Monthly Archives: May 2020

पहिले पाढे

प्रत्येक पहिली गोष्ट रोमांचक असते. अविस्मरणीय असते. शाळेचा पहिला दिवसही विसरु म्हणता विसरला जात नाही. तशीच पहिली शाळासुद्धा आपण विसरत नाही. त्यातही ती मुन्शीपाल्टीची असली तर विचारुच नका. काळ्या दगडावरच्या रेघेसारखी तहहयात ती आपल्या बरोबर असते.

आमच्या शाळेचे नाव पाच नंबरची शाळा. शाळा अकरा वाजता सुरू व्हायची. मधल्या सुट्टीपर्यंत थोडे फार शिक्षण होई. बेरजा, वजाबाकी, मराठीच्या पुस्तकातील धडा. शुद्धलेखन; मग पुन्हा मास्तर बेरजेची कधी वजाबाकीची गणिते घालायचे. सोडवून झाली की “तोंडे फिरवून पाटी पालथी टाका ” ही बसल्या जागी कवायत करायची. लवकर पाटी पालथी टाकणारी दोनच प्रकारची पोरं होती. हुशार आणि ढ. बाकीची सगळी डाव्या हाताची बोटं मुडपून मुडपून ती तुटेपर्यंत कशाची मोजदाद करत ते अजूनही मला आणि त्यांनाही समजले नाही. कधी भेटलेच ते तर ह्या बोटे दुमडण्याच्या आठवणीतच भेट संपते! पाटी पुन्हा पुन्हा पुसण्यात, पाणी किंवा ओले फडके चाळीस पोरांत एक दोघांकडेच असायचे. ते कशाला देतील दुसऱ्याला. मग बोटे जिभेवरून फिरवून किंवा पाटी तोंडाजवळ नेऊन चक्क पटकन थुंकी लावून पुसायची.

ह्या कर्मकांडांत ही मधली पोरे व्यग्र असत. तोपर्यंत मास्तर शेजारच्या वर्गातील मास्तरांशी सुपारीच्या खांडाची किंवा एकाच पानाच्या विड्याची देवाण घेवाण करत. तोपर्यंत सगळी पोरे तोंडे फिरवून पाट्या पालथ्या टाकून आपापासात सुरवातीला हळू, मग भीड चेपली की ‘अबे!काय बे’ची द्वंद्व युद्धे सुरू व्हायची. त्याची “ आता तुला मधल्या सुट्टीत बघतो! तू बघच बे” ह्याने सांगता व्हायची. मधल्या सुट्टीत तरटाच्या रस्साीखेची झाल्या की मग भांडणाला सुरुवात व्हायची. त्याचीही सांगता “शाळा सुटल्यावर कुठं जाशील बे?” मंग बघ; न्हाई दाताड मोडलं तर ..” ह्या वीररसाच्या संवादाने व्हायची. शाळा सुटल्यावर त्या दोघा चौघांचे दोस्त मिळून दहा बारांची जुंपायची. जास्त करून शाब्दिक किंवा फार तर ढकला ढकलीने जुंपायची. “ अबे जातो कुठं बे तू?आं? उद्या शाळेत येशीलच की साल्या! मग बघ काय होतं त्ये!” हे भरतवाक्य होऊन दिवसभराच्या शाळेवर पडदा पडायचा. ही त्यावेळची त्रिकाळ संध्या होती! तिन्ही वेळेला सौम्य ते किंचित तिखट फुल्यांचा मारा होत असे. पण त्यामुळे तिन्ही खेळातील संवाद खटकेबाज आणि चटकदार होत. ह्या तिन्ही युद्धात माझ्या सारख्याची भूमिका दिग्दर्शकाची किंवा साऊंड इफेक्ट वाढवायची होती.

ह्या चकमकी, लढायांची कारणेही महत्वाची असत. कुणी कुणाची शाईची दौत सांडली- तीही दप्तर किंवा चड्डीवर – मग तर विचारूच नका-हे म्हणजे महायुद्धाचे कारण होते- कोणी कुणाची पाटीवरची पेन्सिल तोडली, तोडून तुकडा घेतला, कुण्या तत्वनिष्ठाने म्हणजे खडूसने सोडवलेली वजाबाकी दाखवली नाही. ही ह्या दैनिक लढायांची कारणे असत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सोडवलेली बेरीज कुणी कुणाला दाखवलीच पाहिजे अशी सक्ती नव्हती. ते कायमच्या तहातील एक कलम होते!

मधली सुट्टी संपली की मास्तरांसकट पोरेसुद्धा जरा आळसावल्यासारखी होत. पुजारी मास्तरांची एक डुलकी झाल्यावर मला पाणी आणायला सांगत. आव्वाचे घर समोरच होते. तेव्हढ्या वेळात मी आणखी स्वत:चा वेळ घ्यायचो. पाण्याचा तांब्या, वर तिरक्या टोपीसारखा ठेवलेल्या पेल्यासह, आणून मास्तरांना दिल्यावर सगळी पोरे रोज क्षणभर -क्षणभरच- मला दबून असत. मास्तरांचे पुन्हा शेजारच्या वर्गातील मोरे किंवा पवार मास्तरांच्या बरोबर जलपान आणि सुपारीच्या खांडांची अदलाबदल झाली की पुजारी मास्तर गोष्ट सांगत. झकास सांगत. ती झाली की मग शहराच्या भूगोलाचा धडा. तो लवकर आटपायचा. मग पाढे म्हणायला सुरुवात. पहिल्यांदा मास्तर “बें एकें बें” ह्या नांदीने सुरुवात करीत. त्यांच्या मागोमाग चाळीस पोरे आपापल्या स्वतंत्र गायकीत म्हणत. असे तीन चार पाढे झाले की शाळेत पुन्हा जीव यायचा. कारण कमी जास्त प्रमाणात साथीच्या रोगाप्रमाणे बहुतेक वर्गांत पाढे सुरू झालेले असत.

पाढे म्हणणे सोपे नाही.एक मुलगा बेचा पाढा म्हणतांना ‘ बे एके बेअे’ इतके सफाईने व झटक्यात म्हणायचा की त्याच्या पुढचा मुलगा ‘तीन एके तीऽनं’ची मनात सुरुवातही करायचा. पण बे दुणे आले की हा पुन्हा क्षणभराने ‘बे दोनी’ निराळ्या आवाजात म्हणायचा. असे हे ‘बे दोनी’ तीन वेळा झाले की मग हा निराळा सुर लावून पुन्हा ‘ बे दोन्ही’ निराळ्या ढंगाने म्हणू लागायचा. त्याच्या पुढचा मुलाच्या मनातल्या मनातले ‘तीन एकं तीनं’ कधीच थांबले असत. ह्या ‘बे दोनी’ कडे सगळा वर्ग आनंदाने तल्लीन होऊन पाहात,ऐकत राही. मास्तर मात्र “अरे पुढे” पुढे काय?” असे टेबलावर छडी आपटत विचारायचे. पण ह्याची निरनिराळ्या ढंगाने,अंगाने अर्धा तास “बाबुल मोरा”म्हणणाऱ्या कुण्या बडे खाॅंसारखे ‘ बे दुणे,बे दोनी,बे दोन्ही’ चालूच राही! पुजारी मास्तर झाले तरी त्यांच्या सहनशक्तीलाही मर्यादा होतीच की. ते पुढच्या मुलाला म्हणायचे “हां, तू म्हण रे पुढे ; “बे दोनी? “ हा भाऊ त्याच्या तीनच्या पाढ्यात गुंग झालेला. तो सहज म्हणू लागला,”बे दोनी साहा!” बे त्रिक नऊ “ फटकन छडी बसली तेव्हा पुढचे ‘बे चोक बारा’ कळवळण्यातच विरून जायचे.

रोज असे व्हायचे. त्यामुळे काही दिवस आमच्या वर्गाला कविता ओरडायला मिळाल्या नाहीत. तेव्हा लच्छ्या शिंदेनीच सांगितले,”मास्तर त्या तोतऱ्याला शेवटी ठेवा. म्हणजे नंतर आम्हाला कविता तरी म्हणता येतील.” मास्तरांनाही पटले.

काही वेळा संपूर्ण वर्गाला एकसाथ पाढे म्हणायला लावत मास्तर. हे बऱ्याच जणांना फायद्याचे होते. काहीजणांच्या दुधात ह्यांचे पाणी बेमालूम मिसळून जाई. त्यातही एक लई खारबेळं होतं. कुठलाही पाढा असला तरी हा नेहमी नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव करत पंच्याण्णव पासून घाई करत ‘धावर पूज्य शंऽऽभर “ म्हणत मांडी ठोकायचा. पुढच्या वर्गात गेला की “धा एक्के धा करत ‘धाही धाही शंभर” हाच पाढा घाई घाईत म्हणायचा. त्याही पुढच्या वर्गात पुन्हा हा “वीसेके वीस” करीत वीस धाय दोनशे” म्हणत उडी मारायचा. त्याने असे “ तीस धाय तीनशे” पर्यंत मजल मारली होती! ह्यानेच पुढे “पाढे मेड ईझी” हे पुस्तक लिहिले! का लिहिले तर तो नंतर खरंच एका लघु उद्योगाचा का होईना मालक झाला होता.

आमच्या पाढ्यांची आणखीन एक खासीयत होती.सुरुवातीला सगळी मुले “एक्कोण चाळीस, एक्कूण चाळीस पर्यंत व्यवस्थित म्हणत. पण एके चाळीस ची गणती सुरू झाली की सगळा वर्ग ‘एकेचाळ’ , बेऽचाळ… , स्हेचाळ,… अठ्ठेचाळ असेच म्हणत. मग त्यात शिंदे, कोठे,जाधव, रशीदसह पट्या,गुंड्या,उंड्या,सोहनी,सावकार, देशपांडे हे सुद्धा आले!

शेवटच्या तासाला खरी शाळा सुरु होई! सगळ्या गावाला समजे की इथे शाळा भरते. कारण कविता म्हणायला सुरुवात झालेली असे. “पाखरांची शाळा भरे …” ही कविता वर्गाला असो नसो पण कुठलेही दोन तीन वर्ग ह्या कवितेतच हमखास ओरडत असत. त्यानंतर दुसरी हिट कविता म्हणजे “धरू नका ही बरे, फुलांवर उडती फुलपाखरे!”

कविता म्हणायला सगळी मुले एका पायावर तयार असत. एरव्ही मुकी बहिरी असणारी मुलेही कवितेच्या आवाजात आपला आवाज बिनदिक्कत मिसळत. मोर्चा, मिरवणुकीत भित्राही शूर होतो त्याप्रमाणे ही मुखदुबळी मुलेही कवि होत काव्यगायन करू लागायचे. बरं, चाल एकच असली तरी म्हणणारा ‘आयडाॅल’ आपल्या पट्टीत थाटात म्हणणार. त्यामुळे ‘धरू नका ही बरे’ ह्या ओळीपासूनच कुणाच्या गळ्यामानेच्या तर कुणाच्या कानशीलापासल्या शिरा फुगलेल्या असत! निरनिराळ्या वर्गातून काही त्याच तर काही वेगळ्या कवितांचा कोलाहल ऐकू येत असे.

कवितेमुळे शाळेत निराळेच वारे भरले जायचे! शाळाही आताच भरल्यासारखी वाटायची. शाळा भरूच नये असे शाळेला जाताना वाटायचे. पण शाळा सुटूच नये असे फक्त ह्या शेवटच्या तासाला वाटायचे.

पाढ्यांवरून सुरवात झाली पण शेवट आम्ही ‘ पोरे भारी कवितेचा गोंगाट करी” ह्या ओळीच्या गोंगाटातच करावा म्हणतो !