आईडा आणि हॅरी

अर्नॉल्ड फाइन ‘ ज्युईश प्रेस’चे संपादक होते. त्यांना एक पत्र आले. अगदी वेगळ्या प्रकारचे पत्र होते. एका वाचकाचे असूनही ते वाचकांच्या पत्रव्यवहारातले नव्हते. पत्रात तिने लिहिले होते,”मी तुमचे सदर नेहमी आवडीने वाचते. केवळ भाषा शैली चांगली म्हणूनच नव्हे तर लिखाणातील भावनेचा ओलावा आणि त्यातून प्रतित होणारी सहृदयता यामुळे ते मला जास्त आवडते. तुम्ही मला मदत करू शकाल म्हणून मी हे पत्र लिहित आहे.”

“माझे वय आज ऐशी वर्षांचे आहे. मी विधवा आहे. पण मी अजूनही माझे पहिले प्रेम आणि माझ्या पहिल्या प्रियकराला विसरू शकत नाही. मी सतरा वर्षाची होते तेव्हा माझे आणि हॅरीचे प्रेम जमले. ते अजूनही तितकेच टवटवीत आहे. हॅरी त्यावेळी तेवीस वर्षाचा होता. आम्ही दोघेही एकमेकांचे जीव की प्राण होतो आणि आहोतही. वेड्यासारखे आम्ही एकमेकाच्या प्रेमात होतो.”
“पण माझ्या आई वडिलांना आमचे प्रेम पसंत नव्हते. माझे आई वडील श्रीमंत आणि समाजातील बडे प्रस्थ ; अमेरिकन जर्मन. हॅरीचे आई वडील नुकतेच पूर्व युरोपियन देशातून आलेले. माझ्या आई वडलांनी आमचे प्रेम सफळ होउ नये म्हणून जे जे करता येईल ते सर्व केले.”
“ते मला वर्षभर युरोपात घेऊन गेले. मी जेव्हा परत आले तेव्हा हॅरी या जगातून नाहीसा झाल्यासारखाच होता. तो कुठे निघून गेला होता कोणालाही माहित नव्हते. त्याने आपला पत्ता कोणाकडेही दिला नव्हता. कुठे जातो हे पण कोणालाही ठाऊक नव्हते. मी सगळीकडे कसून तपास केला. पण त्याचा ठावठिकाणा लागला नाही. ”
“काही वर्षानंतर माझे लग्न झाले. मला नवरा अतिशय चांगला मिळाला. सुस्वभावी, उमद्या मनाचा. सर्वच बाबतीत तो उत्तम माणूस होता. आमचा दोघांचा साठ वर्षाचा संसार फार आनंदाचा झाला. आमचे आयुष्य सुखाचे गेले. तो मागच्या वर्षी वारला.”
हे सगळे होउनही मी हॅरीला विसरत नव्हते. आजही त्याची मला आठवण येते. त्याचे काय झाले असेल ? तो कुठे असेल? तो जिवंत असेल काय? ह्या विचारांनी सैरभैर होते.”
“मला जाणीव आहे की मी अंधारात बाण मारते आहे. पण जर हॅरीला शोधून माझी आणि त्याची भेट घडवून आणेल तर ते तुम्हीच करू शकाल. मि.फाईन, तुम्हाला अनेक कामे आहेत. वेळ नसतो. पण शक्य असेल तर हॅरीचा ठावठिकाणा आपण शोधून काढा ही माझी तुम्हाला विनंती आहे.”
“मी क्राऊन मॅनॉर नर्सिंग होममध्ये असते. हे लॉन्ग बीच येथे आहे. हॅरीचा जुना पत्ता असलेले एक पाकिट तेव्हढे माझ्याकडे आहे. त्याचा काही उपयोग झाला तर पहा. ते सोबत पाठवत आहे. तुमच्या उत्तराची वाट पाहाते आहे. आपली, आईडा ब्राऊन”
पत्र वाचल्यावर फाईन थोडा वेळ स्तब्ध बसले. त्यांना फार कामे होती. कामात बुडून गेलेले असत.संपादक होतेच शिवाय ते एका शाळेत विशेष शिक्षकही होते. त्यात वर्तमानपत्राच्या इतर अनेक कामांची भर होतीच. पण ते पत्र अंत:करण हेलावणारे होते. त्यांनी आईडाला मदत करायचे ठरवले. आपला व्यावसायिक अनुभव आणि संबंध पूर्ण कसोटीला लावून ते रोज इडाच्या कामाला लागले.पण मनात धाकधुक होतीच, हॅरी जगात नसेल तर ते आईडाला कसे सांगायचे? .एक दोन महिन्यांनी ॲर्नॉल्ड फाईन प्रवास करून थकले होते तरी ते लगेच लाँग बीचला क्राऊन मॅनॉर नर्सिंग होममध्ये गेले. प्रथम ते सहाव्या मजल्यावर गेले. वयस्कर पण तडफदार वाटणाऱ्या, डोळ्यांत विनोदीवृत्तीची आणि मिस्किलपणाची झाक असलेल्या गृहस्थाच्या खांद्याभोवती हात टाकत त्याला घेऊन ते लिफ्टमध्ये घेऊन गेले. दोघेही तिसऱ्या मजल्यावर आले. तिथे आईडा वाट पाहात होती.
“हॅ…री?”आईडा भावनावेगाने किंचित कापऱ्या आवाजात म्हणाली. “अरे!.. अरे! कोण?…आई..डा.! तो चाचरत म्हणाला.
दोघांनाही इतके दिवस माहित नव्हते की ते एकाच नर्सिंग होममध्ये राहत आहेत!
एक दोन महिन्याने ॲर्नॉल्ड फाईन, मॅनॉर नर्सिंगमध्ये पुन्हा आले. ह्या खेपेस ते आईडा आणि हॅरीच्या लग्नाला आले होते. हे लग्न होण्यास साठ वर्षे वाट पहावी लागली!

[Based on stories from the book: Small Miracles: Extraordinary Coincidences from Everyday Life]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *