बर्फाचे वादळ चालू असतानाच माझा भाऊ कामावरून घरी यायला निघाला होता.बसची वाट पाहत तासभर थांबला पण बस येण्याचे काही चिन्ह दिसेना. बर्फाची वृष्टी वाढतच चालली होती. रस्त्यावर इतका बर्फ साचला होता. आणखी किती साचणार ते सांगता येत नव्हते. त्यातून पाऊलही पुढे टाकणे अशक्य होते.
भावाला बर्फातून चालणे अवघड होत चालले. बर्फ पडण्याचे थांबण्याचे एकही लक्षण दिसत नव्हते. भाऊ मोठ्या कष्टाने एक एक पाऊल कसे बसे टाकत चालत होता. चालणे कसे म्हणायचे त्याला. पाय ओढत राहिला. बर्फातून पाय ओढणेही मुष्कील होत चालले होते. थंडीने पार गारठून,गोठून गेला होता. एक वेळ अशी आली की त्याला एक पाऊलही उचलता येईना की सरकवता येईना. तरीही तो पाय ओढत होता. आणि अचानक तो कशाला तरी ठेचकाळून पडणारच होता. काय आहे पाहण्यासाठी खाली वाकला. बर्फ बाजूला करत पाहिले तर एक बाई पडली होती. त्याने तिच्या नाकाशी हात धरून पाहिले. छातीशी कान लावून ऐकू लागला. त्या स्त्रीने थोडीशी हालचाल केली. भाऊ इतका थकला होता की त्याला स्वत:लाच उभे राहणे कठिण झाले होते. पण त्याने त्या स्त्रीला आपली शक्ती लावून उचलले.
त्याला स्वत:ला उभे राहता येत नव्हते.त्यात त्या स्त्रीचे ओझे हातावर घेतलेले. त्याचा तोल गेलाच होता पण त्याने कसेतरी सावरले दोघांनाही. कोणी पडले नाही खाली. माझा भाऊ त्याचे पाय रोबोटसारखे सरकावत बर्फातून वाट काढत होता. अखेर एक इमारत दिसली. तिच्या व्हरांड्यात त्या स्त्रीला झोपवले. काही वेळाने तिने डोळे उघडले. भावाच्या मदतीने मागे सरकून भिंतीला टेकून बसली. भाऊ डोळे मिटून गप्प बसला होता. दम खात गप्प बसला होता.
ती बाई म्हणाली,”मी किती वेळ बर्फात पडले ते मला आठवत नाही .” भावाने फक्त हुं म्हटले. शक्तीच नव्हती त्याच्यात. थोड्या वेळाने दोघांनी आपले पत्ते आणि फोन नंबर दिले. बाई म्हणाली,” आता मी जाऊ शकते. तुम्हाला कसे वाटतेय?” भाऊ म्हणाला,” नकी तुम्ही जाऊ शकाल एकट्या? नाहीतर मी येतो तुमच्या सोबत.” पण बाई एकटी जाईन म्हणाली.
तीन चौक ओलांडले की आमचे घर होते. भाऊ सुद्धा निघाला. घरी आला; आल्यावर त्याने त्या स्त्रीची हकिकत सांगितली. स्वत:कडे यत्किंचितही श्रेय न घेता सांगितली. जेवणं झाल्यावर आम्ही त्याचे कौतुक केले. पण” त्यावेळी दुसरा कोणी तिथे असता तर त्यानेही हेच केले असते,” असे म्हणत तो त्याच्या खोलीतही गेला ! पण आमच्यासाठी आमचा भाऊ ‘हीरो’ होता !
कल्पना करा ऑफिसमध्ये पगाराच्या दिवशी त्याचे डोळे आश्चर्याने आणि आनंदानेही किती मोठे झाले असतील! त्याच्या पाकिटात पगाराबरोबर ५,००० डॉलर्सचा एक चेक होता! त्याच्या मोठ्या वरिष्ठाचे लहानसे पत्रही होते. त्याने लिहिले होते,”माझ्या बहिणीचे प्राण वाचवल्याबद्दल मनापासून आभारी आहे.”
आमचा भाऊ आहेच ‘हीरो’ !
[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]