Monthly Archives: June 2014

वाटेवरचे दिवे

आदित्य आणि यश  मला  कधी  कधी  पुस्तक-खुणा  देत  असत.  त्यानंतर सोनियाही देऊ लागली. तिच्या अशा पट्टया विविध तऱ्हेनी सजवलेल्या असत. रंग, मखमल, चमकी वापरून सोनिया त्या करीत असे. दुकानातही, पुस्तकांबरोबर अशा पुस्तक खुणेच्या पट्टया देतात. बहुधा त्यावर  पुस्तके, वाचन वाचनाची महत्ता पटविणारी   थोरा  -मोठ्यांची वचने  असतात .  विनोदातून गर्भित, सूचक इशारा देणारीही काही असत. कथा-कादंबऱ्या -चरित्रांवरून अनेक चित्रपट निघतात . त्या संदर्भातील पुस्तक-खुणेची ही  पट्टी मिस्कीलपणे मला बजावत होती,”Don’t judge a book by its movie .”

परमेश्वराच्या निर्मिती सामर्थ्याचे वर्णन करणारे , शब्दाचा गौरव करणारे बायबलमधील ” In the beginning was the Word, and the word was with with God , and the Word was God .”  हे बायबलमधील वचन आपल्याला माहित आहे. एक पुस्तक-खुणेची पट्टी, त्याच श्रेणीत शोभणारा शब्द सांगत होती – READ.  सृष्टी निर्मितीतील पहिला शब्द ‘आवाज’च होता. तो पहिला हुंकार पहिल्या माणसाने ऐकल्यावर, तो त्याचाही असेल, तो उच्चारल्यावर, तो भयचकित आश्चर्यचकित आणि तितकाच आनंदितही झाला असेल! त्या पुस्तक-खुणेच्या पट्टीवरील ठळक अक्षरातील READ  वाचल्यावरही वाचकाला तसेच वाटले असणार.  READ-वाच-  ह्या एका शब्दापासून स्फूर्ती घेऊन माणसाने केव्हढी प्रचंड प्रगती केली आहे!

READ  हा आदेशात्मक शब्द वाचल्यावर मला मुहम्मद पैगंबराच्या आयुष्यातली त्या प्रसंगाची आठवण झाली . मुहंम्मद पैगंबर एकदा स्वस्थ, स्वस्थचित्त बसला असता त्याच्या मनावकाशातून  त्याला धीर गंभीर आवाजात “म्हण” अशी आज्ञा झाली . हा काय प्रकार आहे हे त्याला प्रथम समजेना . तो पहिल्यांदा भ्याला; नंतर चकित झाला . “हं , म्हण”, “कर सुरवात” असे पुन्हा त्याला ऐकू आले. प्रथम तो अडखळत , चाचरत म्हणू लागला . मग हळू हळू, त्याच्या न कळत तो नीट  म्हणत  गेला .  तो जे म्हणत होता तेच आजचे कुराण  होय !     पुस्तक-खुणेच्या पट्टीवरील READ  हा शब्दही आपल्याला त्याच तोलामोलाची अपौरुषेय आज्ञा आहे !

ह्या पट्ट्यांवरून मला शाळा-कॉलेजात असताना  (कधीतरी)  अभ्यास करताना आपणही पुस्तकात खुणा करत होतो याची आठवण झाली. अनुक्रमणिकेत काही धड्यांवर, काही पानांवर काही ना  काही खुणा करत असे. काही ओळी कंसात तर काही चौकोनी कंसांच्या कोंदणात बसवत असे. तर कधी एखाद्या परीचछेदाशेजारी उभी रेघ काढून बाजूला IMP  लिहून ठेवित असे. कधी एक दोन ओळीखाली रेघा मारायच्या. परीक्षेच्या अखेरच्या क्षणी तयारीच्या वेळी ह्या खुणा उपयोगी पडत.  ह्या खुणा अभ्यासाच्या वाटेवरील दिवेच होते .

पुस्तक-खुणेच्या ह्या पट्टया (bookmarks) , पुस्तकात केलेल्या ह्या उणाखुणांवरून ती. अण्णांच्या अनेक पुस्तकांतील, विशेषत: दोन ग्रंथराज, ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत ह्यांची आठवण झाली . हजारो ओव्यांचे  हे ग्रंथ म्हणजे मराठीचे ऐश्वर्य आहे . ही  दोन्ही पुस्तके वाचताना , अण्णांनी खुणा केलेल्या , ओव्यांखाली  ओढलेल्या कडक-सरळ, सुंदर रेघा, समासात त्यांनी दिलेले संदर्भ, शब्दार्थ हे सर्व माझ्यासाठी वाचन किती सहज सोपे करीत होत्या ! अडखळणे नाही की वाट चुकणे नाही ! एखादे प्रसंगी अण्णा  ज्ञानेश्वरीतील त्यांना आवडलेल्या ‘मन हे मीच करी’ किंवा ‘ह्या हृदयीचे त्या हृदयी  घातले ‘ ह्या ओव्यांविषयी सांगत. किंवा ‘ God is Imagination ‘  ह्या विवेकानंदांच्या  वचनाचा  गूढार्थ स्पष्ट करण्याच्या ओघात ते एकनाथांच्या भागवतावरील भावार्थ टीकेतील  ‘ मन हेच सुखदु:खाचे कारण ।’ ‘मनकल्पित संसार जाण । मन कल्पिले जन्म मरण ।’ अशा काही ओव्या सांगून त्याचे विवरण करीत. एखादे वेळी अनन्यता. मनाची एकाग्रता किती पराकोटीची असावी ह्या संबंधातील एकनाथ महाराजांनी दिलेला दृष्टान्त  ‘परदेशी गेला बहुतकाळ  भर्ता । त्याचे पत्र सादर ऐके कांता । तैशिया अति एकाग्रता । भिक्षुगीता ऐकावी ।।’ ही  भिक्षुगीतेचे महत्व पटविणारी ओवीही ऐकवीत .

त्यावेळी आम्हाला अण्णा  असे जे काही सांगत ते डोक्यावरून जात असे . त्यांचे सांगणे उत्तम असे पण आमच्या डोक्यात काही ते शिरत नसे. मनापासून फारसे लक्षही नसे. कारण हा विषय समजण्याचे  त्यात रस असण्याचे, घेण्याचे आमचे वयच नव्हते .

मन लावून, रस घेऊन ऐकले नसले तरी अण्णा सांगत त्यातील काही शब्दकण कर्णरन्ध्रातल्या कर्मतंतूनी अडवून ठेवले असावेत . मेंदूतील आठवणींच्या कप्प्यात ते कुठेतरी पहुडले असले पाहिजेत .आज ज्ञानेश्वरी  किंवा एकादश स्कंधातील ओव्या वाचताक्षणी अण्णा  जे सांगत ते त्यांचे सुंदर भाष्य होते ; त्यांचे ते सांगणे म्हणजे त्यांचे ते एक एक  निरूपणच होते; व्याख्याने होती ह्याची तीव्रतेने जाणीव होते . मी ग्रंथ बंद करतो. डोळे  मिटून घेतो . स्वस्थचित्त होण्याचा प्रयत्न करतो. पण गळा दाटून यायचा तो येतोच .

तर पुस्तकातील अशा खुणा म्हणजे माझ्यासाठी वाटेवरचे दिवे होतात. आकाशातील तारे होतात. आणि माझ्या वाचनाची लहानशी वाटचाल राजमार्गावरून होऊ लागते .