकन मी होणार ! झालोच!

रेडवुड सिटी

१९५६ साली बी.एस्सीची परिक्षा दिली. पास होईन का नाही हीच धागधुग होती. मला आणि माझ्या प्रोफेसरांनाही. काहींना तर खात्री होती; मी पास होणार नाही ह्याची. पण अखेर पास झालो. त्यानंतर कानाला खडा लावला की झाली-दिली ही परीक्षा शेवटची.

नोकरीसाठी अर्ज करायला सुरवात केली. काळ बेकारीचा होता. सर्वच अर्जांना होकार आले नाहीत. पत्रिका पाहूनच मुलगी नापसंत ठरावी तसे अर्जाच्या पहिल्या फेरीतच मी गारद व्हायचो. पण दोन तीन ठिकाणी माझ्यासाठी मुलाखतीतूनच नोकरीच्या पायघड्या घातल्या होत्या. पण मी त्यांना नकार देत होतो.हे झाले. पण माझा निश्चय मी पाळला होता. ज्या नोकऱ्यांसाठी अगोदर लेखी परीक्षा असे तिथे मी कधी गेलो नाही. पण नंतरचे कलेक्टर,परराष्ट्र अधिकारी,वन अधिकारी (कांन्झरव्हेटर) , मुख्याधिकारी पाहिल्यावर आपणही ह्या परीक्षा द्यायला हरकत नव्हती असे वाटले. आता निवृत्त होऊनही किती तरी-पंचवीस-वर्ष झाली.
पण परवा मात्र मला तोंडी व अंशात्मक लेखी परीक्षा माझा नियम मोडून द्यावी लागली. तरी बरं लेखी परीक्षा एका ओळीची होती.

इतर वाचन चालू असले तरी परीक्षेच्या पुस्तकांचे म्हणजे गाईड्सचे माझे वाचन कधीच बंद पडले होते. त्यामुळे अमेरिकन नागरिकत्वासाठी पूर्व तयारीसाठी एक पुस्तक होते ते वाचायला सुरवात केली. बरं हे पाठ्यपुस्तक माझ्यासाठीच तयार केले असावे. कारण प्रश्नांची उत्तरे लगेच त्या खालीच दिली होती. मग मी का ते वाचणार नाही? हे इतके चांगले गाईड परिक्षकानेच दिल्याच्या आनंदात त्यातली शंभर प्रश्नोत्तरे मी दिवसातून एकदा रोज वाचू लागलो. देवाचा नित्यनेम इतक्या मनापासून केला असता तर रोज दहा वेळा,देवाने प्रत्यक्ष दर्शन दिले असते!

बरं नुसते मी स्वत: वाचून स्वस्थ बसणाऱा विद्यार्थी नव्हतो. रोज मी घरातील कुणाला तरी पकडायचो व त्या पुस्तकातील प्रश्न मला विचारून त्यांना मी माझी परीक्षा घेणे भाग पाडू लागलो. प्रथम सगळेजण सौजन्य म्हणून बळी पडले माझ्या विनंतीवजा हट्टाला. पण नंतर प्रत्येक जण मी त्या पुस्तकात बोट घालून हाका मारत येताना दिसलो की काही तरी निमित्त काढून कुठेतरी गायब होत. मला टाळण्यासाठी सर्वांनी तीन तीनदा आंघोळी करायला सुरवात केली. जणू जुलाब होताहेत म्हणून पटापट संडासात जाऊन दडून बसू लागले. घरात सगळ्या वस्तु असल्या तरी दिवसातून चार पाच वेळा बाजारात जात. काही नाही तरी दातकोरणीच्या काड्यासाठी जाऊ लागले. तास न् तास बाहेरच असत. कामाला गेलेले तर तीन तीन चार चार दिवस आॅफिसातच राहात. शाळा काॅलेजात जाणारे सुद्धा आज हा क्लास आहे,त्याचा तो क्लास आहे हे निमित्त सांगून हाॅस्टेलात कुणाच्या तरी खोलीत पडून राहात. टेनिसच्या क्लासचे, आज आमची स्पर्धा आहे, अंतिम सामना आहे असे सांगून बारा बारा तास तो सामना खेळत! विम्बल्डन वगैरेच्या अनेक खेळाडूंचे वेळेचे विक्रम त्यांनी मोडीत काढले. अशावेळी माझा मीच प्रश्न वाचून पुस्तक बंद करून उत्तरे देऊ लागलो. कुणी सापडलाच चुकुन माकून तर मी त्याच्याकडून माझी शंभर प्रश्नांची तीन वेळा उजळणी करून घ्यायला लावत असे ! कुणाशी बोलणे म्हणजे ती प्रश्नोत्तरेच मी म्हणत असे. त्यामुळे माझ्या वाऱ्यालाही कोणी उभे राहिनासे झाले. बरं इथे अमेरिकेतच असल्यामुळे शेजाऱ्या पाजाऱ्याला अशी काही विनंती करण्याचीही सोय नाही. स्वावलंबन हाच उपाय मी चालू ठेवला. तरीही दया येऊन, अखेरच्या काही दिवसात माझ्या तिन्ही नातींनी व मुलाने मला पुष्कळच मदत केली.

परीक्षेचा दिवस आला. पहिले आश्चर्य घडले.नातीने लावलेला गजर होण्या आत मी पहाटे पाच वाजता उठलो. कित्येक वर्षांनी,पहाट कशाला म्हणतात आणि ती कशी असते ह्या प्रश्नांच्या उत्तरानेच दिवस सुरु झाला!
“नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अर्धा तासच आधी येणे” अशी तंबी परीक्षेच्या आमंत्रण-पत्रातच दिली होती. पण सावधगिरी म्हणून आम्ही बरेच आधी पोचलो होतो. त्यामुळे धावपट्टीवरील गर्दीमुळे नेमके आपलेच विमान त्या तळा भोवती दिवसभर घिरट्या घालते त्याप्रमाणे आम्हीही रस्ते ओलांडत एका हाॅटेलात काॅफी पित वेळ काढत बसलो. योग्य वेळी दरवाजापाशी दोन तीन जणांच्या रांगेत उभे राहिलो. चेहरा हसतमुख ठेवा ही सगळ्यांची सूचना मी काटेकोरपणे पाळत होतो. द्वारपालाकडे तो शतजन्मीचा दोस्त आहे ह्या भावनेने मी त्याच्याकडे पाहून हसत होतो. तो एकदा माझ्या कडे व पासपोर्टमधील फोटोकडे वारंवार पाहून ‘ तो हाच का कोण येडपट आहे’ ह्या नजरेने माझ्याकडे पाहात होता. काय झाले कुणास ठाऊक! तो”कामाटकार “ Isn’t it? “म्हणत हसू लागला. मी तर हसतच होतोआता सतीशही हसत हसत हो म्हणाल्यावर त्याने आनंदाने दार उघडून आम्हाला आत सोडले.
अमेरिकेत सर्व तपशील एकदम अचूक ठेवतात व कळवतात, त्याचा प्रत्यय येत होता. माझ्यापत्रात A काउंटर सांगितलेच होते. तिथे ठळकपणे तो काउंटर दिसत होता. माझे नाव गाव विचारले. फोटो काढला. पुढे वळून Aवेटिंग हाॅल मध्ये थांबायला सांगितले.

आता परिक्षेच्या हाॅलमध्ये आल्यासारखे वाटायला लागले. माझ्यासह आणखी दोघे तिघे होते. फक्त मीच ताणतणावात होतो. हातात पासपोर्ट आणि एकदोन पुरावे धरून होतो. हात पाय बोटे काहीही थरथरत नव्हती. पण शंभर अधिक उठल्याबरोबरचे पहाट म्हणजे काय? ती कशी असते ह्या दोन अशा एकूण एकऱ्शे दोन उत्तरांचा जप चालू होता. पूर्वी उजळणी म्हणत होतो. पण वयामुळे आपोआप आध्यात्मिक झाल्यामुळे ‘जप’ म्हणालो. अध्यात्म संपले व आतून माझी परीक्षा घेणारी बाईच ओठ,तोंड वेडे वाकडे करत ‘शॅढॅसिव’? म्हणत माझ्याकडे पाहात आली!
आत जाऊ लागलो. सतीश “काही टेन्शन घेऊ नका बाबा,all the best”वगैरे म्हणाला. मी मान हलवून आत गेलो.
बोलवायला आलेली बाईच परीक्षक होती. माझी जन्म तारीख,मी राहतो तो घरचा पत्ता विचारला. सांगितला. अगोदर इंग्रजी वाचनाची परीक्षा घेतली. माझी! तुम्हालाही प्रश्न पडला असणार इतका वाचणारा मी,माझी वाचनाची परिक्षा?माझी? काय करणार मी तरी. डोळ्यांच्या डाॅक्टरांकडे तक्त्यात असतात तेव्हढ्या ढब्बू अक्षरांतील तीन वाक्ये पुढे ठेवली.मी माझ्या स्पष्ट शब्दोच्चारात पहिले वाक्य खणखणीतआवाजात वाचून दाखवले. सिनेटर किती असतात असे ते प्रश्नार्थक वाक्य होते. ते मी त्याच प्रश्नार्थक भावाने,प्रश्नार्थक आवाजात त्या बाईंकडे पाहात वाचले. तेही टेबलावर पुढे झुकून. बाई गांगरल्या. आणि घाबरत त्यांनीच ,”One Hundred” असे बरोब्बर उत्तर दिले! मी सुद्धा बावरलो. बरोबर या अर्थी मी फक्त मान हलवली!आता पुढचा प्रश्न मी काय विचारणार म्हणून बाईच सावरून बसल्या! माझी वाचनाची परीक्षा संपली,एका वाक्यात!
नंतर मला इंग्रजी लिहिता येते का ह्याची चाचणी झाली.

बाईं सांगतील ते मी लिहायचे अशी ती चाचणी होती. बाईंनी There are one hundred senators हे मगाचे उत्तरच मला लिहायला सांगितले.सोप्पे !असे म्हणत मी ते सुवाच्य अक्षरात बिनचूक लिहिले. झाली लिहिण्याची परीक्षा. अरे ही तर एका वाक्यांचीच परीक्षा दिसतेय असे वाटलें. बाईं मला इंग्रजी समजते का ह्याचीपरीक्षा दहा प्रश्नांच्या उत्तरांवरून ठरवणार होत्या. त्यातही त्यांनी विचारलेल्या पहिल्या सहा प्रश्नांची उत्तरे मी जर बरोबर दिली तर ती परीक्षा तिथेच संपणार होती. म्हणजे मी इंग्रजीत हुषार हे नक्की होणार होते. मनात म्हणालो मी तर शंभर उत्तरांचा अभ्यास पक्का करून आलोय. विचारा कसेही उलट सुलट, कोणत्याही क्रमाने. माझ्या इथल्या दोन आणि पुण्याच्या एका नातीने ‘सारेग रेगम गरेमग गरमा गरम’ अशा प्रचंड उलथापालथी करून माझी तयारी करवून घेतली आहे. पहिलाच प्रश्न,” राष्ट्रगीताचे बोल काय आहेत?” हा होता. तिघींनीही हा प्रश्न मला नेहमी शेवटी विचारला होता. माझ्या अभ्यासाची सांगता त्या राष्ट्रगीताच्या प्रश्नाने करीत. त्यामुळे पहिला प्रश्न हा असणारच नाही या खात्रीने क्षणभर वाचा बंद पडून गप्प होतो. पण जाऊ द्या बाईंनी परीक्षेची सुरवात राष्ट्रगीताने केली अशी मीच माझी समजूत घालून उत्तर बरोबर दिले. चला,”कोन बनेगा नागरिक?”स्पर्धेतील पहिला एक हजाराचा प्रश्न मी सोडवला.

मग ‘झेंड्यावर तेराच पट्टे का आहेत’ हा प्रश्न विचारला. त्याचे खरे उत्तर ‘ कारण झेंड्यावर तेव्हढीच जागा होती’ हे आहे.पण मी मात्र अभ्यास केलेले उत्तरच दिले.त्यानंतर दोन तीन प्रश्नांचीही उत्तरे बरोबर दिल्यावर What is the rule of the law ? ह्या प्रश्नाला तर मी शाळेच्या वक्तृत्व स्पर्धेतील भाषणाच्या स्टाईलने बुबळे वर करून छताकडे पाहात उत्तर देऊ लागलो. उत्तर सविस्तर देत होतो. बुबळे अजूनही छताकडेच लागलेली. माझी ती खेचर मुद्रा पाहून रामदेवबाबाही खुष होऊन त्यांचा तो प्रख्यात कायम मिटलेलाच एक डोळा पुन्हा मारत,दाढीतून कौतुकाने माझ्याकडे हसत पाहात राहिले असते. पण ह्या बाई मात्र माझे ते भेसूर रूप पाहून ‘नऊशे अकराला’फोन करताना जी स्थिती होते तशी होऊन धडधडत्या छातीवर हात ठेवून पुढचा प्रश्न विचारु लागल्या. पण अनुभवाने त्या शाहाण्या न होता गडबडीत त्यांनी नको तो पुढचा प्रश्न विचारला. तो होता “११ सप्टेंबर २००१ रोजी काय घडले? “ अमेरिकन नागरिक होण्याअगोदरच देशभक्तीचाही मी सराव करत असल्यामुळे मी त्या भयंकर घटनेचे नाट्यपूर्ण आवाजात साभिनय उत्तर देऊ लागलो. डोळे मोठे करत,संपूर्ण देशाला धक्का बसल्याचा अभिनय करत, टेबलावर पुढे झुकून प्रत्येक शब्दावर कमी जास्त जोर देत गंभीर आवाजात चढ उतार करत, बाईंकडे पाहात, “ Terrorists attacked United States of America!” असे सांगू लागलो.तशा प्रत्येक शब्दानिशी बाई बसल्या जागीच आपली फिरती खुर्ची एकदम मागे लोटत भिंतीवर आ-द-ळ-णा—र होत्या.पण तेव्हढ्यात माझे ते ऐतिहासिक नाट्यपूर्ण उत्तर संपल्यामुळे त्या आदळल्या नाहीत! खैर माझी. नाही तर माझी त्याच दिवशी अमेरिकेतून हकालपट्टी झाली असती!

अशा रीतीने पहिली साही उत्तरे बरोबर दिल्यामुळे परीक्षक बाईंचे पुढचे श्रम व भीतीही नाहीशी झाली.
त्यानंतर मी भरलेल्या अर्जाची, त्यातली माहिती व माझ्याकडून येणाऱ्या उत्तरात तफावत नाही याची पडताळणी सुरु झाली. तीही बरोबर ठरली. मग, तुम्हाला शपविधीला हजर राहण्याचे पत्र येईल तेव्हा ग्रीन कार्ड न विसरता घेऊन या. ते नसेल तर परत पाठवले जाईल किंवा तशा अर्थाचे काही तरी सांगितले. माझे तिकडे लक्ष नव्हते.आणि एक छापील पत्र मला काही खुणा करून दिले. आपल्याकडील म्हणजे माझ्या पद्धतीप्रमाणे मी त्या Pinjalinan बाईंना मला नागरिकत्व मिळण्याची शक्यता आहेना? तुम्हाला काय वाटते? वगैरे प्रश्न विचारले. त्यावर त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्या म्हणाल्या,”ते पत्र दिले ना तुम्हाला आता,ते वाचा.त्यात Congratulations म्हटलेय की.”

कागदपत्रे व ते पत्र सावरत बाहेर आलो. सतीशने दोन तीनदा “बाबा कसा झाला इंटरव्ह्यू” म्हणून विचारले,पण मी अजूनही अध्यात्माच्याच गुंगीत असल्यामुळे उरलेल्या ९४ उत्तरांचाच जप करीत होतो! तेव्हढ्यात सुधीरचा फोन आला.त्याने माझे अभिनंदन केले. सतीशने त्याला त्या आॅफिसातूनच कळवले असावे. मी सतीशला काही सांगणार तोपर्यंत आम्ही घरापाशी आलोही होतो!