Monthly Archives: January 2021

चांगभले! सगळ्यांचेच चांगभले!

बेलमॅान्ट

एक तरुण मुलगा होता. तो अगदी पोरका होता. एका शेठजी कडे पडेल ते काम करायचा. काम संपल्यावर घरी जाताना शेठजी त्याला पीठ मीठ द्यायचा.

घरी आल्यावर तो मुलगा पिठाच्या चार भाकऱ्या करायचा. मीठा बरोबर किंवा कधी शेठजीनी चटणी दिली असेल तर चटणी बरोबर खायचा. दोन रात्री खायचा आणि उरलेल्या दोन, सकाळी कामाला जाताना खायचा. एकदा सकाळी जेवायला बसला तर दुरडीत एकच भाकरी! एक भाकरी काय झाली असा विचार करत त्याने जेवण संपवले. दुसऱ्या दिवशी सकाळी तोच प्रकार; एकच भाकऱी शिल्लक. हे रोज होऊ लागले तेव्हा एका रात्री झोपेचे सोंग घेउन पडून राहिला. एक मोठा गलेलठ्ठ उंदीर येऊन भाकरी घेऊन पळून गेला.

दुसऱ्या रात्री त्याने उंदराला भाकरी पळवतानाच पकडले. उंदराला म्हणाला,” अरे तू माझी भाकरी पळवतोस. रोज माझी भूक मारावी लागते. अगोदरच चार भाकऱ्या त्यातलीही तू एक पळवतोस! मी करू काय?” “ एऽ बघ , मी माझ्या नशिबाने खातोय. तुझं तू पाहा.” उंदीर असे म्हणाल्यावर तरूण मुलगा म्हणाला,” अरे कसले नशीब आणि फिशिब. मी गरीबीने व्यंगून गेलोय. काय करावे सुचत नाही.” असे म्हणून कपाळाला हात लावून उंदराकडे पाहू लागला. मुलाचे बोलणे ऐकून उंदीरही आपले डोळे मिचकावित म्हणाला, “ तुझ्या प्रश्नाचे उत्तर एकच माणूस देईल. तू गौतम बुद्धाला जाऊन भेट. तो सांगेल.”

तरूण मुलगा मालकाची रजा घेऊन निघाला. प्रवास लांबचा. मुलाच्या अडचणीत आणखी अडचणींची भर घालणारा तो प्रवास! एका रात्री त्याला जंगलातून जाताना दूरवर दिवा दिसला. त्या दिव्याच्या रोखाने निघाला. ते मोठे घर होते. मुलाने दार ठोठावले. एका बाईने दार उघडले. मुलाने त्या बाईला आजची रात्र इथे काढू का असे विचारल्यावर बाई हो म्हणाली. तिने मुलाला खायला दिले पाणी दिले. जेवण झाल्यावर तो कुठे चालला ते विचारले. तरुण मुलगा म्हणाला,” माझा प्रश्न विचारायला मी बुध्दांकडे निघालो आहे.” ते ऐकून बाई म्हणाली,” अरे माझाही एक प्रश्न आहे तोही विचार. माझी वीस वर्षाची मुलगी बोलत नाही. मुकी आहे. ती कधी बोलू लागेल ते विचार गौतम बुद्धाला.” मुलगा हो म्हणाला.

दुसरे दिवशी मुलाचा प्रवास सुरु झाला. जाता जाता वाटेत एक प्रचंड बर्फाने झाकलेला उंच पर्वत दिसला. आणि त्याला शिखरावर माणसासारखा एक ठिपका दिसला. तरूणाला प्रश्न पडला हा पर्वत ओलांडून कसा पार करायचा. शिखरावरच्या माणसाने त्याला पाहिले असावे. तो तिथूनच ओरडला,” मुला वर चढायला सुरुवात कर.” हे ऐकून चढावे की नाही असा विचार करत असतानाच तो माणूस पुन्हा म्हणाला, “ घाबरू नको. वर ये.” मुलगा पर्वत चढू लागला आणि एका क्षणात तो शिखरावर आला. मुलगा थक्क झाला. इतका थक्क झाला की आश्चर्याने तो बोट तोंडात घालायचेही विसरला. बोटात तोंड घालताना, दोन्ही कानात बोटे घालून तोंड आऽऽऽ करून त्या माणसाकडे पाहात राहिला. माणसाने विचारले,” अरे इकडे कुणी येत नाही. तू कसा आलास?” तरुण मुलगा म्हणाला, “ ते नंतर. आधी मी इथे एका क्षणात वर कसा आलो ते सांगा.” त्यावर तो माणूस आपल्या हातातली सुंदर छडी दाखवत म्हणाला,” अरे मला ही जादूची शक्ती मिळाली आहे. तू कुठे चाललास ?” त्यावर मुलगा म्हणाला, मी माझा प्रश्न विचारायला गौतम बुद्धाकडे निघालोय्.” ते ऐकल्यावर तो माणूस म्हणाला,” अरे मी इथे हजार वर्षे तप करत बसलो आहे. जादूच्या शक्तीशिवाय मला काही मिळाले नाही.मला स्वर्गात जायला केव्हा मिळेल ते बुद्धांना विचार.” तरूण हो म्हणाला. शिखरावरच्या माणसाने त्याला पर्वत पार करून दिला.

मुलगा निघाला. विचार करू लागला, माझा प्रश्न घेऊन निघालो आणि आता ह्या दोघांच्या प्रश्नांची आणखी भर पडली.चला. असे स्वत:शी म्हणत पुढचा प्रवास करू लागला. तर एक नवीनच संकट पुढे वाहात असताना दिसले. भल्या रुंद पात्राची महानदी समोरून वाहात होती. काय करावे. पोहता येत होते तरी आडा विहिरीतले पोहणे त्याचे. इतकी अफाट रुंदीची नदी पार करणे अशक्यच होते त्याला. अधेमध्येच गटांगळ्या खाऊन बुद्धाला न भेटताही चौघांचेही प्रश्न सुटले असते!

तेव्हढ्यात एक फार मोठे कासव पोहत येत असलेले दिसले. कासव जवळ आले. मुलगा म्हणाला,” कासवराव मला नदी पार करून देता का? “ “ का नाही? चल माझ्या पाठीवर बस. तरुण मुलगा कासवाच्या महाप्रचंड पाठीवर बसला. जाताना कासवाने मुलाला तो कुठे , कशासाठी चालला विचारले. मुलाने तो बुद्धाकडे स्वत:ची समस्या सोडवण्यासाठी चालल्याचे सांगितले. त्यावर कासव म्हणाले,” बाळा माझाही एक प्रश्न तथागतांना विचार.. मला डायनासोर व्हायचं आहे. मी काय करू?” मुलगा म्हणाला नक्की विचारेन. पण मनात म्हणत होता माझा एक म्हणता म्हणता आता चार प्रश्न झाले! चला.

तरूण मुलगा गौतमबुद्धांच्याकडे पोचला. पुष्कळ लोक होते. गौतम बुद्धाने प्रथमच सांगितले की प्रत्येकाला फक्त तीनच प्रश्न विचारता येतील!”
हे ऐकून मुलगा निराश झाला. विचारात पडला. त्याची पाळी येईपर्यंत तो मनाशी बोलत होता. फक्त तीनच प्रश्न विचारायचे. मला तर चार प्रश्न विचारायचे आहेत. तो तिघांचे प्रश्न घोळू लागला. तिघेही त्याच्या डोळ्यांसमोर येऊ लागले. कुणाचा प्रश्न बाजूला ठेवायचा हा प्रश्न पुन्हा पुन्हा पडू लागला.
त्याने विचार केला मुलगी मुकी. त्यामुळे बाई व मुलगी वीस वर्षे त्या एकमेकींशी बोलू शकत नाहीत. तसेच तो जादूगार कित्येक वर्षे तप करतोय; आणि कासवदादा किती वर्षे पाण्यातच पोहतोय. माझा प्रश्न काय फक्त पोटापाण्याचा आहे. आज कोरडीसुकी का होईना पोटाला भाकरी मिळतेच आहे नां?

मुलाची पाळी आली. त्याने कासव डायनासोर केव्हा होईल ते विचारले. त्यावर बुद्ध म्हणाले,” त्याला म्हणावं ते पाठीवरचे अगडबंब कवच फेकून दे!” नंतर त्याने जादुगाराला स्वर्गात जायला केव्हा मिळेल हे विचारले. त्यावर बुद्ध म्हणाले,” त्याला अगोदर त्याच्या त्या शक्तीचा त्याग कर म्हणावे.” त्यानंतर मुलाने वीस वर्षे मुकी असलेली मुलगी केव्हा बोलेल हा प्रश्न विचारला. त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, “ तिचे लग्न झाल्यावर ती बोलेल.”

मुलगा परत निघाला. कासवाने त्याला पाठीवर घेऊन पैलतीराला सोडताना विचारले,” विसरलास ना तू माझा प्रश्न विचारायला?” मुलगा म्हणाला,” मी तुला कसा विसरेन ? बुद्धाने तुला कवच काढून टाकायला सांगितले आहे!” हे ऐकताक्षणीच कासवाने सर्व शक्ती पणाला लावून आपले कवच तोडून फाडून टाकले. प्रचंड आवाज होत कासवाचा महाकाय डायनासोर झाले! ते होत असतानाच कवचातून रत्नामोत्यांचा वर्षाव झाला. पूर्वीचे कासव म्हणाले. “ तरूण मित्रा ही सर्व रत्ने मोती तुझी!”

मुलगा ती रत्नं मोती मिळाल्याने मालामाल झाला. प्रवास करत पर्वतापाशी आला. पर्वतावरच्या माणसाने वरूनच विचारले,” पोरा माझा प्रश्न विचारलास नां ? का गडबडीत विसरलास?” विचारला असलास तरच तुला वर घेईन.” हे ऐकल्यावर मुलगा हो म्हणाल्याबरोबर त्याच क्षणी तो शिखरावर आलाही! “ बुद्धांनी तू तुझ्या शक्तीचा जेव्हा त्याग करशील तेव्हाच तू स्वर्गात जाशील असे सांगितले आहे.” हे ऐकल्यावर तो जादूई शक्तीचा माणूस म्हणाला, “ आताच मी माझ्या शक्तीचा त्याग करतो.” तो पुढे म्हणाला,” हे मुला ही माझी शक्ती मी तुलाच देतो !” असे म्हणून त्याने जादूची सुंदर कांडी त्या मुलाला दिली. क्षणार्धात त्या तपस्व्यासाठी “उघडले स्वर्गाचे दार!”

रत्नं मोती आणि जादुची ती छडी घेऊन एका क्षणात तो तरुण त्या बाईंच्या घरी पोचला. बाईंनी बुद्धाने काय सांगितले असे विचारल्यावर मुलाने बुद्धाचा निरोप बाईंना सांगितला. ते ऐकून बाईला फार आनंद झाला. आपल्या वीस वर्षाच्या तरूण सुंदर मुलीला घेऊन आल्या. त्या म्हणाल्या,” अरे तुझ्यासारखा तरुण समोर असताना माझ्या मुलीसाठी दुसरा नवरा का शोधायचा?”

त्सा तरुण मुलाचे व मुक्या मुलीचे लग्न झाले. मुलीने आनंदाने ,” आई! आई! मला बोलता येऊ लागले”म्हणत आईला मिठी मारली.
कासवाची, तप करणाऱ्याची व मुक्या मुलीच्या आईची – तिघांच्याही मनातल्या इतक्या वर्षांच्या इच्छा पूर्ण होऊन त्यांच्या चिंता मिटल्या. प्रश्न सुटले. आणि त्या तरुण मुलाने गौतम बुद्धांना आपली चिंता प्रश्न न विचारता तोही धनवान शक्तिमान आणि चांगली बायको मिळाल्याने भाग्यवानही झाला.

एकाच्या भलेपणाने इतर सगळ्यांचेही चांगभले झाले.


आपण पंढरपूर, तुळजापूर किंवा कोल्हापूरला किंवा एखाद्या सत्पुरुषाच्या दर्शनाला जाणार हे कळल्यावर काहीजण “आमचाही नमस्कार सांगा” असे सांगतात. तिथे गेल्यावर कितीजण लक्षात ठेवून त्यांचे नावे नमस्कार करतात हे माहित नाही.

(युट्युबवरील एका व्हिडिओत काही जण गप्पा मारत असता त्यातील एकजण ही लहानशी गोष्ट सांगतो. त्यावरून अखेरच्या परिच्छेदाची भर घालून मी ही लिहिली.)