ऊन उतरले होते. सूर्य मावळायला थोडा अवकाश होता. सावल्या लांबत होत्या. हा देखावा डिसेंबरमधील होता. म्हणजे ऊन असले काय आणि नसले काय, बरेच ढगाळ होते. बर्फ पडत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फाचे डोंगर झाले होते. रस्त्याच्या बाजूची बरीच घरे दिसतही नव्हती एव्हढा बर्फच बर्फ दोन्ही बाजूला झाला होता.त्यामुळे शाळेकडे जाणारा मैल दीड मैलाचा रस्ता जास्तच अरुंद झाला होता. लिंडाच्या ओहायो मधल्या लहानशा गावाचे हे तीस वर्षापूर्वीचे चित्र आहे.
कमरेच्या पट्ट्यात फ्लूट खोवून सतरा वर्षाची लिंडा बर्फातून चालली होती. बॅन्डचा सराव सुरू झाला असेल या काळजीने भरभर जायचा प्रयत्न करीत होती. पण ते अशक्य होते. ती आपल्याच नादात चालली होती. तिच्या बाजूने एक भला दांडगा कुत्राही चालतोय तिकडे तिचे लक्षही नव्हते.आपल्या कंबरेला काय घासतेय पाहण्यासाठी तिने बाजूला पाहिले तर तो राक्षसी कुत्रा! तिला खेटून चाला होता कारण रस्ताच इतका अरुंद होता. ती त्याच्याकडे रागाने, घाबरून, बाजूला होत मोठ्याने ओरडली. जा, जा, जा इथून असे ओरडली. कुत्र्ऱ्यावर काहीही परिणाम झाला नाही. तो तिच्या बाजूने चालतच राहिला. तिने थोडा वेग वाढवला, त्यानेही वाढवला. शेवटी दुर्लक्ष केले. येऊ दे म्हणत चालत राहिली. किंचित वळणावर बर्फाच्या प्रचंड ढिगाऱ्यामागून एकदम एक धटिंगण आला आणि लिंडाच्या अंगावर येऊ लागला. तो माणूस तिच्या अंगचटीला येऊ लागला तसे ती ओरडू लागली.माणूस काही हटेना. त्या थंडीतही लिंडाला घाम फुटला. ती त्याला ढकलू लागली. पण उपयोग होईना. तो माणूस एकदम जोरात किंचाळला. त्या कुत्र्ऱ्याच्या प्रचंड धूडाने त्याच्यावर झेप घेतली होती. खाली लोळवले आणि त्याच्या पिंडरीचा कडकडून चावा घेतला होता. कशीबशी सुटका करून घेऊन तो गुंड पळाला.
लिंडाची छाती धडधडत होती. तोंडावर हात ठेवून मुसमुसत होती. कुत्र्ऱ्याकडे किती कृतज्ञतेने ती पाहात होती. दोघेही आता जोडीने निघाले. लिंडाने आपला हात त्याच्या पाठीवरच ठेवला होता. तिच्या कमरेपेक्षाही उंच असललेला तो कुत्रा शाळेपर्यंत आला.
शाळेचे मुख्य फाटक बंद होते. लिंडा मागच्या बाजूने निघाली. कुत्राही तिच्या सोबत निघाला. तिने मागचा दरवाजा जोराने खडखडावला . बँडमधल्या एका मुलीने दरवाजा उघडला. लिंडाचा चेहरा, एकंदर अवतार पाहून तिने लिंडाला काय झाले म्हणून विचारले. लिंडा घडलेले सांगू लागली आणि म्हणाली,” ह्या कुत्र्ऱ्याने मला वाचवले. माझ्या मागेच उभा आहे, तो पाहा,” असे म्हणत त्या दोघी मागे पाहू लागल्या.
तिथे कोणीही नव्हते!