मॅरिएटा
पुढे चालू …..
ती. अण्णांविषयी खूप आठवणी आहेत. रविवारी , सणासुदीच्या सुट्टीच्या दिवशी आमची दुपारची जेवणे म्हणजे खऱ्या अर्थांनी “काव्य-शास्त्र- विनोद” ह्यांनी रसभरित व्हायची. अण्णा कधी कधी त्यांच्या फर्ग्युसन कॅालेजच्या गोष्टी सांगत. त्यातल्या दोन तर आम्हा सर्वांच्याच-शैला अमलाच्यासुद्धा- लक्षात राहिलेल्या आहेत. त्या गप्पांमध्ये आम्हा सर्व भावंडाचा सहभाग असे. त्यामुळे जेवण तर लांबत असेच. पण जेवण संपल्यावरही पाटावर बसून गप्पा रंगतच असत. सगळ्यांचे हात कोरडे झाले असत. ओट्यावर आई शांतपणे बसलेली असे. कुणाच्या तरी लक्षात येई.” अरे अजून आईचे जेवण व्हायचेय की!” अण्णा मग लगेच उठत. मागोमाग आम्हीही. जेवणापेक्षा ह्या गप्पांच्या पंगतीच रंगत असत.
अण्णांनी फर्ग्युसन कॅालेजमध्ये असतांना गॅदरिंगच्या कार्यक्रमासाठी “ वसतिगृहात” ही प्रहसनात्मक एकांकिका लिहिली होती. ती पाहायला प्रमुख पाहुणे “केसरी” चे संपादक व साहित्यसम्राट न.चि. केळकर ह्यांना आमंत्रण देण्यासाठी अण्णा व इतर पदाधिकारी विद्यार्थी गेले त्यांच्याकडे. अगोदर नाही नाही म्हणत होते. पण तरुणांचा हिरमोड होऊ नये म्हणून अखेर ते तयार झाले. पण एका अटीवर- “ मी फक्त दहा मिनिटेच थांबेन”. अण्णा व इतरांनी ते मान्य केले.
त्या विनोदी नाटिकेचा प्रयोग अर्थातच फर्ग्युसनच्या ॲम्फी थिएटरमध्ये होता. गॅदरिंगचे अध्यक्ष न.चि. केळकर आले. दहा मिनिटासाठीच येईन म्हणणारे साहित्यसम्राट व लो. टिळकांच्या प्रख्यात केसरीचे संपादक, विद्यार्थ्यांच्या गडगडाटी हसण्यात सामील होऊन नाटिका प्रहसन पूर्ण होईपर्यंत शेवटपर्यंत थांबले होते. अण्णांना स्वतःचा अभिमान का वाटणार नाही?
मराठी कवितेला नविन वेगळे वळण देणाऱ्या रविकिरण मंडळाचे अध्यक्ष कविवर्य डॅा. माधवराव पटवर्घन उर्फ माघव ज्युलियन हे होते. ( “प्रेमस्वरूप आई,” “मराठी असे आमुची मायबोली, “ “ … वाघ बच्चे फाकडे, भ्रांत तुम्हां कां पडे? कवितांचे कर्ते) ते एकदा अण्णांना बरोबर घेऊन रविकिरण मंजळाच्या सभेला गेले. तिथे असलेल्या सर्व प्रसिद्ध कवींशी – कवि यशवंत, कवि गिरीश( नाटककार वसंत कानेटकरांचे वडील) व इतरही – त्यांनी अण्णांची ओळख ,” हे माझे तरुण कविमित्र…” अशी करून दिली. अण्णा पुढे सांगत ही खरी मोठ्या मनाची माणसे ! दुर्मिळ आहेत! “ ह्यामुळे कवि गिरीश व यशवंत ( आई म्हणोनि कोणी ह्या अविस्मरणीय कवितेचे जनक) अणांचे चांगले मित्र झाले. त्यावेळी अण्णा, आबासाहेब ती. बाबा वगैरे रिठ्याच्या वाड्यांत राहत होते . तिथे बरेच वेळा कवि गिरीश त्यांच्या घरी मुक्कामाला असत.त्या वेळी ते आपल्या जुन्या, नवीन कविता म्हणून दाखवीत. ते कविता कशा म्हणत ह्याची नक्कलही अण्णा “गेले तुझ्यावर मन जडून राऽमा गेले…” असे साभिनय करीत!
“प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा —“ हे महाराष्ट्र गीत लिहिणारे, तसेच “ सुदाम्याचे पोहे” ह्यासारखे अप्रतिम विनोदी पुस्तक लिहिणारे, नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे त्यावेळच्या साहित्यिकात मोठे प्रस्थ होते. स्वतः प्रतिभाशाली नाटककार व विनोदी लेखक नाटककार आणि कवि राम गणेश गडकरी, श्री.कृ . कोल्हटकारांना गुरू मानीत. तर सांगायचे असे की, आमच्या ती. अण्णांचे “पैशाचा पाऊस” हे नाटक मुंबई पुणे व इतरत्र गाजत होते. अण्णांची व श्री.कृ. कोल्हटकरांची चांगली ओळख झाली. कधी कोल्हटकर अण्णांना आपल्याबरोबर निमंत्रित ठिकाणी घेऊन जात. तिथे गेल्यावर कोल्हटकर अर्थातच तक्के लोड असलेल्या गादीवर बसत. अण्णा नम्रपणे त्यांच्या बाजूल पण जरा खाली सतरंजीवर बसत. ते पाहिल्यावर स्वतः कोल्हटकर मोठ्याने आपल्या शेजारी गादीवर थाप मारत म्हणत,” अहो कामतकर इथे या. इथे बसा. अहो तुम्ही आम्ही नाटककार आहोत. असे इकडे या.” म्हणत अण्णांना आपल्या शेजारी बसवून घेत. ती. अण्णा त्यांचा मोठेपणा सांगण्यासाठी नव्हे तर वर माधव ज्युलियन संबंधात ते म्हणाले तसे ,” अशी खऱ्या मोठ्या मनाची उदारवृत्तीची माणसे दुर्मिळ!” हे पटवून देण्यासाठी सांगत. श्री.कृ कोल्हटकरांचे सुपुत्र प्रभाकर कोल्हटकर आमच्या घरी एकदा आले होते.
आमच्या हायस्कूलच्या दिवसात महाराष्ट्रात दोन वक्तृत्व स्पर्धा प्रतिष्ठेच्या होत्या. पुण्याची रानडे वक्तृत्व स्पर्धा आणि बेळगावचीही रानडे स्पर्धा. आम्ही हायस्कूल मध्ये नुकतेच गेलो होतो. आमच्या वर्गात स्पर्धक मुले मुली स्पर्धेच्या तयारी साठी ती भाषणे आम्हापुढे करीत. नंतर कळले की काही वर्षे आमचे ती. अण्णा ही भाषणे लिहीत. त्यांनी तयार करून दिलेल्या भाषणांनी व त्या मुलींच्या वक्क्तृत्व कलेने दोन वर्षे – वनमाला किंवा शरयू चितळे व विदुला लळित ह्या त्या दोन मुली!- ह्यांनी दोन्ही स्पर्धा जिंकल्या होत्या. पुढे मग आमच्याच हायस्कूल मध्ये शिक्षक असलेले माझे चुलत भाऊ गो. रा. कामतकर हे भाषणे लिहित. एके वर्षी आमच्या श्यामने दोन्ही स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने बेळगावची रानडे स्पर्धा जिंकून ती गाजवली!
ती अण्णांना अनेक लेखक आपली पुस्तके भेट म्हणून पाठवत असत. मग त्यामध्ये सोलापुरला आमच्याच कॅालेजात प्राध्यापक असलेले कवि डॅा. वि. म. कुळकर्णीचे ‘कमळवेल’ हा काव्यसंग्रह, चरित्रकार व ती. अण्णांचे सहाध्यायी मित्र गं. दे.खानोलकरांचे “ माधव ज्युलियन यांचे चरित्र , य. गो. नित्सुरे यांचे त्या काळी वेगळ्या विषयावरचे “कुमारांचा सोबती, सुप्रसिद्ध कथालेखक वि. स. सुखटणकर ह्यांनी त्यांचे “ टॅालस्टॅायच्या बोधकथा” , तसेच अण्णांचे मित्र प्रख्यात लेखक य. गो. जोशी ( वहिनींच्या बांगड्या फेम) ह्यांची पुस्तकेही ; आणखी स्थानिक लेखकांची पुस्तकेही ! किती तरी!
ती. अण्णांचा ज्योतिषाचाही चांगला अभ्यास होता. विशेषतः कुंडलीचे ज्ञान. त्यानंतर हस्त सामुद्रिक. हा वारसा आमच्या ती वासुनानाने चालवला. पण पुढे त्याने सांगण्याचे थांबवले. ते जेव्हा दिल्लीला कोर्टाच्या केससाठी गेले होते त्या प्रवासात त्यांच्या ज्योतिषाच्या अभ्यासाला चांगलेच यश मिळाले. त्यानंतर, त्यांना प्रवासात भेटलेल्या व ज्यांचे त्यांनी भविष्य सांगितले असेल त्या प्रवाशांची एक दोन वर्षे तरी पत्रे येत होती.
अण्णांना रेल्वेच्या केसेस मुळे हैद्राबाद सिकंदराबाद तसेच दिल्ली येथे प्रवास करण्याची मोठी संधी मिळाली. आम्हाला आठवते ते जेव्हा दिल्लीहून येत तेव्हा आठवणीने आग्र्याचा पेठा घेऊन येत असत.
प्रवासावरून आठवले . सोलापुरच्या श्रीयोगी अरविंद मंडळाच्या मंडळींची कलकत्ता गया काशी वगैरे ठिकाणी जाण्याच्या यात्रेत ती. अण्णा व योगिनी प. पू. मावशी ह्यासुद्धा होत्या. कलकत्याला अर्थातच ते रामकृष्ण परमहंसांच्या दक्षिणेश्वर येथील मंदिरात वगैरे जाऊन आलेच. गयेलाही गेले . बोधीवृक्षही पाहिला असणार. पण प्रवासानंतर एक दोन वर्षांनी ते मला म्हणाले की गयेला मी माझे स्वतःचे श्राद्धही करून घेतले. केले. थोडावेळ मी अवाकच झालो. ते म्हणाले की ही फार पूर्वींपासून चालत आलेली प्रथा आहे. गयेला गेले की अनेकजण असे करतात. मग आपण गेल्यानंतर कुणी श्राद्ध करो न करो. तो प्रश्न राहात नाही.
ती. अण्णा गेल्यानंतर त्यांच्या जुन्या आणि हयात असलेल्या कुणाला कळवायचे त्यासाठी मी, वासुनाना,श्याम, अण्णांना आलेली पत्रे पाहात होतो. त्यामध्ये कोण कोण असावेत? नागपुरचे प्रसिद्ध साहित्यिक व त्यांच्याच तरुण भारतचे संपादक ग. त्र्यं माडखोलकर, , श्री. कृ. कोल्हटकर, प्रभाकर कोल्हटकर, कोठीवाले, खांडेकर, दिल्लीला क्युरेटर पदावर असलेले मुंबईचे श्री दिघे , कवि गिरीश, खानोलकर, सुखठणकर, समीक्षक टीकाकार श्री. श्रीकेक्षी ( म्हणजेच श्री. के. क्षीरसागर), चिं.वि. जोशी, संत साहित्याचे अभ्यासक व प्रेमबोध ह्या मासिकाचे संपादक पंढरपुरचे भा. पं. बहिरट, वगैरे. आज ह्या नावांचे कुणाला फारसे महत्व वाटणार नाही. पण ही मंडळी आपापल्या परीने सर्वांना माहितीची व प्रसिद्ध होती.
आणखीही पुष्कळ आठवणी आहेत. लिहायच्या आहेत. आपल्या सगळ्यांनाच ती. अण्णा त्यासाठी प्रेरणा देतील ह्यात शंका नाही. आज फार वाईट वाटते ते एका गोष्टीचे ; ती. सौ. ताई , ती. सौ. माई, ती. वासुनाना , श्याम, नंदू,चंदू,मालू नाहीत आपल्यांत. त्यांनी ती. अण्णांच्या, त्यांच्या ह्याहून जास्त मोलाच्या आठवणी सांगितल्या असत्या!
आमची शैला व अमला ह्यांच्यापाशीही ती. अण्णांच्या आठवणींच्या अत्तराच्या खूप कुप्या भरलेल्या असणार. त्या दोघीही छान भर घालतील.
ती. आई आणि अण्णांनी, आम्हा भावंडांना कुणालाही कधी अरे अभ्यास करा , केला की नाही वगैरे सांगितले नाही. विचारलेही नाही. किंवा वळण लावले वगैरे काही नाही. त्यांचे वागणे बोलणे, रोजचे आचरणच न कळत आम्हाला काही शिकवत गेले असावे. आम्हीच काय आमच्या मुलाबाळांनीही त्यांना पुस्तके वाचतानाच जास्त पाहिले असेल! बहुधा आम्हालाही त्यामुळे न कळत वाचनाची आवड निर्माण झाली असावी.
ती. अण्णांच्या साहित्यिक प्रतिभेचा वारसा चि. चंदूला लाभला. तो त्याने आणखीनच जोमाने यशस्वीरीत्या पुढे नेला. आज मेधाची नेहा व चि. नंदूचा अभिजित ही तोच वारसा पुढे नेत आहेत.
ती. अणांनी स्वतंत्र व्यवसाय, उत्तम, नेकीचे, गरीबाचे वकील अशी ख्याती मिळवून चांगला केला. तोच स्वतंत्र व्यवसायाचा वारसा आपल्या नंदूने डॅाक्टर होऊन पुढे चालवला.मेधानेही वकील होऊन ती तो पुढे नेत आहे.
आपला श्याम ती. अण्णांचे श्राद्ध त्याच्या अखेरीपर्यंत, निष्ठापूर्वक व प्रेमाने, शास्त्रोक्त विधिवत् करीत असे. सुरुवातीची काही वर्षे मीही करीत होतो. पण आता खंड पडला . आज ती. अण्णांचा तिथीप्रमाणे श्राद्धाचा दिवस आहे. मी त्यांच्या आठवणींना पुन्हा उजाळा देऊन त्यांची श्रद्धापूर्वक आठवण करीत आहे.
ती. प.पू. अण्णा ( आणि अर्थातच ती. आई तुझेसुद्घा) आम्हा सर्वां सर्वांना तुमचे आशीर्वाद सतत लाभोत ! ती. अण्णा! तुमचे गुणसंकीर्तन करण्याची संधी व पात्रता आम्हाला लाभू दे.