सकाळी फलटणहून निघालो ते वाटेतील विडणी, पिंपरद करत करत दुपारचा
विसावा वाजेगावला होता तिथे आलो.
दुपारच्या विसाव्यापाशी, त्या अगोदर दोन अडीच किलोमीटर, आणि विसाव्याच्या पुढे
दोन तीन किलोमीटर पर्यंत वारकरी शेतात, मळ्यात, केळी-डाळिंबाच्या बागेत,
झाडाखाली रस्त्याच्या कडेला कुठे सावली आडोसा मिळेल तिथे, विश्रांतीसाठी
पहुडलेले होते. आम्हीही तेच केले.
दुपारची विश्रांती आटोपून बरडकडे कूच केले.आजचा मुक्काम बरडला होता.तळ
बरडच्या मार्केट यार्डच्या बाजूला होता. आम्ही बरडला पोचून आमच्या तंबूत
शिरलो.
आता पंढरपूर जवळ येत होते. वारकऱ्यांच्या लोकसमुद्रालाहे याची जाणीव होत
आली होतीच.
रात्री डॉक्टरांचा फोन आला. त्यांना तीव्र ब्रॉंकायटीस झाला होता.
औषधोपचारांचा उपयोग हॊऊन त्यांना आता बरं वाटत आहे हे प्रत्यक्ष
त्यांच्याकडून समजल्याने मला खूप बरे वाटले.
बरडचा मुक्काम संपवून नातेपुत्याला निघायचे. नातेपुत्यालाही आमच्या
मुक्कामाचे ठिकाण सापडायला फार त्रास झाला.पत्ता स्पष्ट,तपशीलवार
नसल्यामुळे असे झाले. खरं म्हणजे आम्ही नातेपुत्याला लवकर पोचलो होतो पण
मुक्कामाची जागा सापडेपर्यंत संध्याकाळचे ७.०० वाजले!
अशा अपुऱ्या, संदिग्ध माहितीमुळे असे वाटायचे की,यापेक्षा असेच चालत चालत
पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी गेलेले बरे! पण हे क्षणभरच. कारण पुढच्या
गावातही ठावठिकाणा हुडकावाच लागणारच की! एका मोकळ्या मैदानात अनेक
दिंड्या उतरलेल्या. बहुतेकांचे तंबू सारखेच.मग तंबूवर लिहिलेले आपापल्या
दिंडीचे क्रमांक तरी बघत जायचे किंवा आजूबाजूच्या, तंबूतील लोकांना
त्यांच्या दिंडीचा नंबर विचारायचा! असा हा आता रिवाजच झाला होता!