Monthly Archives: September 2017

स्वप्नवास्तव आणि वास्तवस्वप्न

रेडवुड सिटी

४०-५० वर्षांपूर्वी Fantabulous शब्द वापरात असे. Fantastic आणिFabulous या दोन शब्दांतून तोतयार झाला. या नावाची फटफटीही बाजारात आली. त्या शब्दांपैकी fantastic मी वाचला, अगरकुणी म्हणाला तर लगेच मला डाॅ. येवलेकरांची आणि त्यांच्या आवडत्या सुगंधाची आठवण यायची. त्या सुगंधाचे नाव होते Fantasia !  आजही झाली. पण त्याचं कारण नेमका fantastic शब्द नाही. सांगतोच आता त्या आठवणीची शब्दकथा.

Words Are My Matter पुस्तक पुन्हा चाळायला घेतले. लेखिका Ursula LeGuin तिच्याव्याख्यानात जाॅर्ज लुई बोरजेस् या प्रसिद्ध अरजेंटिनी लेखकाच्या लघुकथा कविता संबंधात सांगतहोती. तो मुख्यता Fantasy चा लेखक म्हणूनच ओळखला जातो. कारण त्याचे सर्वच लिखाणfantasyमध्ये मोडणारे आहे. पण त्या अगोदर फॅन्टसी या प्रकाराचा तिने खूप अभ्यास केला. त्याचाचभाग म्हणून fantasy चा खरा अर्थ काय हे पाहण्यासाठी तिने OED पाहिली.

OED सांगते fantasy चे मूळ लॅटिन phantasia आहे. हे वाचल्यावर मला का आठवण होणार नाहीत्या सुगंधाची? त्या शब्दाचा खरा आनंद त्याच्या अर्थात आहे. लॅटिन phantasia चा त्या काळात ‘ मूर्तरुपात आणणे ‘ a making visible ‘ असा आहे. आपल्या मनात आलेले विचार, त्याही पेक्षा कल्पना, दृश्य करणे! बघा, तो सुगंध दिसू लागतो! प्रकट होतो! अमूर्ताला मूर्त करणारा सुगंध आहे तो !

आपल्या वाक्प्रचारात ‘सोन्याला सुगंध’ होता; त्या पुढची ही पायरी. तो सुगंधही दृश्यात येतो. काळाच्या ओघात  सर्वच शब्दांप्रमाणे fantasyचा अ्र्थही  बदलत गेला तरी तिचे भावंड fiction मध्येत्यातली ‘कल्पनाशक्ती, तिचे पंख’ हा अर्थ अजूनही आहे. Fantasyचीच भावंडं –  fiction , imagination ! काल्पनिक, काल्पनिकता, कल्पना,कल्पनाशक्ति आणि कल्पनेतील सुखद भागम्हणजे कल्पनारम्यता. पण त्याचा, आता things not actually present हा आणखी एक अर्थसांगितला आहे. त्यामुळे ‘ती केवळ कल्पनाच ‘असे काही वेळाने लक्षात आल्यावर वस्तुस्थितीचा रागयेतो. हे म्हणजे लहान मुलाला ” अरे ती जादू नव्हे, ती फक्त हातचलाखी आहे ” सांगून त्याच्या निर्मळअद्भुततेच्या जादूई जगातील त्याचा निर्भेळ आनंद हिरावून घेण्यासारखे आहे. अलीकडे ” ती virtual reality आहे ” (सत्याभास) हे मला समजल्यावर त्या लहान मुलाइतकाच मीही काही वेळ खट्टू होतो.

इतके निराश होण्याचे कारण नाही. वास्तव आणि स्वप्न यात अस्पष्ट धूसर रेषा आहे. स्वप्न, वास्तवात कसे आणि केव्हा येते समजत नाही. अनेक विज्ञानकथांनी ते स्पष्ट केले आहे. बहुधात्यामुळेच Fiction / fantasy ही सर्वांना आवडते. मग ती कादंबऱ्या, कविता, विज्ञानकथा( science fiction)  अथवा थरार-कथा आणि हो, भुतांच्या गोष्टी असो,लोकप्रिय आहेत.वास्तव पटवूनदेण्यासाठी उपमा, दृष्टांत रूपक यासारख्या प्रतिभेतून  स्फुरलेल्या अलंकारांचा  उपयोग करावालागतो.

Truth is stranger than fiction तरी काय सुचवते.स्वप्न आणि वास्तव यांच्या सरहद्दी बदलतअसतात. एकमेकाला भिडलेल्या असतात. त्या शिवाय कविराज म्हणतात का,’प्रत्यक्षाहुनी प्रतिमासुंदर ‘? स्वप्न वास्तवात यावे किंवा वास्तव स्वप्नासारखे व्हावे यासाठी आपलाही मनोरथ धावतचअसतो. प्रेयसीही आत्मविश्वासाने प्रियकराला ” सत्यात जरी न आले स्वप्नात येऊ का मी?” विचारते. दोन्ही तिला वेगळे वाटतच नाहीत.

मग सर्वांनाच फॅंटाशिया आणि fantasy, fiction.  imagination ही, अदृश्य ते दृश्य करणारीशब्दरत्ने आपलीशी का वाटणार नाहीत?

मित्राच्या आवडत्या fantasia वरून हा अर्थाचा सुगंध दरवळला. खरे वाटते ना? का फॅंटसी?

पाण्यावरच्या रेघा

रेडवुड सिटी

आपल्याकडे लग्नाचे काही प्रकार मानलेले आहेत किंवा होते म्हणा. वैदिक किंवा पारंपारिक, गांधर्व विवाह,   राक्षस विवाह इत्यादि. त्याची ढोबळपणे अलीकडची रुपे सांगायची तर आई-वडिलांनी पसंत केलेली, प्रेम विवाह, यातहीकाही उपप्रकार म्हणजे पळून जाऊन केलेले, तर राक्षस विवाह सांगायचे तर सिनेमाकडे गेले पाहिजे. प्राण, प्रेम चोप्रा, जीवन, अजित हे नायिकेला पळवून आणून भटजीला किंवा देवळातल्या पुजाऱ्याला पिस्तुल दाखवून लग्न भरभर लावायला सांगत. सप्तपदी पळत पळत पूर्ण करून लग्ने लावत. त्या लग्नाला राक्षस विवाह म्हणता येतील. लग्ने पैशासाठी होतात, ‘खानदान की इज्जत के लिये’ होतात तर काही चक्क फसवूनही केली जातात.

पण चीनने या सर्वांवर ताण केली आहे! कडी केली आहे!

बेजिंग आणि शांघाय मध्ये इतक्या असंख्य मोटारी झाल्या की रहदारी तुंबायला लागली, भांडणे वाढू लागली.  रहदारी वारंवार ठप्प होऊ लागली. प्रदुषण तर वाढलेच. सरकारने फतवा काढला; मोटर लायसन्स म्हणजे नंबर प्लेट लाॅटरीतूनच मिळतील. वर्षातून तीन चार वेळा लाॅटरी निघते.यंदा जूनच्या लाॅटरीत २८लाख चिन्यांनी नावे नोंदवली होती! त्यापैकी दर ८४३ लोकांमधून  एकाला नंबर प्लेट मिळाली. सरकार चिनी आणि लोकही चिनीच! एक नियम असाही आहे की नवरा बायको आपल्या प्लेटस एकमेकांना देऊ शकतात.  लोकांनी डोके लढवले. सुरुझाली लग्ने! त्यात chat boxes आणि इतर सोशल मिडियांची भर. कोण्या एखाद्या पुरुषाला/बाईला नंबर प्लेट हवी असेल तर दुसऱे नवरे / बायका तयार असतात आपल्या प्लेटस विकायला.

प्लेटींच्या किंमती वाढतावाढता वाढू लागल्या. सध्याचा बाजार भाव १३५०० डाॅलर्स आहे. मोटारींच्या किमतीपेक्षाही जास्त!  त्यातही एकच आकडा तीन वेळा असलेली नंबर प्लेट पाहिजे असेल तर आणखी पैसे मोजायला लागतात. चीनमध्ये ८८८ / 888 ला फार मागणी असते. कारण चिनी भाषेतील “भाग्य” या शब्दाचा उच्चार ८/8 च्या उच्चारासारखा आहे म्हणून! अशा प्लेटची किंमत ९३००० डाॅलर्स आहे.इतके पैसे मोजणारेही आहेत. कारण नविन उदयाला आलेल्या मध्यमवर्गीयांकडे ती ऐपत आहे.

नंबर प्लेटसाठी गरजू तरुण/तरूणी बरोबर लग्न लावायचे. नंबर प्लेट रीतसर नावावर झाली कीपुन्हा घटस्फोट घ्यायचे. आणि पुन्हा पहिल्या नवऱ्याबरोबर किंवा बायकोशी लग्न लावायचे! ह्यासाठी मध्स्थांच्याही जाहिराती असतात.

असाच आणखीही एक सामाजिक प्रकार होत असतो. गेली बरीच दशके लोकसंख्येला आळा घालण्यासाठी चीनच्या सरकारने ‘एकच मुल’ धोरण सक्तीने अंमलातआणले. कोणत्याही सक्तीचा काहीतरी दुष्परिणाम होतोच. स्त्रीगर्भाची भ्रुणहत्या सुरु झाली. मुलांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली. ह्यातून काही गुंतागुंती वाढल्या.

चीनमध्ये असाही नियम आहे की बेजिंग शांधायमध्ये रहिवासी असलेल्यानाच तिथे घर विकत घेता येते.तसेच विवाहिताला घराच्या रोख हप्त्यात मोठी सवलत असते. मुलींची संख्या कमी. मुले जास्त. त्यमुळे घर असलेल्या तरुणाला लग्नाच्या बाजारात मानाने प्रवेशही  मिळतो. अगोदर घर मग बायको मिळण्याची शक्यता जास्त. बघा कसा पेच आहे!  खऱ्या बायकोसाठी घर हवे आणि घरासाठी अाधी खोटी बायको लागणार!

अरे संसार संसार। घर मोटार नंबर। लगीन झालं आता पान्यावरची रेघ!

एका नव्या युगाची सम्राज्ञी

रेडवुड सिटी

१९८४ साली तिच्या पुस्तकाचा विक्रमी खप झाला. तिने आपली स्वत:ची प्रकाशन संस्था सुरु केली. त्यातूनच तिने पुढे आपले साम्राज्यच उभे केले!

प्रेरक विचारांतून प्रेरणा देणारी; माणसाला पुन्हा उभी करणारी,काहींच्या आयुष्याला कलाटणी देणारी अशी पुस्तके तिने लिहिली.

तिचे मुख्यआणि आवडते प्रमेय असे की तुमच्या रोग-व्याधींचा संबंध तुमच्या विचारांशी आहे. आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना प्रसंगांमागेही तुमचे विचारचमुख्यत्वे कारणीभूत असतात. वाचकांना तिचे आवर्जून सांगणे असे की सकारात्मक भावाने तुमचे विचार, वाईट किंवा प्रतिकूल घटनाही परतवून लावू शकतात.  तिच्या लिखाणात अध्यात्माचा स्पर्श होता. तिचा विशेष हा की आपण जे सांगतो ते तिने केलेले असे. आचरणात आणलेले असे. “बोले तैसा चाले” अशी उंचीतिने गाठली होती.

“You Can Heal Your Life” , “The Power Is Within You ” , “Meditations to Heal Your Life ”

ही तिची काही गाजलेली पुस्तके. तिने इतर चांगल्या लेखकांची पुस्तकेही प्रसिद्ध केली. चांगल्या लेखक वक्त्यांचा  ताफा तिच्या संस्थेच्या पटावर होता. केवळप्रकाशन करूनच ती थांबली नाही तर आयुष्य घडवणाऱ्या निरनिराळ्या बाबींसाठी ती शिबिरे कार्यशाळा. व्याख्याने आयोजित करत असे. त्याकामी तिला तिच्यासंस्थेशी निगडीत असणारे व इतरही लेखक वक्ते उपयोगी पडत. ह्या विषयांचे online अभ्यासवर्गही चालू केले. मग त्याबरोबर CDs, DVDs सगळेच आले!

एकच एक, एकट्या स्त्रीचे हे कर्तृत्व आहे. त्या कर्तबगार बाईचे नाव ल्युझी हे आणि कोट्यावधी डाॅलर्सची उलाढाल असणाऱी तिची कंपनी, ” हे हाऊस “. मगNew York Times Magazine ने २००८ साली तिच्यावर  ” नव्या युगाची राणी” हा गौरवपर लेख लिहिला यात नवल ते काय !  तिचे कर्तृत्व आजचे नाही. पाचसहा दशकांचे कष्ट त्यापाठीमागे आहेत. १९८०साली आपल्या घरातील एका खोलीत सुरु केलेल्या Hay House चा वेलु गगनावरी गेलाय!

ल्युझी हेच्या आयुष्याचे वर्णन कसे करायचे? बाळपण तिला नव्हतेच असे म्हणावे लागेल. पाच वर्षाची असतानाच ल्युझीवर तिच्या सावत्र बापाने अत्याचार केले. त्यानंतर पुढे शेजाऱ्याने. वयात आली नाही तोच शाळा सोडावी लागली, कारण ती गरोदर झाली. एक मुलगी झाली. हेच तिचे एकटे अपत्य. पण तिने आपलीमुलगी एका दत्तक देणाऱ्या संस्थेला दिली.

अशा स्थितीत शिकागोलाच काही काळ काढल्यावर ती न्युयाॅर्कला आली . तिथे ती fashion model म्हणून काम करू लागली. एकोणीसशे पन्न्शीच्या मध्यासब्रिटिश व्यावसायिक ॲंड्र्यू हेशी तिचे लग्न झाले. चौदा वर्षाचा संसार झाल्यावर घटस्फोट झाला.

पुन्हा हलाखीचे दिवसआले. निराश अवस्थेत असताना एके दिवशी ती मॅनहॅटन मधील एका चर्चमध्ये गेली. तिथल्या प्रवचनातले एक वाक्य काही तिला पटेना; प्रवचनकार सांगत होता, ” तुम्ही तुमचे विचार बदललेत तर तुमचे आयुष्यही बदलेल.” ” खरं?” ती स्वत:लाच विचारत राहिली. काही काळानंतर ती कॅलिफोर्नियातआली.

तिने त्या तत्वज्ञानाचा अभ्यास सुरु केला. प्रमेयांवरची गणिते स्वत: सोडवली म्हणजे त्याप्रमाणे वागू लागली. तिचे आचरण तसेच होऊ लागले. पण तिच्याकसोटीचा खरा काळ १९७७ साली आला. तिला कॅन्सर झाला ! ती विचार करू लागली. हळू हळू तिच्या लक्षात आले की आपल्याला जो कॅन्सर झाला त्याचेमूळ पूर्वी झालेल्या अत्याचाराची चीड,घृणा जी अजूनही आपल्या मनात आहे. त्यात आहे. खोलवर दडलेला असेल पण तो नकळत वर येत असतो.

तिने पहिल्या प्रथम निश्चय केला. कॅन्सरवर उपचार करायचे नाहीत. चांगला आहार घ्यायला सुरवात केली. उदार क्षमाशील वृत्तीने ती वागू लागली. हे मनापासूनकरू लागली. आयुष्यात ज्यांच्यामुळे जे काही भोगावे लागले असेल-नसेल त्यांना ती पूर्णपणे विसरून गेली. सर्व काही मनातून काढून टाकले. चांगला परिणाम, बदलहेी होऊ लागला. हे चालू असताना तिने एक छोटेखानी पुस्तक लिहिले- “Heal Your Body “.  ह्याचाच पुढे विस्तार करत आपल्या स्वानुभवातूनजाणवलेल्या विचारांवर आधारित “You Can Heal Your Life” हे पुस्तक लिहिले. ह्या पुस्तकाच्या ५० लाख प्रति खपल्या आहेत!

त्यानंतर एडसची लागण झाली. त्या लोकांसाठीही तिने काम केले. त्या बैठकांची सुरवातही पहिल्यांदा तिच्या घरातच झाली. पण नंतर मोठी सभागृहे घ्यावीलागली. ती म्हणते तिथे जास्त करून धीटपणे आयाच पुढे येत. एकही एडसग्रस्त बाप उभा राहात नसे, मग मंचावर येणे दूरच!

तिची एक दोन उत्कृष्ट वचने पाहूयात. “Every thought we think is creating our future. My happy thoughts create my healthy body.”

” Only good can come to me .”

I always work with and for wonderful people. I love my job.”

वरील वाक्य वाचल्यावर मी पूर्वी वाचलेले, एका काळ्या गृहस्थाने-बहुधा तो गायक असावा- म्हटलेले वाक्य आठवले. तो म्हणतो,” मला आजपर्यंत एकही वाईटमाणूस भेटला नाही.”

तिचे टीकाकार  म्हणतात की तिच्या सांगण्यातला अतिशय सोपेपणा आणि साधेपणा हा चांगला भाग असेल पण लोकांच्या हातात नसलेल्या अनेक गोष्टीआहेत. त्यावर त्यांचे नियंत्रण नसते. अशा वेळी ते स्वत:लाच जबाबदार धरतील. आपल्या विचारांमुळेच असे झाले मानू लागतील. रोगांवर औषधोपचारही घेणारनाहीत. त्यांच्या म्हणण्यात व्यावहारिक सत्य आहे. अशाच तऱ्हेचा प्रश्न ल्युझी हे ला Time मासिकाने मुलाखतीत विचारला होता.

” तुमच्या म्हणण्याप्रमाणे लोकांचे विचारच त्यांच्या स्थितीला कारणीभूत असतात; तर दुसऱ्या महायुद्धात जो वांशिक संहार झाला त्यात ते लोकच त्यांच्यामृत्युला जबाबदार होते असे म्हणायचे का?”

त्यावर ती म्हणाली,” मी त्यांना तसे म्हणणार नाही. लोकांना तुम्ही वाईट आहात असे मी सांगत नाही. त्यावर माझा कधीच भर नसतो. तो माझा कधी उद्देशहीनसतो.”

हे हाऊस संस्थेचा एक लेखक आणि ल्युझी हेच्या काही पुस्तकांचा सह लेखक डेव्हिड केसलरने ” You can Heal Your Heart ” च्या प्रस्तावनेत, आठ वर्षांपूर्वील्युझीशी झालेला संवाद लिहिला आहे. ल्युझी हे म्हणते, ” मी विचार करत होते. आणि  ठरवलंय की माझ्या अखेरच्या क्षणी तू तिथे असावेस.”

” काही होतंय का? बरं आहे ना? ” केसलरने विचारले.  ” नाही, तसं काही नाही. मी ८० वर्षाची आहे. चांगली ठणठणीत आहे. समाधानात, आनंदाने जगते आहे. माझं मरणही तितक्याच आनंदाने जगत व्हावे असं वाटतं . जगणे जसे परिपूर्ण तसं मरणही जगावं असं वाटतं.” ल्युझी हे ने सांगितले.

ही कर्तबगार, जे आपण केले तेच दुसऱ्यांना सांगणारी आणि जे इतरांना सांगितले तेच करणारी ल्युझी हे, सॅन डियॅगो येथे वयाच्या ९०व्या वर्षी नुकतीच परवासमाधानाने सर्वांचा निरोप घेऊन गेली.