औषधे घेतली म्हणून किंवा मनाची उभारी म्हणा, पण नेहमीप्रमाणे सर्व
आटोपून मी माझ्या सोबत्यांसह सकाळी सहा-सव्वा सहा वाजता लोणंदच्या
दिशेने उसळलेल्या वारकऱ्यांच्या लाटेत सामील झालो.
टाळ मृदुंगाच्या नादावर, अधून मधून उड्या मारत, भजने म्हणत, हरिनामाचा
घोष करत चाललेल्या दिंड्या आणि वारकऱ्यांची असंख्य पावले सोबतीला होतीच.
त्यांच्या बरोबरीने आमची पावलेही वाट चालू लागली.
आज खुद्द डॉक्टरांचीच तब्येत बिघडली होती. त्यामुळे ते वाल्ह्याहून
गाडीतूनच पुढे गेले होते.
वाटेत नीरा नदी लागली. मोठे रूंद पात्र. पाणीही भरपूर. दोन्ही काठांवर
हिरवे हिरवे शेतमळे. सर्व प्रदेश मोठा रमणीय होता.
नीरा नदीचा पूल ओलांडून आम्ही दोघे तिघे लोणंदला इतरांपेक्षा लवकर
पोहोचलो. मुक्कामाचे ठिकाण नेहमीप्रमाणे गावाबाहेर दोन-तीन कि.मी. दूर.
लोणंदच्या विशाल मार्केट यार्डमधील कांद्याच्या अनेक वखारींपैकी एका
वखारीत आमचा मुक्काम होता. इतक्या वखारींतून आमची वखार सापडायला
बराच वेळ लागला.वारीत कितीही चालले तरी ती पायपीट वाटत नाही.पण
अनोळखी गावातील अशी ठिकाणे शोधण्यासाठी हिंडणे त्रासदायक वाटायचे. हा
अनुभव तरडगाव, नातेपुते येथेही आला.
कांद्याची वखार प्रथमच पहात होतो. भली मोठी, उंच, पत्र्याचे छ्प्पर असलेली
व चारी बाजूंना लोखंडी जाळ्याच्या भिंती.थोडक्यात वर उंचावर छप्पर;आणि
जाळ्यांना थोड्या उंची पर्यंतच प्लास्टिक्स्चे कापड लावलेले.इतकेच खाजगीपण.
जमीन इथेही गारगोट्या,मुरुमाची खडी, खडे यांनी खचाखच भरलेली.आम्ही
तीन चार मोठ्या पाट्या भरतील इतके दगड खडी बाजूला केली!
थोड्या अंतरावर असलेल्या आमच्या दिंडीच्या ट्रकमधून ताडपत्र्या आणल्या.
आमच्या जागेवर त्या पसरून इतर सोबत्यांची वाट पहात बसलो.
हळू हळू सर्वजण आले.इतर दिंडीकरही आले.सर्वांनी सामान आपापल्या हद्दीत
लावले. गडबड, बडबड सुरू झाली. डॉक्टर आले ते अंगात ताप घेऊनच. शिवाय
भरीस भर म्हणून खोकलाही होता.
कांद्याच्या मार्केट यार्डपासून गाव लांबच. मी ताडपत्र्या वगैरे टाकल्यावर
फोनची बॅटरी भारीत करण्यासाठी आणि नंतर संध्याकाळी डॉक्टरांसाठी
औषधे आणण्यासाठी गावात गेलो.
गावातील मुख्य रस्ता वारकऱ्यांनी आणि वाहनांनी दुथडी भरून वहात होता.
अखेर हवी होती ती औषधे आतल्या रस्त्यावरच्या एका दुकानात मिळाली.
डॉक्टरांना दिली. ते अंथरुणात पडून होते.
रात्रभर एकटे डॉक्टरच नाही तर आमच्या कांद्याच्या वखारीतील आम्ही
सर्वजणच खोकत होतो.कंदर्प संपर्क!
लोणंदचा मुक्काम दोन रात्र्रींचा होता. त्यामुळे दुसरे दिवशी आम्ही
नेहमीचे पाच-सहाजण आंघोळीसाठी नीरा नदीवर गेलो. त्यासाठी आम्ही
लोणंदपासून चार पाच किलोमीटर मागे गेलो. झकास आंघोळी झाल्या. आजचा
दिवस निवांत. पायांना विश्रांती.
डॉक्टरांची तब्येत जास्तच बिघडली. त्यांनी चंद्रपूरला परत जायचे
ठरवले. प्रथम पुण्याला आमच्या गाडीतून जायचे आणि तेथून रात्री
चंद्रपूरला.त्यांच्याबरोबर त्यांचे निकटचे स्नेही श्री. कमलाकरही
जाणार. कारण त्यांनाही ताप वगैरे होताच शिवाय त्यांच्या दोन्ही गुडघ्यांचे
दुखणे त्यांना असह्य झाले होते. त्यांनी आपल्या गुडघेदुखी पुढे गुडघेच टेकले.
त्या दोन आजारी माणसांबरोबर एक तरी धडधाकट माणूस हवा म्हणून
डॉक्टरांनी आपल्या भावाला बरोबर घेतले. तेही जाण्यासाठी तयारच होते.
मी पुण्याला फोनाफोनी करून माझे जावई श्री.श्रीकांतकडून चंद्रपूरची
तिकीटे काढून ठेवली.
डॉक्टर परत निघाले. आपली वारी पूर्ण झाली नाही. अर्धवट सोडून
परत जावे लागते ह्याचे दु:खही होते. आळंदीला भेटल्यावर वाटेत,” ह्या
वारीनंतर मी पुन्हा वारी करणार नाही. ही बहुधा शेवटची वारी.ती
तुमच्याबरोबर होतेय, आपली इतक्या वर्षानंतरची भेट या वारीमुळे होतेय”.
वगैरे सांगत होते. त्यांचे निकटचे मित्र कमलाकर यांच्याजवळही ते असेच
काहीसे म्हणाले होते असे मला कमलाकर वारीत सांगत होते.
मलाही मनातून फार वाईट वाटत होते.डॉक्टरांच्यामुळेच माझ्या आयुष्यातील ही
पहिलीवहिली पंढरपूरची वारी घडत होती. इतक्या वर्षांनी भेटलो, थोड्या
फार गप्पा झाल्या. आतापर्यंत त्यांच्या अनुभवी सोबतीने वाट सोपी झाली होती.
डॉक्टरांनी आणि मी उराभेट घेऊन निरोप घेतला. आमच्या दोघांचेही डोळे
पाणावले. ते पाहून महिला मंडळही गलबलले.
मी आणि श्री. आवताडे डॉक्टरांना व इतरांना निरोप दॆऊन परतलो. थोडा वेळ
सुनं सुनं वाटत होते.काही वेळाने एका वखारीत भारूड, गौळण वगैरे चालले
होते.तिथून लोकांच्या हसण्याचा आवाज ऐकू येत होता.मी व श्री. आवताडे तिकडे
गेलो.
नाथांची भारूडे चालली होती. ती झाल्यावर संत सेना महाराजांचा”आम्ही
वारिक वारिक । करू हजामत बारिक बारिक॥” ह्या अभंगाचा दोघा वारकऱ्यांनी
नाट्याविष्कार केला.अभंगाचे नाट्यीकरण सादर करण्याचा प्रकार मी प्रथमच
पहात होतो.
प्रहसनातील-फार्स मध्ये जलद हालचाली असतात तसे अभंगातल्या ओळीत जी
कृती वर्णन केली ती विनोदी पद्धतीने ती कृती प्रत्यक्ष करत होते. वस्तऱ्याने
गळा कापल्याचा(पाप काढून टाकण्याचा) अभिनय, एका मोठ्या केरसुणीने बगला
झाडण्याची कृती; हे पाहून सर्वांना मजा वाटत होती. मध्येच टाळ
मृदंगाच्या बरोबर अभंगातील पुढची ओळ म्हटली जायची की त्यावर विनोदी
सादरीकरण.
गंमत आली. प्रहसनाच्या-वळणाने अतिशयोक्तीने सादर केलेले हे अभंगांचे नाट्यीकरण
वारकऱ्यांना हसवून सोडत होते. संत सेना महाराजांनी ह्या रुपकातून
सांगितलेला भावार्थ मात्र हरवून जाऊ नये. मात्र वारकरी मंडळीची
घटकाभर झकास करमणूक झाली हे निर्विवाद.
रात्री श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम गावात जिथे होता तिथे
शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम असावा. भक्तीपर चिजा, पदे गायक गात होता.
दूरवरून येणारे ते सूर आनंद देत होते. काही दिंड्यांतून भजने, तर एखाद्या
दिंडीत ह.भ.प.बुवांचे कीर्तन चालू होते. सर्व वातावरण सुस्वर झाले होते.
कीर्तन भजन लवकर संपले.गायन मात्र पहाटे २.३०/३.००पर्यंत चालू असावे.
ऐकता ऐकता कधी झोपलो ते समजले नाही.