सदाशिवनगरचे गोल रिंगण

नातेपुत्याहून सर्व वारी निघाली. आमची अणि सर्वच वारकऱ्यांची मने
जवळपास पंढरपूरला पोचली होती.

आजचा मुक्काम माळशिरस ह्या तालुक्याच्या ठिकाणी. माळशिरस गाव
साखरेच्या शुभ्र समृद्धीचे लेणे लेवून नटले आहे.”पांढऱ्या सोन्याचे”–
-साखरेचे– हे गाव

साखर कारखान्याबरोबरच इतर अनेक सहकारी संस्थांचे जाळे असलेल्या या
गावात प्रवेश केल्यापासून मुख्य रूंद रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठमोठ्या
आधुनिक पद्धतीच्या इमारती; कापड, विविध उपकरणे, खाण्याचे पदार्थ,
टी. व्ही, इत्यादी वस्तूंनी भरलेली मोठमोठी दुकाने नजरेला पडत होती.
अशा या गावाला ग्रामपंचायत कशी? नगरपरिषद वगैरे का नाही? असा
प्रश्न पडला.हे ठरविण्यासाठी दुसऱ्याही निरनिराळ्या कसोट्या असतील
हे नंतर लक्षात आले. ह्या राजरस्त्याच्या दुतर्फा असलेल्या मोठमोठ्या
चांगल्या इमारती, कार्यालये, संस्था ह्यांच्या पाठीमागील गाव कसे आहे?
माहित नाही. पण चांगले समृद्धीचे असणार ह्यात शंका नाही.

माळशिरसला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी सदाशिवनगर
येथील साखर कारखान्याच्या भव्य, प्रचंड मैदानात आज माऊलीच्या
पालखीचे पहिले गोल रिंगण होते.

मी आणि श्री. आवताडे यांनी हॉटेलात चहापाणी केले. हॉटेलवाल्याला पैसे
दॆऊन निघालो. मी पुन्हा माघारी आलो.मालकांना विचारले,”गोल रिंगण पहायचे
आहे.कुठे जायचे? “आलात त्याच दिशेन थोडे मागे जा. कारखान्याच्या मैदानात
पोचाल.कालव्याच्या बाजूला, आमच्या हॉटेलाच्या दिशेलाच बसा, म्हणजे
तुम्हाला सर्व दिंड्या,माऊलीचे पालखी येताना दिसेल. मग पुढे सरका व
पुढच्या रिंगणाच्या बाजूल बसा. सर्व काही मस्त पहायला मिळेल.” त्यांनी
सांगितले.

इतक्या माहितगार माणसाकडून सर्व बारकाव्यांसहित माहिती मिळाल्यावर आणखी
काय पाहिजे?

दुपारची रणरणते उन्ह; नुकतेच खाणेपिणे झालेले. अंगावर सुस्ती
पसरायच्या बेतात आलेली पण तरीही आम्ही मैदानाकडे निघालो.

मैदानात आलो. आम्हाला वाटत होते आम्हीच सर्वांत अगोदर पोचलेलो असणार. पण
आमच्या आधीच हजारो वारकरी तिथे आले होते. त्यांनाही माहितगार
माणसांकडून सर्व बारकाव्यांसह माहिती मिळालेली असावी!

आम्ही खट्टू झालो. पण चिकाटीने पुढे सरकत थोडीशी मोकळी जागा शोधत
पुढे निघालो.एका झाडाखाली हळू हळू पाय पुढे मागे घेत थोडे आरामात
बसलो.

दिंड्या,पालख्या येण्याला अजून खूप अवकाश होता.

नजर टाकावी तिकडे फक्त माणसे आणि माणसे! नुसती गर्दी. बसलेली, उभी
राहिलेली,झाडांवर बसलेली,गर्दीच गर्दी! मधूनच माणसे माऊली म्हणत
उठायची,उभी रहायची. पण अनुभवी वारकरी आम्हाला,”उठू नका, अजून
लई टायम हाय.” असे म्हणायची.

थोड्या वेळाने आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या हॉटेल मालकानी
सांगितल्याप्रमाणे आम्ही दोघे उठून पुढे गेलो.बाहेरच्या रिंगणाच्या
काठाशी गेलो. पण तिथेही गर्दीच. बरीच कुटुंबवत्सल गावकरी आणि
वारकरी होते. त्यांच्यामुळेच आम्हाला बसायला, उभे रहायला, बाहेरच्य्या
आणि आतल्या दिंड्यांसाठींच्या दोन रिंगणामधील मोकळ्या जागेत म्हणजे
प्रेक्षकांच्या रिंगणात मोक्याची जागा मिळाली.

बराच वेळ झाला होता. दोघा चौघांनी सांगितले दिंड्या बाहेरच्या रिंगणात
आल्या की इकडे तोंड करून उभे राहायचे आणि सर्व दिंड्यांचे रिंगण झाले की
आतल्या रिंगणाकडे तोंड करून बसा किंवा उभे रहा.

एक एक दिंडी येऊ लागली. हजारो वारकऱ्यांची उत्सुकता त्यांच्या डोळ्यांत
दाटली होती. येणाऱ्या प्रत्येक दिंडीलाही उत्साहाचे उधाण आले होते.

योगायोगाने आम्हाला जागा चांगली मिळाली होती.प्रत्येक दिंडी आमच्या समोरच
थांबायची.

हरिनामाचा, संतांच्या अभंगाचा कल्लोळ, विठूरायाचा गजर करीत,उंच
उड्या मारत तर कधी लेझीमचे हात केल्यासारखे वाकून, गिरक्या घेऊन,
दिंडीकर भजनानंदात दंग असत.त्यांच्या पुढची दिंडी धावत धावत बरेच
अंतर पुढे जाऊन थांबे.अगदी एकदम ब्रेक लावल्यासारखी सर्व मंडळी थांबत. त्या
नंतरची दिंडी मग पुढे यॆई.

एका दिंडीत तर दोन वारकऱ्यांनी सुंदर फुगडी घातली. दहा पंधरा सेकंद
एक मोठी भिंगरी फिरते आहे असे वाटत होते.पुढच्या दिंडीने,दहीहंडी
फोडण्यासाठी जसा मनोरा करतात तसा उंच मनोरा केला.मनोऱ्याच्या शिखरावरचा
वारकरी टाळ वाजवत होता!

आणखी काही दिंड्यांनीही मनोरे केले. एक मनोरा फार उंच नव्हता पण त्याच्या
शिखरावर एक म्हातारे आजोबा वारकरी वैष्णवांची पताका तोल सांभाळत
फडकवत,नाचवत होते!

मोठी मजा आली. हे सर्व चालले होते ते साध्या दोन वाद्यांच्या नादावर!
टाळ आणि मृदुंग!

पंढरपूरला जाणारी श्रीज्ञानेश्वरमहाराजांची पालखी असो किंवा
संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीची वारी असो,लाखो
वारकऱ्यांच्या ह्या साऱ्या वाऱ्या टाळमृदुंगाच्या नादब्रम्हावरच चालत
असतात.

सर्व कष्ट, अडचणी विसरून लाखोंचा हा भक्तीमार्ग उत्साहाने पुढे जात असतो
तो टाळमृदुंगाच्या ठेक्यावरच.टाळ आणि मृदुंग! किती साधी आणि बाळबोध
वाद्ये. असे कितीसे निरनिराळे ताल आणि ठेके त्यावर वाजवले जात असतील?पण
त्यांच्या एक दोन भजनी ताला ठेक्यातून वारकऱ्यांवर सुखाची झुळूक सतत
वहात असते.

प्रदक्षिणेचे रिंगण आटोपून सर्व दिंड्या एकत्र जमल्यावर
श्रीज्ञानेश्वरमाऊलीची पालखी अबदागिर, छत्र चामरे आणि घोडेस्वारासह
रिंगणाच्या मुख्य ठिकाणी आली.

आता सर्वांनी तोंडे मागे फिरवली. माना उंचावून नजरा घोडेस्वाराकडे आणि
माऊलीच्या घोड्याकडे लागल्या. त्या अगोदर मारुतीचे रूप घॆऊन एक दोघे आतल्या
रिंगणातून उड्या मारत लोकांची करमणूक करून गेले.

घोडेस्वार आपला घोडा दौडत रिंगणातून फेरी मारून गेला. उत्कंठा वाढतच
चालली.दुसऱ्या फेरीत त्या घोडेस्वाराबरोबर माऊलीचा घोडा भरधाव
गेला.त्याच्या अशा तीन भर वेगाच्या फेऱ्या झाल्या प्रत्येक फेरीला “ज्ञानोबा
माऊली”,”माऊली, माऊली” असा आवाज घुमायचा.तिसरी फेरी झाल्यावर तर
अनेक घोष झाले.अखेर पंढरीनाथ महाराज की जय होत होत दिंड्या बाहेर पडून
पुन्हा वारीचा मार्ग क्रमू लागल्या.इथेही श्रद्धाळू भाविकांची माऊलीच्या
घोड्याच्या रिंगणातील मातीचा अंगारा घेण्याची धावपळ सुरू झाली.

वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर फक्‍त आनंद दिसत होता. भक्तीमार्गाची ही
पेठ असली तरी रोजच्या वाटचालीतील तोच तोचपणा घालवायला ही रिंगणे
म्हणजे वारकऱ्यांसाठी मोठा विरंगुळा असतो. चांदोबाच्या लिंबासारखी
उभी व माळशिरस जवळच्या गोल रिंगणासारखी दिंड्यांची अशी रिंगणे
पंढरपूरपर्यंत तीन चार ठिकाणी होतात.कोणत्याही साधन सामग्री
शिवाय,फुगड्या,फेर धरणे, मनोरे उभे करणे, असे साधे विरंगुळ्याचे खेळ ह्या
ईश्वरनिष्ठांना पुरतात. त्यांचे करमणुकीच्या बाबतीतही “मागणं लई
नाई” हेच खरं.

प्रथमच अनुभवलेला गोल रिंगणाचा रोमहर्षक सोहळा पाहून आम्ही
माळशिरसला आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *