Monthly Archives: December 2020

टॉम  हॅन्क्स

अनेकांना टॉम  हॅन्क्स Forrest Gump सिनेमामुळे माहित आहे. मला तो सुधीरकडे पाहिलेल्या The Green Mile मुळेही माहित आहे. तसेच गाजलेल्या Toy Story मध्ये Woody चा आवाजी म्हणूनही माहित असेल. टॉय स्टोरी च्या चारी सिनेमात Woody ला आवाज त्यानेच दिला आहे. आता नाताळ आहे म्हणून त्याचा Polar Express सिनेमा सगळ्या वाहिन्यांवर दाखवला जाईल. ह्या सिनेमात तर त्याने मुलगा, बाप, कंडक्टर, ड्रायव्हर (हा स्वत:च) इतक्या जणांना आवाज दिला आहे! ह्या २५ डिसेंबरला काही टॅाकीजमध्ये व HBO वर त्याचा News From The World हा नवा कोरा सिनेमा येतोय.

बहुधा टॉम हॅन्क्सला ह्या भूमिकेमुळे Oscar मिळण्याची किंवा नामांकन तरी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. कथा अमेरिकेतील यादवी युद्ध नुकतेच संपले ह्या काळातली आहे. कॅप्टन केयल /केयल किड्ची(Kayla Kidd) बायको वारली. युद्ध संपल्यावर करायचे काय म्हणून हा सरहद्दी सरहद्दीवरील खेड्यापाड्यात जाऊन माणशी दहा पैशे(डाईम)घेऊन तो वर्तमानपत्र वाचून दाखवत प्रवास करत असतो. त्यातच त्याला युद्धामुळे पोरकी झालेली दहा वर्षाची मुलगी सापडते. टेक्सासमधील तिच्या आजी आजोबा कडे पोचवण्याची जबाबदारी घेतो. आणि एका मोठ्या प्रवासाला आपल्या घोडागाडीतून मजल दरमजल करत निघतो. त्यात काय होते ते ….

वर्तमानपत्र वाचून दाखवण्यावरून मला पूर्वी लहानमोठ्या पोस्ट ऑफिसच्या बाहेर एक लाकडी उतरते डेस्क घेऊन एक जण बसलेला असे, त्याची आठवण झाली.

डेस्कवर निळ्या आणि तांबड्या शाईच्या दौती, दोन तीन टाक व बाजुला डेस्कवरच टीपकागदाचा ठसा डुलत बसलेला; एव्हढाच सरंजाम. लागली तर असावीत म्हणून पाच सहा मनीऑर्डरचे फॉर्म,थोडी तिकीटे-पाकीटेही डेस्कच्या कप्प्यात असत. बरेच निरक्षर लोक आपली पत्रे मनीऑर्डरचे फॉर्म त्याच्या कडून लिहून घेत. त्याचे पैसे तो अर्थातच घेत असे. कामगार,मजूरवर्गाला,आणि इतर अनेकांना हा गृहस्थ मोठी विद्या शिकलेला वाटायचा ह्यात नवल नाही. त्या सर्वांसाठी ही फार मोठी सोय होती हे खरे.

कोर्टातही असे लोक होते व आजही आहेत. तिथे तर कोर्टाच्या मोठेपणा प्रमाणे दोन तीन ते आठ दहा जण असत. पोस्टाप्रमाणे ही माणसं साधी नसत. कोर्टाच्या वातावरणाचा हा परिणाम असावा. कोर्टाजवळची ही लिहिणारी माणसे कायदा कोळून प्यालेली असत. आज तर ते कियोस्को सारख्या टपऱ्यात कंम्प्युटर घेऊन व जोडीला झेरॅाक्सचे मशिन घेऊन आहेत. हे सुद्धा कोर्टकचेरीला नवख्या शिक्षितांना व चागल्या शिकल्या सवरलेल्यांनाही तसेच अशिक्षितांना ही ह्यांची गरज असते. पण पैसे काढायलाही बेरकी असतात. कोर्टाती पायरी चढलेला अडला नारायण काय करणार! देतात बिचारे.

टॉम हॅन्क्सने तीन चार सिनेमाच्या कथा किंवा पटकथाही लिहिल्या आहेत. फॅारेस्ट गम्प च्या कामासाठी त्याला एक रकमी मोबदला नव्हता. त्याऐवजी सिनेमाला जे उत्पन्न होईल त्याचे काही टक्के रक्कम मिळेल असा करार होता. त्याला त्याकाळी, वीस बावीस वर्षापुर्वी, ४०मिलियन डॅालर्स एव्हढी रक्कम मिळाली!
टॉम हॅन्क्स हा पंधरा सोळा वर्षाचा असतांना तो ओकलॅन्डच्या हिल्टन हॅाटेल मध्ये प्रवाशांचे सामान उचलून नेण्याचे काम करत होता. हॅालिवुडच्या चेर, सिडने पॅाइशे सारख्या अनेक नामवंतांचे सामान उचलून त्याने खोल्यात ठेवले आहे. आजही ते फोटो त्या हिल्टनमध्ये आहेत. तसेच ओकलॅन्ड टीमच्या बेसबॅालच्या मॅचेस वेळी त्याने पॅापकॅार्न चॅाकलेट विकली आहेत.

टॉम हॅन्क्सला टाईपरायटर फार आवडत. त्याच्या जवळ त्याने जमवलेले देशोदेशीचे २५० टाईपरायटर्स आहेत! तो टाईपरायटरवरच लिहायचा. आता लॅपटॅाप किंवा स्मार्ट फोन वरील कीबोर्ड वापरत असेल.

टाईपरायटरवरील प्रेमाने त्याने स्वत: एक साधन App केले! त्याचे नाव त्याने Hanks Writer ठेवले आहे. की बोर्डवरील अक्षर उमटताना टाईपरायटरच्या ‘की’चाच आवाज येतो व ओळ संपली की तशीच बेल वाजते! चला, माझ्या लिखाणाचीही ओळ संपली. टिंग्!

कर्ण

कर्णाच्या रथाचे चाक रक्ताचिखलात रूतले. कर्ण रथाखाली उतरून ते चाक बाहेर काढू लागला. कर्ण ? महारथी कर्ण खाली उतरून चाक काढू लागला? सारथी नाही उतरला चाक काढायला? सारथी नव्हता का?

सारथी होता.आणि तोही श्रीकृष्णाच्या तोडीचा सारथी होता. राजा शल्य!

शल्याने दुर्योधनाला तो त्याच्या कौरवांच्या बाजूने लढेन असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे तो आपल्या सैन्यासह कौरवांकडे येण्यास निघाला होता. पण वाटेत पांडवांनी त्याला आग्रहाने थांबवून घेतले. पाहुणचार केला. आपली बाजू सांगितली. आमच्या बाजूने तू लढ अशी विनंतीही केली. शल्यही जवळपास तयार झाला होता. पण आपण दुर्योधनाला अगोदरच त्याच्या बाजूने लढणार असे आश्वासन दिल्याची त्याला जाणीव झाली. पांडवांना,” पण मी आधीच दुर्योधनाला त्याच्या बाजूने लढेन असे कबूल केले आहे. माझी इच्छा असूनही मला तुमची बाजू घेता येत नाही असे सांगितले. पण त्याच बरोबर मी तुम्हाला मदत करेन” असेही सांगितले.

शल्याचे बोलणे ऐकून कृष्ण नेहमीप्रमाणे स्वत:शी हसल्यासारखे हसत म्हणाला,” शल्या,तुझी वाणी जरी वापरलीस तरी ती खूप मदत होईल!” कृष्णाच्या बोलण्याचा अर्थ कुणाला समजला असेल असे वाटत नाही. पण शल्य, कृष्णाने आपले वर्म काढून डिवचले की आपल्या शैलीचे कौतुक केले ह्यावर विचार करत पांडवांचा निरोप घेऊन कौरवांच्या युद्ध शिबिरात आला.

दुर्योधनाने शल्याचे स्वागत केले. द्रोणाचार्य पडल्यानंतर कर्णाकडे सेनापतीपद आले. दुर्योधनाने व कर्णाने त्याला आपले सारथ्य करावे अशी विनंती केली. सारथ्यात शल्याच्या तोडीचा,एक श्रीकृष्ण सोडल्यास कोणीही नव्हता. म्हणूनच दुर्योधनाने शल्याला तशी विनंती केली. शल्य मनात म्हणत होता,कर्ण पराक्रमी वीर आहे पण एका सूतपुत्राचे मी सारथी व्हावे हे कसे शक्य आहे. पण दुर्योधनाची मैत्री व त्याच्याविषयी वाटणारी जवळीक यामुळे तो कबूल झाला. पण एक अट घालून. तो फक्त कर्णाच्या रथाचे सारथ्यच करेल. सारथ्याची इतर कामे तो मुळीच करणार नाही. शिवाय मी कर्णाशी बोलताना किंवा मी कर्णाला काहीही बोललो तरी त्याला ते मुकाटपणे ऐकून घ्यावे लागेल. प्रत्युत्तर दिले तर माझीही प्रत्युत्तरे सहन करून ती ऐकावी लागतील. ह्या अटी मान्य असल्या तरच मी कर्णाचा सारथी व्हायला तयार आहे.

कर्णाला शल्याच्या अटीच्या पहिल्या भागाविषयी काही विशेष वाटले नाही. सारथ्य तर फक्त सारथ्य कर चालेल! असेच तो मनात म्हणाला असेल. पण शल्याने दुर्योधनाला मदत करण्या बद्दल अशा अटी घालाव्यात हेच कर्णाला पटण्यासारखे नव्हते. कर्णाला, आतापर्यंत राजमंडळात आपला विषय निघाला की त्याचा एखादा दोष काढता येत नाही असे जाणवल्यावर , मग केवळ “तो काय शेवटी सूतपुत्रच!” असे म्हणत अनेक राजे काय बोलत असतील ह्याचा त्याला अंदाज होता. त्यामुळे शल्य काय बोलेल ह्याची शक्यता त्याला माहित होती. तरीही आपला मित्र दुर्योधनाचे सांगणे मान्य करत शल्याची ती अट त्याने मान्य केली.

रणांगणावर शल्य कर्णाचा किती उपहास, उपमर्द, अपमान करत असे त्याला सीमा नाही! कर्णाच्या पुर्वीच्या पराभवांचा उल्लेख करीत त्याच्या वर्मावर बोट ठेवून झोंबणाऱ्या शब्दात बोलत असे. पराक्रमात अर्जुनाचे गोडवे गायचे;प्रत्येक बाबतीत अर्जुनाची स्तुती करून कर्णाला हिणवायचे. कर्ण अर्जुनाच्या तोडीचा नाही असे सांगत त्याची सर्वतोपरी खच्ची करण्याची संधी सोडत नसे. कर्णाचा शल्याने सतत तेजोभंग करीतच तीन दिवस सारथ्य केले होते. कर्णाच्या पराभवात शल्याचा मोठा वाटा होता. सुरुवातीला कर्णानेही उत्तर देतांना शल्याचा उल्लेख न करता सगळ्या मद्रदेशीयांच्या संदर्भात बोलत त्यांची निंदा केली होती. पण शल्यानेही त्याला तिरकस शब्दांत सुनावले होते. ह्या पार्श्वभूमीवर कर्णाच्या रथाचे चाक जमीनीत रूतल्यावर कर्णालाच ते बाहेर काढण्यासाठी उतरावे लागले ह्यात आश्चर्य वाटायला नको!

कर्ण रथचक्र शक्ति लावून काढत असता कृष्ण उदारदात्या कर्णाला विचारु लागला,” कर्णा तुला रथ देऊ का दुसरा?” मुळात दानशूर, उदार कर्ण दुसऱ्याची मदत मग तो कृष्ण असला तरी कशी घेईल? किंबहुना कृष्णाची मदत तो कशी घेईल? कर्णाचे उत्तर त्याला साजेसेच होते. तो म्हणाला,” कृष्णा ज्याच्या बाजूने, ज्याच्या साठी मी लढतो आहे त्या राजा दुर्योधनापाशी अनेक रथ आहेत. पण मी माझ्याच रथातून युद्ध करत असतो. म्हटले तर कौरवांचा राजा माझ्यासाठी दहा रथ पाठवेल. त्यामुळे मला तुझे सहाय्य घेता येणे शक्य नाही कृष्णा!” पण तुझी इच्छाच असेल तर कृष्णा तुला बरे वाटावे म्हणून मागतो. द्यायचेच असेल तर मला लाकडाचे मोठे दांडके दे. ते जास्त उपयोगी येईल.” पण कृष्णाला मानी कर्णाचे असले क्षुल्लक मागणे आपण पुरे करणे कमीपणाचे वाटले असावे. तो पुन्हा कर्णाला म्हणाला, “कर्णा,मी तुला रथ देत असता तू मला लाकडाचे दांडके मागतोस ! आणि मी ते देईन अशी अपेक्षा करतोस? अजूनही विचार कर! मी तुला पाहिजे तसा रथ देईन, बघ! “

कर्ण मनांत म्हणाला असेल,” रथापेक्षा दुसरा सारथी देतो म्हणाला असतास तर माझ्या स्वभावाला मुरड घालूनही ते मी लगेच मान्य केले असते.”

कर्णाने समोर मोडून पडलेल्या रथांपैकी एका रथाचा दांडका काढून आणला. ते मोठे दांडके चाकाच्या पुढे ठेवून त्यावरून चाक बाहेर काढण्याच्या खटपटीस लागला.

पण अखेर कर्णाची वेळ आली होती. कर्णाच्या त्या स्थितीत अर्जुनाने युद्धधर्माच्या विरुद्ध कृत्य करीत त्याच्यावर बाण मारायला सुरुवात केली. तेव्हा कर्णाने अर्जुनाला अशा परिस्थितीत लढणे हे युद्धधर्माविरुद्ध आहे; ह्याला धर्मयुद्ध म्हणत नाहीत असे सांगितले. पण “तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म?” (कवि मोरोपंत) अशी एकेका प्रसंगाची आठवण करून देत, प्रश्न विचारत, अर्जुनाने कर्णावर शरसंधान चालूच ठेवले… इत्यादी इत्यादी …. भाग माहित आहेच.

कर्णानंतर शल्यच कौरवांचा सेनापती झाला. पण एका दिवसातच शल्याचा फडशा पडला. पांडवांकडून निघताना कृष्ण हसत शल्याला जे म्हणाला त्याचा अर्थ शल्याला अखेरीस लक्षात आला असेल!