Monthly Archives: December 2017

दिसणारा देव

रेडवुड सिटी

आमच्या आजोबांना आम्ही बाबा म्हणत असू. बाबा महिन्यातून एकदा आत्याकडे जात असत. त्यावेळी त्यांचा पोशाख पाहण्यासारखा असे. धोतर जाडसर असायचे. पण स्वच्छ धुतलेले, पांढरे शुभ्र. तसाच सदरा आणि डोक्याला पांढरा रुमाल, म्हणजे फेटा.उपरणे असायचे की नाही आठवत नाही. बाराबंदी असायची तर सदऱ्यावर कधी जाकीट. आणि ते टांग्यातून जात असत. टांग्यातून जायला मिळते म्हणून मीही जात असे. बाबांनी एरव्ही चालताना काठी वापरल्याचे आठवत नाही. पण बाहेर जाताना ती बरोबर घेत. एक म्हणजे रुबाब वाढे. शिवाय टांग्याच्या मागे कधी कुत्री पळत येत. त्यांना हटवायला काठी उपयोगी पडे!

भाद्रपदात पक्षपंधरवडा असतो. त्यावेळी आणि त्यांच्या आई वडिलांच्या श्राद्धाच्या तिथी अगोदरही ते बाजारात जात. बहुधा  कुणाची तरी तिथी उन्हाळ्यात असे. त्यामुळे बेत आंब्याच्या रसाचा असे. टांगा करूनच जात. मग काय आमचीही मजा असे. ते बाजार -किराणा भाजी- मोठ्या झोळ्यातून आणत.आंबेही झोळी भरून आणत. तिथे बाजारात नमुना म्हणून रस पुष्कळ पोटात जाई. ती एक निराळीच मजा ! कधी बाजारातूनच आत्याकडे जात. तिथे काफी होई. काफी असेच म्हणत बहुतेक सगळेजण. काफी अगदी गोड पाहिजे असे त्यांना. तशी झाली की समाधानाने ते,”छान केली होतीस. गुळचाट झाली होती.”अशी करणाऱ्याला शाबासकी देत.

बाबांचा असाच पोशाख दसऱ्याला शिलंगणाला पार्कवर जाताना असे.सगळा पोशाख नविन असे.आम्हा सगळ्यांना प्रश्न पडे हे कधी सटीसहामासी दिसणारे कपडे इतर वेळी कुठे गायब ह्वायचे ? कारण घरात त्यांचा पोशाख एकदम वेगळा म्हणजे हेच का ते बाबा? असा प्रश्न पडावा असा असायचा. पंचासारखे धोतर, ते गुडघ्याच्या किंचित खाली इतक्याच लांबीचे! त्यावर कुठला तरी सदरा. कधी त्यावर तसलेच जाकीट.पण सगळे धुतलेले तरी धुवट मळकट वाटत. पण आमचे तिकडे कधी फारसे लक्षही नसे म्हणा.

बाबा आम्हाला,लहर आली,की भीती दाखवत.बहुतेक वेळा ते पुढच्या दाराच्या मधल्या पायरीवर बसलेले असत. ते आपले डोळे वर नेत, तोंड उघडे ठेवून डोके किंचित मागे नेत. भुवया वर गेलेल्या. बुबुळे वयामुळे धुरकट पांढरट झालेली. उघड्या तोंडात वरच्या बाजूच्या दोन्ही कडेला एखाद दुसरा लांबट पिवळसर दात, खालच्या बाजूचेही एक दोनच दात,तेही अंतरावर.त्यांचे असे रूप पाहिले की आम्ही घाबरत तर असूच पण हसत हसत ,” बाबा पुन्हा एकदा! पुन्हा एकदा भीती दाखवा” म्हणत त्यांच्या पाठीमागे लागत असू! त्या घाबरण्यातही केव्हढा आनंद असे.

बाबा श्रावणी करत. त्यावेळी आमचे नातेवाईक तर येतच पण एक दोन शेजारी येत. दोन चार भटजीही असत.श्रावणीत जानवी बदलतआणि  किंचित शेणही खायला लागे. श्रावणी विषयी इतकीच माहिती होती आम्हाला. तो भाग आला की ते काडीच्या टोकाला लागलेले इतकेसे असले तरी ते कसे टाळायचे हाच विचार सगळ्यांच्या डोक्यात असे! तरी बरे हा प्रसंग माझ्यावर एकदा दोनदा आला असावा. कारण मुंज झाली नव्हती तोपर्यंत फक्त प्रेक्षकाचेच काम असे!प्रेक्षक म्हणूनही माझ्या आठवणीत श्रावणी हा प्रकार एक दोनदाच झाल्याचे आठवते. कारण बाबाही थकलेहोते. त्यांनी श्रावणी बंद करून टाकली. ती कायमची बंद झाली.

बाबा सगळ्यांसाठी जानवी स्वत: करत. त्यासाठी कापसाची टकळी घेऊन तिचे सूत भिंगरी फिरवत ते काढायचे. भिंगरी फिरवताना घसरु नये म्हणून थोडी रांगोळी असलेल्या वाटीत ती धरून ते एका हातातली कापसाची टकळी वर नेत नेत दुसऱ्या हाताने भिंगरी फिरवत तिला सूत गुंडाळत पुन्हा तो हात हळू खाली आणीत. हे असे खाली-वर किती वेळ चालत असे! आणि किती दिवस! त्यानंतर ते सूत एका बाजूने बाबा धरत; दुसऱ्या बाजूने अक्का धरायची.(अक्का म्हणजे आजी.) आणि त्या सुताला पाण्याचा हात लावून पिळा देत. मग त्याची जानवी बाबा करीत! त्यातही बरेच दिवस जात असावेत. पण जानव्याचे सूत म्हणजे दोरी वाटावी इतके जाडअसे! दणकट आणि टिकाऊ! पण जानवी तयार होई पर्यंतचे दृश्य पाहण्यासारखे असायचे.ह्या दरवाजाला बाबा ऊभे; तिकडे त्या दरवाजापाशी अक्का. कधी दमली तर भिंतीपाशी असलेल्या काॅटवर बसायची. बाबा फार कमी बोलत. पण अक्का बोलत असायची. पण बाबा ते कधी ऐकत असतील असे वाटत नव्हते. ते आपल्या जानव्याच्या कारागिरीत दंग असल्याचे दाखवत.

अचानक बाबांची आठवण का झाली ? गायत्री मंत्र हा सूर्याचा मंत्र आहे हे माहित होते. परवा त्यातील काही शब्दांचा अर्थ व त्यातून होणारे सुर्याच्या गुणकार्याविषयीचे वर्णनात्मक शब्द पाहात होतो. आणि  मागे माईने बोलता बोलता,  बाबा संध्याकाळी सूर्याला नमस्कार करताना आपल्याला काय सांगत, ते सांगितलेले आठवले!

बाबा नेहमी प्रमाणे पायरीवर बसलेले असत. रोज संध्याकाळी सूर्य मावळताना ते नमस्कार करीत. ते आम्हाला म्हणत, अरे ह्याला नमस्कार करा! हा दिसणारा देव आहे! नमस्कार करा”

दिसणारा देव ! सूर्याचे फक्त दोन शब्दांत इतके नेमके  सुंदर आणि यथार्थ वर्णन मी कुठे वाचले नाही की ऐकलेही नाही.

सूर्य, दिसणारा देव, म्हणून बाबांची आठवण झाली!

ती. अण्णांच्या काही आठवणी

रेडवुड सिटी ता.१५ डिसेंबर २०१७

काल  १४ डिसेंबर रोजी गदिमांच्या सुनेने त्यांच्या अखेरच्या दिवसाची साद्यंत हकीकत लिहिलेला हृदयस्पर्शी लेख वाचल्यावर ‘फार मोठा माणूस’ हेच मी मनात म्हणालो.त्याच वेळी चंदूने त्याची गदिमांशी झालेल्या भेटीची हकीकत, किती उत्साहाने सांगितली होती, तिचीही आठवण झाली.

गदिमा विधानपरिषेदेत सभासद होते. तिथे चंदूची आणि त्यांची भेट झाली. चंदूने त्यांना आपली ‘पावसांच्या थेंबांची वाजंत्री पानापानांवर वाजते’ही कविता वाचून दाखवली. ती ऐकल्यावर ते प्रसिद्ध कवियत्री शांताबाई शेळकेंना हाक मारून म्हणाले, “अहो इकडे बघा, काय सुंदर कविता लिहिलिय ह्याने” , असे म्हणून कवितेतील दोन तीन ओळीही त्यांनीस्वत: वाचून दाखवल्या त्यांना!

गदिमांची रसिकता आणि त्यांच्या मनाचा मोठेपणा आणि उमदेपणाची जाणीव होते!

ह्यावरून मला आमच्या ती. अण्णांची आठवण झाली. तेही त्यावेळचे प्रख्यात साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककारआणि महाराष्ट्र-गीताचे कवि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर आणि मराठी कवितेला रोमॅंटिसिझमचे वळण देणारे रविकिरण मंडळाचे अध्वर्यु, संस्थापक कविवर्य माघव ज्युलियन( प्रेमस्वरुप आई, वाघ बच्छे फाकडे भ्रांत तुम्हा का पडे असे विचारुन मराठी माणसाला पुन्हा जागवणारे, मराठी असे आमुची मायबोली… तिचे पुत्र आम्ही तिचे पांग फेडू असे मायमराठील वचन देणारे कविश्रेष्ठ) यांच्या आठवणी अण्णा सांगत.

अण्णा काॅलेजात असताना-फर्ग्युसन,लाॅ काॅलेज-त्यांच्या कविता मासिक मनोरंजन यशवंत मध्ये येत असाव्यात. प्रा. डाॅ माधवराव पटवर्धन म्हणजेच कवि माधव ज्युलियन,रविकिरण मंडळात इतरांना अण्णांची ओळख करून देताना “आमचे तरुण कविमित्र” असाच उल्लेख करीत असे अण्णा सांगत. रविकिरण मंडळातील कवि गिरीश, यशवंत आणि ग. त्र्यं माडखोलकर यांची आणि अण्णांची चांगली ओळख होती.

ती. अण्णांचे “पैशाचा पाऊस” हे नाटक व “तीन शहाणे”हे चांगले प्रसिद्धीला आले होते.त्यामुळे त्यांची आणि श्री.कृ. कोल्हटकरांची चांगली ओळख झाली असावी. नाटक मंडळींत किंवा इतर मोठ्या लोकांकडे जातांना काही वेळेला ते अण्णांनाही बरोबर घेऊन जात. तिथे ते स्वत: गादीवर तक्क्याला टेकून आरामात बसत.अण्णा त्यांचा मान राखून सतरंजीवर बसत. लगेच कोल्हटकर गादीवर हात थापटत अण्णांना म्हणायचे,” अहो कामतकर, इकडे या, अहो आपण नाटककार आहोत, इथे बसा ,”असेम्हणत ते त्याच्या शेजारी अण्णांना बसवून घेत,

ह्या आठवणी सांगताना अण्णा म्हणायचे, ह्या लोकांचा केवळ माझ्यावरचा लोभच नाही तर तितकाच त्यांच्या मनाचा मोठेपणाही होता!”

अण्णा फर्ग्युसनमध्ये असताना त्यांनी ‘वसतीगृहात’ नावाचे विनोदी प्रहसन लिहिले होते. त्याचे आमंत्रण स्वीकारताना  साहित्यसम्राट न.चि. केळकरांनी स्पष्ट केले होते की मी फार तर दहा मिनिटासाठी येईन. प्रयोगाला ते आले. फर्ग्युसनचे ॲम्फी थिएटर गच्च भरले होते. न. चि. केळकरआले. प्रयोगाच्या सुरवातीपासूनच हशा टाळ्या सुरु झाल्या. पुढे पुढ तर मुलांनी थिएटर डोक्यावर घेतले. साहित्यसम्राट प्रयोग संपेपर्यंत थांबले होते हे सांगायला नको. प्रयोगाच्या अखेरीस केलेल्या भाषणात त्यांनी,”मी निमंत्रण स्वीकारताना फक्त दहा मिनिटेच थांबेन हे स्पष्ट केले होते पण प्रयोग पाहायला लागलो आणिवगैरे ….” ह्याचा आवर्जून उल्लेख केला व प्रहसानाच्या लेखकाची प्रशंसाही केली! केसरीचे संपादक, नाटककार, इतिहासकार, व महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनात महत्वाचे स्थान असलेल्या व्यक्तींकडून कौतुक होणे ही काॅलेजमधील तरुणाला किती अभिमानास्पद असेल ह्याची कल्पना आपण करू शकतो.

अण्णा ही आठवणसांगत ती माझ्या जन्मापूर्वीची आहे.मला वाटते त्यावेळेस वासुनानाचाही जन्म झाला नसेल. अण्णा आबासाहेब ती.बाबा वगैरे रिठ्याच्या वाडायात राहात होते. हा वाडा शुभराय महाराजांच्या मठाच्याही पुढे शनीचे देऊळ, गद्रेंच्या वाड्याच्या जवळपास आहे. आता तिथे रिठ्याची झाडे आहेत की नाहीत कुणास ठाऊक.

रविकिरण मंडळाच्या सप्तर्षींपैकी व महाराष्ट्रातही लोकप्रिय असलेले कवि गिरीश यांचे अापल्याकडे येणे होत असे. कवि गिरीश म्हणजे ‘ रायगडाला जाग येते, वेड्याचे घर उन्हात, सूर्याची पिलेअशा नाटकांचे लेखक वसंत कानेटकरांचे वडील. कवि गिरीश सांगलीच्या विलिंग्डन काॅलेजात प्राध्यापक होते. ते आले की काव्यशास्त्रविनोदाला साहजिकच बहर येई.गिरीश त्यांच्या कविता म्हणत असत. ते खऱ्या अर्थाने काव्यगायन असे. ते कविता चालीवर छान म्हणत, असे अण्णा सांगत. कधी तरी अण्णा गिरीशांची नक्कल करत ” गेले तुझ्यावर जडून, रामा मन गेले तुझ्यावर जडून” ‘ ही शूर्पणखा रामाला आपले प्रेम उघड करून सांगतेय ती कविता म्हणत. गिरीशांची ही कविता सर्व रसिक गुणगुणत असत! पुढे ह्या कवितेच्याच चालीवर अनेक कविता झाल्या. त्या कवितांची चाल/वृत्त दर्शवताना कवि ‘चाल- गेले तुझ्यावर मन जडून’ असाच उल्लेख करत!

आचार्य अत्रे आमच्या घरी आले तेव्हा बरेच लोक जमले होते. आचार्य अत्रे घरात येण्याआधी लोकांनी नारळ ओवाळून तो फोडला! त्यांचा मोठा आदर केला. ही आठवण आई-अण्णा दोघेही सांगत. ही हकीकत मी नुकताच जन्मलो त्यावेळची, म्हणूनही त्या संदर्भात आई सांगत असावी.

गडकरी किंवा आचार्य अत्रे यांच्या इतके चिं. वि जोशी गडगडाटी हसवत नसतील. पण ते वाचकांना हसवत ठेवीत हे नि:संशय! आमच्याउन्हाळ्याच्या सुट्ट्या त्यांच्यामुळे सतत हसण्यात गेल्या. सुट्टी कधी उन्हाळ्याची वाटतच  नसे! चिमणराव, गुंड्याभाऊ आणि त्यांचा आवडता सोटा, चिमणरावांची मुलं मोरु राघू आणि मैना, बाजाची पेटी आणि आपल्या पोपटाच्या पिंजऱ्यासहितआलेली व पेटी वाजवत वाजवत नाट्यगीते म्हणणाऱ्या स्वैपाकीण काकू , तसेच चि.विं चे ओसाडवाडीचे देव; भली मोठी लोखंडी ट्रंक भरून चिमणरावांसाठी ‘ इस्टेट  ‘ ठेवणारे त्यांचे दत्तक वडील कोण विसरेल? तर हे प्रख्यात विनोदी लेखक चिं. वि. जोशीही आमच्या घरी अण्णांना भेटायला  येत असत.उन्हाळ्याच्या सुट्टीत ते येत.एक दोन रविवारी त्यांचे येणे होत असेल. आम्हाला विनोदी लेखक म्हणजे सारखे हसणारे, हसवणारेअसतात असे वाटायचे. पण चिं.वि.जोशी शांत आणि गंभीर मुद्रेचे होते. अण्णांचे आणि त्यांचे बोलणे चालू असे. आम्ही मध्येच मधल्या खोलीतून डोकावून पाहून जात असू.

सोलापूरला १९४१/४२ साली मराठी साहित्य संमेलन झाले त्याचे वि. स. खांडेकर हे अध्यक्ष होते. त्या आघीपासून नाटककार कवि लेखक म्हणून साहित्यवर्तुळात अण्णांची ओळख होती.त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष अण्णा असतील अशी बऱ्याच जणांची अपेक्षा होती. त्यामध्ये खांडेकरही असावेत. पण ते पद अण्णांना मिळाले नाही. तेअसो. पुढे जेव्हा वि. स. खांडेकरांना  ज्ञानपीठ पारितोषिकचा सर्वोच्च सन्मान लाभला तेव्हा होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण पत्र अण्णांना आले होते. सोलापुरात फक्त एकट्या अण्णांनाच हे आमंत्रण होते ! ह्याचा मात्र अणांना अभिमान वाटला, आणि खांडेकरांनी आठवण ठेवली याचा आनंदही ते व्यक्त करीत.

तर अण्णांमुळे आमच्या घरचे वातावरण असे साहित्यिक असायचे !

उंदराचा पिंजरा

रेडवुड सिटी

आता उंदराचे पिंजरे दिसत नाहीत.कारण आता बहुतेक गावातले उंदीर कमी झाले आहेत. निदानपक्षी घरांतील उंदीर तरी कमी झाले आहेत. अणि जिथे असतील तिथे हल्ली उंदराचे औषधच जास्त वापरले जाते. हे लक्षात येण्याचे कारण नुकतेच मी ॲगाथा ख्रिस्टीचे The Mouse trap नाटक वाचायला घेतले आहे. आणखी एक कारण, तिचा The Murder on Orient Express हा सिनेमा नुकताच लागला आहे.

ॲगाथा ख्रिस्टी  कोण हे सांगावे लागत नाही. शेरलाॅक होम्स चा जनक सर काॅनन डायल इतकीच किंवा काकणभर जास्तच ती प्रसिद्धच नव्हे तर लोकप्रियही आहे. तिच्यावर एडगर ॲलन पो (हाही रहस्य कथा लिहित असे.) काॅनन डायल, जीके चेस्टरटन यांचा प्रभाव होता. रहस्य वांड.मयाची ती अनभिषिक्त राणीच मानली जाते. सर काॅनन डायलचा  जसा शेरलाॅक होम्स तसे  ॲगाथा ख्रिस्टीचे हरक्युल पायराॅं आणि मिस मार्पल हे दोन डिटेक्टिव्ह जगप्रसिद्ध आहेत.

लेखकाने लिहावे म्हणजे किती? तिने ६६रहस्यमय कादंबऱ्या, रहस्यकथा संग्रह १४, नेहमीच्या कादंबऱ्या ६, १२ नाटके आणि इतरप्रकारची म्हणजे आपले आत्मचरित्र आणि आपल्या पुराणवस्तु संशोधक (पुरातत्वशास्त्रज्ञ)असलेल्या नवऱ्याच्या संशोधनाच्या दौऱ्यात तीही जायची,त्या दौऱ्यासंबंधीत प्रवासवर्णनाची तीन पुस्तके लिहिली आहेत. तिच्या रहस्यकथा, कादंबऱ्यांवर बरेच चित्रपट निघाले आहेत. शिवाय TV साठीही अनेक कथा कादंबऱ्याच्या मालिका झाल्या आहेत!

तिच्या नवऱा पुराणवस्तु शास्त्रज्ञअसून तोही त्याच्या क्षेत्रात प्रसिद्ध होता. त्याच्या कामामुळे त्याला Sir हा किताब मिळालेला आहे.

अॅगाथा ख्रिस्टीने तिचे The Mouse Trap नाटक ती रहस्य कथा,कादंबऱ्यातून विरंगुळा म्हणून  सुट्टी घ्यायची त्या विरंगुळ्याच्या दिवसात तिने लिहिले आहे! अॅगाथा ख्रिस्टीचा  जन्म १८९० साली झाला. ती वयाच्या ८५व्या वर्षी १९७६ साली वारली.

तिच्या पुस्तकांची विक्रीही तितकीच प्रचंड आहे.फक्त बायबलआणि शेक्सपिअरच तिच्या पुढे आहेत. तिच्या मूळ इंग्रजी पुस्तकांच्या एक अब्जाहून जास्त प्रति विकल्या गेल्या आहेत. तिची पुस्तके जगातील ४४ भाषांतून प्रसिद्ध झाली. त्यांची विक्रीही एक अब्ज आहे!

म्हणजे एकूण दोन अब्ज प्रति विकल्या आहेत! हा सार्वकालीन(all time great) विक्रम आहे!

पण हे सर्व विक्रम, इतके ग्रंथ, इतक्या भाषांतून झालेली भाषांतरे ह्यापेक्षा हया रहस्य-राणीच्या मुकुटातील चमकणारा हिरा म्हणजे तिचे The Mouse Trap हे नाटक!

माऊस ट्रॅप नाटक १९५२ साली रंगभूमीवर आले. पहिल्या प्रयोगापासून ते गाजू लागले.पुढे तर गर्जू लागले. नाटकातील नट-नट्या किती वेळा बदलले असतील, दर पिढीतले नवे नवे नट काम करताहेत ! थेटरमधले फर्निचरही  किती वेळा बदलले असेल इतकेच काय प्रेक्षकांच्याही किती पिढ्या हे नाटक पाहात असतील आणि आतापर्यंत किती लोकांनी, तेही देशोदेशीच्या, याची गणती कोणी केली असेल तर ते आकडे पाहूनच  लोक तोंडात बोटे घालतील! इंग्लंडमधीलच नव्हे तर जगातले असंख्य  प्रवासी लंडन पहायला येतात तेव्हा त्यांच्यातील नाट्यरसिक माऊस ट्रॅप नाटक पहायला आवर्जून येतात! मॅदाम तुसाॅंचे,जगप्रख्यात सजीव वाटणाऱ्या मेणाच्या पुतळ्यांचे म्युझियम किंवा लंडनचा टाॅवर ब्रिज पहायला जगातील लोक धडपडून जातात तसेच ते ॲगाथा ख्रिस्टीचे माऊस ट्रॅप नाटक पाहायला जातात! हे नाटक आजही चालू आहे! सतत ६५ वर्षे झाली ह्या नाटकाचे प्रयोग होतच आहेत. अक्षय-नाटक,अजरामर, चिरंजीव ही विशेषणे शोभून दिसणारे एकच एक असे हे एकमेव नाटक आहे.

काही लोक सुरवातीची एकदोन वर्षे म्हणायचे की,”अहो थिएटर लहान म्हणून चालत असणार.”  The Ambassadors Theatre मध्ये पहिला प्रयोग झाला १९५२ साली. त्यात २००प्रेक्षकांची सोय आहे.पण त्याचा प्रतिवाद करणाऱ्यांचे म्हणणे बरोबर आहे. ते म्हणतात, १९५२पूर्वीपासून हे थिएटर आहे. दुसरी नाटके होतच होती. मग ती का नाही चालली इतका काळ? ती का प्रवाशांचे आकर्षण झाली नाहीत? अलीकडच्या काळात ते सेंट मार्टिन या थिएटर मध्ये होते.

ह्या पहिल्या प्रयोगात आपल्याला माहित असलेला प्रख्यात सर रिचर्ड अॅटनबराह् ह्याने डिटेक्टिव्ह सार्जंट ट्राॅटरचे काम केले होते. हा पुढे प्रख्यात झाला. पण आपल्याला तो’गांधी’ सिनेमाचा दिग्दर्शक म्हणून जास्त माहितीचा आहे.

नाट्यप्रयोगाचे एक वैशिष्ट्य आहे; नाटक संपले की एक नट बाहेर येऊन प्रेक्षकांना विनंती करतो की आम्हाला एक वचन द्या की तुम्ही ह्या नाटकाचा शेवट कुणालाही सांगणार नाही. असे म्हटले जाते की आजपर्यंत तरी प्रेक्षकानी दिलेले वचन पाळले आहे. जेव्हा ह्या नाट्यप्रयोगाची ६० वर्षे-सुवर्ण जयंती-झाली त्या प्रयोगाच्या अखेर पहिल्या प्रयोगात काम केलेल्या आणि त्यावेळी अखेरीस हेच भाषण करणारा नट सर रिचर्ड अॅटनबराह् आला आणि त्याने तेच भाषण दिले!

गंमत अशी की जेव्हा पहिल्या प्रयोगाचा दिग्दर्शक आणि ती बोलत असता तो म्हणाला,” हे नाटक चौदा महिने चालेल.” त्यावर ॲगाथा म्हणाली,” छे:! मला नाही वाटत. फार तर आठ महिने, हां, आठ महिने चालेल!”

पाहा, आजचे त्या नाटकाचे पासष्ठावे वर्ष चालू आहे. आणिन२०१९ सालच्या तिकिटांची विक्री चालू आहे!

तिच्या पुस्तकांतून अनेकांनी निवडलेली बरीच म्हणजे दोनहजार तरी वचने/वाक्ये असावीत. त्यातली एक दोन पहा, ” One doesn’t recognizes the really important moments in one’s life until it’s too late.”

” Very few of us are what we seem.”

आणि तिच्या आत्मचरित्रातल्या वाक्याने या नाटकाच्या लेखावर पडदा पाडू या.

हे वाक्य तुम्हाला तिचा नवरा आर्किआॅलाॅजिस्ट आहे हे आठवत असेल तर निश्चित हसवेल – ” Archaeologist is the best husband a woman can have. The older she gets the more interested he is in.”