माळशिरसला बस स्टॅंड समोर असलेल्या शाळेच्या पटांगणात
आमचा मुक्काम होता. योगायोगाने आमच्या दिंडी जवळच ह भ.प. जैतुनबी
यांच्या दिंडीचा मुक्काम होता. रात्री त्यांचे कीर्तन होणार आहे असे समजले.
आमच्या दिंडीचे जेवण वगैरे होईपर्यंत कीर्तन सुरुही झाले होते.
मी कीर्तनाला गेलो.वारकरी पंथाच्या कीर्तनाचा एक उत्तम नमुना असेच
त्यांच्या कीर्तनाचे वर्णन करावे लागेल. ह.भ.प.जैतुनबी यांची कीर्ति
बरीच वर्षे ऐकत होतो. आज त्यांचे कीर्तन ऐकण्याचा योग आला.
ह.भ.प. जैतुनबी भक्तीमार्गातील मोठ्या अधिकारी बाई. पंचाहत्तरी पार
केलेल्या या बाईंचा आवाज खणखणीत आहे,पण अभंग, ओव्या,भजन म्हणताना
वयामुळे आवाजात कंप येतो, किंचित थकवा वाटतो.
संत गाडगेबाबा, क्रांतिसिंह नाना पाटील, आचार्य अत्रे यांच्या शैलीचे
बोलणे. कीर्तनात श्रोत्यांशी प्रश्नोत्तरी संवाद करण्याची शैली अप्रतिम.जे
स्पष्ट करायचे ते अतिशय समर्पक गोष्टीतून. निराळे उपदेशपर किंवा
अभंगाचे तेच ते खुलासेही करण्याची गरज नव्हती! त्यांच्या टाळकरी
भजनींनी कव्वालीच्या धर्तीवर म्हटलेले भजनी पदही सुरेख होते.
मोकळ्या उघड्या जागेत कीर्तने होत असल्यामुळे साथीदारांचे आवाज बरेच वेळा
फाटल्यासारखे होत; सारखे वरच्या पट्टीत म्हणण्यामुळेही असे होत असावे.
अर्थात ह्या संगीतातल्या, वादनातल्या गोष्टींचे मला अजिबात ज्ञान नाही. पण
वर म्हटल्याप्रमाणे काही तरी होत असे. बेसूरही व्हायचे. पण असे होणारच.
आणि इथे गायकीपेक्षा भाव मोठा, संकीर्तन महत्वाचे असते. आणि ते सर्व
काही त्यात होते.
एक लक्षात रहाण्यासारखा अनुभव गाठीशी बांधून, बरेच दिवसांची
इच्छाही अनायासे पूर्ण झाल्याचे समाधान घॆऊन,तंबूत परतलो.