Monthly Archives: June 2011

रेशनकार्ड ते ग्रीन कार्ड

सध्या कार्ड-संस्क्रुतीचे युग आहे. ओळख-पत्रापासून ते क्रेडिटकार्डपर्यंत नुसती कार्डेच कार्डे! मला माहित आहेत ती फक्त रेशन कार्ड आणि पोस्टकार्ड. ह्या दोन्हीशीच जास्त संबंध आला माझा.

रेशन कार्डानेही आपले रंगरूप बदलले. पूर्वी फक्त पोटापाण्याच्या वस्तूंसाठीच ते होते. आता तो एक महत्वाचा दस्त ऐवज झालाय. इतर अनेक अर्जांसोबत रहिवाशी असल्याचा पुरावा, घराच्या पत्त्याचा पुरावा,बॅंकेत खाते उघडताना अशा अनेक कारणासाठी ते आता वापरले जाते. त्यामुळे ते मिळवण्यासाठीही कचेरीत लांब रांगा लागलेल्या असतात. बरं ते आता निरनिराळ्या रंगातही मिळू लागलय. केशरी, तांबडे, पांढरे वगैरे वगैरे!

मध्यम वर्गात अलिकडे अमेरिकेचा उदय झाला. अमेरिकेत जाणाऱ्यांची जशी वर्दळ वाढू लागली तसे व्हिसा, जेट लॅग हे शब्द ऐकू येऊ लागले.मी ओळखत असलेल्या कार्डांबरोबर ग्रीन कार्डाचाही बोलबाला कानावर येऊ लागला.कुणाला व्हिसा मिळाला की त्या घरात जल्लोष होई, सत्यनारायणाची जंगी पूजा व्हायची. अमेरिकेचा विसा मिळायला पूर्वजन्मीचे पुण्य लागते,कुंडलीत तसे योग असावे लागतात, एखाद्याच्या(च) ते भाग्यात असते अशा दैवी गोष्टींना उत आला.एखाद्याला व्हिसा नाही मिळाला तर त्याला दुखवट्याची पत्रे येत!

व्हिसाबरोबर ओघाने ग्रीन कार्डाचेही महात्म्य वाढले. पण अनेकांना ह्या ग्रीन कार्डासाठी काय करावे लागते, आपल्या देशातूनच प्रयत्न करावा लागतो की अमेरिकेत जाऊनच केलेले बरे, कोण कोणती कागदपत्रे लागतात याची नेमकी माहिती नसते. बरं ज्यांना ग्रीन कार्ड मिळाले आहे त्यांना विचारले तर ’ते माझ्या मुलाला/मुलीला माहित आहे’, ’रोज नियम बदलतात’, ’काही खरं नाही हो’ अशी गूढ, रहस्यमय माहिती देतात. त्यामुळे ग्रीन कार्डाभोवतीचे वलय आणखीच गडद होते. पण ते मिळालेल्या माणसाभोवती मात्र एक तेजोवलय निर्माण होते!

नुकताच मीही ग्रीन कार्डाच्या भोवऱ्यातून बाहेर आलो. मी पुण्याला असतानाच सतीशने कोण कोणती कागदपत्रे आणायला लागतील त्याची यादी सांगितली होती. त्यापैकी जी मिळणार नाहीत, दप्तरात नोंदच नाही असे काही असेल तर तशा अर्थाचे प्रमाणपत्र त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून आणायचे. नातेवाईकांचे त्याकरता प्रतिद्न्यापत्र नोटरीकडून प्रमाणित करून घ्यायचे ते सांगितलेच, शिवाय ही सर्टिफिकिटे, प्रतिद्न्यापत्रे यांचा मजकूरही सांगितला. अमेरिकेतील त्या खात्यांना ज्या पद्धतीचा आणि स्पष्ट अर्थबोध होईल अशा साध्या भाषेतील होता तो मजकूर. वास्तव काय आहे हे नेहमीच्या सोप्या आणि खरे काय आहे ते सांगणारा मजकूर असतो. मी तयारीला लागलो. एप्रिल महिन्याच्या मध्यापासून माझा जन्म दाखला, माझ्या लग्नाचे प्रमाणपत्र, ते नसल्यास संबधित अधिकाऱ्याकडून तशा अर्थाचे पत्र, माझ्या ज्येष्ठ नातेवाईकांचे माझे लग्न अमुक तारखेला झाले ते आम्ही त्याचे काका, मामा, मावशी…भाऊ, बहीण ..आहोत म्हणून आम्हाला माहित आहे आणि हे आम्ही शपथेवर सांगतो… असे प्रतिद्न्यापत्र, सतीशचा जन्मदाखला, बस्स, इतकीच कागदपत्रे लागणार होती.

सतीशचा जन्म दाखला मिळवण्यासाठी, माझे शेजारी अकोल्याचेच म्हणुन त्यांना भेटलो. त्यांनी माझ्याकडून सर्व नावे, तारीख मागितली. मी ती ठळक इंग्रजी अक्षरात, पासपोर्टमध्ये जशी स्पेलिंग आहेत तशीच लिहून दिली. सर्व काळजी घेऊन. “होईल काका हे काम दोन तीन दिवसात”, असे त्यांनी सांगितल्यावर,इतक्या लवकर काम होईल हे ऐकल्यावर माझा कंठ दाटून आला यात नवल ते काय!.

आता मी माझ्या कागदपत्रांसाठी सोलापूरला गेलो. माझंच गाव, सर्व कार्यालये कुठे आहेत त्याची सगळी माहिती मला होती. एक दोन दिवसात होतील कामे असा माझा अंदाज. गेलो सोलापूरला. जन्म दाखल्यासाठी फी भरून अर्ज दिला. “आठ दिवस लागतील, नंतर या” असा पहिलाच झटका मिळाला. मी कामाची तातडी सांगितली. पण फारसा उपयोग झाला नाही.मग ओळखी-पाळखीने कामं लवकर होतील या अनुभवाने त्याच्या शोधात लागलो. सुनीलच्या ओळखी भरपूर. आपल्यापैकी एकाचा एक मामा आहे त्याला भेटू असे म्हणून आम्ही त्या दुय्यम अधिकाऱ्याकडे गेलो. त्याने मला एक अर्ज द्यायला सांगितला. मी लिहून दिला. “अहो असा नाही, असे म्हणत एक मोठा ताव घेतला आणि लिहा असे म्हणाला. त्यांना पाहिजे तसे लिहून दिले. “नावं, त्याची स्पेलिंग बरोबर लिहून द्या. नंतर काही बदल करता येणार नाही. मी सर्व काही माझ्या पासपोर्टमध्ये लिहिली होती तशी लिहून दिली. “बरं झालं, आजच आलात. मी पुण्याला वरच्या ऑफिसात चाललोय. तिथून उद्या परवा मंजूर करून तसा जन्म दाखला तुम्हाला देतो”. इतके ठामपणे सांगितल्यावर कुणाला धन्य धन्य वाटणार नाही?

मी आता माझ्या लग्नाच्या प्रमाणपत्राच्या पाठीमागे लागलो. “त्याची त्या ऑफिसात झाडून सगळ्यांशी घसट आहे. त्याला सांगा तुमचं काम.झालच म्हणून समजा.” “त्याला गाठले. “उद्या ११.४५ वाजता डाक बंगल्यापाशी या. मग आपण त्या निबंधकांच्या ऑफिसात जाऊ.” मी ११.३० वाजता डाक बंगल्यापाशी पोहोचलो. साडे बारा वाजले, १.३० वाजला, २.४५ वाजले आणि फटफटीवरून ते ग्रहस्थ एका माण्साला घेऊन आले. इतका उशीर झाला वगैरे त्याचे काही वाटत असल्याचे एकही चिन्ह त्या ग्रहस्थाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हते.. “यांचं छोटसं काम आहे मिनिस्टरांकडे. ते करून आलोच पंधरा वीस मिनिटात असे सांगून डाक बंगल्यात गेले ते दोघे जण. मी पुन्हा डाक बंगल्याचा पहारा करत उभा राहिलो. चार वाजता ग्रहस्थ आला आणि म्हणाला,” मिनिस्टरने जेवायलाच थांबवून घेतले. चला निघू या आता” असे म्हणत आम्ही निघालो. दुय्यम निबंधकांच्या कार्यालयात आलो. ह्यांच्या सर्वांशी गप्पा सुरू झाल्या. काही वेळाने कुणाचे तरी माझ्याकडे लक्ष गेले. काय काम आहे असे म्हटल्यावर मी माझा अर्ज दिला. आमचे ग्रहस्थ साहेबाला सांगू लागले. साहेबांनी माझा अर्ज टेबलावर कागदाच्या ढिगाऱ्यात कुठे तरी ठेवून दिला. थोड्या वेळाने आम्ही बाहेर आलो. ते ऑफिसात “वटट” असणारे ग्रहस्थ म्हणाले दोन दिवसात काम होईल.

चला. दोन्ही कामे दोन दिवसात होणार या आनंदात मी बुडून गेलो. म्हटलं आता विजय अण्णांचे ऍफिडेविट करून घेऊ या.

प्रतिद्न्यापत्राचा मजकूर एका कागदावर छापून घेतला. तो सुनीलकडे दिला. त्याच्या ओळखीचा एकजण ह्या कामात अनुभवी होता.

वाचकहो आता माझ्या जन्म दाखल्याच्या कामाचे काय झाले तिकडे वळू. (ह.ना.आपटे, नाथ माधव यांच्या कादंबऱ्यांची आठवण आली ना?) चला आता आपण त्या “आपल्यापैकी एकाच्या ओळखीच्या माणसाच्या मामांनी” पुण्याला जाऊन जन्मदाखला आणलाही असेल. त्यांना फोन करू. “अहो, हे काय मी पुण्याच्या साहेबांच्या ऑफिसातच आहे. काम होणार. उद्या मी येतोच आहे”. उद्याचे आठ दिवस झाले. इकडे त्या सगळीकडे वट असणाऱ्या ग्रहस्थांनी काय केले ते पाहू. कारण त्यालाही आता आठ दिवस होऊन गेले होते. “मी उद्या जातोय त्यांच्याकडे. उद्या फोन करा.” चला आपली दोन्ही कामे उद्या होणार. दहा बारा दिवस राहिल्याचे सार्थक होणार. उद्या दोन्हीकडे फोन केले. पुन्हा चार दिवसांचे वायदे मिळाले. सुनीलला सांगितले मी आता जातो. तू पाठपुरावा कर. तो बिचारा आपला नोकरी व्यवसाय सांभाळून माझ्या कामाचाही पाठपुरावा करत होता.

मी पुण्याला आलो.जवळपास एक महिना उलतून गेला होता. दोन तीन दिवसात मिळणारा सतीशचा जन्म दाखला पुण्याला येऊन जुना झाला असेल अशा विचाराने माझ्या अकोल्याच्या शेजाऱ्यांकडे गेलो. त्यांच्या कडून सतीशचा जन्म दाखला आणावा म्हणून गेलो. काय कसं काय झाल्यावर त्यांना दाखला मागितला. त्यावर ते म्हणाले.” हा घ्या फोन, विजूभाऊंशी तुम्हीच बोला.” ही आणखी काय नवी भानगड असे पुटपुटत फोन घेतला. त्या विजूभाउंशी बोललो. त्यानी पुन्हा सगळी माहिती विचारून घेतली. स्पेलिंग, प्रत्येक नावाचे एकेक अक्षर उच्चारून लिहून घेतले.त्यांनी सांगितलेली फी शेजाऱ्यांकडे दिली. चार दिवसांनी फोन करा म्हणाले.

हे सगळे होईपर्यंत मे संपला, जून कधी उलटून गेला ते समजले नाही. जूलैही निघून गेला. फक्त अकोल्याहून विजूभाऊनी मात्र आठ दिवसात सतीशचा जन्म दाखला पाठवला. पण त्यात संजीवनीचे स्पेलिंग चुकले होते. पुन्हा फोन. पण त्यावर विजूभाऊंचे उत्तर,”स्पेलिंग चुकले तरी उच्चार तोच होतोय ना?” काय म्हणणार यावर आपण? चार महिन्यात एक कागद हाती आला. दरम्यान माझ्या जन्म दाखल्याचे. लग्नाच्या सर्टिफिकेटचे आणि विजय अण्णांच्या प्रतिद्न्यापत्राचे काय झाले त्याची वाचकांना उत्कंठा लागली असणार. पण आता मला अमेरिकेला निघणे भागच होते. त्यामूळे वाचकहो माझ्याबरोबर तुम्हीही अमेरिकेला चला!

मिळाली तेव्हढी कागदपत्रे घेऊन अमेरिकेत पोचलो.

अमेरिकेत येऊन तीन महिने मुक्काम झाल्यावर ग्रीन कार्डासाठी अर्ज दाखल करता येतो. पण त्या अगोदर तिथल्या पोलिस खात्याकडून माझ्यावर कोणतीही पोलिसी कारवाई झाली नाही, मी कोणताही गुन्हा केला नाही, अशा अर्थाचे एक प्रमाणपत्र लागते. डिसेंबर महिन्यात सतीशने माझ्यासाठी तसा अर्ज दिला. लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही रेडवूड सिटी पोलिस मुख्यालयात गेलो. आवश्यक ती फी भरलीच होती. अर्ज होताच. मला पाहिले, पासपोर्ट पाहिला. लगेच माझ्या नावावर कसलाही गुन्हा, बेकायदेशीर गोष्ट केल्याची कसलीही नोंद नाही, मी गुन्हेगार नाही असे सर्टिफिकेट त्यांनी एकही प्रश्न न विचारता ताबडतोब दिलेही!

सतीशने कागदपत्रांची यादी पाहिली. माझा जन्म दाखला मिळेल तसाच दाखल करायचा ठरले. कारण त्याबाबतीत जनामावशीचे तसे प्रतिद्न्यापत्र होते. सतीशचा जन्मदाखलाही मिळाला तसाच दाखल करायचा असे ठरले. सतीश माझा पुरस्कर्ता असल्यामुळे त्याला जी कागदपत्रे दाखल करायची होती ती त्याने जमवली. एका दिवसात. आता राहता राहिले माझ्या लग्नासंबंधीची कागदपत्रे. ती अजूनही सोलापूरहून आली नव्हती. त्या निबंधकाच्या ऑफिसात “वट्ट्ट्ट” असणाऱ्या माणसाचे कोणी ऐकले नाही. “असे प्रमाणपत्र आजपर्यंत कुणी मागितले नाही आणि आम्ही तसे ते देतही नाही” हे ठाम उत्तर निबंधकांनी दिल्याचे कळले.(कायद्याच्या कोणत्या कलमाखाली असे सर्टिफिकेट देता येते हे नमूद केले असूनही!) मग जगदिशने सुचविलेल्या एका वकीलाला हे काम दिले. त्या वकिलालाही तेच उत्तर निबंधकाने दिले.(वकीलानेही अशा अशा कलमाखाली,साहेब, तुम्ही असे सर्टिफिकेट देऊ शकता असे सांगितले नसणार). उलट वकीलालाच त्यांनी सांगितले की तुम्ही आमच्याकडे एक शॊध अर्ज करा, शॊध घ्या आणि प्रतिद्न्यापत्र करून द्या. वकीलाने तसे केले. पण त्यानेही एक चूक केलीच. काहीही आवश्यकता, गरज नसताना, आम्ही सांगितले नसतानाही, संजीवनीच्या पाठीमागे “लेट” असे लिहिले. विनाकारण नसते फाटे फोडायचे सगळ्यांनी ठरवले की काय वाटायला लागले. पुन्हा मुंबई, सोलापूरला फोनाफोनी. दुरुस्ती झाली. आता माझे लग्न झाले याचे प्रतिद्न्यापत्र विजय अण्णांकडून यायचे होतेच. श्याम आणि शैलाकडून घ्यायचे ठरले. सोलापूराहून एकही कागदपत्र आले नव्हते. दरम्यान फोनाफोनी चालूच होती.

माझ्या जन्मदाखल्यात अनेक चुका होत्या. त्यातील दोन चुका फक्त दुरुस्त होतील, आईचे नाव माझ्या पासपोर्टात आहे तसे(तेच बरोबर नाव होते तरीही) करून मिळणार नाही असे बरेच वेळा संगितले होते. पुन्हा खटपट, आपली बाजू मांडून सुनीलने पहिली. पण काही उपयोग झाला नाही. विजय अण्णांच्या प्रतिद्न्यापत्रात जणू काही दर वेळी नवी चूक करण्याचा निश्चयच केला होता की काय त्या तज्न्य माणसाने असे वाटायला लागले. आतापर्यंतच्या चुकांवर सर्वात मोठी कडी त्याने केली म्हणजे नवीन प्रतिद्न्यापत्रात वर्तमानपत्रात हेड्लाईन शोभावी एव्हढ्या ठळक अक्षरात “देअर इज टॉयलेट इन माय हाऊस” असे शीर्षक छापून मग पुढचा (तोही स्पेलिंगच्या चुका करून ) मजकूर लिहिला होता. निर्मळ ग्राम योजनेच्या नियमाप्रमाणे ते कुठल्याही प्रतिद्न्यापत्रावर आवश्यक केले होते म्हणे! तेही फक्त सोलापुरातच की काय! कारण पुण्या मुंबईत जी दुसरी दोन तीन ऍफिडेव्हिट करून घेतली होती तिथे कुणी असा “विधी” केला नव्हता. मग सोलापूरचा नाद सोडून दिला. मिळाला तसा माझा जन्म दाखला मागवून घेतला. तो आहे तसाच दाखल करायचे ठरवले होतेच. माझ्या ल्ग्नासंबंधीची दोन प्रतिद्न्यापत्रे श्याम आणि शैलाकडून करून घ्यायचे नक्की केले. यासाठी श्रीकांतने आणि स्मिताने खटपट केली. अखेर पाहिजे होती ती कागदपत्रे आली. आली पण केव्हा? मार्च महिन्यात! तीन चार दिवसात माझी वैद्यकीय तपासणी(म्हणजे रक्ताच्या चाचण्या, तीन चार लशी टोचून घेणे इ.) होऊन त्याचे रिपोर्टही हातात आले. आता सगळी कागदपत्रे, यादी करून सोबत माझी आणि सतीशची पूर्ण माहिती भरलेले अर्ज जोडून आणि आवश्यक त्या रकमेचा चेक लावून ते बाड सतीशने पाठवून दिले. तीन दिवसांनी ते मिळाल्याचे पोच-पत्र त्यांच्याक्डून आले. आठ दहा दिवसात ३ मे रोजी बोटाचे ठसे देण्यासाठी १२.१५ वाजता या असे पत्रही आले. बोटाचे ठसे दिले. लागलीच, तिथल्या तिथेच, तुमचे बोटाचे ठसे घेतले, पुढच्या कार्यालयात पाठवले अशा अर्थाचे पत्रही दिलेही! त्यानंतर आठ दहा दिवसांनी ग्रीन कार्ड मिळण्यासंबंधात तुम्ही मुलाखतीसाठी ३ जून रोजी सकाळी ८.२५ वाजता या ऑफिसात यावे असे पत्रही आले.त्यामूळे आता अजून पंधरा दिवस आहेत, यशचे बरेच फोनही आले,”तू केव्हा येणार? माझ्या कॉन्सर्टला यायला पाहिजेस “असे त्याचे फोन येत होते. सतीशकडे येऊनही बरेच महिने झाले होते. यदाकदाचित ग्रीन कार्ड मिळालेच(!) तर मग लगेच निघावे लागेल. असा सर्व विचार करून मी सुधीरकडे पंधरा दिवसांसाठी आलो. तिथला मुक्काम आटोपून सतीशकडे पुन्हा एक जूनला आलो. त्या दिवसापासूनच नव्हे मुलाखतीचे पत्र आल्यापासून काळजी, चिंता, धाकधुक वाढली होतीच. इंटरव्ह्यू कसा होईल याची काळजी, ताण आला होता, वाढतही होता.

सुधीर सतीश सारखे सांगत होते. साधा असतो हा इंटरव्ह्यू. जुजबी माहिती विचारतात, काळजी करू नका; असे सारखे सांगत होते. पण माझे मन ते माझे मन. “चिंतनात” मग्न! असो. आदल्या रात्री सतीशने सकाळी सात वाजता निघायचे असे सांगितले. सॅनफ्रॅन्सिस्कोला जायचे होते. सकाळी रहदारी फार. गर्दी असते. तेजश्रीने सांगितले, “विरळ म्हणत होता इंटरव्ह्यू अर्धा तास तरी चालतो”. पुन्हा माझ्या पोटात गोळा आला. इतका वेळ तोंड कसे काय द्यायचे! मी म्हटले, अरे, बराच वेळ असतो की हा प्रकार! सतीश शांतपणे म्हणाला, ” बाबा, तुमचा इंटरव्ह्यू एक तास चालेल,दहा मिनिटे चालेल.प्रत्येकाचे प्रकरण निराळे असते.” तीन जून उजाडला. मी पाच वाजताचा गजर लावला होता. उठलो. सगळे आटोपले. सतीश आणि मी निघालो. आणि त्या कचेरीत आठला पाच मिनिटे कमी असताना पोचलो. बाहेरच्या प्रवेशद्वारापासूनच सुरक्षिततेची तपासणी, ओळखपत्रांची तपासणी, सुरू झाली. आत गेलो तिथे तर याहूनही थोडी जास्तच तपासणी. पण हे सर्व साध्या नेहमीच्या आवाजात सौम्यपणे सांगत चालले होते. मग दुसऱ्या मजल्यावरील एका कर्मचाऱ्याला भेटलो. त्याने माझ्या अर्जावर काहीतरी लिहिल्यासारखे केले आणि तिसऱ्या मजल्यावर जाऊन थांबायला सांगितले. गेलो आणि वाट पहात बसलो. बरोबर ८.२०-२२ मिनिटांनी एक हसतमुख अधिकारी आला. “सडॅ, सडा..शिव्ह कॅमॅ..ट म्हणत आला. इतके नागमोडी उच्चार करायला लावणाऱ्या नावाचा दुसरा तिथे कुणीही(तामिळ, तेलगू) नव्हता. त्यामुळे आम्ही दोघे लगेच उठलो. त्याने आम्हाला त्याच्या पाठोपाठ यायला सांगितले. एक दोनदा डावीकडे, उजवीकडे करत त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. त्याने पुन्हा आमचे हसतमुखाने स्वागत केले. आणि वरदहस्त करत मी खरे सांगेन, खोटे सांगणार नाही खरे तेच सांगेन अशी शपथ घ्यायला लावली.(सांगू तेच खरे-मी). मग त्याने आमची ओळख पत्रे(माझा पासपोर्ट) पाहून आम्ही तेच आहोत याची खात्री करून घेतली. मी अर्जात माझी जी माहिती– जन्म तारीख, सतीशचा पत्ता, वय, वगैरे दिली होती तीच पुन्हा विचारून घेतली.लगेच किती मुले(सन्स) विचारले.

मी दोन मुलं(मुलगे) म्हणून सांगितले. नंतर एखादा प्रश्न विचारला. आणि पुन्हा विचारले किती मुले? मी दोन म्हणालो. चूक लक्षात आली. तो अर्जात पाहू लागल्यावर मी लगेच म्हणालो ऍन्ड वन डॉटर”. तो हसला आणि यस यस म्हणत अर्जावर बरोबर अशी खूण केली. सतीशलाही त्याने एखादाच प्रश्न विचारला असेल. लगेच त्याने तुम्हाला ग्रीन कार्ड मंजूर झाल्याचे सांगितले आणि तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत का असे विचारले. मी तर इतका मोकळा मोकळा, हलकाफुल्ल झालो होतो, ताण तणाव कुठे पळून गेले होते ते लक्षातही आले नाही. मला कसले प्रश्न असणार? सतीशने अखेर विचारायचे म्हणून विचारले की मग आता माझे बाबा परत जाऊ शकतील का? तो अधिकारी म्हणाला,” नाही. कार्ड प्रत्यक्ष हातात पडल्याशिवाय जाता येणार नाही.”आणि ते कार्ड दोन-तीन आठवड्यात येईल तुमच्या पत्त्यावर हेही सांगितले. लगेच त्याने एक छापील पत्रही दिले. माझे अभिनंदन आणि ग्रीन कार्ड तुम्हाला मिळाले असे सांगणारे ते पत्र दिले. ते घेतले आणि आम्ही थॅन्क्यू थॅन्क्यू म्हणत बाहेर आलो. सहज घड्याळाकडे पाहिले -फक्त दहा मिनिटे झाली होती!

चला, ग्रीन कार्डाच्या या प्रवासाला ंमी पुण्याहून निघण्या अगोदर फार पूर्वीपासूनच सुधीरने बाबा आता ग्रीन कार्डाच्या तयारीनेच या, मी आणि सतीश तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील आणि काय करावे लागेल ते सांगू, अशी सुरवात करून कामाला लावले. सतीशने मग सगळे तपशीलवार क्ळवले त्यापासून सुरवात झाली होती.. सतीशच्या धडपडीला,सुधीरच्या सुचनांना जगदीशच्या,सुनीलच्या, श्रीकांत आणि स्मिताच्या मेहनतीला, तसेच जनामावशी, श्याम आणि शैला यांनी केलेल्या सहाय्याला, मदतीला यश आले. माझ्यासारख्या ” सदंभटाचे तट्ट्टूटू अमेरिकेच्या गंगेत न्हाले”.

ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड. त्यामुळे कागदपत्रांची जमवा जमव करताना आलेले अनुभव आता मोठे विनोदी वाटतात! हसू येते.

पण सतीश म्हणतो त्याप्रमाणे, बाबा आपले सगळे रेकॉर्ड इतके सरळ, आणि कसल्याही गुंतागुंतीचे, बेकायदेशीर, वेडेवाकडे काही नसते. आपल्याला काय विचारायचे हा त्यानांच प्रश्न असतो!”त्यांनी आपल्यालाच ग्रीन कार्ड तुम्ही छापून घ्या असे सांगितले असते.” हेच खरे.