अलेक्स्झँडर जी. टेरिक्स हे मूळचे हंगेरियन. त्यांचा जन्म हंगेरीत, बुडापेस्ट येथे झाला. १९३६ साली बर्लिनमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये हंगेरीने वॉटर पोलोचे सुवर्ण पदक जिंकले. ऑलिंपिक विजेत्या वॉटर पोलो संघात टेरिक्स होते. त्या संघातील ते सर्वात वयाने लहान, तरूण होते. ते महत्वाचे खेळाडू होते.
सुवर्ण पदकासाठी झालेल्या सामन्यात त्यांचा प्रतिस्पर्धी, जर्मनीचा संघ होता. तोही मोठा बलवान तुल्यबळ होता. म्हणूनच हा सामना बरोबरीत सुटला ! किंवा त्या सामन्यात टेरिक्सना घेतले नव्हते म्हणूनही असेल !
पण स्पर्धेतील गोलसंख्येच्या सरासरीमुळे हंगेरी विजेता ठरला. इथे टेरिक्स यांचे महत्व सिद्ध होते. त्यांच्या गोलची सरासरी जास्त ठरली कारण माल्टाच्या संघाविरुद्ध खेळताना हंगेरीने माल्टाला ९ // ३ अशा फरकाने हरवले होते. आणि त्यातले ६ गोल एकट्या टेरिक्सने केले होते. याही पुढची गंमत म्हणजे हंगेरीने टेरिकसला ह्या एकमेव सामन्यात खेळवले होते ! एका अर्थी टॅरिक्स्च्या ह्या सहा गोलमुळेच हंगेरीने सुवर्ण पदक पटकावले !
पण ह्याहीपेक्षाही हंगेरीच्या संघाचा मोठेपणा दाखवणारी गोष्ट माल्टाविरुद्ध खेळताना घडली. सामना चालू असतानाच माल्टाचा एक खेळाडू घेरी येऊन पाण्यात बुडाला. त्याला वर काढले. नंतर तो उपचारने बचावलाही. पण संघातील एक खेळाडू कमी झाला. त्याकाळी बदली खेळाडू घेऊन खेळण्याची परवानगी नव्हते. हंगेरीने काय करावे? त्यांनी आपल्या संघातील एक खेळाडू आपणहून कमी केला !
“त्यावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांचा येव्हढा कडकडाट केला ! तेव्हढ्या टाळ्या आमच्या संघाला सुवर्णपदक मिळाले तेव्हाही पडल्या नसतील!” टेरिक्स ही आठवण सांगताना म्हणाले.
त्याच “ऑलिंपिक ग्राम”मध्ये टेरिक्स आपणहून अमेरिकेचा महान क्रीडापटू जेसी ओवेनला भेटायला हुडकत हुडकत गेले होते. “फार उत्तम माणूस ! अणि अतिशय सुंदर ॲथलिट ! लांब उडी मारताना अगोदर जी धाव घ्यायचा ती पाहण्यासारखी असे. एखाद्या चित्त्यासारखा तो धावत येत असे ! ” तिथली आणखी एक आठवण सांगताना ते म्हणत होते.
“हिटलरला भेटलात की नाही तुम्ही बर्लिनच्या ऑलिंपिकमध्ये?” “नाही, त्यावेळी भेट झाली नाही. पण विद्यापीठ संघांच्या १९३९ मध्ये झालेल्या वेळी मी हिटलरच्या अगदी जवळ होतो. हिटलर माझ्याशी काही बोलला नाही. आमच्या हंगेरीच्या संघाने जर्मनीच्या संघाला ९//३ ने हरवले होते ! आणि त्यात मी जर्मनीच्या विरुद्ध सात गोल केले होते ! त्यामुळेही हिटलरला माझ्याशी बोलायचे नसावे.” हसत हसत ते सांगत होते.
हंगेरीच्या लोकांना वॉटर पोलोचे फार वेड. त्यामुळे अलेक्झँडर जी. टेरिक्स म्हणजे “ॲलेक्स्” हे आजही हंगेरीचे हिरो आहेत. त्यामुळेच लंडन येथे झालेल्या २०१२च्या ऑलिंपिक्समध्ये हंगेरीने त्यांचा मोठा सन्मानपूर्वक गौरव केला होता.
टेरिक्स हे बांधकाम उभारणीचे म्हणजेच वास्तुरचनाशास्त्र अभियंते. ते कॅलिफोर्नियाच्या बर्कले विद्यापीठात शिकवत असताना प्रा. जेम्स केली यांच्याबरोबर त्यांनी भूकंप निरोधक असे शॉक ॲब्सॉर्बर्स तयार केले. ते बेस आयसोलेशन शॉक अब्सॉर्बर्स सिस्टीम म्हणून ओळखले जातात. असे शॉक ॲब्सॉर्बर्स तयार करण्याचे अभियांत्रिकांचे शेकडो वर्षांचे स्वप्न होते. जपानमध्ये तीन हजारापेक्षा जास्त इमारती भूकंपाच्या धक्क्यांना इमारतीपासून एकाकी पाडणाऱ्या शॉक ॲब्सॉर्बर्सवर उभ्या आहेत. १९७० मध्ये टेरिक्सने प्रा. जेम्स केली बरोबर तयार, विकसित आणि प्रत्यक्षात आणलेल्या भूकंपविरोधी ५३०, शिसे आणि रबर ह्यापासून बनवलेले, बेस आयसोलेशन शॉक ॲब्सॉर्बर्स सॅन्फ्रान्सिस्कोच्या सिटी हॉलच्या इमारतीच्या तळाशी बसवले आहेत. हे काम १९९८मध्ये झाले. भूकंपाच्या धक्क्यांपासून बचाव करण्यासाठी इमारतीचा भक्कमपणा आणि मुख्य म्हणजे सुरक्षितता वाढते.
ह्या यशानंतर टेरिक्स आणि जॉन रीड ह्यांनी एक वास्तुरचना अभियांत्रिकी कंपनीच काढली. त्यांच्या कंपनीने सॅन्फ्रॅन्सिस्कोच्या रेल्वेची म्हणजेच बार्टची पाच रेल्वे स्टेशने बांधली , कॅलिफोर्नियाचे सॅन्फ्रॅन्सिस्को युनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॉलेजच्या इमारती आणि वीसपेक्षा जास्त शाळाही बांधल्या.
भूकंप निरोधक शॉक ॲब्सॉर्बर्स तयार करणारे , उत्तम अभियांत्रिकी आणि यशस्वी उद्योजक म्हणून ते ओळखले जात असले तरी टेरिक्स हे आयुष्यभर एक उत्तम ॲथलिटच होते. वॉटर पोलोचे हंगेरीचे नामांकित राष्ट्रीय खेळाडू, ऑलिंपिक सुवर्ण विजेते तर ते होतेच पण वयाच्या ९०व्या वर्षापर्यंत ते टेनिस खेळत आणि रोज पोहत असत. त्यांच्या निधनाच्या आधी दोन वर्षेपर्यंत ते नित्यनेमाने पोहत होते!
ते म्हणत “मी काही फार मोठा पोहणारा नव्हतो. त्यामुळे स्वत:चे स्थान मिळविण्यासाठी मी वॉटर पोलोवर लक्ष केंद्रित केले आणि खेळू लागलो. त्यात माझे नाव झाले..” “त्यावेळी दरवर्षी थंडीच्या कडाक्यात हंगेरीचा वॉटरपोलोचा संघ बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत असे. त्यामुळे तलावात मी कोणत्याही लढतीला घाबरत नसे. हो, वॉटरपोलो ही एक लढतच आहे. तीही एक चकमकच असते. वॉटरपोलोच्या खेळाडूने तडाखा खाल्ला आणि तो घाबरला तर तो कुचकामी आहे असे मानले जात असे! त्यामुळे बॉक्सिंगचे शिक्षण तलावाच्या लढतीत आम्हाला उपयोगी पडत असे,” असे ते मोठ्या अभिमानाने सांगत.
टेरिक्सच्या सुवर्ण पदकाचीही एक कथा आहे. १९३६च्या ऑलिंपिक्सनंतर “ॲलेक्स्”टेरिक्स ह्या कॉलेज विद्यार्थ्यावर बुडापेस्टमध्ये अर्धपोटी दिवस काढायची पाळी आली. तेव्हा अखेरचा उपाय म्हणून आपले सुवर्णपदक गहाण ठेवायला तो सावकाराकडे गेला ! सावकाराने ते कसोटी लावून, तपासून पाहिले आणि सांगितले,” हे सोने नाही !” ॲलेक्सने ते दिवस कसे काढले ते त्यालाच माहित.
दुसऱ्या महायुद्धाचा भडका उडाला. १९४४च्या हिवाळ्यात रशियाने हंगेरीवर हला केला. बुडापेस्टवर कबजा करणाऱ्या रशियन सैन्याची आणि जर्मनी व हंगेरीच्या सैन्यांशी जोरदार लढाई झाली. टेरिक्स आपल्या बायको आणि लहान मुलासह त्यांच्या तीन मजली इमारतीच्या तळघरात आश्रयाला गेले. लढाईच्या धुमश्चक्रीत बॉंबहल्यात ती इमारत पार उद्ध्वस्त झाली. काही दिवसांनी ते त्या इमारतीच्या जागी गेले. दगड विटातून शोधत आपले सुवर्ण पदक शोधून काढले !
टेरिक्स युनिव्हर्सिटी गेम्स नंतर वॉटर पोलोतून निवृत्त झाले होते. १९४३मध्ये त्यांनी स्थापत्य शाखेच्या अभियांत्रिकीतली
मानाची डॉक्टरेट पदवी मिळवली ! १९४६मध्ये त्यांना अमेरिकेत शिकवण्यासाठी निमंत्रित केले. आणि बर्कलेच्या युनिव्हर्सिटीत ते शिकवत असतानाच जेम्स केली यांच्या बरोबर त्यांनी वर सांगितल्याप्रमाणे भूकंपाचे धक्के इमारतींना बसून त्या पडणार नाहीत अशी बेस आयसोलेशन शॉक ॲब्सॉर्बर्स सिस्टीम विकसित केली.
टेरिक्स हे ऑलिंपिक वीर आहेत हे कॅलिफोर्नियाच्या(सॅन्फ्रॅन्सिस्कोच्या) बे एरियातील कुणालाही ठाऊक नव्हते.
“कित्येक वर्षे मी ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता आहे हे इथे कुणालाही माहित नव्हते. मीही कधी कुणाला ते सांगितले नाही. नंतर काय झाले , जोनी मोस्लेनी १९९८च्या ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले. जॉनी बेलव्हडरचा तिथे सत्कार समारंभ झाला. कसे कुणास ठाऊक पण त्यावेळी आमच्या बेलव्हडर गावाला समजले की इथे आणखी एक ऑलिंपिक सुवर्ण वीर आहे !” टेरिक्स हसत हसत म्हणाले.
टेरिक्स शंभरीला पोचले तेव्हा त्यांचा विरंगुळा म्हणजे गणितातील “अवघडातील अवघड समस्या” सोडवणे ! ते म्हणत “मी खरा इंजिनीअर, त्यामुळे हे गणिती प्रश्न सोडवताना इंजिनीअरिंगच्या भूमिकेतूनच ते सोडवतो. त्यामुळे माझे निष्कर्ष निराळे असू शकतात. मला असलेल्या विज्ञानाच्या ओढीतून मी हे करतो. त्यात मला आनंद मिळतो. “
टेरिक्स, त्यांचे निधन होईपर्यंत कार्यरत होते. त्यांच्या नव्वदीतही ते टेनिस खेळत. आणि जवळपास शंभरीतही नियमितपणे पोहत असत! आता आता पर्यंत ते थर्बॉन गावात “गोल्ड ३६” ही लायसन्स पाटी असलेल्या आपल्या गाडीतून फिरत. त्यांच्या मित्रांबरोबर, परिचितांबरोबर हिंडत फिरत असत.
टेरिक्स यांचे वर्णन कसे करायचे? ते इतके चतुरस्त्र होते की शतायुषी ह्या आदरार्थी विशेषणाने करायचे, हंगेरीचा हिरो, ऑलिम्पिक सुवर्ण विजेता अशी ओळख करून द्यायची की उत्तम आरोग्यसंपन्न व्यक्तिमत्व असा प्रारंभ करायचा का भूकंपग्रस्त प्रदेशातील इमारतींचे भूकंपाच्या धक्क्यापासून संरक्षण म्हणजे पर्यायाने अनेक लोकांचे प्राण वाचवणारी सुरक्षिततेची पद्धत विकसित करणारे बुद्धीमान अभियांत्रिकी असा सन्मानदर्शक परिचय करून द्यायचा असा प्रश्न पडतो!
हे सर्व काही असलेल्या पण त्यातही महत्वाचे म्हणजे भूकंपा पासून अनेकांचे प्राण वाचण्याची शक्यता असलेले उपाय शोधून काढणारे ही सर्वात खरी ओळख ! खेळाडू आणि उच्च शिक्षित, संशोधनात गति असलेले, त्यात मोठी कामे केलेले खेळाडू विरळा असतील. त्यापैकी एक अलेक्झॅन्डर जी. टेरिक्स होते.
आयुष्याचे सोने करणाऱ्या ह्या सुवर्ण पदक विजेत्या शतायुषी खिलाडू गृहस्थाचे वयाच्या १०२व्या वर्षी, शनिवारी ता. २१ मे २०१६ रोजी निधन झाले.