रेडवूड सिटी ४ जून, २००८
नेहमीप्रमाणे बाळासाहेबांचे पत्र आले. नेहमीप्रमाणे पत्र वाचून आनंदही झाला. पण त्यांच्या अलिकडील काही पत्रातून,”कुणाशी बोलावे,चार गोष्टी कराव्यात तर तसे कोणी आसपास दिसत नाहीत. कोणी फारसे भेटत नाहीत. आवडीने बोलावे, थट्टामस्करी, प्रसंगी थोडासा वात्रटपणा करावा असे शेजारी जवळपास भेटत नाहीत.कुणाकडे जावे तर असे तडक जाताही येत नाही.” अश्या थोडाश्या निराश तक्रारीचा सूर जाणवत होता.मला वाटले ते परदेशात असल्यामुळे त्यांची अशी मन:स्थिती झाली असावी.
सध्या परदेशातच नव्हे तर आपल्या येथेही वारंवार एकमेकांकडे जाणे येणे कुठे होते? आले मनात की गेलो मित्रांकडे,नातेवाईकांकडे,असे घडत नाही. इतकेच काय शेजाऱ्यांकडे जाऊन गप्पा-टप्पा,थट्टा-मस्करी, पत्ते कुटणे होत नाही. कारणे अनेक असतील पण थोडक्यात सांगायचे तर बदललेली, रोज बदलत असलेली परिस्थिती हेच मुख्य कारण होय.
माणसे भेटावीत,आपण जाऊन त्यांना भेटावेत असे सर्वांनाच वाटते.काही काळापूर्वी म्हणजे घरांचे दरवाजे उघडे असण्याच्या काळात हे शक्य होते. बोलावून, न बोलावता, शेजारी, जवळपासचे असे भेटत असत.भेटीगाठी सहज होत.
हुंकाराला शब्दांचा अंकुर फुटण्यापूर्वी, आवाजाला शब्दांची पालवी बहरण्यापूर्वी; दळणवळणाची साधने येण्यापूर्वी माणूस एकमेकांना कसा भेटत असेल,कसाबोलत असेल! आपला प्रतिध्वनी ऐकू आला तरी त्याला कोणी भेटल्याचा, कोणाशी बोलल्याचा आनंद झाला असेल!
माणूस बोलयला लिहायला लागल्यावर तो पक्ष्यांमार्फत चिठ्यांतून संदेश पाठवू लागला. भेटता येत नाही,गपा मारता येत नाहीत यावर माणसाने शोधून काढलेला उपाय म्हणजे पत्र.असे म्हणतात की, परमेश्वराला एकाच वेळी सगळीकडे,सगळ्यांकडे जाता/पाहता यॆईना म्हणून त्याने ’आई’ निर्माण केली.माणसाने ’पत्र’ शोधून काढले! पत्रं लिहायला सुरूवात केली.पत्रातून भेटी गाठी हॊऊ लागल्या,होत आहेत आणि पुढेही होतील.काळाप्रमाणे पत्र आपले रूप बदलेल.
नळ-दमयंतीचे पत्र हंस होते.कालिदासाने तर कमाल केली. त्याच्या यक्षाने मेघालाच आपले पत्र केले.’न देखे रवि,ते देखे कवि’अशा प्रतिभावान कवींनी चंद्रालाही पत्र केले– साजण आपल्याला विसरला अशी त्याच्या भेटीसाठी तळमळत असलेली प्रेयसी ’चंदा देस पियाके जा’आणि त्याला समजावून परत घेऊन ये अशी चंद्राला विनवणी करते.तर माहेरच्या आठवणीने मन भरून आलेली सासुरवाशीण, अंगणात आलेल्या पाखराला ’माझिया माहेरा जा’, तुझ्या सोबतीला माझे आतुरलेले मन देते आणि माहेरची वाट दाखवायला भोळी आठवणही देते,असे म्हणत पाखराला आपले पत्र करते. तुरुंगात बंदीवान झालेला क्रांतिकारक तर आपल्या श्वासांना पत्र करून आपल्या ह्रुदयातील खंत मातृभूमीला कळवतो!
पत्रांतून माणूस आपले विचार, मतं कळवतो.मनातल्या गोष्टी, ह्रुदयातील गोड गुपित सांगतो, मन मोकळे करतो. पत्रातून माणसे एकमेकांना भेटतात ही कवि-कल्पना वाटेल किंवा भाषालंकार. पण भेटत असली पाहिजेत. काहींना तर ती दिसतातही! असावीत; कुणी सांगावे? तसे नसते तर उगीच का कुणी एखादे पत्र ओठांना लावून ह्रुदयाशी घट्ट धरतो? का कुणी हातात पत्र फडफडवत हसत हसत सगळ्यांना दाखवत घरभर फिरतो? का कोणी आराम खुर्चीतून उठून,नाकावर घसरलेला चष्मा सावरत,”पाहिलस का…आपला…काय म्हणतोय” म्हणत कौतूकभरल्या डोळ्यांनी ते पत्र दुसऱ्या चष्म्याला देतो! पत्र वाचल्यावर आपल्याला आनंद होतो,आपण तरंगतो,बुडून जातो,थोडेसे चकित होतो, सुखावतो, काळजीतही पडतो. सगळे कसे कोणी भेटल्यावर बोलल्यावर वाटते तसेच पत्र वाचून होते यात शंका नाही.कवींचे मेघ, चंद्र, हंस, पाखरू, श्वास हे वरवर पहाता पत्र-दूत वाटतील, पण ती त्यांची पत्रेच आहेत.
सध्याच्या अतिशय वेगवान काळात एकमेकांना भेटणे, गप्पा गोष्टी करणे पत्रं लिहिणे शक्य होत नाही.पण शब्दसृष्टीच्या परतिभावंतांने लिहिलेल्या शब्दांतूनही मणसे भेटवण्याची दिसताहेत अशी भावना निर्माण केली त्याचप्रमाणे प्रतिभाशाली वैज्ञानिकांनी त्याहीपेक्षा सोयीचे,उपाय शोधून आपल्या हातात दिले. दूरध्वनी, बिनतारी संदेश,आणि ह्यांचीच आजची बदलली विविध रूपे पाहिली की आपण थक्क होतो.परिसाचा एक लहानसा तुकडा सर्व लोखंडाचे सोने करतो. तसे आजच्या विज्ञानयुगातील लहानशा परिसाने-मायक्रोप्रोसेसर चिपने[लघुतम क्रियाप्रक्रियाकारी ?]सर्व विश्व आपल्या घरात आणून ठेवले! संगणकावरून आपल्या अनेक मित्रांशी एकाच वेळी बोलता येते.संगणकातून पत्र लिहिले तर ते पोचायला एक क्षणही लागत नाही. दूरध्वनी वरून बोलताना समोरचा आपल्याला समोर दिसतो! व्हिडिओ कॉन्फ़रन्सिंगने[चित्रफितिमुळे]चार मित्रांची झकास गप्पाष्टकेही रंगू शकतात.आणि हे सर्व, मनात आले की क्षणार्धात घडून येते! चाळी-वाड्यांतील घरांची दारे उघडी असण्याच्या काळात जसे सहज होत असे तशाच आता ह्या मायक्रोप्रोसेसरच्या ’परिसा”मुळे हे सर्व साधते.भाषाप्रभू शब्द आणि कल्पना सृष्टीचे निर्माते तर विज्ञानप्रभू सत्याभास सृष्टीचे जनक.ह्या किमयागारांनी आणि त्यांच्या “परिसाने” प्रत्यक्ष आणि कल्पित, सत्य आणि मिथ्य, वास्तव आणि भास यामधील सीमारेषा इतकी पुसट,अंधुक केली आहे की भासाची चाहूलही लागत नाही! ही खरी किमया! पुन्हा कवींच्या शब्दातच म्हणावेसे वाटते ’प्रत्यक्षाहूनी प्रतिमा सुंदर’!
हा नव्या मनुचा नवा परिस हाताशी असल्यावर पूर्वीची ती पत्रे, त्या भेटीगाठी,त्या गप्पा नाहीत, ’गेले ते दिन गेले’ ही खंत कशाला? परिस हातात असल्यावर जुन्या सोन्याच्या खाणी उजाड झाल्या ह्याची चिंता कोण करेल? आणि का करावी?