२५ जुलै,२००७,बुधवारी पहिली एकादशी. पंढरपूरच्या वारकऱ्यांची
एकादशी उद्या, गुरुवारी. काही का असेना, आम्ही श्रीज्ञानेश्वर माऊलीच्या
सोबतीने इथपर्यंत आलो.
आज बुधवारी पालखी सकाळी,पंढरपूरला पोहोचण्यासाठीन इघणार.
आम्हीही वाखरीहून सकाळी निघालो.
गेले १७-१८ दिवस पाऊले पंढरीची वाट चालत होती. आज ही
अवस्था संपली. आज तर पांडुरंगाच्या पायाशीच(पंढरपूरला) पोचणार
आपण! पंढरीची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यां़च्या ह्या आनंदाला,
कृतकृत्यतेला त्रिखंडात तोड नाही!
एका मागोमाग एक येणाऱ्या वारकऱ्यांच्या लाटांबरोबर आम्ही
वाखरीतून कधी निघालो हे समजलेही नाही.
वाखरी सोडली. काही अंतर पुढे आल्यावर वाटेत श्रीज्ञानेश्वर
–आणि बहुधा श्रीतुकाराम महाराजांची सुद्धा-महाराजांची पालखी
जेथे विसाव्यासाठी थांबते त्या विठ्ठल-रखुमाईच्या देवळात
थांबलो. हे देऊळ इ.स. १८३३ साली बांधलेले आहे. थिटे घराण्याच्या मालकीचे
आहे.विठोबा-रखुमाईचे दर्शन घेतले.देवळाभोवती प्रदक्षिणा घातली.
देवळाभोवती, लहान लहान दगड गोटे एकावर एक असे ठिकठिकाणी रचून ठेवलेले
दिसले. अनेक वारकरीही तसे दगड, लगोरी सारखे, देवळाच्या आकाराचे रचत
असलेले पाहिले. एका आजोबा वारकऱ्यांना हे असे दगड का रचून ठेवतात ते
विचारले.
“या देवळाभोवती असे दगड रचून ठेवले की पुढची वारी
घडते. वारी पुन्हा घडते असे म्हणतात.”असे ते म्हातारेबुवा म्हणाले.
मी आणि श्री आवताडे यांनीही तसे दगड रचून ठेवले.पुन्हा एकदा
पंढरीची वारी आपल्या हातून घडावी!श्रद्धा-अश्रद्धेच्या सरहद्दीवर
रेंगाळणाऱ्या, कधी श्रद्धेच्या तळ्यात तर कधी अश्रद्धेच्या मळ्यात उभे
राहण्याचा हा मध्यमवर्गीय खेळ! दुसरे काय म्हणणार!
सकाळी नऊ साडे नऊच्या सुमारास पंढरपूरच्या हद्दीत आलो.
त्या अगोदरच पंढरपूरच्या विविध संस्था, पुढारी आमचे मोठमोठया
फलकांनी “सहर्ष स्वागत” करत होते. आणखी १० मिनिटे चाललात की
पंढरपूरात पोचाल असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्या प्रमाणे
मी आणि आवताडे पुढे चालत निघालो. सगळ्या महाराष्ट्राचे, सर्व
वारकऱ्यांचे माहेर, त्या पंढरपूरला आम्ही पोचलो!
माहेर म्हटल्याबरोबर मला बरडला विश्रांती घेत असताना
भेटलेला जुन्नर येथील शिवनेरी जवळचा वारकरी आठवला………..
………बरडला जाताना एके ठिकाणी रस्त्याच्या उतारावर झाडाखाली
पडलो होतो. थोड्या वेळात दोन वारकरी आले. आमच्या शेजारी तेही लवंडले.
थोडा वेळ विश्रांती झाल्यावर त्यातील एक वारकरी, कोण कुठले झाल्यावर,
बोलू लागला.शिवनेरी किल्ल्याजवळच्या गावातला. दिसण्यातही विठोबाच!
सर्व सामान्य वारकऱ्यांची विठ्ठलाविषयी असलेली भक्ती व प्रेम त्याच्या
बोलण्यातून ओसंडत होते. मी ऐकत होतो. बोलता बोलता तो म्हणाला,”अवो, लेकीला
सासराहून आपल्या माह्येरला जाताना जसं वाटतं, आनंद हुतो बघा, त्येच,
तसाच आनंद आमाला पंढरपूराला जाताना हुतो. अवो, आपलं माह्येरच हाये हो
पंढरपूर! आपून माह्येरालाच चाललोय.”
शेवटची दोन वाक्ये बोलताना म्हातारपणाकडे झुकलेल्या वारकऱ्याचे डोळे
भरून आले होते.शहरी सायबाला ते अश्रू दिसू नयेत म्हणून त्याने आपला
चेहर झट्कन वळवला.!
आपल्या संतांनी सुद्धा आपल्या अभंग, ओव्यातून हेच म्हटलय.
ज्ञानेश्वर महाराजही,”जाईन गे माये तया पंढरपुरा।
भेटेन माहेरा जीविचीया ॥ ”
म्हणतात. पंढरपूर हेच त्यांच्या जीवाचे माहेर होते आणि ते स्वत: विठोबाला,
त्या माहेराच्या पांडुरंगाला, आपली क्षेम-खुशाली सांगताना,”क्षेम मी
दॆईन पांडुरंगा”असे म्हणतात. एकनाथ महाराजांनी तर माझे माहेर पंढरी
म्हणताना आपल्या माहेरच्या सर्वांचीच, बहिण भावंडांचीही आठवण
काढली आहे.आपल्या माहेरचे मोठेपण आणि तिथे कोण कोण आहे हे सांगताना,
आपल्या माहेराचा किती अभिमानाने आणि प्रेमाने उल्लेख करतात.आपल्या मातब्बर
बहिण भावंडांचा,आणि ती काय,काय करू शकतात याचा किती अभिमानाने
उल्लेख करतात.
आपल्या सर्व संतांची विठलाविषयीची भक्ती,प्रेम, माया, जिव्हाळा, कौतूक त्या
शिवनेरीच्या वारकरी बाबांच्या बोलण्यात होते. आणि ते सर्व त्यांच्या
डोळ्यातील पाण्यानेही सांगितले!
तिन्ही लोक आनंदे भरले आहेत का ते मला माहित नाही पण माढ्याच्या आणि
शिवनेरीच्या ह्या दोन विठोबा-वारकऱ्यांनी मात्र माझे वारीचे दिवस
आनंदाने काठोकाठ भरले!…………….
मी आणि श्री. आवताडे पुढे चालत चालत पंढरपुराच्या उंबरठ्या पर्यंत
आलो.
सर्व मराठी संतांचे आणि त्यांची शिकवण आचरणाऱ्या लक्षावधी
वारकऱ्यांचे सावळे परब्रम्ह जिथे भक्तांसाठी तिष्ठत उभे आहे, सर्व
संतांचे “जीविचिया माहेर” त्या पंढरपूरातील रस्त्यावर मी खाली वाकून
विठ्ठलाला, त्या पांडुरंगाला नमस्कार केला.
मल इथपर्यंत पंढरपूरला श्रीज्ञानेश्वर माऊलीनी आणि पांडुरंगाने
आणले. माझ्याकडून त्यांनीच हे घडवून आणले. माझी पंढरपूरची पायी
वारी श्रीज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने साठा उत्तरी सफळ संपूर्ण झाली.