वारीचे वैभव!

मी थेट आळंदीपासून वारकऱ्यांसोबत पंढरपूरच्या वारीसाठी निघालो.
आळंदीला त्या रात्री, उद्यापासून आपली वारी सुरू होणार ह्याचे थोडे अप्रूप
वाटत होते. पण सासवडला पोचलो तरीही आपली पंढरपूरची वारी होतेय
असे मनात येत नव्हते. नवखेपणाच्या नवलाईचा उत्साह अजूनही संचारला
नव्हता.

सासवडचा मुक्काम संपवून जेव्हा आम्ही जेजुरीला निघालो त्या क्षणापासून
मात्र मला एकदम काहीतरी निराळे वाटू लागले. अरे वा! निघालो की मी
पंढरपूरा! लहान मुलाला पहिल्यांदाच आगगाडीत बसून प्रवासाला जाताना
वाटते तसे काही तरी मलाही वाटत होते.वारीला आपण खरच निघालोय ही
भावना काही औरच होती!

गेली अनेक शतके ही वारी चालू आहे. सर्व संतांच्या पालख्यांबरोबर
वारकऱ्यांची ही वारी विठोबाच्या भेटीसाठी अखंड चालूच आहे. आज
आपणही त्यांच्याबरोबर त्या मार्गावरून जात आहोत. किंचित का होईना आपण
आज वारकरी झालो असा फार फार पुसटसा शिक्का माझ्यावर उमटला असेल याचा आनंद
झाला होता.

लहान मुलाच्या कुतुहलाने, त्याच्या डोळ्यांनी मी आजूबाजूला पहात होतो.
कुठेही, केव्हाही पाहिले तरी हजारो वारकऱ्यांची दाटी नदीच्या
प्रवाहासारखी सतत वहात असलेली दिसायची.

वारीचा रंग कसा सांगावा! वारीचा पोषाख पांढरा. पांढरा सदरा,
डोक्यावर पांढरे पागोटे किंवा गांधी टोपी आणि पांढरे धोतर,किंवा पायजमा.
कपाळावर नाममुद्रा– गोपीचंदनाचा टिळा त्यावर काळ्या बुक्क्याचा ठिपका.
मराठवाड्याचे वारकरी त्यांच्या गुलबक्षी तांबड्या रूमाला-पागोट्याने
उठून दिसायचे. वारकरी स्त्रीयांची रंगीत लुगडी-साड्या त्या पांढऱ्या
वारीत रंग भरायच्या. ह्या सर्वांवर वारकऱ्यांच्या हातातील गेरुच्या
रंगाची वारकरी पंथाची निशाणे, पताका जोरात फडफडत तर कधी
उंच उंच नाचत असत.

संत चोखोबाने( संत चोखा मेळा)म्हटल्याप्रमाणे,”टाळी वाजवावी गुढी
उभारावी । वाट हे चालावी पंढरीची॥ पतांकाचे भार मिळाले अपार…….”
आमची ही अडीच तीन लाख वारकऱ्यांची वारी टाळमृदुंग वाजवित,निशाणे
उंचावत, फडफडवत “हरीनाम गर्जता नाही भयचिंता” असे संत चोखोबाच्या
विश्वासाने हरीनाम गर्जत निश्चिंतपणे चालत होती.

टाळमृदुंगाच्या नादावर संतांचे अभंग तल्लीनतेने म्हणत,मध्येच आनंदाने
उड्या मारीत, कधी फुगड्या घालत,रिंगण धरून भजने म्हणताना
वारकऱ्यांच्या ओसंडणाऱ्या उत्साहाचे काय वर्णन करावे?

खेड्यापाड्यातील वारकरी बायकाही काहीना काही म्हणत, गुणगुणत चालत असत.
मग ती एकनाथांची गौळण असो,किंवा साधे “ज्ञानोबा माऊली तुकाराम,तुकाराम”
असो, मनापासून म्हणत.त्यांची काही गाणीही गमतीची असत. “जात्ये विठोबाला
(शी) भांडायाला”,किंवा कृष्णाविषयी, तो दिसल्यावर”गेली माझी घागर सुटून”
अशा गोड तक्रारीची,”द्येवा मी करत्ये धंदा व्यापार…देत्ये हो नाम उधार”…..
तरीही कोणी देवाचे नाव घेत नाही असे हताशपणे सांगणारे गाणे, म्हणत म्हणत
लांबची वाट सोपी करत.

[ह्या बाया-बापड्यांकडे अशा अनेक गाण्यांचा, लोकगीतांचा साठा आहे ह्याची
आपल्याला-निदान मला तरी नव्हती-अजूनही कल्पना नाही. ती ऐकताना
त्यांच्या पाठांतराचे तर कौतूक,आश्चर्य वाटायचेच पण हे ध्वनिमुद्रित करावे
असे सारखे वाटत होते.असो]

दूरदर्शनवर किंवा सिनेमात डोक्यावरची समई किंवा लहान कळशा, खाली पडू
न देता थोडा वेळ नृत्य केलेले पाहिले तर त्याचे किती कौतूक होते.पण वारीतील अनेक
स्त्रीया डोक्यावर तुळशीवृंदावनाची कुंडी, हाताचा आधार न देता,रोज वीस
पंचवीस किलोमीटर चालत असतात.डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेतलेल्या त्या
बाईच्या शेजारी डोक्यावर पाण्याने भरलेली लहान कळशी घॆऊन चालत असते
तिची दुसरी सोबती. तुळस सुकू नये म्हणून ती पाण्याची कळशी.हे असे थेट
पंढरपुरापर्यंत. ह्याला काय म्हणायचे? भक्तीमार्गातील हटयोग? काहीही
नाही.ही फक्‍त परंपरेने आलेल्या प्रथेवरची चालती बोलती भक्ती,श्रद्धा!

वारी म्हणजे एक चालते फिरते शहरच!

वारीमध्ये फक्त वारकरीच चालतात असे नव्हे. वारकऱ्यां़च्या रोजच्या गरजा
भागवणारे अनेक लहान व्यावसायिक वारीबरोबर असतात. न्हावी, पायताणे दुरुस्त
करणारे, ती विकणारे, साबण, काड्यापेट्या, मेणबत्त्या पान तंबाखू विकणारे असे
कित्येक हातावर पोट भरणारे लहान व्यावसायिक वारीबरोबर येत असतात. अगदी
पहाटेपासून, वारी जागी झाल्यापासून, आपल्या चहाच्या गाड्या तयार ठेऊन
गरम चहा देण्याऱ्या “सागर चहा,मोडलिंब”च्या अनेक हातगाड्या उभ्या असतात.
आपापल्या हातगाड्या ढकलत वारी चालू लागायच्या आत ठरलेल्या मोक्याच्या
जागा धरत तर कधी वारीबरोबर तर कधी पुढच्या थांब्याजवळ ह्या “सागर
चहा,मोडलिंब” च्या गाड्या सेवेला उभ्या असत.भजी, वडे, भेळ चुरमुरे वगैरे
पदार्थांची लहान हॉटेलं,टपऱ्या, गाड्या असतातच.लिंबाच्या सरबताच्या,
उसाच्या रसाच्या गाड्या वारकऱ्यांची तहान गोड करत. केळी, डाळिंबं,पेरु
विकणारेही भरपूर!

म्हणूनच वारी हे एक चालते फिरते शहर असते.एक दृष्टीने पाहिले म्हणजे
महंमद तुघ्लकानी राजधानी अशी हलवायला हवी होती असे वाटते. चहाची
प्रत्येक गाडी “सागर चहा, मोडलिंब”च कशी? असा प्रश्न पडला. मोडलिंबच्या
कोणी एकाने चहाची पहिली गाडी वारी सोबत आणली असावी. मग ह्या आद्य
चहावाल्याचेच नाव गाव इतरांनीही वापरायला सुरुवात केली असावी. बौद्धिक
संपदा हक्क, “फ़्रंचायझ”, “चेन ऑफ़ शॉप्स” अशा आधुनिक मालकी हक्काच्या सोयी
त्यावेळी आणि आजही अशा लहान गरीब चहाच्या हातगाडीवाल्याला कुठून लागू
पडणार? आणि अशा बिचाऱ्यांना ह्याची माहिती तरी कोण लागू देणार? बरं हे
नाव वापरणारेही बिचारे त्याच्या इतकेच लहान!

वारीच्या सुरवाती पासून ते थेट पंढरपूरपर्यंत अनेक उदार लोक चहा पणी,
खाण्याचे निरनिराळे पदार्थ, केळी, जेवणखाण मोफत देत असतात.

ऐपत असलेले आणि ऐपत नसलेले, असंख्य गोरगरीब वारकरी, थोडक्यात वारीत
कोणीही उपाशी राहात नाही!

वारीतील अनेकजण आपल्या आंघोळी, कपडे धुण्यासाठी विश्रांतीसाठी
रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतमळ्यांचा आश्रय घेत.त्या शेतमळ्यांचे मालक
शेतकरी मोठ्या उदार मनाचे असले पाहिजेत. पिकांना पाणी देणारे त्यांचे
पाण्याचे पंप वारीच्या दिवसात वारकऱ्यांसाठी दिवसभर धो धो पाणी देत
असत.तिथे वारकरी गर्दी करीत.

एक दोन गावातील शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला वारकऱ्या़ंच्या
आंघोळीसाठी फार चांगली सोय केली होती.अर्धा पाऊण किलो मीटर अंतरा पर्यंत
दहा-दहा, बारा-बारा पाण्याची कारंजी बसवली होती. त्या कारंज्याखाली
(शॉवर) शहरातील आधुनिक पद्धतीच्या आंघोळीचे(शॉवर-बाथ) सुखही
वारकरी लुटत होते. अशा सुंदर, मोफत सोयी करणाऱ्या शेतकऱ्यांना कोण दुवा
देणार नाही?

आपल्या घराच्या ओवऱ्यांवर, अंगणात, शेता-वावरात वारकऱ्यांना
विश्रांतीसाठी जागा देणारे,हे शेतकरीही वारकऱ्यांचा दुवा घेत असतील.

सुरवातीचे ३-४ दिवस मी आमच्या दिंडीच्या पाण्याच्या मोटारीखाली आंघोळ
करत असे. त्या तीन चार नळांवर बायका पुरुषांची ,तांबे, कळशा, बादल्यासह
गर्दी होई. शिवाय तिथेच नळाखाली घुसुनही बायका पुरुषांच्या आंघोळी
पहाटे ३-४ वाजल्यापासून सुरू होत.आजूबाजूला इतका चिखल, दलदल असे की
आंघोळ केली तरी आंघोळ झाल्यासारखी वाटत नसे.

लोणंद पासून मात्र मी, बहुसंख्य वारकऱ्यांसारखी वाटेत वाहत्या नळाखाली
आंघोळ करायचे ठरवले. माझ्याबरोबर माझे नेहमीचे सोबती असत. आम्ही दोघे
लवकर निघत असू. कमी गर्दीचे भरपूर पाण्याचे ठिकाण शोधण्यासाठी दोन्ही
बाजूला आमची टेहळणी चालू असे.बऱ्याच वेळाने अशी एखादी जागा
सापडायची. काही वेळेला रस्त्याच्या कडेला पाण्याच्या मोटारी असत. त्यांच्या
नळाखाली आंघोळी व्हायच्या.

एकदा आंघोळीची गंमतच झाली. रस्त्याच्या उताराला एक शेतमळा होत. तेथे
बरेच लोक न्याहारी करत होते. तो मोठा घोळका ओलांडून आम्ही पुढे जात राहिलो.
लांब पडवी असलेले शेतकऱ्याचे घर आले. थोड्या अंतरावर उसा जवळ पाण्याचा
पाईप चांगला पाणी ओतत होता. एक दोघेच आंघोळ करत, कपडे धूत होते. विचार
केला, कपडे साबण लावून भिजवून ठेवू. त्या दोघांचे आटोपत आले आहे. मग
आंघोळ करू निवांत. तोपर्यंत माझे सोबतीही “जाऊन येतो” म्हणून गेले. कपडे
साबणात भिजवून ठेवले. तेव्हढ्यात त्या दोघा वारकऱ्यांचेही आटोपले. मी
आंघोळीसाठी त्या मुसळधार पाइपाखाली वाकून बसलो. एक सेकंद,दोन सेकंद…..
तीन सेकंद झाले पण डोक्या पाठीवर पाण्याचा एक थेंबही पडला नाही. हा काय
चमत्कार म्हणून वर पाहिले तर पाणी बंद झालेले!

श्रीज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने सापडलेली गंगा एकदम सरस्वती प्रमाणे गुप्त
झाली! पायजम्यातली नाडी आत गेल्यासारखे पाणी पाइपात पुन्हा आतमध्ये
गेले. मी वेड्यासारखा पाइपात हात घालून पाहिला. मग काही अंतर पाईप
बाहेरून चाचपडत पहात राहिलो!

तेव्हढ्यात माझे सोबती आवताडेही आले. तेही चक्रावले. वीज गेली असावी असे
वाटले. पण वीज गेल्याचे तसेही काही दिसत नव्हते. इकडे तिकडे पाहिले. काही
सुचेना. परत कपडे घातले. शेतकऱ्याचा तरूण मुलगा दिसला. त्याला
सांगितले. त्याने दुर्लक्ष केले. काही वेळाने शेतकऱ्याची घरधनीण आली. तिला
मी सर्व हकिकत सांगितली. एखादी बादली पाणी दिली तरी मेहरबानी होईल असे
म्हणालो. त्या माऊलीने घरात जाऊन आपल्या घरधन्याला सांगितले असावे.तो
म्हातारा शेतकरी आला. आमच्याकडे न पाहता कुठे तरी गेला. मग काही
क्षणातच त्या पाईपाला पुन्हा पाझर फुटला!

आमच्या आंघोळी, कपडे धुणे निवांत झाले हे निराळे सांगायला नको. कोणत्या
का होईना ’माऊलीची’ कृपा झाली!

ह्याच्या अगदी उलट अनुभव एकदा आला.

एका मळ्यात चांगले नविन पद्धतीचे मोठे घर होते.थोडी वारकरी मंडळी
घराच्या अंगणात,आणि काही झाडाखाली थांबले होते.आम्ही तिथे गेलो.
पाण्याचा पाईप दिसला. मनात आले आंघोळीला ही जागा चांगली आहे.
घरातील माणसांना विचारले.त्यांनी, “इथे नाही. पुढे ढाबा आहे. तिथल्या
हौदावर आंघोळ करा”, असे सांगितले.

आम्ही पुढे निघालो. थोड्या अंतरावर ढाब्याच्या आवारात हौदाच्या तीन चार
नळाखाली लोक आंघोळी करत होते. कपडे काढले आणि नळ रिकामे झाल्यावर
आंघोळीसाठी गेलो.आता आंघोळीसाठी नळाखाली जाणार तेवढ्यात मालक आला.
त्याने आमचे दोन्ही नळ बंद केले.”इथे आंघोळ करायची नाही” असे बजावले.आणि
तो तिथेच थांबला. एक दोनदा मी विनवणी केली पण तो काही बधला नाही.
निमूटपणे परत जाऊन कपडे चढवले आणि पुढे निघालो.

वारीच्या वाटचालीत दुपारी उन्हं तापू लागली की सर्वजण सावली शोधून
कुठेही विश्रांतीसाठी आसरा घेत. आम्हीही अपवाद नव्हतो. चांगली सावलीची
झाडे झुडुपे शोधण्यातच पुष्कळ वेळ जायचा. पण दर खेपेला दाट सावली
दिसणारी जागा, जवळ गेल्यावर त्या दाट सावल्या उन्हाच्या असंख्य कवडशांनी
उसवलेल्या असायच्या. उन्हाची तिरीप चुकवत, उन-सावलीचा खेळ खेळत आम्ही
पडून विश्रांती घेत असू. खरी दाट सावली कधी लाभली नाही वारीत.दुरून
सावल्या दाट हेच खरे!

दाट सावलीची झाडाखालची जागा इतर वारकऱ्यांनी आधीच भरलेल्या
असायच्या.

वारीत आणखी एक विशेष जाणवणारी गोष्ट म्हणजे”माऊली”! श्रीज्ञानेश्वर
महाराजांच्या पालखी बरोबरच्या वारीत तर “माऊली” हा परवलीचा शब्द
आहे. एक चलनी नाणे आहे.

सर्व व्यवहार “माऊली” ह्या शब्दानेच सुरू होतात. साधे बाजूला सरका
म्हणताना किंवा म्हणण्या ऐवजी “माऊली, माऊली” असा आवाज देत तुम्हाला थोडे
बाजूला करून लोक पुढे सरकत असतात. दिंड्यांचे टृक-टेंपो, मोटारीसुद्धा भोंगा
न वाजवता, पुढे बसलेले दरवाज्यावर हात आपटत”माऊली,माऊली” असे ओरडतच
पुढे जातात. सर्व सूचना, हुकूम, आर्जव, थोडक्यात सर्वच भावना एका
“माऊली”च्या उच्चाराने वारीत व्यक्त होतात.” माऊली, माऊली” ह्या एका
संबोधनानेच सर्व व्यवहार सुरळीत होतात.

“सौभद्र” नाटकात संन्याशाचा वेष घेतलेला अर्जुन आपल्या सर्व भाव-भावना,
प्रतिक्रिया “नारायण! नारायण!”ह्यातूनच सांगत असतो. तसेच काहीसे वारीत
“माऊली,माऊली” ह्यातूनच सगळे काही होत असते.

सासवड सोडल्यावर मात्र माझी पंढरीची वारी खऱ्या अर्थाने सुरू झाली
असे वाटले त्याप्रमाणे वाल्ह्यापर्यंत माझ्या हातून वारी पूर्ण होईल का याची
थोडीशी धाकधूक होती.पण वाल्ह्यानंतर मात्र अशा शंकेची, धास्तीची
पाल एकदाही चुकचुकली नाही.

आमच्या तंबूतील डॉक्टर अंदनकर अणि श्री.आदे सोडले तर आम्ही सर्व
पहिल्यांदाच ही पंढरीची वारी करत होतो. पहिले काही दिवस तर रोज आज किती
चाललो,उद्या किती चालयचे अशी चर्चा होई.बरेच जण तर थेट पंढरपूर
यॆईपर्यंत हा विचार करत होते. मी आणि इतर काहीजणांनी हा विषय कधीच
मनात आणला नाही.

आम्ही सासवडहून थेट पंढरपूरला गेलो होतो.विठ्ठलाचे मनसोक्‍त दर्शन झाले
होते.

वारीतील मुक्कामाचा अखेरचा टप्पा-वाखरी-सोडला आणि पंढरपुरात आलो.
कृतकृत्य झाल्याचा आनंद झाला. फार मोठे समाधान लाभले. आणि काय
वाटले ते सांगता येत नाही. आम्ही विठोबाचे दर्शन अगोदरच घेतले होते.
त्यामुळे वारीतून विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेण्याचा
रोमहर्षक अनुभव मात्र चुकला. उत्कंठा वाढवणाऱ्या चित्रपट नाटकाचा
शेवट कोणीतरी अगोदर सांगितल्यावर वाटते तसे काही वेळ मला पंढरपुरात
पोचल्यावर वाटले. पण ते तेव्हढ्यापुरतेच.कारण हजारो वारकऱ्यांच्या
संतसंगतीने झालेली पंढरीची पायी वारी हाच एक मोठा रोमहर्षक अनुभव
होता आणि तो अजूनही तितकाच ताजा आहे. अजूनही वारीचे टाळ मृदुंगाचे नाद,
बोल आणि ठेका ऐकू येतो आहे.

“सैन्य पोटावर चालते” असी नेपोलियन म्हणत असे. वारी टाळ मृदुंगाच्या नादा-
-ठेक्यावर चालते असे म्हटले तर वावगे होणार नाही.टाळमृदुंगाचा नादमधुर
आवाज सतत तुमच्याबरोबर असतो. अगदी सावलीसारखा. संतश्रेष्ठ
तुकाराममहाराजांनी सांगितलेले,
“सोपे वर्म आम्हा सांगितले संतीं ।
टाळदिंडी हाती घेऊनी नाचा ॥”
हेच ते सोपे वर्म,लक्षावधी वारकरी, टाळ मृदुंग वाजवत, हरीनाम गर्जत
नाचत पंढरीच्या वारीत आचरत असतात. संपूर्ण वाटचाल आनंदे भरत जात
असतात.टाळमृदुंगाचे हे नादब्रम्ह वारी संपल्यावरही काही दिवस अनाहत
नादासारखे तुमच्या मनात गुंजत राहते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *