भंडी शेगावहून निघालो. संपूर्ण वारीलाच आता आपल्या विठोबाचे
पंढरपूर जवळ आले आहे याची जाणीव झाली असावी. का कुणास ठाऊक
पण आज वारी भरभर,झपझप चालली आहे असे वाटत होते.आपल्या
मनाच्या कल्पना, दुसरे काय!
दुपारी वाखरीच्या वाटेवर बाजीरावची विहीर येथे उभे रिंगण आणि चौथे
गोल रिंगणही होणार होते.पण आम्ही त्यासाठी आज थांबलो नाही. चालतच राहिलो.
दुपारी अडीच वाजता आम्ही वाखरीला पोहोचलो. पालखी तळावर आलो.
केव्हढा प्रचंड तळ आहे हा! श्रीज्ञानेश्वर माऊलीची पालखी ज्या गोलाकार
ओट्यावर मुक्कामासाठी विसावते तो ओटाही मोठा भव्य आहे.
आजूबाजूला माऊली बरोबर आलेल्या अनेक दिंड्यांचा मुक्कामही इथेच होता.
सर्वदूर, तंबू, राहुट्या,ट्रक्स,टेंपो, पाण्याच्या मोटारी, वारकऱ्यांचे थवे,
निशाणे, पताका……..एक मोठे गावच वसले होते.
महाराष्ट्र सरकारने इथे पाण्याची आणि विशेषत: संडासांची मोठी आणि
चांगली सोय केली होती.आम्ही लवकर पोचलो होतो. त्यामुळे सर्व काही स्वच्छ
होते.
अनेक दिंड्यांच्या तंबू, राहुट्या, पाण्याच्या मोटारींच्या चक्रव्यूहातून
नेमक्या आमच्या दिंडीचा तळ सापडायला दोन तास लागलेच!
भंडी शेगाव ते वाखरी हे वीस किलोमीटरचे अंतर किती झटकन पार केले असे
सारखे वाटत होते. आणि उद्या फक्त पाच किलोमीटर चालायचे. जणू दोन तीन
पावलांच्या अंतरावर पंढरपूर!
पंढरपूरच्या वेशीपाशीच आलो की आपण! इतकी वर्षे पंढरपूरला
वारीतून जायचे,जायचे असे घोकत होतो.म्हातारी जाई पंढरपुरा ।
वेशीपासून यॆई घरा॥ या वाक्प्रचारातील म्हातारीसारखे आपले झाले
होते.उद्या पंढरपूरला पोचणार या आनंदातच आम्ही सर्वजण होतो.
सर्वच वारकऱ्यांना वाखरीला पोचल्यावर पंढरपुराला आलो ह्याचा
आनंद होत असणार. विठोबा आणि आपल्यामध्ये फक्त चार-पाच किलोमीटरचा
रस्ता! म्हणजे पंढरपूरच्या अंगणात आलो आपण.हाकेच्या अंतरावर पांडुरंग
आपली वाट पहात उभा आहे. हे विचार, जाणीव उत्साह वाढवणारी आहे.