Monthly Archives: May 2023

आमचा ‘ पासिंग शो ‘

बेलमाँट

बहुसंख्य लहान मुलांना मुलींना काही तरी गोळा करण्याचा , जमवण्याचा , जमवून ते जपून ठेवण्याची हौस छंद आवड -काही नाव द्या- असते . मला आणि माझ्या बरोबरीच्या काही सवंगड्यांना सुरुवातीला काचेच्या,सिमेन्ट सारख्या टणक, लहान मोठ्या गोट्या जमवण्याची आवड होती. गोट्या खेळत असल्यामुळे ती जोपासणेही सहज होत असे. मोठ्या गोटीला, गोटी कसे म्हणायचे, गोटूलाच म्हणावे लागेल, अशा गोट्या ढंपर म्हणून ओळखल्या जायच्या. काचेच्या गोट्यांतही विविध रंगासोबतच त्यांच्या पोटात नक्षीही असे. पोटात, अंतरात नक्षी खेळत असलेल्या पारदर्शी गोट्यांना तितक्याच सुंदर नावाने म्हणजे ‘बुलबुल’ म्हणून त्याओळखले जायचे .

गोट्यांनंतर काड्याच्या पेटीचे छाप जमवणे सुरू केले. काड्याच्या पेट्या घरोघरी असायच्या. किराणा दुकानदार. पानपट्टीवाले संख्येने किती तरी असत. त्या प्रत्येक दुकानात वेगवेगळ्या छापांच्या काड्यापेट्यांची बंडले असत.

छाप जमवण्यास सुरुवात झाल्यावर दोस्तांशी गप्पा मारत जात असलो तरी प्रत्येकाचे लक्ष चारी बाजूना बारकाईने असे. काही जण गप्पांत रमले की, मला नाही तर त्याला रिकामी काड्यापेटी किंवा चिरडली गेलेली काड्यापेटी दिसली की कशाचेही भान न राहता त्या काड्यापेटींवर झडप घालायला झेपावत असू. एकदम दोन्ही मिळणे फार कठिण. एक जरी मिळाली तरी लढाई जिंकल्याचा आनंद असायचा. मग तुला कोणता छाप मिळाला ह्याची चर्चा. “हाऽत्तीच्या! घोडा छापच की” म्हणत तो किंवा मी ती काड्याची पेटी पुन्हा फेकून देत असू. कारण हा घोडा छाप सर्रास सापडत असे. पत्त्याच्या पानाचा छाप, किंवा नुसता एकच किलवर आणि इस्पिक छाप मिळाले की काही तरी मिळाले असे वाटे. अदला बदलीत किंचित वरचढ ठरणारे हे छाप असत. तांबड्या रंगाचा आडवा चौकटच्या एक्क्याचा छाप असलेली काडीपेटी सापडली की तो दिवस सोन्याच व्हायचा आम्हा दोस्त मंडळीचा.

एकेकटे फिरताना, भाजी आणायला संध्याकाळी फाटकावर जाताना, रविवारी गावातल्या मुख्य भाजीबाजारात जातांना किंवा, आई किंवा काकूंबरोबर देवळात जाताना, ह्या छापांची आणि तशीच अगदी वेगळ्या नेहमीच न मिळणाऱ्या छापांची कमाई होत असे!

कधी कधी आमची ही हौस- छंद-आवड अगदी व्यसनाची पातळी गाठायची. कुणी दोघे- तिघे अगर एकटा माणूस सिग्रेट विडी ओढताना दिसले किंवा आता ‘तो/ ते विडी सिग्रेट शिलगावणार ‘ असा अंदाज आला की आशाळभूतपणे तो किंवा त्यांच्यातले एक दोघे तरी रिकामी काडीपेटी केव्हा फेकतील ह्याची वाट पाहात उभे असू. सहज दोस्त उभे आहेत किंवा कोणी एकटा असला तर, कुणाची वाट पाहातोय अशी ॲक्शन करत उभे राहायचो. नशिब जोरावर असेल तर दोन काड्याच्या पेट्या खाली पडलेल्या दिसायच्या. दिसल्या की त्याच सहजतेने ती काड्याची पेटी उचलून पुढे सटकायचे. घोडा छाप निघाली की चिडून ती पायाखाली चिरडून पुढे जायचो; कुणी विडी सिग्रेट ओढतेय का ते पाहात ! हा तपश्चर्येचाच काळ होता आमच्यासारख्या ‘ एका ध्येयाने पछाडलेल्या ‘ ‘ एकच श्वास एकच ध्यास ‘ घेतलेल्या पोरांचा. काड्यापेटींचे वेग वेगळे भारी वाटणारे छाप जमा करणाऱी छंदोमय झालेली मुले आम्हीच ! आमच्यासारखी आणखीही पुष्कळ असतील.

प्रत्येकाकडे दुर्मिळ, सहज न मिळणारे काड्या पेटींचे एक दोन छाप तरी नक्कीच असत. त्यांची अदला बदल देवाण घेवाण सहसा होत नसे. प्रत्येकासाठी ते छाप Trophy च असत. माझ्याकडे आणि धाकट्या भावाकडेही अशी मौल्यवान रत्ने होती. एका काड्यापेटीच्या वर संत तुकारामांचा छाप होता . त्याची छपाई व चित्रही सुंदर! दुसरा एक छाप टारझनचा होता. त्यालाही तोड नव्हती. सुरवातीला दुर्मिळ असणारा पण नंतर काही महिन्यांत तो तितकासा वैशिष्ठ्यपूर्ण न राहिलेला म्हणजे जंगलातून झेप घेतलेला वाघ व झाडावर बंदूक रोखून बसलेला शिकारी. पिवळसर व हिरव्या रंगाचे मिश्रण त्या छापात होते. काडीपेटी ती अशी कितीशी मोठी ? त्यावर हे चित्र छापणे सुद्धा फार अवघड आहे असे त्या वयातही वाटायचे. दुसरा एक छाप होता, समई छाप. किंचित गडद तपकिरी रंगाच्या पार्श्वभूमीवर पितळेची चकचकीत समई, चारपाच तेवणाऱ्या ज्योती आणि त्यांच्या भोवती पिवळ्या प्रकाशाते वलय. आमच्या भाषेत- येकदम मस्त! असेच उदगार संत तुकाराम महाराजांचा छाप पाहिल्य्वर सगळ्या पोरांच्या तोंडून बाहेर पडत. फक्त” येकदम मस्त हाय ब्ये!” ही भर पडायची.

गोट्यांच्या मागोमाग काड्यांच्या पेटीचे छाप जमवण्याचा नाद लागला व तोही संपला. काड्यापेटीची सखीसोबती सिग्रेटच्या पाकिटांच्या मागे लागलो. त्यावेळी बिडी सिग्रेट पिणे म्हणत जरी त्यात ओढण्याची क्रिया असली तरी पिणे हेच क्रियापद प्रचलित होते.

ह्या दोन्ही नादासाठी रस्ते धुंडाळणे हे समान कर्तव्य होते. ते इमान इतबारे पार पाडत असू. त्यासाठी शाळेच्या सुट्टीची वाट पाहण्याची गरज नव्हती. काड्यापेटीचे छाप असोत की सिग्रेटची पाकिटे, शाळा सुद्धा आमच्या संशोधनाचे केंन्द्र होते. मोरे मास्तर, पवार मास्तर, हे ह्या दोन्हींसाठी भरवशाचे .

काड्याच्या पेटीत जशी घोडाछाप सार्वत्रिक होती तशी सिग्रेटीत दोन ब्रॅन्ड लोकप्रिय होते. चहात जसा कडक चाय पिणारे तसे सिग्रेटमध्ये लई कडक चार मिनार होती ! त्यानंतर सर्वाना सहज सहन होणारी म्हणजे पीला हत्ती किंवा पिवळा हत्ती. ही पाकिटे जमवायला कौशल्याची हुन्नरीची आवश्यकता नव्हती. कुठेही गेलो आणि पाहिले तरी सहज ह्या दोन्ही छापांची पाकिटे मुबलक मिळायची. त्यानंतर बर्कले व त्याही नंतर कॅपस्टन हे दोन प्रतिष्ठित छाप होते. सर्वात वरिष्ठ म्हणजे गोल्ड फ्लेक्स सिगरेट. तिला सिग्रेट- शिग्रेट म्हणण्याचे धाडस कुणी करत नसे. ती लोकसंबोधने जनतेच्या जिव्हाळ्याचे जे दोन ब्रॅन्ड चार मिनार आणि पिवळ्या हत्तींसाठी राखीव होती ! कारण ते सर्वसामान्य कामगारांना, कारकुनांना आणि हेडक्लार्कना परवडणारे होते.

छाप कोणताही असो सर्व सिग्रेटींची पाकीटे दहाची असत. नंतर काही काळांनी काही ब्रॅन्डनीं वीसचीही पाकिटे आणली ती दोन्हीही गुण्या गोविंदाने पानपट्टीच्या टपऱ्यांत एकमेकाशेजारी बसत. तसेच बर्कले, कॅपस्टन, आणि गोल्ड फ्लेक्स ह्यांचे पन्नास सिगरेटींचे टिन असत. इस्त्रीच्या कपड्यातील, गॅागल लावलेले तरूण कधीतरी रुबाबात हातात हा टिन तिरपा धरून जाताना जिसत. पण अशी शान मोजके मोटरवाले होते त्यांना जास्त शोभून दिसे. गोल्ड फ्लेकस शिवाय ते दुसऱ्या सिगरेटीचा झुरकाही घेत नसावेत. पण चार मिनारवाले ह्या सर्वांना तुच्छ समजत. बायकी शिग्रेटी पिणारे म्हणत त्यांना.

ही पाकिटे जमा करायचोच पण कधी सटीसहीमाहीला कॅमल किंवा अबदुल्ला नावाचे एखादे पाकीट मिळे ! ही वार्ता सिग्रेटची पाकिटे जमवणाऱ्या आमच्या सारख्या नादिष्ट मुलांच्या गोटांत वाऱ्यासारखी पसरे! दुध पिणाऱ्या गणतीचे दर्शन घ्यायला पुढे येणाऱ्या नंतरच्या काळात धावपळ झली नसेल तितकी पळापळी केली असेल पोरांनी! हे कधी न ऐकलेले ना पाहिलेली छापाची पाकिटे कशी दिसतात इतके पाहायला मिळाले तरी धन्य वाटायचे.

पण दुर्मिळ असल्यामुळे व कसलीही माहिती नसल्यामुळे लहानशा ओढ्याला अचानक आलेल्या पुराचा लोंढा जसा लगेच ओसरतो तशी आमची उत्सुकताही ओसरायची ! ओळखीची माणसेच बरी हाच सनातन नियम पटायचा.

हे चार मिनार, पिवळा हत्ती, कॅपस्टन वगैरे जमा करण्याच्या मोसमातच एक वेगळा ब्रॅन्ड त्याच्या अत्यंत अनोळखी नावा मुळे, पाकिटाच्या रंगसंगतीमुळे व त्यावर असणाऱ्या स्टायलिश माणसाचा फोटो आणि त्याच्या तितक्याच स्टायलिश हॅट मुळे त्या पाकिटाची किंमत ( मूल्य वगैरे शब्द कुणाला माहित?! आणि म्हणता येणार होते!) आमच्या अदलाबदलीच्या मार्केटमध्ये वधारली! ज्यांच्याकडे ही पाकिटे होती ते मोटारीतून गोल्डफ्लेकसचा टिन घेऊन उतरणाऱ्या रुबाबदार श्रीमंताप्रमाणे आव आणीत आमच्यात वावरत !

पण ह्या सिग्रेटचे नावही सुंदर आहे . ‘ पासिंग शो ‘ वा! सिगरेटचे झुरके घेण्याला इतके काव्यमयच नव्हेतर वास्तवही म्हणता येईल नाव आहे. ‘ घटकाभरचा खेळ, घटकाभर करमणुक, क्षणभराचा विरंगुळा!’ ‘फार नाही, दोन घटका मजेत घालवा’ ‘दोन घटका लगेच सरतील,’ त्यावेळी हे अर्थ माहित नव्हते. नाव सोपे आणि निराळे होते. हे समजत होते. ते नाव लक्षात राहण्याचे त्यातील सहजता हेही कारण असेल.

काड्यापेट्यांचे छाप, सिगरेटची पाकिटे जमवणे हा खेळही होता आणि नाद होता. छंद आवड हौस हे शब्दही आम्हाला कधी आमच्या वाटेवर भेटले नाहीत. त्यामुळे नाद होता म्हणणेच योग्य. बरं ह्या वस्तु अखेर शब्दशः टाकाऊच. बरीच माणसे, मुलं छाप पाकिटे गोळा जमवतात हे पाहून ते कौतुकाने आपणहून रिकामी काडेपेटी किंवा रिकामे सिगरेटचे पाकीट देत. काहीजण तर एकच शिल्लक असली तर ती खिशात ठेवून सिगरेटचे पाकिट देत.

गोट्या जमवणे थांबले, मग काड्यापेटींचे छाप जमवण्यामागे लागलो. तेही बंद कधी झाले त्याचा पत्ता नाही आणि सिगरेटची पाकिटे जमवता जमवता तोही नाद कसा आणि कुठे संपला तेही समजले नाही.

हा खेळ अखेर ‘पासिंग शो’ च होता!

‘बॅट बाॅल’ आणि…

आम्ही मुले स्वतंत्रपणे आणि काही वेळा आमच्या काकांच्या आणि वडिलांबरोबरही बॅडमिन्टन, रिंगटेनिस खेळत असू. बॅडमिन्टनसाठी लागणाऱ्या रॅकेटस मोजक्या होत्या. त्यामुळे आळीपाळीने खेळणे ओघानेच आले. बॅडमिंन्टनचा उत्साह संपला की त्याच मोठ्या अंगणात बॅट- बाॅल खेळत असू.

सुरवातीला सिद्धेश्वरच्या जत्रेत मिळणाऱ्या बॅटी होत्या. खऱ्या बॅटीशी किंचित सारखेपणा असायचा. तोही फक्त आकारात. ती बॅट म्हणजे बॅटीच्या आकाराची केवळ फळी होती. पण त्याकडे आमचे लक्ष नसे. रबरी चेंडू आणि ती बॅट म्हणजे आमचा बॅट बाॅल; म्हणजेच क्रिकेट खेळणे असे. रबरी बॅाल (टेनिसचा नव्हे) हरवायचा किंवा बॅटीचा मार खाऊन फुटायचा. जशी बॅट तसाच बाॅल. समान दर्जाचे. रबरी बाॅल फुटला की श्रावणी सोमवारी सिद्धेश्वरच्या जत्रेतून लाकडी बाॅल आणायचो. टिकाऊ आणि टाळक्यात, कपाळाला लागला की किती कडक आणि दणकट तेही समजायचे. त्यामुळे तो बाॅल अडवण्याचा, कॅच पकडण्याचा आमच्यापैकी कुणीही प्रयत्न करीत नसे. असल्या हिरोगिरीच्या वाटेला जात नसू.

खऱ्या बॅटी बॅाल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे कुकरेजाचे दुकान ! हे दुकान म्हणजे क्रिकेटच्या बॅटी बॅाल आणि फुटबॅाल हॅाकी आणि इतरही सर्व खेळांच्या साहित्याचे दुकान, -भांडारच! त्यावेळी संपूर्ण शहरात असे एकच दुकान होते. गावातल्या सगळ्या शाळा कॅालेजांची, खेळाच्या सामानाची खरेदी इथूनच होत असे. कुकरेजा कं.चे आणखी एक खास वैशिष्ठ्य म्हणजे आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेची मानाची ढाल कुकरेजांनी ठेवली होती. कुकरेजा शिल्ड जिंकण्यासाठी सर्व हायस्कुलांत दरवर्षी अटीतटीची लढाई असायची. विशेषतः आमची शाळा, न्यु हायस्कूल आणि ॲन्ग्लो उर्दु ह्यांच्यात.

आम्हाला कुकरेजा आणि कं.चे दुकान आणखी एका कारणाने माहितीचे होते. बॅडमिन्टनच्या रॅकेटस दुरुस्त करायला तिथे जात असू. दुकानात एक अत्यंत कुशल आणि कसबी कारागीर होता. हा कारागिर अगदीशिडशिडा. आणि मालक कुकरेजा ( हे गृहस्थ, मालक कुकरेजाच होते का कोणी व्यवथापक होते हे माहित नाही. पण आम्हाला ते मालकच वाटत.) जाडे होते. ह्या दोघांना पाहिले की लॅारेल हार्डीची आठवण यायची. त्यांचा वेष ठरलेला असे. जाड कापडाचा ढगळ पायजमा आणि त्यावर कधी अर्ध्या बाह्यांचा रंगीत, कधी पांढरा शर्ट. केस पांढरट. भांग साधा पाडलेला . पण व्यवसथित विसकटलेले. त्यांचा कारागीर उंच आणि शिडशिडीत. पंजाबी लुंगी, वर पैरणीसारखा अर्ध्या बाह्यांचा चोकटीचा सदरा किंवा बनियन. डोक्यावर फेटा नसे पण मध्यभागी केसांचा बुचडा बांधलेला असे. सदा कामात गढलेला. बॅडमिन्टनच्या रॅकेटस ची जाळी घट्ट विणत बसलेला दिसे तर कधी क्रिकेटच्या बॅटला तळाशी चांभारी दोऱ्यासारखी ट्वाईन काटेकोरपणे गुंडाळत असे. त्यासाठी तो बॅट, मागे- पुढे- -बाजुला सरकवता येईल असा, जमीनीवर ठेवलेल्या साचात ठेवायचा. ट्वाईन बॅटला ज्या ठिकाणी गुंडाळायची तिथे ब्रशने सरस लावायचा. मग ट्वाईनचे एक टोक तिथे घट्ट चिकटवून ठेवायचा. त्यानंतर साचा हळू हळू फिरवायला लागे. आणि ट्वाईन इकडे तिकडे न भरकटू देता बरोबर एकाखाली एक अगदी सरळ रेषेत जवळ आणत आपोआाप तो गुंडाळत असे. ही पट्टी झाली की तीन चार बोटांचे अंतर ठेवून त्यावर सरसाचा ब्रश फिरवून झाला की दुसऱ्या पट्टीसाठी ट्वाईन गुंडाळणे सुरू. अशा तऱ्हेने तो ट्वाईनच्या दोन पण बहुतेक बॅटीना तीन पट्ट्या लावायचा.

आम्ही आमचे काका आबासाहेबांच्याबरोबर बॅडमिन्टनच्या रॅकेटस दुरुस्तीसाठी कुकरेजाकडे घेऊन जायचो. रॅकेटची जाळी सैल झाली असेल तर दोन तीन दिवसांनी या म्हणायचा. कधी मधली एखाद दुसरी तार तुटली असेल तर तो अर्ध्या तासात सुंदर विणून द्यायचा. जाळी पुन्हा पहिल्या सारखी दिसायची. एखाद्या तारेची वेलांटी फ्रेम मधून सैल झालेली दिसल्यावर तो काय करायचा माहित नाही. पण खालच्या बाजूने, वरच्या बाजूने दोन तारा तो अशा काही खाली वर ताणत असे. आणि तळहातावर ती रॅकेट मारत असे त्यावेळी “तंन्नन” असा झंकारणारा आवाज ऐकायला मजा येई. जाळी आता पक्की झाली ह्याची खात्री होई.

असेच एकदा आम्हाला आमचे वडील अचानक कुकरेजा मध्ये क्रिकेटची बॅट घ्यायला घेऊन गेले. तेव्हाचा आनंद काय वर्णावा. आपली पहिलीच टेस्ट मॅच खेळायला जाणाऱ्या बॅटसमनला किंवा बॅालरला काय वाटत असेल ह्याची काही कल्पना नव्हती. पण शाळेच्या टीम मधून न्यू हायस्कूल किंवा ॲंग्लो उर्दु विरुद्ध पार्कच्या मैदानावर खेळायला जाताना बॅट्समन किंवा गोलंदाजाला काय वाटत असेल तोच आनंद, तीच धाकधुक, तसाच उत्साह आम्हालाही आला होता.

खरी क्रिकेटची बॅट! आणि तो चमकणारा, पॅालिशने चकाकणाऱ्या लाल रंगाचा लेदर बॅाल! तो बॅाल हातात घ्यायला मिळाला, नव्हे ह्या बॅटने व बॅालने आता बॅटबॅाल न खेळता ‘ क्रिकेट ‘ खेळणार हाच विचार वारंवार आम्हा तिघाही भावांच्या मनात येत होता. आमच्यासाखे भाग्यवान आम्हीच!

दुकानात आम्ही तीन चार बॅटी स्टाईलमध्ये धरून बॅटिंग करण्याच्या पवित्र्यात उभे राहून पाहिल्या. तिघांनाही बॅट व्यवस्थित धरता येईल अशी एकमेव बॅट मिळणे शक्य नव्हते. त्यातून कुकरेजानीच मार्ग काढला. आमच्याकडे पाहात त्यांनी एक दोन प्रसिद्ध ‘नॅान्जर’च्या बॅटी ( बॅटीना खेळाडूच्या शरीरयष्टी म्हणण्यपेक्षा उंची ध्यानात घेऊन नंबर दिलेला असे. ५,६ ७ वगैरे.) पाहून त्यातली त्यांनी योग्य त्या नंबरची बॅट दिली. oiling करून झाल्यावर बॅट घेऊन जा असे त्यांनी सांगितले. स्टम्पस? कमीत कमी तीन तरी लागायचे पण बजेटमध्ये स्टम्प बसत नव्हते त्यामुळे बॅालिंग न करता उडवले आम्ही ते !

भरपूर खेळलो आम्ही त्या बॅटने. गल्लीतल्या मॅचेस मध्ये नवीन होती तोपर्यंत आमची बॅट हिरॅाईन होती. एकदा बॅटीचे हॅन्डलच सैल झाले. कुकरेजा कडे गेलो. बिनफेट्याचा तो कसबी शीख कारागीर यायचा होता. कुकरेजाशेठनी बॅट पाहिली. थोडा वेळ थांबा म्हणाले. थोड्या वेळाने तो शीख कारागीर येताना पाहिला. बिचारा एका पायाने लंगडा होता ते आम्हाला समजले. एका पायाच्या चौड्यांने चालायचा. त्या पायाची टाच टेकतच नव्हती. उंच होता मुळात त्यात एक पाय नेहमीसारखा टाकायचा पण तो दुसरा पाय चौड्यावर चालण्यामुळे दर पावला गणिक तो एका बाजूने जास्त उंच व्हायचा.

त्याने बॅटीकडे नुसती नजर टाकली. काही न बोलता, सैल झालेल्या हॅन्डलच्या पाचरात जिथे अंतर होते तिथे सरस भरला आणि त्या साच्यात बॅट ठेवली. व हॅन्डलचे पाचर जिथे खुपसले होते त्या बॅटीच्या दोन्ही भागांना त्याने रबरी हातोड्याने योग्य तेव्हढ्याच शक्तीने हळू हळू ठोकू लागला. “ठीक हो गयी है. पण ट्वाईन लावली तर बरेच दिवस टिकेल.” पैशाचा अंदाज घेतला. परवडेल वाटल्यावरून हो म्हणालो. त्याची ती आखीव रेखीव पण तितकीच दोरा बळकट गुंडाळण्याची कामगिरी ओणवे होऊन पाहात राहीलो. बॅट हातात दिली त्यांनी. पुन्हा बॅटिंग करण्याच्या पवित्र्यात उभे राहून मुद्दाम हॅन्डलवर जोर देत जमिनीवर बॅटीने टक टक करत बॅटिंग करून पाहिली. बॅट नविन झाली ह्या खुषीत आलो घरी !

बॅटीचा दोस्त लाल चेंडूची मात्र रया जाऊ लागली. पण दुसरा लेदर बॅाल घेणे शक्य नव्हते. त्या ऐवजी खेळण्याच्या इतर मोठ्या दुकानात सीझन बॅाल नावाचा एक बॅाल मिळायचा. तो स्वस्त व बरेच दिवस टिकत असे. पण नडगीवर किंवा हॅन्डल धरलेल्या दोन्ही हातांना लागला की ठो ठो करण्याची वेळ यायची. पण असल्या किरकोळ कारणांनी कुणी क्रिकेट खेळणे थांबवते का?

बॅटीच्या हॅन्डलला रबरी कव्हर बसवताना पाहणे हा सुद्धा एक नेत्रसुभग सोहळा असायचा. कुकरेजाचा हा वाकबगार कलावंत-कारागीर तुम्हाला पाहिजे ते कव्हर ( ‘परवडणे’ हा आमचा परवलीचा शब्द असायचा.) निवडा म्हणायचा. बॅट नवीन घेताना जे कव्हर असे ते फुकट असे. कारण बॅटीसह ते गृहप्रवेश करायचे. त्याची गुणवत्ता तितकीच. नवीन घेणे बरेच दिवस लांबणीवर टाकायचो आम्ही. पण बदलायची वेळ टळून गेली. उघड्या हॅन्डलने खेळून हात खरचटू लागले. टोलाच नाही चेंडू नुसता तटवला तरी हाताला झिणझिण्या यायच्या. आता मात्र तसे नवीन कव्हर बसवणे आणि हॅन्डल पक्के करून घेण्यासाठी गेलो.

चांगले रबरी काटेरी ठिपकेदार कव्हर ज्यामुळे पकड छान यायची खेळताना तसे घ्यावे असे पहिल्यांदा वाटायचे पण किंमत ऐकल्यावर मग “हे केव्हढ्याला, ते केव्हढ्याला” करत एक परवडणारे( पुन्हा तो परवलीचा शब्द आलाच) कव्हर नक्की करत असू.

आता इथून त्या शीखाची कामगिरी सुरू. पहिल्यांदा तो ते कव्हर दोन्ही बाजूंनी ओढून ताणून पाहात असे. बॅटीच्या हॅन्डलला पांढरी पावडर लागायची. तीच पावडर रबरी कव्हरमध्येही जायची. कव्हर चांगले चोळले जाई. त्यानंतर तो ते कव्हर आत खुपसताखुपसता मध्ये पावडर हाताला लावायचा, रबरी कव्हर मध्यम लांबीचे करी. उघडे तोंड हॅन्डलच्या डोक्यावर घट्ट दाबून ठेवल्या सारखे करतो ना करतो तोच कव्हरची वर राहिलेली बाजू सरसर करीत खाली आणत जाई! बॅटीचे दोन्ही खांदे बेताने झाकले जातील इतके ते कव्हर खाली न्यायचा. थोडा भाग अजून वर दिसत असे तो भाग खाली सरकवत सरकवत हॅन्डलच्या कपाळपट्टीला खाली वळवत गुंडाळून टाके. वारे पठ्ठे ! एका झटक्यात, हवेत हात फिरवून बंद मुठीतला रुपया प्रेक्षकांना दाखवणाऱा कुकरेजाच्या दुकानातील हा आमचा लंगडा कलाकार जादूगारच होता आमच्यासाठी !

ढगळ मापाचा वाढत्या अंगाचा अभ्रा असला तरी तो उशीला घालण्यासाठी अर्धा तास झटापट करणारे आम्ही. आम्हाला तो कसबी शीख जादूगार वाटला तर आश्चर्य नाही.

पुस्तकांच्या गराड्यांत

बेलमाँट

गेले काही दिवस पुन्हा मी लायब्ररीत जाऊ लागलो आहे. आजपर्यंत पाचसहा लायब्रऱ्यात जाऊन बराच काळ तिथे काढला. सर्व ठिकाणी अनेक चांगल्या पुस्तकांच्या नंदनवनात वाचक म्हणून वावरत होतो.

सध्या बेलमॅान्टच्या लायब्ररीत मात्र मी व्हॅालन्टियर म्हणून जातो. म्हणूनच सुरुवातीला लिहिले की पुन्हा मी लायब्ररीत जाऊ लागलोआहे.

पुस्तके मासिके वाचण्यासाठी माझ्या लायब्ररींच्या भेटी जनरल लायब्ररीपासून सुरुवात झाली. त्यानंतर वल्लभदास वालजी वाचनालय, बळवंत वाचनालय,नवजीवन ग्रंथालय, ते मुंबई मराठी ग्रंथालय – विशेषतः तिथल्या संदर्भ ग्रंथालयापर्यंत पर्यटन झाले. . त्यानंतर माउन्टन व्हयू लायब्ररी, मर्चंटस् वॅाक, रेडवुड शोअर्स, सॅन कार्लोस रेडवुडसिटी ह्या लायब्रऱ्यात सुद्धा जाऊन आलो. सॅन कार्लोस लायब्ररीपासून माझे व्हॅालंन्टियरचे दिवस सुरू झाले.

पण आज जास्त करून लिहिणार आहे ते, विशेषतः बेलमॅान्टच्या वाचनालयाशी संबंधित आहे. कारण सध्या मी बेलमॅान्टच्या लायब्ररीत व्हॅालन्टियर म्हणून जात आहे. तिथे देणगी म्हणून येणाऱ्या पुस्तकांशी माझा सतत संबंध येतो.

निरनिराळी, अनेक विषयांवरची, कादंबऱ्या, आठवणींची, चरित्रे, आत्मचरित्रे, अभिजात (classic), काव्यसंग्रह , इतिहासाची, उत्कृष्ठ छायाचित्रांची, आर्थिक राजकीय विषयांवरची किती किती, अनेक असंख्य पुस्तके समोर येत असतात.

काही पुस्तके अगोदर वाचली असल्यामुळे ओळखीची असतात. त्यातलीही काही पुस्तके तर केव्हा कुठे वाचली कोणी दिली ह्यांच्याही आठवणी जाग्या करतात. ह्यातच काही योगायोगांचीही भर पडते. थोरल्या मुलाने अगोदर केव्हा तरी – केव्हा तरी नाही- दोन तीन दिवसांपूर्वी विचारले असते ,” बाबा सध्या अचानक ज्योतिषावरची पुस्तके दिसायला लागलीत.तुमच्या पाहण्यात आलीत का?” त्यावर मी नाही म्हणालो. इतक्यात तरी काही दिसली नाहीत.” असे म्हणालो. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी, चिनी ज्योतिष, अंकशास्त्रावर आधारित भविष्याची, तुमची जन्मतारीख आणि भविष्य अशी पुस्तके आली की! योगायोग म्हणायचा की चमत्कार हा प्रश्न पडला.

फेब्रुवारीत धाकटा मुलगा म्हणाला की ते सगळे एप्रिलमध्ये युरोपातील ॲमस्टरडॅम लंडन पॅरीस ला जाणार आहेत. दोन चार दिवस माझ्या ते लक्षात राहिले. नंतर विसरलो. ऐका बरं का आता. मी लायब्ररीतल्या कॅाम्प्युटरवर पाहिले. स्टीव्ह रीकची पुस्तके दिसली नाहीत. एक आढळले. पण ते दुसऱ्या गावातल्या लायब्ररीत होते. माझ्यासाठी राखून ठेवा असे नोंदवून ठेवले. दोन दिवस गेले. तिसरे दिवशी लंडन का पॅरिसवरचे स्टीव्ह रीकचे पुस्तक समोर आले. अगदी समोर. वा! हे जाऊ द्या. मी लायब्ररीतल्या बाईंनाही सांगून ठेवले होते. दोन तीन दिवसांनी त्यांनी मला बोलावलेआणि नेदर्लॅंडचे पुस्तक हातात ठेवले. “ पण तुला पाहिजे त्या ॲाथरचे नाही .” मी काय बोलणार? योगायोग की चमत्कार ? हा नेहमीचा प्र्शन पुन्हा पडला!

पुस्तके देणारे बरेच लोक पुस्तके देतात ती इतक्या चांगल्या स्थितीत असतात की आताच दुकानातून आणली आहेत! अनेक पुस्तके खाऊन पिऊन सुखी अशी असतात. तर काही जिथे जागा सापडली तिथे बसून, जेव्हा मिळाला वेळ तेव्हा वाचलीअशी असतात. कव्हरचा कोपरा फाटलेला , नाहीतर कान पिरगळून ठेवावा तशी आतली बऱ्याच पानांचे कोपरे खुणेसाठी दुमडून ठेवलेली, अशा वेषांतही येतात. काही मात्र बघवत नाहीत अशा रुपाने येतात. पण अशा अवस्थेतील, फारच म्हणजे अगदी फारच थोडी असतात.

पुस्तके ज्या पद्धतीने दिली जातात ती पाहिल्यावर देणगी दार आणि त्यांची घरे कशी असतील ह्याचा ढोबळ अंदाज येतो. काही पुस्तके बऱ्याच वर्षांपूर्वी प्रकाशित झाली असतात तरी ती नुकतीच दुकानातून आणली आहेत असे वाटते.काहीजण कागदी पिशव्या भरून पुस्तके देतात. पण इतकी व्यवस्थित लावून रचलेली की ती पिशवी रिकामी करू नये; पिशवीकडे पाहातच राहावे असे वाटते. साहजिकच पुस्तके बाहेर काढताना मीही ती काळजीपूर्वक काढून टेबलावर ठेवण्याचा प्रयत्न करतो.

काही वेळा पुस्तके खोक्यांत भरून येतात. पहिले दोन थर आखीव रेखीव. मग वरच्या थरात जशी बसतील, ठेवली जातील तशी भरलेली ! खोकी आपले दोन्ही हात वर करून उभे ! काही पुस्तके तर धान्याची पोती रिकामी करावी तशी ओतलेली. सुगीच्या धान्याची रासच! हां त्यामुळे मोऽठ्ठ्या, खोल पिपातली पुस्तके उचलून घ्यायला सोपे जाते हे मात्र खरे.

एक दोनदा तर दोन लहान मुले,पुस्तकांनी भरलेले आपले दोन्ही हात छातीशी धरून “कुठे ठेवायची ?” विचारत कामाच्या खोलीत आली ! लहान मुलांची पुस्तके होती. त्या मुलांइतकीच पुस्तके गोड की पुस्तकांपेक्षाही मुले ? ह्याचे उत्तर शोधण्याची गरजच नव्हती. दोन्ही गोड! किती पुस्तके आणि ती देणारेही किती!

आठवणी जाग्या करणारी पुस्तकेही समोर येतात. पूर्वी मुलाने ,” हे वाचा” म्हणून दिलेले Little Prince दिसल्यावर माउन्टन व्ह्यु नावाच्या लायब्ररीची आठवण येते. जिथे बसून वाचत असे ती कोचाची खुर्ची, तिच्या बाजूला खाली ठेवलेली, बरोबर घेतलेली वहीची पिशवी…. असेच आजही बेलमॅान्टच्या लायब्ररीत टाईम, न्युयॅार्क संडे मॅगझिन, रिडर्स डायजेस्ट,न्यूयॅार्कर वाचताना वही बॅालपेन असलेली पिशवी जवळच्या टेबलावर ठेवलेली असते!

मध्यंतरी धाकट्या मुलाने दिलेले बेंजॅमिन फ्रॅन्कलिनचे, आयझॅकसनने लिहिले चरित्र आले तर एकदा त्यानेच दिलेले लॅारा हिल्डनबर्डचे Unbroken भेटीला आले. माझ्या दोन्ही नातवांच्या शेल्फातील चाळलेले The Catcher in the Rye आणि Of the Mice and Man ही पुस्तके हातात आल्यावर त्यांची ती विशेष खोली, तिथली,त्यांच्या पुस्तकांनी भरलेली शेल्फंही दिसली. इकडे अगदी पहिल्यांदा आलो तेव्हा मुलाने आणून दिलेले Ian Randची सर्वकालीन श्रेष्ठ कादंबरी Fountain Head काही दिवसांपूर्वी दिसले ! आणि त्याच लेखिकेचे Anthem ही ! धाकट्याने दिलेले Confidence Men सुद्धा मध्यंतरी अचानक भेटून गेले.

मुलीचे आवडते Little Women हे अभिजात वाड•मयाचे पुस्तक आणि तिला आवडलेले व नातीने मला दिलेले Anne of Green Gables ही दोन्ही पुस्तके इतक्या विविध, सुंदर आवृत्यांतून येत असतात की लग्नसमारंभाला नटून थटून जाणाऱ्या सुंदर स्त्रियांचा घोळकाच जमलाय! हाच सन्मान शेक्सपिअर , चार्ल्स डिकन्स,शेरलॅाक होम्स आणि लिटल प्रिन्स , हॅरी पॅाटरला, आणि ॲगाथा ख्रिस्तीलाही मिळत असतो. उदाहरणादाखल म्हणून सन्मानीयांची ही मोजकीच नावे सांगितली.

लहान मुलांच्या पुस्तकांनाही देखण्या, जरतारी आवृत्यांतून असेच गौरवले जाते. त्यापैकी काही ठळक नावे सांगायची तर C.S. Lewis ह्यांचे प्रख्यात Chronicles of Narnia , Signature Classics of C.S. Lewis. तसेच E.B. White ची Charlottes Web , Stuart Little ही पुस्तके, Alice in Wonderland, Sleeping Beauty , The Beauty and The Beast, ह्या पुस्तकांनाही असाच मान मिळतो.

अगदी अलिकडच्या योगायोगाची कहाणी; मी पूर्वी वाचलेले Dr. Andrew Weil चे पुस्तक अचानक प्रकट झाले. अरे वा म्हणालो. पुन्हा परवा त्याच डॅाक्टरांचे Natural Health Natural Medicine हे पुस्तक दिसले. म्हटलं आता मात्र हे मुलांना कळवायलाच पाहिजे.

मघाशी मी वेगवेगळ्या रुपातील आवृत्यांतून येणाऱ्या पुस्तकांच्या यादीतील आणखी एका मानकऱ्याचे नाव सांगायचे राहिले. ते म्हणजे Hermann Hess चे Siddhartha ! हे सुद्धा सार्वकालीन लोकप्रिय पुस्तक आहे. मागच्याच वर्षी मला हे मुलाने दिले होते. मी वाचले. छान लिहिलेय. आपल्या तत्वज्ञानासंबंधी व तत्वज्ञाविषयी लिहिलेले, तेही परदेशी लेखकाने ह्याचे एक विशेष अप्रूप असते. ह्याने बरेच समजून उमजून लिहिले आहे. सहा महिन्यांपूर्वी, मुलांनी वाचलेले व मला,” बाबा हे वाचा तुम्हालाही समजेल,आवडेल असे पुस्तक आहे “ म्हणत दिलेले Homosepiens हे गाजलेले पुस्तक परवाच दोन तीन वेळा शेकहॅन्ड करून गेले. माझ्याकडे असलेली लायब्ररीविषयी, लायब्ररी हेच मुख्य पात्र असलेली The Library Book किंवा Troublewater Creeks Book-woman अशी पुस्तके पाहिली की लायब्ररीत लायब्रऱ्या आल्या असे वाटू लागते !

काही वेळा मी ह्या ना त्या पुस्तकांचा “ परवा हे आले होते आणि ते सुद्धा, बरं का!” असे मुलांना सांगतो. पण माझ्या आवडीच्या जेम्स हेरियटचे एकही पुस्तक आतापर्यंत तरी ह्या गराड्यात आलेले, थांबलेले पाहिले नाही! येईल, योग असेल तेव्हा ती चारीही पुस्तके येतील. !

पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांच्या, लोकांच्या गराड्यांत , किंवा प्रसिद्धीच्या सतत झोतांत असलेल्या लोकप्रिय नामवंतांना आपल्या चहात्यांची गर्दी,गराडा हवा हवासा वाटतो. पुस्तकप्रिय वाचकांनाही पुस्तकांच्या गर्दीगडबडीचा गराडाही हवा हवासा वाटत असतो ! नाहीतर आजही लायब्ररीत इतके वाचक-लोक आले असते का?