रात्रभर झोपलो नव्हतो. हो, संपूर्ण रात्र. जेवणे झाल्यावर थोड्या गप्पागोष्टी झाल्या. मग वाचत बसलो, ते रात्री दीड वाजेपर्यंत. नंतर झोप आलीच नाही.नेहमी असे होत नाही. कितीही जागलो तरी पहाटे ३-४ च्या सुमारास तरी झोप लागते. त्यामुळे मग रोज उशीरा उठणे. सकाळी उशीरा, उशीरा म्हणजे किती! ९:३० पासून ११:३०-१२:००वाजेपर्यंत केव्हाही! मी उशीरा उठतो अशी ख्याती मीच करून ठेवलेली.
रात्रभर झोपलोच नव्हतो; त्यामुळे जागा झालो म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. भली पहाटही नाही आणि सकाळ तर नाहीच अशा प्रात:काळी उठलो. खिडकीतून बाहेर पाहिले. फार फार छान वाटले. खाली येऊन पट्कन चहा केला. प्यालो आणि बाहेर आलो. शांततेच्या स्वर्गात आलो.वाराही अजून उठला नव्हता त्यमुळे झाडेही जागी झाली नव्हती. गाढ स्तब्ध होती. रात्री पाऊस पडून गेल्यामुळे विमल होती. एक म्हणजे एकही पान हलत नव्हते. सगळी झाडे स्तब्ध होती.स्तब्धचा अर्थ झाडे होता. मी कागदावर आता ‘वल्ली’ लिहिले असते तरी तेव्हा वेली थरारल्या असत्या. सगळीकडे इतके शांत शांत होते. पातळ असे धुकेही मध्ये मध्ये उभे होते. त्यानेही शांततेला गांभीर्य दिले होते.
रात्रीच्या पावसाचे मोती पानावर फुलांच्या पाकळ्यांवर थबकून होते. केव्हा निघायचे विचार करत घरंगळत पाना पाकळ्यांच्या टोकाशी थांबले होते. सूर्य येईल आणि नकळत अलगद घेऊन जाईल! पहाट म्हणावी का प्रभात अशा वेळी पक्षी कसे नसतील? होते. वडील गंभीर होऊन गप्प गप्प आहेत म्हटल्यावर मुलेही हळू दबक्या आवाजात आपापसात बोलतात तसे पक्षी बोलत होते. जे बसले होते ते झाडाचे कसे एक पानही हलू न देता बसले होते. एखाद दुसरे उडणारेही आपले पंख न फडफडवताच जात होते.
काहींचे आवाज जुन्या टाईपरायटरचे एकच बटन दाबत दाबत रेघ ओढताना आवाज येई तशा आवाजात तर काही जुन्या तारायंत्राच्या कट्ट कडकट्ट अशा शब्दात बोलत होते. एक दोघे लांSब शिट्टी वाजवत खुणेच्या भाषेत बोलत चालले होते. एक दोघे एकएकटे होते ते नटासारखे स्वगत म्हणत होते.काही संवाद विसरलेल्या नटासारखे भांबावून प्राॅम्पटर कुठे दिसतोय का पहात होते.पण पाखरांचे कौतुक बघा, त्यांच्या आवाजाने शांततेला क्षणभरही तडा गेला नाही. मौनात मग्न असलेल्या शांततेला पक्ष्यांचे स्वर सुगंधित करत होते.
‘काय म्हणावे या स्थितीला’ असा विचारत त्या ‘ सर्वार्थ मौनातील ‘ थोडेसे मौन घेऊन आत आलो.