Monthly Archives: April 2016

एक चूक…

स्वत:च्या उद्योगातून रिचर्ड फ्लेमिंग निवृत्त झाले होते. ते कामाची कागदपत्रे चाळत होते. तेव्हढ्यात फोन आला. “मि. फ्लेमिंग?” एका स्त्रीने सौम्य आणि मृदु आवाजात विचारले; पुढे म्हणाली,” मी डॉक्टर ब्राऊन यांची सेक्रेटरी लॉरेन बोलतेय. उद्या तुमची डॉक्टरांकडे अपॉइंटमेन्ट आहे त्याची आठवण करून देण्यासाठी आणि तुम्ही येणार याची खात्री करून घेण्यासाठी फोन केला””माझी उद्या अपॉइंटमेंट? डॉक्टर ब्रॉऊनकडे? आपल्या बायकोकडे पाहात फ्लेमिंग म्हणाले. “काय आहे? कुणाचा फोन आहे?”बायकोने अगदी हळू आवाजात विचारले. फोन थोडा बाजूला धरून,गोंधळून गेलेले फ्लेमिंग बायकोला विचारत होते,” मी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती? विसरलो की काय?”

डॉक्टर ब्राऊनकडे सहा महिन्यापूर्वी ते गेले होते. सगळ्या तपासण्या झाल्यावर डॉक्टरांनी सगळे ठीक आहे. काळजीचे कारण नाही असेही सांगितले होते. पण सहा महिन्यानंतर पुन्हा भेटा असे ते काही म्हणाल्याचे आठवत नव्हते. ते त्या सेक्रेटरीला म्हणाले, ” दोन मिनिट हां,प्लीझ !” इतके म्हणत ते आपली डायरी काढून उद्याची अपॉइंटमेंट आहे का पाहत होते. दिसली नाही. “नाही, लिहिलेली नाही. मला अल्झामेअर होतोय की काय?असे ते बायकोला हळूच म्हणत होते. ” माझी अपॉइंटमेन्ट खरीच आहे, नक्की?” त्यांनी सेक्रेटरीला विचारले. “तुम्हीच रिचर्ड फ्लेमिंग ना?” त्या बाईच्या आवाजात आता थोडा त्रागा आणि करडेपणा होता. “हो, अर्थात मीच रिचर्ड फ्लेमिंग.” फ्लेमिंगनी नरमाईने सांगितले. “हे बघा फ्लेमिंग, माझ्याकडे तुमची नऊ वाजताची अपॉइंटमेंट लिहून ठेवलेली आहे.” “लॉरेन, खरं सांगायचे म्हणजे, अशी अपॉइंटमेंट घेतल्याचे मला तरी आठवत नाही,” कबूली दिल्यासारखे ते बोलत होते.” हे बघा मि. फ्लेमिंग,” तिच्या आवाजातला पहिला गोडवा अणि सौम्यपणा कुठच्या कुठे गेला होता, ती मोठ्या आवाजात बोलत होती, “न्यूयॉर्कमध्ये ज्या डॉक्टरांकडे पेशंटची गर्दी असते आणि महिना महिना अगोदर नंबर लावावा लागतो अशा प्रख्यात हृदयरोगतज्ञ डॉक्टरांपैकी डॉ.ब्राऊन आहेत. माझ्याकडे बरेच पेशंट त्यांचा नंबर कधी लागेल याची वाट पाहत आहेत. तुम्हाला उद्या यायचे नसेल तर तसे आताच मला सांगा. इथे खूप गर्दी आहे. ताबडतोब सांगा. वेळ नाही.” “काय करू? बायकोला ते विचारत होते. अपॉइंटमेंट असेल तर जा.” बायको तरी दुसरे काय सांगणार? ” बराय, मी उद्या येतो,” रिचरड फ्लेमिंग अखेर कबूल झाले.”ठीक आहे, उद्या या तुम्ही. बऱ्याच चाचण्या कराव्या लागतील, तुम्हाला माहितच आहे. काळजी नका करू. आराम करा आज.” बाईच्या आवाजात पुन्हा व्यावसायिक गोडवा आला होता.
पण रिचर्ड फ्लेमिंगचे चित्त काही ताळ्यावर नव्हते. दिवसभर ते आपण अपॉइंटमेंट कशी विसरलो, हे अल्झायमरचेच लक्षण असणार, आपल्या एका मित्राला असेच होत होते आणि परवा त्याचे तेच निदान झाले हे त्यांना माहित होते. काहीही व्हावे पण तो अल्झायमर नको असे ते स्वत:शीच प्रार्थना केलासारखे बोलत होते. उद्या डॉक्टरांना हेही विचारून घेऊ असे त्यांनी ठरवले.

दुसरे दिवशी सकाळपासून त्यांच्या बऱ्याच चाचण्या आणि तपासण्या झाल्या. रिचर्डच्या मनात, हे झाले की डॉ. ब्राऊनना अल्झामेअरचे विचारायचे हेच होते. त्यांचे सगळे रिपोर्ट्स डॉ. ब्राऊन वाचत होते, बऱ्याच विचारात असल्यासारखे ते दिसत होते. काही वेळाने ते रिचर्ड फ्लेमिंगकडे आले आणि एकदम म्हणाले,”अगदी वेळेवर आलात तुम्ही मि.फ्लेमिंग. तुमचे नशीब चांगले की आज तुमची अपॉइंटमेंट होती ते ! तुमच्या रिपोर्ट्स वरून तुम्हाला लवकरात लवकर हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागेल. तुमचे रिपोर्ट्स मी तज्ञ सर्जनकडे पाठवतो. ते तुम्हाला नक्की दिवस सांगतील. पण बरे झाले तुम्ही आज आलात ते,नाही तर फार गंभीर परिस्थिती झाली असती.”

डॉक्टरांचे आणि रिचर्ड फ्लेमिंगचे बोलणे चालले असताना बाहेर ऑफिसमध्ये सेक्रेटरीच्या टेबलापाशी एकाजण तावातावाने,” रिचर्ड फ्लेमिंग आधीच आत डॉक्टरांच्या खोलीत आहे अस्ं कसे काय म्हणता? अहो,हा मी रिचर्ड फ्लेमिंग हा तुमच्या समोर आहे.” सांगत होता. शेजारी उभी असलेली नर्स्, तिला आपण हळू बोलतोय असे वाटत होते,ती म्हणत होती,”हल्ली डॉक्टरांकडे नंबर लावण्यासाठी लोक काय काय सोंग्ं करतील नेम नाही.” पण ते त्या माणसाने ऐकले असावे. तो लगेच उसळून, आपल्या खिशातून एक एक करत कागदपत्रे काढत म्हणाला, ” हे पहा माझे ड्रायव्हिंग लायसन्स, ही माझी क्रेडिट कार्डं,”असे चिडून म्हणत ते सगळे पुरावे त्याने टेबलावर टाकले. “पाहा, ह्या पेक्षा, मीच रिचर्ड फ्लेमिंग आहे ह्याचा दुसरा पुरावा काय पाहिजे?” “आणखी हे पाहा, तुम्हीच मला दिलेले तुमचे अपॉइंटमेंटचे हे कार्ड, बोला आता! आत कोण रिचर्ड फ्लेमिंग म्हणून घुसला आहे ते पाहा”

सेक्रेटरीने आपल्या कपाटातून काही फाईली काढल्या. आणि तिला रिचर्ड फ्लेमिंग नावाच्या दोन फाईली दिसल्या. एक रिचर्ड होता मॅनहॅटनचा. तोच संतापाने बाहेर ओरडत होता.
दुसरा रिचर्ड फ्लेमिंग ब्रुकलिनचा. तो आत डॉक्टरांकडे होता. त्याच्या गंभीर हृदयविकाराचे निदान आताच झाले होते!

सेक्रेटरीने चुकीने ब्रुकलीनच्या फ्लेमिंगला फोन करून आठवण करून दिली ! पण तिच्या त्या एका चुकीने, चुकीच्या असू दे पण आवश्यक होते त्या रिचर्ड फ्लेमिंगचे रोगनिदान वेळेवर झाले. त्याचे प्राण वाचले!

… विसर न व्हावा… टायटस ब्रॉम्ले

टायटस आणि ॲनी ज्युबिली गावाबाहेर एका झोपडीत राहात होते. अतिशय मोडक्या तोडक्या, पूर्वी कधीतरी झोपडी असेल अशा लहान छपराखाली ते दोघे राहत होते. थोडक्यात म्हणजे ते अतिशय गरीब होते. पण स्वत:चे पोट भरण्याची जिथे मारामार तिथे हे ब्रॉम्ले गावातल्या कोणत्याही भटक्या कुत्र्या मांजराला सांभाळत असत. लोकांना याचेच मोठे आश्चर्य वाटे. त्यांची ही हौस म्हणायची की आपल्यासारखेच जीवन जगणाऱ्याविषयी सहानुभुती म्हणायची! का, “गरीबच गरीबाला मदत करतो ” त्याचाच हा भाग ? त्यांच्या त्या छपरात वीज नव्हती की पाणी नव्हते. टायटस आणि त्याची बायको ॲनी आपल्या जुनाट, सगळ्या प्रकारचे आवाज काढणाऱ्या, खडखडत संथ गतीने ज्युबिली सारख्या गावातही ट्रॅफिक जाम करणाऱ्या मोडक्या ट्रक मधून आमच्याकडे सटी सहामाशी कधी तरी येत. ते दोघे फाटकापाशी आले की आम्हा सगळ्यांना लगेच जाणवायचे. कारण त्यांचा तो महाभयंकर घाण वास ! शब्दात सांगता येणार नाही इतका त्यांच्या अंगाला, कपड्यांना विलक्षण वास यायचा. ते जे अंगात घालत त्यांना कपडेही म्हणता येत नसे. पार फाटके, ठिगळे लावलेले; त्यातली काही ठिगळेही फाटलेली!

त्या काळी आपल्या अंत्यकाळाची व्यवस्था अगोदरच करून ठेवण्याची पद्धत नव्हती. पण आपल्या गरीबीमुळेच की काय टायटस आणि ॲनी आमच्या ‘घरी’ येऊन एखादा डॉलरही भरणार नाही इतकी चिल्लर आणून देत. माझे बाबा मात्र त्या दोघांना इतरांसारखेच आदबीने वागवत. टायटस खुर्चीवर बसलेला आणि शेजारी त्याच्यासारखीच अवघडून गेलेली ॲनी स्वत:ला अगदी बारिक करून बसलेले असत. त्याने दिलेली चिल्लर बाबा न मोजता ड्रॉवरमध्ये ठेवीत. पण कशी? टायटस आणि ॲनी यांचा मान राखत, मोठी रक्कम हाताळतोय ह्या भावनेने ते चिल्लर खणात ठेवीत. वडिलांना, टायटस इतकी लहान रक्कम तरी कुठून आणि कशी जमवतो हे कोडे कधी सुटले नाही.
एक्दा मी बाहेरून घरी आले. मी एकदम मोठ्याने म्हणाले,” अरे देवा! कुणी मेलं बिलंय की काय? बाबा लगेच म्हणाले, ‘मेलेल्या माणसाचा वास येत नाही. आणि आपल्या इथे तर कधीच येत नसतो.” त्यांचे म्हणणे खरे होते.माझ्या बाबांचे कामच इतके स्वच्छ सुंदर असायचे!
टायटस वारला तेव्हा त्याच्या देहावर प्रसाधनाचे काम करता करता बाबा आणि त्यांचे मदतनीस पार थकून गेले. टायटसला स्वच्छ करणे आणि नीटनेटके करणे अतिशय जिकिरीचे आणि मोठे कसबी कौशल्याचे होते. बाबांनी त्याची दाढी कापायला घेतली. ते काही इतके सोपे आणि साधे काम नव्हते.पण किती वर्णन करायचे! अखेर तेही काम आटोपले. बऱ्यापैकी पण त्याला शोभतील असेच कपडे घातले. दाढी काढल्यावर टायटस बरा दिसू लागला होता.टायटस असा स्वच्छ आणि व्यवस्थित कधीही दिसला नव्हता. अखेर त्याच्यावरचे सर्व सोपस्कार आटोपल्यावर टायटसच्या ॲनीला आत बोलावले. तिनेही आज बरे म्हणावेत असे कपडे घातले होते. तिच्या अंगाचा आणि कपड्यांचा वास येत होता.पण नेहमीपेक्षा कमी होता. ॲनीला माझ्या बाबांनी चॅपेल मध्ये नेहमीच्या गांभीर्याने आणले. ॲनी आत आली. प्रयत्न करूनही बिचारीच्या चेहऱ्यावरील भेदरलेला भाव फारसा कमी झाला नव्हता. तिने शवपेटीत पाहिले. बाबांकडे वळून पाहिले आणि म्हणाली,” हा माझा नवरा नाही. टायटस नाही. त्याचे काय झाले? टायटस कुठे आहे?” माझ्या बाबांना धक्काच बसला. पहिल्यांदाच त्यांना अशी प्रतिक्रिया ऐकायाला मिळाली होती. ते सावरून तिला म्हणाले,”ॲनी, हा तुझा नवराच, टायटसच आहे.” “नाही! नाही हा टायटस नाही. मला माहित नाही हा कोण आहे ते. पण टायटस नाही हे नक्की. असे म्हणून ती अवती भोवती जणू टायटस दिसतो का कुठे अशा भावनेने पाहू लागली. बाबांनी पुन्हा समजून सांगितले. त्याची दाढी काढली चांगला स्वच्छ नेटका केलाय त्याला. पण तिची खात्री पटेना. त्यांनी तिला खुर्चीत बसवले. ते लागलीच आमच्या ऑफिसमध्ये गेले. तिथे तिचे दोन भाऊ होते. त्यांना घेऊन आले. त्या दोघांनाही शवपेटीतला टायटस दाखवला. तेही प्रथम चमकले. पण त्यांनी बराच वेळ निरखून पाहिल्यावर त्यांची तो देह म्हणजे टायटसच आहे ह्याची खात्री पटली. त्यांच्या कुटुंबातली एक बाईही आली. तिने आणि त्या दोन्ही भावांनी तिला सर्व समजावून सांगितले. अखेर तो टायटसच आहे अशी तिची खात्री पटली!

माझे बाबा कधीही पैशाकडे पाहून काम करीत नसत.रोजच्या व्यवहारातही ते माणसा माणसात भेद करीत नसत. अतिशय मनापासून काम करणारे. मृतव्यक्तीचा आणि दफनभूमीत विश्रांती घेत असलेल्यांचाही ते फार मान ठेवीत. ह्या प्रसंगामुळे ते गंभीर दिसत होते. सर्व आटोपल्यावर ते बराच वेळ एकटे शांत बसलेहोते.
ज्यासाठी आयुष्यभर टायटसने आणि ॲनीने अट्टाहास केला होता तो टायटसचा शेवटचा दिस गोड झाला.

[Based on story from the book: The Undertaker’s Daughter]

विसर न झाला

‘अंडरटेकरची मुलगी ‘ केट मेफिल्डने आपल्या पुस्तकात ज्यांचा ‘विसर न झाला’ अशा काही जणांविषयी स्मरणलेख लिहिले आहेत. त्यापैकी काही आपण वाचू या.

” एका पाठोपाठ एक त्या बायका आमच्या ‘त्या घराच्या’ चॅपेलमध्ये येत. त्या आल्या की लव्हेंडरचा सुगंध सगळीकडे पसरे. काळ्या हॅट घातलेल्या काळ्या मैना खुर्च्यांवर विराजमान होत. त्यांच्या पोषाखाच्या कडा, बाह्यांच्या कडा, कॉलर्स काळ्या फितींनी सजवलेले असत. काही जणींचे चेहरे सुरकुतलेले असले तरी पावडर लावलेले असत. फिकट का होईना बहुतेक जणींचे ओठ लिप्स्टिकने रंगलेले असत. विधवा झाल्या म्हणून काय,अखेर त्याही स्त्रियाच होत्या.
ह्या स्त्रियांपासून थोड्या अंतरावर मिसेस फॉक्सवुड उभी असते. त्या सर्वांना ती ओळखत असते. पण ती अजून त्यांच्यातली झाली नव्हती.

मी फॉक्सवुडबाईला चांगली ओळखत होते. का ओळखणार नाही? चांगले एक वर्षभर रविवारच्या शाळेत ती आम्हाला शिकवायला होती. माझ्या आयुष्यातले ते सर्वात मोठे लांबलचक वर्ष होते ते. आता मला वाटते, त्या वर्षात तीनशे पासष्ट महिने असावेत ! फॉक्सवुड देवाशी मोठ्या आवाजात बोलत असे. तिची प्रार्थना ऐकण्यापेक्षा पाहण्यासारखी असे ! ऐकण्याऱ्या कुणालाही ‘त्या सम तीच’ वाटणारी अशी असे.

प्रथम दोन्ही हात वर करून डोके थोडे मागे नेऊन ती आपले डोळे उघडायची. प्रार्थनेला सुरवात करायची तसे तिचे डोळे मोठे रुंदावत, इतके मोठे मोठे होत जायचे की जणू काही चर्चच्या छतातून फॉक्सवुडबाईला आरपार स्वर्ग दिसू लागलाय ! बाई मोठ्या आवाजात थँक्यू देवा थँक्यू प्रभो थँक्यू म्हणायला लागायची तशी बाईंची मान मागे मागे अकॉर्डियन वाद्याप्रमाणे लांब लांब होत जायची! कोणत्याही नाठाळ घोड्याला गुडघे टेकवायला लावेल अशी आमच्या बाईंची प्रेक्षणीय आणि ठणठणीत प्रार्थना असे!

रविवारच्या शाळेत वर्षभर दर रविवारी मला तिची ही प्रार्थना पहायला आणि ऐकायला मिळत असे.
फॉक्सवुड जोडपे काटकसरीने राहात असे. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांची कशाच्या बाबतीत कसलीही कुरकुर नसे की तक्रार नसे. दोघांचा साठ वर्षांचा संसार असाच चालू होता. मिसेस फॉक्सवुड रविवारच्या शाळेत तिच्या त्या नामांकित प्रार्थनेत नेहमी देवापाशी तिच्या नवऱ्याला, “अक्बर्टवर देवा तुझी कृपा असू दे” अशी विनवणी करीत असे. बाईंची लांबलचक्, न संपणारी प्रार्थना चालू असे आणि इकडे माझे देवापाशी इतकेच मागणे असे की “देवा मिसेस फॉक्सवुडची प्रार्थना कधी थांबेल? मला भूक लागली आहे, झोप येतेय रे, आणि जोराची शू ही लागलीय देवा!”
मिसेस फॉक्सवुड अशी ठणठ्णीत प्रार्थनेची तर मि. फॉक्सवुड शांत शांत गप्प. चेहरा सुरुकतलेला, आकसलेला. नेहमी अंग चोरून असल्यासारखा त्याचा बांधा होता. चेहऱ्याप्रमाणे कपडेही चुरगळलेले.

यथावकाश मि. अल्बर्ट फॉक्सवुड वारला. आणि त्याचा मृतदेह माझ्या वडिलांनी नीटनेटका करून दर्शनासाठी आमच्या चॅपेल मध्ये ठेवला. पण रीतीप्रमाणे इतर बाहेरचे लोक येण्या अगोदर बराच वेळ आधी घरच्या लोकांसाठी राखून ठेवलेला असतो.

मिसेस फॉक्सवुड आल्या. त्यांना घेऊन माझे वडील चॅपलमध्ये आले. थोडा वेळ बाईंच्या बाजूला उभे राहिले आणि लगेच बाहेर आले. त्यावेळी मी तिथेच जवळ कुठे होते वाटते. वर जाण्यासाठी मी निघाले तर किंचित उघड्या दरवाजातून मला बाई दिसल्या. त्यांची माझ्याकडे पाठ होती. आजपर्यंत चर्चमध्ये जातानाचे त्यांचे पोषाख मला माहित होते. पण आजचा पोषाख काळा होता. मला वाईत वाटले. साठ वर्षे ज्याच्या बरोबर काढली तो आज सोडून गेला. साठ वर्षांचा साथीदार आज आपल्या बरोबर नाही. किती दु:ख झाले असेल बाईंना. हेच विचार माझ्या मनात चालू होते. मी वरच्या मजल्यावर जायला निघाले. इतक्यात फॉक्सवुडबाईंनी आपले हात वर आकाशाकडे नेल्याचे पाहिले. बाईची प्रार्थना सुरू होणार हे माझ्या लक्षात आले. मला राहवेना. मी तिथेच थांबले. त्यांची ती खास प्रार्थना ऐकायला मिळणार म्हणून मी थांबले.

“हे परमप्रिय प्रभो ! देवा ! थँक्यू, देवा, थँक्यू प्रभो अखेर आज तू ह्या मरतुकड्याला जमिनीत गाडलेस !थँक्यू थँक्यू देवा !”

फॉक्सवुडबाईंची मी ऐकलेली ही सगळ्यात लहान प्रार्थना !

[Based on a story from the book: The Undertaker’s Daughter]

जोडी जमली

१९१९ साल असावे. माझ्या आजोबांचे शिक्षण नुकतेच संपले असावे किंवा संपण्याच्या बेतात असावे. अजून त्यांना कुठे काम मिळत नव्हते आणि त्यात लग्नही झालेले. त्यांच्या आईचे झेकोस्लोवाकियातील कोसाइव्ह गावात एक दुकान होते. आईच्याच दुकानात ते काही काम करत असत. पण आई तरी असा कितीसा पगार देऊ शकणार? दुकानावर दोन घरे पोट भरू शकत नव्हती. नाईलाजाने आईने,” तू आता काहीतरी स्वतंत्र काम बघ, बाबा ” असे सांगितले.

आजोबांनाही स्वत:च्या पायावर उभे राहावे असे वाटतच होते. आपल्यापाशी धडाडी आणि धंदा करण्याची आवडही आहे हे त्यांना माहित होते. त्या दृष्टीने कोणता व्यवसाय करायचा आणि सध्या कोणत्या धंद्यात वाव आहे याची त्यांनी चाचपणी सुरू केली.

पहिले महायुद्ध नुकतेच संपले होते. झेकोस्लोव्हाकियात अन्नधान्य आणि जवळपास सर्वच गोष्टींचा फार तुटवडा पडला होता. कातड्याच्या वस्तूंचे तर अतिशय दुर्भिक्ष्य होते. चांगले आणि टिकाऊ बूट मिळणे दुरापास्त होते. गरजेपोटी लोक जाड पुठ्ठ्याचे आणि जाड कागद भरलेले बूट वापरत होते. लोक तरी काय करणार? मिळेल ते वापरत होते.

माझ्या आजोबांच्या लक्षात आले, हीच वेळ आहे ह्या धंद्यात उतरण्याची. त्याकाळी फार मोठी रक्कम वाटावी असे ५००० क्रोनिनचे कर्ज त्यांनी काढले. ते एका मोठ्या शहरात गेले. तिथे बुटांच्या ठोक व्यापाऱ्यांकडे अनेक खेटे घातले. अखेर त्यांच्या मनासारखा व्यवहार झाला. त्यांना मिलिटरीचे दणकट आणि टिकाऊ बूट मिळाले होते. दगदग झाली खरी पण आपले काम फत्ते झाले ह्या समाधानात ते घरी परत आले. लोक बुटांवर आधाश्यासारखी झडप घालतील आणि आपला माल हातोहात खपेल याची त्यांना खात्री होती.

आजोबांचा चेहरा कसा झाला असेल? तो कल्पनेनेही माझ्या डोळ्यांसमोर येतो. मोठ्या उत्साहाने त्यांनी मोटारीतली खोकी उघडून सगळ्यांना दाखवायला सुरवात केली. आणि त्यांचा चेहरा इतका रडवेला झाला की ते आता केव्हाही मोठ्याने रडायला सुरवात करतील!

ते वर्णन करत होते त्या मिलिटरीच्या टिकाऊ आणि दणकट बुटांच्या पाचशे जोड्या ऐवजी तिथे फक्त एक हजार उजव्या पायाचेच बूट होते! काय झाले असेल आजोबांच्या मनात त्यावेळी! कर्ज काढून केलेल्या पहिल्याच व्यवहारात असा जबरदस्त फटका!

आजोबा, हृदयाला पीळ पडेल असे हुंदके देत देत खाली मान घालून तोंड दाबून रडत होते. उजव्या पायाच्या एक हजार बुटांची रांग त्यांच्याकडे छद्मीपणाने बघत हसत होती ! डाव्या पायाचा एकही बूट त्यात नव्हता. हे बूट कवडी किमतीचे नव्हते. मित्रांकडून, नातेवाईकांकडून शेजाऱ्यांकडून ओळखीच्या लोकांकडून काढलेले मोठे कर्ज आता कसे फेडायचे हा प्रश्न त्यांना भेडसावत होता. आपल्या बायकोमुलाचे पोट कसे भरायचे, लोकांना तोंड दाखावायलाही आता जागा नाही असे विचार त्यांच्या मनात एकापाठोपाठ एक येऊ लागले.

” ताबडतोब शहरात जा. त्या व्यापाऱ्याला गाठ आणि त्याच्याकडून पैसे वसूल कर. सोडू नकोस त्याला आता,” असे सगळेजण त्यांना सांगू लागले.

माझे आजोबा पुन्हा त्या मोठ्या शहरात गेले. त्या व्यापाऱ्याला गाठायला गेले तर काय! त्याचा पत्ता नाही. इतर एकाही व्यापाऱ्याला त्याची काहीही माहिती नव्हती. माझे आजोबा सगळ्या शहरात भटक भटक भटकले पण त्या भामट्याचा त्यांना कुठेही ठावठिकाणा लागला नाही. अगदी निराश, हताश होउन ते माघारी आले.
आजोबा काही दिवस उदास होउन खिन्न बसायचे. एके दिवशी आजी त्यांना म्हणाली, ” अहो असे बसून कसे चालेल? त्या सदगृहस्थाकडे तरी जाऊन या. सगळे त्यांचे नाव घेतात. सत्पुरुष आहे म्हणे. काहीतरी उपाय सांगेल. जा तरी एकदा त्यांच्याकडे.” त्यांनी आजीचे ऐकले. त्या सत्पुरुषाकडे गेले. तिथे गेल्यावर आजोबांना एकदम रडेच फुटले. थोडे शांत झाल्यावर त्यांनी आपली सगळी कर्मकहाणी सांगितली. प्रथम ते साधुपुरुष काही बोलले नाहीत. पण त्यांना आजोबांच्या सरळपणाची, धडपडीची जाणीव झाली असावी. ते त्यांना दयार्द्र बुद्धीने इतकेच म्हणाले,” हे बघ मुला, देवाची मनापासून करुणा भाक. अत्यंत तळमळीने त्याची प्रार्थना कर. सध्या तरी मला इतकेच सांगता येते.” त्या साधुपुरुषाच्या शब्दांतून दया ओसंडत होती असे आजोबांना वाटले.

आजोबा देवळात गेले आणि प्रार्थना करू लागले. त्यांना दुसरे काही सुचेनासे झाले. जवळपास त्यांनी स्वत:ला कोंडूनच घेतले. किती दिवस ते देवळात जात असतील सांगता येत नाही. जायचे, प्रार्थना करायला बसले की डोळ्यांतून अश्रू ओघळायचे. प्रार्थना चालूच असायची. आपल्या भोवती काय चालले आहे, कोण आले, गेले ते त्यांच्या ध्यानीही नसायचे. त्यांना पाहून इतर भाविकही अगदी आवाज न करता जात असत.

आपले झालेले नुकसान आणि सर्वनाश ह्या विचारातून ते बाहेर आले असतील का नाही ते माहित नाही. पण प्रार्थना करताना इतर कशाचेही भान नसायचे हे खरे; नाहीतर एक नवखा माणूस आला आणि एका कोपऱ्यात जाऊन हुंदके देतोय हे त्यांना ऐकू आले असते. पण बराच वेळ त्यांना काहीच ऐकू आले नाही. नंतर मात्र तो माणूस मोठ्यानी हुंदके देत रडू लागला तेव्हा त्यांनी त्याच्याकडे पाहिले. त्या माणसाला ते ओळखत नव्हते. पण त्याचे ते रडणे ऐकून मात्र त्यांना राहवेना. देवळात ते एकटेच होते. ते उठले आणि त्याच्या जवळ गेले. आपण काय मदत करू शकणार त्याला असेच त्यांना मनात वाटत होते. पण आजोबांनी त्याला शांत करत त्याची विचारपूस केली. त्याला काही मदत हवी का असे विचारले. त्यावर तो माणूस रडक्या आवाजातच म्हणाला,” मला कोणीही मदत करू शकणार नाही. अहो मी फार मोठे कर्ज काढून धंद्यात ओतले हो! पण माझे दुर्दैव असे की त्या चोर व्यापाऱ्याने मला साफ गंडवले. सपशेल बुडवले. मला वाटत होते की मी मिलिटरी बुटाचे पाचशे जोड विकत घेतले. पण पाहतो तो काय?

सगळ्या खोक्यांत फक्त डाव्या पायाचे एक हजार बूट निघाले !” इतके सांगून भकास नजरेने तो माझ्या आजोबांकडे पाहात राहिला. रडून रडून दोघांचेही डोळे लाल झाले होते. पण आजोबांच्या डोळ्यांत मात्र आनंदाचे अश्रू दिसू लागले. ते त्या माणसाला म्हणाले, ” माझ्या दोस्ता, तुझ्यासाठी एक आनंदाची खबर आहे .”

माझे आजोबा आणि नव्याने झालेल्या मित्राने भागीदारीत बुटांचा व्यवसाय सुरू केला. ते दोघे जोडीदार झाले. बुटांच्या जोडांसारखी त्यांचीही जोडी छान जमली.

पुढे माझे आजोबा, ॲरोन लेझर, हे नामांकित उद्योजक झाले. खूप श्रीमंतही झाले. झेकोस्लोव्हाकियाच्या आर्थिक जगातही त्यांनी मोठ्या मानाचे स्थान मिळवले!

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]