पंढरपूरहून सासवडला आम्ही रात्री पोहोचलो. सासवडला आमचा
रात्रीचा मुक्काम छत्रपती शिवाजी हायस्कूल मध्ये होता.शाळेची इमारत
भली मोठी होती. पण त्यापेक्षाही शाळेचे मैदान फार मोठे होते.विद्यार्थी
मोठे भाग्यवान.
शाळाचुकार विद्यार्थी जसा मास्तरांचा डोळा चुकवून हळूच वर्गात
येऊन बसावा त्याप्रमाणे आम्ही दुसरे दिवशी सकाळी पुन्हा वारीत सामील
झालो. सासवडहून निघाल्यावर पुढचा मुक्काम जेजुरीला.पुण्यापासून
वारकऱ्यांसाठी अनेक उदार लोक ठिकठिकणी चहा, फराळ जेवणाची सोय
करतात. वारीतील अनेक गोरगरीबांना त्याचा फायदा होतो. पुणे सासवड सोडले
की अशा सोयी कमी होतात असे ऐकले होते. पण तशी काही फारशी तफावत
दिसली नाही.जेजुरीपर्यंत अनेकांनी उदार हस्ते अशा सोयी केल्या होत्या.
दात्यांची संख्या कमी असेल पण दिंडीशिवाय येणाऱ्या अनेक गरीब
वारकऱ्यांसाठी त्या पुरेशा होत्या. पुढे नातेपुतेपासून ते वाखरीपर्यंत
अनगरकर मंडळींनी(अनगरचे पुढारी आणि समस्त गावकऱ्यांनी) तर
माऊलीच्या वाटेवर रोज सकाळी-दुपारी चहा नाश्ता, दुपारी जेवणाची
चांगली सोय केली होती. अनेक गोरगरीब शेतमजूर,कष्टकऱ्यांचे दुवे ह्या आणि
इतर अनेक दात्यांना मिळाले असतील ह्यात शंका नाही.
सासवड ते जेजुरीची ही वाटचाल,पुणे ते सासवड आणि त्यातील
घाटाची चढण ह्या पेक्षा पुष्कळच सोपी. पण मी अंगात ताप घेऊनच
जेजुरीपर्यंत आलो. आमच्या दिंडीचा मुक्काम जेजुरीच्या एस.टी. स्टॅंड शेजारी
होता.आमच्या दिंडी सकट अनेक दिंड्यांचा तळ तिथे पडला होता. माझे अंग
दुखत होते. ताप भरला होता.
जेजुरीला माऊलीच्या पालखीचा जिथे मुक्काम असतो तिथे सर्व
दिंड्या एकत्र येतात. त्यांच्या काही तक्रारी, अडचणी, सूचना असल्या
तर त्या ऐकल्या जातात व पालखीबरोबरचे प्रमुख त्या ऐकून त्यावर
निर्णय जाहीर करतात, निवारण करतात. मग आरती हॊऊन हा कार्यक्रम
संपतो. ही फक्त रूपरेखा झाली. पण सर्व दिंड्यांचे एकत्र येणे,
त्यानंतर माऊलीची पालखी येण्यापासून तिचे ह्या दिंड्या मोठ्या
चढाओढीने भजने, अभंग,नामघोष करून स्वागत करतात.ह्या सर्व
गोष्टीतील आणि तिथे जमलेल्या अफाट गर्दीतीलही शिस्त, मग निस्तब्ध शांतता,
ज्ञानराज माऊलीची आरती वगैरे पहण्यासारखे असते,असे डॉक्टरांनी
सांगितले. पुढेही वारीत दोन तीन ठिकाणी हा कार्यक्रम असतो. पण आजचे
ठिकाण जवळच आहे म्हणून मी जायचे ठरवले.
मी एकटाच निघालो. मैदान जवळच म्हटले तरी एक दीड कि.मी.
असेल. त्याशिवाय प्रचंड गर्दीचे लोंढे होतेच.
मी त्या मैदानात पोचलो.गर्दी होतीच. वारकरी होते, आजूबाजूच्या
लहान गावातील, खेड्यातील,वाड्या-वस्तीतील लोक, जेजुरीतील लोक असा मोठा
जनसमुदाय जमला होता.
मैदानाच्या एका बाजूला माऊलीच्या मुक्कामासाठी मोठ्या सुबक
चौथऱ्यावर एक मोठा सुंदर तंबू होता. हार फुलांच्या माळा आणि
विजेच्या दिव्यांनी नटला होता.
एक एक दिंडी येऊ लागली. मैदानाच्या चारी बाजूंनी त्या दिंड्या
आपापल्या जागी उभ्या राहू लागल्या. पण हे सर्व संगीतमय वातावरणात
चालले होते. माऊलीच्या पालखीच्या स्वागतासाठी आपण आलो आहोत हे जाणून
दिंड्या,माऊली वगैरे टाळमृदुंगाच्या साथीने, मोकळ्या राना-मैदानात
गाण्याची सवय झालेल्या तापल्या गळ्याने, जोरात म्हणत येत होते.
दिंडीतील वारकऱ्यांच्या गायकीतील जोष आणि तन्मयता
अनुभवण्यासारखी असते.
सर्वांचे कान टाळमृदुंगाच्या आवाजाने भरले होते आणि डोळे
श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखीकडे लागले होते.
अधून मधून लोक मध्येच उठून माऊली, माऊली, श्रीज्ञानदेव-
तुकारामाचा गजर करत उभे रहायचे. पण माझ्या जवळ बसलेले गृहस्थ
म्हणायचे, “अहो, अजून वेळ आहे; उठू नका.अजूनही दिंड्या इकडून येताहेत.
माऊली (हात दाखवून) तिकडून येणार आहे.”
माऊलीच्या स्वागतासाठी तंबूच्या दोन्ही बाजूला उभ्या
असलेल्या दिंड्यांतून वारकरी म्हणत असलेल्या अभंगांचे शब्द नीट कळत नव्हते
पण टाळ मृदुंगाच्या नादातून साध्या सुरेख चालीवर तरंगत आलेले सूर
कानावर येत होते. चहूकडून येणाऱ्या सुरांच्या गोपाळकाल्याने
वातावरण भारावून गेले होते. तेव्हढ्यात माऊलीची पालखी आली.
चोपदाराने आपल्या हातातील दंडा उंच उभारल्या बरोबर
सर्वदूर क्षणात शांतता झाली. सर्व काही स्तब्ध. फक्त शांतता.
दिंड्यातील टाळ मृदुंगही गप्प झाले. पण एका कोपऱ्यात मात्र टाळांचा
आवाज ऐकू येतच होता. म्हणजे त्यांची काही तरी तक्रार असणार.
पालखीबरोबरची मोठी माणसे तिकडे जाऊन तक्रार ऐकून आली असावीत.
तक्रार मोठ्यांदा सांगण्यात आली व त्यावरील निकालही दिला. मग
काही निवेदने व इतर सोपस्कार झाले. पालखी मुक्कामासाठी माऊलीच्या
तंबूकडे निघाली. दर्शनासाठी गर्दीही पुढे सरकू लागली.
मी तापाने फणफणलो आहे, थकलेला आहे हे लक्षात आल्यावर माझ्या शेजारी
बसलेल्या त्या माहितगार माणसाने माझा हात धरून,तशा त्या गर्दीतून मला
सुरळीतपणे मुख्य रस्त्यावर आणले आणि माझ्या दिंडीचा तळ जेथे होता त्या
रस्त्याला मला लावून दिले.
शेतकीखात्यातून निवृत्त झालेल्या त्या सज्जनाचे नाव विचारायचे मी विसरलो.
त्यानेही सांगितले नव्हते.
पंढरीच्या वारीत अशीच असंख्य अनामिक, साधी माणसं मदत करत असतात.
त्यामुळेच वारीत प्रत्येकजण दुसऱ्याला “माऊली” म्हणत असावा!