Monthly Archives: August 2008

स्वातंत्र्य,प्रगती,सुबत्ता समृद्धी……..

जळगावचे माझे मित्र आणि शेजारी डॉ.देसाई यांना अखेर स्कूटर मिळाली. ती आणण्यासाठी त्यांना धुळ्याला जावे लागले. एक दोन दिवस तिथे रहायला लागले.दोन दिवसांची प्रॅक्टिस बुडाली. पण स्कूटर मिळाली त्या पुढे प्रॅक्टिस बुडणे वगैरे गोष्टी क्षुल्लक होत्या. आपल्या देशाच्या औद्योगिक प्रगती आणि भरभराटीसाठी इतका थोडा त्याग करायलाच हवा प्रत्येकाने. त्यांनी सर्व कागदपत्रे, पैसे भरून स्कूटर ताब्यात घेतली. नेहमी स्कूटर बरोबर एक जास्तीचे चाकही असते. पण त्या दुकानदाराने ते दिले नाही कारण ते आले नव्हते. त्या ऐवजी एक ट्यूब दिली!तरीही डॉक्टर आपली ती नवीन स्कूटर मोठ्या आनंदाने घेऊन आले.तिला हार घालून नारळ फोडून पेढे वाटून विजयी वीरासारखे आले. जळगावच्या वेशीपाशी पंचवीस सुवासिनींनी त्यांना ओवाळायचे तेव्हढे राहिले. पण घरी आल्यावर त्यांच्या बायकोने प्रेम आणि कौतूकभरल्या डोळ्यांनी त्यांचे -त्यापेक्षा त्या स्कूटरचे- पंचारती करून औक्षण केले असणार ह्यात शंका नाही. दिवसच तसे देशाच्या भरभराटीच्या स्वप्नांचे होते. देश आर्थिक सुबत्तेकडे प्रगतीकडे, भरभराटीकडे मोठी झेप घेत होता. आजही तो तशीच झेप घेतच आहे.

नंतरचा महिना दीड महिना डॉक्टर नाटक-सिनेमातल्या शिवाजी सारखी मान थोडी तिरपी वर करून आणि छाती पुढे काढून जात होते. स्कूटरवर असतानाही हीच स्टाईल! पायी चालताना तर ते कुणाकडे ढुंकुनही पहात नसत.त्या काळात कुणी असे चालू लागला की सगळ्यांना समजायचे ,ह्यांचा स्कूटरचा नंबर लागला. ह्यांना स्कूटर मिळाली!अखेर स्कूटरचा नंबर लागला, स्कूटर मिळाली की पुढे आयुष्यात काही करायचे बाकी नसे! आपली स्कूटर असणे म्हणजे काय असते ते आताच्या केव्हाही, कुठेही, पैसे फेकले की ’बाईक’ मिळणाऱ्या,आणि ती घेणाऱ्या पिढीला कळणार नाही. तो गगनात न मावणारा आनंद, तो अभिमान, ते आपले कर्तृत्व,आपले स्वप्न सत्यात उतरले त्या यशाचा उत्साह आणि मनात मारलेल्या आनंदाच्या उड्या, ह्या सर्व शुद्ध आनंदाची चव आणि अनुभव आता कुणाला येणार नाही!

ह्याचे कारण डॉक्टरांना ती स्कूटर पैसे भरून पाच वर्षांनी नंबर लागल्यावर मिळाली होती!

हे सगळे सांगण्याचे कारण आमच्या वासुनाने सांगितलेला किस्सा. वासुनानाच्या मित्रानी काटकसर करून, बऱ्याचशा इच्छा मारून पैसे साठवले आणि पैसे घेऊन तो स्कूटरसाठी नाव नोंदवायला स्कूटरच्या शोरूममध्ये गेला.निमुटपणे पैसे भरले. कुठे राहतो, त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड विजेची तीन बिले वगैरे सर्व सोपस्कार पूर्ण झाले. पावती घेतली. दुकानदाराला नम्रपणे विचारले,”स्कूटर केव्हा मिळेल? दुकानदाराने आपल्या पुस्तकात पाहिले आणि सांगितले,” बरोबर ह्याच तारखेला म्हणजे १५ ऑगस्टला पण पाच वर्षांनी या.” वासुनानाचा मित्र म्हणाला,”शेठजी,पाच वर्षांनी स्कूटर ताब्यात घ्यायला सकाळी येऊ का संध्याकाळी?” शेठजींना हा असे का विचारतो ते समजेना. तो म्हणाला,का, तुम्ही असे का विचारता?” मित्र म्हणाला,” त्याच दिवशी ग!असचा सिलिंडरही येणार आहे घरी…म्हणून… म्हणून….”

[१६ ऑगस्ट,२००८ द इकॉनॉमिस्ट्च्या अंकात एका वाचकाच्या पत्रावरून मला हे सुचले. त्याने रशियात मोटार मिळणे किती अवघड होते,असते ह्या संबंधी विनोदी किस्सा पाठवला होता. त्याचा आधार माझ्या लिखाणाला आहे.]