हसण्यासाठी जन्म आपला!

रेडवूड सिटी

मला एकदम हसू आलं. कारण काही नाही. सोनियाची आठवण झाली आणि
तिची हसरी मूर्ती डोळ्यांसमोर आली. हसण्यासाठी तिला विशेष कारण
लागत नाही. आणि म्हणूनच तिचे हसणे इतकं गोड असावे. सोनिया अवघी दोन
अडीच वर्षांची. सोनियाला हसताना पाहणे ह्यापरते दुसरे सुख नाही,
भाग्य नाही. सोनिया हसू लागली की–खरं म्हणजे कोणतेही लहान मूल हसू
लागले की-प्रकाश जास्त उजळतो, पक्षी अंगणात येतात, झाडे डोलू लागतात,
वारा फ़ुलांचा सुगंध घेऊन येतो, बाल-निर्झर हसत-खेळत झुळुझुळ वाहत
येतो, काळज्या मिटून जातात, खेद-खंत मावळतात, राग-लोभ पळून जातात;
सारे जग हसू लागते.

हसवणारा सगळ्यांनाच आवडतो. मग तो विनोदी लेखक,कवि, वक्ता, विनोदी
कलाकार, नट-नटी, विदूषक, व्यंग चित्रकार,गोष्टीवेल्हाळ कोणीही असो,
तो सर्वप्रियच होतो.विनोद,चुटके, किस्से, आठवणी, गप्पा म्हणजे रोज येणाऱ्या
आनंदाच्या सरीच! त्यांत भिजणे कुणाला आवडत नाही?

हसणे आरोग्यासाठी उत्तम औषध आहे. नव्हे ते आयुष्यवर्धक संजीवक आहे
असे डॉक्टरही म्हणतात.कॅलिफोर्नियातील लोमा लिंडा युनिव्हर्सिटीच्या
हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या आणि ह्रुदयविकाराच्या रुग्णांना “आय लव्ह ल्युसी”
सारखे विनोदी कार्यक्रम रोज दाखवतात. ते पहाताना रोगी आपले दुखणे विसरून
हसत असतात. ह्यामुळे शरीरातील टी-सेल्स वाढून त्यांची प्रतिकारशक्ती
वाढल्याचे आढळून आले.

“सॅटर्डे रिव्ह्यू” ह्या प्रख्यात मासिकाचा संपादक नॉर्मन कझीन हा मणक्यांच्या
विकाराने अंथरुणात पडून होता. त्यावेळी तो मार्क्स ब्रदर्सचे विनोदी चित्रपट
पहात असे. आठ दिवसात पूर्ण बरा होऊन तो चालू लागला.हे पाहून डॉक्टरही
चकित झाले.

नाटकातील, कथा-कादंबऱ्यातील संवादात कुणी हसला किंवा हसणे हे हा:
हा: ; ही ही; हो हो; असे लिहून दर्शवतात.इंग्रजी आणि इतर भाषांतही असे
ह-च्या बाराखडीतून “हसणे” सुचवतात.स्वराच्या मागे ह हे व्यंजन
वापरलेले असते. आपण श्वासोश्वास घेतानाही “ह” असाच काहीसा आवाज होत
असतो. म्हणजे श्वासोश्वासा इतकेच हसणेही आपल्या जीवनाशी किती निगडित
आहे पहा! इतर भाषांत ’हसणे’ यासाठी जे शब्द आहेत त्या शब्दांची सुरवात
’ह’ या व्यंजनाने होत नाही; उदा. इंग्रजीत ’लाफ”लाफ्टर’; पण मराठीत मात्र
’हसणे’ ’हास्य’ हे शब्द ’ह’नेच सुरू होतात! आपल्या मराठीचे हे एक खास
वैशिष्ठ्य आहे.

कुणी”हसून हसून बेजार होतो” पण हसल्यने तो आजारी पडल्याचे
कोणी ऐकले नाही. “हसून हसून आपले पोट दुखले” असेही कुणी सांगतो पण
हसण्याने कधी तब्येत बिघडल्याचे आपल्याला माहित नाही. प्रख्यात इंग्रजी
लेखक आणि निबंधकार मॅक्स बीरभॉमने म्हटल्याप्रमाणे, ह्या पृथ्वीतळावर
आपल्यापूर्वी आणि आजपर्यंत इतके लोक हो़ऊन गेले पण हसण्यामुळे, हसून
हसून कोणी दगावला आहे अशी इतिहासात कुठेही नोंद नाही.
बायबलच्या जुन्या करारातील जेनेसिस[विश्वोत्पत्ती संबधीचा भाग]मधील एक
प्रसंग लक्षात घेण्यासारखा,गमतीचा आहे.:- आणि देव ऍब्रॅहमला
म्हणाला,”मी तुझ्यावर आणि तुझ्या बायकोवर प्रसन्न झालो आहे. माझ्या
आशीर्वादाने तुम्हाला मुलगा होईल!” हे ऐकून ऍब्रॅहम पोट धर धरून हसू
लागला.अगदी जमिनीला डोके टेकेपर्यंत हसत होता. त्याला वाटले, माझी
म्हाताऱ्याची देव किती थट्टा करतोय!”
ही देववाणी ऐकून ऍब्रॅहमची बायको-सेरा-सुद्धा हसायला लागली. ह्या
वयात-त्यावेळी ती नव्वद वर्षांची होती- आपल्याला मूल होणार ह्या नुसत्या
कल्पनेनेही तिला हसू लोटलं. देव आपली गंमत करतोय असे तिला वाटले.
देवाने त्या मुलाचे नावही ठरवले होते. देव पुढे म्हणाला,”तुमच्या मुलाचे
नाव आयझॅक असेल.” खरी गंमत पुढेच आहे–’आयझॅकचा अर्थही,’हसरा’ ’तो
हसेल’ ’हसणारा’ असा आहे!

आपले मूळ स्वरूप आनंदच आहे असे आपल्या अध्यात्मिक तत्वज्ञानातही म्हटले
आहे. ही आनंद साधना करणे ह्यात आपल्या आयुष्याचे सार्थक आहे असे आपले
संत, ज्ञानी पुरूषही सांगतात.

आपले हसणे, हास्य म्हणजे आनंदाचा प्रकट आविष्कार. आनंदाचे मूर्त स्वरूप
म्हणजे हसणे, हास्य! इजिप्तमध्ये सापडलेल्या, इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या
शतकातील एका कागदपत्रात म्हटले आहे: “जेव्हा देव मोठ्या आनंदाने
पहिल्यांदा हसला तेव्हा प्रकाश निर्माण झाला…..दुसऱ्यांदा मोठ्याने हसला
तेव्हा पाणी निर्माण झाले…. आणि जेव्हा देव सातव्यांदा [सात मजली?] हसला
तेव्हा मानव, मनुष्य प्राणी निर्माण झाला!” परमेश्वराच्या आनंदाच्या
परमोच्च क्षणी आपला जन्म झाला ही कल्पना किती रम्य आहे!

हे सगळं हसण्यावारीच जाण्याची शक्यता आहे.हसण्यासंबंधी इतके
वाचल्यावर तुम्ही, हे म्हणजे अगदी, “अति झालं आणि हसू आलं” असे म्हणून
हसाल.हरकत नाही. तुम्ही असे हसण्यातही मजा आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *