Monthly Archives: December 2019

एका लग्नाची अदभुत इव्हेन्ट!

शीव/ चुनाभट्टी

नरसी मेहता नेहमी आपल्याच नादात असायचा भजन कीर्तन लेखन ह्यात तो हरवलेला असे. ध्यानातच कष्णाचे गुण आवडीने गात असे. हिसाबकिताबात त्याचे मन लागत नसे. नरसी मेहत्याच्या घरी कोण मुलगी देणार! पण मुलगा लग्नावाचून राहात नाही आणि मुलीचे लग्न झाल्याशिवाय राहात नाही ह्या सत्याप्रमाणे नरसी मेहत्याच्या मुलाचे स्थळही कुणाच्या तरी नजरेस आले.

हा असा तसा कुणी सोमाजी गोमाजी कापसे नव्हता. जुनागडजवळच श्यामापुर नावाच्या गावात त्रिपुरांतक -देवाचेच विशेषण शोभावे – अशा भारदस्त नावाचा धनाढ्य सावकार होता. त्याची मुलगीही लग्नायोग्य झाली. मुलीचा बाप कितीही मोठा, सावकार असला तरी अखेर मुलीचाच बाप. त्यानेही आपल्या पुरोहिताला म्हणजे कुळाच्या उपाध्यायाला स्थळ शोधायला सांगितले.

कृष्णंभट आपल्या यजमनाच्या मुलीसाठी स्थळं पाहू लागले. ते जुनागडला आले असता गावात चौकशी करू लागले. एक दोघांनी बिचकत अडखळत नरसी मेहत्याचा मुलगा लग्नाचा असल्याचे सांगितले. पण नरसी मेहत्याच्या घरची दामाजीचीही अवस्था सांगितली.

कृष्णंभट स्वत:शी म्हणाला,”मी नरसी मेहत्याला कसा काय विसरलो?“ तो नरसी मेहत्याच्या घरी आला. नरसी त्याच्या जीवीचा विश्राम अशा कृष्णाचे गुणगान करत होता.”तूच माझा विसावा। तूच माझा सखा। कष्णा, तूच मजला एक एकला। तुझ्यासारिखा अन्य कोण मज।। असे भजन करीत होता.

नरसीला घरी येणारा प्रत्येकजण साधु सज्जन वाटायचा. कष्णंभटाला गूळपाणी झाले. सुपारीही कातरून दिली. कृष्णंभटही काही काळ नरसी भगतच्या सहवासात स्वत:ला व सभोवताल विसरून गेला होता. सावध झाल्यासरसा त्याने नरसी भगतचा मुलगा सावकाराच्या मुलीसाठी निश्चित केला.खरा वैष्णव पाहिल्यावर नरसी मेहत्याच्या घरी धनसंपदा किती, शेती आहे का नाही हा विचार न आणता नरसी खरा वैष्णव आहे हीच त्याची थोरवी आहे, हे जाणून तुमचा मुलगा पसंत आहे हे नरसी मेहत्याला सांगितले. पण ही मुलगी कुणाची हे त्याने विचारल्यावर कृष्णंभटाने उत्तरा दाखल, “मुलगी त्रिपुरांतक सावकाराची आहे” सांगितल्यावर,दीनआणि राव, राजा आणि भिकारी,शत्रु आणि मित्र समान मानणाऱा नरसी भगत हरखून गेला नाही की चिंतेतही पडला नाही. त्याने हसतमुखाने कृष्णंभटाला निरोपाचा विडा दिला.

कृष्णंभट समाधानाने श्यामापुराला आला. आपण मुलगा निश्चित केल्याचे वर्तमान त्याने त्रिपुरांतक सावकराला सांगितले. सावकाराला आनंद झाला. सोयरे कोण चौकशी केली. नरसी मेहत्याचा मुलगा हे ऐकल्यावर मात्र सावकराचा चेहरा खर्रकन उतरला. आपल्या तोलामोलाचे घर, नातेवाईक नाहीत समजल्यावर आतून संतापला पण आता काही करणे अशक्य आहे हे तो जाणून होता. कारण त्या काळी पुरोहिताने निश्चित केलेले लग्न मोडता येत नसे.

पण सावकार धूर्त होता. त्याने कृष्णंभटाला सांगितले,” उपाध्याय ! लगोलग जा आणि व्याह्यांना सांगा मुहुर्त उद्याचा दिवस सोडून परवाचा आहे. वऱ्हाड हत्ती घोडे छत्र चामरे उंची वस्त्रे, वाजंत्र्यांसह या म्हणावे.” हे ऐकून नरसी मेहता लग्न मोडेल अशी त्याची धारणा होती

कृष्णंभट लगेच निघाला. त्याने नरसी मेहताला, लग्न परवाच करायचे ठरले आहे तर सर्व तयारीनिशी, शोभेशा इतमामाने या.” येव्हढाच मोघम निरोप दिला. हे ऐकून नरसी भगतच्या घरांत गोंधळ सुरु झाला. एका दिवसात कुठे लग्नाची तयारी होते का? वऱ्हाडाची मंडळी तरी कशी जमणार? वगैरे कलकलाट सुरु झाला. पण नरसी मेहता मात्र शांतपणे “हरिके गुन गाऊ मैं” म्हणत “हे नाथ वासुदेव हरे मुरारे; गोविंद नारायण मधु कैटभहारे ” म्हणत आपल्या भजनात पुन्हा गुंग झाला.नंतर कृष्णंभटाला जेवायला घालून सावकराला होकार कळवायला सांगितले.

कृष्णंभटाने धोरणीपणाने नरसीच्या प्रेमापोटी आपल्या मालकाच्या अटी मात्र नरसीला सांगितल्या नव्हत्या. काय होत्या त्या अटी?

“लग्न लगेच परवाच करायचे. वऱ्हाडाने हत्ती घोडे मेणे छत्र चामरे, वाजंत्र्या चौघड्यासहित थाटामाटात यावे. आमचीही प्रतिष्ठा राखली पाहिजे की नाही?“ कृष्णंभटाने यजमानाला नरसी मेहत्याचा होकार कळवला. सावकार खट्टू झाला. पण करणार काय!

नरसी मेहत्याला परिस्थितीचे आचके लागत नव्हते. पण तिकडे द्वारकेत कृष्णाला मात्र उचकी लागली. त्याच्या लक्षात आले. त्याने रुक्मिणी सत्यभामेला बोलावून नरसीच्या मुलाच्या लग्नाच्या तयारी करण्यास सांगितले. तसेच त्याने आपल्या नामांकित भक्तांना पाचारण करण्यास सुरुवात केली. उद्धव अक्रूर तुंबर। शुक वाल्मिकी प्रल्हाद थोर।भीष्म बिभीषण आणि विदुर ।मारुति सत्वर पाचारिला।। इतकेच काय आपला मित्र सुदामा आणि लहानपणीचा सवंगडी पेंद्यालाही बोलावले. स्वत: पुन्हा आत जाऊन सत्यभामा रुक्मिणीला वऱ्डाड मंडळी जमली आहेत. नरसी मेहता श्यामापुराच्या सीमेत पोचण्यापूर्वीच आपण सर्वांनी पोचले पाहिजे असे बजावले.

नरसी मेहत्याच्या मुलाचे वऱ्हाड द्वारकेतून, स्वर्गलोकींच्या पाहुण्यासह निघाले. त्वरित श्यामापुराच्या सीमेपाशी आले. सर्वांनी अर्थातच आपली रूपे बदलली होती. पण तेज आणि सौदर्याची, ज्ञानाची आणि सौहार्दाची झळाळी कशी लपवता येणार.

विश्वकर्म्याने मंडप बांधण्यास घेतला. त्याची सजावटही वैभवशाली केली. ऋतुपर्ण राजाने सुगंधी वनस्पती, हिरवी पाने व सुगंधी फुलांची आरास झटक्यात केली. सजवलेले हत्ती घोडे मेणे पालख्यांची गणना नव्हती! सर्व वऱ्हाड्यांची वस्त्रे अलंकार भूषणे डोळे दिपवणारी होती. सीमंत पूजनाचा हा थाट पाहून गावकरी सावकाराला हे अदभुत सांगू लागले. इकडे नरसी मेहता आपल्या वैष्णव भक्तांसह हरिगुण संकीर्तन करत आला.नरसी मेहत्याची बायको मेण्यातून आली.ती दागिन्यांनी मढली होती.

त्रिपुरांतक सावकार आपला थाट दाखवत येऊ लागला. आपले दोन वाजंत्र्याचे जोड, आपल्यापरीने उंची वस्त्रे ल्यालेली दागदागिने घातलेली मुलीकडच्या मंडळीसह तो आला. पण नरसीचे वैभव पाहून लाजल्याहून लाजल्यासारखे झाला. स्वत: कृष्णाने सर्वांचे स्वागत केले. त्याची सारखी धावपळ चालू होती. समारंभ आटोपल्यावर रंभा उर्वशी तिलोत्तमा ह्यांचे नृत्य गायन झाले.

दुसरा दिवस तर प्रत्यक्ष लग्नाचा! कवि वाल्मिकीने केलेली मंगलाष्टके यक्ष गंधर्व गाऊ लागले. त्यांना संगीताची साथ स्वत: नारद आणि तुंबर करत होते. लग्नातील स्वैपाकासाठी स्वत: अन्नपूर्णा हजर होती.द्रव्याच्या, वस्त्रांच्या आहेरावर देखरेख कुबेर करत होता. तर सवाष्णींना खणा नारळाच्या ओट्या रुक्मिणी जांबवती सत्यभामा, मित्रविंदा,याज्ञजिती, लक्ष्मणा,भद्रावती ह्या कृष्णाच्या अंत:पुरांतील स्त्रिया भरत होत्या! आणि ह्या सगळ्यांत सुसुत्रता, कुणाला काय हवे नको ते स्वत: ‘नारायण’ करत होता. अखेर झाल धरण्याच्या वेळी त्रिपुरांतक सावकाराने त्याची ओळख विचारली तेव्हा “ मी नरसी मेहत्याच्या पेढीचा, द्वारकेचा गुमास्ता, सावळाराम .” असे तो जगज्जेठी म्हणाला.

नरसीच्या मुलाचा लग्नसोहळा पाहायलाच नव्हे तर वऱ्हाडी म्हणून आलेली स्वर्गलोकीची सर्व मंडळी जुनागडला आली. आणि नरसीच्या गुमास्त्याचा निरोप घेऊन अंतर्धान पावली. कृष्ण परत निघताना नरसीला येव्हढेच म्हणाला,” नरसी काहीही अडचण आली तर माझी आठवण कर. मी तुला विसरत नाहीस. आणि तुही मला! “
नरसी ह्यावर काय बोलणार? हे अदभुत अघटित पाहून डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू वाहात असता तो इतकेच म्हणाला असेल,” हेचि दान देगा देवा। तुझा विसर न व्हावा।।

सदाशिव पं. कामतकर

भगवंताने भक्तासाठी किती करावे!

शीव/चुनाभट्टी

हरिकृष्णाने आपल्या सगळ्याच भक्तांना मदत केली. नरसी मेहतासाठी मात्र तो वेळोवेळी धावून गेला आहे. ठळक आख्यायिका आणि कथांवरून तो दोन तीनदा तरी धावून गेला असे दिसते. खरे तर भक्ताला तो सतत आपल्य पाठीशी आहे ह्याची खात्री असते .पण लोकांना मात्र त्याचा परिणाम दिसल्यावाचून खात्री पटत नाही. श्रीहरीने नरसी मेहत्याची पत राखली. प्रतिष्ठाही वाढवली.


नरसी मेहत्याचा जन्म जुनागडला नागर ब्राम्हणाच्या पोटी झाला. नरसी मेहताची रीतीप्रमाणे मुंज झाली. पण त्याच्या नशिबी आई वडीलांचे सुख नव्हते. मुंज झाल्यानंतर त्याच्या चुलत भावाने त्याचा सांभाळ केला.


बालसुलभ स्वभावाप्रमाणे नरसीचे लक्ष गल्लीतल्या मुलांबरोबर खेळण्या हुंदण्यात जास्त होते. तो आणि त्याचे सवंगडी कोणते खेळ खेळत ते आपण संतकवि महिपतीबुवांच्या ओव्यांतूनच ऐकू या. आज यातले अनेक खेळ लुप्त झाले आहेत. लगोरी लपंडाव विटीदांडू आपण आता आतपर्यंत खेळत होतो. भोवराही फिरवत असू. पण महिपतीबुवांनी वर्णिलेले खेळ १८व्या शतकातील आहेत. किती विविध तऱ्हेचे आहेत!

“गावची मुले खेळती सकळ।। इटीदांडू लगोरिया। चुंबाचुंबी (!) लपंडाया। हमामा हुंबरी घालोनिया।पाणबुडियां खेळती।।वाघोडी आणि आट्यापाट्या।झिज्या बोकट अगलगाट्या। भोवरे चक्रे फेरवाट्या ।देती काट्या सत्वर।।”

असे रोज निरनिराळे खेळ खेळून हुंदडून पाण्यात पोहून डुंबून तो एकदा खूप दमला.तहान लागली.घरी आला. वहिनीला पाणी मागितले. तिने पाणी दिले पण,” नुसते दिवसभर गावात गप्पा मारत टवाळ्या करायच्या. खेळायचे हुंदडायचे आणि घरी येऊन फुकटचे हादडायचे! काम नको, कमवायला नको. भावाच्या जीवावर बसून आयते खायचे!” हे सुद्धा ऐकवले.किती बोलावे तिने! काय काय ऐकवले तिने नरसीला!

नरसी मेहता आवंढ्यांबरोबर पाणी प्याला खरे पण तो रडवेला होऊन तिरिमरीत घरातून निघाला तो थेट गावाबाहेर दूर चारपार मैलावर असलेल्या अरण्यात गेला. एक जुनाट महादेवाचे देऊळ दिदसले. पिंडीला मिठी मारून तो ढसढसा रडू लागला. आणि पिंडीवरच डोके टेकून झोपी गेला. अन्नपाण्यावाचून तो सात दिवस तसाच पडून राहिला.

शंकराला दया आली. त्यांनी नरसीच्या खांद्याला धरून हलवले. उठवले. “बाळ काय पाहिजे तुला? हवे ते माग!“ नरसी खराच लहान म्हणायचा. तो म्हणाला, शंभोमहादेवा, मी लहान आहे. काय मागायचे ते मला समजत नाही.” “ अरे पण तुला काही तरी हवे असे वाटत असेल की!” शंकर असे म्हणाल्यावर नरसी म्हणाला,” शंकरदेवा मी काय मागायचे ते मला खरच समजत नाही. नाही तर असे कर ना? तुला प्राणाहूनही प्रिय असेल ते मला दे !” नरसीचे हे मागणे ऐकल्यावर शंकराला त्याच्या चतुराईचे कौतुक वाटले. भोलेनाथ आनंदाने म्हणाले,” मला कृष्ण फार प्रिय आहे. तोच तुला मी देतो. चल.” इतके बोलून शंकराने नरसीला गोपीचा वेष दिला. चांगले नटवले. त्याचा हात धरला व क्षणार्धात त्याला घेऊन गोकुळातल्या कालिंदी काठी आले.


तिथल्या सुंदर उपवनात श्रीकृष्ण गोपींबरोबर रास लीला करत होते. (त्या रासक्रीडेचे बरेच स्पष्ट वर्णन महिपतीबुवांनी केले आहे.) प्रत्येक गोपीच्या मनात कृष्ण आपला व्हावा ही इच्छा झाली की कृष्ण तिला आलिंगन देऊन तिथे रमायचा. गोपी मथुरेहून आल्या. वृंदावनातून आल्या. गोकुळच्याही होत्या नव्हत्या सर्व येऊ लागल्या. तस तसे श्रीकृष्णही तितकेच होऊ लागले. प्रत्येकीचा श्रीकृष्ण रासक्रीडा करू लागला.रासक्रीडा रंगात आली होती. शंकराने हळूच गोपी-नरसीलाही त्यांच्यामध्ये सोडले.

स्वत: कृष्ण ह्या नव्या गोपीजवळ आले. निरखत पाहात म्हणाले,” तू गोपी काही इथली दिसत नाहीस.तू तर मला नरसी दिसतोस जुनागडचा. भगवान शंकर कुठे आहेत ?” असे म्हणतच कृष्ण नरसीगोपीला घेऊन शंकराजवळ आले. शंकर म्हणाले ,”कृष्णा हा माझा भक्त नरसी आता तुझा झाला.” हे ऐकताच नरसीने कृष्णाच्या पायावर डोके ठेवले. कृष्णाने त्याला वर उठवले.त्याला मिठी मारून त्याला आपला केले. ते नरसीला म्हणाले, नरसी आता तू निश्चिंतपणे जा. मी आता तुला माझा म्हटले आहे. आता तू माझा आणि मी तुझा.” आणि हो,नरसी, इथले रासमंडळ, रासलीला तू स्वत: पाहिली आहेस. हे सर्व तू कवितेत लिहून काढ.” गुजराती ऱ्भाषेत नरसी मेहत्यांनी कुंजवनात पाहिलेला रासमंडळ कवितेत लिहून काढले.त्याचे “रासमंडळ” काव्यग्रंथ आजही गुजराथमध्ये आवडीने वाचला जातो.

नरसी मेहताला शंकराने पुन्हा जुनागड जवळच्या जंगलातील जुन्या शंकराच्या देवळात आणून सोडले व ते गुप्त झाले.

शंकराचा हा वैष्णव भक्त तिथे हरिनाम घेत हरीचे कीर्तन करू लागला. सगळीकडे इथे एक वैष्णव हरीकृष्णाचे फार मधुर कीर्तन करतो ही बातमी पसरली. नरसी मेहत्याचा भाऊही तिथे आला. त्याने आपल्या नरसीला लगेच ओळखले. मोठ्या प्रेमाकौतुकाने घरी नेले.


नरसी मेहता,महान नरसी भगत म्हणून ओळखला जाऊ लागला. घरचा व्यवसाय अंगावर पडला तरी त्याने तो आपल्याला चिकटू दिला नाही. यथावकाश नरसी मेहत्याचे गावातल्याच एका वैष्णवाच्या मुलीशी लग्न झाले. संसार रोजच सुखाचा होऊ लागला. नरसी मेहत्याला एक मुलगा आणि मुलगीही झाली. संसार फळाला आला.


दिवस वर्षे भराभर जात होती.नरसी मेत्याचा मुलगाही लग्नाचा झाला. नरसी मेहत्याच्या मुलाच्या लग्नाचा सोहळा पाहावा ऐकावा तितका अदभुत आहे. तोही आपण पाहू या.

सदाशिव पं. कामतकर

नरसी मेहत्याची हुंडी

शीव/चुनाभट्टी

श्यामापुरात नरसी मेहत्याच्या मुलाचे लग्न थाटामटात पार पडले.नव्या लक्ष्मीसूनबाईला घेऊन सर्वजण आपल्या जुनागडच्या घरी आले.आपला भक्त नरसी मेहत्याचे लोकांत कमीअधिक दिसू नये ह्यासाठी भगवान त्याचा व्यवहारिक योगक्षेमही चालवत होते.

एकदा द्वारकेला जाणाऱ्या यात्रेकरूंचा जथा जुनागडात रात्री मुक्कामासाठी उतरला. धर्मशाळेत,देवळांमध्ये आपापली व्यवस्था लावून यात्रेकरू झोपले.सकाळी
सर्वजण उठले. कामाला लागले. एका यात्रेकरूजवळ मोठी रक्कम होती. प्रवासात रोकड नेणे सुरक्षित नाही म्हणून तो गावात सावकाराची पेढी शोधू लागला.काही लोकांनी नरसी मेहत्याचे नाव बद्दू करण्यासाठी यात्रेकरूला नरसी भगतचे नाव सुचवले. नरसी मेहत्याचे ते गुणवर्णनही करू लागले. ते यात्रेकरूला सांगू लागले ”अहो नरसी मेहता सावकार हा प्रेमळ भक्त आहे. सधन,नामवंत आहे.त्याचे वैभव विचारू नका.त्याच्याकडे जा; तुमचे काम झालेच समजा!” नरसी मेहत्याविषयी इतके चांगले ऐकल्यावर त्याने नरसीची पेढी घर कुठे आहे ते विचारले. त्यावर सगळे एकमुखाने सांगू लागले,
“पताका आणि वृंदावन। गरूडटके हरिकीर्तन। नरसी मेहत्याचे सदन। तेचि तू जाण।।”

यात्रेकरू नरसी मेहत्याच्या घराजवळ जसा आला तसे त्याला हरिनाम संकीर्तनाचे गोड सूर कनावर आले.यात्रेकरू खुणेबरहुकुम नेमका नरसी मेहत्याच्या घरी आला. सांगितलेले वैभव काही दिसेना पण वातावरण कुणाचेही मन प्रसन्न करणारे होते. वृंदावन मोठे होते. वैजय्ंतीही बहरली होती. समोरच विष्णुभक्त नरसी हरिकृष्णाला “तूच आमचा आनंदघन दयाळा, भक्त भूषण पांडुरंगा, सकळ देवांत तूच वरिष्ठ, भक्त वत्सला पांडुरंगा! हरेकृष्णा मायबापा! म्हणत त्याने दंडवत घातले. उठून पाहतो तर समोर यात्रेकरू उभा! यात्रेकरूने नमस्कार करण्या आतच नरसीने त्याला लवून नमस्कार केला. “ काय काम काढले माझ्यासाठी?” असे नरसीने विचारल्यावर लोकांनी नरसी मेहता किती मोठा सावकार आहे;त्याचे वैभव अमाप आहे; तुम्ही त्याच्याकडेच जा काम होईल असे सांगितल्यावरून मी तुमच्याकडे आलो आहे असे यात्रेकरू म्हणाला. लोकांनी आपली फजिती करण्यासाठीच ह्याला आपल्याकडे पाठवून दिले हे नरसी मेहत्याच्या लक्षात आले. मुलाला गूळ पाणी आणायला सांगितले. ते यात्रेकरूला दिले. मग यात्रेकरूने सातशे रुपये घेऊन त्याची हुंडी करून द्यायला सांगितले. आली का पंचाईत! पण द्वारकाधीशावर भरोसा ठेवून त्याने यात्रेकरूला सातशे रुपये वृंदावनाजवळ ठेवायला सांगितले. हुंडी लिहून दिली.

यात्रेकरूने नरसीचे”वैभव” पाहिले होते. मोठा सावकार पण त्याच्या ओसरीवर गाद्या लोड तक्के नव्हते हेही लक्षात आले. इतक्यात नरसीने यात्रेकरूला इतर यात्रेकरूंनाही घेऊन यायला सांगितले. मुलाला बोलावून गावातल्या लोकांना आणायला सांगितले.
गावकरी आले. इतर सर्व यात्रेकरूही आले.मुला जवळ सातशे रुपये देऊन यात्रेकरूंसाठी धोतर,लुगडी,पांघरुणे आणायला पिटाळले.तर सर्वांसाठी प्रसादही करायला सांगितला. त्या यात्रेकरू समोरच नरसी मेहत्याने सातशे रुपये खर्च करून संपवलेही होते.

यात्रेकरूने नरसीच्या हुंडीकडे पाहात विचारले.” सावकार , “तुमचा द्वारकेचा गुमास्ता आहे त्याचे नाव काय?” नरसी म्हणाला,” त्याचे नाव सावळसा सावता! गुमास्ता असला तरी त्याच्या पेढ्या पुष्कळ आहेत. मुख्य पेढी द्वारकेला. इतर दुकाने गोकुळ वृंदावन मथुरा इथेही आहेत. त्याची आणखी एक मोठी पेढी पंढरपुरला आहे. आणि नंतर हळूच म्हणाला मूळ पेढी क्षीरसागर येथे आहे!”
यात्रेकरू निघाला. पण विचार नरसीने दिलेल्या हुंडीचाच करत होता. “ हा नरसी मेहता तर सावकार वाटत नाही. नाही दिसण्या वागण्यात ना व्यवहारातही. कुणी चिटपाखरू आले नाही तिथे दिवसभरात! आणि मूळ पेढी क्षीरसागरला काय आणि गोकुळ मथुरेलाही गुमास्त्याच्या पेढ्या आहेत म्हणतो. कमाल म्हणजे पंढरपुरलाही मोठी पेढी आहे म्हणे. इकडचा कोण यात्रेकरू दूरच्या पंढरपूरला जातो! हुंडी तरी खरी आहेका? माझे पैसे बुडालेच म्हणायचे. बरे परतताना सातशे रुपये परत घ्यावे म्हटले तर ह्याने ते आपल्या समोरच खर्चून टाकले. समुद्रात एकदा विरघळलेले मीठ परत येते का? एकदा नदी समुद्राला मिळाली की ती समुद्राचीच झाली! तसे माझे पैसेही गेले ते गेलेच!बुडाले!”

यात्रेकरू द्वारकेत आला. द्वारकाधीशाचे डोळे भरून दर्शन घेतले. दर्शन झाल्यावर तिथल्या दोन पुजाऱ्यांना त्याने “इथे सावळसा सावता नावाचा गुमास्ता कुठे असतो?” विचारल्यावर असा कुणी गुमास्ता इथे नाही असे पुजाऱ्यांनी सांगितले. मग गावात एक दोन व्यापाऱ्यांना विचारले की सावळसा सावता गुमास्त्याची पेढी कुठे आहे? तर ते हसू लागले. “अरे कोण कुठला सावता? इथे असा कुणीही गुमास्ता नाही!” हे ऐकल्यावर तो रडायचाच बाकी राहिला होता. व्यापाऱ्यांनी,”अशी हुंडी कुणी दिली?” विचारल्यावर त्याने नरसी मेहत्याने दिली सांगितल्यावर तर ते खो खो हसू लागले! “तुला दुसरा कुणी भेटलाच नाही का तिकडे? पैसे बुडाले तुझे.” हे पूर्ण ऐकायलाही तो यात्रेकरू थांबला नाही. तो एका जुनाट वाड्याच्या ओट्यावर डोक्याला हात लावून बसला. त्याला खाणे सुचेना, पिणे रुचेना. हुंडीकडे वेड्यासारखा पाहात होता.

इतक्यात एक दिमाखदार चार घोड्यांचा रथ येताना दिसला. वाड्यावरून पुढे गेला. पण लगेच मागे फिरला. यात्रेकरूजवळ येऊन थांबला. त्या चकाकणाऱ्या रथाकडे व शुभ्र घोड्यांकडे तो पाहू लागला. रथातून एक मोठी सावकारी पगडी घातलेला, रेशमी धोतर व रेशमी लांब कोट त्यावर सोन्याच्या दोन साखळ्या व छातीवर कौस्तुभमण्याचा कंठा घातलेला, कानात पाणीदार मोत्यांची भिकबाळी, हातात चांदीची मुठ असलेली चंदनाची काठी घेतलेला,खरा श्रीमंत दिसणारा सावकार उतरला. त्याने यात्रेकरूला इथे ओसाड जागी का बसलास? येव्हढा खिन्न का? असे विचारल्यावर नरसी मेहत्याने सावळसा सावता गुमास्त्याच्या नावे दिलेल्या हुंडीची हकाकत सांगितली. आणि “नरसी मेहत्याने सावळसा सावत्याच्या नावावर मला फसवले. तो सावळसा सावता शोधून सापडत नाही ही सर्व हकीकत एका दमात सांगितली”. त्यावर त्या सावकाराने हसत हसत ,” अरे मीच तो सावळसा सावता. माझ्या नरसी मेहत्याचा गुमास्ता!”

हे ऐकल्यावर सातशे रुपयात अडकलेल्या त्याच्या जीवात जीव आला. हुंडी त्याने सावता गुमास्त्याला दिली.सारथ्याला रथातून थैली आणायला सांगितली . प्रथम गुमास्त्याने नरसी मेहताने दिलेली हुंडी डोळे मिटून कपाळाला लावली. मग थैलीतून सातशे कलदार नाणी काढून यात्रेकरूला दिली.
नाणी पाहून यात्रेकरुला आनंद झाला. आश्चर्य वाटत होते ते त्याने मोकळेपणाने उघड केले. यात्रेकरूने विचारले, “तुम्ही नरसीचे गुमास्ते आहात पण तुम्हीच घरंदाज गर्भश्रीमंत सावकार दिसता. आणि नरसी बघा! हे कसे?” त्यावर सावकार प्रसन्न हसत म्हणाला, का ह्यात काय विशेष ?

अहो कृष्ण कसा आणि त्याचा शाळासोबती सुदामा कुठे! गोकुळात कालिंदी काठी खेळणाऱ्या बाळकृष्णाची सर कुणाला येईल का? आणि त्याचा खेळगडी बोबडा लंगडा पेंद्या कुठे? पण गवताच्या काडीसारखा सुदामा आणि बोबडा पेंद्या कृष्णाचे जिवलग सखे नव्हते का? मग मी असा आणि नरसी भगत कसा म्हणण्यात काय अर्थ?” असे म्हणून परतताना तुझी भेट झाली तर नरसी मेहताला माझा नमस्कार सांग म्हणत गुमास्ता सावळसा सावता वैभवशाली रथात बसून केव्हा गेला ते मागे उडालेल्या धुळीच्या लोटात कुणालाही दिसले नाही.
यात्रेकरू कलदार नाणी मोजत होता. मोजून मोजून हात दुखू लागले. बसून बसून पायाला मुंग्या आल्या पण मोजायची नाणी संपतच नव्हती!

सदाशिव पं. कामतकर