माळशिरसचा मुक्काम आटोपून आम्ही दुपारी साडे चार, पाच वाजता
वेळापूरला आलो.
गेले चार पाच दिवस रोज २२-२३ किलोमीटर चलणे होत असे.वेळापूरचा मुक्काम
झाल्यावर सोमवारी सकाळी भंडी शेगावला जाण्यासाठी निघालो.
वाटेत तोंडले बोंडले येण्या आधी ठाकूरबुवांच्या समाधी जवळ तिसरे गोल
रिंगण झाले. ते पहाण्यासाठी आम्ही थांबलो नाही. पुढे आलो. वारीचा
दुपारचा विसावा “टप्पा” येथे होता. तोंडले बोंडले पार करून”टप्प्यावर” यॆऊन
विश्रांतीसाठी थांबलो.
टप्प्यावर संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील एक वारकरी
भेटले.त्यांच्याकडूनच समजले की या ठिकाणी तुकाराम महाराजांची
पालखीही येते. या दोन संतश्रेष्ठांची त्यांच्या लाखो वारकऱ्यांसह
इथे गाठ पडते.
हा वारकरी गृहस्थ भेटला तो माढ्याचा. नाकी डोळी अगदी नीटस. हसतमुख.
विठोबासारखाच काळा सावळा. बोलणे आणि हसणेही प्रसन्न. डोळे पाणीदार.
वारीत पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन,आषाढी एकादशीला तर किती मुष्किल
आणि कठिण असते; आपल्यासारख्या असंख्य सामान्य वारकऱ्यांना तर फारच
कठिण वगैरे तो अनुभवी वारकरी सांगत होता. हे बोलत असताना सहज
म्हणाला,”अहो, आपणच एकमेकांना पहायचं,भेटायचं!”
वा! व्वा! वारीचे, वारकरी पंथाचे संपूर्ण सार त्या माढ्याच्या
वारकऱ्याच्या सहजोद्गारातून बाहेर पडले! जे जे भेटे भूत। ते
मानीजे भगवंत॥ ह्याचे एका वाक्यात ते निरुपण होते. हे बोलत असताना
माढेकरांचे डोळे जास्त पाणीदार झाले होते, चेहऱ्यावर निर्मळ हसणेही होते.
वारीत नकळत साधणारे उद्दिष्टही त्यांच्या त्या उत्स्फूर्त बोलण्यात होते.ह.भ.प.
बुवांना त्यांच्य कीर्तनात टाळकरी-मृदुंगवाल्यांनी साथ करावी तसे
माढेकर बुवा हे सांगत असताना त्याच वेळी मोठ्या रस्त्यावरून,
“विठ्ठल विठठल। जय हरी विठठल॥” “ज्ञानोब्बा माऊली तुकाराम” असे
टाळमृदुंगा समवेत म्हणत वारकऱ्यांचा एक मोठा जथा गेला!
विठोबाच पांढरे धोतर, सदरा, गांधी टोपी घालून माढेकर वारकरी हॊऊन
आला असे त्यांचा निरोप घेताना मला क्षणभर वाटले!
टप्प्यावरची विश्रांती आटोपून आम्ही रात्री भंडी शेगावला
आलो.
भंडी शेगावला संध्याकाळी सौ.ज्योती तारे आम्हाला माऊलीच्या
घोड्याविषयी त्यांना बरडला एका वारकऱ्याने सांगितलेली गोष्ट सांगितली.
सगळ्या नवख्या वारकऱ्यांना माऊलीचा घोड्याविषयी कुतुहल असते.
माऊलीच्या घोद्यावर स्वार का नाही? असे काही प्रश्न वारीत नवीनच आलेल्या माझ्यासारख्या
वारकऱ्यांच्या मनात असतात.
श्रीज्ञानेश्वरमहाराज ज्या मार्गाने पंढरपूरला गेले त्याच मार्गाने आजही
त्यांची पालखी पंढरपुरला जाते. माऊली पंढरपूरला जात असताना
एकदा वाटेत त्यांच्या समोर एक घोडा आला. तो त्यांना आपल्या पाठीवर बसून
पंढरीला चला असे बराच वेळ विनवणी करत होता पण माऊलीनी माझी ही
पायी वारी आहे असे त्या घोड्याला संगितले. घोड्याला वाईट वाटले. पण तो
घोडा माऊली बरोबर, पुढे थेट पंढरपूर पर्यंत चालत होता.त्यानंतर
श्रीज्ञानेश्वरमहाराजांची पालखी पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू
झाली तेव्हापासून एक घोडाही पालखी बरोबर नेऊ लागले. ही परंपरा आजही
चालू आहे. ही आख्यायिका आहे.त्यामुळे ही निरनिराळ्या स्वरूपात सांगितली जात
असण्याची शक्यता आहे.
रात्री झोपताना मनात म्हणालो,उद्या वाखरी! वाखरी म्हणजे पंढरपूर
आलेच की! वाखरी म्हणजे पंढरपूरची वेस म्हणायची.
आपल्याकडून पंढरीची पायी वारी पूर्ण होत आहे ह्याचा मनात आनंद
वाढत असताना, झोप कधी लागली हे समजलेही नाही.