Monthly Archives: January 2018

भगवद् गीता अ. १५ वा श्लोक १८, १९ आणि २० वा

रेडवुड सिटी 

यस्मात्क्षरमतीतोऽहमक्षरादपि चोत्तम: ।

अतोऽस्मि लोके वेदे च प्रथित: पुरुषोतम: ।।१८।।

मी क्षराच्याही पलीकडचा आणि अक्षरपुरुषाहूनही उत्तम पुरुष आहे. ह्या लोकीच्या सर्व व्यवहारात आणि वेदांमध्येही मी पुरुषोत्तम म्हणून प्रख्यात आहे. ।।१८।।

मी क्षर आणि अक्षरपुरुषापेक्षाही केवळ वेगळा नसून वेदोपनिषदातील संज्ञा वापरायची तर क्षराक्षर ह्या दोन्ही पुरुषांहूनही निरुपाधिक असलेला उर्ध्वतमच आहे. म्हणजे आकलन होण्यासाठी कठिण आहे.ह्या आणि इतर लोकींच्या सर्व पुरुषांहून मी श्रेष्ठ आहे हे तर निराळे सांगायला नको. 

यो मामेवमसंमूढो जानाति पुरुषोत्तमम् । 

स सर्वविदभजति मां सर्वभावेन भारत ।।१८ ।।

ज्याने सर्व मोह दूर सारून माझी उपासना केली व मला जाणून घेतले तो ज्ञानी होऊन सद्भावपूर्वक मलाच भजतो.।।१८।।

ह्या श्लोकात ज्ञान झालेला ज्ञानसाधक भक्त सर्वत्र सच्चिदानंदालाच पाहतो, मी ब्रम्हरुप झालो असेही त्याला ज्ञान होते. तरीही तो संपूर्णपणे परब्रम्ह रूपात लीन झाला, त्याचे द्वैताचे भान पूर्णपणे लोपले असे म्हणता येत नाही. महत्वाचा जो भाग ‘मद्रूप’ होण्यास अजून किंचित का होईना राहिले आहे. जसे सूर्योदयाची चाहूल लागली आहे. आकाशात झुंजुमंजूचे रंग आले आहेत, केवळ सुर्योदयाचाच अवकाश आहे, अशी त्या साधकाची स्थिती आहे. त्यासाठी ज्ञानोत्तर भक्तीची आवश्यकता सांगितली व मोहाचा इतकाही अंश नको असे म्हटले आहे. असे सर्व मोह दूर सारून (इथे  ‘मला आत्मज्ञान झाले’ हा अहंभावाचा मोह) भक्ती करणारा ‘मद्रुप’ होतो असे भगवंत म्हणतात. 

त्या मद्रुप ज्ञानी भक्ताचे वर्णन ज्ञानेश्वर माऊली 

…….। मज पुरुषोत्तमाते धनंजया।

जाणे जो पाहलेया । ज्ञानमित्रे।।५५९।।

मला ज्ञानसुर्याच्या प्रकाशाने जाणल्यावर सगळे जग तो एकरुपाने पाहतो. सर्वांभूती परमेश्वरच पाहतो. मनात द्वैत भावनेचा अंशही नसतो. असे झाले की तोही मीच होतो. आकाशाने आकाशाला मिठीत घ्यावे तसे. 

ह्या श्लोकात मोह दूर सारून असे का म्हटले तर सर्व वासनांचा त्याग हा खरा संन्यास. ह्या अध्यायात विरक्ति वैराग्य दृढ व्हावे असे म्हटले आहे. त्याचाच हा पुनरोच्चार आहे. तसेच पुढच्या अध्यायात आसुरी संपत्तीचे वर्णन येणार आहे. आसुरी संपत्ती म्हणजे मोहांचा खजिनाच. त्याचे हे सुतोवाच असावे. मोहांचा त्याग केल्याशिवाय परमार्थात प्रवेश नाही! 

इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ ।

एतदबुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत  ।।२० ।।

हे अर्जुना हे गुह्यातले गूढतम शास्त्र मी तुला सांगितले. हे नीट समजून घेतल्याने मनुष्य बुद्ध म्हणजे बुद्धिवान, जाणता आणि कृतकृत्य होईल.।।२०।।

भगवान म्हणतात, अशा तऱ्हेने क्षराक्षर पुरुषांना बाजूस सारून जो मी पुरुषोत्तम त्याची भक्ति करून तू मद्रूप हो. 

हा श्लोक पंधराव्या अध्यायाचा फलश्रुतीचा आहे. 

ह्या अध्यायात गीतेच्या तत्वज्ञानाचे सार आहे. त्यामुळे समारोप करताना ते गीतेचेही वैशिष्ठ्य सांगतात. 

सावचि बोलाचे नव्हे हे शास्त्र।पै संसारु जिणेते हे शस्त्र।

आत्मा अवतरविते मंत्रे। अक्षरे इये ।।५७०।।

हे गीता शास्त्र केवळ बोलण्या वाचण्याचा उपदेश नाही. त्यात सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर संसार जिंकण्याचे शस्त्रच आहे.( म्हणजे, गीतेत सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला तर संसारातील अडीअडचणी, संकटांवर मात करता येईल.) गीतेतील अक्षर न् अक्षर आत्म्याचे दर्शन घडवून देणारे मंत्रच आहेत.।।५७०।

माणसाने आपली चौकस बुद्धि, जिज्ञासा जर नेहमी जागृत ठेवली तर आपले ज्ञान वाढत राहते आणि ताजेही राहते. हा ज्ञानमार्गच आहे. आपली कामे लक्ष लावून मनलावून केली, आवडीचे न आवडणारे असा भेद न करता प्रत्येक काम आवडीचेच समजून ते आवडीने (Love’s Labour) ,आणि निस्वार्थीपणे केले ; आणि ते मलाच नव्हे तर सगळ्यांच्याच उपयोगी व्हावे ह्या भावनेने करणे, तर हा कर्मयोगच होईल; व्यवहारात अनावश्यक  अहंकार न दाखवता, नम्रतेने बोलणे चालणे केले, (पण तेहीअनाठायी न होऊ देता) तर ते भक्तीमार्गाचेच एक रूप होईल. 

परि हे बोलो काय गीता। जे हे माझी उन्मेषलता।

जाणे तो समस्ता। मोहा मुके।। ५८३।।

सेविली अमृत सरिता। रोग दवडूनि पंडुसुता।

अमरपणा उचितां। देऊनि घाली।।५८४।।

तैसी गीता हे जाणितलिया। काय विस्मयो मोह जावया।

परी आत्मज्ञानाने आपणपयां। मिळिजे येथ।।५८५।।

फार काय सांगू पार्था !  माझी ही ज्ञानलता गीता जो जाणून घेईल तो सर्वप्रकारच्या मोहातून मुक्त होईल व मद्रुप होऊन मला पावेल. माझ्या गीतारुपी अमृताचे जो सेवन करील तो फक्त रोगमुक्तच न होता अमरत्व पावेल. मग गीता यथार्थ जाणून घेतल्यावर त्याचा मोह दूर होईल ह्यात नवल नाही. तो आत्मज्ञानी होऊन मलाच येऊन मिळेल! ।।५८३-५८५।।

आचार्य विनोबा यांनी केलेल्या,  पंधराव्या अध्यायात सांगितलेल्या,पुरुषोत्तम योगाचे थोडक्यात आणि अचूक वर्णनाने आपण समारोप करू या. विनोबा म्हणतात, मत्सर अहंकार वगैरे दोषरहित बुद्धीने केलेल्या साधनेने,आत्मज्ञान प्राप्त होण्यात सर्वच कर्मांची समाप्ति होते.( काही करण्याचे राहात नाही). म्हणून ह्याला परमपुरुषार्थ म्हणतात. “आत्मज्ञानाची पूर्णावस्था म्हणजे पुरुषोत्तम योग !”

।। गुरुमहाराज की जय!।।

भगवद् गीता अ. १५वा, श्लोक १७वा

रेडवुड सिटी 

पंधराव्या श्लोकाच्या अखेरीस क्षर आणि अक्षर ह्या दोन्ही पुरुषापेक्षाही श्रेष्ठ अशा उत्तम पुरुषाची ओळख पुढच्या श्लोकात आहे असे म्हटले होते. तो श्लोक आता वाचायला घेऊ या. 

उत्तम: पुरुषस्त्वन्य: परमात्मेत्युदाहृत:।

यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वर:।।१७।।

 क्षर आणि अक्षर या दोन्ही पुरुषांहून वेगळा आणि उत्तम असा हा पुरुष आहे. त्याला परमात्मा म्हणतात. हा त्रैलोक्यात भरलेला आहे. तो अव्यय( कधीही कमी न होणारा म्हणजेच परिपूर्ण, नित्य) हा ईश्वर तिन्ही लोकांचे पोषण करतो. ।।१७।।

ह्या श्लोकात हा उत्तम पुरुष क्षराक्षरापेक्षा निराळा आहे याचे दोन तीन विशेष सांगितले आहेत. ते म्हणजे हा सर्वत्र भरलेला आहे. तो आहे. आणि आहे तसाच आहे. त्याचा व्यय होत नाही. शाश्वत आहे. तो सर्व विश्वाचा पोषक आहे. 

आपण ह्या परमात्म्याची महत्ता आतापर्यंतच्या सर्व अध्यायातून जाणून घेतली आहे. ती त्याच्या महत्वाच्या वैशिष्ठ्यातून माहिती करून घेतली आहेत. ह्या श्लोकातही त्यातील तीन वैशिष्ठ्ये आली आहेत.

परमात्म्याचे  ‘ एकोऽहं बहुस्याम’ या स्फुरणातून हे (स्फुरण हीच मूळ प्रकृति) अव्यक्त/ परा प्रकृतीत साम्यावस्थेत-समवाय- असलेल्या पृथ्वि आप तेज वायु आकाश आणि मन बुद्धि अहंकार हया आठही भागातून  (अपरा प्रकृति होउन) जड भूतमात्र नाना रुपनामात्मक भूतांची टाकसाळ उघडली. ही जड सृष्टी निर्माण झाली. उत्पत्ति संहाराचे चक्र सुरु झाले. पण अंती सर्व काही पुन्हा या अव्यक्तात (साम्यावस्थेतच) लीन होतात. हे ढोबळ मानाने लक्षात ठेवले म्हणजे क्षर व अक्षर पुरूष समजायला सोपे होते. कारण अपरा व परा प्रकृतींची लक्षणेच त्यांच्यात आहेत. मग पुरुष असे का म्हटले तर ह्या अध्यायात तत्वज्ञानच सांगायचे असल्यामुळे वेदान्ती  सर्वांमध्ये चैतन्य पाहतात. त्यामुळे इथे क्षरपुरुष व अक्षर पुरुष असे म्हटले आहे.( ही नावे सुद्धा अपरा प्रकृति व परा प्रकृतींच्या लक्षणांवरूनच दिली आहेत. हे आतापर्यंतच्या १६ श्लोकांवरून विशेषत: १६ व्या श्लोकाद्वारे ध्यानात आलेआहे.)  परमात्मा नावाचा पुरुषोत्तम श्रेष्ठ आहे हे लगेच लक्षात येते. 

परमात्मा नावाच्या उत्तम पुरुषाचे क्षराक्षर ह्या दोन्ही पुरुषांपेक्षा श्रेष्ठत्व कसे आहे हे विविध मुद्द्यांवरूनआणखी स्पष्ट होईल. विपरित ज्ञानाच्या- म्हणजे खोट्यालाच खरे भासवणारे (सर्प-दोरी न्याय) जे ज्ञान- त्याच्या जागृति आणि स्वप्न ह्या दोन अवस्था ज्या अज्ञानत्वात  लुप्त होतात आणि जेव्हा ज्ञान होते तेव्हा हे अज्ञान त्या ज्ञानात लोपते .पण अंती ज्ञानही जिथे लीन होते, तो पुरुषोत्तम होय. ( आत्मसाक्षात्कार झाल्यावर ज्ञानही लुप्त होते. कारण आत्मज्ञानी त्या परमात्म्याशीच एकरूप झालेला असतो.) 

ज्ञानेश्वर माऊली हेच उपमा दृष्टांतातून पटवून देतात. 

पै ग्रासूनि आपुली मर्यादा। एक करीत नदीनदां।

उठी क्लपांती उदावादा। एकार्णवाचा।।५३३।।

तैसे स्वप्न ना सुषुप्ती। ना जागरची गोठी आथी।

जैसी गिळीली दिवोराती। प्रळय तेजें।।५३४।।

ऐसे आथि जे काही। ते तो उत्तम पुरुष पाही।

जे परमात्मा इहीं। बोलिजे नामी ।।५३६।।

नदी नद्या सर्व आपल्यात सामावून घेऊन त्या सर्व तोआपणच होऊन  अमर्याद होतो. आणि कल्पांतात  तर ह्या प्रळयात सर्वांचा विलय होऊन सर्वत्र एकच एक महाप्रळय सागर होतो; प्रळयाग्नीचे सर्वग्रासक महातेज दिवसरात्र सर्वच गिळून टाकते तसे इथे स्वप्न ना सुषुप्ति इतकेच काय जागृताचीही गोष्ट नाही. आत्मज्ञान्यांना ह्याचे ज्ञान, साक्षात्कार झाल्यावर त्यांच्या स्थितीचे, तिथे ज्ञाता-ज्ञेय-ज्ञान ही त्रिपुटीही राहात नाही असे वर्णन केले जाते. म्हणजे ते सर्व काही ज्यात लीन होते, असे जे काही आहे, त्या उत्तम  पुरुषाला परमात्मा म्हणून ओळखले जाते!  मग आहे- नाहीअसे काहीच कळत नाही म्हणजेच सर्व द्वैताद्वैतही ज्यात लोप पावते असा जो स्वयंसिद्ध आहे तो उत्तम पुरुष म्हणजेच परमात्मा. ह्याला कोणतेही अभिधान देता येत नाही. आपल्या आकलनासाठी ह्या अध्यायाच्या आतापर्यंतच्या संदर्भात थोडक्यात सांगायचे तर तो व्यक्त-अव्यक्ताच्याही पलीकडे आहे. 

केवळ जीवात्म्याच्या सापेक्षतेतून त्याला परमात्मा म्हणायचे.तो अनिर्वाच्य आहे हेच खरे.त्याचे ज्ञान करून त्याचा प्रत्यक्षानुभव घेणे ही खरी साधना होय. 

त्याची प्राप्ती करून घेण्याच्या उपासना मार्गांचे विवेचन गीतेने आतापर्यंतच्या सर्व अध्यायात केले आहे. 

ध्यानयोग, बुद्धियोग, ज्ञानयोग, भक्तियोग ह्या चारी आत्मज्ञान करूनघेण्याच्या मार्गांची चर्चा मागील सर्व अध्यायातून झाली आहे. त्यातून ह्या तारी मार्गांचा समन्वय साधला आहे. सामान्यांसाठी प्रपंचातून वेळ काढून,  निष्ठापूर्वक श्रवण, भजन, कीर्तन, नामस्मरण, ह्यातून भगवंताशी सतत अनुसंधानात राहणे व शक्य असल्यास संतांच्या ग्रंथांचा अभ्यास, हे करावे. निष्ठा तळमळ वाढत जाईल तशी पुढची पायरी चढण्याची तयारी होईल. असा परमार्थाचा सोपान चढत राहणे हे आपल्या हाती आहे. ह्याने कल्याणच साधेल असे संत स्ंगतात. 

ह्या अध्यायात केवळ तत्वज्ञानाचीच चर्चा आहे. परमात्मा सर्वत्र आहे, त्याचे अमरत्व, जीवात्मा हा त्याचाच अंश आहे, सर्वांमध्ये तोच कसा भरून आहे, तो (इतर कुणाकडूनही) प्रकाशित होणारा नाही तर तोच सर्व प्रकाशक आहे, तो नियम्य नसून तोच त्रैलोक्याचा नियामक आहे गोष्टी ह्या अध्यायात आल्या अाहेत. अशा पुरुषोत्तमाला कोण भजणार नाही? जे ह्याचे हे स्वरूप जाणून घेण्यास केवळ उत्सुक नसून आतुर आहेत, ह्याला प्राप्त करून घेण्याची तीव्र तळमळ आहे असे पारमार्थिक ह्यालाच भजतात. 

पंधरावा अध्याय हा गीतेच्या शिकवणुकीचे सार  असलेल्या तत्वज्ञानाचा मानला जातो. त्या दृष्टीनेही सोळावा आणि सतरावा हे दोन्ही श्लोक महत्वाचे वाटतात. 

ह्या अध्यायात परमात्मा हा सगुण- निर्गुण, व्यक्त-अव्यक्त ह्यांच्याही पलीकडे आहे हे स्पष्ट केले आहे. तो प्रकाश देणाऱ्यांचाही प्रकाशक आहे. दिसत नाही म्हणून तो नाही असे अजिबात नाही. तो सर्वात आहे, पण तो दृश्य नाही. फुलातील सुगंध डोळ्यांना दिसत नाही म्हणून त्याचे अस्तित्व नाही असे म्हणतो का? परमात्मा हा चराचरात प्राणीमात्रांत भरलेला आहे.पण तो दिसण्यापेक्षा अनुभवण्याचा विषय आहे. तो कसा अनुभवायचा त्या साठी गीतेने चार मार्गांचा परमार्थाचा प्रवास सांगितला आहे. ते चार मार्ग पुन्हा सांगण्याती आवश्यकता नाही. त्या त्या मार्गाचा अधिकारी होऊन हा परमेश्वर अनुभवता येतो हे गीतेने स्ंगितले आहे. 

 आपल्या नामदेवांनी, जनाबाईंनी, ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी, एकनाथ, तुकाराम रामदास आणि इतर अनेक मराठी संतमहात्म्यांनी याची आपल्याला शपथपुर्वक खात्री दिली आहे. 

हा विचार बाळगून आपण ह्यानंतरचे श्लोक अभ्यासूया. 

पसायदान

रेडवुड सिटी

पसायदान

ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेले ‘ पसायदान ‘हे अलौकिक, अभूतूपूर्व, आणि अदभुत आहे. त्यातील उपमा, दृष्टांत,रूपक ह्या भाषालंकार, काव्यगुण किंवा भाषागुणांशी पसायदानाच्या अलौकिकत्वाशी किंवा अभूतपूर्वतेशी संबंध नाही. कारण नऊ हजार ते दहा हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी त्यांनी सलग काही दिवस किंवा महिने सांगितली ती ज्ञानेश्वरी हाच एक, भाषेचाच नव्हे तर ज्ञानाचाच एक मौल्यवान अलंकार आहे. धनाढ्य श्रीमंतापासून पार गरीबालाही हा दागिना सहज धारण करता येतो! अशा ज्ञानेश्वरीचेच पसायदान हे मधुर परिपक्व फळ आहे. त्यामुळे त्यातील काव्यात्मकतेमुळे ते अलौकिक झाले आहे असे अजिबात नाही. तर त्यांनी मागितलेले कृपाप्रसादाचे दानच खरोखर जगावेगळे आहे. पसायदानातील एकेक ओवी वाचताना ह्याचा प्रत्यय येतो. आजपर्यंत विश्वातील सर्वांच्या भल्यासाठी मोठ्या मनाने अशी प्रार्थना केली नव्हती.

पसायदानाच्या अभूतपूर्व वेगळेपणाचे रहस्य ज्ञानदेवांच्या चरित्रात आणि चारित्र्यात आहे. कारण त्यांचे जीवनही इतर असंख्यांसारखे सुरळीत एका चाकोरीतील नव्हते.

धर्मशास्त्रात, संन्याशाने संन्यासाश्रमाचा त्याग करून पुन्हा गृहस्थाश्रमी होऊन पुन्हा मुलाबाळांसह प्रपंच करण्याची घटना विठ्ठलपंतांच्या घटनेआधी झाली नसावी. धर्मशास्त्रात पूर्वी कधी न घडलेल्या दोषावर निर्णय नसणार. त्यामुळे ह्यावर काय निर्णय घ्यावा हे त्यावेळच्या धर्मशास्त्री पंडिताना प्रश्न पडला असावा. त्यांच्याजवळ शास्त्रानुसार उत्तर नव्हते. तोडगा नव्हता. विठ्ठलपंतांच्या कुटुंबाला वाळीत टाकलेआणि त्यानंतर त्यांना पराकोटीचे देहांत प्रायश्चित्त घेण्यास सांगितले! म्हणजे मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली. आई-वडील गेल्यावर, ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना रोजचे जगणेही समाजाने अवघड करून टाकले होते. धर्मशास्त्राच्या आधाराने त्यांना शुद्ध करून पुन्हा ब्राम्हण्याची दीक्षा देण्यासही नकार दिला.

निवृत्तीनाथांच्यामुळे ज्ञानदेव व इतर भावंडे आत्मज्ञानाच्या उच्च पदावर आरुढ झाली होती.

निवृत्तिनाथांना शुद्धिपत्र, पुन्हा दीक्षा द्या म्हणणे हे काहीच पसंत नव्हते. आपल्याला त्याची काहीच आवश्यकता नाही, असे त्यांचे म्हणणे होते. ते ह्या सर्वाच्या पलीकडे पोचले होते. पण ज्ञानेश्वरांना सामाजिक घडी मोडायची नव्हती. त्यांचे म्हणणे आपण हे मानले नाही तर सामान्य लोकही त्याकाळच्या पद्धति झुगारून देतील. आपल्यामुळे समाज विस्कळित होईल असे काही करु नये असे त्यांचे म्हणणे होते.

ज्ञानेश्वरांनी त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या,छळ करणाऱ्या धर्ममार्तंडाच्या विरुद्ध किंवा समाजातील कुणा विरुद्ध कधीही, एकही कठोर,वावगा,अपशब्द काढला नाही. इतकेच काय त्यांच्या कोणत्याही ग्रंथात किंवा ओव्या- अभंगात एकही वाईट,अपशब्द आढळत नाही.काढायचाच म्हणून अगदी भिंग घेऊन शोधून पाहिले तर ज्ञानेश्वरीत अडाणी या अर्थी गावढा हा एक शब्द सापडतो, असे ह. भ.प. गुरुवर्य मामासाहेब सोनोपंत दांडेकरांनी म्हटले आहे.ज्ञानेश्वरांमध्ये सत्वगुणाचा परमोच्च उत्कर्ष झालेला होता. ते सात्विकतेची मूर्तीच होती.ज्ञानेश्वरांनी कोणालाही उपदेश केला नाही. आयुष्यभर फक्त जे जे चांगलेआहे ; उदात्त उन्नत उत्तम आहे तेच त्यांनी नेहमी लोकांसमोर ठेवले.आपल्या वाणीने आणि आचरणाने फक्त चांगले तेच लोकांसमोर ठेवल्याने समाजात बदल होऊ शकतो त्याचे उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे ग्रंथ- विशेषत: ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ- होत. मग, निर्मळ निरपेक्ष आणि लोकांचे निरंतर कल्याण चिंतणारे ज्ञानेश्वर स्वत: पसायदानात प्रकट होतात ह्यात आश्चर्य ते काय? चित्रामध्ये चित्रकाराचे, गायन-वादनात त्या त्या कलावंतांचे, साहित्यात लेखकाचे प्रतिबिंब उमटलेले असते असे म्हणतात. पसायदानात स्वत: अलौकिकत्व झालेले ज्ञानेश्वरच त्यात आहेत!

आता पसायदान वाचायला, म्हणायला सुरवात करु या.

आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे।
तोषोनि मज द्यावे । पसायदान हे।।१।।

(विश्वात्मक= विश्वात सर्वत्र भरून राहिलेला, परमात्मा; तोष= समाधान, संतोष, तृप्ती ह्यामुळे आनंदित प्रसन्न होणे. पसायदान= प्रसादाचे दान; वाग्यज्ञे= वाणीरूप यज्ञाने; प्रवचन-सत्र, व्याख्यानमाला यामधून केलेला वाचिक यज्ञ, ज्ञानयज्ञ. )

ज्ञानेश्वरी सांगून झाल्यावर तिच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी ही प्रार्थना केली आहे. त्यांनी त्या काळच्या पद्धतीप्रमाणे ज्ञानेश्वरी पद्यातून म्हणजेच ओव्यांतून अखंड ओघाने सांगितली. तीही थोड्या थोडक्या नव्हे तर सुमारे नऊ ते दहाहजार ओव्यांतून सांगितली. त्यांचा तो वाग्यज्ञच होता.यज्ञ फार मोठ्या समुदायाच्या हितासाठी केला जात असे. ज्ञानेश्वरांनी सामान्य लोकांनाही संस्कृतात अडकून पडलेले ज्ञान मिळावे म्हणून ते ज्ञान, ज्ञानेश्वरी लिहून मराठीत आणले. हे लोकोपयोगी यज्ञकार्य होते. वाणीरुपाने व्याख्यानातून केलेला ज्ञानेश्वरांचा हा यज्ञ होता. म्हणून त्यांनी इथे वाग्यज्ञ असा उल्लेख केलाआहे.

आपल्या वाग्यज्ञाने विश्वात्मक देवाला संतोष व्हावा आणि त्याने प्रसन्न होऊन आपल्याला वर द्यावा अशी प्रारंभी विनंती करतात. ज्ञानेश्वर, राम किंवा त्यांचा आवडता विठोबा किंवा ते स्वत: योगी असल्यामुळे शंकराचीही प्रार्थना करु शकले असते. पण ज्या अनंत, अमर्याद, अव्यक्त परमात्म्याचे त्यांना आपले गुरु निवृत्तिनाथांच्या आशिर्वादाने प्रत्यक्ष ज्ञान-दर्शन झाले होते त्या ब्रम्हांडस्वरूप विश्वात्मक देवाचीच प्रार्थना करून, आपल्या वाग्यज्ञाने संतोष पावलेल्या विश्वात्मकाकडे त्यांनी प्रसादाचे दान मागितले आहे. अशा तऱ्हेने पहिल्या चरणापासूनच पसायदानाच्या भव्यतेचे वैशिष्ठ्य जाणवते.

आपण पसायदानातील पुढच्या ओव्या वाचत जाऊ तसे त्यांनी मागितलेले दान किती महान, जगावेगळे आणि थोर मनाचे निदर्शक आहे ह्याची खात्री पटत जाते. विश्वातील सर्वांच्या सर्वांगिण कल्याणासाठी त्यांनी हे दान मागितले. केवळ कुणाच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी अथवा धनसंपदेसाठी ह्या दानाची मागणी नाही. सामान्य सुखांचा त्यात अंतर्भाव आहेच पण सगळ्या लोकांच्या मनात सदविचार, सदभावना निर्माण होऊन सर्व सदाचारी होवोत, सर्वजण एकमेकांचे मित्रच होऊन राहोत, ही उदात्त मागणी त्यात आहे. ज्ञानेश्वरांच्या पसायदानाचे हे निराळेपण आहे.

यावरून ध्यानात येऊ लागते की आत्मज्ञानी ज्ञानेश्वरांनी थेट तिन्ही लोकांत सर्वत्र भरून राहिलेल्या विश्वव्यापी परमात्म्याचीच प्रार्थना का केली. ज्ञानेश्वरांनी स्वत:साठी किंवा भावंडांसाठी काहीही न मागता एकूण सर्व मानवांचे सर्व काही चांगले व्हावे; त्यांच्या शाश्वत कल्याणासाठी प्रार्थना केली. बरे इतक्या सर्वश्रेष्ठ परमात्म्याजवळ काय केशर कस्तुरी मागायची? देव मोठा, प्रसाद मागणाराही तितकाच मोठा. मग मागितलेले दानही तेव्हढेच भव्य दिव्य असणार! देणाऱ्याचा मोठेपणा सिद्ध करणारेच, सर्व प्राणीमात्रांच्यासाठी मागितलेले हे दान आहे! हे वेगळेपणही अभूतपूर्वच ह्यात शंका नाही.

माऊली पुढे म्हणतात, असे दान दे गा देवा की ज्या योगे

जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो।
भूतां परस्परे पडो। मैत्र जीवांचे।।२।।

(खळ=दुष्ट,दुर्जन; व्यंकटी= वाकडेपणा, मनाचा वाईटपणा, दुष्टता; रती = गोडी,सुख,प्रेम; भूतां= भूत म्हणजे माणसे, लोक, प्राणिमात्र; म्हणून भूतां म्हणजे लोकांत, लोकांमध्ये एकमेकांविषयी)

ज्यांच्या मनात, स्वभावात वाकडेपणा आहे, जे दुष्ट असतील, त्यामुळे त्यांच्या आचरणातही दुराचार आहे, अशांचा त्यांच्यातील ह्या वाईट प्रवृत्तींचा, कुविचारांचा नाश होऊन त्यांना सदबुद्धी देऊन त्यांना सत्कर्मे करण्याची गोडी लागो. ती गोडी सतत वाढत राहो. सर्वांमध्ये सामंजस्य वाढीला लागून सकलजन एकमेकांचे मित्र होवोत. परस्परांविषयीची प्रेमाची भावना केवळ माणसां माणसांतच नव्हे तर ते आणि सर्व प्राणीमात्रही एकमेकांशी सामंजस्याने राहोत असा त्यात मोठा आशय आहे.

आपले हित अहित कशात आहे हे न कळणाऱ्यांच्या बाबतीत ते काय प्रार्थना करतात पहा,

दुरितांचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्ये पाहो।
जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात ।।३।।

(दुरित= पाप,पातक; इथे अज्ञान, अज्ञानामुळे किंवा अज्ञानाचा अंध:कार असाही अर्थ अभिप्रेत आहे. तिमिर = अंधार. पाहो=प्रकाश, सूर्याचा प्रकाश लाभो; स्वधर्माचा सूर्योदय होवो.)

आपल्या हिताचे काय आणि आपले नुकसान कशात आहे हे कळत नसल्याने ज्यांच्याकडून कुकर्मे होत असतात, किंवा पापाचरण झाले त्यांच्या मनातील हा पातकांचा अंधार, अज्ञानाचा अंधार दूर कर, त्यानांच नव्हे तर सर्वांना, आपापल्या वाट्याला आलेले स्वाभाविक कर्म, कर्तव्य करण्याची म्हणजेच प्रत्येकाचा जो सहजधर्मआहे ते कर्म नेकीने करण्याची work is worship ह्या निष्ठेने करण्याची बुद्धी दे. म्हणजेच त्यांच्यामध्ये स्वधर्मकर्म (कर्तव्यकर्म) करण्याचा सूर्य उगवू दे. विद्यार्थ्यांना अभ्यास करून विद्याधन मिळवण्याची; तरुणांना आपल्या उपजीविकेसाठी कराव्या लागणाऱ्या धंदा, व्यवसाय, नोकरी प्रामाणिकपणे करून स्वकष्टावर पोट भरण्याची प्रवृत्ति जागृत राहू दे; गृहस्थाश्रमीला कुटुंबाचे योग्य मार्गाने पालन पोषण करण्याची; सत्ताधीशांना, अधिकाऱ्यांना आपले पद ही लोकसेवा करण्याची तसेच जास्तीत जास्त लोकांसाठी जास्तीत जास्त चांगले करण्याची संधी आहे, अशी बुद्धि झाली म्हणजेच सर्वांमध्ये स्वधर्माचा सूर्योदय झाला. ह्या स्वधर्मकर्माच्या सूर्यप्रकाशामुळे इतर वाईट गुणांचा, वाईटाचा अंधार आपोआपच नाहीसा होईल. असे झाले की जो ज्या इष्ट वस्तुची इच्छा करेल त्याही पूर्ण होतील.असे व्हावे आणि ज्याला जे जे हवे ते प्राप्त होवो हा सर्वांच्या आवडीचा कृपाप्रसाद ज्ञानेश्वर माऊली आपल्यासाठी परमेश्वराकडे मागतात.

आतापर्यंतच्या ओव्यातून ज्ञानेश्वरांनी जी प्रार्थना केली ती सफळ आणि सुकर होण्यासाठी ते कोणती इच्छा व्यक्त करतात, आणि काय घडावे असे त्यांना वाटते ते पुढील दोन तीन ओव्यात सुंदर शब्दात विश्वात्मके देवाजवळ मागतात. आणि त्या वाचल्या की ज्ञानेश्वरांच्या पसायदानाच्या प्रार्थनेची उंची, उदात्तता वाढतच आहे ह्याचा अनुभव येतो.

वर्षत सकळ मंगळी। ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी। भेटतू भूतां ।।४।।

(वर्षणे= वर्षाव करणे/ होणे; पाण्याचा वर्षाव होणे; जशा पावसाच्या धारा पडतात; मांदियाळी= मोठा समुदाय,गर्दी,किंवा थवा,समाज. अनवरत= सतत,अखंड,निरंतर, सातत्याने. )

ते म्हणतात, हे विश्वात्मका, सर्व मंगल करणारे,सर्व चराचरातील सर्व प्राणीमात्रांवर मांगल्याचा वर्षाव करणारे, सर्वांचे चांगले करणाऱ्या ईश्वरनिष्ठ सज्जन सत्पुरुषांचा मोठा समुदाय या भूमंडळावर सातत्याने अखंड, निरंतर येत राहावा आणि आम्हा सर्वांना त्यांचा कायम सहवास लाभावा. अशा ईश्वरनिष्ठांची आमच्या पृथ्वीवर सतत गर्दी होऊ दे.
ह्या ईश्वरनिष्ठ सज्जनांचे इतके काय महत्व आहे म्हणून माऊली ते सतत अखंडितपणे येत राहोत असे मागणे मागतात? कारण जे जे काही सत् आहे त्यांचे ते दूत आहेत म्हणून त्यांनी ह्या आमच्या पृथ्वीतळी यावे अशी माऊलींची इच्छा आहे. ईश्वरनिष्ठांचे बहारदार वर्णन ज्ञानेश्वर महाराज पुढील दोन ओव्यात करतात.

चला कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचे गाव।
बोलते जे आर्णव । पीयूषाचे।।५।।

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु।।६।।

(चला किंवा काही प्रतीत चलां असेही येते= चालत्या, चालणाऱ्या. आरव= अरण्य, वृक्षराजी. चिंतामणि= चिंतिलेले- जे इष्ट,योग्य असेल- ते प्राप्त करून देणारे स्वर्गीय रत्न; आर्णव= समुद्र, सागर; पीयुष=अमृत, लांछन= दोष, डाग, कलंक).

ज्ञानदेव म्हणतात, हे सत्पुरुष चालत्या-बोलत्या, जिवंत कल्पतरुंची उपवने, उद्यानेच आहेत. त्यांच्या सावलीत बसले की सर्वांच्या मनातील इच्छा अनायासे पूर्ण होतात. ते जिथे वसती करतात ते चिंतामणीचे म्हणजे ते ते गाव चिंतामुक्तांचे गाव होऊन जाते. तेथील लोक जे काही इष्ट,चांगले चिंततील ते त्याना प्राप्त होऊन भूतळावरील सर्व लोकांच्या सर्व चिंता ह्या ईश्वरनिष्ठांच्या मुक्कामी दूर होतात. अशा ईश्वरनिष्ठांच्या सहवासाने, ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी मागितलेले, जो जे वांछिल ते त्याला का मिळणार नाही?

त्यांच्या बोलण्याचे काय वर्णन करावे? त्यांचा प्रत्येक बोल अमृताचाच असतो. ते जे सांगतात, बोलतात ते अमृतच हे खरे, ते अमृताइतके मधुर हेही खरे पण हे जास्त खरे की त्यांचे बोलणे हे सर्वांना संजीवक होते! सर्वांचे जीवन पुन्हा उजळून टाकणारे असे त्यांचे बोल असतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांचे शब्द अमृताचा सागरच आहे! ज्ञानेश्वरांच्या ईश्वरनिष्ठांचे सर्व व्यवहार,आचरण सत् आणि शुद्ध असते. हे सत्पुरूष म्हणजे कोणताही डाग, ठिपका किंवा दोष नसलेले चंद्र आहेत. एव्हढा धवल शीतल चंद्र पण त्या चंद्रावरही डाग असतो. पण हे सज्जन पूर्णपणे निष्कलंक आहेत. सूर्य प्रकाश देतो त्याचबरोबर त्याचा दाहक तापही सर्व चराचराला होतो. पण हे ईश्वरनिष्ठ सर्वांना फक्त प्रकाश देणारेअसे तापहीन सूर्य आहेत. हे संत-सत्पुरुष, सज्जन,सदासर्वदा, सर्वकाळी आमचे आप्तच होवोत.

पुन्हा सांगायचे तर, हे ईश्वरनिष्ठ सत्पुरुष आमच्या भूमंडळी सतत येत राहोत, ते आमचे जवळच्या आप्तासारखेच होऊन त्यांनी आमच्या समवेत राहावे. आम्हाला त्यांचा सत्संग सदैव लाभो, हा प्रसाद ज्ञानेश्वर महाराज मागतात. असा निरंतर सत्संग लाभल्यावर, ज्ञानेशेवर माऊली आपल्या सदिच्छापूर्ण मागणीची उंची आणखी वाढवताना म्हणतात,

किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिन्ही लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित ।। ७।।

(किंबहुना = फार काय, इतकेच नव्हे या पेक्षा; आदिपुरुखी=आदिअनादि असा पुरुष; परमात्मा.)

ईश्वर निष्ठांचा निरंतर सत्संग लाभल्यावर, इतकेच नव्हे तर, सर्वव्यापी आदिपुरुषाचे अखंड भजन,उपासना करून तिन्ही लोकांतील सर्व लोक पूर्ण सुखी होवोत; असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ते पुढे म्हणतात,

आणिग्रंथोपजीविये । विशेषे लोकी इये।
दृष्टादृष्टविजये । होआवे जी।।८।।

(दृष्टादृष्ट= दिसणारे आणि न दिसणारे, इह व परलोक.)

ह्या ग्रंथात उपदेश केलेल्या शिकवणुकीचे पालन करून त्याप्रमाणे सदविचार, सदभावाने आणि सदाचरणाने जे वागतील ते ह्या दृश्य जगात आणि अव्यक्त लोकातही विजयी होवोत. त्यांचे इहलोकी आणि परलोकीचे जीवनही कृतकृत्यतेचे होवो. ही अपूर्व प्रार्थना ऐकल्यावर,

तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दान पसावो ।
येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया जाला ।।९।।

[विश्वेशरावो= ह्या ओवीत हे पद ज्ञानेश्वरांनी आपले थोरले भाऊ आणि गुरू निवृत्तिनाथांना उद्देशून वापरले आहे. अव्यक्त विश्वात्मकाचे निवृत्तिनाथ हे व्यक्त,सगुण, साकार स्वरूप आहे हा ज्ञानेश्वरांचा दृढ विश्वास होता. (दान) पसावो=दानाचा प्रसाद प्राप्त होईल; पसायदान होईल) ]

ही प्रार्थना ऐकल्यावर विश्वेशरावो निवृत्तिनाथांनी अत्यंत संतोषाने, ज्ञानदेवाला तथास्तु, तसेच होईल, तुझी पसायदानाची प्रार्थना पूर्ण होईल असा आशिर्वाद दिला. तो ऐकून, सर्व त्रैलोक्य सुखी होणार ह्या विचाराने ज्ञानदेव धन्य झाले. सुखी झाले.