परवा बाळासाहेबांचे पत्र आले.आजही हाताने पत्र लिहून पोष्टाने
पाठवणारी थोडी माणसे असतील त्यापैकी बाळासाहेब आहेत.पाकिटावरील
सुंदर हस्ताक्षरावरूनच समजलो की बाळासाहेबांचे पत्र! सुंदर
अक्षराबरोबरच ते, पाकिटही वेलबुट्टीनी तर कधी फुलांच्या नक्षीने
सजवतात. आजच्या पाकिटावर पत्रं घेऊन लगबगीने निघालेल्या पोस्टमनचे
लहानसे चित्र चिकटवले होते.पत्रावर आपले चित्र पाहून पोष्टमनही खूष
झाला होता. पाकिट माझ्या हातात देताना तो हसत होता त्यावरूनच ते दिसत
होते.इतके समर्पक चित्र पाहून मलाही त्यांचे कौतूक वाटले.पत्रासाठी
कोणीतरी घराघरात, कार्यालयात, वाट पहात असेल हे जाणून असलेला तो
पोस्टमन किती लगबगीने निघाला आहे!
आपल्या प्रियकराचे पत्र आज यॆईल म्हणून अधिरतेने सारखे आत बाहेर करत,
शिवाय ते दुसऱ्या कोणाच्या हातात पडू नये ह्यासाठीही,मधेच खिडकीतून
दूर टक लावून पोस्टमन दिसतोय का याची उत्सुकतेने वाट पहात असलेली तरूणी
असेल; किंवा”इतके दिवस झाले अजून तिचे पत्र कसे नाही”म्हणून थोडा चिडलेला,
थोड्या चिंतेत असलेला पण तितक्याच आतुरतेने आपल्या प्रियतमेच्या पत्राची
येरझाऱ्या घालत वाट पहाणारा “घायाळ” प्रियकर असेल; तर “माहेरी गेली की
विसरली मला”असे गेले चार दिवस घोकणारा,नुकतेच लग्न झालेला तरूण
नवरा विरह कष्टाने सहन करत, सर्वच बाबतीत सध्या उताविळ असलेला तो
नवरा पोस्टमनची तितक्याच उताविळपणे वाट पहात असेल; तर एखादी
पहिल्यांदाच माहेरी आलेली तरूण माहेरवाशीण”ह्यांचे पत्र कसले येते!
बसले असतील हॉटेलात मित्रांच्या बरोबर चहा ढोसत,हसत खिदळत.कशाला
आठवण येतेय त्यांना!” असे मनातल्या मनात म्हणत पण चेहऱ्यावर मात्र आज
नक्की यॆईल पत्र असा हर्षभाव असलेली, आपल्या धाकट्या भावा-बहिणींना
पोस्टमनकडे लक्ष ठेवा रे असे सांगत स्वत:च दाराबाहेर दोन चार वेळ येऊन त्या
मेघदूताची वाट पहात असेल.
एखादी माऊली, घर सोडून पहिल्यांदाच लांबच्या गावाला शिकायला/
नोकरीला गेलेल्या मुलाच्या साध्या खुशालीच्या पत्राची प्राण डोळ्यात
साठवून वाट पहात असेल तर दूर गावी शिकायला, नोकरीच्या
खटपटीसाठी गेलेला मुलगा आपल्या वडिलांच्या “गोष्टी घराकडील”
पत्राची वाट पहात गहिवरून उभा असेल.किंवा एखादा तरूण इंटरव्ह्यू अथवा
नेमणूकीच्या पत्राची, मान मोडून दुखायला लागली तरी आशेने पोस्टमनची
वाट पहात असेल; कुणी नवखा लेखक संपादकाच्या”तुमची कथा दिवाळी
अंकासाठी स्वीकारली आहे” अशा भाग्योदयी पत्राची डोळ्यांत दिवाळीच्या
चंद्रज्योतीचा प्रकाश घेऊन धडधडत्या अंत:करणानी वाट पहात असेल.उपवर
मुलीचे आईबाप “मुलगी पसंत आहे, मुहूर्त नक्की करण्यासाठी या”अशा
पसंतीची मोहर असलेल्या पत्राची, उत्सुकता आणि काळजीने दाटलेल्या
डोळ्यांनी पोस्टमनची रोज वाट पहात असतील!
पोस्टमन ना नात्याचा ना गोत्याचा. पत्र आणल्या दिवशी मात्र प्रत्येकाचा!
असा इतका बाहेरचा असूनही सगळ्यांच्या ह्रुदयातला झालेला त्याच्या
सारखा समरस सेवक दुसरा नाही!
खऱ्याखुऱ्या अर्थाने सर्वांचा ’पत्रमित्रच’ तो. सगळ्यांचे ज्याच्या
वाटेकडे डोळे लागलेले असतात तो पोस्टमन!
पण हे सगळे पत्रपुराण ४५-४६ वर्षापूर्वीच्या काळाला लागू पडणारे आहे.
आज दूरध्वनी,संगणक, ई-मेल, व्हॉइस-मेल,एसएमएस,टेक्स्ट मेसेज,सर्वसंचारी
दूरध्वनी इत्यादी आधुनिक सोयींची रेलचेल झाली आहे की हस्ताक्षरातील
पत्रेच गेली.ती आता “एन्डेंजर्ड स्पेसीज” झाली आहेत.पत्रेच नाहीत तर
पोस्टमनची वाट कोण पाहिल?
छापील कचरा वाटप करण्याचे काम फक्त त्याला आता राहिले आहे.तोही
बिचारा आता कोरडेपणाने काम करतोय ह्यात त्याचा काय दोष?
पूर्वीचा पोस्टमन “कुणा’रावसाहेब!’बोले बघून। कुणा’भाऊ!’नाना!’म्हणे तो
हसून॥ अशी नावे पुकारून पत्र टाकताना किंवा हातात देताना पत्राच्या
अक्षरा रूपावरून त्यातील भावना हसून, डोळ्यांनी, भुवयांनी आनंद,
आश्चर्य व्यक्त करत जात असे.
कोण कोणत्या पत्राची वाट पहातात हे अनुभवी पोस्टमनला सरावाने माहित असे.
“वकीलसाहेब, मुलासाठी बऱ्याच पत्रिका-फोटो आलेले दिसताहेत!”असे अदबीने
म्हणत त्यांना पत्रे दॆईल तर भोसले मधुला,”चहा-चिवडा तरी पाहिजे नोकरी
लागल्याचा”असे म्हणून सरकारी पत्त्याच्या पाकिटाकडे पहात लांब पाकिट
दॆईल. “श्री”आणि कसलाही मायना नसलेले दोन-तीन ओळीचे कार्ड खाली मान
घालून न बोलता शेजारच्या लाटकरांच्या घरात हळूच सरकवून झटकन
पुढे जाईल.
काळाच्या झपाट्यात हे सर्व संपले.आणि त्यात काही नवल नाही. असे होणारच.
पोट खपाटी गेलेला शेतकरी जसा पावसाच्या ढगाची, आकाशाकडे खोल
गेलेल्या डोळ्यांनी काकुळतीने वाट पाहात असतो त्याप्रमाणे एखाद्या खेड्यातील
कुणी गरीब आई-बाप पोराच्या मनीऑर्डरसाठी आजही पोस्टमनची काकुळतीने
वाट पहात असतील म्हणा.
आणि आपला पोस्टमनही, ती मनी-ऑर्डर देण्यासाठी लगबगीने निघालाही
असेल!