Monthly Archives: November 2010

साबणाचा लाडू

शीर्षक बरोबर आहे. मुद्राराक्षसाचा प्रताप नाही किंवा उपसंपादकाच्या डुलक्यांचाही परिणाम नाही. ’साबुदाण्याचा लाडू’ऐवजी मी साबणाचा लाडू असे तर लिहिले नाही ना, असेही वाटण्याची शक्यता आहे. पण तसे काही नाही. लाडू साबणाचाच आहे.

साबणाचा लाडू म्हटल्यावर काहीजण म्हणतील, “लोक काय खातील, कशाचे काय करतील, काही सांगता येत नाही हल्ली”!

खरं सांगायचे तर काही शब्द नुसते ऐकले तरी लागलीच पुढचा शब्द, नावे, व्यक्ती लगेच आपल्या डोळ्यांसमोर येतात. नुसते छ्त्रपती म्हटल्यावर लगेच शिवाजी महाराज, लोकमान्य शब्दाच्या पुढे लगेच टिळकच येणार. किंवा महात्मा म्हटल्यावर गांधींच्या किंवा जोतिबा फुले यांचाशिवाय कोण समोर यॆईल? तसेच ’खादी’च्या पुढे भांडारच येणार.

पाडवा म्हटल्यावर घराघरांवर लावलेल्या भरजरी गुढ्या दिसू लागतात, तर दसरा शब्द ऐकला तर आपट्यांच्या पानांचे-शिलंगणाच्या सोन्यचे- ढिगारे आणि टपोऱ्या झेंडुच्या फुलांचे डोंगर आणि माळा-तोरणे डोळ्यांसमोर येतात यात नवल नाही. दिवाळी म्हणल्यावर सर्वांना लहानपणी तरी भरपूर सुटी, फटाके, आकाशदिवा, लाडू करंज्या, शंकरपाळी आणि चकल्या-कडबोळ्यांनी भरलेले स्वैंपाकघर दिसत असणार. त्याचबरोबर दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून दरवळणारा सुगंधही येत असतो. मग तो फटाक्यांच्या प्रकाशाने अंगण उजळून गेल्यावर पसरलेल्या धुराचा असो, घराघरांतून येणारा तेला-तुपाचा खमंग वास असेल,किंवा आंघोळीच्या आधी लावलेल्या तेलाचा आणि त्याबरोबरच खास दिवाळीसाठी आणलेल्या साबणाचा सुगंधही येत असतो!

दिवाळीच्या आधी तीन चार दिवस कुणा मोठ्या माणसांबरोबर गावात, बाजारपेठेतून जाताना दुतर्फा दिसणाऱ्या फटाक्यांची, आकाशदिव्यांच्या रंगीत रांगाच रांगा असलेली, तेल-उटणी आणि साबणांची आरास असलेली लहान मोठी दुकाने पहात पहात जात असू. आणि हे फटाके घ्यायचेच, हा आकाशदिवा आणू, ह्या बाटल्या घॆउ असे मनाशी ठरवत पुढे पुढे जात असू.

कधी तर अंधार पडेपर्यंत अशी भटकंती व्हायची.  आकाशदिव्यातून येणाऱ्या निळ्या-तांबड्या प्रकाशाचे कवडसे अंगावर झेलत, त्यांच्या डुलणाऱ्या झिरमिळ्यांबरोबर आम्हीही तल्लीन होऊन पहात बसयचो.फटाक्यांच्या दुकानांपुढून तर पाय निघत नसे. तितक्याच कुतुहलाने, पायऱ्या पायऱ्यांच्या फळ्यांवर मांडून ठेवलेल्या सुवासिक तेलाच्या निरनिराळ्या आकारांच्या बाटल्या, आणि त्या खालीच समोर साबणांच्या वड्यांचे पिरॅमिडस, तर कुठे सुगंधी सबणांच्या वड्यांची तटबंदीच उभी केलेली पहात उभे रहात असू.

एरव्ही डोक्याला अंगाला खोबरेल तेलाशिवाय दुसरे तेल क्वचितच लागत असे. पण दिवाळीची गोष्ट काही औरच! टाटा, स्वस्तिकच्या डाळिंबी रंगाच्या कॅस्टर ऑइलच्या डौलदार बाटल्या, त्यांच्या शेजारीच राजकोटचे पोपटी व्हेजितेबल ऑइलच्या त्रिकोणी बाटल्या ऐटीत उभ्या असत. तर झुल्फे बेंगॉल असे आम्हाला अफलातून वाटणारे म्हणजेच न समजणाऱ्या नावाच्या  बाटल्याही पुढे पुढे करीत असायच्या. ह्या सर्व सुगंधी तेलाच्या प्रदेशात मालेगावी आवळेल तेलाच्या बाटल्याही अंग चेपुन पण नेटाने उभ्या असत.

ह्या तेलांच्या बाटल्यांच्या झगमगाटात समोर नेहमीचे लक्स, रेक्सोना, स्वस्तिकचा कांति, कधी झिजेल ह्याची वाट बघायला लावणारा दीर्घायुषी हिरवा हमाम आणि ’आरोग्य तेथे वास करी’चा लाल लाइफबॉय ही रोजच्या ’सोप ऑपेरा’तील यशस्वी “साबणे मंडळी” हजर असतच. त्यांच्यापेक्षा वरिष्ठ पातळीवर गोदरेज नं १, पाटणवाला यांचे सुगंधी साबण, पेअर्सची पारदर्शक वडी, म्हैसूर सॅंन्डल सोप आपल्याच तोऱ्यात ऐटीत बसलेले असत. पण पिरॅमिडस, तटबंदी, मैदानी प्रदेश आणि वरच्या पायरीवरील या सर्व साबणांपेक्षाही उच्चासनावर विराजमान असलेले टाटाचे मोती साबणाचे लाडू हे खरे लक्ष वेधून घेत. राजाचा शाही रुबाब, दिमाख या बरोबरच त्याचा “मोठेपणा” हे सर्व निरनिराळ्या रंगातील आणि सुगंधातील ’मोती’ साबणाच्या लाडूत असे. मोती साबणाचा आमच्या हातात न मावणारा लाडू घ्यायचाच हे ठरवायला फार वेळ लागत नसे.

दिवाळीच्या सुटीतले पहिले दोन तीन दिवस अशा आराशीने सजलेल्या बाजारपेठेतून हिंडण्यात जायचे आणि रोज अचंबित होऊन उत्साहाने एक-दोनच दिवसावर आलेल्या दिवाळीच्या पहाटेची वाट बघता बघता कधी झोपी जायचो ते समजतही नसे.

दिवाळीच्या चारी दिवसात रोज आमच्या हातात न मावणाऱ्या साबणाच्या लाडूने आंघोळ करताना, आपण कुणीतरी मोठे झालो असे वाटायचे!

पण दिवाळी संपल्यावर मात्र त्या साबणाच्या लाडुतली अप्रूपता, कौतूक आणि सुगंधही कमी व्हायचा!

आता लक्षात येते की ती सर्व चार दिवसाच्या दिवाळीची जादू असायची!

तरीही छत्रपती म्हटले की शिवाजी महाराज, महात्मा म्हटल्यावर गांधी, तसे लाडू म्हटले की बेसनाचा, बुंदीचा, मोतीचूर या लाडोबांबरोबरच ’मोती’ साबणाचा लाडूही डोळ्यांसमोर येतो.

साबणाचे आता आपले रूपही बदलले आहे. साबणाच्या वड्या कमी झाल्या आणि लाडूही फारसे दिसत नाहीत. साबणाने नवीन अवतार घेतला आहे. साबणाचा आता बॉडी वॉश झाला आहे. कुणाचा ओल्ड स्पाइस तर कुणाचा जिलेट,एक्स! त्यांचीही नव्या दिवाळीत परंपरा होईल.

दिवाळी येतच राहणार आणि साबणाच्या लाडूचीही आठवण यॆणार.

आजही आम्ही तो साबणाचा लाडू आठवणीने आणतो.