Monthly Archives: May 2013

कवितेचे दिवस!

ड्ब्लू. आय. मर्विन हे दोन वेळा पुलित्झर पारितोषिक मिळालेले आणि पोएट लॉरिएट असे गौरविलेले कवि आहेत. त्यांचे आज ऍटलॅंटा येथे काव्य वाचन आहे. मेर्विन यांचे सांगणे असते की कविता ही नुसती वाचायची नसते तर ती मोठ्याने म्हणायची, वाचायची असते. रॉबर्ट एबर्ट ह्या चित्रपट समीक्षकाचे एक म्हणणे प्रसिद्ध आहे. तो म्हणतो,”चित्रपट चांगला की वाईट, अप्रतिम की सामान्य हे ठरविताना आपली बुद्धी गोंधळून जाईल, विचार करूनही ते जमणार नाही पण आपल्या मनाला जे एकदम भिडते, वाटते ते आपल्याला खोटे पाडणार नाही.”
मर्व्हिन याना ते तंतोतंत पटते आणि ते म्हणतात,” कवितेच्या बाबतीतही असेच म्हणता येईल. कविता ऐकताना मनाला जे वाटते, भिडते ती कवितेला दाद असते. मग तुम्हाला ती किती समजली कवितेत काय आशय आहे, कविला काय म्हणायचे आहे ह्या सर्व नंतरच्या गोष्टी. विचार करता करता हळू हळू कविता समजते.

“माझ्यासारख्याच्या बाबतीत कवितेचेच्या दिवसांचे सरासरी आयुष्य साधारणत: माध्यमिक शाळेपर्यंत. फार झाले तर महाविद्यालयाच्या एक दोन वर्षापर्यंत.पुढे कविता बाजूला पडते. म्हणजे आता मला कविता केव्हा समजणार!

… आता आता पर्यंत आपण सगळे कविता ’म्हणत’ असू. चालीवर म्हणत असू. त्या तशा म्हटल्यामुळे आवडत असत. बा.भ.बोरकरांची तेथे कर माझे जुळती, किंवा यशवंतांची संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी तसेच नारायण सुर्व्यांच्या कविता, सुरेश भटांच्या, विंदा करंदिकरांच्या मुक्तछंदातील कविता मोठ्याने म्हटल्यावर जास्त आवडतात.

कविता समजणे, तिचे आकलन ह्यासंबंधी मला काही सांगता येणे फार कठीण आहे. कविता मोठ्याने म्हणताना ती जास्त आवडते हे निर्विवाद. किंवा आवडलेली कविता म्हणताना जास्त आवडते असे म्हणू या.. त्यासाठी जास्त मागे जायला नको. परत आपल्या शाळेच्या दिवसात गेले की हे न सांगता पटेल. बघा ते दिवस. प्रत्येक इयत्तेतल्या आपण घरी म्हटलेल्या, शाळेत ४०-४५ पोरांबरोबर म्हटलेल्या, पोरांच्या आवाजात बुडून गेलेला तो मास्तरांचा आवाज… इंग्रजी कवितांपाशी थोडे अडखळतोय, पण तीही मोठ्याने म्हणायला लागल्यावर जास्त आवडायची…

मराठी शाळेत, शाळा सुटण्याच्या अगोदर पाढे, कविता म्हणायला वर्गात सुरवात व्हायची. आमच्या वर्गात पाढे म्हणताना सगळ्यांचे आवाज इतके हळू व्हायचे,बराच वेळ आवंढे गिळल्याचाच काय ते आवाज ऐकू येत. पाढे येणाऱ्या पाच-सहा पोरांचा काय तो आवाज. अशांना सगळेजण “लै आखडू हाय बे” असे म्हणत. पण ’पाखरांची शाळा भरे पिंपळावरती’ किंवा’धरू नका ही बरे फुलांवर उडती फुलपाखरे’ ह्या कविता सुरू झाल्या की पोरांना चेव येत असे. आवाज चढत चढत पुढे फक्त कवितेचा आरडा ओरडा व्हायचा! फुलपाखरे कधीच उडून गेलेली असत, पाखरेही आमच्या गोंगाटाला घाबरून घरट्यात लपून बसलेली असत!

घरातही कवितेची आवर्तने चालूच असत. सुरवातीला ’देवा तुझे किती.., ’चंद्र पहा उगवे मनोहर’ अशा कविता. पुढे मग ’रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा..”, त्याही नंतर, ह्या मागे पडून ’तेथे कर माझे जुळती’ माधव ज्युलियन यांची वाघ बच्चे फाकडे, भ्रांत तुम्हा का पडे’ म्हणण्यात असत. यशवंतांची ’आई’ तर घरोघरी म्हटली जायची. शाळेतल्या धड्यांबाहेरच्या कविताही आम्ही म्हणत असू. पूर्ण जरी नाही तरी एखादे दुसरे कडवे म्हटले जात असे. यशवंतांचीच ’संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी’ वंदन तुज मायभूमी हे अखेरचे’ माधव ज्युलियनांची ’ऐकव तव मधुबोल कोकिळे’ इत्यादी आम्हा सगळ्या भावंडांना येत असत.शाळेच्या पुस्तकातील इंग्रजी कविताही ठेक्यात लयीत म्हटल्या जात. ’मिलर ऑफ द डी’ ’वुई आर सेव्हन’ होम दे ब्रॉट द वॉरियर डेड’ ’चार्ज ऑफ द लाइट ब्रिगेड’ ह्या वर्ड्स्वर्थ. टेनिसन यांच्या कविता किंवा त्यातील दोन चार ओळी ठेक्यात म्हणत असू. पुन्हा एकदा सांगायचे की कविता मोठायाने म्हटल्य़ा तरी समजत असत की नाही हे सांगता येणार नाही. पण त्या सगळ्या कविता आवडायच्या हे मात्र खरे. आजही त्या आवडतात.आम्हाला कविता हीच गाणी होती!

कवितेच्या दिवसांत ’आई म्हणोनी कोणी’ ’राजहंस माझा निजला’किंवा ’ने मजसी ने..’ अशा कविता घरोघरी म्हणल्या जात. तसेच तेव्हाच्या म्हणजे कुंकू. गोपाळकॄष्ण,रामराज्य, रामशास्त्री आणि त्या नंतरच्या काळातीलही ८० सालापर्यंत च्या काळातील– आणि आजच्याही काळातील काही सिनेमातील– ग. दि. माडगूळकर, शांताबाइ शेळके. ना.धों. महानोर यांची सिनेमातील गाणीही खरे तर सुंदर कविताच होत्या. मघाशी वर लिहिलेल्या सिनेमातील गाणीही कवितेसारखीच म्हटली जात. ’रामराज्य’ सिनेमातली गाणी कविवर्य राजा बढे(गर्जा महाराष्ट्र माझा’-यांचेच आहे) यांची होतीअसे आठवते. त्यातील गाणी-कविता-पहा. संस्कॄत प्रचुर जोडाक्षरांनी युक्त पण किती गेय!

“सुजन हो परिसा रामकथा। जानकीजीवन विरहव्यथा। किंवा  “सुवर्णरथ दिव्य तो रविचा सप्त-अश्व गतिमान। युगे युगे गातील राघवा तुझेच मंगल नाम। त्यानंतर चाल बदलून म्हणजे आवाज चढवून- हे पोरांना आवाज चढवायचे फार आवडायचे–सीते सीते विमलचरिते कोमले चारुशीले!

पहा, बरेचसे संस्कॄत आणि जोडाक्षरेही आहेत. पण मराठी दुसरी तिसरीतील माझा धाकटा भाऊ आणि माझ्या सारखी मुले ती म्हणत असत. बरीचशी चालीला धरून! आमची आजी आणि मावश्या तर उत्तम अभिनेत्री होत्या. रामराज्यातली ही गाणी आम्ही दोघे म्हणत असताना त्या मन लावून ऐकत असल्याचा शिवाय चेहऱ्यावर कौतुकाचा भाव एकवटल्याचा उत्तम अभिनय करीत! सहनशीलतेचे दुसरे नाव अभिनय!

या नंतर कुसुमाग्रजांची “गर्जा जय जयकार क्रांतीचा” ही कविता तर घराघरातून गर्जत, दुमदुमत असे. बरं एकेकाचे आवाज म्हणजे एकदम ’अर्जंट! जंक्शन, खडार्डम स्टाप’! इंग्रजांनी ही कविता आमच्या आवाजात ऐकल्यामुळेच ते हिंदुस्थान सोडून गेले!

कवितेचा वावर आमच्या घरी बराच असे.आमची एक बहिण तर इंग्रजी कविताही मराठी कवितांच्या चालीवर म्हणत असे. तिला कविता आवडत असत. एकदा वळवाच्या पावसाची सर येऊन गेल्यावर तिने आईला हाक मारली. आई,”काय गं” म्हणत आली तर ही आईला,”पाऊस खुळा किती पाऊस खुळा’ ओळी म्हणून दाखवायला लागली. आई,’पाऊस खुळा का तू वेडी ’ अशा नजरेने पहात निघून गेली!

बालकवि तर सगळ्यांचेच होते! त्यांची आनंदी आनंद गडे आणि त्याही पेक्षा श्रावणमासी हर्ष मानसी या कवितेमुळे सगळीकडेच आनंदाची हिरवळ दाटत असे.”येई भाई येथ पाही” या कविते बरोबरच “भिंत खचली कलथून खांब गेला” ही कविता थोरला भाऊ म्हणत असे. रागात असला किंवा त्याला कुणी काही बोलले असेल तर तो “भिं-त ख-च-ली म्हणताना खचली हा शब्द रेटा देत देत रेटत म्हणत असे. मग समजायचे की काहीतरी बिनसले आहे. बहिण, लक्ष्मीबाई टिळकांची’मी तुझी मावशी तुला न्यावया आले ही सुंदर कविता म्हणायची. कवितेच्या अखेरीस मावशी आपल्याला माहेरी घेऊन जायला आली आहे. नेणार आहे हे कळल्यावर त्या बाळीला जेव्हढा आनंद व्हायचा तेव्हढाच ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्यालाही होई.

बालकवींच्या श्रावण मासी कवितेनंतर पुढे गेलो तेव्हा ’पाय टाकूनि जळात बसला..’ ही कविताही आवडू लागली. तो पाण्याचा खोल डोह, डोहाच्या काठावरचे उंबराचे मोठे झाड, पुढे सरकत सरकत पाण्यात कधी शिरल्या ते न कळणाऱ्या त्याच्या मोठ्या जाड मुळ्या आणि त्या डोहावर पडलेली औदुंबराची गडद सावली. अशा त्या जळात पाय सोडून बसलेल्या कवितेचे चित्र डोळ्यांसमोर येई. आणि का कसे ते माहित नाही पण किंचित उदास, गंभीर वाटायचे. कविता आवडायचीच पण मर्विनने म्हटल्याप्रमाणे हळू हळू समजेल केव्हातरी. म्हणजे केव्हा ते अजून कळले नाही.

रायगडाला जाग येते मध्ये सगळ्यांना आवडेल असे एक दॄश्य आहे. संभाजी आपला धाकटा भाऊ बाळराजे राजाराम याला पाठीवर घेऊन खेळवत येतो. मराठी स्वराज्याचे दोन राजपुत्र, एखाद्या चार चौघांसारख्या भावंडासारखेच खेळतात ह्यापेक्षा प्रेक्षकांना आनंद देणारे ह्रुद्य द्रुश्य कोणते असेल? असेच एक दॄश्य रामराज्य सिनेमात आहे. दोन लहान , आश्रमवासी बहिण-भाऊ चाललेली, भाऊ बहिणीला थोडे भरभर चाल असे म्हणतोय, म्हणत असतानाच,”उचल पाऊले आश्रम हरिणी जायचे गं दुरी।हरिणी जायचे । ती उंच ऊंच गोपुरे ती भव्य राजमंदिरे । पुरे! पुरे! पुरे जाहल्या आठवणी त्या, जायचे..” हे गाणेही म्हणतोय. सुंदर! काव्य साधे, सुंदर. अशी गाणीही आम्हाला कविताच होत्या.

मघाशी मी शाळेच्या पुस्तकातील इंग्रजी कविताही म्हणत असूअसे म्हणालो. त्यातील “इन्टू द व्हॅली ऑफ डेथ रोड सिक्स हंड्रेड” ही तर आम्हीही जणू घोड्यावर बसून तलवारी परजत समोर दिसेल त्या शत्रुला कापत चाललोय अशा टक डक, टक डक थाटात म्हणत असू.ह्या पेक्षा एकदम निराळीच “होम दे ब्रॉट द वॉर्यर डेड” ही कविता. वाचताना समजली असे वाटायचे. पण नुसता शब्दार्थ. वर्गात म्हणताना मध्येच सरही म्हणायला लागायचे. युद्धात पडलेल्या नवऱ्याचे शव घरात आणल्यावर बराच वेळ ती बाई रडत नसते, बोलत नसते. सुन्न होऊन भकास चेहऱ्याने कुठेतरी पहात बसलेली. हे चिन्ह बरे नाही हे एका अनुभवी पुरुषाच्या की बाइच्या लक्षात येते. मग तिच्या लहान मुलाला तिच्या जवळ आणून देते. त्याला पाहिल्यावर ती बाई क्षणात पुन्हा आई होते. आणि रडायला लागते. कविता म्हणता म्हणता समजली असे वाटायला लागले.

वरील कवितेतल्या अनुभवी माणसाच्या समयसूचकतेतूनच मला भासाच्या ’प्रतिमा नाटकातील एक प्रवेश आठवतो. तोही अशाच समयसूचकतेचे उदाहरण आहे.

राम वनवासात गेल्याच्या दु:खाने हाय खाऊन दशरथ राजा मरण पावला. भरताला बोलावून घेतले. पण राजा दशरथ गेल्याची दु:खदायक बातमी भरताला एकदम सांगायची कशी? मंत्री सुमंत, भरताला राजवाड्यात नेण्यापूर्वी एका स्थळी नेतो. तिथे असलेल्या सुर्यकुळातील इष्वाकू राजाच्या प्रतिमेपासून, राजा दिलीप वगैरे राजांच्या प्रतिमा दाखवत, प्रत्येकाची थोरवी सांगत सांगत सहजगत्या दशराथाचा पराक्रम, वचन पाळण्याची नीति सांगत दशरथाच्या प्रतिमेशी येतो तोच भरत,”काय? माझे तात? माझे वडीलही…?महाराज दशरथही गेले? असे मोठ्या दु:खाने , नंतर व्याकुळतेने, शांत होत होत आपल्या आईला भेटायला त्वरेने जातो असा प्रसंग रंगवला आहे.

आमच्या घरातील कवितेने बहरलेले आमचे दिवस संपत आले होते.एकदा माझी कर्जत दहिवलीची भाच्चे मंडळी लहानपणी सुटीत आली असतात्यांनी, बालकवींप्रमाणेच रंगीत शब्दांनी काढलेले चित्रच अशी बा.भ. बोरकरांची, ” निळ्या खाडीच्या काठाला..” ही कविता म्हणून दाखवली; तेव्हा मोठा आनंद झाला.मला एकदम माझे वडील मोठ्याने वाचून दाखवत असलेली ’डोंगराच्या आड माझ्या जन्मदेचे गाव आहे। तेथ या वेड्या मनाची ही कधीची धाव आहे’ ही प्रा.वर्‍हाड्पांडे यांची कविता आठवली.त्यामुळे आमचे कवितेचे दिवस अजून चालूच आहेत की काय असा भास झाला.

पुढे थोद्याच काळात आम्हा भावंडांच्या मुलांचे कवितेचे सुगीचे दिवस आले. घरात’गवत फुला रे गवत फुला’, उठ मुला, उठ मुला बघ हा..’ ’टप टप पडती अंगावरती..’ ’उठा उठा चिऊताई’, सदैव सैनिका पुढेच जायचे’ आणि ’निळ्या खाडीच्या काठाला’ अशा कविता ऐकू येऊ लागल्या. तेव्हा पुनर्प्रत्ययाचा, कवितांचा पुन्हा आनंदी आनंद दरवळला! मुलांनाही कविता गाणीच होती.

काळ पुढे सरकतच असतो. आता मुलांच्या घरातही त्यांची मुलं, मुली ’वारा वदे कानामध्ये गीत गाईन तुला’ चंद्र हा सुंदर चांदण्या सुंदर’ अशा कविता म्हणु लागले. दोन्ही नातवांनी ’उठ मुला उठ मुला..’ पासून “फुलपाथरु” ’चांदोबा चांदोबा इथपर्यंत कविता म्हणत, मध्ये थोडे भाष्य करत “कवितेचा दिवस” गाजवला. ’चंद्र हा सुंदर, सुंदर चांदण्या’ होऊन, कवितेच्या पाखरांची शाळा रेड्वूडच्या झाडांवर भरू लागली. आमच्याप्रमाणेच मुलांनाही त्यांची मुले कवितेच्या सुवर्णकाळाची आठवण करून देऊ लागली.

कविवर्य मर्विन यांच्यामुळे आमचा कवितेच्या सुगीचा काळ आठवला. कवितेचे कवडसे पकडण्याच्या खेळात रमलो; आणि ’कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा?’ असे मनाशी गुणगुणत बसलो!