Monthly Archives: February 2020

मधूची सायकल

टीव्हीवर बातम्या पाहात होतो. मध्ये मोटारीची जाहिरातही आली. तिच्यातल्या सुंदर मोटारी पाहून मी सतीशला म्हणालो, “काय सुंदर चकचकीत दिसतात ह्या मोटारी.! “ नव्या आहेत त्या बाबा.” सतीश म्हणाला.

त्यावर मी माझी एक आठवण सांगत म्हणालो,” आमचा आतेभाऊ मधू त्याच्या सायकलची इतकी देखभाल करायचा! हा कंटाळत कसा नाही वाटण्या इतकी तो रोज घासून घासून पुसायचा. तेलाची धार एकाच ठिकाणी पण चेन गरगर फिरवित सगळ्या चेनला व्यवस्थित तेल पाजायचा. मग लहान बाळाचे तोंड पुसावे तितक्याच काळजीने चेन वरच्यावर पुसुन घ्यायचा.

दोन्ही चाकांची मडगार्डस तर बाहेरून कुणीही चकाचक करेल. मधुच्या सायकलची मडगार्डस आतूनही स्वच्छच नव्हे तर चमकतही असत! रात्री खाली रस्त्यावर त्या मडगार्डसचा प्रकाशच चाकाबरोबर फिरत येई. सीटही तो मेण लावून चमकवत असे. मग सायकलचा साचा -मधला त्रिकोणही-स्वच्छ का नसणार? चाकांची प्रत्येक तार व रिमही चमचम चांदीची वाटत असे. प्रत्येक स्पोक तो एकदा कोरड्या फडक्याने मग किंचित ओल्या फडक्याने व ते झाल्यावर रुमालावर अत्तराचा थेंब टाकावा तसा तेलाचा थेंब टाकलेल्या फडक्याने प्रत्येक तार (स्पोक) पुसायचा. ही फडकी काही शेमाॅयची किंवा पिवळी मऊ फ्लॅनेलची नसत. जुन्या गंजीफ्राकाची चार फडकी असत. हे घासून पुसून झाले की तो हबकडे वळे. तिथेही हीच किमया करू लागे.

आम्ही एकदा, बिरबलाने बहुरुप्याच्या नंदीबैलाची परीक्षा घ्यावी तसे, त्याच्या सायकलच्या ब्रेकस्चे रबरी मोजे किंवा शूज स्वच्छ आहेत की नाही ते पाहू लागलो. ब्रेकसची रबरे राहू द्या दोन्ही टायर्सवरही धुळीचा एक कण नव्हता!

मधुला सायकलची देखभल करताना कुठे किती जोर लावून घासावे, खरारा कितपत आणि कुठे करावा हे माहित होते.काही भागांना, लहान बाळाचे नॅपकिनने स्पंज करावे तितक्या हळुवारपणे तो करायचा! उपजत म्हणतात ते ज्ञान मधूचेच असावे !

त्यावेळी सायकलला लावायचे दिवे लहान असले तरी कंदीलासारखे वातीचे असत. त्यांचीही तो निगा राखत असे. त्याच्या दिव्याची भिंगासारखी काच स्वच्छ असे.यामुळे त्याच्या दिव्याचा प्रकाशाला कधीही काविळ होत नसे! नंतर तर डायनॅमोचे किंवा बॅटरीचे दिवे आले. त्यामुळे मधुच्या उत्साहाला आणखीच भरती येत असे. नशीब! मधु, दिव्यातून पडणारा प्रकाशही घासून पुसून स्वच्छ करत नव्हता!

आम्हा सगळ्यांनाच संशय असे की मधु त्याची सायकल रस्त्यावर चालवत नसणार. आवडत्या कुत्र्याला फिरवून आणावे तशी तिला तो फिरवून आणत असावा.

रात्री मधुच्या घरी गेलो तर, अंधारात घड्याळातील रेडियमचे काटे चमकावेत तशी,त्याची सायकल चकचकत असे. मधुच्या सायकलमुळेच, त्यांच्या वाड्यापुरती तरी अमावस्याही पौर्णिमा होत असे!