तरडगावाहून फलटण पर्यंत वीस किलोमीटरची चाल आहे. रात्रीचा मुक्काम
फलटणला होता.
आमची जोडी–श्री. आवताडे आणि मी–चालत चालत, थांबत थांब फलटणला
यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या भव्य इमारतीत यॆऊन
पोहोचलो.
आज तंबूत मुक्काम नाही ही एक चांगली गोष्ट झाली. फलट येण्या अगोदर
पासूनच पावसाला सुरुवात झाली होती.फलटणला पोचलो तर तिथे मुसळधार
पाऊस पडत होता.शाळेच्या रस्त्यावर आणि सभोवती पाणी साचले होते. चिखलच
चिखल झाला होता. त्यामुळे आज मुक्काम शाळेच्या वर्गात आहे म्हटल्यावर
सगळ्यांना हायसे वाटले.
अनेक दिंड्या शाळेतच उतरल्या होत्या. दोन तीन दिंड्यांच्या जेवणाची एकच वेळ
आली. कोणत्या दिंडीची पंगत कुठे संपते आणि दुसऱ्या दिंडीची कुठे सुरू होते
हे त्या त्या दिंडीच्या वाढप्यांना लक्षात येणे कठिण झाले. पंगतीत बसलेलेच
आपला वाढपी पुढच्या ताटांत वाढत चालला हे लक्षात आल्यावर, “माऊली
इकडे; तिकडे नाही”. असे सांगत त्यामुळे “माऊली इकडे इथे; तिकडे नाही,” याचा
गलबला दर पाच सात मिनिटांनी होई!
दुसऱ्या दिंडीत आज काय बेत होता, काय गोड होते त्याचा लाभ झाला नाही ह्याची
रुखरुख माझ्यासारख्या अनेकांना वाटली!